श्रमिकांच्या व्यथेवर मराठी साहित्यिकांनी दिलेला विचार मनात थैमान घालत असताना ख्रिस्त, रस्किन ते गांधी अशा सर्वच महापुरुषांनी केलेला या श्रमिकांचा गौरव आठवला. गांधींनी तर विलासाचे जीवन त्यागून श्रमिकच होणे पसंत केले होते. कालीनबाकसारखे गांधींचे कित्येक सहकारीदेखील समृद्धीकडून गरिबीकडे वळलेले होते.
शालेय जीवनात मराठी पाठ्यपुस्तकात वाचलेल्या काही कथा आजही माझ्या स्मरणात आहेत. या कथांमध्ये दरवर्षी निदान चारपाच कथा आणि एकदोन तरी कविता श्रमिक वर्गाच्या दयनीय स्थितीवर आधारलेल्या असायच्या.
रोजगार मिळवण्यासाठी त्यांचा चाललेला संघर्ष, त्यांच्या पोटात भुकेने सदैव पेटलेला वणवा आणि अगदी त्याच वेळी त्यांच्या आजूबाजूस वावरणारा आणि चैनी, विलासी जीवनात रममाण झाल्यामुळे संवेदनाहीन झालेला एक दुसरा समाजगट आणि त्याही गटातून या गरिबांची गरज समजून घेऊन त्यांच्या मदतीस धावणारा एखादा 'मसीहा' असा काहीसा या कथांचा ढाचा असायचा.
लॉकडाऊनच्या काळात हजारो मजुरांना कित्येक मैल पायपीट करावी लागली. कित्येकांना त्यात जीवदेखील गमवावा लागला. वृत्तपत्रात अशा मृत व्यक्तींचे फोटो पाहत असताना त्यात अस्ताव्यस्त झालेले त्यांचे साहित्य, त्यात दिसणारी भाकरी आणि पैसे पाहून काळीज पिळवटून गेले.
याच काळात गेल्या महिन्यात कॉलेजला गेलेलो असताना विले पार्लेच्या एरव्ही वेठबिगारांनी गजबजलेल्या बाजारात सन्नाटा दिसल्यावर दैनंदिन रोजगारासाठी पराकाष्ठा करणारे ते वेठबिगार आजच्या घडीला कुठे असतील, आपल्या दैनंदिन गरजा ते कशा भागवत असतील असे प्रश्न मनात उभे राहिले आणि पाठ्यपुस्तकातल्या त्या सर्व कथा पुन्हा आठवू लागल्या.
समाजाच्या अन्य घटकांसाठी आवाज उठवणारे नेते आहेत. त्यांच्या मागण्या सरकारपुढे ठेवणारी युनिअन्स आहेत. धनदांडग्यांच्या आत्महत्या आणि खूनप्रकरणाच्या तपासासाठी सरकारवर दबाव आणणारी पत्रकारिता आपल्याकडे आहे... परंतु प्रतिदिन मजुरीवर राबणाऱ्या मजुरांना कोण वाली आहे?
जर हा वर्ग एकजूट होत असताना दिसत असेल तर दडपशाहीचे हत्यार उपसून त्यांचा आवाज लगेच तिथल्या तिथे बंद करण्याची आपली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था! समाजाच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे कुणाचे कधी लक्षदेखील जाणार नाही अशा ठिकाणी त्यांनी जन्म घ्यावा आणि एक दिवस तिथेच दम तोडावा हा जणू त्यांच्यासाठीच असलेला एक अलिखित नियम!
ज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांची ‘दमडी’ नावाच्या एका आदिवासी कन्येची एक अशीच कथा त्या वेळी आठवून गेली. दमडी आपल्या म्हाताऱ्या आजीसोबत काबाडकष्ट करणारी मुलगी. बाजारात मिळणाऱ्या शेवेची चव आणि कुणा एका श्रीमंता घरी तिने पाहिलेल्या दुधाची चव कशी असावी हे तिचे कुतूहल. एक दिवस झोपलेली असताना तिला दिसते की, तिच्या डोक्यावर गवताऐवजी शेवेचा भारा आहे. थोडीशी शेव खाऊन पाहावी अशा विचारात ती असताना तिचे इमान आड येते आणि ती मनाशी ठरवते की, ही शेव मला त्या मुंडासेवाल्या बाबांपर्यंत पोहोचवायची आहे, त्याच्याकडून त्याचे पैसे मिळाले की मग मी स्वतः शेव विकत घेईन.
...मग ती स्वप्नातच एका मंदिरात जाते. तिथे विठू नारळ फोडत असतो. त्यातील थोडेसे खोबरे दाताखाली चावून त्यातून निघणारे दूध ती चाखणार इतक्यात तिची आजी तिला हाक मारते आणि दमडीची झोपमोड होते. अर्थात स्वप्नातही तिला या पदार्थांची चव घेता येत नाही. कथेचा शेवट करताना लेखिका दमडीच्या जगण्याच्या रहाटगाड्याचे चित्रण करत म्हणतात, ‘दीडदमडीचा चालता जीव तो… असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी… मग त्याच्या पुढल्याही.…’
असा हा श्रमिकांच्या व्यथेवर मराठी साहित्यिकांनी दिलेला विचार मनात थैमान घालत असताना ख्रिस्त, रस्किन ते गांधी अशा सर्वच महापुरुषांनी केलेला या श्रमिकांचा गौरव आठवला. गांधींनी तर विलासाचे जीवन त्यागून श्रमिकच होणे पसंत केले होते. कालीनबाकसारखे गांधींचे कित्येक सहकारीदेखील समृद्धीकडून गरिबीकडे वळलेले होते.
अर्थशास्त्रात मानवी क्रियांचा योग्य विचार न झाल्याने औद्योगिकीकरण, आर्थिक सुबत्ता हेच प्रगतीचे निकष ठरवले जात असताना रस्किनने पाश्चिमात्य साहित्यिकांची परंपरा राखत आपल्या 'Unto this last' या पुस्तकाद्वारे कामगारवर्गाचा सन्मान केला. पुढे जाऊन महात्मा गांधींनी तेच विचार ‘सर्वोदय’ या पुस्तिकेद्वारे भारतीय परिस्थितीला लागू करून दाखवले.
श्रमिकवर्ग अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा समाजाला पुरवतो... त्यामुळे श्रमिक वर्ग हाच खरा समाजाचा कणा आहे, या महात्म्याच्या विचारांची दखल मानवी सभ्यतेच्या संवर्धनासाठी घेणे केवळ महत्त्वाचे नसून अपरिहार्य आहे.
पाश्चिमात्य देशात आजही कित्येक धनदांडगे आपल्या वैभवाचा त्याग करून श्रमिकांत एकरूप होताना दिसत आहेत. लेखक ‘रॉबिन शर्मा’चे ‘द माँक व्हू सोल्ड हीज फेरारी’ हे पुस्तक अशाच परिवर्तनाची एक कथा वाचकांपुढे घेऊन येते. अशा वेळी श्रमिकांच्या जीवनात दिसणाऱ्या अंधारातही एक शाश्वत प्रकाश लपलेला आहे हा विचार मनात डोकावून जातो. लगेच इंग्रजी साहित्यिकांच्या रचना आठवतात ज्यांत श्रमिकांच्या जीवनाला एका आनंदयात्रेचे स्वरूप दिलेले जाणवते.
फ्रान्सिस डार्विन कॉनफोर्ड यांची ‘The Princess and the Gypsies’ ही अशीच एक रचना. महालाच्या प्रशस्त सज्जावर उभी असलेली एक सम्राज्ञी ज्या वेळी स्वच्छंदी असे जिप्सी लोकांचे जगणे पाहते, त्या वेळी तिला स्वतःच्या जगण्यातील बंधनांची जाणीव होते आणि ती त्या जिप्सींच्या जगण्याचा गौरव करत त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त करते... परंतु तिच्या त्या विनंतीवर ते जिप्सी त्यांच्या खडतर जीवनाचे स्वरूप तिच्यासमोर ठेवतात.
ते सम्राज्ञीला म्हणतात की, महालाच्या सुखात तुझे पाय गरम पाण्याने चांदीच्या पात्रात धुतले जातात... परंतु आमच्या सोबत आल्यावर चांदीसारख्याच दिसणाऱ्या परंतु रक्त गोठवणाऱ्या थंड झऱ्याच्या पाण्यातून तुला अनवाणी फिरावे लागेल. बारलीची कडू भाकरी कदाचित तुझ्या गळ्याखाली जाणार नाही. रस्त्याने जाताना कुत्रीदेखील तुझ्यावर भुंकतील. हे सर्व चालेल तुला?
अशा वेळी ती सम्राज्ञी त्यांच्यासोबत जाण्यास धजत नाही आणि माघारी वळते. त्या वेळी तिच्यावर उपहासाने हसलेले ते जिप्सी तिच्या हृदयास छिन्नविच्छिन्न करून जातात. थोडक्यात जिप्सिंचे स्वातंत्र्य त्या सम्राज्ञीला हवेहवेसे वाटते... परंतु ती स्वतः सुखविलासाच्या बेड्यांमधे अशी काही जखडली गेली आहे की, तिला इच्छा असूनही त्या जगात जाता येत नाही. कवीने इथे जिप्सींच्या खडतर जगण्यासोबतच त्यांच्या जगण्यातील मनमुराद आल्हाद... तर सुखोपभोगाच्या राशीतही अस्वस्थ असलेल्या त्या विवश सम्राज्ञीचे चित्र... दोन्ही मोठ्या सुबोध शब्दांत रेखाटले आहे.
रॉबर्ट लुईस स्टिव्हनसन यांची अलीकडेच वाचनात आलेली 'The Vagabond' ही कविता अशाच प्रकारे श्रमिकांच्या जगण्यातले स्वातंत्र्य अधोरेखित करते आणि तसे जगण्याची आकांक्षा व्यक्त करते. यात कवी संपत्ती, प्रेम, मित्रपरिवार अशा भौतिक सुखांची अपेक्षा न धरता अशा जगण्यावर प्रेम करतो ज्यात संभ्रमाचे सर्व धुके निघून जाईल आणि आनंदाच्या स्वर्गात तो प्रवेश करेल. हा स्वर्ग म्हणजे गवतावरील बिछान्यात लोळत ताऱ्यांचे घेतलेले विलोभनीय दर्शन आणि नदीच्या गोड पाण्यात बुडवून चाखलेल्या भाकरीची चव!
श्रमिकांचे आयुष्य तेच... परंतु या दोन्हीकडच्या साहित्यिकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून त्याची मांडणी केलेली आहे. एकीकडे आहे त्यांचे दारूण दुःख, दुसरीकडे त्या दुःखात लपून बसलेला परमानंद. एकीकडे जगण्याचा आणि दैनंदिन गरजा भागवण्याचा ज्वलंत प्रश्न, दुसरीकडे जीवनाच्या खऱ्या सुखाचे एक सरळसोपे उत्तर. एकीकडे परिस्थितीची गुलामी आणि पारतंत्र्य - किड्यामुंग्यांशी केलेली तुलना... तर दुसरीकडे निखळ-स्वच्छंदी जीवन, पशुपक्ष्यांप्रमाणे अनंतात विहार करणारे....
एका अर्थाने श्रमिक म्हणजे बहुजन आणि बहुजनांची सत्ता हा तर एक निसर्गाचा नियमच! परंतु या वर्गाने स्वतःच्या या सक्षमतेवर केलेले दुर्लक्ष हेच त्यांच्या मागासलेपणाचे खरे कारण. या दोन्हीही दृष्टीकोनांतून कुठला विचार घ्यावा हा पूर्णपणे व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाला... परंतु सध्याची जागतिक, राजकीय स्थिती लक्षात घेता आज खरोखरच प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर होण्याची वेळ आलेली आहे. ही आत्मनिर्भरता केवळ आर्थिक गोष्टींपुरतीच मर्यादित नसून स्वच्छता, राहणीमान, आहारविहार यांपैकी प्रत्येक गोष्टीसाठीच बाध्य झालेली आहे.
जर श्रमिकांनी स्वतःच्या दारिद्रयात लपलेल्या संपन्नतेचा शोध घेतला आणि धनिकांनी श्रमिकांच्या जीवनासोबत आपल्या जीवनशैलीचा सुयोग्य मेळ साधला तरच आत्मनिर्भरतेच्या दिशेने आपले खरे प्रयाण चालू होईल. कदाचित ख्रिस्ताने कल्पिलेले स्वर्गराज्य, नरसिंह मेहतांचे वैष्णव राज्य त्याच जगण्याची पुढची पायरी असेल.
(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक हे नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधीविचारांचे अभ्यासक आहेत.)
Tags: मॅक्सवेल लोपीस श्रमिक कामगार साहित्य लॉकडाऊन श्रमिकवर्ग Maxwel Lopes Labour Workers Literature Lockdown Load More Tags
Add Comment