निसर्गात रमलेला एक आधुनिक गांधीवादी

रॉब ग्रिनफिल्ड हे एक नाव सध्या सोशल मिडियावर गाजत आहे...

'द माँक हू सोल्ड हिज फेरारी' या रॉबीन शर्मा यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकातील नायक ज्युलिअन मँटन सुखासीन जीवनाच्या बेगडी रंगात लुप्त झालेला जीवनातील परमानंद शोधत निसर्गाच्या सान्निध्यात येतो व त्याचे जीवन अत्युत्तम आनंदाने भरून जाते. पैसा आणि फकिरी या दोघांमधे लपलेल्या जीवनाच्या मूलभूत आनंदाची ही कथा...! 

दादागिरी ते गांधीगिरीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मुन्नानामक एका शहरी गुंडाची कथा काही वर्षांपूर्वी चित्रपट स्वरूपात आपण पाहिली आणि काया, वाचा, मनाने गांधींना पाहणारा राजू हिरानींचा ‘मुन्नाभाई’ प्रेक्षकांच्या मनात सदैव घर करून राहिला. अशा कथा वाचायला आणि पाहायला खऱ्या वाटतात... परंतु खरोखरच ज्युलिअन आणि मुन्ना अशा व्यक्ती आजच्या ‘अर्थस्य पुरुषो दासः’ अशी स्थिती असलेल्या  जगात आढळू शकतात का... असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. 

रॉब ग्रिनफिल्ड हे एक असे नाव सध्या सोशल मिडियावर गाजत आहे जो ज्युलिअनप्रमाणे भौतिक साधनांचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगण्याचा संदेश आपल्या कृतीतून जगाला देत आहे आणि अगदी त्याच वेळी महात्मा गांधींच्या विचारांचा एक अनुयायी म्हणून त्या वाटेवर चालत असताना अगदी स्वप्नातदेखील मुन्नाप्रमाणे महात्म्याला भेटण्याची अनुभूती तो घेत आहे.   

उत्तर अमेरिकेतील विस्कॉन्सिन या राज्यातील ऐशलँड या एका छोट्या नगरात रॉबचे बालपण गेले. बालवीर घडवणाऱ्या बॉय स्काउट्स संस्थेत रॉबने ‘इगल स्काऊट’ ही सर्वोच्च श्रेणी वयाच्या अठराव्या वर्षी मिळवली. पुढे विस्कॉन्सिनला क्रॉस विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी मिळवून त्याने 2011मध्ये सॅन डिएगो येथे स्वतःची ‘द ग्रिनफिल्ड ग्रुप’ नावाची मार्केटिंग कंपनी सुरू केली. 

रॉबचे बालपण तसे आर्थिकदृष्ट्या खूपच बेताचे असल्याने त्याला अधिकाधिक संपत्ती मिळवण्यात रस निर्माण झाला होता. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत आपण एक अरबपती व्हावे हे त्याचे उद्दिष्ट होते. हळूहळू त्याचे जीवन मद्यपान, स्त्रीसुख यांत गुरफटू लागले... परंतु सुदैवाने वयाच्या चोविसाव्या वर्षी काही डॉक्युमेंटरीज्‌ पाहून रॉबचे परिवर्तन होऊ लागले व तो मानवाने विकासाच्या नावाखाली चालवलेल्या निसर्गाच्या अधःपतनावर विचारशील झाला. त्या विचारांना त्याने कृतीची जोड दिली. ‘मद्यपी युवक’ ते ‘समाजात सकारात्मक बदल घडवणारा युवक’ असा हा त्याच्या परिवर्तनाचा टप्पा होता. 

हळूहळू त्याने आपल्या जीवनशैलीत रासायनिक पदार्थांचा वापर टाळणे, अन्नपदार्थ पूर्णपणे सेवन करणे, स्थानिक वस्तूंचा वापर करणे, वस्तूंचा पूर्नवापर करणे असे छोटेछोटे बदल घडवायला सुरुवात केली. त्यानंतरची पायरी म्हणजे त्याने स्वतःची कार विकून टाकली, बँक अकाउंट्स बंद केले, पैशाचा वापर अगदीच घटवला. 2014मध्ये त्याने शेवटचे बील भरले आणि तेव्हापासून त्याने पैशाचे सर्वच व्यवहार बंद केले. आपली मार्केटिंग कंपनी बंद करून त्याने ‘हॅपी, हेल्दी अँड फ्री’ नावाची चळवळ स्थापन केली. 

कॅलिफोर्नियातील आपल्या 50 चौरसफुटांच्या घरात राहत त्याने सौर ऊर्जा, फक्त पावसाचे पाणी, सोनखत निर्मिती, शेती, मधुमक्षिका पालन असे प्रयोग राबवले. एक वर्ष सहज असे जगता येते हे सिद्ध झाल्यावर त्याने आपल्या या घराचा दहा हजार डॉलरला लिलाव करून त्या पैशातून सॅन डिएगो येथील निराश्रितांसाठी अशीच दहा छोटी घरं बांधून दिली. सध्या त्याचा निवास असलेले घर हे असेच केवळ 100 चौरस फुटांचे असून त्यासाठी केवळ वापर केलेल्या वस्तूच उपयोगात आणलेल्या आहेत. 

सतत पाच वर्षे आपल्या गरजा कमी करत त्याने फक्त आपल्या खांद्यावरील बॅगमध्ये सामावतील अशा 111 गोष्टींपुरत्या स्वतःच्या गरजा ठेवल्या (आता त्या वस्तूंची संख्यादेखील 44वर आलेली आहे) आणि साध्या जीवनाचा संदेश देत दोन वर्षे वेगवेगळ्या देशांत भटकंती केली. आजपर्यंत रॉबने सहा खंडांतील 45 देशांत खिशात एक छदामदेखील न ठेवता भ्रमंती केलेली आहे आणि त्यासाठी त्याला साहाय्यभूत ठरले आहे आजही या जगात तग धरून असलेले मानवतेचे भांडवल! स्वतः तयार केलेल्या बांबूच्या सायकलवर या निसर्गपुत्राने तब्बल तीन वेळेस पूर्ण संयुक्त राष्ट्रांमधून सवारी करत निसर्गाला पूरक जीवनशैलीचा संदेश दिलेला आहे.  

आजवर रॉबने केलेल्या या प्रवासाची दखल National Geographic, BBC, CBS This Morning, Discovery Channel, USA Today, LA Times, The Guardian, Huffington Post अशा वाहिन्यांनी घेतलेली आहे. या सर्व वाहिन्यांकडून मिळालेली नगद रॉबने निसर्ग बचावासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना दान केलेली आहे. 

2017मध्ये रॉबने जनजागृतीसाठी एक अजब चळवळ केली. ही चळवळ त्याला ‘The trash man’... अशी ओळख देऊन गेली. या मोहिमेत प्रत्येक व्यक्ती आपल्या बेमुक्त संसाधनांच्या वापराने निसर्गात किती टाकाऊ पदार्थ निर्माण करत आहे हा विचार पटवून देण्यासाठी त्याने एक महिना अमेरिकन नागरिक सरासरी वापरतो त्या गोष्टी वापरल्या आणि त्यांच्या वापरानंतर प्रतिदिन निर्माण होणारा 4.5 पौंड टाकाऊ घटक स्वतःच्या शरीराला बांधून तो गल्लोगल्ली फिरला. यातून आपल्या गरजांना लगाम घालण्याचा संदेश त्याने जगाला दिला. 

रॉबच्या मतानुसार संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिवर्षी 165 अब्ज डॉलर इतका अन्नाचा अपव्यय होत असतो आणि अगदी त्याच वेळी देशात पन्नास दशलक्ष इतकी लोकसंख्या अन्नावाचून राहत असते. या देशात 30 टक्के वस्तू न वापरता अगदी आहेत तशाच अवस्थेत कचरापेटीत फेकण्यात येतात.  या विरोधाभासाला आवर घालण्यासाठी रॉबने आपल्या दुसऱ्या सायकल सवारीच्या वेळी 'The Food Waste Fiasco' चळवळ सुरू केली. यानुसार रॉब कचरा पेटीत उतरून विनाकारण त्यात टाकण्यात आलेले पदार्थ जमा करत असतो व त्यांवर आपला गुजारा करून प्रत्येक नागरिकाला संसाधनांचा सुयोग्य वापर करण्याचा बोध तो देत असतो. त्याच्या या चळवळीत आता अधिकाधिक लोक सामील होऊन या पर्यावरणसंवर्धनाच्या कार्यास बळकटी देत आहेत.      

स्वतःला अपेक्षित असलेला बदल सर्वप्रथम स्वतःमध्ये करणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी रॉब ग्रिनफिल्डचे आदर्श आहेत. गांधींच्या कार्यावर रॉब इतका प्रभावित झालेला आहे की, मुन्नाप्रमाणे एकदा महात्मा गांधी रॉब ग्रिनफिल्डच्याही स्वप्नी आले होते. ते वर्ष होते 2019, महात्म्याच्या जयंतीचे 150वे वर्ष! रॉब त्यांच्याकडे पुढील ध्येयदिशा ठरवण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून पाहत होता. त्यानंतर भारतात येऊन गांधींजींच्या मार्गाने चालण्याचा संकल्प त्याने व्यक्त केला. 

द्रव्याची हाव न ठेवता पशुपक्ष्यांप्रमाणे जीवन जगल्यावर कुणीही आपले जीवन सुखकर करू शकते आणि निसर्ग त्याला शरण आलेल्या प्रत्येकाच्या गरजा पुरवण्यास पूर्णपणे  समर्थ आहे या ख्रिस्त आणि गांधी यांच्या विचारांचेच आधुनिक रूप रॉब हे नव्हे का! बायबलमध्ये ख्रिस्त आकाशातील पक्ष्यांचा दाखला देत वृथा संचय करण्याच्या प्रवृत्तीला आवर घालण्याची शिकवण देतात. रॉबच्या रूपातील हा संयुक्त राष्ट्रांतील आधुनिक गांधी आज तेच तत्त्वज्ञान आपल्या कृतीतून साकारत आहे.

 'लक्ष प्रभूचे चिमणीवरती, जरी विकते ती दमडीला
 मनुष्य हा चिमणीहून सान, सदा रक्षितो प्रभू  त्याला…

- मॅक्सवेल लोपीस

(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय संगीत आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)

Tags: लेख रॉब ग्रिनफिल्ड मॅक्सवेल लोपीस Maxwel Lopes Rob Greenfield Load More Tags

Comments: Show All Comments

Manasi K

Nice article

पांडूरंग आत्माराम थोरात

विश्वास बसत नाही पण सत्याचा प्रयोग करणारा हा महात्म्यांचा अनुयायी पाहिला की आपली मान खाली जावी अशी स्थिती. कुठून एवढे मोठे धैर्य गोळा केले असेल या राॅबने. श्री मॅक्सवेल लोपीस सरांना धन्यवाद.

Daniel M

रॉबविषयी महत्वाची, मौलिक माहिती.

Jayant Ghate

फार सुंदर लेखाने एका सुपरहीरोची गोष्ट लोपीस साहेबांनी सांगितली आहे. आता किती तरुण मंडळींंच्या पर्यंत ती पोहोचते ते या लेखाच्या वाचकांवर अवलंबून आहे. चला सर्वजण जमेल तितक्या मार्गाने ही प्रेरक कहाणी सर्वदूर पसरवूया!

शिरीष पाटील

न्यवाद मॅक्सवेल लोपीस, आपण जगात मानवता शिल्लक आहे असे लेखन केले आहे .धन्यवाद त्या राॅबला आणि तुम्हालाही अजूनयेतो वास फुलांना अजून माती लाल चमकते....

दीपक पाटील

गांधी विचारांचे व जीवनशैलीचे गारुड अनेक विदेशी व्यक्तीवर आहे..त्यातील राॕबचा परिचय होणे ही निखळ आनंदाची बाब ! सद्यस्थितीत गांधीप्रणित जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणारा हा लेख अतिशय मोलाचा व मार्गदर्शक ! मॕक्सवेल..धन्यवाद !!

Vinod Wagh

अशा अवलिया व्यक्ती आजही वास्तववादी जीवनात आहेत. सलाम राॅब.

Raymond B. Dabre

अतिशय सूंदर लेखन आहे. जसे संगीतात सुर, ताल, लय आणि आलाप ह्याचा मिलाप असतो. आणि संगीत बहारदार होते त्याचप्रमाणे तुमचे साहित्य, वाड्मय आणि ललितलेखन ह्याचा मिलाप आहे. तुम्ही ऐक उत्कृष्ट गायक ही आहात. ग्रेट सलाम तुमच्या लेखनाला आणि विचाराला.

Prasad John Dabre

Awesome...I m learning from my student..keep it up..God Bless U Dear Maxwell

Add Comment