मीरेचा स्वर - लता!

लता मंगेशकर यांच्या 92 व्या जन्मदिनानिमित्त...

28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांचा आज 92 वा जन्मदिवस. सन 1942 मध्ये अवघ्या 13 व्या वर्षी त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात झाली. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 980 हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यासोबतच वीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमधूनही त्यांनी गायन केले.  2001 मध्ये त्यांना 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संत मीरेच्या पदांना त्यांनी जो स्वरसाज चढवला त्याचा आस्वाद घेणारा हा लेख...

संत शिरोमणी मीराबाई मध्ययुगीन भक्ती आंदोलनातली प्रख्यात संत कवयित्री. मीरा ही एक गूढवादी होती. किंबहुना इतर सर्व गूढवादी द्रष्ट्यांमध्येदेखील मीरा आजवर गुढ होऊन राहिली आहे. मीरेभोवती ऐतिहासिक वलयही खूप मोठे आहे. तिची समृद्धी आणि तिचे सौंदर्य यांबद्दल लोकांच्या मनात विलक्षण कुतूहल आहे. एक राजकन्या आणि त्यातून झालेला तिचा भक्तीप्रवास इतका विस्मयकारक होता की, मध्ययुगातील मीरा पौराणिक पात्रांसोबत गणली जाऊ लागली. मीरेने परमार्थासाठी केलेला त्याग इतका विशाल होता की, इतक्या राजवैभवाचा त्याग करणारी मीरा सिद्धार्थ गौतमानंतर कदाचित पहिलीच संत असेल.

मीरेच्या भक्तीला काव्याची जोड होती. मीरेच्या काव्यात तिच्यातील संगीततज्ज्ञ, सत्याग्रही, बंडखोर, नृत्यांगना, सौंदर्यग्राही अशी अनेक रूपे उलगडत जातात. अशा या मीरेला चलच्चित्रांद्वारे साकारण्याचे बरेच प्रयत्न अगदी बालगंधर्वांपासून हेमामालिनीपर्यंत अनेकांनी केले. अगदी अलीकडेच तिच्यावर एक मालिकादेखील येऊन गेली. परंतु मीरेचे यथायोग्य दर्शन चित्रपटांतून कधीच झाले नाही. दुसरीकडे मीरेच्या पदांनाही गायनातून साकारण्याचे प्रयोग एम.एस. सुब्बलक्ष्मी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित कुमार गंधर्व अशा महान गायकांनी केले आणि अर्थात ते यशस्वी झाले. परंतु तरीही त्यातून मीरा पूर्णपणे उलगडत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. मुळात मीरेची पदे ही अनलंकृत आहेत आणि त्यांची अनलंकृतता हाच त्यांचा खरा अलंकार आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच महंतांनी मीरेच्या पदांना सांगीतिकदृष्ट्या बहुमोल अलंकारांचा नजराणा चढवला खरा! परंतु त्यात त्या पदांचा साधेपणा हा मुख्य अलंकारच हरवल्यागत झाला. परंतु ही कसरही भरून निघाली ज्या वेळी भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या 'चाला वाही देस' या ध्वनिफितीमार्फत मीरेला भारतरत्न लता मंगेशकरांच्या स्वरांचा अलंकार चढवला!

लतादीदींच्या आवाजातील साधेपणा, स्फटिक जलाप्रमाणे असलेला स्वच्छपणा आणि स्थितिस्थापकत्व, त्याच वेळी समुद्राच्या तळाप्रमाणे असलेली त्याची सखोलता ही त्यांच्यातील आणि मीरेच्या पदांच्या अभिव्यक्तींतील काही साधर्म्य स्थळे. दीदींनी आजवर जे गीत गायले त्या गीताचा लहेजा त्यांनी आपल्या आवाजात उतरवला आणि ते गीत पूर्णपणे आपलेसे करून टाकले. दीदींनी गीतांच्या शब्दांतून एखादी अभिव्यक्ती प्रकट करत असताना इतर गायकांप्रमाणे आवाजात जास्त फेरबदल केलेले आढळणार नाहीत. दीदींचा स्वर मुळात धीरगंभीर आणि कुठल्याही सप्तकात सहज खेळणारा असल्याने तो तर त्यांचा हुकमी एक्काच ठरतो! आणि या सर्व भांडवलासोबतच कुठलेही गीत गाताना मन शक्य तितके शांत ठेवण्याची योगविद्या दीदींना योग्यपणे आकळल्यामुळेच दीदींना मीरेचा आवाज होणे जास्त कठीण गेले नसणार!

मीरेच्या मूळ पदांत सर्व रसांचा भरभरून वापर झालेला आहे परंतु दीदींनी ही पदे गात असताना जोपासला आहे तो शांतरस! परंतु या शांतरसाचेही विश्लेषण केले तर स्वरांचे असे काही विराट रूप दिसू लागते की, सामान्य गायकासाठी ही पदे गात असताना तोच शांतरस त्यांच्यासाठी रौद्ररस होऊन जावा! उदाहरणच घ्यायचे झाले तर 'म्हारा री गिरीधर गोपाल' हे पद. यातील 'गिरीधर' या एका शब्दातील 'ध' आणि 'र' या दोन अक्षरांमधील दीदींनी केलेला स्वरप्रवास. या अतिसूक्ष्म अशा स्वरप्रवासात दीदींनी हरकत घेत मिंड घेतलेली आहे आणि हे सर्व करताना तालाचे गणित इतके अचूक सांभाळले आहे की, या इतक्याशा जागेत इतके काही केलेले असेल याची जाणीवही ऐकणाऱ्याला होणार नाही.

संगीत ही सूक्ष्मातून सुंदर आणि परिणामकारक होत जाणारी कला आहे आणि हे सूक्ष्म सौंदर्यदेखील दीदींवर भरभरून प्रसन्न झालेले आहे. दीदींच्या असंख्य गाण्यांतून या गोष्टींचा परिचय येत असतो. मग ती नैना बरसे गाण्यातील 'ना तुम आए ना मौत आयी' या ओळीतील 'आयी' या शब्दात 'आ' आणि 'यी' यां दोन अक्षरांमधील सूक्ष्मशी हरकत असो वा 'अजी रूठ़कर अब' या गाण्यातील 'हमे पाइएगा'मधील 'पाइएगा' शब्दाची नागमोडी हरकत असो! कदाचित दीदींच्या गायनात असलेल्या या अंगभूत सूक्ष्म सौंदर्यामुळेच दीदी मीरेचा स्वर होत असाव्यात का?

मीरेची पदे ही वरवर ऐकताना अत्यंत साधी, सरळ वाटली तरीही त्यांची उकल होणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. म्हणजे श्रीकृष्णाचे रूप वर्णन करत असताना मीरा अचानक एखाद्या दही घुसळवण्यासारख्या दैनंदिन क्रियेबद्दल बोलू लागते आणि त्या पदांच्या आस्वादकाला या विषयबदलाची उकल सहजासहजी होत नाही. ती उकल होण्यासाठी राजस्थानी, ब्रज, गुजराथी भाषांची तोंडओळख तर असावी लागतेच परंतु त्यापेक्षा त्या पदांवर दीर्घ चिंतन करावे लागते. दीदींनी गायलेली ही पदे सदर चिंतनास पूरक ठरतात आणि कधीकधी ती ऐकत असताना त्यांचा अर्थ आकळत जातो. दीदींची पदे ऐकत असताना मीरेच्या अशा कित्येक रचनांचा अर्थ मला एकाएकी समजून आल्याचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे.

हृदयनाथजी यांनी काही वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलेले होते की, दीदीशिवाय स्वर्गातील जर प्रत्यक्ष सरस्वती समोर आली तर तिलाच मी ही मीरेची गाणी देऊ शकतो. अर्थात पंडितजींचे हे बोल बंधूप्रीतीचे नसून एका खऱ्या संगीतकाराचे बोल आहेत, ही बाब कुठलाही संगीत समीक्षक अमान्य करू शकणार नाही. मीरेची केनु संग खेलु होली, म्हाई म्हाने सुपना मे परना रे दिनानाथ, सावरे रंग राची अशी बाळासाहेबांनी संगीतबद्ध केलेली कित्येक पदे ऐकताना आपणालाही तशीच जाणीव होते.

लतादीदींचे मीरेसोबत जुळलेले समीकरण असे काही आहे की, शांतारामबापूंच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेले 'जो तुम तुम तोडो पिया' हे मीरेचे पद ऐकावे. अगदी मीरेचे विरह भाव, तसेच स्वरांचे कंप, तीच भक्तीची गंभीरता आणि सात्त्विक आक्रमकताही! एरव्ही मीरेच्या राजपुती रूपाच्या जवळही न जाऊ शकणारी संध्या इथे मीरेचा आभास देऊ शकते ते केवळ दीदींच्या स्वरांमुळेच. पायोंजी मैंने राम रतन धन पायो हे मीरेचे पद तर गावे ते लता दीदींनीच! परंतु तरीही मीरेची खरी ओळख देतात ती मीरेची दीदींनी गायलेली बाळासाहेबांनी संगीतबद्ध केलेली पदेच! वास्तविक मीरेच्या पदांना स्वरात उतरवणाऱ्या दीदींइतकेच त्या पदांना सखोल समजून घेणाऱ्या पंडितजींचेही योगदान 'चाला वाही देस'च्या निर्मितीत तितकेच मोलाचे आहे. या भावंडांनी मीरेला असे काही उभे केले की, गुलजार यांच्या 'मीरा' चित्रपटाला संगीत देणारे प्रख्यात सतारवादक भारतरत्न पं. रविशंकर यांनी ही पदे ऐकल्यावर म्हटले होते की, मीरेच्या पदांना हात घालणे ही माझी चूक होती. असो.

संत मीरेने तिच्या पदांत साहित्यिक अलंकारांचा वापर केलेलाच नव्हता असे नव्हते. अतिशयोक्ती, रूपक, विप्सा, उत्प्रेक्षा अशा कितीतरी अलंकारांचा तिथे भरभरून वापर झालेला आढळतो. परंतु मीरेच्या भक्तीची तृष्णा, तिच्या विरहाची तीव्रता इतकी प्रखर होती की, त्या अतिशयोक्तीदेखील फिक्या वाटू लागतात. तीच गत इतर अलंकारांचीही होते. त्यामुळे अंततः अलंकारांचा वापर होऊनही ती पदे अनलंकृत ठरतात. नेमकी हीच गोष्ट दीदींच्या गायनाबाबत होते. गाताना दीदींची भावविभोरता इतकी उंच पातळीला पोहोचते की, गायनाच्या इतर सगळ्या कलाकुसरी त्या संगीतसागरात छोट्याछोट्या लहरी होऊन मिसळू लागतात आणि आपल्यापुढे उभा राहतो तो स्वरसागर! मीरेच्या भक्तिसंगीताने भरलेला अथांग स्वरसागर!

1979मध्ये लंडनच्या रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये जगप्रसिद्ध व्रेन वाद्यवृंदासोबत दीदींनी मीरेचे 'चाला वाही देस' हे पद गायले होते. दीदींनी गाताना आपली साधीसोपी गायकी जपत फक्त तानपुऱ्यासोबतच ते गायले. जणू घनदाट जंगलातल्या एखाद्या पर्णकुटीत बसून मीराच हे पद गात होती. दीदींचे पद गाऊन झाल्यावर व्रेन ऑर्केस्ट्राने तेच पद आपल्या अगदी ग्रँडस्टाइलमध्ये वाजवले. जणू पर्णकुटीतील मीरा संत पीटर बॅसिलिकाप्रमाणे दिसणाऱ्या स्वर्गाच्या एका भव्य महालात पोहोचलेली होती. पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या संगीताचा हा अनोखा मिलाफ अद्भूत होता. तो विश्वशांतीचा आणि बंधुत्वाचा उपदेश देत होताच. परंतु त्या सादरीकरणानंतर मीरेच्या पदांना सर्वार्थाने संगीताची साथ मिळालेली होती आणि मध्ययुगातील मीरेच्या स्वरांचे दर्शन या आधुनिक युगात साऱ्या जगाला घडले होते….

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 

(लेखक संत मीराबाईंच्या साहित्याचे अभ्यासक असून संत मीराबाईंवरील त्यांचे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत आहे.)

Tags: लता मंगेशकर मीराबाई मॅक्सवेल लोपीस संगीत भक्तीगीत lata mangeshkar mirabai maxwel lopes music Load More Tags

Comments:

Komal Kelkar.

Very well written Maxwell. लता दिदींच्या गाण्यातल्या अगदी बारीक बारीक गोष्टी तू नोट केलेल्या आहेस. आणि या लेखातून अगदी सहजरित्या त्या वाचकांना सांगितल्या आहेस. संत मीराबाई यांच्याबद्दल ही छान माहिती दिली आहेस. शुभेच्छा.

दीपक पाटील

एका अदभूत..दैवी..तरीही साध्या लोकभाषेत असलेल्या रचनांना हृदयनाथजींनी लतादिदींचा स्वरसाज दिला अन् संत मीराबाई प्रत्येकाच्ला भावनिक..सात्विक व प्रासादिक साद देऊ लागल्या. ही गीते ऐकताना शरीरभर उठणारी आंदोलने ही भाषा..प्रांत..संस्कृती..धर्म यांच्या सीमापार कधी घेऊन जातात हे ऐकणारास कळतही नाही. मॕक्सवेलजी यांनी या लेखातून येणा-या पुस्तकाची चुणुक दाखवली आहे. उत्सुकता वाढवली आहे. श्रद्धा ही धर्मातीत व विश्वव्यापी असून तीला कुठल्याही एका धर्माचे लेबल लावून बंधनात अडकवता येत नाही हेच त्यांच्या लेखनातून जाणवते.

Sadhana Kshirsagar

Great achievement Lata didi.

Add Comment