बंदिश बँडिट्स - एक सांगीतिक अहंकथा

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील चर्चित वेबसिरीज विषयी...

फोटो सौजन्य: Meta Reel

रॉक संगीताच्या भरमसाठ फैलावात एकीकडे भारतीय संगीत झाकोळले जात असतानाच्या या काळात भारतीय तरुणाईला आपल्या समृद्ध वारशाचा विसर पडत चालला असल्याची खंत सातत्याने व्यक्त केली जाते. अशा काळात अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सध्या लोकप्रिय होत असलेली ‘बंदीश बँडिट्स’ ही वेबसिरीज संगीताच्या या महान परंपरेला नवसंजीवनी देण्यास कारक ठरत आहे आणि त्याच वेळी बुरसटलेल्या मतांना चिकटून बसलेल्या आपल्या दिग्गजांसाठी अंकुश बनून संगीत प्रसारातल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्मरणही ती करून देत आहे.

उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात घराणेदार गायकीची एक समृद्ध परंपरा आहे. या परंपरेने आपल्या कर्मठ स्वरूपात दुसऱ्या घराण्यातले उत्तम, उदात्त आणि उन्नत स्वीकारणारा अभिजात विचार खुंटवून ठेवलेला होता. आजच्या नफेखोरीच्या स्पर्धात्मक युगातही खुळचट वाटावी अशी स्वत्व जपणारी गळेकापू स्पर्धा घराण्याघराण्यांत होती. 

आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक संक्रमणात ते वैमनस्य जरी संपलेले असले तरीही त्याचे भग्नावशेष अजूनही डोके वर काढून आहेत. मराठी रंगभूमीवरच्या 'कट्यार काळजात घुसली'नंतर घराणेशाहीच्या बंधनात पुन्हा एकदा झालेली मानसिक घुसमट ‘बंदीश बँडिट्स’मध्ये समर्थपणे चित्रीत केलेली आहे.

कथेची सुरुवात राठोड घराण्याचे संस्थापक पंडित राधे मोहन राठोड (नसीरूद्दीन शाह) यांच्या कडव्या शिस्तबद्ध तालमीतल्या प्रसंगाने होते. पंडितजी हे त्यांच्या घराण्याप्रति असलेल्या निष्ठेसाठी ख्यातनाम आहेत. कुटुंबाच्या आर्थिक संघर्षातही ते केवळ आपल्या घराण्याचाच विचार करतात. त्यांच्या कठोर साधनेपुढे आणि शिस्तीपुढे कुणाचाच टिकाव लागत नाही. त्यांना 'राधे' (ऋत्विक भौमिक) या त्यांच्या नातवाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. राधेची खडतर मेहनत त्याला पंडितजींचा गंडाबंद शिष्य होण्यास पात्र बनवते... परंतु दैवाचा अजब खेळ म्हणावा तशी तमन्ना (श्रेया चौधरी) नावाची एक पॉप सिंगर त्याच्या आयुष्यात येते. ती राधेला रॉक म्युझिकच्या दुनियेत नेऊ पाहते आणि राधेसुद्धा आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्या संधीचा लाभ घेतो. 

स्वतःला पंडितजींपासून वाचवण्यासाठी तो 'मास्क मॅन' या मुखवट्यामागे आपली खरी ओळख लपवतो... तर दुसरीकडे जोधपूर संस्थानाच्या वार्षिक संगीत सम्राट स्पर्धेत, ज्यात गेली २६ वर्षे पंडितजी अजय संगीत सम्राट आहेत; त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते राधेला तयार करत असतात... परंतु एक दिवस राधेची भीती वास्तव ठरते आणि पंडितजींना ‘मास्क मॅन’चे गुपित कळते. राधेचे संगीतशिक्षण तिथेच थांबण्याच्या मार्गावर असताना त्याची आई मोहिनी (शिबा चड्डा) राठोड घराण्याची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी मुख्य कथानकात प्रवेश घेते.

कधीकधी शांतता हजारो शब्दांनाही भारी पडते. मोहिनीच्या चेहऱ्यावरची शांतता काहीशी अशीच दाखवली आहे... मात्र मध्यांतरानंतर त्या शांततेला खऱ्या अर्थाने शब्द फुटतात. मोहिनीच्या तोंडी सुरुवातीपासूनच अगदी जुजबी संवाद दिलेले आहेत... पण राधेला तिने दिलेल्या मागर्दर्शनपर सूचनांतून संगीत शिकणारा खरा साधक सहज अंदाज बांधू शकतो की, मोहिनीचे संगीतविषयक ज्ञान केवळ त्या कलेच्या सखोल साधनेतूनच मिळणारी मौक्तिके आहेत. आईकडून संगीताचे धडे घेत असताना राधेला शरीराच्या हरएक हालचालीत लपलेले संगीत पाहण्याची दृष्टी मिळते. संगीतासोबतच राठोड घराण्याचे अनेक छुपे भेद त्याला कळतात. अगदी त्याच्या आईच्या संगीतज्ञानासंबधी असलेले गूढही!

अगदी त्याच वेळी... पंडितजींना पहिल्या बायकोपासून असलेल्या दिग्विजय (अतुल कुलकर्णी) या मुलाचा मालिकेत प्रवेश होतो आणि राठोड घराण्याच्या अकल्पित रहस्यांची मालिका अशिष्टपणे थैमान घालू लागते. दिग्विजय हा बिकानेर घराण्यातला एक ख्यातनाम गायक आहे आणि पंडितजींनी त्याला स्वतःचा वारस म्हणून घोषित करावे अशी मनीषा तो बाळगून आहे. एका अर्थाने दिग्विजय या कथेचा नायक म्हणून शोभू शकतो. लहानपणापासून पंडितजींनी त्याला अनौरस संतानाप्रमाणे वागणूक दिली. पंडितजींच्या ताठ्यामुळेच त्याचा प्रेमभंगही झाला. पात्रता असूनसुद्धा पंडितजी त्याला स्वतःचा वारस मानत नाहीत आणि याउपर कहर म्हणजे संगीत सम्राट स्पर्धेत दिग्विजयला आव्हान देण्यासाठी पंडितजी राधेला उभा करतात. अशा प्रकारे कथानकाचा प्रवास प्रेक्षकांना त्या रोमांचक प्रसंगापर्यंत घेऊन जातो. 

‘बंदीश बँडिट्स’ घराण्यांमधल्या संघर्षापुरती मर्यादित राहत नाही. दोन भिन्न कलाभ्यासांतले द्वंद्व ही मालिका उत्तम प्रकारे रेखाटते. एकीकडे राधेची रागसाधना तर दुसरीकडे तमन्नाचा संगीतात भौतिक सुखाचा मार्ग शोधणारा दृष्टीकोन. त्या अर्थाने तमन्ना ही 'लाईक, शेअर अँड सबस्क्राईब' पद्धतीच्या आधुनिक पिढीची प्रतिनिधीच! 'तुम्हारा म्युझिक थोडीही राग है? उसे तो हप्ते बाद कोई याद भी नही करेगा...' हा राधेने मारलेला टोला ग्लॅमर दुनियेच्या अशाश्वततेवर भाष्य करून जातो. शाश्वततेशी फारकत पत्करलेली आणि शॉर्टकट्‌स शोधणारी, तंत्रज्ञानाच्या बुरख्याआड चुका लपवणारी अशी ही आधुनिक संगीताची शिक्षण पद्धती.

अगदी त्याच वेळी परंपरेचे दास्यत्व पत्करलेल्या आपल्या गुरुजनांनाही ही मालिका चांगले अंजन देते. जिला ईश्वराचा दर्जा दिलेला आहे अशा कलेच्या संवर्धनाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा चौकटीच्या बाहेर उपयुक्ततावादाच्या दिशेने काही अंशी मार्गक्रमण करावेच लागते याची जाण प्रत्येक कलाकाराला असणे हे कलेसाठी आणि त्या कलाकारासाठी कधीही हितकरच. आपल्या संस्कृतीत गुरूला देवाचा दर्जा आहे आणि शिष्याने गुरूमध्ये देवत्व पाहणे रास्तच आहे... पण ज्या वेळी हे गुरूच स्वतःला देव समजू लागतात आणि कलेचा प्रसार करण्यात आडमुठेपणा दाखवतात तेव्हा त्या कलेचा वाली कोण?

या अशा मानसिकतेनेच भारतीय संगीताचा प्रसार हवा तसा झाला नाही आणि बहुजनांचे संगीत हे केवळ मूठभर गुणीजनांपुरतेच मर्यादित होऊन बसले. वैश्विकीकरणाच्या या युगात आपल्या गुरुजनांना उदारीकरणाचे धोरण संगीतातही लागू करावे लागेल आणि आपल्या संकुचित वृत्तीला तिलांजली द्यावी लागेल. शेवटी समन्वय हासुद्धा एक मूलभूत सिद्धान्त आहेच ना....

‘बंदीश बँडिट्स’ ही मालिका 'बैजू बाबरा' या चित्रपटाची आठवण जागी करते. या चित्रपटातले बैजू आणि तानसेन यांच्यातल्या जुगलबंदीचा प्रसंग  सहज डोळ्यांसमोर तरळतो. त्या प्रसंगामध्ये संगीताला एका  वैश्विक भाषेच्या रूपात प्रेक्षकांपुढे ठेवले गेले होते... परंतु ‘बंदीश बँडिट्स’मध्ये दुर्दैवाने हा संदेश दुर्लक्षिला गेलेला आढळतो.

मालिकेच्या शेवटच्या दृश्यात राधेकडून पराभूत झाल्यावर दिग्विजय राधेच्या कानात पुटपुटतो, 'ये घराना मेरा है और इसे मैं लेकर रहुँगा ।' तमन्ना जी राधेच्या प्रेमात आहे ती त्या प्रेमातही आपण राधेपेक्षा संगीतात हीन आहोत या मत्सरयुक्त भावनेलाच जास्त प्राधान्य देते आणि संगीतसाधना करण्यासाठी त्याच्या आयुष्यातून निघून जाते. पुन्हा बैजूची कथा खऱ्या संगीतप्रेमींच्या मनाचा ताबा घेते; ज्यात बैजू प्रेमापुढे आपले संगीत आणि आयुष्यसुद्धा समर्पित करतो.' संगीत ही एक प्रेमसाधना आहे...' असा संदेश जर या कथेत दिला असता तर कदाचित ही सांगीतिक प्रेमगाथा ठरली असती.

तरीही उतावळ्या मनाच्या आधुनिक विद्यार्थ्यांना आणि परंपरेचे जोखड वाहत बसलेल्या गुरुजनांना योग्य तो पाठ शिकवणारी ही कथा जीवनात समतोल आणि परिवर्तन  आणण्याचा विचार देत राहते हे स्वागतार्हच आहे. 

‘बंदीश बँडिट्स’ ही तमन्नाची आणि राधेची अपरिपक्व प्रेमकथा आहे... तर दिग्विजयची आणि मोहिनीची भंगकथा... पण सर्वात महत्वाचे म्हणजे ही एका विद्वानाची अहंकथा ठरते.

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 
(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.)

मूळ इंग्रजी लेख: Bandish Bandits: Back to Indian classical 

Tags: कला संगीत मॅक्सवेल लोपीस बंदीश बँडिट्स शास्त्रीय संगीत नसिरुद्दीन शाह अतुल कुलकर्णी Maxwel Lopes Music Classical Music Amozon Prime Amazon Prime Video Bandish Bandits Nasiruddin Shah Atul Kulkarni Load More Tags

Comments:

विठ्ठल कामाण्णा

सुंदर व अभ्यासपूर्ण लेख ,, कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित पणा न ठेवता तटस्थपणे केलेली मांडणी

Hira

चित्रकथात्म सांगितिक संघर्षाचे अतिशय साक्षेपी विवेचन .खूप आवडले.

M Kulkarni

Excellent review that is based on minute observation and in depth study

Add Comment