उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे प्रगल्भ दर्शन

शोभा नाईक लिखित इरावती कर्वेंचे कार्यचरित्र

साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते' या मालिकेत डॉ. इरावती कर्वे यांचे डॉ. शोभा नाईक यांनी लिहिलेले ‘इरावती कर्वे’ याच शीर्षकाचा मोनोग्राफ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गतशतकातील व्यासंगी मानववंशशास्त्रज्ञ आणि बुद्धिप्रामाण्यवादी संशोधक डॉ. इरावती कर्वे या अग्रभागी तळपणाऱ्या न्या विदुषी आहेत. एवढ्यानेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सम्यक दर्शन घडत नाही. याहूनही विविध पैलूंनी युक्त असलेल्या त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेचा आवाका फार मोठा आहे. त्यांनी मागे ठेवलेला ज्ञानमय वारसा अतुलनीय आहे. त्या पासष्ट वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. अधिक काळ जगल्या असत्या तर भारतीय ज्ञानसंपदेत आणखी मोलाची भर पडली असती यात तिळमात्र संशय नाही. 

अभिरुचि, व्यासंग, रसिकता आणि मूलगामी संशोधनाची वृत्ती आपल्या कृतिशीलतेने कशी वाढवावी याचे आत्मभान आणि अविश्रांत परिश्रमांनी, विधायक कार्य करून मिळवलेल्या ज्ञानाचा विस्तार कसा करावा याचे समाजभान इरावतीबाईंकडे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील तेजोमयता पाहून त्यांच्या सासूबाई बाया कर्वे यांनी तसेच सव्यसाची साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही त्यांना ‘दीपमाळ' म्हटले होते. आणि नामवंत कथाकार डॉ. विद्याधर पुंडलिकांनी चैतन्याची समाजशास्त्राची समर्थ वेल' या शब्दांत गौरव केला. त्यांच्या तेजस्वितेचे गुणगान याहून अन्य कोणत्या विशेषणांनी करणार?

या पुस्तकाच्या लेखिका डॉ. शोभा नाईक यांनी हे चरित्र अत्यंत समरसतेने लिहिले आहे. यापूर्वी विदुषी दुर्गाबाई भागवत यांचे चरित्रही त्यांनी समर्थपणे लिहिले होते. त्या प्रथितयश कवयित्री आणि रसज्ञ समीक्षक आहेत. भारतीय स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि अनुवादक म्हणूनही त्या मराठी साहित्य जगताला परिचित आहेत. बेळगावच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये त्यांनी दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केले. काही वर्षे प्राचार्यपद भूषवून त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या या चरित्रात पाच प्रकरणे आहेत. १. इरावती कर्वे : वाङ्‌मयीन व्याक्तिमत्त्व २. ललित लेखन ३. संशोधनपर लेखन ४. युगान्त आणि ५. समारोप. याशिवाय शेवटी तीन परिशिष्टे जोडलेली आहेत.

पहिल्या प्रकरणात इरावतीबाईंच्या समृद्ध जीवनाचे दर्शन घडविले आहे. सुरुवातीलाच लेखिका म्हणते, "माहेराकडून त्यांना समृद्ध वृत्तीचा, कोणत्याही प्रश्नाकडे डोळस व वास्तववादी दृष्टीतून पाहण्याचा तसेच श्रद्धा आणि चिकित्सा यांचे संमिश्रण झालेल्या स्वभावाचा वारसा मिळाला, तर सासरी, स्त्रीशिक्षणासंदर्भातील सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाची प्रयोगशीलता राबवली जात होती. वैशिष्ट्यपूर्ण माहेर आणि सासर यांच्या मुशीतून घडलेल्या इरावती यांच्या रूपात महाराष्ट्राला एक वाङ्‌मयीन आणि संशोधकीय कर्तृत्व सिद्ध करणारे स्त्रीरत्न लाभले. 

इरावती कर्वे यांनी ललित आणि संशोधनपर या दोन प्रकारांत लेखन केले. परिपूर्ती (१९४९), भोवरा (१९६०), युगान्त (१९६७) आणि (१९७१) गंगाजळ (१९७६) ही त्यांची ललित साहित्य प्रकारात मोडणारी पुस्तके आहेत, तर मराठी लोकांची संस्कृती (१९५१), आमची संस्कृती (१९५०), हिंदूंची समाजरचना (१९६७) महाराष्ट्र : एक अभ्यास (१९७१), धर्म (१९७१), संस्कृती (१९७२), किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३) याचा हिंदी अनुवाद - भारत में बंधत्वसंगठन (१९७३) आणि हिंदू समाजः एक अन्वयार्थ (१९७५) इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. शिवाय इंग्रजीतील १२ शोधनिबंध / लेख लिहिले आहेत.

शोभा नाईक म्हणतात, “त्यांचे ललितलेखन स्वानुभवावर आधारित, मूल्याधिष्ठित, स्वैर, चिंतनात्मक, आस्वादक स्वरूपाचे आहे. तर संशोधनपर लेखन हे मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या भूमिकेतून भारतीय समाज आणि संस्कृतीचे चिंतन करणारे आहे. या दोन्ही प्रकारच्या लेखनात त्यांनी कमालीची तार्किक चिकित्सा प्रस्तुत केलेली आहे. विषयाच्या व्यासंगातून गाढ संशोधन करून विद्वानांसमोर विषय मांडून झाल्यावर मग त्यावर ललितलेखन केले आहे. माणसाची, समाजाची मनोभूमिका सखोलतेने जाणून घेतल्याचे त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसते.”

'ललित लेखन' या प्रकरणात परिपूर्ती, भोवरा आणि गंगाजळ या तीन ललित निबंध संग्रहांचे लेखिकेने १८ पृष्ठांत सांगोपांग, रसग्राही विवेचन केले आहे. पण त्याचबरोबर मनःपिंडाने संशोधक असलेल्या इरावतीबाईंच्या संशोधनात्मक लेखनाची बलस्थाने लेखिकेने नेमकेपणाने अधोरेखित केली आहेत, त्यांच्या लेखनात वैचारिकता आणि चिंतनशीलता असून ललितनिबंधाच्या शैलीत त्यांनी ती मुरवून घेतली आहे. त्यांची सुक्ष्म निरीक्षणशक्ती, भारतीय मूल्यव्यवस्थेतील मूलगामी भाष्य जागोजागी आढळते; पण येथे रससौंदर्याला कुठेही बाधा येत नाही. भारतीय संस्कृतीच्या अंगाने आलेला स्त्रीवादाचा प्रभाव येथे जाणवतो, इत्यादी निरीक्षणे लेखिकेने नोंदवली आहेत.

‘मराठीतील ललितनिबंधाला डॉ. इरावतीबाईंनी काय दिले?’ या संदर्भात लेखिकेने काही मार्मिक मते मांडली आहेत. मानववंशशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी मराठी ललितनिबंधात नव्या विषयांची खैरात केली. बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन, थायडियन, ग्रीक, हडप्पा आणि मोहेंजोदारो या संस्कृतींचा अभ्यास केला. उत्खननातून सापडलेली स्नानगृहे, ब्राह्मी लिपी, वास्तुशिल्पे यांचा अन्वयार्थ लावण्यात इरावतीबाई गढून गेल्या होत्या. हिंदुस्थानात संस्कृती आहे आणि युरोपात वसाहती आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय संदर्भातून सावधगिरी बाळगत स्त्रीवादी पावले टाकली पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. या संदर्भात परिपूर्ती या ललित निबंध संग्रहातील प्रेमाची रीत, वेड लागलेले घर, जन्मांतरीची भेट, स्त्री आणि संस्कृती, स्त्रीराज्य, मारीकुट्टी, मराठ्यांचा मठ्ठपणा, महार आणि महाराष्ट्र, सुप्त इच्छा, एक प्रयोग आणि परिपूर्ती या ललित न निबंधांचा उल्लेख लेखिकेने केला आहे. तसेच ‘वाटचाल' हा पंढरपूरच्या वारीचे वर्णन करणारा अप्रतिम लेख आहे. भाषा, संस्कृती, मराठी माणसे, वारकरी समाज, त्यांच्या अनुभूती, त्यांच्या भावना चित्रित करण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. हा लेख मराठी संस्कृतीच्या या उन्नत अवस्थेचे दर्शन सहजतेने घडवतो.

मानवी संस्कृती हा इरावती कर्वे यांचा आवडता विषय आहे त्यामुळे त्यांनी सर्वत्र भ्रमंती केली. तेथील माणसे त्यांचा अध्ययनाचा विषय आणि साधने बनली. स्त्री आणि संस्कृती आणि गौराई यांसारख्या ललित लेखांतून स्त्रियांचे प्रारूप रेखाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे लेखिकेचे मत आहे.

‘भोवरा' या ललितनिबंधसंग्रहातील 'आजोबा' हे व्यक्तिचित्र संस्मरणीय आहे. विचार करायला लावणारे आहे. महर्षी कर्वे यांचे ते व्यक्तिचित्र आहे. रॅङ्गलर र. पु. परांजपे यांचे ‘दुसरे मामंजी' हे व्यक्तिचित्रउल्लेखनीय आहे. मल्हार या ललितनिबंधात इरावती कर्वे यांचे संवेदनशील कविमन आढळते.तर  तितिक्षा' या ललितनिबंधात त्यांनी भारतीय जीवनशैलीतील वास्तव शोध घेतला आहे. “ललित लेखांची मौलिकता ही त्या त्या साहित्यिकाच्या अंतर्मनाच्या अनवट स्पंदनांशी थेट जुळलेली असते हे इरावती कर्वे यांच्या लेखांनी अधिकच सुस्पष्ट केलेले आहे.” असे मत लेखिकेने व्यक्त केले आहे. नरहर कुरुंदकरांनी तर इरावतीबाईंना मराठी ललित निबंधाच्या अग्रदूत म्हटलेले आहे.

तिसऱ्या प्रकरणात इरावतीबाईच्या संशोधनपर ग्रंथांचा परामर्श घेतला आहे. धर्म, संस्कृती, समाज, आणि मानववंशशास्त्र या संदर्भातील त्यांचे मूलगामी विवेचन अभ्यासनीय आहे. त्याचे सार सांगताना डॉ. शोभा नाईक म्हणतात, "इरावती कर्वे यांनी संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती, भारतीय संस्कृती या विषयांची आवडीने पाठपुरवणी केली... भारत देशाचे सौंदर्य हे विविध भाषा-संस्कृतींच्या सहवासातून वृद्धिंगत होत आलेले आहे ही गोष्ट त्यांच्या ध्यानी आलेली होती. महाराष्ट्र संस्कृतीचा विचार करताना त्याच्या शेजारी असणाऱ्या राज्यांच्या संस्कृतीचाही विचार केला पाहिजे असे मत त्यांनी आग्रहाने मांडले. एक महाराष्ट्र समजून घेताना हिंदुस्थानाचे वेगवेगळे प्रांत, विविध भाषांचे अस्तित्व, त्या त्या प्रांतांतील रीतिरिवाज, तेथील धार्मिक व्यवहारांचे स्वरूप यांचे संशोधन सूक्ष्मतेने प्रस्तुत केले. संस्कृतीची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी भारतीय सामाजिकतेचे विविध स्तर विचारात घेतले. केवळ ठराविक अशा पुढारलेल्या जातींच्या अभ्यासातून संस्कृती विचार सिद्ध होत नसतो. तर मागे राहिलेल्या जाती जमाती अगदी आदिवासींच्या जीवनपद्धतींचाही विचार सूक्ष्मतेने झाला पाहिजे हा आग्रह त्यांनी धरला. माणसाबाबतच्या निखळ आस्थेतूनच त्यांचा सर्व संशोधनविचार स्फुरलेला आहे. या इरावती कर्वे यांच्या संशोधनामागच्या प्रेरणा आणि धारणा कोणत्या होत्या हे समजून घेणारे हे प्रकरण आहे.

चौथ्या प्रकरणात इरावतीबाईंच्या 'युगान्त' या महाभारतविषयक ग्रंथाचा सूक्ष्म मागोवा घेतलेला आहे: मराठीत महाभारतावर भाष्य करणारे अनेक ग्रंथ आहेत. त्यांत युगान्त ह्या ग्रंथाचे मोल विशेष आहे. इरावतीबाईंनी महाभारताकडे इतिहासतल्या त्या काळाचे जीवन आणि विचार यांचे सखोल आणि व्यापक चित्रण करणारा संदर्भग्रंथ म्हणून आणि महाभारतातील व्यक्तिरेखांकडे 'माणूस' म्हणून पाहिले आहे. माणसांमधील सुष्ट-दुष्ट प्रवृत्तीचे कंगोरे आणि मानवी प्रमाद‌शीलता आणि नियतिनाट्य यांमुळे महाभारताला शोकात्मिकेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. असे इरावतीबाईंना वाटते. गांधारी, द्रौपदी, मयसभा, शेवटचा प्रयत्न, परधर्मो भयावहः, कृष्ण वासुदेव, कुंती, मी कोण आणि युगान्त असे दहा लेख आहेत. महाभारतात महर्षी व्यासांनी भारताच्या समृद्ध संचिताचे अवगाहन केले आहे. इरावती कर्वे यांनी या विशाल ग्रंथाचा धांडोळा एक मानववंशशास्त्रज्ञ, प्रज्ञावंत संशोधक, आणि सर्जनशील साहित्यिक या नात्याने घेतला आहे. तो सर्वसामान्य रसिकांपासून ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठ समीक्षकांपर्यंत प्रशंसेस पात्र आहे. कर्वे यांचे विवेचन कृष्णाला सर्वसामान्य माणसाच्या मुशीत ठेवू इच्छिते, गांधारी, कुंती, धृतराष्ट्र, विदुर, कर्ण, कृष्ण, द्रौपदी, पांडव ही सगळीच वास्तविक हाडामांसाची असल्याची प्रचीती येते. त्यांचे मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय आकलन लक्षणीय आहे. स्त्रीपुरुषांविषयीचा कळवळा, सुधारणांच्या संदर्भातील परिवर्तनशील आणि संतुलित वृत्ती, उदारमतवादी प्रवृत्ती, भारतीय संस्कृती व समाजशीलता याबाबत असणारी आस्था यांचे आरसपानी दर्शन युगान्तमधून घडते. एकंदरीत पाहता मराठीतील महाभारताविषयीच्या ग्रंथात युगान्त हा मानदंड ठरेल असे शोभा नाईक यांचे प्रतिपादन आहे. 

इरावतीबाईंसारख्या विदुषीचे चरित्र लिहिणे ही सोपी गोष्ट नव्हती. कारण त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेला अनेक आयाम आहेत. परंतु हे आव्हान स्वीकारून डॉ. शोभा नाईक यांनी इरावतीबाईंचे सर्वांगीण दर्शन घडविले आहे. या पुस्तकात शोभा नाईक यांनी डॉ. इरावती कर्वे यांच्या कारकिर्दीचा केवळ रुक्ष आढावा घेतलेला नाही, तर इरावतीबाईंच्या लेखनाशी तादात्म्य पावून अनुसर्जनात्मक लेखन केले आहे. मराठी वाचकांनी अवश्य संग्रही बाळगावे असे हे पुस्तक आहे.

- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)


शीर्षक : इरावती कर्वे
लेखक : डॉ. शोभा नाईक
प्रकाशन : साहित्य अकादेमी
पृष्ठसंख्या : 130
किंमत : ₹ 225

 

Tags: इरावती कर्वे डॉ. इरावती कर्वे डॉ. शोभा नाईक शोभा नाईक साहित्य अकादमी भारतीय साहित्याचे निर्माते makers of indian literature anthropology paleontology archaeology sociology मानववंशशास्त्र समाजशास्त्र लेखन ललित लेखन संशोधन परिपूर्ती पुरातत्त्वशास्त्र Load More Tags

Add Comment