भारतातील राजकीय संघर्षाचे विविध टप्पे प्रधान मास्तरांनी जवळून पाहिले होते. प्रत्यक्ष चळवळीत उतरूनही आपला वैचारिक पिंड त्यांनी जोपासला. आचार्य जावडेकरांची राजकीय विचारप्रणाली त्यांनी अभ्यासली. आगरकरांच्या सुधारक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. राष्ट्र सेवा दल म्हणजे समर्पण भावनेने राष्ट्रकार्य कसे करावे याचा वस्तुपाठ घालून देणारी प्रयोगशाळा होती. त्या मुशीतून आपले व्यक्तिमत्त्व कसे घडले, हे त्यांनी सांगितले आहे. जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान चळवळीला वाहून घेतले त्या प्रसंगी त्यांच्या मनात उभा राहिलेला भावनांचा कल्लोळ, अध्यापन क्षेत्रात काम करत असल्यामुळे गोवा मुक्तिसंग्रामात सामील होता आले नाही याविषयीची खंत अशा काही गोष्टींची प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील थोर विचारवंत, राजकीय नेते, इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, साहित्यिक आणि मर्मज्ञ समीक्षक प्रा. ग.प्र. प्रधान यांनी 'माझी वाटचाल हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले. त्यांची कीर्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती भारतात सर्वदूर पसरली आहे. त्यांचे निर्मोही, निःस्पृह आणि कृतिशील जीवन सर्वांना प्रेरक वाटत आलेले आहे. त्यांना आदराने आणि आपुलकीने 'प्रधान मास्तर' असे संबोधले जाते. ते थोर लोकशिक्षक होते. साधना परिवाराने त्यांची आणि प्रा.वसंत बापटांची जमशताब्दी बौद्धिक वातावरणात साजरी केली. जनमानसासमोर त्यांची उज्ज्वल प्रतिमा अधोरेखित केली गेली. साधना साप्ताहिकाचे संपादन दोघांनी तन्मयतेने केले. साधना'च्या समृद्ध वाटचालीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.
‘माझी वाटचाल' हे प्रधानांचे समग्र आत्मचरित्र नव्हे. त्यांनी आपली मर्यादित भूमिका प्रारंभीच्या मनोगतातून प्रकट केली आहे. ते म्हणतात, “स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरच्या पर्वात झालेल्या लढ्यामध्ये मला भाग घेता आला आणि त्यामुळेच मी पुढील अनेक वर्षे राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये काम केले. माझ्या या आत्मकथनात मी मुख्यतः याच वाटचालीचे निवेदन केले आहे. राजकारण, समाजकारण याप्रमाणेच मी साहित्यावर प्रेम केले, साहित्याचे अनेक वर्षे अध्यापन केले आणि बरेचसे लेखन केले. या अनुभवासंबंधीही मी लिहिले आहे.”
प्रधान मास्तर दीर्घकाळ राजकीय क्षेत्रात वावरले. पण ते राजकारणग्रस्त झाले नाहीत. त्यांनी मूल्याधिष्ठित राजकारण केले. या थोर नेत्याच्या प्रांजळ आणि पारदर्शी निवेदनातून त्यांच्या संवेदनशील मनाची स्पंदने प्रकट झाली आहेत. गतकाळाचा आलोक त्यांतून साकार होतो. त्यांच्या ऋजू अंतःकरणाची साक्ष पटते. आपल्या जीवनाची 'साता उत्तरांची कहाणी’ ते लिहीत नसून सांगत आहेत असे वाटते. वाचन, मनन आणि चिंतन यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झालेली आहे. देशकार्य हाच त्यांचा निदिध्यास आहे, तर निःसंग वृत्ती हा त्यांचा स्थायीभाव आहे. स्वतःची वास्तू त्यांनी साधना ट्रस्टला दिली. 'अंतरीचे धांवें स्वभावें बाहेरी' ही त्यांची वृत्ती आहे. गंगाजलासारखे जीवन ‘माझी वाटचाल' मध्ये व्यक्त झालेले आहे.
भारतातील राजकीय संघर्षाचे विविध टप्पे प्रधान मास्तरांनी जवळून पाहिले होते. प्रत्यक्ष चळवळीत उतरूनही आपला वैचारिक पिंड त्यांनी जोपासला. आचार्य जावडेकरांची राजकीय विचारप्रणाली त्यांनी अभ्यासली. आगरकरांच्या सुधारक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. राष्ट्र सेवा दल म्हणजे समर्पण भावनेने राष्ट्रकार्य कसे करावे याचा वस्तुपाठ घालून देणारी प्रयोगशाळा होती. त्या मुशीतून आपले व्यक्तिमत्त्व कसे घडले, हे त्यांनी सांगितले आहे. जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान चळवळीला वाहून घेतले त्या प्रसंगी त्यांच्या मनात उभा राहिलेला भावनांचा कल्लोळ, अध्यापन क्षेत्रात काम करत असल्यामुळे गोवा मुक्तिसंग्रामात सामील होता आले नाही याविषयीची खंत अशा काही गोष्टींची प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.
प्रधान मास्तरांच्या आयुष्यातील 1955 ते 65 हा काळ मोठ्या धामधुमीचा होता. 1955 साली त्यांनी पुणे विद्यापीठ सिनेटची निवडणूक प्राध्यापक संघातून लढविली. ते निवडून आले. शिक्षण-क्षेत्रात भरीव कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. रॅङ्गलर परांजपे, प्रा. डी. जी. कर्वे, प्रा. धनंजयराव गाडगीळ, म. म. दत्तो वामन पोतदार आणि काकासाहेब गाडगीळ अशा प्रज्ञावंताबरोबर त्यांनी हे कार्य केले. ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांना तरुण प्राध्यापक मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.
प्रधान मास्तरांनी आपली पत्नी मालविकाबाई यांना बीएएमएस या वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. पुढे त्या नानल रुग्णालयात नोकरी करू लागल्या. याच काळात त्यांच्या संमतीने प्रधानांनी पूर्ण वेळ राजकीय क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी समाजवादी पक्षात प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष असे दोन गट झाले. या घटनेचा आघात त्यांच्या मनावर झाला. समविचारी मित्रांमध्ये राजकीय मतभेदांमुळे निर्माण झालेला अंतराय त्यांना असह्य झाला. सुदैवाने त्यांच्यामध्ये कटुता मात्र निर्माण झाली नाही.
1966 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाने प्रधानांना पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उभे केले. पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या अविश्रांत कप्ष्टांमुळे आणि पाठिंब्यामुळे ते निवडून आले. त्यावेळच्या काही कटू आठवणी असल्या तरी मुख्यतः आल्हाददायी क्षणांचा उल्लेख त्यांनी कृतज्ञतापूर्वक केलेला आहे. देशातील समकालीन राजकीय घटनांचा वेध घेत घेत त्यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीचा आलेख रेखाटला आहे.
25 जून 1975 ला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. हे दुःसह पर्व होते. समकालीन इतिहासाचा हा पट प्रा. प्रधान यांनी संक्षेपाने आणि तटस्थपणे रंगविलेला आहे. आणीबाणीत प्रधानांना येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. या काळात त्यांनी पाश्चात्य आणि भारतीय तत्त्वज्ञान सूक्ष्मतेने वाचले. भगवद्गीता, गीताई, ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्य यांचा सुसंगत अभ्यास केला. रा. द. रानडे यांचा 'कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदास' हा ग्रंथ वाचला. वेगवेगळ्या सात राजकीय पक्षांत निष्ठेने काम करणाऱ्या मित्रांच्या जीवनाचे चित्रण करणारी 'साता उत्तरांची कहाणी' ही आगळी वेगळी कादंबरी लिहिली. तसेच 1939 ते 1975 पर्यंतच्या राजकीय अंतः प्रवाहांचे चित्रण करणारे 'भाकरी आणि स्वातंत्र्य’ हे पुस्तक लिहिले. साने गुरुजींशी असलेल्या दृढ अनुबंधापोटी प्रधानांनी साधना साप्ताहिकासाठी काम करायला सुरुवात केली. त्यांनी आणि वसंत बापटांनी साधना साप्ताहिक, साधना प्रेस आणि साधना प्रकाशन यांना आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. साधनाचे संपादन करीत असताना प्रधानांनी ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' आणि त्याचा इंग्रजी अनुवाद 'इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही दोन पुस्तके लिहिली. या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी आत्मविश्लेषक वृत्तीने आपल्या सार्वजनिक जीवनाचे सिंहावलोकन केले आहे. आपल्या स्वभावदोषांची आणि मर्यादांची मनमोकळेपणाने कबुली दिलेली आहे.
‘म. गांधी, ना. गोखले, लो. टिळक (भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील त्रिवेणी संगम)’ या तिसऱ्या प्रकरणाचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. या तिन्ही नेत्यांविषयीचे प्रधानांचे भाष्य विचारणीय आहे. राजकारणाला नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असले पाहिजे हा मूलमंत्र आपल्याला या तिघांच्या जीवनसरणीतून मिळाला, असे ते म्हणतात. 'माझ्या जीवनाचे शिल्पकार' या चौथ्या प्रकरणात त्यांनी साने गुरुजी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मा. ग. बुद्धिसागर, प्रा. अ. क. भागवत, प्रा. वसंत बापट, प्रा. सदानंद वर्दे, बंडू गोरे, अशोक मेहता, डॉ. राममनोहर लोहिया, कोल्हटकर मास्तर, आचार्य जावडेकर आणि वि. स. खांडेकर यांच्यासारख्या थोरामोठ्यांच्या निकटतम सहवासात आपली वैचारिक जडणघडण कशी झाली याविषयी त्यांनी जिव्हाळ्याने आणि भरभरून लिहिले आहे. पाचव्या प्रकरणात समाजवादी साथी शिरुभाऊ लिमये, अनुताई लिमये, दत्ता ताम्हणे, बॅ. नाथ पै, मधु दंडवते, लालजी कुलकर्णी आणि रामभाऊ तुपे यांच्याविषयी तसेच हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भरीव कार्य केलेल्या अनंत भालेरावांच्या कार्याविषयी प्रधानांनी अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे.
प्रधानांच्या लेखक म्हणून जडणघडणीत साधना साप्ताहिकाचा मोठा वाटा आहे. साधना परिवारात मोलाचे कार्य करणाऱ्या यदुनाथ थत्ते, वसंत बापट आणि प्रा. सदानंद वर्दे या या सुहृद्धांविषयी त्यांनी सहृदयतेने लिहिले आहे. ‘विद्यार्थी ते अध्यापक आणि लेखक' या प्रकरणात त्यांनी आपल्याला ज्ञानोपासनेस प्रवृत्त करणान्या प्रा. पटवर्धन आणि प्रा. मनोहर भाटे या शिक्षकांविषयी कृतज्ञतापूर्वक लिहिले आहे. डॉ. अशोक केळकर हे त्यांचे बुद्धिमान विद्यार्थी. त्यांच्याकडे भाषाविज्ञानाचा कोर्स पूर्ण करता आला, आणि आमच्या मैत्रीचे वर्तुळ पूर्ण झाले असे उद्गार प्रधानांनी काढले आहेत. प्रा.अ.के-भागवन, प्रा. नरहर कुरुंदकर, प्रा.अभि.शहा या प्रज्ञावंत आणि व्यासंगी प्राध्यापक मित्रांच्या आठवणी प्रधानांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.
'माझा लेखनसंसार' या लेखात प्रधानांनी आपल्या लेखनाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. ते एक ग्रंथलुब्ध वाचक आहेत. ते म्हणतात, "जीवनातील विविध अनुभवांना सामोरे जात असताना आणि अभिजात साहित्याशी समरस होताना माझ्या भावना उचंबळून येतात आणि मी अंतर्मुख होतो.” या भावनेनेच त्यांना लेखनप्रवृत्त केले. पुस्तकात प्रधानांनी कौटुंबिक जीवनाविषयी संक्षेपाने लिहिले आहे. त्यांच्यावर बालपणी संस्कार करणाऱ्या आई-वडिलांविषयी, तसेच स्वतः वैद्य असलेल्या आणि सातत्याने साथसंगत करणाऱ्या आपल्या पत्नी मालविकाबाई यांच्या हृद्य आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.
कृतार्थ जीवनाच्या संध्याकाळी प्रधान मास्तरांनी आपले हे आत्मकथन लिहिले. ते वाचकाच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणारे तसेच नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.
- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)
Tags: majhi vatchal autobiography आत्मकथन राजकीय सामाजिक चळवळ शिक्षक प्रधान मास्तर प्रधान सर साधना डिजिटल साने गुरुजी वसंत बापट समाजवाद साता उत्तराची कहाणी Load More Tags
Add Comment