पुनर्भेट की प्रथम भेट?

न्या. रानडे यांच्या तीन अनुवादित ग्रंथांची पार्श्वभूमी

या ग्रंथांची निर्मिती करताना विशेषत्वाने आठवण झाली ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1943 मध्ये न्या.रानडे यांच्या 101 व्या जन्मदिनी केलेल्या ‌‘रानडे, गांधी ॲन्ड जीना‌’ या विषयावर दिलेल्या इंग्रजी भाषणाची. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रकांड पंडित डॉ.आंबेडकरांनी, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रकांड पंडित न्यायमूर्ती रानडे यांचा गौरव त्या भाषणात ज्या पद्धतीने केलेला आहे, तो एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. त्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या त्या भाषणातील तीन वैशिष्ट्यपूर्ण परिच्छेद या तीन ग्रंथांच्या प्रारंभी घेतले आहेत.

जी पुस्तके प्रकाशित होणे गरजेचे आहे, मात्र अन्य प्रकाशकांनी या ना त्या कारणाने प्रकाशित केलेली नाहीत, अशी काही पुस्तके तरी आपण प्रकाशित करावीत, या प्रकारची इच्छा इतर अनेकांप्रमाणे प्रस्तुत संपादकाच्या मनातही असते. त्यामुळे, मागील पाच वर्षांत अशी दोन मोठी व महत्त्वाची पुस्तके साधना प्रकाशनाकडून आणली आहेत. पहिले, लुई फिशर यांनी लिहिलेले ‘द लाइफ ऑफ महात्मा गांधी‌’; हे इंग्रजी पुस्तक 1950 मध्ये प्रकाशित झाले, त्यावर आधारित ‘गांधी‌’ हा ऑस्कर विजेता सिनेमा आला, मात्र ते पुस्तक सत्तर वर्षांनंतरही मराठीमध्ये आलेले नव्हते. म्हणून गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षात, म्हणजे 2019 मध्ये ते पुस्तक साधना प्रकाशनाकडून मराठीत आणले, वि.रा.जोगळेकर यांनी त्याचा अप्रतिम अनुवाद केला होता. त्यानंतर, ग.प्र.प्रधान व अ.के.भागवत यांनी लिहिलेले ‘लोकमान्य टिळक: ए बायोग्राफी‌’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद 2021 मध्ये साधना प्रकाशनाकडून आणला, तो अनुवाद अवधूत डोंगरे यांच्याकडून करवून घेतला होता. वस्तुतः टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षात, म्हणजे 1956 मध्ये काँग्रेस महासमितीने घेतलेल्या चरित्र लेखन स्पर्धेसाठी ते पुस्तक लिहिले होते, त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (विभागून) मिळाले होते आणि तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्याला छोटी प्रस्तावना लिहिली होती, तरीही ते पुस्तक पुढची साठ वर्षे मराठीत आलेले नव्हते. म्हणून लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्षात ते साधनाकडून आणले.

‘लोकमान्य टिळक चरित्र‌’ हा सातशे पानांचा अनुवाद अवधूतने एका वर्षभरात अचूक व प्रवाही तर केला होताच; पण त्याआधी त्याच्याकडे अरुणा रॉय यांच्या ‘द आरटीआय स्टोरी‌’ या पुस्तकाचा अनुवाद सोपवला होता आणि तोही त्याने सहा महिन्यांत उत्तम प्रकारे केला होता. त्यामुळे, लोकमान्य टिळक चरित्र प्रकाशित झाल्यावर, ‘लेनिन 150’चे निमित्त करून, लुई फिशर लिखित ‘द लाइफ ऑफ लेनिन‌’ या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित करावा अशी कल्पना मनात आली. आणि त्याच वेळी, न्यायमूर्ती रानडे यांचे 125 वे स्मृती वर्ष समोर ठेवून त्यांच्या तीन इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद करून घ्यावेत, अशीही कल्पना मनात आली. त्यातील लेनिन चरित्र मागे पडले, पण रानडे यांचे तीन ग्रंथ मात्र आता मराठीत आले आहेत.  

वस्तुतः न्यायमूर्ती रानडे यांचा ‘Miscellaneous Writings’ हा ग्रंथ प्रस्तुत संपादकाने फार पूर्वी वाचला होता आणि म्हणून तो मराठीत आणावा असा विचार टिळक चरित्र प्रकाशित केल्यानंतर मनात होता. मात्र, टिळक चरित्राची भेट प्रत अरविंद गणाचारी (यांनी फार पूर्वी ‘आगरकर चरित्र‌’ इंग्रजीत लिहिले आहे) यांना पाठवली, तेव्हा त्यांच्याशी ओझरते बोलणे झाले. तेव्हा न्या.रानडे यांचे एक पुस्तक मराठीत आणण्याचा विचार बोलून दाखवला, तर ते पट्‌कन म्हणाले, “मग त्यासोबतच ‘ Religious and Social Reform’ हे पुस्तकही मराठीत आणण्याचा विचार करा.” आणि त्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपीही त्यांनी लगेच पाठवली. त्याच आठवड्यात अभय दातार (यांनी सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा‌’ या द्विखंडात्मक ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला आहे) यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा ते म्हणाले, “मग ते दोन तुम्ही करणारच आहात, तर ‘Essays on Indian Economics’ हेसुद्धा का घेत नाही?” असे म्हणून त्यांनीही त्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी तत्परतेने पाठवली. त्या दोन्ही इंग्रजी ग्रंथांच्या सॉफ्ट कॉपीज नजरेखालून घातल्या, त्यातले काही लेख वाचले आणि तिन्ही ग्रंथ मराठीत आणण्याचा निर्णय घेतला. 2021 च्या ऑगस्ट अखेरीस तो निर्णय झाला. अर्थातच, एकाच अनुवादकाकडून ते करवून घेणे आवश्यक वाटले. त्यासाठी तेवढ्याच ताकदीचा अनुवादक लागणार होता, साहजिकच तिन्ही ग्रंथांचे अनुवाद अवधूतकडे सोपवले. जानेवारी 2025 मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांचे 125 वे स्मृती वर्ष सुरू होईल तेव्हा तीनही ग्रंथ (साधारणतः एक हजार पाने) एकाच वेळी प्रकाशित करायचे, असे ठरवले. म्हणजे अनुवादासाठी अवधूतला तीन वर्षे आणि निर्मितीसाठी आम्हाला सहा महिने मिळणार होते. 

अर्थातच, हे नियोजन ठरवले असताना काही जाणकारांशी बोलणे होत होते, तेव्हा दोन प्रश्न हमखास पुढे येत होते. एक, हे तीन ग्रंथ आता वाचणार कोण, त्यांची उपयुक्तता किती? दुसरा प्रश्न, त्यासाठी येणारा आर्थिक खर्च परवडणार आहे का? दोन्ही प्रश्न बरोबरच होते. पण ज्यांचा उल्लेख ‘प्रबोधन पुरुष‌’ असा केला जातो, त्या न्या. रानडे यांचे तीन महत्त्वाचे ग्रंथ, त्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनीही मराठीत उपलब्ध नसणे हे आश्चर्यकारक व धक्कादायक नाही का? अनुक्रमे 1898,1902 व 1915 मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेले हे ग्रंथ कोणत्याही खाजगी वा सरकारी प्रकाशन संस्थेने अद्याप मराठीत आणलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय, ज्यांनी ही पुस्तकं इंग्रजीत वाचलीत (अर्थातच, ती संख्याही अत्यल्प असणार), त्यांच्यासाठी कदाचित ही न्या. रानडे यांची पुनर्भेट असेल, मात्र जे कधीच त्या इंग्रजी ग्रंथांच्या वाटेला गेलेले नाहीत, त्यांच्यासाठी तर ही प्रथम भेट असेल. हे दोनच मुद्दे या ग्रंथांचे मराठी अनुवाद प्रकाशित करण्यासाठी आवश्यक तो वेळ, ऊर्जा, श्रम व पैसा खर्च करण्यास पुरेसे वाटत होते. अर्थातच, दरम्यानच्या काळात ही तीनही पुस्तके पुन्हा पुन्हा चाळली होती, त्यातील काही लेख वाचले होते. या पुस्तकांचा वाचक वर्ग मर्यादित असेल याची पूर्ण खात्री होतीच, पण विविध क्षेत्रांतील अभ्यासक-संशोधक, विद्यापीठ वर्तुळातील विद्यार्थी प्राध्यापक, सामाजिक-राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील लहान-थोर आणि अन्य जिज्ञासू लोक या सर्वांसाठी हा मराठी ऐवज कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त ठरेल, असे वाटते. कोणी त्यातले निवडक लेख वाचतील, तर कोणी संदर्भ पाहण्यासाठी वापर करतील. कोणाला भूतकाळ समजून घेण्यासाठी, तर कोणाला वर्तमानाचा अर्थ लावण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. कोणाला अभ्यासाची नवी दालने खुली झाल्याचे दिसेल, तर कोणाला आपण भलत्याच गैरसमजात होतो असा साक्षात्कार होईल. 

आणि तेवढ्यासाठी होणारा खर्च उभा करता येणे अवघड नाही किंबहुना करायला हवा असाच मनाचा कौल होता. त्यामुळे, पुढील तीन वर्षांत ते अनुवाद पूर्ण व्हायचे असतील तर अवधूतने प्रत्येक तीन महिन्यांनंतर तयार झालेला मजकूर पाठवावा असे ठरले. त्याप्रमाणे तो दर तीन महिन्यांनी शंभर-सव्वाशे पानांचा अनुवाद करीत राहिला, साधनाकडे पाठवत राहिला. 2022 व 2023 या दोन वर्षांत दोन खंड उत्तम प्रकारे अनुवादित झाले. त्यामुळे तीन खंडांचा प्रकल्प उत्तम प्रकारे मार्गी लागणार याची खात्री पटली. साहजिकच, या अनुवाद प्रकल्पाविषयी निवडक जाणकारांशी अधिक उत्साहाने बोलणे होऊ लागले. गेल्या वर्षी जर्मन भाषेच्या अभ्यासक आणि साधनाच्या लेखिका नीती बडवे यांनी, साधनाच्या एखाद्या प्रकल्पासाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांना म्हणालो, ‘या तीन ग्रंथांच्या फक्त अनुवादासाठी साधारणतः तीन लाख रुपये खर्च येतो आहे, त्यातील तुम्हाला शक्य असेल तेवढा खर्च तुम्ही देऊ शकता.’ त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ती संपूर्ण रक्कम देण्याचे मान्य केले. त्यानंतर सहा महिन्यांनी रसायनशास्त्रज्ञ सुरेश गोरे यांच्याशी या प्रकल्पाबाबत बोलणे चालू होते. तेव्हा मी  म्हणालो, “आपण हे मराठीत आणतो आहोत खरे, पण तिन्ही पुस्तके आता इंग्रजीतही उपलब्ध नाहीत.” तेव्हा ते पटकन म्हणाले, “त्यासाठी किती खर्च येईल?” ‘प्रत्येकी पाचशे प्रती छापल्या तर साधारणतः तीन लाख रुपये‌’ असे सांगितल्यावर त्यांनी पट्‌कन सांगितले, “त्यासाठीची देणगी मी देतो.” म्हणजे मराठी अनुवाद व मूळ इंग्रजी या दोन्हींसाठी येणाऱ्या दहा लाख रुपये खर्चापैकी अर्ध्याहून अधिक वाटा या दोघांनी उचलला, हा आनंद तर आहेच. मात्र, अधिक आनंदाचा भाग हा होता की, या दोन तज्ज्ञांना हा उपक्रम इतका महत्त्वाचा वाटतो आहे. परिणामी, आता मराठी ग्रंथ येत आहेत आणि आणखी सहा ते आठ महिन्यांत मूळ तीनही इंग्रजी ग्रंथ साधना प्रकाशनाकडून आणणार आहोत.  

आता हे तीन ग्रंथ मराठीत आणताना त्यांची कागदछपाई व निर्मितीचा दर्जा निर्विवाद उत्तम असावा हे ओघानेच आले. मात्र, अनुवाद करून आणताना त्यात मूल्यवृद्धी कशी होईल याचाही विचार दरम्यानच्या काळात चालू होता. त्यातून पहिला निर्णय असा घेतला की, आताच्या संदर्भात त्या तिन्ही ग्रंथांना विवेचक प्रस्तावना लिहून घ्याव्यात. त्यासाठी नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक या तिघांशी बोलणे झाले आणि तिघांनीही आनंदाने तत्काळ होकार दिला. अर्थातच, अनुवादकाची टीप अवधूतने लिहिली आहे, ती तिन्ही ग्रंथांमध्ये सुरुवातीलाच समाविष्ट केली आहे. मात्र, त्याने ‘लोकमान्य टिळक चरित्र‌’ अनुवाद करतानाचा सविस्तर अनुभव ‘एका शब्दाचा पेच‌’ या शीर्षकाखाली लिहिला होता, त्याची स्वतंत्र पुस्तिका साधनानेच प्रकाशित केली आहे. तसेच काहीसे तो या तीन ग्रंथांच्या संदर्भात सविस्तर लिहील, तेव्हा तेही आम्ही प्रकाशित करू.


हेही वाचा - 'धार्मिक व सामाजिक सुधारणा' या ग्रंथाची प्रस्तावना (अरविंद गणाचारी)


या ग्रंथांची निर्मिती करताना विशेषत्वाने आठवण झाली ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1943 मध्ये न्या.रानडे यांच्या 101 व्या जन्मदिनी केलेल्या ‘रानडे, गांधी ॲन्ड जीना‌’ या विषयावर दिलेल्या इंग्रजी भाषणाची. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रकांड पंडित डॉ.आंबेडकरांनी, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रकांड पंडित न्यायमूर्ती रानडे यांचा गौरव त्या भाषणात ज्या पद्धतीने केलेला आहे, तो एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. त्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या त्या भाषणातील तीन वैशिष्ट्यपूर्ण परिच्छेद या तीन ग्रंथांच्या प्रारंभी घेतले आहेत. त्यापुढे आणखी आवश्यकता वाटली, रानडे यांची ओळख अधोरेखित करणारे समकालीन व्यक्तींनी लिहिलेले तीन विशेष महत्त्वाचे लेख तिन्ही ग्रंथांना परिशिष्ट म्हणून जोडण्याची. त्यासंदर्भात लोकमान्य टिळक यांनी रानडे यांच्यावर ‘केसरी‌’मध्ये (मराठीत) लिहिलेला मृत्यूलेख हाताशी होताच, तो एका ग्रंथाला वापरण्याचे ठरवले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी रानडे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी केलेले अप्रतिम भाषण (मूळ इंग्रजीत) त्यांच्या एका संग्रहात सापडले, त्याचा अनुवादही अवधूतने अतिशय कमी वेळेत अचूक व प्रवाही करून दिला आहे. ते दुसऱ्या ग्रंथात वापरले आहे. तिसऱ्या ग्रंथासाठी महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर किंवा जवाहरलाल नेहरू यांच्यापैकी एखाद्याचा लेख असावा असा विचार होता; मात्र तसा एकही लेख मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्या ग्रंथाला परिशिष्ट जोडलेले नाही. याशिवाय, तीनही ग्रंथ वाचायला सुरू करण्यापूर्वी नव्या-जुन्या वाचकांची सोय व्हावी म्हणून संक्षिप्त जीवनपट तयार करून तिन्ही ग्रंथांच्या अखेरीस दिला आहे. या तिन्ही ग्रंथांच्या अंतिम फाइल्स अवधूतकडून इतक्या व्यवस्थित आल्या होत्या की, त्यांचे केवळ एकदा प्रूफ तपासणे पुरेसे होते. मात्र, ते काम काटेकोर होणे आवश्यक होते आणि म्हणून ते एकाच व्यक्तीकडे सोपवावे असे ठरवले होते. ती जबाबदारी आमची सहकारी आरती सुमित हिने उचलली आणि दीड महिना सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून ते काम उत्तम प्रकारे संपवले. अर्थातच, मांडणी व सजावट हे काम नेहमीप्रमाणेच गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याकडे, तर निर्मितीच्या अन्य बाजू सांभाळण्याचे काम आमचे सहकारी सुरेश माने यांच्याकडे सोपवले होते. (‘धार्मिक व सामाजिक सुधारणा‌’ आणि ‘संकीर्ण निबंध‌’ या दोन ग्रंथांमध्ये न्या.रानडे यांची तीन भाषणे सारखी आहेत, ती पुनरावृत्ती त्या त्या ग्रंथाची गरज म्हणून कायम ठेवली आहेत.)

या तीन ग्रंथांच्या प्रकाशन समारंभासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटचे सभागृह निवडले आहे. ग्रंथांचे प्रकाशन गिरीश कुबेर यांच्या हस्ते, सुहास पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अरविंद गणाचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. आगामी वर्षभरात म्हणजे, न्यायमूर्ती रानडे यांचे 125 वे स्मृती वर्ष संपण्याच्या आत न्या.रानडे यांची ‘धर्मपर व्याख्याने‌’, ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष‌’ ही दोन पुस्तके आणि रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी‌’ हे तिसरे पुस्तक, साधना प्रकाशनाकडून आणण्याचा विचार करीत आहोत. तसे झाले तर, रानड्यांच्या वैचारिक व कृतिशील वारशाला उजाळा देण्याचा एक उपक्रम मार्गी लावल्याचे समाधान साधना प्रकाशनाकडे राहील. अर्थातच, या अनुवादित ग्रंथांचा उपयोग मराठीतील वैचारिक क्षेत्र यथावकाश आणि यथायोग्य पद्धतीने करून घेईल अशी आशा आहे!

- संपादक

kartavyasadhana@gmail.com


Tags: न्या. रानडे न्या. रानडे 3 खंड पार्श्वभूमी नवे पुस्तक Load More Tags

Add Comment