'साधना'च्या, 15 ऑगस्ट 1948च्या पहिल्या अंकाची पुनर्भेट 

साधनाच्या अमृतमहोत्सवाचा समारोपाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. एस. वाय. कुरेशी यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होते आहे.

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोपाचा कार्यक्रम माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांच्या उपस्थितीत होत आहे. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे हॉल मध्ये उद्या, 13 ऑगस्ट 2023 रोजी, सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. कुरेशी यांची दीर्घ मुलाखत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर घेणार आहेत. 1947 मध्ये जन्मलेल्या डॉ. कुरेशी यांच्या आयुष्याची पाऊण शतकी वाटचाल (सुरुवातीच्या जडणघडणीचे पाव शतक, प्रशासनातील साडेतीन दशके, निवडणूक आयोगातील पाच वर्षे आणि निवृत्तीनंतरची दहा वर्षे) या मुलाखतीत उलगडली जाणार आहे. यावेळी राज्यशास्त्राचे विश्लेषक, साधना ट्रस्टचे विश्वस्त सुहास पळशीकर यांचेही भाषण होणार आहे. साधना ट्रस्टचे अध्यक्ष आणि एमकेसीएलचे चीफ मेंटर विवेक सावंत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

याच कार्यक्रमात साधना साप्ताहिकाचा 15 ऑगस्ट 1948 रोजी, प्रकाशित झालेला पहिला अंक पुनर्भेट म्हणून प्रकाशित होणार आहे. साने गुरुजींनी मुंबई येथून प्रसिद्ध केलेला तो पहिला अंक टॅबलॉईड आकारातल्या 16 पानांचा होता. त्यामधील संपादकीय निवेदनात गुरुजींनी लिहिले आहे, ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे.’ त्याच निवेदनात, ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!’ असेही त्यांनी बजावले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला तो अंक आलेला असल्याने, त्यातील बहुतांश मजकूर त्याच थीमभोवती आहे. 16 पानांच्या त्या अंकात दीर्घ लेख, स्फुट लेख, कविता, बातम्या आणि एक कथाही आहे.

दीर्घ म्हणजे अंकाचे जवळपास एकेक पान व्यापणारे लेख लिहिणाऱ्यांमध्ये साने गुरूजी (जयप्रकाशांचा जयजयकार असो), आचार्य जावडेकर (समाजवादी पक्ष आणि लोकशाहीचे रक्षण), एस.एम. जोशी (आमची जीवननिष्ठा), रावसाहेब पटवर्धन (निष्काम सेवेनेच साधनशुद्धी), ग. ना. जोशी (गांधीजींचा जीवनयोग), अशोक मेहता (समाजवाद म्हणजे काय?) यांचा समावेश आहे. शिवाय, जानपद या टोपणनावाने ‘भांडवलवाल्यांची कृष्णकारस्थाने’ हा दीर्घ लेख आहे.

अंकात काही स्फुट लेख आहेत. त्यामध्ये आचार्य स.ज. भागवत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिलेला संदेश आहे. ल. नि. छापेकर यांचा ‘महात्माजींचे अमरत्व’ हा लेख आहे. गुरूजींनी लिहिलेली ‘विनोबा वाणी’ व अनुवादित केलेले गांधींजीच्या ‘दिल्ली डायरी’तील काही उतारे आहेत. गुरूजींनीच लिहिलेल्या ‘बापुजींच्या गोड गोष्टी’ आहेत. ‘सेवादलाचा थोर वीर हुतात्मा कमलाकर दांडेकर’ हा लेख निनावी आहे. ‘समाजाचे अज्ञात आधार’ हा द.दा. पेंडसे यांचा लेख आहे.

बातम्यांमध्ये ‘स्वदेशी वृत्त’ व ‘विदेशी वृत्त-विचार’ आहे. ‘स्वदेशी वृत्त’मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांनी पुकारलेला संप ही बातमी आहे. तर ‘विदेशी वृत्त-विचार’मध्ये बर्लिन, फ्रान्स व ब्रह्मदेश यांच्या संदर्भातील छोट्या बातम्या आहेत.

‘प्रांतभारती’ हे एक स्वतंत्र पान आहे. ‘या सदरातून त्या त्या प्रांतातील नवनिर्मितीची, साहित्याची, महाराष्ट्रीयांस ओळख करून देण्यात येईल. साधनेने सुरु केलेली नव भारताची ही उपासना आहे.’ असे निवेदन सुरुवातीला दिले आहे. या पानावर, कन्नड महाकवी द.रा. बेंद्रे यांच्या दोन रम्य कवितांचा अनुवाद आणि रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू द्विजेंद्रनाथ यांचे भावगीत आहे. अर्थात त्या मूळ कविता (देवनागरीत) आणि काही वाक्यांत त्यांची पार्श्वभूमीही दिलेली आहे. ‘साधनेच्या कथा’ या सदरात गणपत वालावलकर या लेखकाची ‘चार महिन्यांसाठी’ ही पानभर कथा आहे. ‘मध्यवर्ती कल्पना इंग्रजीवरून’ अशी नोंद कथेच्या शेवटी केलेली आहे.  

या अंकात वेगवेगळ्या पानांवर छोट्या कविता आहेत. त्यात ‘कवि पंढरीनाथ’ या नावाने ‘प्रभू तुम्हीच तारा’, ‘भारताचा यात्रेकरू’ आणि ‘तरुणास आव्हान’ या तीन कविता आहेत; त्या साने गुरुजींच्याच आहेत. शिवाय, साने गुरुजी या नावाने ‘इकडे ये रे बाळा’ ही कविता आहे. पंजाबी लेखक धनीराम चातुरिक यांच्या ‘वाटसरूस’ या गद्यकाव्याचा अनुवाद गजानन मळेकर यांनी केला आहे. प्रफुल्ल दत्त यांची ‘होईल मानव बंधनमुक्त’ ही कविता पहिल्याच पानावर आहे. ‘मायबोलीचे माहेर’ ही सोपानदेव चौधरी यांची कविता आणि तिची पार्श्वभूमी असा एक कॉलम आहे. रामचंद्र जाधव या विद्यार्थ्याची ‘तारिल कोण अता’ ही कविता आहे.

अंकात साधना साप्ताहिकाची एक जाहिरात आहे, त्यामध्ये वार्षिक वर्गणीचे दर नऊ रूपये तर प्रत्येक अंकाची किंमत तीन आणे लिहिलेली आहे. नेहमीच्या अंकाची पाने 12 असतील असेही लिहिले आहे. साधना अंकातील जाहिरातींचे दर सांगणारीही एक छोटी जाहिरात आहे, त्यामध्ये प्रति कॉलम प्रति इंच तीन रूपये असा दर लिहिला आहे.

याशिवाय , ‘चित्रकार रंगा’ आणि ‘कर्तव्याची हाक’ या गुरुजींच्या दोन पुस्तकांची छोटी जाहिरात आहे. ‘बापूजींच्या गोड गोष्टी हे पुस्तक विक्रीस तयार आहे’ अशीही एक जाहिरात आहे. ‘रेकॉर्ड इंक’ आणि ‘स्वीडीश रेडिओ एजन्सी’ यांच्या दोन छोट्या जाहिराती आहेत.

अंकात पहिल्याच पानावर, ‘पुढील अंकापासून मधु लिमये यांची युरोप डायरी क्रमशः प्रसिद्ध होईल’ अशी नोंद केलेली आहे. एका लेखाच्या शेवटी अगदी दोन ओळीची जागा शिल्लक राहिलेली आहे , तिथे ‘यांत्रिकधर्म’ या शीर्षकाखाली रविंद्रनाथांचे छोटे अवतरण दिले आहे, ‘ज्या वेळी धर्म यांत्रिक बनतो तेव्हा तो शांती आणण्याऐवजी शांतीच्या मार्गात विघ्ने मात्र आणतो.’ हे अवतरण निवडतानाही गुरूजींनी किती नेमकेपणा दाखवला आहे, हे लक्षात येते.

या अंकाला ऐतिहासिक म्हणून काही एक मूल्य तर आहेच, पण संपूर्ण अंक आजही कमालीचा वाचनीय आहे. साधारण शतकापूर्वीच्या मराठी भाषेचे वळण, तेव्हाचे प्रचलित शब्द, प्रचलित व्याकरण (विशेषतः अक्षरांवर अनुच्चारित अनुस्वार देण्याची पद्धत) हा आनुषंगिक भागही पाहण्यासारखा आहे. तसेच यापैकी दोन-तीन लेख वगळता अन्य लेखन कोणत्याही पुस्तकात समाविष्ट झालेले दिसत नाही. आणि काही झालेच असेल, तरी ती पुस्तके उपलब्ध नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन, तो संपूर्ण अंक त्यातील जाहिराती व निवेदने यांसह ‘15 ऑगस्ट 2023’चा साधना अंक म्हणून प्रकाशित करणार आहोत. त्या अंकाची ही पुनर्भेट घडवताना एकच बदल केलेला आहे, तो म्हणजे मूळ अंक टॅबलॉईड आकारात होता; आता काढला जाणार असलेला अंक साधनाच्या आत्ताच्या नेहमीच्या आकारातला आहे. त्यामुळे आता तो 56 पानांचा झाला आहे. अर्थातच त्याचा ले-आऊट तेवढा बदलला आहे.

नव्या अंकाच्या शेवटी परिशिष्टामध्ये ‘गुरुजींची साधना महाराष्ट्राची होवो!’ हा आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन यांचा लेख जोडला आहे. गुरुजी गेल्यानंतर त्यांनी साधनेचे संपादकत्व स्वीकारले तेव्हाच्या म्हणजे, 24 जून 1950च्या 12 पानी अंकातले हे संपादकीय निवेदन आहे.

आजच्या कार्यक्रमामध्येच डॉ. कुरेशी यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होते आहे. वर्गणीदार वाचकांना हा अंक नेहमीप्रमाणे घरपोच उपलब्ध होणार आहेच शिवाय लवकरच तो पीडीएफ व युनिकोड स्वरूपात साधनाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

- संपादक, साधना 
kartavyasadhana@gmail.com


Tags: साधना 75 साने गुरुजी साप्ताहिक साधना निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी समाजवाद कर्तव्य पुनर्भेट अंक Load More Tags

Comments:

जवाहर नागोरी

खूप छान उपक्रम. खूप खूप शुभेच्छा! अंक नंतर मिळणार का?

Add Comment