कर्तव्य चा एक महिना

 

कर्तव्य साधना

प्रिय वाचक, प्रेक्षक, श्रोतेहो

'कर्तव्य साधना' या डिजिटल पोर्टलचा प्रारंभ 9 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला केला, त्याला आज एक महिना पूर्ण झाला.  साधनाने डिजिटल क्षेत्रात मोठे पाऊल टाकले, याचे महाराष्ट्रातील वाचक - लेखक वर्तुळात स्वागत झाले. अनेकांकडून अद्याप हे पोर्टल या ना त्या कारणाने पाहायचे राहून गेले आहे आणि टेक्नोसॅव्ही नसलेल्या अनेकांना ते पाहता आलेले नाही, मात्र त्या दोन्ही वर्गांकडून (बातमी वाचून वा ऐकून)  या पोर्टलचे स्वागतच झाले आहे. कारण 'काळाची पावले ओळखून टाकलेले योग्य पाऊल', अशी त्यांची धारणा आहे. 'या पोर्टलसाठी काही मदत लागली तर आम्हाला जरूर सांगा', असेही विविध क्षेत्रांतील अनेकांनी कळवले आहे. यामध्ये साधनाचे तुलनेने नवे व बरेच जुने वाचक आहेत, तसेच पूर्णतः नवे लोकही आहेत. या सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया, दाखवलेला विश्वास व व्यक्त केलेल्या अपेक्षा याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

कर्तव्य साधना हे पोर्टल सुरू केले त्याच दिवशी साधना साप्ताहिकाची वेबसाईटही नव्या रुपात अवतरली. कर्तव्य व साप्ताहिक या दोन्हीच्या वेबसाईट्स स्वतंत्र आहेत, मात्र एकीवरून दुसरीवर एका क्लिकमध्ये जाता येते. या दोन्ही वेबसाईट्स पटकन उघडतात, मजकूर संपूर्ण व व्यवस्थित दिसतो, मात्र छायाचित्रे व मांडणी यामध्ये काही तांत्रिक त्रुटींमुळे आवश्यक तितका सफाईदारपणा अद्याप बाकी आहे. मराठीत तरी डिजिटल तंत्रज्ञान व माध्यम तुलनेने नवे आहे आणि ते  हाताळू शकणारे लोकही तुलनेने कमी आहेत. त्यामुळे पूर्ण सफाईदारपणा येण्यासाठी आणखी एखादा महिना जाऊ द्यावा लागेल. अनुभवातून आलेल्या, नव्याने सुचलेल्या, आणि वाचकांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव केला जात आहे.  ही प्रक्रिया चालू असल्याने आम्ही हे पोर्टल खूप मोठ्या प्रमाणात viral करण्याचा प्रयत्न केलेला नाही, मात्र पुढील महिनाभरानंतर तेही केले जाईल. 

साधना साप्ताहिक व कर्तव्य साधना यांच्यावरील मजकूर पूर्णतः वेगळा ठेवण्याचा, म्हणजे कर्तव्यवरील मजकूर साप्ताहिकात आणि साप्ताहिकाचा मजकूर कर्तव्यवर प्रसिद्ध करायचा नाही ( माध्यमांतर व भाषांतर हा अपवाद ), असे धोरण आम्ही कर्तव्य सुरू झाले त्या दिवशीच्या संपादकीय निवेदनात जाहीर केले आहे. त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही, किंबहुना ते अधिक काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे, असाच गेल्या महिन्यातील अनुभव आहे. त्याचप्रमाणे अन्य डिजिटल माध्यमात प्रसिद्ध झालेला मजकूर जसाच्या तसा कर्तव्यवर प्रसिद्ध करायचा नाही ( अपवाद- संदर्भासाठी आवश्यक असलेले काही तुकडे ), असेही धोरण ठरवले आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे विषय कर्तव्यवर येणे राहून जाईल, पण ते साहजिक आहे. म्हणजे जे काही प्रसिद्ध करायचे ते थोडे पण चांगले असावे, अशी सर्वसाधारण भूमिका आहे. 

कर्तव्य सुरू केले त्या दिवशी एकूण 10 लेख , एक ऑडिओ, एक व्हिडिओ इतका ऐवज अपलोड केला होता. तांत्रिक दृष्टीने ते सर्व सुरळीत चालते आहे ना, हे पाहण्यासाठी एक आठवडाभर तेवढाच ऐवज ठेवला होता. 15 ऑगस्टपासून मात्र रोज एक युनिट ( लेख किंवा ऑडिओ किंवा व्हिडिओ ) अपलोड केले जात आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर कर्तव्य वर 35 युनिट्स आहेत. यामध्ये चार व्हिडीओ ( कुमार केतकर, अनिल अवचट, लक्ष्मीकांत देशमुख, हमीद दाभोलकर ) आणि चार ऑडिओ ( चले जाव व विवेकाचा आवाज या पुस्तकांवर आणि सरोजिनी बाबर व बुकर टी. वॉशिंग्टन या व्यक्तींवर ) आहेत. तीन लेख इंग्रजी भाषेत आहेत :  सुनील देशमुख यांचा उद्योजकांच्या संस्कृतीवर,  दत्ता नायक यांचा उद्योजकांतील  सर्जनशीलतेवर आणि एन. राम यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिनिमित्त दिलेले व्याख्यान ). उर्वरित 24 युनिट्स मात्र मराठीतील लेख आहेत. 

मराठीत प्रसिद्ध झालेल्या लेखनामध्ये रामचंद्र गुहा यांचे तीन लेख आहेत (अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काश्मीर प्रश्न व शंकर गुहा नियोगी  यांच्यावर गुहांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या लेखांचे हे अनुवाद आहेत). सुहास पळशीकर यांचे 'राजकारण' व 'स्वातंत्र्य' या दोन संकल्पनांच्या मूळ अर्थांकडे लक्ष वेधणारे दोन लेख  आहेत. संकल्प गुर्जर (अफगाण क्रिकेटचा जन्म हा लेख, रॉबर्ट मुगाबे यांच्यावरील मृत्यूलेख) आणि हिनाकौसर खान ( हेल्लारो चा दिग्दर्शक व आर्टिकल 15 चा सहअभिनेता यांच्या मुलाखती) या दोन युवा लेखकांचे प्रत्येकी दोन लेख आहेत.

याशिवाय विवेक सावंत (नियोजित लेखमालेतील पहिला लेख - युवा नेतृत्वासमोरील आव्हाने), स्वाती राजे (माझी संस्था : भाषा), समीर शेख (ट्रिपल तलाक बंदी),  डॉ. ऐश्वर्या रेवडकर (बिजापूरचा आठवडी बाजार), भारती रेवडकर (सरोजिनी बाबर यांना अभिवादन), नामदेव माळी (शिक्षकदिनानिमित्त मुलाखत), आलोक ओक (किरण नगरकर यांना आदरांजली), मुग्धा दीक्षित (हरिकेन वादळाचा अनुभव) यांचा प्रत्येकी एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. 

कर्तव्यमध्ये विषयांचे वैविध्य राखतानाच विश्लेषणात्मक व चिकित्सक असे काही देत राहण्याचा प्रयत्न कोणत्या दिशेने चालू आहे, हे वाचकांच्या नजरेच्या टप्प्यात आणून  देण्यासाठी केवळ वरील तपशील जरा विस्ताराने दिले आहेत . या प्रक्रियेत आशय, विषय, सादरीकरण या तिन्ही आघाड्यांवर खूप काही करायला वाव आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि कर्तव्यचे पाचही सहकारी त्या आघाड्यांवर काम करीत आहेत. 

कर्तव्यची लिंक फेसबुक, व्हाट्स अप, ट्विटर याद्वारेही पाठवली जाते. छायाचित्रे हा भाग अद्याप विकसित केलेला नाही, अन्य तांत्रिक सुविधाही  लवकरच पुरवल्या जातील. 

हे असे काम काही दिवस चालू राहणार आहे, याची जाणीव असल्यानेच कर्तव्यचा उदघाटन समारंभ आयोजित केला नव्हता. साधनाच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनीच एकत्र येऊन त्या दिवशी सेलिब्रेशन केले होते, मात्र कर्तव्यला 100 दिवस पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 14 नोव्हेंबरच्या दरम्यान एका मोठ्या समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. तोपर्यंत, अंतरंग व बाह्यरंग यांत बऱ्याच सुधारणा होऊन कर्तव्यच्या दीर्घकालीन वाटचालीसाठीची पायाभरणी पूर्ण झालेली असेल. या पार्श्वभूमीवर, वाचक- प्रेक्षक- श्रोते यांच्याकडून येणाऱ्या सूचना, तक्रारी, अपेक्षा यांचे स्वागत आहे...! 

संपादक, कर्तव्य साधना

editor@kartavysadhana.in

 

Tags: kartavy sadhana editorial संपादकीय कर्तव्यची हाक Load More Tags

Comments: Show All Comments

खूपच छान

खूपच छान

आनंद लाटकर

स्तुत्य उपक्रम

Anant kadam

जमानेके साथ चलो. या प्रमाणे काळाची गरज आणि सुलभता , अत्यंत प्रशंसनीय.

Ganpat Shinde.

खूप छान संपादकीय साधना साप्ताहिकाचा मी गेली अनेक वर्षे वाचक आहे .या पोर्टलवर नक्कीच कसदार व वैचारिक लेखन असेल याची खात्री वाटते. धन्यवाद !

लतिका जाधव

कर्तव्य हा शब्द जबाबदारीची जाणीव करून देतो. तसेच आपले सर्वांचे परिश्रम व चिकाटी देखील बहुमोल आहे. 'कर्तव्य' मधील गुणवत्तापूर्ण लेखनसाहित्य समाजात नक्कीच नवचैतन्य निर्माण करेल.

milind deshmukh

एक महिन्यात खूपच गोष्टी पुरवल्या आहेत.सध्या अश्या स्वरूपात नवनवीन माहीती सर्वांना मिळू शकणे खूप महत्वाचे आहे.पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा...

Arvind p jadhav

अत्यंत प्रभावी पाऊल! आता साधनाने सर्व जगाला कवेत घेतल आहे, मी आता येथे न्युजर्सीला बसून साधनाचे अंतरंगाचा आस्वाद घेवू शकतो, ही अपुर्वाईच... (ह्या साठी वेगळी फी किती द्यायला हवी तेही कळवा.)... अरविंद जाधव, एडीसन( न्युजर्सी) USA

Add Comment