सप्रेम नमस्कार,
युवा अभ्यासकांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन उत्तम दर्जाचे लेखन मिळविण्याचा उपक्रम म्हणून साधना साप्ताहिकाच्या वतीने दहा तरुण-तरुणींना अभ्यासवृत्ती जाहीर झाली आहे. त्यातील पाच अभ्यासवृत्ती प्रा. श्रीकांत तांबे व प्रा. ल. बा. रायमाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तर पाच अभ्यासवृत्ती साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार आहेत. या सर्व दहा तरुण तरुणींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जाणार असून, पुढील सहा महिन्यांत त्यांच्याकडून दीर्घ लेख वा रिपोर्ताज लिहून घेतले जाणार आहेत. ते सर्व लेखन जानेवारी 2024 मध्ये साधना साप्ताहिकाच्या दोन विशेष अंकांतून प्रसिध्द केले जाणार आहे.
तांबे-रायमाने अभ्यासवृत्तीसाठी विवेक वाघे (जळगाव), प्रतीक राऊत (अकोला), प्रशांत पवार (अमरावती), अविनाश पोईनकर (चंद्रपूर), प्रिया फरांदे (पुणे) या पाच जणांची निवड झाली आहे. त्यांनी अनुक्रमे ज्वारीच्या पिकावर खरीप हंगामात येणारे पक्षी, अकोला व मुंबई येथील अंध शाळांमधील मुलांची स्थिती-गती, पारधी समाजाची आर्थिक व सामाजिक स्थिती, सुरजागड येथील खाण प्रकल्पात माडिया आदिवासींचे विस्थापन, मुलींच्या विवाहाचे कायदेशीर वय वाढवण्याचा स्त्री सक्षमीकरणाशी संबंध हे विषय अभ्यासासाठी निवडले आहेत..
यदुनाथ थत्ते अभ्यासवृत्तीसाठी वैभव वाळुंज (पुणे/ सध्या इंग्लंड), विकास वाळके (पुणे/ सध्या मिझोराम), नेहा राणे व प्रियांका अक्कर (मुंबई), स्नेहा वासनिक (अमरावती), तेजस्विनी डहाट (नागपूर) यांची निवड झाली आहे. त्यांनी अनुक्रमे इंग्लंडमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीय माणसांमधील जातव्यवस्था, मिझो समाजाचे म्यानमार व चिनी प्रदेशातील जनतेशी आदानप्रदान, पारंपरिक मच्छीमारांच्या सहकारी सोसायट्या, विटभट्ट्यांवर काम करणारी मेळघाटातील मुले, तेंदुपत्ता कामगार महिलांच्या समस्या हे विषय निवडले आहेत..
या अभ्यासवृत्तीसाठी गेल्या महिन्यात निवेदन प्रसिद्धीला देऊन, पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण तरूणींनी अर्ज व प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यातील 27 जिल्ह्यांतून मिळून 89 अर्ज आले होते, त्यात 38 तरुणी व 51 तरुण होते. त्यातील 18 जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन, दहा तरुण तरुणींची अंतिम निवड केली आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतेक सर्वजण पदवी, पदव्युत्तर वा उच्च शिक्षण घेतलेले आहेत. त्यामध्ये मानव्यविद्या शाखांमधील (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र) अर्जदारांचे प्रमाण जवळपास अर्धे आहे. उर्वरित अर्ध्या अर्जदारांमध्ये विज्ञान, वाणिज्य, कायदा, समाजकार्य, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रांतील तरुण-तरुणी आहेत.
एकूण 89 अर्जांपैकी 40 अर्जदारांच्यामध्ये चांगली क्षमता आढळली. मात्र दर्जेदार लेखन करण्याची क्षमता आहे का, निवडलेला विषय अलक्षित आहे का आणि नियोजित वेळेत अभ्यास करून लेखन पूर्ण होऊ शकेल का, या तीन निकषांचा विचार करून अंतिम दहा जणांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व दहा तरुण-तरुणींसाठी एक दिवसभराची कार्यशाळा 19 जून रोजी पुणे येथे होणार आहे. त्यात समाजशास्त्राचे अभ्यासक व मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील आणि ग्रामीण समाजजीवनाचा अभ्यास करणारे पत्रकार व साहित्यिक आसाराम लोमटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय अभ्यासपद्धती व संशोधनपद्धती या संदर्भात एका विशेष तज्ञाचे व्याख्यान होणार असून, यापूर्वी साधनाने अभ्यासवृत्ती दिलेल्या पाच तरुण तरुणींची एकत्रित मुलाखतही होणार आहे.
कार्यशाळा झाल्यानंतर या सर्व युवा अभ्यासकांना एकेक मार्गदर्शक वा सल्लागार दिला जाणार आहे. त्यानंतर तीन महिने फिल्डवर्क आणि तीन महिने लेखन असा एकूण सहा महिन्यांचा कालावधी दिला जाईल. त्यातून तयार झालेल्या दीर्घ लेखनाचे दोन विशेषांक जानेवारी 2024 मध्ये, राष्ट्रीय युवक दिनाचे (12 जानेवारी) औचित्य साधून केले जाणार आहे.
या अभ्यासवृत्तीची निवड व कार्यवाही म्हणजे परीक्षा नव्हे आणि स्पर्धाही नव्हे, तर उत्तम दर्जाचे लेखन मिळविण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आलेल्या सर्व अर्जाची छाननी करून, त्यावर तीन निवड समिती सदस्य व तीन सल्लागार यांचे अभिप्राय मागवून अंतिम निवड केली आहे. तांबे-रायमाने अभ्यासवृत्तीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक साहाय्य केले आहे, तर यदुनाथ थत्ते अभ्यासवृत्तीसाठी साधनाच्या पाच मान्यवर वाचकांनी अर्थसहाय्य केले आहे. तांबे-रायमाने अभ्यासवृत्तीचे हे दुसरे वर्ष असून, यदुनाथ थत्ते अभ्यासवृत्तीचे मात्र हे पहिलेच वर्ष आहे.
सोमवार, 5 जून 2023 / पुणे.
- विनोद शिरसाठ
संपादक, साधना साप्ताहिक
Tags: sadhana saptahik yadunath thatte shreekant tambe l b raymane media fellowships research fellowships in marathi Load More Tags
Add Comment