प्रिय वाचक, प्रेक्षक, श्रोते हो
30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्त्या झाली, दुसऱ्या दिवशीपासून साने गुरुजींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. उपोषणाच्या 14 व्या दिवशी त्यांनी दोन पानांचे सायंदैनिक सुरू केले, त्याचे नाव कर्तव्य. परंतु चार महिन्यांनंतर ते बंद पडले. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी साप्ताहिक सुरू केले, त्याचे नाव साधना. गेली 71 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. आणि आता सात दशकांनंतर कर्तव्य पुन्हा जन्म घेत आहे, पण डिजिटल पोर्टलच्या रुपात.
रोज सायंकाळी सहा वाजता या पोर्टलवर एक-दोन लेख किंवा ऑडिओ / व्हिडिओ अपलोड केले जातील, पुढे पुढे हे प्रमाण वाढत जाईल. एका मर्यादित अर्थाने याला छोटे सायंदैनिक म्हणता येईल. साप्ताहिक व कर्तव्य यांच्यावरील मजकूर पूर्णतः वेगळा असेल. म्हणजे साप्ताहिकातील मजकूर कर्तव्यवर नसेल आणि कर्तव्यवरील मजकूर साप्ताहिकात नसेल. मात्र ही दोन भावंडे परस्परांना पूरक भूमिका बजावत राहतील.
साधना साप्ताहिक हे मुख्यतः मुद्रित (प्रिंट) माध्यम आहे, मागील बारा वर्षांपासून ते डिजिटल (वेबसाईट) स्वरूपातही उपलब्ध आहे. कर्तव्य साधना हे फक्त डिजिटल माध्यम असणार आहे, मात्र त्यात लिखित मजकूर असेल आणि दृक- श्राव्य स्वरूपातील ऐवजही. या दोन्हीच्या वेबसाईट्स स्वतंत्र असतील, पण त्या परस्परांना जोडलेल्या असतील. त्यामुळे कर्तव्यवरून साप्ताहिकाकडे आणि साप्ताहिकाकडून कर्तव्यकडे , एका क्षणात जाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
साप्ताहिक व कर्तव्य यांच्यात फरक काय असेल ? साप्ताहिकासाठी लेख लिहायला सांगणे ते तो वाचकांच्या हातात देता येणे यात किमान आठ- दहा दिवसांचा कालावधी जातोच, त्यामुळे अधिक गहन / गंभीर आशयाला प्राधान्य द्यावे लागते. कर्तव्यबाबत तो कालावधी दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त नसेल, त्यामुळे त्यावर ताज्या घटना-घडामोडींवरील लेखन जास्त प्रसिद्ध करता येईल, शिवाय ऑडिओ / व्हिडिओ ची सुविधा असल्याने वेगळा परिणाम साधता येईल.
साप्ताहिक व कर्तव्य यांच्यात साम्य काय असेल ? ही दोन्ही भावंडे पुरोगामी वाटचाल करीत राहतील. म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग या प्रमुख पाच घटकांच्या बाबतीत अधिकाधिक उदारमतवादाचा व सहिष्णुतेचा पुरस्कार करीत राहतील. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली भूमिका बजावत राहतील. साने गुरुजींनी साप्ताहिकाच्या पहिल्या संपादकीय निवेदनात लिहिले होते, " सर्व प्रकारची विषमता व सर्व प्रकारचा वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. " ही प्रक्रिया वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालू आहे. त्यात साप्ताहिक व कर्तव्य ही दोन्ही भावंडे आपापला वाटा उचलत राहतील.
कर्तव्य चे वेगळेपण काय असेल ? माध्यमक्रांतीच्या या काळात माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य !
कर्तव्यमध्ये काय असेल? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती इत्यादी विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक ऐवज दिला जाईल. अर्थातच त्यात कला , क्रीडा, उद्योग , व्यापार, शिक्षण, आरोग्य, शेती इत्यादी घटक येऊन जातील. हा सर्व ऐवज लेख , मुलाखती, भाषणे, रिपोर्ताज, चित्रे, इत्यादी प्रकारातील असेल, ऑडिओ / व्हिडिओ स्वरूपातही तो असेल. आठवड्यातून एक दिवस इंग्रजी भाषेतील मजकूर असेल. हा सर्व आशय शक्य तितक्या सोप्या व सुबोध पद्धतीने देण्याचा प्रयत्न राहील . प्रत्येक सहा महिन्यांनंतर आवश्यकतेप्रमाणे बदल केले जातील.
कर्तव्य पोर्टल व साप्ताहिकाची वेबसाईट ही दोन्ही सर्वांसाठी खुले आहेत, वाचकांनी त्यांचा लाभ घ्यावा, kartavyasadhana.in आणि weeklysadhana.in या लिंक आपल्या आप्तस्वकीयांना फॉरवर्ड करून प्रचार-प्रसार करावा. सध्या तरी कोणतेही शुल्क किंवा वर्गणी त्यासाठी आकारली जाणार नाही , परंतु संस्थेचे अर्थकारण जुळवण्यासाठी व अधिकाधिक चांगले काम करता येण्यासाठी देणग्या व जाहिराती मात्र जरूर पाठवाव्यात.
-संपादक
Tags: editorial लेख Load More Tags
Add Comment