कर्तव्यची वर्षपूर्ती

पत्रकारितेची नीतिमूल्ये जपत अधिक चांगले काम करता येते असा आमचा विश्वास आहे !

9 ऑगस्ट 2019 रोजी ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल सुरू झाले. आज त्याचा पहिला वाढदिवस. रोज एक युनिट असे नियोजन पहिल्या वर्षभरासाठी केले होते. त्यानुसार प्रत्येक सप्ताहात पाच दिवस मराठी लेख, एक दिवस इंग्लिश  लेख आणि एक दिवस ऑडिओ / व्हिडिओ असे प्रमाण ठरवले होते. मराठी व  इंग्लिश लेखांबाबत ते तसेच राहिले. ऑडिओ/व्हिडिओ यांबाबत आधीच्या आठ महिन्यांत ते प्रमाण बऱ्यापैकी राखता आले, नंतरच्या चार महिन्यांत (कोरोना कालखंडात) मात्र ऑडिओ/व्हिडिओ प्रसिद्ध केले नाहीत.

राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन कर्तव्य वरून प्रसिद्ध करायचे... ते News based नसेल तर Views based असेल असे ठरवले होते. या वर्षभरातील बहुतांश लेखन तसेच होते असे म्हणता येईल. हे खरे आहे की, त्यात अगदी ताजे म्हणावेत असे विषय तुलनेने कमी होते. परंतु टीम नवी होती, नवे माध्यम हाताळायचे होते आणि पत्रकारितेची मूलतत्त्वे सोडायची नव्हती, त्यामुळे गती काहीशी कमी राहणार हे उघड होते.

या संपूर्ण काळात डिजिटल माध्यम हे दुधारी हत्यार आहे, याचे विस्मरण कधीही होऊ दिले नाही. प्रसिद्ध करण्यासाठी दर्जेदार मजकूर निवडणे, तांत्रिक सफाईदारपणा आणत राहणे आणि त्याचे डिसेंट सादरीकरण ही त्रिसूत्री समोर ठेवली होती; ही पहिली आघाडी होती.या आघाडीवर चांगले काम करता आले. ते करताना रूढ कल्पनांच्या आहारी जायचे नाही आणि आपली बलस्थाने व मर्यादा लक्षात घेऊन कार्यरत राहायचे हा निश्चय पक्का होता. त्यापासून विचलित होण्याचा विचार कधीच मनात आला नाही. प्रसिद्धीमध्ये विशिष्ट वेळेचे सातत्य राखणे आणि वितरणासाठी प्रभावी मोहीम राबवणे या दुसऱ्या आघाडीवर मात्र आवश्यक तितका वेळ, ऊर्जा, श्रम आम्ही देऊ शकलो नाही.

साधना साप्ताहिकातील लेखन कर्तव्यवर घ्यायचे नाही आणि कर्तव्यवरील लेखन साधनात प्रसिद्ध करायचे नाही असा नियम आम्ही केला होता. तो कटाक्षाने पाळताना अपवाद केला तो साधनातील फार पूर्वीच्या चारपाच लेखांबाबत... ते कर्तव्यवर घेतले त्याचे कारण विशेष औचित्य होते म्हणून. अर्थात साधनातील विशेष महत्त्वाच्या मराठी लेखांचे अनुवाद करून कर्तव्यवर घेणे आणि कर्तव्यवरील विशेष महत्त्वाच्या इंग्लिश लेखांचे अनुवाद साधनात घेणे असे आम्ही ठरवले होते. याचे कारण दोन्ही माध्यमांतील वाचकांना त्याचा फायदाच होतो. वर्षअखेर आमचे असेच मत राहिले की, अशी स्वायत्तता दोहोंना परस्परपूरकच ठरली आहे.

‘साधना’त आणि ‘कर्तव्य’मध्ये फरक काय राहिला किंवा ठेवला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ‘फार नाही...’ असेच द्यावे लागेल. कर्तव्यवर इंग्लिश लेख आणि ऑडिओ, व्हिडिओ हा वेगळ्या स्वरूपातील ऐवज येत राहिला हा दृश्य-रूपातील फरक आहे. काही ताजे विषय साधनात घेता आले नसते ते कर्तव्यवर घेता आले हा फरकही आहेच... पण आशय, विषय व भूमिका आणि दर्जाचा आग्रह यांत मात्र काहीही बदल केला नाही. अर्थात, डिजिटल माध्यमाची वेगळी अशी ताकद पुढील वर्षभरात कर्तव्यचे वेगळेपण अधोरेखित करील...

मात्र इथे आम्हांला हे ठळकपणे नोंदवावेसे वाटते की, डिजिटल माध्यमात विशिष्ट आशय, विषय, सादरीकरण लागते या प्रचलित धारणेला धक्का बसेल असा आमचा अनुभव आहे. उदाहरणार्थ, डिजिटल माध्यमात आठशे-हजार शब्दांपेक्षा मोठे लेख फार वाचले जात नाहीत असे मानले जाते. आमचे अर्ध्याहून अधिक लेख  बाराशे ते तीन हजार शब्द यादरम्यान होते आणि तेही तितकेच किंबहुना अधिक वाचले गेले आहेत. दुसरा एक समज असा आहे की, गंभीर, वैचारिक आणि संकल्पनात्मक लेख कमी वाचले जातात... पण कर्तव्यवर मागील वर्षभरात जास्त वाचले गेलेले लेख सुहास पळशीकर, रामचंद्र गुहा यांचे; तसेच  संपादकीय  आणि संपादकाने स्वतःच्या नावाने लिहिलेले लेख आहेत. अशाच प्रकारच्या अन्य लेखांना मिळालेला प्रतिसादही उत्तमच आहे. अर्थात, या वर्षभरात साधनाचा नेहमीचा जास्त वाचक कर्तव्यवर असल्याने असे झाले असणार. मात्र डिजिटल माध्यमावरही वाचनीय असलेले गंभीर आणि वैचारिक लेखन चांगले स्वीकारले जाऊ शकते हा निष्कर्ष यातून निघतोच.

डिजिटल माध्यमात लेखनाचे सादरीकरण हा भाग विशेष महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे आकर्षक चित्र किंवा छायाचित्र आणि वाचकमनाची पकड घेणारे शीर्षक असावे लागते. मात्र या दोन्हींबाबत आम्ही आशय व विषय यांपासून दूर न जाता सौम्य म्हणावे  असे सादरीकरण पसंत केले. त्याचप्रमाणे घडलेल्या घटना-प्रसंगाचे निमित्त साधून घाईघाईत मजकूर लिहून घेणे आणि प्रसिद्ध करणे हेही आम्ही टाळले आहे. त्यामुळे वाचकांचा अपेक्षाभंग होणे व नकारात्मक प्रतिक्रिया येणे क्वचितच घडले आहे आणि संपादन करताना झालेल्या चुका नगण्य म्हणाव्यात अशा आहेत. अर्थात, दर्जाशी तडजोड न करता, तत्परता दाखवून, चालू घटना घडामोडींची उकल करून दाखवणारे उत्तम म्हणावे असे लेखन प्रसिद्ध करता येते आणि ते करायलाही हवे याची चांगली  जाणीव आम्हांला आहे.

डिजिटल माध्यमासाठी Google Analytics हे खूपच चांगले हत्यार (tool) उपलब्ध आहे. त्यातून कित्येक प्रकारचे वर्गीकरण क्षणात मिळवता येते. मात्र त्यातून येणारे निष्कर्ष अंधपणे स्वीकारले तर फसगत होऊ शकते. त्या वर्गीकरणाचा वापर करून प्रत्येक माध्यमाने आपले असे वेगळे वर्गीकरण, विश्लेषण आणि निष्कर्ष काढायला हवेत. उदाहरणार्थ, मागील वर्षभरात कर्तव्यला किमान एकदा भेट देणाऱ्यांची संख्या 80 हजार इतकी असली तरी, दोनचार वेळाच भेट देणाऱ्यांची संख्या बाजूला केली तर तो आकडा बराच कमी होईल. दुसऱ्या बाजूला असेही दिसते की, (वाचल्या गेलेल्या लेखांवर वाचक किती वेळ थांबलेत ते पाहिले तर) कर्तव्यवरील संपूर्ण लेख वाचणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. मात्र आम्ही प्रसिद्ध केले त्या प्रकारचे लेखन हवे आहे अशा वाचकांची संख्या खूप जास्त आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडलो आहोत.

असो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण कर्तव्यच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हांला पुन्हा आठवण होते आहे ती ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ असे संबोधले जाते त्या बाळशास्त्री जांभेकर (1812-1846) यांची. वयाच्या विसाव्या वर्षी ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केलेल्या बाळशास्त्रींना केवळ 34 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी निवडलेले ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ हे दोन शब्द कोणत्याही काळात पत्रकारितेचा गाभा काय असायला हवा हे सांगण्यास पुरेसे आहेत. तो गाभा समोर ठेवून पत्रकारितेची नीतिमूल्ये जपत अधिक चांगले काम करता येते असा विश्वास आम्हांला आहे आणि त्यासाठी आज व उद्याही मोठा वाचकवर्ग उपलब्ध असणारच आहे, याबाबत आमच्या मनात शंका नाही. कर्तव्यवर सर्वाधिक वाचला गेलेला आणि त्यातील विवेचन, विश्लेषण व निष्कर्ष उत्तम प्रकारे स्वीकारले गेले असा या वर्षभरातील लेख (राहुल-राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी!) पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचा आग्रह धरणारा आहे, हा त्याचा छोटासा पुरावा मानता येईल.

या पार्श्वभूमीवर कर्तव्यचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना, (कोरोना कालखंडामुळे) कोणताही उत्सवी समारंभ आयोजित केलेला नाही. त्याऐवजी इंग्लिश पत्रकारितेतील तीन महनीय संपादकांच्या दीर्घ मुलाखती आजपासून पुढील सात दिवस (9 ते 15 ऑगस्ट) प्रसिद्ध करणार आहोत. 

एन. राम यांची मुलाखत तीन भागांत प्रसिद्ध होईल. ते The Hindu दैनिकाच्या वाटचालीबद्दल बोलले आहेत. शेखर गुप्ता यांची मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होईल, ते India Today, Indian Express, The Print या तीन माध्यमांत केलेल्या कामाविषयी बोलणार आहेत. आणि नरेश फर्नांडिस यांची मुलाखत दोन भागांत होईल. ते Scroll या डिजिटल पोर्टलबाबत बोलणार आहेत. हे तीन संपादक तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे आहेत, तिघांच्याही दृष्टीकोनांत काही प्रमाणात फरक आहेत. मात्र पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी तिघांचीही बांधिलकी पक्की आहे. (या तीनही मुलाखतींचा मराठी अनुवाद असलेला साधना साप्ताहिकाचा विशेषांक येत्या 15 ऑगस्टला येत आहे.) 

 

- संपादक, कर्तव्य साधना
kartavyasadhana@gmail.com

Tags: कर्तव्य साधना वर्षपूर्ती पत्रकारिता कर्तव्य ऑनलाईन पोर्टल Kartavya Sadhana Kartavya Editorial online portal एन राम शेखर गुप्ता नरेश फर्नांडिस N Ram Shekhar Gupta Naresh Fernandes Load More Tags

Comments: Show All Comments

Vidyut Bhagwat very precious

Khoopach molache yogdaañ

अभिजीत. एन. यस.

साधना चे हेही कर्तव्य उल्लेखनीय च.. साधना आणि कर्तव्य चा मजकूर वेगळा ठेवणे याकडे नेहमी लक्ष द्याल. कर्तव्य द्वारे नवीन , तरुण पिढी, १९९१ नंतर ची त्यांचे विचार वाचावे वाटतील..जसे साधना हे वरिष्ठ व्यक्तींचे विचार मांडते..पुन्हा एकदा अभिनंदन पुढील वाटचालीस

PRAMOD Badde

मी साधना साप्ताहिकाचा सदस्य आहे पण मला मार्च पासून साप्ताहिक येणे बंद झाले आहे.

Shubham Wanave

मागील दोन-तीन महीन्यांपासून कर्तव्य साधना च्या वाचक वर्गात प्रवेश मिळवला. अर्थात त्याआधी सुद्धा याबद्दल माहीती होतीच मात्र निरंतरतेचा अभाव वाचनात होता. आता तो नाही याचा समाधान आहे आणि हे शक्य झाले दररोज वाट्सअॅप द्वारे मिळणाऱ्या लेखाच्या लिंक द्वारे. बौद्धिक संपदा संपन्न महाराष्ट्र अविरत ठेवण्यात आपली भुमिका एकदम उत्तम.

Vilas Ratan Nikumbh

महाराष्ट्रातील वैचारिक चळवळीचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

Kanhaiya zade

पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤️

बालिका ज्ञानदेव

पुढील वाटचालीकरिता मनस्वी शुभेच्छा

Atul Teware

पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

SHIVAJI PITALEWAD

खूप खूप शुभेच्छा! मनापासून आभार!

Pro. Bhagwat Shinde

कर्तव्याला पहिल्यावहिल्या वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा! मागील वर्षभरात कर्तव्य वरून वेगवेगळ्या प्रकारचे लेख,मुलाखती ,ऑडिओ- व्हिडिओ ऐकता आले याबद्दल खूप खूप समाधान वाटते.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे साने गुरुजीनी सुरू केलेलं कर्तव्य सुरुवातीच्या काळात फार दिवस चालू शकले नाही. परंतु या डिजिटल रूपातील नव्या कर्तव्याने आपला पहिला वाढदिवस अत्यंत जोमाने,उत्साहाने बाळसेदारपणे साजरा केलाय ही आपणा सर्वांसाठीच आश्वासक, उत्साहवर्धक अशी बाब आहे. त्याबद्दल साधना व कर्तव्य टीमच्या सर्व संपादकीय मंडळास मनस्वी धन्यवाद, अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

संतोष मुळे

कर्तव्य साधनास पहिले वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. सिरसाठ सर यांनी एका वर्षाचे अतिशय कठोर आणि प्रामाणिक परीक्षण केले आहे. हे आत्मपरीक्षण कर्तव्याला खूप पुढे नेईल यात शंका नाही. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

हरिभाऊ बारगजे

कर्तव्य साधनांच्या प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या खुप सुंदर माध्यम आहे

भाऊसाहेब गोरे, पाथर्डी

कर्तव्य व साधना ने उत्तम दर्जा ठेवला. या पुढेही असेच विवेकनिष्ठ लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा.वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा.

डॉ. अनिल खांडेकर

कर्तव्य आणि साधना... या दोन्ही माध्यमातून गेल्या वर्षात समाधान कारक काम होत आहे. याबद्दल मनापासून आनंद होत आहे. वर्षात साधना चा प्रवास पण आश्वासक आहे. कर्तव्य मधील बहुतेक लेख प्रासंगिकते च्या पलिकडे .. विशेषतः प्रा. पळशीकर यांचे लेख संग्रह करण्यासारखे आहेत. संवैधानिक मूल्यांवर अधिक माहिती मिळाली आहे. अजूनही प्रा. पळशीकर यांच्या कडून वैचारिक लेखनाची अपेक्षा आहे. डॉ. संतोष मुळ्ये यांनी आर्थिक विषयांवर इतरत्र प्रसिद्ध झाले ल्या लेखांपेक्षा वेगळा विचार मांडले आहेत. एकूणच धन्यवाद. साधना आणि कर्तव्य ..संपादक मंडळी यांना शुभेच्छा.

सागर मच्छिंद्र डवरी

आपल्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि यशस्वी वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन..!

Anand Gulanikar

अत्यंत विवेकनिष्ठ आणि दर्जेदार लिखाण

Vasant Vitthalrao Mule

Namskar.Just started today.

संजय मेश्राम, पुणे

'कर्तव्य'ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! यापुढेही असेच दर्जेदार लेख वाचायला मिळतील, ही अपेक्षा.

जयंत पाटील.

'कर्तव्य साधना'ला मनापासून शुभेच्छा !

Add Comment