साधना साप्ताहिकाचा 75 व्या वर्षात प्रवेश 

15 ऑगस्टला 'साधना'च्या 75व्या वर्षारंभानिमित्त एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृहात (सायं. 5.30 ते 8) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. सर्व प्रकारच्या विषमता आणि सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणा करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे, असे गुरुजींनी साधनाच्या पहिल्या संपादकीयात लिहिले होते. त्यातच त्यांनी 'स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी,' असे प्रतिपादन केले होते. तो वारसा आणि वसा घेऊन मागील 74 वर्षे साधना साप्ताहिक अखंड प्रकाशित होत आहे. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी त्याची ओळख झाली आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक आणि चिकित्सक लेखन साधनातून प्रामुख्याने प्रसिद्ध केले जाते. भारतीय संविधानातील मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आग्रही भूमिका साधनाने सातत्याने घेतली. सनदशीर मार्गाने चाललेले लोकलढे आणि संसदीय लोकशाही यांचा साधनाने सदैव पुरस्कार केला. 'समता व शांती प्रस्थापित होण्यासाठी जे कोणी शुद्ध साधनांचा म्हणजे योग्य मार्गांचा अवलंब करून सातत्याने प्रयत्नशील राहतील, त्यांना उत्स्फूर्त ठेवण्यासाठी साधना साप्ताहिक कार्यरत राहील' असा साधनाच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे.

साधनाच्या स्थापनेनंतर पावणेदोन वर्षेच साने गुरुजी संपादक होते, त्यांचे निधन झाल्यावर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन हे पाच वर्षे संपादक होते. त्यानंतरची 25 वर्षे यदुनाथ थत्ते संपादक राहिले. त्यानंतर दोन वर्षे नानासाहेब गोरे आणि मग पंधरा वर्षे वसंत बापट व ग. प्र. प्रधान हे दोघे संपादक होते. त्याच काळात त्यांना सहसंपादक म्हणून लाभलेले दुर्गा भागवत, मंगेश पाडगांवकर, अनिल अवचट, ना. य. डोळे हे तरुण भविष्यात मराठीतील प्रख्यात साहित्यिक झाले. त्या सर्वांनी साधनाला सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत आणले. त्यांना एस. एम. जोशी, प्रमिला दंडवते, पुरुषोत्तम साने, पी. व्ही. मंडलिक, नरेंद्र डेंगळे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे श्रीरंग वरेरकर, नाना डेंगळे, दशरथ पाटील, हरिभाऊ गद्रे, मधुभाई मेहता, दादासाहेब रुपवते इत्यादी दिग्गजांनी विश्वस्त म्हणून खंबीर दिली.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साधनाने 'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशी भूमिका घेतली. 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी साधनाने दिलेला लढा तर राष्ट्रीय पत्रकारितेत उल्लेखनीय मानला जातो. प्रबोधन, रचना व संघर्ष या तीनही क्षेत्रांत कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था व संघटना यांना साधनाने सातत्याने बळ दिले. त्यात दलित, स्त्रिया आणि युवकांच्या चळवळींचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल. त्या काळातील अनेक विशेषांक समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे होते. नरहर कुरुंदकर हे मराठीतील प्रख्यात विचारवंत म्हणून ओळखले जातात, हमीद दलवाई यांनी स्थापन केलेले मुस्लिम सत्यशोधक मंडळ राष्ट्रीय स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण ठरले, बाबा आमटे यांचे आनंदवनातील कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरले. पण हे तिघेही अगदी तरुण होते तेव्हा साधनाने त्यांच्या विचार कार्याला खूप सातत्याने व दीर्घकाळ बळ पुरवले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

1998 मध्ये साधना साप्ताहिकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष संपले तेव्हा नरेंद्र दाभोलकर व जयदेव डोळे हे साधनाचे संपादक झाले. पण थोड्याच काळात जयदेव बाहेर पडले. त्यानंतर, डॉ दाभोलकर यांनी अनेक लहान थोरांना साथीला घेऊन पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून साधनाचा पाया विस्तारला. त्यासाठी अनेक नव्या जुन्या लेखकांची, हितचिंतकांची साथ संगत मिळवली. पायाभूत सुविधा निर्माण केल्या. अर्थकारण, वितरण, व्यवस्थापन यात अनेक सुधारणा केल्या. साधनाचे दहा हजार वर्गणीदार सभासद करण्यासाठी अभियान राबवले. सदानंद वर्दे, मोहन धारिया, ग प्र प्रधान, किशोर पवार, कुमुद करकरे, आप्पासाहेब सारे पाटील, रा ग जाधव इत्यादी विश्वस्तांनी त्यांना खंबीर साथ दिली. साधनाचे हीरक महोत्सवी वर्ष आले तेव्हा म्हणजे 2007 मध्ये डॉ. दाभोलकर यांनी प्रस्तुत लेखकाला युवा संपादक म्हणून घेतले आणि पुढील पंधरा वर्षे म्हणजे अमृत महोत्सवापर्यंतची वाटचाल सुरळीत व्हावी यासाठी नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली. साप्ताहिकाची वेबसाईट, वाचन संस्कृती अभियान, बालकुमार दिवाळी अंकांची राज्यभरात मोहीम, राष्ट्रीय स्तरावरील विषय समोर ठेवून विशेष अंक, महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची कार्यवाही, व्याख्यानमाला व चर्चासत्रे इत्यादी अनेक आघाड्यांवर काम केले. त्यांनी साधनाचा वारसा व वसा केवळ टिकवला असे नाही, तर वृद्धिंगत केला. ते पंधरा वर्षे साधनाचे संपादक राहिले. साधनाला 65 वर्षे पूर्ण झाली त्याच आठवड्यात त्यांची हत्या झाली. त्यानंतर प्रस्तुत लेखकाकडे संपादकपद आले. आधीचे सर्व उपक्रम चालू ठेवून, आम्ही नवे उपक्रम व नवे विभाग सुरू केले. त्या प्रक्रियेत विजया चौहान, गणपतराव पाटील, हेमंत नाईकनवरे, विवेक सावंत, सुहास पळशीकर, हमीद दाभोलकर या विश्वस्तांनी मोलाची साथ दिली. आणि साधनाला अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत आणले आहे.

2

15 ऑगस्ट 2022 रोजी साधना साप्ताहिक 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, मात्र 75 कडून 100व्या वर्षाकडे वाटचाल करण्यासाठीची भक्कम पायाभरणी म्हणून मागील तीन वर्षांत साधनाने विविध आघाड्यांवर काम चालू ठेवले आहे. त्यात नव्या व तरुण पिढीला समोर ठेवून अनेक डिजिटल प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यातील काही पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित पुढील वर्षभरात पूर्णत्वास जाणार आहेत. साधनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप 2023 च्या 15 ऑगस्टला होणार आहे. दरम्यानच्या दहा महिन्यांत राष्ट्रीय स्तरावरील दहा नामवंतांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये भाषा, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, देश-विदेशातील वंचित दलित, देशाचे वर्तमान आणि भविष्य, विज्ञान व तंत्रज्ञानाची भावी वाटचाल, लोकशाही आणि राजकारण इत्यादी विषय हाताळले जाणार आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर या पाच महिन्यांत प्रताप भानू मेहता, एस. वाय. कुरेशी, सूरज येंगडे, रामचंद्र गुहा इत्यादी वक्ते निश्चित केले असून, आणखी काही वक्ते लवकरच निश्चित होणार आहेत. हा देश 75 कडून 100 व्या वर्षाकडे जात असताना काय काय करणे आवश्यक आहे, याची मांडणी या व्याख्यानांच्या केंद्रस्थानी असेल. याशिवाय राज्यातील बारा ते पंधरा जिल्ह्यांत नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 या काळात साधना वाचकमेळावे आयोजित केले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, अमृतमहोत्सवी म्हणजे 75 व्या वर्षाचा प्रारंभ म्हणून 15 ऑगस्ट 2022 रोजी पुणे येथील एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात एक समारंभ आयोजित केला आहे. साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. या समारंभात -

1. साधना साप्ताहिकाच्या 1972 ते 2022 या पन्नास वर्षांच्या डिजिटल अर्काइवचे उद्घाटन होणार आहे. या पन्नास वर्षात प्रकाशित झालेले अडीच हजार अंक आता weeklysadhana.in या वेबसाईटवर विनामूल्य करून दिले आहेत. लेखक, विषय, उपविषय, लेखनप्रकार इत्यादी वर्गीकरणासह ते अंक उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या 25 वर्षांचे म्हणजे 1948 ते 72 या काळातील अंक अशाच स्वरूपात आगामी वर्षभरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

2. साधना प्रकाशनाची नवी वेबसाईट sadhanaprakashan.in चे उद्घाटन या समारंभात होणार आहे. साधना प्रकाशनाची 150 पुस्तके आणि साधना साप्ताहिकाचे 50 विशेषांक मागील वर्षभरात इ-बुक स्वरूपात किंडलवर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर साधनाची ऑडिओ बुक्ससुद्धा स्टोरीटेलवर आली आहेत. काही ऑडिओ बुक्स लेखकांच्या आवाजात (उदाहरणार्थ मिलिंद बोकील, नामदेव माळी, हिनाकौसर खान) आणि काही पुस्तके नाटक, सिनेमा क्षेत्रांतील व्यक्तींच्या आवाजात (उदाहरणार्थ गजानन परांजपे, राजकुमार तांगडे, ओंकार गोवर्धन) आता उपलब्ध आहेत. आगामी वर्षभरात त्यात मोठी भर पडणार आहे. आणखी अनेक उपक्रम राबवता येणार आहेत.

3. देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, म्हणजे 15 ऑगस्ट 1972 चा साधना साप्ताहिकाचा विशेष अंक "25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य" या विषयावर काढला होता. अनिल अवचट यांनी त्या अंकाचे संपादन केले होते. त्या अंकातील राजा ढाले यांच्या लेखामुळे बरेच वाद-संवाद झडले होते. तो संपूर्ण अंक आणि त्यावरील वादसंवाद यांचे मिळून दोनशे पानांचे पुस्तक याच समारंभात प्रकाशित होणार आहे. तब्बल 50 वर्षानंतर तो सर्व ऐवज उपलब्ध होणार आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या अंकाचे मुखपृष्ठ प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी केले होते, आताच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही त्यांनीच केले आहे.

स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे या अंकाला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, तर तो धागा पुढे घेऊन हा 75 वा वर्धापनदिन अंक "कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही" या विषयावर काढला आहे. (यशवंत मनोहर यांच्या 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही' या कवितेवरून हे शीर्षक सुचले आहे.) या अंकात भटके विमुक्त, आदिवासी, दलित, बहुजन आणि मुस्लिम समाज यांच्यातील तळागाळापर्यंत मागील 75 वर्षांत स्वातंत्र्याची फळे कितपत पोहोचली याचा वेध घेणाऱ्या, राष्ट्रीय स्तरांवरील चार मान्यवरांच्या (किशोरचंद्र देव, बाळकृष्ण रेणके, कांचा इलाया शेफर्ड आणि नूर जहीर) मुलाखती असलेला हा अंक आहे. त्या चार समाजघटकांच्या संदर्भात काय घडले आणि सद्य:स्थिती काय आहे, याचे चित्रण करणारा तर आहेच; पण या चार समाजघटकांची स्थिती सुधारावी यासाठी पुढील 25 वर्षांत काय केले जायला हवे, हेही सूचित करणारा आहे.

वस्तुत: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत, त्यामुळे हा दिवस आनंदाने साजरा करण्याचाच आहे आणि आम्ही तो करणारच आहोत. एवढेच नाही तर ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर या देशाने किती विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे, हेही नाकारण्याचे कारण नाही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार या प्रत्येक क्षेत्रांत हा देश दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे या पद्धतीप्रमाणेच का होईना, पण पुढेपुढेच जात राहिला आहे. तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांत तर उंच उंच भरारी घेत राहिला आहे, त्याचे फायदे सर्वदूर पोहोचले आहेत. त्यामुळे मागील पाऊण शतकात देशाचे विभाजन झाले नाही, लोकशाही टिकून राहिली, अनेक वाद निकालात निघाले इथपासून ते साक्षरता 10 टक्क्यांवर 75 टक्क्यांपर्यंत आली किंवा दारिद्यरेषेतून कोट्यवधी लोक बाहेर पडले हे सर्व अधोरेखित करण्यासासारखेच आहे आणि आम्ही ते वेळप्रसंगी करीत आलोही आहोत.

मात्र या देशात असे काही प्रमुख समाजघटक आहेत, त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा विचार केला तर दोन प्रतिक्रिया पुढे येतात. एक- 'ब्रिटिश होते तेव्हाची आमची किंवा आमच्या बापजाद्यांची स्थिती आणि आजची आमची स्थिती यात काहीच फरक पडला नसेल तर; तेव्हा आम्ही तुमच्यासारखे पारतंत्र्यात नव्हतोच मुळी, त्यामुळे आता स्वतंत्र आहोत या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.' दुसरी प्रतिक्रिया अशी येईल की, 'ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेल्या या देशाने संविधान तयार करून स्वतः प्रत अर्पण केले आहे आणि या देशातील सर्व लोकांसाठी स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प केलेला असेल, तर ते स्वातंत्र्य व न्याय आमच्या दारापर्यंत अद्याप आलेले नाही.'

तर हे साधेच सत्य अधिक नेमकेपणाने व तीव्रतेने अधोरेखित करणारा हा विशेषांक आहे!

- संपादक, साधना

Tags: अमृतमहोत्सव साने गुरुजी डिजिटल पत्रकारिता स्वातंत्र्य Load More Tags

Comments:

Bhagwat Shinde

सर्वप्रथम साधना साप्ताहिकाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! हा लेख वाचत असताना साधनेच्या संपादक पदी साने गुरुजी फक्त पावणेदोन वर्ष कार्यरत राहिलेले असतानाही आज साधना साप्ताहिक 75 व्या वर्षात अत्यंत भरीवपणे आपली वाटचाल करत आहे याचे एकाच वेळी आश्चर्य आणि आनंदही वाटतो. साने गुरुजींचे आणि त्यांचा वारसा चालवणाऱ्या सर्व संपादकांचे या निमित्ताने मानावे तितके आभार आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करु तितकी कमीच असणार आहे. साधनेचे सर्व संपादक, विश्वस्त व सर्व सहकारी टीम आणि वाचक वर्गणीदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार!

Add Comment

संबंधित लेख