गर्वाचे घर खाली

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019  

कर्तव्य साधना

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आधी जे काही निवडणूकपूर्व सर्व्हे झाले आणि मतदानोत्तर चाचण्या झाल्या त्या सर्वांनी केंद्रात नरेंद्र मोदी प्रणित भाजप आघाडीचे सरकार येणार, त्यात एकट्या भाजपलाच स्पष्ट बहुमताइतक्या जागा मिळणार असे अंदाज व्यक्त केले होते. मात्र त्यापैकी क्वचितच कोणी भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळतील असे म्हटले होते. प्रत्यक्षात भाजप तीनशे पार आणि त्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशे पार असे घडले. याचाच अर्थ जनमानसातील अंतःप्रवाह ओळखण्यात आपली माध्यमे आणि निवडणूक विश्लेषज्ञ कमी पडले.

तसाच प्रकार आता पुन्हा घडला आहे, पण उलट अर्थाने. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाबाबत झालेल्या निवडणूक सर्व्हे आणि मतदानोत्तर चाचण्यांनी असे अंदाज वर्तवले होते की, भाजप व शिवसेना युतीच्या जागा दोनशे पार असतील आणि कदाचित एकट्या भाजपलाही स्पष्ट बहुमताइतक्या जागा मिळतील. प्रत्यक्षात युतीला दीडशेच्या पार जाता आले आहे आणि भाजपला मिळालेल्या जागा शंभराच्या आत आहेत. याचाही अर्थ आपली माध्यमे व निवडणूक विश्लेषज्ञ जनमानसातील अंतःप्रवाह ओळखण्यात कमी पडले आहेत.

हे लोकशाहीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे, कारण ‘आम्हाला गृहीत धरू नका’ हा जनतेचा संदेश यातून मिळतो आहे. अर्थात, पुढील दोन-चार दिवसांत वेगवेगळी आकडेवारी दाखवून, युती व आघाडी यांच्यातील पाडापाडीच्या राजकारणामुळे व मधल्या काळात झालेल्या पक्षांतरामुळे आमचे गणित जुळले नाही, असे युक्तिवाद, अंदाज वा भाकिते वर्तविणाऱ्यांकडून केले जातील. त्यामध्ये तथ्यही असेल. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कौलही भाजपला बहुमतापासून दूर ठेवणारा आहे; हे लक्षात घेतले तर ‘आम्हाला गृहीत धरू नका’ हाच संदेश तेथील जनतेनेही दिला आहे, हे पटायला हरकत नसावी.

हा संदेश प्रामुख्याने कोणासाठी आहे तर देशाच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी! या चौघांची वक्तव्ये, त्यांची भाषा, त्यांची अरेरावी, त्यांचा उद्धटपणा, त्यांचा (आपण काहीही करू शकतो हा) अविर्भाव,  जनता आपल्या मुठीत आहे आणि विरोधी पक्ष पुरते नामोहरण झाले आहेत अशी गुर्मी, हे सर्व अवगुण या निवडणूक निकालानंतर जरा कमी होतील.  

‘गर्वाचे घर खाली’ असे त्यांच्याबाबत घडू शकेल,  घडायला हवे! कारण सर्व प्रकारची ताकद त्यांनी पणाला लावली होती, साम-दाम-दंड-भेद ही रणनीती त्यांनी कधी नव्हे इतकी वापरली होती. मात्र हेही लक्षात घ्यायला हवे की, महाराष्ट्र विधानसभेत भाजप व शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे, जरी भाजपच्या जवळपास पंचवीस आणि सेनेच्या पाच-सात जागा (मागील निवडणुकीपेक्षा) कमी झाल्या असल्या तरी! याचा अर्थ युतीनेच पण सबुरीने सरकार चालवावे असा जनतेचा सांगावा आहे. शिवाय गरज नसताना काँग्रेस व राष्ट्रवादीतील गावोगावचे सुभेदार भाजपने स्वतःकडे का वळवले असा सवालही जनतेने विचारला आहे.  

या बरोबरच हेही लक्षात घ्यायला हवे की, काँग्रेसला मागील निवडणुकीत मिळाल्या इतक्याच आणि राष्ट्रवादीला मागील वेळेपेक्षा पाच-सात जागा जास्त असे आताचे निकाल आहेत. याचा अर्थ काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यावरील जनतेचा रोष पाच वर्षांनंतरही कमी झालेला नाही. म्हणजेच ‘आधीच्या पंधरा वर्षात तुम्ही अति केले आहे ते आम्ही विसरलो नाही’,  असा जनतेचा सांगावा आहे. 

शिवाय, मागील पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही नीट काम का केले नाही, आपापली पक्षबांधणी का केली नाही, असा सवालही जनतेने विचारला आहे. असो. जे झाले ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्यच. या संदर्भात आणखी बरेच काही सांगता येईल, पण निवडणूक निकालांचा अन्वयार्थ पाहायचा असेल तर तो याच चौकटीत दिसेल...! कसे ते पुढील चार दिवसांत थोडे थोडे पाहू..

संपादक, कर्तव्य साधना
editor@kartavyasadhana.in   

Tags: Maharashtra Elections संपादकीय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजप नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis Narendra Modi Load More Tags

Comments: Show All Comments

gajanan

good comant

अनंत कुलकर्णी

लोकशाही जिवंत राहू शकते हे जनतेनं सांगितले आहे

Umesh Madhukar Kunde

खुप सुंदर व वास्तव समीक्षण

गणेश चिंचोले

अत्यंत समर्पक व परखड विश्लेषण.

makarand dixit

अत्यंत समर्पक आणि राजकीय व्यवस्थेला विचारप्रवृत्त करणारा लेख

Mrs. P. S. Deshmukh

Accurate analysis

Add Comment