कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल सुरू होऊन काल दोन महिने पूर्ण झाले. 60 दिवसांमध्ये 60 युनिट्स अपलोड झाले आहेत. यामध्ये नऊ व्हिडिओ,आठ ऑडिओ आणि सात इंग्रजी लेख यांचा समावेश आहे. याचा अर्थ आठवड्यातून एक असे ते प्रमाण राहिले आहे. उर्वरित 36 युनिट्स म्हणजे मराठीत लिहिले गेलेले लेख आहेत. या सर्वांच्यामध्ये कोणते विषय येऊन गेले आहेत, कोणते लेखक/ वक्ते आहेत, आणि त्यामधून कोणता आशय व्यक्त झाला आहे ? हे समजून घेण्यासाठी वरवर नजर टाकली तरी आम्ही कोणत्या दिशेने जाऊ इच्छितो याचा अंदाज येईल. वर्तमानाला जोडण्याचा प्रयत्न, आणि ते करताना मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याची गरज, जास्त प्रमाणात अधोरेखित झालेली दिसेल.
या प्रयत्नांची दिशा अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. मात्र त्यामागचा विचार काय आहे, हे इथे थोडक्यात सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्तव्यचे भावंड असलेल्या साधना साप्ताहिकाचा वसा आणि वारसा ध्यानात घेतला पाहिजे. मूलतः साधना साप्ताहिक हे वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक आहे. ते अशा क्लाससाठी आहे, जो माससाठी काम करते. म्हणजे विविध क्षेत्रांतील कर्तेकरविते हे त्याचे प्रामुख्याने वाचक राहिले आहेत. मात्र साधनाच्या सात दशकांच्या इतिहासात एक असा उपक्रम राहिला आहे, ज्यामध्ये क्लासचा मजकूर मासपर्यंत पोहचवण्यात साधनाला उत्तम यश मिळाले आहे. तो उपक्रम म्हणजे साधनाचे बालकुमार व युवा दिवाळी अंक.
बालकुमार अंकाचे हे बारावे वर्ष आहे तर युवा अंकाचे हे सहावे वर्ष आहे. गुणात्मक व संख्यात्मक वाढ या दोन्ही निकषांवर हे दोन्ही अंक सातत्याने यशस्वी झाले आहेत. म्हणजे सलग दहा वर्षे सरासरी अडीच लाख प्रती बालकुमार अंकांच्या आणि सलग पाच वर्षे सरासरी पन्नास हजार प्रती युवा अंकांच्या वितरित होत असताना, या अंकांच्या आशय-विषयांमध्ये कुठेही वाचकानुनय केलेला नाही. हे अंक लहान मुलांना व युवांना ‘हेवी’ होत आहेत, असे तक्रारीचे सूर सुरुवातीपासून क्षीण व कमी प्रमाणात का होईना, निघत आले आहेत. तरीही या दोन्ही अंकांचे आशयविषय सोप्याकडून अवघडाकडे आणि कमी गुंतागुंतीकडून अधिक गुंतागुंतीकडे असेच जात राहिले आहेत.
एवढेच नाही तर, ते करताना स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा पातळीला अधिकाधिक महत्त्व दिले गेले आहे. याचे कारण बालकुमार असो वा युवा, दरवर्षी मोठेच होत गेले पाहिजेत! ही मुले-मुली किंवा युवक-युवती लहान आहेत असे समजून त्यांच्यासाठी विषय / लेखन निवडणे असे न करता, हे सर्वजण मोठे होत आहेत, होणार आहेत असे समजून त्याप्रकारचे लेखन / विषय निवडले गेले आहेत. आणि ही दिशा पूर्णतः बरोबर आहे, याचेच पुरावे सातत्याने मिळत आलेले आहेत.
तर क्लासचा मजकूर मासपर्यंत पोचवण्याचा हाच उपक्रम आम्ही कर्तव्य या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून राबवू इच्छितो. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की, मार्केटमध्ये काय चालते, का चालते आणि ते चालण्यासाठी काय करावे लागते! मात्र आम्ही ते करू इच्छित नाही, किंबहुना ठरवले तरी आम्हाला ते करता येणार नाही. आणि तसा प्रयत्न यदाकदाचित झालाच तरी वाचक त्याला प्रतिसाद देणार नाहीत, कारण त्यांचीही साधनाकडून ती अपेक्षा नाही. म्हणून पर्याय उरतो तो हाच की, बालकुमार व युवा अंकांप्रमाणेच ‘कर्तव्य’ हेसुद्धा क्लासचा मजकूर मासपर्यंत पोहचवणारे पोर्टल म्हणून ओळखले जाईल असे काम करीत राहणे.
‘कर्तव्य’चा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम चालू आहे, आणखी महिनाभराने म्हणजे कर्तव्यच्या जन्मानंतर 90 दिवसांनी त्याचे नवखेपण संपलेले असेल.
संपादक, कर्तव्य साधना
ताजा कलम : साधना साप्ताहिकाचे 2019 चे बालकुमार व युवा दिवाळी अंक आजपासून (10 ऑक्टोबर) उपलब्ध झाले आहेत.
Tags: संपादकीय Load More Tags
Add Comment