शोकसागरात बुडालेले आनंदवन...

या संकटाचे सर्वाधिक दुःख साधना परिवारालाच झालेले आहे.

डॉ. शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटकांचा शोध पोलीस व न्याययंत्रणा त्यांच्या त्यांच्या परीने घेत राहतील. प्रश्न आहे तो आनंदवन परिवाराचा. पुढे काय व कसे जायचे, की गर्भगळीत होऊन सात दशकांची परंपरा असलेल्या संस्थेला ऱ्हासाच्या मार्गाने जाऊ द्यायचे? एव्हाना हे सर्वमान्य झाले आहे की, आनंदवन हे केवळ एका संस्थेचे मुख्यालय नाही. ते एक ऊर्जाकेंद्र आहे, ती मानवतेची एक प्रयोगशाळा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील 'महारोगी सेवा समिती' या संस्थेचे काम ज्या ठिकाणी चालते, त्याची ओळख 'आनंदवन' अशी आहे. सत्तर वर्षांपूर्वी बाबा आमटे व साधना आमटे यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा सर्व प्रकारचे दुर्भिक्ष असलेला तो परिसर होता. नंतरची साडेतीन दशके त्या दोघांनी आनंदवन मोठ्या कष्टाने व मोठ्या प्रेमाने फुलवले आणि त्यानंतरची साडेतीन दशके डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांनी ते केवळ राखले नाही, तर वाढवले. बाबांचेच दुसरे स्वप्न साकार करण्यासाठी, तिथून दोनशे मैल अंतरावरील हेमलकसा या अधिक दुर्भिक्ष असलेल्या परिसरात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली, त्यालाही आता पन्नास वर्षे होत आली आहेत. बाबा व साधनाताई यांचा समाजसेवेचा वारसा व वसा घेऊन उभी राहिलेली ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राची आधुनिक तीर्थक्षेत्रे म्हणूनच ओळखली जातात. 

आजच्या महाराष्ट्रात असा एकही तालुका नसेल जिथे बाबा आमटे यांचा करिश्मा सांगणारे कार्यकर्ते नाहीत. सामाजिक-राजकीय कार्याचे वारे प्यायलेली अशी एकही व्यक्ती या महाराष्ट्रात नसेल, जिला डॉ. विकास व डॉ. प्रकाश यांनी (आपापल्या जीवनसाथींसह) उभारलेले कार्य माहीत नाही. साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, शिक्षण, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रांतील असा एकही धुरीण नसेल ज्याला या दोन तीर्थक्षेत्रांचे आकर्षण कधीच वाटले नाही. मागील पाच दशकांहून अधिक काळ असे ग्लॅमर टिकून राहिलेल्या अन्य संस्था महाराष्ट्रात जवळपास नाहीत. (मागील पाव शतकाचा विचार केला तर असेच स्थान डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या सर्च'ला लाभले आहे.) या दोन्ही संस्थांचा लौकिक देशातील अनेक राज्यांत पोहोचलेला आहे, जगातील अनेक लहान-मोठ्या देशांनी या संस्थांचे कौतुक करण्यात समाधान मानले आहे.

अशा या बाबा आमटे यांच्या श्रमातून व घामातून फुललेल्या आनंदवनात, कमालीची भयानक म्हणावी अशी घटना गेल्या आठवड्यात घडली. विकास व भारती आमटे यांची कन्या डॉ. शीतल हिने आत्महत्या केली. कोणी कल्पनाही केली नसेल, अशी दुःखद घटना. महाराष्ट्राचे समाजजीवन त्या घटनेमुळे हादरून गेले. हे खरे आहे की, चार महिन्यांपूर्वी आनंदवनातील कौटुंबिक कलह एका वृत्तपत्रातून चव्हाट्यावर आला, तेव्हापासून सामाजिक क्षेत्रांतील कित्येक लहान-थोर नेते व कार्यकर्ते अस्वस्थ होते, काळजी करीत होते. पण आताचा हा प्रहार अनेकांना बधिरावस्था आणून गेला. हजारो लोक स्तब्ध झाले, निशब्द झाले. काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न भल्याभल्यांना पडला. संपूर्ण आमटे कुटुंबाचे सांत्वन कसे करावे, याचे उत्तर आज तरी कोणाकडेही नाही. आनंदवन शोकसागरात बुडाले आहे आणि तिथून प्रेरणा घेऊन आलेले हजारो लहान-थोर, 'इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाहीत', अशी हतबलता अनुभवीत आहेत. 

साधना साप्ताहिक आणि आनंदवन यांचे नाते त्यांच्या जन्मापासूनचे आहे. जवळपास एकाच वर्षी या दोन्ही संस्था जन्माला आल्या. बाबा आमटे हे साधनाचे संस्थापक साने गुरुजी यांना दैवतासमान मानत होते. आणि जवळपास साडेतीन दशके साधनाच्या संपादकीय कामाची धुरा वाहणाऱ्या यदुनाथ थत्ते यांना बाबा आमटे यांनी 'माझ्या स्वप्नांचा सहोदर' असेच संबोधले. आनंदवन आकाराला येत होते, फुलवले जात होते; त्या काळातील सर्व कार्यक्रम व उपक्रम यांना महाराष्ट्रातील वाचकांसमोर आणण्याचे प्रमुख काम यदुनाथांचे नेतृत्व असलेल्या साधना साप्ताहिकाने केले. एवढेच नाही तर, बाबांचे सर्व चिंतनकाव्य पहिल्यांदा साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांनीच मराठी वाचकांच्या मनामनांत पेरले. मग ते 'ज्वाला आणि फुले' असो, 'माती जागवील त्याला मत' असो, वा 'उज्वल उद्यासाठी' ही पुस्तकं असोत. तसाच प्रकार हेमलकसा येथील प्रकल्पाबाबतही झाला. डॉ. प्रकाश व डॉ. मंदा यांच्या तेथील कामाकडे लक्ष वेधणारा पहिला विशेषांक साधनानेच काढला आणि मोठ्या झाडाखाली वाढलेली झाडेही तितकीच मोठी होऊ शकतात, याचे उदाहरण दाखवून दिले.

अर्थातच, सुरुवातीच्या साडेतीन दशकानंतर परिस्थिती क्रमाक्रमाने बदलत गेली. आनंदवन व साधना या दोन्ही संस्थांमधील आदान-प्रदान कमी कमी होत गेले. त्याचे एक कारण बाबा आणि यदुनाथजी या दोघांनीही साठीचा टप्पा ओलांडल्यानंतर आपापल्या संस्थांच्या कामातून सुटका करून घेतली. दुसरे कारण, पहिल्या पिढीत असलेले भावबंध दोन्ही बाजूंच्या नव्या पिढ्यांमध्ये किंवा नव्या नेतृत्वामध्ये तितकेसे नसणे साहजिक होते. मात्र तिसरे कारण अधिक खरे होते, ते म्हणजे आनंदवनचा पसारा आणि पिसारा इतका फैलावला होता की, तो अधिक वाढवण्यासाठी साधना उपयुक्त ठरू शकणार नव्हती, आणि तशी गरजही नव्हती. शिवाय, सार्वजनिक कार्यात सक्रिय असलेल्या सर्वच संस्था व संघटना यांच्यामध्ये निर्माण होणारा दुरावा, गैरसमज, अनाकर्षण हे प्रकारही किंचित प्रमाणात का होईना इथेही घडले असणार. मात्र तरीही, दोन्ही संस्थांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही परस्परांविषयी आदर व जिव्हाळा कायम होता, प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत असल्या तरी आणि फारसे आदान-प्रदान होत नसले तरी! इथे आम्ही दोन्ही संस्था व त्यातील कर्त्या-करवित्या व्यक्ती असा उल्लेख केवळ विवेचनाच्या सोयीसाठी करीत आहोत. प्रत्यक्षात हे लक्षात घेतले पाहिजे की, या दोन्ही संस्थांच्या वर्तुळात व परिघावर वावरणाऱ्या अनेक लहान-मोठ्या व्यक्ती, संस्था, संघटना आम्हाला इथे अभिप्रेत आहेत. म्हणूनच आनंदवन परिवारावर आता कोसळलेल्या संकटाचे सर्वाधिक दुःख साधना परिवारालाच झालेले आहे.

दहा-बारा वर्षांपूर्वी बाबा व साधना आमटे यांच्या दुसऱ्या पिढीने वयाची साठी ओलांडली आणि त्याच दरम्यान तिसरी पिढी कार्यरत झाली. पहिल्या व दुसऱ्या पिढीत असलेले काही गुणधर्म तिसऱ्या पिढीत कमी असणार हे साहजिक होते, पण आधीच्या दोन पिढ्यांमध्ये कमी असलेले काही गुणधर्म तिसऱ्या पिढीमध्ये अधिक असणेही साहजिक आहे. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि त्यानुसार गरजा व प्राधान्यक्रमही! मात्र मागील दशकात हेही स्पष्ट झाले की, पुढील पाव शतक तरी ही तिसरी पिढी तेच काम कमी-अधिक नेटाने पुढे चालू ठेवणार. याचे कारण या तिसऱ्या पिढीतील तरुणाई लो-प्रोफाईल आहे, 'आपण व आपले काम भले' अशा पद्धतीने वाटचाल करीत आहे. 

अशा पार्श्वभूमीवर, आताची भयानक घटना घडली आहे. वस्तुतः डॉ. शीतल यांनी वयाची चाळिशी गाठण्याच्या आत जी तडफ दाखवली ती वाखाणण्यासारखीच होती, त्या बाबतीत अनेकांना बाबा आमटे यांचीच आठवण येत होती. मात्र अनेक बुद्धिवान व प्रतिभावान व्यक्तींमध्ये असे काही एक दोन अवगुण भिनत जातात की, ते त्यांच्यासाठी शाप बनतात; तसेच काहीसे डॉ. शीतल यांचे झाले असावे. आनंदवनात गेल्या दशकात व्यवस्थापनाच्या व उपक्रमांच्या आघाडीवर नवे काही येत होते, त्याचे मोठे श्रेय शीतल यांच्याकडे जाते. पण ती कार्यवाही करताना आपले आग्रह दूराग्रहात कधी रुपांतरित होत गेले, याचे भान सुटत जाणे आणि नंतर ते भान आले तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड होत जाणे, असेही त्यांचे झाले असावे. 

हे खरे आहे की, कुटुंबाच्या आतून बाहेरून व परिघावरील लोकांकडूनही त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी होत गेली, अलीकडच्या काळात मुख्य प्रवाहातील एका दैनिकातून आणि नंतर सोशल मीडियावरून ती चर्चा होत गेली. हे सर्व प्रकार शीतल यांना पेलवता आले नाहीत, असे आता उघड दिसते आहे. परंतु यासंदर्भात कोणत्याही एका व अधिक घटकांना दोष देणे योग्य ठरणार नाही. सार्वजनिक कार्यात सक्रिय राहायचे असेल तर हे सर्व कमी अधिक प्रमाणात अपरिहार्य असते, ते सहन करून पुढे चालायचे असते.

वस्तुस्थिती अतिरंजित स्वरूपात मांडली जाणे, काही बाबतीत विपर्यास होणे, मूळ विषय बाजूला ठेवून भलतेच मुद्दे वादाचे विषय बनणे, हे सर्व प्रकार सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग असतात. त्या सर्वांचा सामना कसा करायचा हे कोणत्याही संस्थेचे/संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने तारतम्याने ठरवायचे असते. त्यासाठी अंतर्मुख होऊन वारंवार स्वतःचे विचार व वर्तन तपासायचे असते, आवश्यक त्या सुधारणा करीत पुढे जायचे असते. प्रत्यक्ष कामातून सिद्धांत (थिअरी) आणि सिद्धांतातून प्रत्यक्ष काम (प्रॅक्टिकल) यांच्यात दुरुस्त्या करायच्या असतात. आणि एवढे करूनही, कधी कधी बाह्य कारणांमुळे परिस्थिती अशी बनते की तिथे काम करणे अशक्य होऊन जाते. अशा वेळी शांतपणे थोड़ी वा संपूर्ण माघार घेऊन नवे काम वा नवे मार्ग अंगिकारायचे असतात. आणि समजा तेही शक्य नसेल तर, 'झाले तेवढे सामाजिक काम पुरे', असे स्वतःला व सभोवतालच्या लोकांना बजावून सामान्य जीवन छान पद्धतीने जगता येते. अर्थात सामान्य माणसांसारखे जीवन जगण्यातही लहान-मोठे अडथळे व संघर्ष असतातच, पण तिथेही सौदर्य व सर्जनशीलता असतेच असते! त्यामुळे हे जग मी सुंदर करून जाईन असा बाणा मनोमन जपताना, हे जगाचे रहाटगाडे युगानुयुगे चालू असल्याने आपले स्थान एका दवबिंदू इतकेच आहे, याचीही खूणगाठ सार्वजनिक काम करताना मनाशी बांधून ठेवायची असते. डॉ. शीतल यांना हे कळत नव्हते असे नाही, पण वळले नाही हेच खरे. 

वस्तुतः बाबा आमटे यांचा सहवास त्यांना वयाच्या पंचविशीपर्यंत लाभला होता, 'गीतेतील कर्मयोगाचा प्रभाव माझ्यावर आहे' असे त्या सांगत होत्या. मात्र त्या समजुतीत काही तरी दोष राहून गेला. कारण तीनच वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असे सहजतेने सांगितले आहे की, "विवाहानंतर काही काळ श्रीलंकेत वास्तव्याला असताना, काहीही न करता भौतिक सुविधांचा उपभोग घेत जगण्याला काहीच अर्थ नाही असे मला वाटले आणि असेच जगायचे असेल तर आत्महत्या केलेली बरी असेही वाटू लागले होते. त्याचवेळी जीवनाला काही तरी प्रयोजन असले पाहिजे असे वाटले आणि म्हणून मी आनंदवनात पूर्ण वेळ काम करायला पुन्हा आले." हे एक विधान तपासले तरी लक्षात येते की, प्रचंड ऊर्जा व सर्जनशीलता असलेली व्यक्ती उदात्त ध्येयवाद व उत्कट भावनांच्या आहारी जाऊन कुठल्याही टोकाला जाऊ शकते. राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक, कलाकार, वैज्ञानिक, स्वातंत्र्ययोद्धे, तत्त्ववेत्ते इत्यादींपैकी असलेल्या काहींनी स्वतःचे आयुष्य असेच अचानक संपवले आहे. जगभरात अशी उदाहरणे सर्वच काळात सापडतात. त्यात खलनायक आहेत आणि महानायकही. त्यामुळे एका मर्यादेनंतर अशा लोकांच्या अखेरच्या वर्तनाबद्दल चर्चा-चिकित्सा करण्याला काहीच अर्थ नसतो, इतकी अजब गुंतागुंत त्यात असते.

डॉ. शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटकांचा शोध पोलीस व न्याययंत्रणा त्यांच्या त्यांच्या परीने घेत राहतील. प्रश्न आहे तो आनंदवन परिवाराचा. पुढे काय व कसे जायचे, की गर्भगळीत होऊन सात दशकांची परंपरा असलेल्या संस्थेला ऱ्हासाच्या मार्गाने जाऊ द्यायचे? एव्हाना हे सर्वमान्य झाले आहे की, आनंदवन हे केवळ एका संस्थेचे मुख्यालय नाही. ते एक ऊर्जाकेंद्र आहे, ती मानवतेची प्रयोगशाळा आहे. आजही वर्धा व परिसरात फिरताना महात्मा गांधी यांच्या महान प्रयोगांचे अवशेष व काही खाणाखुणा दिसतात. आनंदवन ही त्याच प्रयोगांची लहानशी प्रतिकृती आहे. 'या जगातील कोणताही माणूस तुच्छ असू शकत नाही, निरुपयोगी असू शकत नाही' ही भावना तो परिसर पाहताना आजही येते. 'कोणत्याही माणसाला कोणत्याही टप्प्यावर माथा उन्नत करून जगता यायला हवे, प्रयत्न केले व संधी दिली तर ते होऊ शकते', हा विचारही आनंदवन पाहताना प्रबळ होऊन जातो. आणि म्हणूनच कदाचित, ऐन उमेदीच्या काळात तिथे भेट देऊन गेलेल्या संवेदनशील तरुणाईला जीवनभर पुरेल इतकी ऊर्जा मिळत आली आहे. त्याहीपुढे जाऊन ते लहान-लहान ऊर्जास्रोत बनले आहेत. परिणामी, महाराष्ट्रात सर्वत्र व देश विदेशांत अनेक ठिकाणे आनंदवनाशी नाते सांगणारे असंख्य लोक कार्यरत आहेत.

सारांश, आजचे आनंदवन टिकले पाहिजे, फुलले पाहिजे आणि ते अशक्य नाही. कारण गेल्या सत्तर वर्षांत आनंदवनाच्या भूमीत हजारो पीडितांनी आनंदाश्रू सांडले आहेत, तिथली जमीन हजारो तरुणांनी स्वतःच्या घामाने श्रमसंस्कार शिबिरात भिजवली आहे. आणि तिथे गेलेले लाखो लहान-थोर लोक, तळागाळातील जनमनात दिवे पेटवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपापल्या गावी परत गेले आहेत. या सर्वांच्या आशा आणि आकांक्षा यांचे आनंदवन हे प्रतीक आहे. अन्य नुकसान कितीही झाले तरी भरून काढता येते, प्रतीकाला धक्का लागणे हे नुकसान अनन्यसाधारण असते. आणि म्हणून शोकसागरात बुडालेले आनंदवन तरंगून वर आले पाहिजे. त्यासाठी बाबा व साधना आमटे यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीला शुभेच्छा द्यायला उत्सुक असलेले लक्षावधी हात आजही आम्हाला दिसताहेत!

- संपादक 
editor@kartavyasadhana.in

(उद्या प्रकाशित होणाऱ्या साधना साप्ताहिकातील हा संपादकीय लेख आहे. साधनातील लेख कर्तव्यवर नसतात आणि कर्तव्यवरील लेख साधनात नसतात. पण क्वचित कधी अपवाद केले जातात. विशेष औचित्य म्हणून हा लेख इथे पुनर्मुद्रित केला आहे. कारण डॉ. शितल आमटे यांच्या मृत्यूला आज दहा दिवस झाले आहेत.)


हेही वाचा :
संधी चालत आली, आणि मी घेतली! - डॉ. भारती आमटे 
संवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या! - डॉ. मंदा आमटे

Tags: बाबा आमटे विकास आमटे भारती आमटे शीतल आमटे Editorial Sheetal Amte Baba Amte Anandwan Vikas Amte Prakash Amte Bharati Amte Load More Tags

Comments: Show All Comments

परितोष गोडबोले

सुंदर लेख. विश्लेषण ही संपादकांची खासियत आहेच, त्यामुळे प्रश्नच नाही. इतर माध्यमांपेक्षा वेगळे मिळावे ही अपेक्षा होतीच आणि ती पूर्णही झाली. एकच... माणसे कोसळतात (भाले कारणे काहीही असोत.) पण संस्था कोसळता कामा नये.. अनेक संस्थांच्या बाबतीत हे घडले आहे घडतही आहे. आमेन...

सचिन नागरे

सुंदर , वाचनिय व सत्य परिस्थिती मांडणारा लेख आहे. लेख वाचला मला माझ्या मनाला समाधान मिळाले. आपला सदैव आभारी आहे. आनंदवन परिवाराच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद.... साधना परिवार आणि आनंदवन चे नाते अशेच जन्मोजन्मी राहो आणि माझं आनंदवन शोकसागरातुन लवकर बाहेर येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो...! आपलाच, सचिन नागरे किनगाव जटु ता लोणार जि बुलढाणा मो. 9604321432

Seema Tayade

समतोल साधत लेखामध्ये घडवून आणलेला संवाद मनाला स्पर्शून गेला .कोणत्याही पिढीला डोळसपणे अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा लेख आहे. जगावे कसे ? हे सहजपणे उलगडत गेले .नवी दिशा नवा विचार

Sulabha Shertate

माफ करा...फक्त फापटपसारा..based on imagination, आनंदवन' च पुढे काय आणि कसं ह्या उद्देशाने वाचला पण facts कमी अन वर्णन अधिक, जे इतर माध्यमातुन वाचनात आलेलं, असो.

Tejas

उत्कृष्ट लेख आहे, एकदम मुद्देसुद, पिढीपिढीमध्ये असलेला फरक, dr शीतल आमटेंच्या मनातली नक्की घालमेल छान मांडली आहे.

प्रभा पुरोहित

आनंदवन येथे दर उन्हाळ्यात भरणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरानी आजवर सामाजिक कार्यकर्त्यांची एक पिढी निर्माण केली आहे. हे विद्यापीठ उत्तरोत्तर भरभराटीने उभे असणे फार गरजेचे आहे

अशोक हेंद्रे

कसोटीचा क्षण जसा व्यक्तीच्या आयुष्यात येतो , तसाच तो संस्थांच्या जडणघडणीसमयी सुद्धा हमखास येतो. एक म्हंण आहे "हवेली की उम्र साठ साल" ! एका पिढीचा वारसा दुसर्या पिढीकडून अभावानेच जोपासला जातो.तिसर्या पिढीकडून तर तशी अपेक्षाच गैरलागू ठरते.काळाने निर्माण केलेलं हे आव्हान सामान्य माणूस पेलू शकत नाही. मात्र आनंदवन ची गोष्टचं वेगळी आहे.इथली सगळी माणसं उत्तुंग ! ती यातून निश्र्चितच मार्ग काढतील आणि आनंदाची पेरणी करणारं हे वन ताजतवाणं ठेवतील असा ठाम विश्वास आहे. अशावेळी जुनं तेच सोनं असा दुराग्रह न करता काळाची पाऊले ओळखून चळवळीमध्ये बदल करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. अशा मनोबल क्षीण करणार्या घटनेतून उभारी घ्यायची असेल तर अशा घटनेकडे एक अपघात म्हणून पाहून आपण पुढे वाटचाल करु शकतो का ? मला वाटतं याचं उत्तर आता आनंदवनातील जाणत्यांनीच द्यायचं आहे , आणि त्यांच्या उत्तरासाठी आज उभा महाराष्ट्र आतूर आहे.

Daniel M

भावपूर्ण श्रद्धांजली !!...

Dagdu lomte

फारच उत्तम! आनंदवन हे ऊर्जा केंद्र आहे सामाजिक भान असलेल्या संस्था व व्यक्तींचे. बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी पेरलेली बीजे सोमनाथ, मुळ व लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, भामरागड व अन्य प्रकल्पात अत्यंत सकसपणे उगवली त्याची फळे समाजाला मिळाली. हजारो लोक या तिर्थस्थळांची सामाजिक संस्था व व्यक्तिगत प्रेरणा घेऊन उभी राहिली. आपण केलीली मांडणी निस्पृह आहे. त्यातले बारकावे आपण योग्य शब्दात व भावना लक्षात घेउन मांडले आहेत. या संकटातून पुन्हा महारोगी सेवा समिती व त्यांचे सर्व लहान मोठे प्रकल्प बाहेर पडतील व स्थेर्य प्राप्त करतील. डॉ. विकासभाऊ, डॉ.प्रकाशभाऊ, डॉ.भारतीवहिनी व डॉ.मंदावहिनी व सर्व कुटुंबीय या दुः:खातुन सावरतील पुन्हा फिनिक्स पक्षा प्रमाणे उभारी घेऊन गत वैभव प्राप्त करतील अशी आशा आहे.

अपर्णा तोरसकर

फार छान मुद्देसुद लेख आहे. सर्व आनंदवन प्रेमी लोकांच्या मनाला उभारी देणारा आहे.आनंदवनात परत आनंद नक्की येईल.

अमिता कुलकर्णी

घडू नये ते घडले. लेख मुद्देसूद व स्पष्ट आहे. आनंदवनची पुढील वाटचाल नक्कीच आता सारखीच प्रेरणा देणारी असेल हयात तिळमात्र शंका कुणामध्येही असणार नाही. शुभेच्छा.

Sidram Bandgar

खूपच वस्तुस्थिती मांडणारा लेख .लवकरच सर्व आमटे कुटुंबीय आणि आनंदवन प्रेमी या दुःखातून बाहेर पडतील आणि पुन्हा आनंदवनातील आनंद परत येईल .

Alandeep Rajkumar Tapare

खूपच दुःखद घटना आहे .आणि गेली साथ दशकांची अविरत सेवा व त्यातून अनेकांनी घेतलेली प्रेरणा हे ही आश्चर्यकारक आहे .डॉक्टर शीतल यांची अवस्था चक्रवात शिरलेल्या अभिमन्यू सारखी झाली व त्यांना ते भेटता आले नाही .माझ्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांचे आनंदवन हे प्रेरणास्थान आहे. ते टिकले पाहिजे बहरले पाहिजे आणि तो निखळ सुंदर झरा असाच वाहत राहिला पाहिजे .आम्ही सर्वजण आनंदवन परिवारासोबत आहोत.

Manisha Tulpule

खुप संतुलित लेख. खुप शिकण्यासारखेआहे

नामदेव माळी

अशा लेखाची गरज होती. खूपच भांबावलेपण आलं होतं. अनेक लोक संभ्रमात आणि भांबालेले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील लोकांनाही आधाराची गरज असते. खरेतर त्यांना बळ द्यायचा हा काळ आहे.

चंद्रकांत पवार, सोलापूर.

अत्यंत क्लेशदायक, धक्कादायक घटना. आनंदवनात असे घडावे यांवर अजुनही विश्र्वास बसत नाही. बाबा आमटे यांनी हजारो आदिवासी/ महारोगी/पिडीतांना जगण्याची उमेद निर्माण केली, त्याच घराण्यातील तिसऱ्या पिढीतील उच्च शिक्षित तरुणीने एवढा टोकाचा निर्णय घ्यावा ,हे अनाकलनीय आहे. आयुष्यात कितीही बिकट प्रंसग आला तरी एवढा भयानक निर्णय घेता कामा नये.

प्रशांत चाफेकर

अतिशय मुद्देसूद,प्रगल्भ व वस्तुस्थिती वर नेमके बोट ठेवणारा व जाता जाता जीवनाच्या नश्वरतेवर अचूक भाष्य करणारा हा लेख मनाला विलक्षण भावला.

Sanjay Nyaharkar

Very nice balanced maintened article

SUBHASH JADHAV

Very nice and giving reality of life. Anandvan n Hemalkasa are really temples. They should be preserved, expanded n encouraged. All Amte parivar are more than GOD to me n many like me. Request not to get discouraged n stop the good work. Keep going, keep walking n keep serving. GOD IS HELPING IN UR FORM. Lot of love n respect to Amte parivar n Bhavpurna Shradhanjali to Dr Sheetal. Subhash Jadhav, Pune

Deepali Awkale

This article gives us an opportunity to have certain insights, reach certain realizations about - 'working in the field of social change'. It is natural that - such articles, which have the capacity to lead their readers upto some deep realizations, will have less facts and more descriptions which might "seem" unimportant to some people at this point of time.. But for others who are looking forward to understand such hurtful and challenging situation deeply, this article plays the role of a "Light House" to them. We are, right now, in the world that is 'full of information' but lack of importance towards expriencing things in depth. Such articles create a hope in the reader to 'wait, experience & understand' than to just read, ruminate and let go.. A pertinent article to read on Dr. Sheetal Amte's situation !

Anup Priolkar

Nice and perfect analysis about the social commitments to the society. More particularly about the contribution of Andanvan and it's followers to the society.

Kamini

I feel each every word have such electricity make us insight deeply

G D Parekh

Fully matured Balanced n Motivation for introspection to the soty

Rajashri Birajdar

2011 साली आम्ही आनंदवनाला भेट देऊन आलो तेव्हापासून त्या कार्याबद्दल आमची श्रद्धा दृढ झाली होती.त्यानंतर भेटेल त्या व्यक्तीला आम्ही तिकडे जाण्यास प्रोत्साहित करत होतो.एक अदृश्य पण अतूट बंध निर्माण झाला होता.भोवतालच्या निराशाजनक वातावरणात तो एक आशेचा किरण आहे असं तर नेहमीच वाटत असे.तशात ही बातमी आणि तत्पूर्वी आणि त्यानंतर झालेली चर्चा खूपच अस्वस्थ करून गेली. ती अस्वस्थता तुम्ही नेमक्या शब्दात मांडली .हे असे का घडले असावे याचे नेमके कारण कोणालाच ठाऊक नाही तरी तुमचा तर्क व विवेचन पटण्यासारखे आहे.शेवटी तुम्ही जागवलेला व अपेक्षिलेला आशावाद वाचून मनातली अस्वस्थता कमी झाली...दुःखावर मात करून आनंदवनाने पुन्हा उभे राहावे हीच सदिच्छा...

Add Comment