सिद्दींचे खेळातील महत्त्व

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : 10

भारतात येऊन गुलाम म्हणून सुरू झालेला सिद्दींचा हा प्रवास आज माणूस म्हणून जगण्याकडे सुरू झालेला आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे आले, येत आहेत. मात्र त्यांच्यातील कष्टाळू वृत्ती, काटकपणा या गुणांमुळे आज त्यांच्यातील काहींचा यशाकडे प्रवास सुरू आहे. खेळ, पोलिस, आर्मी अशा अनेक साहसी क्षेत्रांमध्ये ते आपली ओळख निर्माण करत आहेत. सिद्दी समाजात आता कुठे शिक्षण, आरोग्य, नोकरी आदींबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. समाधानाची बाब अशी की खेळाचे क्षेत्र हे आपले सामर्थ्य आहे, त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे हे सिद्दींना समजले आहे.

हिमा दास... नाव ऐकले तरी रनिंगचा ट्रॅक आणि त्यावरून वाऱ्याच्या वेगाने धावणारी ‘सुवर्णकन्या,’ ‘उडनपरी,’ ‘धिंग एक्स्प्रेस’ डोळ्यांसमोर उभी राहते. जिंकल्यानंतर स्वतःच्या अंगावर भारताचा झेंडा लपेटून घेऊन फिरणाऱ्या तिला पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ होते. योग्य वेळी योग्य संधी आणि प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास काय होऊ शकते- याचे हिमा दास एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. हिमाला 2019च्या आधी फारसे कोणीही ओळखत नव्हते. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांत झालेल्या 200 व 400 मीटर्स धावण्याच्या स्पर्धेत एकाच महिन्यात पाच सुवर्णपदकं जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी हिमाने केली. एका शेतकरी कुटुंबातील मुलीला संधी मिळाली आणि तिने जगभरात देशाची मान अभिमानाने उंचावली. देशाच्या ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या कानाकोपऱ्यांत हिमा दास हिच्याप्रमाणेच क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. केवळ योग्य संधी आणि प्रशिक्षणाच्या अभावी हे खेळाडू दुर्लक्षित राहिले आहेत.

अशा दुर्लक्षित घटकांमधील एक आहेत, आफ्रिकन वंशाच्या सिद्दी समाजातील खेळाडू. सिद्दींची जीवनपद्धती आणि खेळ यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. आनुवंशिकतेने शारीरिकदृष्ट्या कणखर आणि काटक असलेल्या सिद्दी मुलांना योग्य संधी आणि प्रशिक्षण मिळाल्यास जगभरात देशाची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी ते करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुस्ती, कबड्डी, ॲथलेटिक्ससारख्या शारीरिक क्षमता आवश्यक असणाऱ्या विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. रविकिरण फ्रान्सिस सिद्दी, वय 17 वर्षे हा खेळाडू आगामी काळात भारताचा ‘हुसेन बोल्ट’ म्हणून ओळखला गेल्यास नवल वाटू नये. याचे कारण 100 मीटर्स 11 सेकंदांत धावणारा रविकिरण राष्ट्रीय रेकॉर्डच्या केवळ 0.7 सेकंद मागे आहे. दुसरी आहे बारावीच्या वर्गात शिकणारी लिना सिद्दी, वय 18 वर्षे. ‘खेलो इंडिया’ योजनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षांखालील गटात तिने सुवर्णपदक पटकवले आहे. तिला दरमहा केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया योजने’ची फेलोशिप मिळते. याआधी कुस्तीतील कामगिरीसाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारकडून मदत मिळाली आहे. रविकिरण आणि लिना ही सिद्दींमधील प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. असे अनेक खेळाडू सिद्दींच्या घराघरांत सापडतात.

जगातील सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा अशी ओळख असणारी ऑलिम्पिक स्पर्धा 1896 मध्ये सुरू झाली. ही स्पर्धा दर चार वर्षांनी भरवली जाते. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये म्हणजे सन 1900ला भारतीय खेळाडू पहिल्यांदा सहभागी झाले होते. त्यानंतर पुढील सलग पाच स्पर्धांमध्ये सहभाग न घेता, सन 1920 पासून 2016 पर्यंत झालेल्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्या सहभागाला या वर्षी चीनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शंभर वर्षे पूर्ण झाली. या शतकभरात भारताने फक्त 28 पदकांची कमाई केली. त्यातही सुवर्णपदकांची संख्या केवळ सात असून त्यातील सहा सुवर्णपदके हॉकी या सांघिक खेळासाठी तर केवळ एक सुवर्णपदक नेमबाजीसारख्या वैयक्तिक खेळासाठी मिळाले आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जिथे तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे त्या देशाची खेळातील कामगिरी एवढी कमकुवत कशी? देशात गुणवत्ता अगदी ठासून भरलेली असताना अशी परिस्थिती का निर्माण होते? असे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण केवळ प्रश्न पडून चालणार नाहीत. त्याची उत्तरेही आपल्याला शोधावी लागतील.

शहरांमध्ये पालक आपल्या मुलांविषयी बरेच जागरूक आहेत. त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी खेळ, नृत्य, अभ्यास, वादन या सर्वांकडे ते बारकाईने लक्ष देतात. यासाठी या मुलांना घरून पाठिंबा तर असतोच, परंतु घरात आणि बाहेर सर्व प्रकाराच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. इतक्या सगळ्या सुविधा दिल्यानंतर, जर शाळेच्या पातळीवर आपल्या पाल्याने एखादे पदक अथवा ट्रॉफी खेळात मिळवली तर पालकांसह पाल्याची मान अभिमानाने ताठ होते. एकीकडे शहरात अशी परिस्थिती असताना त्याच्या अगदी उलट परिस्थिती उत्तर कर्नाटकातील सिद्दींच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळते. इथे घराघरांमध्ये पदकांचे ढीग सापडतात. एवढी पदके आणि ट्रॉफीज घरामध्ये ठेवायच्या कुठे हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या पदकांना, ट्रॉफीजना प्रतिष्ठा सोडा, पण त्यांचे थोडेफार कौतुकही होत नाही. म्हणजे एकीकडे देशात इतकी क्षमता असतानाही मग जेव्हा संधीची वेळ येते तेव्हा ही मुले कुठे असतात? याचा अर्थ जेव्हा संधी निर्माण होतात तेव्हा त्या योग्य क्षमता असलेल्या खेळाडूंपर्यंत पोहोचतील याची शाश्वती देता येत नाही.

आनुवंशिकतेने कणखर आणि काटक असलेली सिद्दी मुले खेळांमध्ये प्रवीण आहेत. त्यांना जन्मजात मिळालेल्या गुणवत्तेला वाव देऊन ॲथलेटिक्स, कुस्तीसारख्या खेळांमध्ये देशाला भरारी घेता येऊ शकते. तेवढी क्षमता नक्कीच त्यांच्यामध्ये आहे. त्याला जोड हवी आहे ती सरकारचे उदार धोरण, योग्य प्रशिक्षण, संधी आणि भक्कम पाठिंब्याची. ही मुले त्याच प्रतीक्षेत आहेत. मात्र, याची देखल घेण्याची मानसिकता सरकार, प्रशासन आणि माध्यमांमध्ये दिसत नाही. जन्मताच मजबूत अंगकाठी घेऊन आलेल्या या मुलांचे खेळातील भवितव्य फार उज्ज्वल असू शकते. आणि त्यांच्या माध्यमातून भारतालाही ॲथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी आदी खेळांमध्ये चांगले दिवस येऊ शकतात. ही गरज सिद्दींना आणि देशालासुद्धा आहे.

खेळातील कौशल्याची जाणीव करून देणारा ‘स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम’

देशपातळीवर संपूर्ण देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून खेळातील गुणवत्ता शोधून काढण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत एकदाच झाला. सन 1986 मध्ये तत्कालीन क्रीडामंत्री श्रीमती मार्गारेट अल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्पेशल एरिया गेम प्रोग्राम’ आखण्यात आला होता. मार्गारेट अल्वा या त्यावेळी कारवार (पूर्वीचा उत्तर कन्नड) या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्या वेळी त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. सुमारे सहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमातून देशाच्या कानाकोपऱ्यांतील बरेच चांगले खेळाडू देशपातळीवर चमकले. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये राहणाऱ्या सिद्दींवरसुद्धा त्यांची नजर पडली. ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्स खेळांमध्ये आफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व अबाधित असते. सिद्दी हे त्यांचेच वंशज आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतालासुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवता येऊ शकते हा यामागील उद्देश होता. त्याअनुसार संपूर्ण उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या सिद्दी तरुणांच्या ॲथलेटिक्स खेळांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने धावणे, लांब उडी, उंच उडी, बॉक्सिंग, कुस्ती यासारख्या शारीरिक क्षमता अधिक लागणाऱ्या खेळांमधून अव्वल खेळाडूंची निवड करण्यात आली. पहिल्या निवडप्रक्रियेत 15 सिद्दी तरुण मुलांची निवड करण्यात आली. त्यात 12 तरुण आणि तीन तरुणींचा समावेश करण्यात आला. 1987 मध्ये पुन्हा सिद्दींमधील 15 जणांची निवड करण्यात आली. यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. काहींनी एशियन खेळांपर्यंत मजल मारली होती. हे सर्व खेळाडू पुढील वाटचालीसाठी सज्ज होत होते. मात्र दुर्दैवाने राजकीय उदासीनता, सत्ताबदल आणि व्यवस्थापनातील त्रुटींनी या कार्यक्रमाचा गाशा गुंडाळला गेला. केवळ सहा वर्षांतच म्हणजे सन 1992 मध्ये हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कार्यक्रम रद्द करताच या खेळाडूंना तडकाफडकी पुन्हा घरी पाठविण्यात आले. तेव्हापासून आजतागायत सिद्दी आणि इतर वंचित मुले योग्य संधी आणि पाठिंब्याच्या शोधात आहेत.

हा कार्यक्रम बंद झाला असला, तरी यामधून सिद्दी समाजाला एक नवी उमेद मिळाली. राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळणाऱ्या काहींना खेळाच्या आरक्षणातून (स्पोर्ट कोटा) रेल्वे, सैन्य, पोलिस अशा विविध सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे एवढी वर्षे खितपत पडलेल्या समाजाला आपल्या प्रगतीचा मार्ग सापडला होता. खेळामुळे पैसा, सरकारी नोकरी मिळते म्हणून अनेक पालक त्यांच्या मुलांना खेळासाठी प्रवृत्त करू लागले. याचा परिणाम असा झाला की आता सिद्दींच्या घराघरांमध्ये खेळाडू तयार झाले आहेत. जंगलामध्ये राहणाऱ्या सिद्दींना भेटल्यावर अनेक घरांच्या शोकेसमध्ये कबड्डी, कुस्ती आणि ॲथलेटिक्ससारख्या खेळांमध्ये मिळालेल्या पदकांचा खच पडलेला बघायला मिळतो.

‘स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम’ (एसएजीपी) मध्ये सिद्दी मुलांमधून निवड करण्यात आलेल्या पहिल्या 15 खेळाडूंमधे मेरी सिद्दी यांचाही समावेश होता. त्यांच्या घरी गेल्यावर आपले लक्ष वेधून घेतात ते, दिवाणखान्याच्या शोकेसमध्ये त्यांनी ठेवलेली अनेक पदके, सन्मानचिन्हे. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये हा ठेवा मिळवलेला आहे. त्यांचा मुलगाही कबड्डी खेळतो. खेळाच्या आरक्षणातून (स्पोर्ट कोटा) रेल्वेमधील नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

“खेळ हा आमच्या रक्तातच असून सिद्दी मुले जन्मतः मजबूत बांध्याची असल्याने ‘ॲथलेटिक्स’मध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतात,” असे मेरी सिद्दी सांगत होत्या. त्यांच्या अनुभवाविषयी सांगताना मेरी म्हणतात, “स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅमच्या पहिल्या बॅचमधील पहिल्या पंधरा जणांमध्ये माझा समावेश झाला होता. 15 जणांच्या टीममध्ये आम्ही तीन मुली होतो. रूपा सिद्दी, माला सिद्दी आणि मेरी सिद्दी. शाळेपासूनच आम्ही खेळामध्ये चॅम्पिअन असायचो. एसएजीपीमध्ये आमची निवड झाल्यानंतर पहिले आठ महिने आम्हांला हरियाणाला नेऊन प्रशिक्षण दिले. त्यानंतर दिल्लीत प्रशिक्षणासाठी आणून आम्हांला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश करून दिला. पण इंग्रजी भाषेची अडचण व्हायला लागल्याने मार्गारेट अल्वा यांनी बंगळुरूमध्ये स्पोर्ट ‘ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या माध्यमातून एक प्रशिक्षण केंद्र उभारले, आणि आम्हांला तिथे आणून प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तीन वर्षांच्या प्रशिक्षणातच आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळण्यास पात्र झालो होतो. मी शंभर, दोनशे, चारशे मीटर धावायचे. त्या वेळी भारताची ‘सुवर्णकन्या’ म्हणून ओळख असलेली पी.टी. उषा, वंदना राव, रिटा भोसले या त्या काळातील प्रसिद्ध खेळाडूंबरोबर प्रशिक्षण घेण्याची संधी आम्हांला मिळाली. राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दहा ते बारा वर्षं लागली होती. तिथपर्यंत आम्ही केवळ तीन वर्षांत पोहोचलो होतो. आम्हांला आणखी पाच-सहा वर्षं अजून प्रशिक्षण मिळाले असते तर आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला सुवर्णपदक मिळवून दिले असते. एवढा आत्मविश्वास त्या वेळी आमच्यामध्ये आला होता. पण अचानक हा कार्यक्रम रद्द झाला आणि आम्हांला घरी पाठविण्यात आले. हा कार्यक्रम रद्द झाल्याचे कोणतेही कारण आम्हांला सांगण्यात आले नाही. आम्ही खूप दूरपर्यंत जाण्याची स्वप्ने बघत होतो. परत घरी येताना आम्हांला रडू आवरत नव्हते. परत अशी संधी मिळेल का याची खात्री नव्हती. आणि तसेच झाले. त्यानंतर घरातूनही पाठिंबा मिळाला नाही आणि सरकारकडूनही कुठली हालचाल करण्यात आली नाही. स्पोर्टस् कोट्यातून मला रेल्वेमध्ये नोकरी मिळत होती. पण अडाणी आईवडिलांनी ही नोकरी करू देण्यास नकार दिला.”

मेरी यांची ही गोष्ट सुमारे 34 वर्षांपूर्वीची. तेव्हा सिद्दी समाज नुकताच ओळख मिळवण्यासाठी धडपडत होता. त्या काळात सरकारची ही योजना त्यांच्यासाठी मोठी लॉटरीच होती. असे असले तरी तेव्हा आणि आत्ताच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सिद्दींची पहिली पिढी शिक्षण आणि नोकरीत पुढे येत आहे. त्यांना पूर्वीपेक्षा आता खेळाचे महत्त्व अधिक पटले आहे. पालक त्यांच्या मुलामुलींना खेळासाठी पाठिंबा देत आहेत. मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा शालेय पातळीपासून जिल्हा, राज्य पातळीपर्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत. कुस्तीचे आखाडे, कबड्डीचे मैदान किंवा रनिंगचे ट्रॅक असोत सगळीकडे सिद्दी मुले चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.

स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम लवकर बंद झाला तरी त्यातील सकारात्मक बाजू ही की, इतक्या अल्पावधीतही अनेक गुणी खेळाडू नावारूपाला आले. खेळामुळे या दुर्लक्षित मुलांना नवीन ओळख मिळाली. स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅममधून जुजे सिद्दी - फुटबॉल, लुईस सिद्दी - बॉक्सर, अँग्नेल सिद्दी, मिंगॅल सिद्दी, झुझॅ बिर्जी, झुझॅ अँग्नेल, फिलिप सिद्दी – धावणे, डेव्हीड सिद्दी, फ्रान्सिस सिद्दी, कमला सिद्दी - धावणे, मेरी सिद्दी - धावणे असे अनेक खेळाडू निर्माण झाले. ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाचा ठसा उमटवला. यांतील काही एशियन स्पर्धेपर्यंतसुद्धा पोहोचले होते. सध्या यांतील अनेक जण रेल्वे आणि इतर सरकारी विभागांत नोकरी करत आहेत.

शिक्षण आणि खेळाचा संबंध

स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम बंद झाल्यापासून आतापर्यंत या मुलांसाठी पुन्हा असा कोणताही कार्यक्रम राबवण्यात आला नाही. पोटासाठी मोठे शेतकरी, सावकार, जमीनदारांच्या घरी घरगड्यांप्रमाणे काम करत सिद्दींच्या अनेक पिढ्या अशाच संपल्या. आज ते स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी आजही हे लोक ‘कुली’चे काम (कुली म्हणजे रोजंदारीवर मिळेल ते काम करणे) करतात. थोडीफार शेती किंवा जंगलातील वनस्पतीपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर त्यांची उपजीविका चालते. यातून पोटाचा प्रश्न नीट भागत नाही. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण हा खूप मोठा प्रश्न असतो. जेमतेम नववी ते दहावीपर्यंतच शिक्षण घेण्याचे प्रमाण इथे अधिक आहे. त्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावेच लागते. पोटाच्या प्रश्नापुढे शिक्षण आणि खेळाचा मुद्दा दुय्यम ठरतो. बोटावर मोजण्याइतपत मुलं दहावीच्या पुढे शिक्षण घेतात. त्यामुळे शालेय स्तरावर खेळांमध्ये उत्तम कामगिरी बजावणारी मुले शिक्षणासोबतच खेळापासून तुटून जातात. जोपर्यंत शिक्षण सुरू आहे, तोपर्यंतच खेळात काहीतरी करण्याची संधी मिळते. सिद्दी मुलांचे शिक्षण आणि खेळातील भवितव्य एकमेकांवर अवलंबून आहे. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी आणि सिद्दी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी शासकीय पातळीवर चांगले धोरण अवलंबिण्याची गरज आहे. ज्यामधून शिक्षणासोबतच त्यांच्या खेळातील कौशल्याचा विकास होईल. ज्यातून देशासाठी खेळणारे उत्तम खेळाडू घडवता येतील.

स्पेशल एरिया गेम (एसएजीपी) हा प्रकल्प 1992 मध्ये बंद झाला. तो बंद होण्याचे 'सत्ताबदल' हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या प्रकल्पाचे अधिकारी बी. व्ही. पी. राव यांची दुसऱ्या प्रकल्पावर बदली करण्यात आली, तर प्रकल्पासाठी महत्त्वाचे असणारे प्रशिक्षक ‘रवन्ना’ यांचा मृत्यू झाल्यामुळेही इतका चांगला प्रकल्प बंद झाला असे सांगण्यात येते. यातून हेही समजते की, आपल्याकडे खेळासाठी फार विधायक संकल्पना येत नाहीत, आणि त्या राबवल्या, तरी त्या दीर्घकालीन उपाययोजना असतीलच हे सांगात येत नाही.

एसएजीपीनंतर 2015मध्ये स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून (एसएआय) सिद्दी मुलांमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळवण्याची ताकद असल्याचे ओळखून काही योजना राबवता येतील का याचा आढावा घेण्यात आला. 2016 मधील ऑलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून एसएआयकडून सरकारकडे प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्या दृष्टीने पावले उचलली जावीत असे वाटत असताना निधीवरून योजना राबवण्याचे बारगळले. सध्या ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ते 2024 चे ऑलिम्पिक स्पर्धेचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून. परंतु सध्याची योजना अत्यंत तुटपुंज्या आर्थिक तरतुदींवर सुरू आहे. सध्या सिद्दी समाजातील 20 मुलांना ॲथेलेटिक्ससारख्या खेळासाठी तयार केले जाणार आहे, मात्र त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक उपलब्ध नाहीत ही त्या मुलांसाठी आणि देशासाठी शोकांतिका म्हणावी लागेल. 1986ला ज्या जोमाने आणि तयारीनिशी हा प्रकल्प अमलात आणला जात होता त्याच तडफेने तो पुन्हा एकदा देशभरात सुरू व्हायला हवा. ग्रामीण, आदिवासी भागातील मुलांसाठी आणि देशाच्या खेळातील भवितव्यासाठी स्पेशल एरिया गेमसारखे कार्यक्रम पुन्हा एकदा राबविण्याची गरज अधोरेखित होते.

सिद्दी खेळाडूंच्या खेळाच्या कौशल्याची स्तुती करताना माजी केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती मार्गारेट अल्वा, म्हणतात, “सिद्दींमध्ये टॅलेन्ट खूप आहे. विशेषत: धावणे, उंच उडी, लांब उडी, कराटे, बॉक्सिंग, ॲथलेटिक्समध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गरज आहे फक्त त्यांना योग्य संधी देण्याची. राजीव गांधी पंतप्रधान असताना मी क्रीडामंत्री होते. त्या वेळी देशाच्या विविध भागांत स्थानिक पातळीवर खेळले जाणारे खेळ आणि त्यात तरबेज असणाऱ्या खेळाडूंना शोधून त्यांना खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला होता. त्याला स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम असे नाव देण्यात आले होते. त्या वेळी सिद्दींमधील देखील अनेक खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यांचे खेळातील कौशल्यदेखील चांगले होते. पण आपल्या देशात सरकार, सत्ताधारी बदलत राहतात. मग आधीच्या सरकारच्या चांगल्या योजनाही बंद केल्या जातात. तेव्हाही तसेच झाले.”

आनुवंशिकदृष्ट्या वेगळेपणाचा फायदा

सिद्दी मुलांच्या आनुवंशिक वेगळेपणाविषयी बेळगावस्थित वरिष्ठ डॉ.बी.आर. निलगार सांगतात, “शारीरिक भक्कमपणा सिद्दी लोकांच्या आनुवंशिक बांधणीतच आहे. कुठल्याही परिस्थितीतशी दोन हात करण्याची ताकद निसर्गतःच त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. त्याचा उपयोग त्यांना खेळात होतो. खेळामध्ये होणाऱ्या दुखापती निभावून नेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये अधिक असते ती व्यक्ती खेळासाठी योग्य समजली जाते. आणि सिद्दींमध्ये ती आहे. ॲथेलेटिक्ससारखे गेम ते सहज आत्मसात करतात. हे खेळण्यासाठी ‘मसल स्ट्रेंथ’ मजबूत लागते, ती त्यांच्याकडे आहे. निसर्गतःच मिळालेल्या या देणग्यांमुळे सिद्दी खेळात खूप मोठी झेप घेऊ शकतात.”

उत्तर कर्नाटक विद्यापीठातून सिद्दींच्या मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करणारे डॉ. प्रकाश पाटील यांनी त्यांच्या प्रबंधात सिद्दींच्या आरोग्याविषयी काही मुद्दे मांडले आहेत. डॉ. पाटील यांच्या प्रबंधाअनुसार, इतर समाजातील मुलांपेक्षा सिद्दी मुलांमध्ये आरोग्याबाबतच्या तक्रारी कमी आहेत. सामान्य मुलांमध्ये वारंवार आढळणारे अशक्तपणा, पोटात दुखणे, श्वसनाचे विकार सिद्दी मुलांमध्ये कमी आढळतात. याचा फायदा त्यांना खेळात नक्कीच होत असणार.

कारवारमधील हलियाल या तालुक्याच्या ठिकाणी ‘कर्नाटक क्रीडा प्राधिकरणाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र’ आहे. आजच्या घडीला 35 सिद्दी मुले-मुली इथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. यातील अनेक मुलांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश झाल्यामुळे या मुलांना इथे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यांची निवास आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाते. अशा विविध प्रकारच्या सुविधा सिद्दी मुलांना राज्य सरकारकडून दिल्या जातात. या प्रशिक्षण केंद्राचे व आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेचे प्रशिक्षक तुकाराम गावडा पाटील यांनी इतर भारतीय आणि सिद्दी मुले यांच्यातील वेगळेपणाविषयी सांगितले. पाटील म्हणतात, “ सिद्दींच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाचे वजन व उंची इतर समाजांतील सातवीत शिकणाऱ्या मुलापेक्षा जास्त असते. कुस्तीमध्ये व्यायाम आणि शरीरयष्टीला जास्त महत्त्व आहे. इतर मुलांना ‘सिक्स पॅक’ कमवावे लागतात, सिद्दी मुलांना आनुवंशिकतेने थोड्या प्रमाणात प्राप्त झालेले असतात. यातून त्यांच्यातील भक्कमपणा लगेच जाणवतो. याचा उपयोग सराव आणि प्रत्यक्ष खेळात नक्कीच होतो. शारीरिक क्षमतेची इतकी मोठी देन लाभलेल्या या मुलांना संधी आणि प्रशिक्षणाची जोड लाभली तर देशाचे खेळातील भवितव्य उज्ज्वल असेल.”

आजही करावा लागणारा वर्णभेदाचा सामना

‘आपला देश सहिष्णुता पाळणाऱ्या लोकांचा आहे,’ असे वारंवार म्हटले जाते. बहुधा ते स्वतःच्या समाधानासाठी असावे. परंतु, आपल्या देशातील एक जळजळीत सत्य म्हणजे जातीच्या आधारावर जसा भेदभाव होतो, तसाच भेदभाव वर्ण, वंश, रूपावरूनदेखील केला जातो. सिद्दी खेळाडूंना पावलापावलांवर याचा सामना करावा लागतो. गुणवत्तेपेक्षाही माणसाच्या दिसण्यावरून त्याचा जास्त दर्जा ठरवला जातो. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. खेळातील निवडचाचणी पार करून, योग्य ती कौशल्ये दाखवूनही अनेक ठिकाणी स्पर्धेच्या वेळी भेदभावाची वागणूक मिळते. त्यामुळे होणारी मानहानी, मानसिक नुकसान न भरून येणारे असते. सिद्दी समाजातील हलियाल तालुक्यातील लीना सिद्दी ही कुस्तीपटू सांगते की, ती जिथे स्पर्धांना जाते त्या ठिकाणी तिच्या काळ्या रंगामुळे, राठ केसांमुळे तिला कोणीही जवळ करत नाही. सोबत सराव करणे लांबच परंतु कोणी बोलायलाही तयार होत नाही. अशा परिस्थितीत स्वतःला मानसिकरीत्या खंबीर करत चांगला खेळ करणे ही मोठी कसोटी असते. लीना हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेकांचे कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव आहेत. त्यांचे दिसणे, भाषा, राहणीमान या सगळ्याला एका पूर्वग्रहदूषित नजरेने बघितले जाते. यामुळे खेळ आणि स्पर्धा नकोच असेही वाटून जाते- असेही ही मुले सांगतात.

भारतात येऊन गुलाम म्हणून सुरू झालेला सिद्दींचा हा प्रवास आज माणूस म्हणून जगण्याकडे सुरू झालेला आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे आले, येत आहेत. मात्र त्यांच्यातील कष्टाळू वृत्ती, काटकपणा या गुणांमुळे आज त्यांच्यातील काहींचा यशाकडे प्रवास सुरू आहे. खेळ, पोलिस, आर्मी अशा अनेक साहसी क्षेत्रांमध्ये ते आपली ओळख निर्माण करत आहेत. सिद्दी समाजात आता कुठे शिक्षण, आरोग्य, नोकरी आदींबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. समाधानाची बाब अशी की खेळाचे क्षेत्र हे आपले सामर्थ्य आहे, त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे हे सिद्दींना समजले आहे. आज सिद्दी पालक मुलगा-मुलगी हा भेद न करत दोघांना समान शिक्षण आणि खेळासाठी प्रवृत्त करत आहेत. मुलींमधील आजच्या पिढीतील प्रिंसिटा सिद्दी, लीना सिद्दी अशा अनेक खेळाडू मुली पुढे येत आहेत. म्हणजेच तीस वर्षांपूर्वीच्या महिला खेळाडू मेरी सिद्दी यांना जो घर आणि समाज दोन्ही पातळ्यांवरच्या भेदभावाला सामोरे जावे लागले तो संघर्ष लीना आणि प्रिंसिटाच्या वाट्याला आला नाही. हा फार मोठा सकारात्मक बदल होय. याच बदलाचे वारे एक दिवस सिद्दींचा प्रवास ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकापर्यंत घेऊन जाणार आहे. समाजाकडून आपुलकी, सामावून घेणे आणि शासनाची मदत हे पाठबळ मिळाल्यास तो सुदिन दूर नाही. सिद्दीच नाही तर देशातील कानाकोपऱ्यांतील मुलांमधील कौशल्य एकत्र आणण्यात यश आले तर फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळांतही भारताचे भवितव्य उज्ज्वल असेल यात शंका नाही.

- ज्योती भालेराव बनकर
bhaleraoj20@gmail.com


उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज या दीर्घ रिपोर्ताज मधील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


सिद्दींचे खेळातील महत्त्व 

प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...

1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशिपच्या रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात-आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत. 

वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 'साधना ट्रस्ट'च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल. (साधनाकडे 80 G आहे), नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना कळवले जातील.
धन्यवाद! 

विनोद शिरसाठ, संपादक, साधना 
weeklysadhana@gmail.com
Mob 9850257724

प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com
Mob : 97302 62119

Tags: सिद्दी समाज आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज Load More Tags

Add Comment