सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ - समाजवादी युवक दल

डॉ. दाभोलकर यांनी 40 वर्षांपूर्वी, म्हणजे वयाच्या पस्तिशीत असताना लिहिलेला लेख

महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या तरुणांच्या जाणिवांचा शोध घेणारे ‘संकल्प’ हे संजीव खांडेकर यांनी संपादित केलेले पुस्तक 1982 मध्ये ग्रंथालीने प्रकाशित केले होते. त्यात रझिया पटेल, पार्थ पोकळे, वाहरू सोनवणे, दीनानाथ मनोहर, कुमार सप्तर्षी इत्यादी मान्यवरांनी चळवळीतील सुरुवातीच्या दिवसांविषयीचे अनुभव आणि त्यामधून आकाराला आलेला विचार, कार्यशैली यांविषयी लेख लिहिले होते. या पुस्तकातील पहिलाच मनोगतपर लेख आहे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा. वयाच्या पस्तीशीपर्यंतच्या वाटचालीवर आधारित हा लेख आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.   

कॉलेजात असताना सामाजिक कामाची कल्पना मनात उसळत असायची. आता वाटते, ती बरीचशी भाबडी होती. घरी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, प्रा. मे. पुं. रेगे, प्रा. श्री. श. भणगे यांसारखी मंडळी अधूनमधून असायची. त्यांच्या भावाबरोबरच्या (देवदत्त दाभोलकर) गप्पांमुळे विचाराला खाद्य मिळायचे. समाजवादी परिवारातल्या माणसांचीही प्रासंगिक ऊठबस असे, त्याचाही परिणाम होता. सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या जागृत. त्यातील अनेक जण दादांशी गप्पा मारायला येत. या साऱ्यांमधून काही करावे असे वाटायचे. आता वाटते, ते तसे धूसर होते.

ज्या वर्षी डॉक्टरीची परीक्षा पास झालो त्या वर्षीच्या दोन गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला. कुमार सप्तर्षी हा त्या वेळचा युक्रांदचा नेता. बिहार दुष्काळातील काम, फी-वाढविरोधी आंदोलन यामुळे पुण्यात त्याचे नाव गाजत होते. तो विश्रामबागला आला होता. कॉलेजमध्ये त्याची काही व्याख्याने घडवण्यातही मी पुढाकार घेतला होता. त्या वेळच्या माझ्या मनाला कुमारने चळवळीच्या अंगाने केलेली विचाराची रोखठोक व आकर्षक मांडणी खूप झपाटणारी वाटली होती. 

दुसरी आठवण जयप्रकाशजींची. जयप्रकाश नारायण 1969 सालातील अखिल भारतीय सर्वोदय संघाच्या अधिवेशनाकरिता सांगलीला येणार होते. त्यांना 67 वे वर्ष लागले म्हणून 67 हजार रुपये द्यायचे ठरले होते. माझा भाऊ त्या समितीचा कार्याध्यक्ष होता. प्रभावतीदेवींसह आलेल्या जयप्रकाशजींची सोय आमच्या बंगल्याजवळच असलेल्या कॉलेजच्या गेस्ट हाऊसवर केली होती आणि स्थानिक स्वयंसेवक म्हणून सर्व देखभालीसाठी त्या ठिकाणी मी तिन्ही दिवस जे.पीं.च्या बरोबर होतो. 

लोक गटागटाने येत आणि जे.पीं.च्या बरोबर आपला फोटो काढून घेत. काही वेळा आग्रह करून प्रभादेवींनाही फोटोत घेत. तीन दिवसांत माझी दोघांशी बऱ्यापैकी जानपहचान झाली. तेव्हा त्या दोघांबरोबर एकट्याचा फोटो काढणे सहज शक्य होते. पण का कोण जाणे, मनात विचार आला, आपली लायकी आहे का? आणि फोटो काढणे मी टाळले. जे.पीं.ना घेऊन चौथ्या दिवशी गाडी निघाली, त्या वेळी मी काही कारणाने घरीच होतो. घरासमोरून जाताना काहीतरी आठवल्यासारखे करून जे.पीं.नी गाडी थांबवली आणि बरोबर असलेल्या माझ्या भावाला म्हणाले, “तुमच्या भावाचा निरोप घ्यायचा राहिला.” मला दादांनी हाक मारली. गाडीची काच वर करून जे.पीं.नी माझा हात हातात घेतला, तीन दिवसांच्या स्वयंसेवकाच्या सेवेबद्दल धन्यवाद दिले, आणि म्हणाले, "कुछ बनो.” पुढे बरेच दिवस मी अस्वस्थ राहिल्याचे मला आठवते.

1971 साली इंटर्नशिप संपवून मी सातारला गेलो. सातारा हे माझे गाव, शिवाजी उदय मंडळाचा मी नावाजलेला कबड्डीपटू. क्रीडामंडळात बरीच तरुण मुले असायची. मुले हमखासपणे हाकेला उभी राहणारी. स्वाभाविकच त्यांचा उपयोग सामाजिक कामात सहजपणे होणार होता. पण क्रीडासंस्थेचे वळण काँग्रेसचे होते. निवडणुकीच्या वेळी ती हमखास यशवंतराव चव्हाण सांगतील ते काम करायची. म्हणून संघटना नव्या नावाने उभारायचे ठरले. 

समाजवाद हे उद्दिष्ट, युवक हे माध्यम आणि दल हे साधन म्हणून 'समाजवादी युवक दला' ची स्थापना झाली. कल्पना वैचारिक आणि व्यावहारिकदृष्ट्याही अस्पष्टच. स्थापना बैठक ही मंडळातच झाली. 'समाजवाद: प्रेरणा व प्रक्रिया' हे विविध विचारवंतांचे समाजवादावरचे लेख एकत्रित देणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. त्याचा उपयोग संघटनेचे ध्येयधोरण ठरवताना झाला. त्या वेळी ते भलतेच भारदस्त वाटले. 

स्थापनेच्या वेळी दि. के. बेडेकर आले होते. त्यांचे भाषण संध्याकाळी व बौद्धिक रात्री होते. रात्री नऊला साठ-सत्तर तरुण मुले समाजवाद ऐकायला जमलेली पाहून त्यांना फारच आनंद झाला. विचाराच्या बांधिलकीपेक्षा क्रीडांगणाच्या बांधिलकीतून ही तरुण मुले जमल्याचे वास्तव मी त्यांना सांगू शकलो नाही.

मी त्या वेळी साताऱ्यापासून सहा मैलांवरच्या परळीला वैद्यकीय अधिकारी होतो. माझ्याकडे सहा उपकेंद्रे होती. मानेवाडी त्यांपैकी एक. प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि तिला मदतनीस म्हणून आया असायची. मानेवाडीची आया त्याच गावची. आडनाव कांबळे. गावात विहिरीवर पाणी भरायला मिळत नाही, वाढतात हे मला तिच्याकडून समजले. बाबा आढावांची पाणवठा चळवळ त्या वेळी नुकतीच गाजू लागली होती. मानेवाडीला 'एक गाव एक पाणवठा' करायचे ठरवले. दलित वस्तीत बैठका घेतल्या. गावात दबाव बराच होता. मंडळी तयारच होईनात. शेवटी काही बैठकांनंतर त्यांना विश्वास आला. मिरवणुकीने जाऊन पाणी भरले. दुसऱ्या दिवशीपासून गावात दलितांवर कडकडीत बहिष्कार. काम मिळेना, गावात धान्य मिळेना. मंडळी सैरभैर होऊन सातारला आली. त्यांना घेऊन कलेक्टरकडे गेलो. मी सरकारचा क्लास टू ऑफिसर. कलेक्टर सुपर क्लास वन. हाताखालच्या अधिकाऱ्याने असे शिष्टमंडळ आणणे हा त्याला नियमांचा भंग वाटला. त्यामुळे तो नाराज. प्रश्न तर सुटायला पाहिजे होता. सातारचे त्या वेळेचे आमदार, राज्यमंत्रीही होते. त्यांना भेटलो, काही करण्याची विनंती केली. गावचा मराठा मतदार समतेसाठी दुखवणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी आम्हांलाच झापले, "महात्मा फुल्यांनी या प्रश्नात गुडघे टेकले आणि महात्मा गांधींनी हात टेकले, आणि तुम्ही पोरं निघाला शहाणपणा करायला!”

त्यांना मी सरकारी नोकरीत आहे हे माहीत नव्हते ते नशीब. चार दिवसांनी समाजकल्याणमंत्री दादासाहेब रूपवते सातारा दौऱ्यावर आले. त्यांनी लक्ष घातले आणि कणखर भूमिका डीएसपीला घ्यावयास लावली म्हणून आम्ही वाचलो. पण आपण पाय टाकत असलेले पाणी खोल खोल जाते याची त्या वेळी जाणीव झाली.

उत्साहाच्या भरात केलेल्या काही चुका कशा गोत्यात आणतात हे याच सुरुवातीच्या काळात शिकलो. आमदार बनातवाला यांनी वंदेमातरम् म्हणायला नकार दिल्याची बातमी होती. त्यामुळे चिडून जाऊन पुण्याला तरुणांनी 'इस देश में रहना होगा तो वंदेमातरम् कहना होगा' अशा घोषणांची पत्रके सर्वत्र लावली होती. आमच्यातल्या काही उत्साही मंडळींना तो कार्यक्रम पटला. आणि त्यांनी 'वंदे मातरम् देश की पुकार, जो न पुकारे वो गद्दार' अशा घोषणांची मोठी पत्रके छापून घेतली. त्याच्यावर मागे प्रकाशकाचे नाव घालायचे हे माहीत नव्हते. त्यात हुशार मुद्रकाने स्वतःच्या प्रेसचे नावही छापले नाही. धूमधडाक्यात भिंतींवर वाहनांवर घोषणापत्रके चिकटवण्याचा कार्यक्रम झाला. आणि सकाळी डीएसपीचे निमंत्रण घेऊन जीप आली. वातावरण प्रक्षोभित करणारी पत्रके आणि तीही छपाईच्या नियमांचा भंग करून, असा गुन्हा. गुन्हा करणारा राजपत्रित अधिकारी. गुन्हा कबूल होता. शिक्षा होणार हे नक्की होते. स्वाभाविकच नोकरीही जाणार होती. डीएसपी चांगला होता. तो म्हणाला, तुम्ही कोणाही एका अन्य नोकरीवर नसणाऱ्या मुलाचं नाव द्या, माझी हरकत नाही. पण अशी जबाबदारी टाळणे मला पटत नव्हते. दुपारी वातावरण तणावाचे झाले म्हणून शांतता समितीची सभा बोलावली गेली. गावातल्या अनेक मुस्लिमांनी माझ्यावर खटला घालण्याच्या कल्पनेस विरोध केला आणि त्यापुढे डीएसपीला नमते घ्यायला लागले.

या प्रकारच्या चळवळीतून मंडळाशी खेळाडू म्हणून संबंध राहिले तरी कार्यकर्त्यांना पुरवठा बंद होत गेला. त्यांच्या काँग्रेसी पिंडाला हे मानवणारे नव्हते. जयप्रकाशजींची बिहारची चळवळ हळुहळू आकारत होती आणि दलाच्या नावाने काम करणारा छोटा गट त्याकडे खेचला जात होता. त्याच सुमारास तेलाची भाववाढ प्रचंड झाली होती, आणि तेलाच्या गिरण्यांतील साठे घेराव करून ताब्यात घेऊन कमी दरात वाटण्याचे छापा तंत्र शिवसेना व अन्य काही संघटनांनी पुण्या-मुंबईला अवलंबिलेले होते. अतिशय प्रासंगिक आणि अपुऱ्या विचारावर आधारलेले, परंतु क्षणिक आकर्षण ठरणारे हे आंदोलन होते. श्रावणाचा महिना असल्याने तेलाच्या दराबरोबर आम्ही उपवासाच्या सर्व गोष्टीदेखील आमच्या आंदोलनात घेतल्या होत्या. भरपूर तरुण मुले रस्त्यावर आली. त्यांत प्रामुख्याने मंडळाचीच मुले जास्त होती. आंदोलन यशस्वी झाल्याचा क्षणिक आभास झाला. पण पुढे जोर लावायचा ठरला तर मंडळाची मुले तिथल्या अध्यक्षांच्या सूचनेवरून बाहेर पडली. लढ्याचा शक्तिपातच झाला. स्वतःच्या शक्तिसंचयाचे शहाणपण मला त्या वेळी निर्णायकपणे जाणवले.

पुढे आणीबाणी आली. मंडळाबरोबरची नाळ तुटली. वैचारिक स्पष्टता वाढीला लागली. नरहर कुरुंदकरांची लागोपाठ दोन वर्षे झालेली वैचारिक शिबिरे डोळे उघडणारी ठरली. आणीबाणी विरोधाच्या भूमिकेमुळे आम्ही कोणत्या बाजूचे याची संदिग्धता संपली. आणीबाणीला आम्ही सक्रिय विरोध केला. पण बहुसंख्य कार्यकर्ते नोकरी करणारे होते. त्यामुळे प्रत्यक्ष सत्याग्रह मात्र केला नाही. पत्रके वाटणे, भिंती रंगवणे, भूमिगत कार्यकर्त्यांना घरी ठेवणे, पैसे जमवणे, ही सगळी जोखीम आम्ही पार पाडली. आज वाटते, नोकरीचा मोह जो पुढे सोडला तो आणीबाणीतच सोडून सत्याग्रह करायला पाहिजे होता. नाही म्हटले तरी रुखरूख कायमची राहिली. अर्थात केले तेही तसे पोलिसांनी उचलून नेण्यास पुरेसे होते. पन्नालाल सुराणा भूमिगत म्हणून घरी राहून गेले. त्यांनी येताना ढीगभर प्रचार साहित्य आणले होते, त्याने घरातले कपाट भरले होते. दोन दिवसांनी पन्नालाल साताऱ्यात येऊन गेल्याची बातमी पोलिसांना लागली. स्थानिक सीआयडी इन्स्पेक्टर मला भेटायला घरी न येता आयटीआयमध्ये मी वैद्यकीय अधिकारी होतो तिथे आला. दोन तास चौकशी चालली होती. वेगवेगळ्या पद्धतीने गुगली प्रश्न टाकण्यात येत होते. चौकशी चालू “पन्नालाल साताऱ्यात येऊन गेल्याची बातमी खरी आहे. पण ते उतरले कुठे? तुमच्याच घरी उतरण्याची शक्यता सर्वात जास्त.” असे म्हणून होती. शेवटी त्यांचे तात्पुरते समाधान मी केले. घरी येऊन सहज म्हणून कोणतेही कपाट त्यांनी उघडले असते तरी त्यांचे पुरेपूर समाधान झाले असते.

घटना दुरुस्तीवर जाहीर चर्चा व्हावी असे त्या वेळी बाई बोलल्या होत्या. आम्ही चर्चा आयोजित करण्यास परवानगी मागितली. फारच प्रयास पडले. शेवटी एकदाचा परिसंवाद जाहीर झाला. घटना दुरुस्तीविरोधी बोलणारा असा मी एकटाच. बाकीचे सोयिस्करपणे गैरहजर राहिले. घटना दुरुस्तीची तरफदारी करण्यासाठी जिल्ह्यातील दोन नामांकित वकील होते. त्यांनी भाषण केल्यावर मी बोललो. भाषण फारच जहाल झाले. गांधींच्यावर नाव घेऊन टीका केली. त्या रात्री मला पकडणार याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नव्हती. पण कसा वाचलो कोण जाणे.

आधी रचना नंतर संघर्ष, की आधी संघर्ष नंतर रचना, की संघर्षाला तळ बांधण्यासाठी रचना, असे वाद जयप्रकाशजींच्या आंदोलनाच्या काळात नेहमी चालत. त्याचा एक व्यावहारिक जीवघेणा अनुभव आणीबाणीत आला आणि तत्त्वमंथनाला व्यवहारातून परस्पर उत्तर मिळाले. आणीबाणीत प्रत्यक्ष संघर्ष अशक्य म्हणून आम्ही वीस कलमांच्या आधारे दलितांच्या जमिनी सोडवण्याचा आणि प्रत्यक्ष कसण्याचा कार्यक्रम करीत होतो. साताऱ्यापासून सहा मैल अंतरावरच्या गवडी गावात दलितांची अशी बारा एकर गहाणवट सोडविली. कसण्यासाठी बँकेकडून मदत मिळवली. आणखी काही मिळवण्याचे प्रयत्न चालू होते.

दलित मंडळी आमच्यावर खूष होती. आणि आणिबाणी विरोध चालू ठेवूनही हा रचनात्मक कार्यक्रम चालू ठेवल्याने आम्हीही स्वतःवरच खूष होतो. अशा वेळी एस. एम. जोशी सातारला आले. आणीबाणीत हिंडत असता खेड्यामध्ये आणि तेही दलित वस्तीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा अण्णांचा कटाक्ष होता. सातारच्या आसपास या दृष्टीने काम आमचेच होते. त्यामुळे गवडीला जायचे ठरले. मदत करणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यातल्या सहकारी बँकेला हे समजले. त्यांनी दलितांना दम टाकला- मदत ताबडतोब थांबवू. एस. एम. जोशी येऊन चालणार नाहीत. दलित मंडळी घाबरून आमच्याकडे आली. आम्ही त्यांच्यासाठी धडपडतो हे ठाऊक असल्याने आम्ही ठरवलेला कार्यक्रम त्यांना मोडवत नव्हता. पण बँकेने नाडी आवळली तर सोडविलेल्या जमिनीची मशागत होणार नव्हती. हे त्यांना परवडत नव्हते. अण्णांना हे सगळं समजावून सांगणंही अवघड. त्याना गवडीचा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले, तर त्यांना वाटले ते आणीबाणीच्या भीतीपोटीच ते म्हणाले कोणी येऊ नका, मी एकटा जातो. आमची भलतीच अवघड अवस्था झाली. शेवटी आम्ही दलितांची मनःस्थिती त्यांना सांगितली. कार्यक्रम रद्द झाला. पण तेव्हापासून कानाला खडा लावला की राजकीय जाणिवांना बळी देऊन नुसता विधायक कार्यक्रम कधी करायचा नाही. नाहीतर आपणही केव्हा काँग्रेसवाले होऊ याचा पत्ता लागायचा नाही.

रचना आणि संघर्षासारखाच दुसरा केलेला प्रयोग वर्ग-आणि-वर्ण लढ्याचा. आर्थिक शोषणाविरुद्धचा नुसता वर्गलढा उपयोगाचा नाही आणि जातीय विषमतेविरुद्धचा वर्णलढाही एकटा अपुरा आहे; तेव्हा दोन्हीचा सांधा जोडून लढाईची फळी उभारावी; असा विचार याची व्यावहारिक प्रचिती घेण्यासाठी सातारपासून वीस मैल दूर अंतरावरच्या कोरेगाव तालुक्यातील भाडले खोऱ्यात शेतमजुरांची संघटना बांधायची ठरवले. शनिवारी दुपारी नोकरीमध्ये दांडी मारून निघायचे. किन्हईला नदीतून स्कूटर पुढे घुसवून कच्च्या रस्त्याने भाडले गाठायचे. तेथून कोणीही शहाणा माणूस स्वतःची गाडी घालायला धजावणार नाही. अशा दगड-धोंड्यांतून गाडी हाकत रोजगार हमीचे काम गाठायचे. मजुरीवरच्या बायाबापड्यांशी बोलायचे. त्यांच्या बरोबरच कोणत्या तरी वाडीत वा भाडळ्याला मुक्कामाला यायचे. रात्री बैठक जमवायची. सकाळी तरुण पोरांना समजवायचे. असा प्रपंच दीड वर्ष केला. शनिवार रविवारी सुट्टी असणारे सारे साथी पण सोबतीला असत. गावात वस्तीला बहुधा बुद्ध वस्तीत असायचो. लोकांना पर्यायी रोजगार म्हणून सातारहून चरखे घेऊन गेलो. रोजगार हमीवरच्या सुखसोयी मिळवणे, कामाची नवी ठिकाणे हुडकणे हेही चालूच होते. तरीही दीडवर्षाअखेर हातात काहीच लागले नाही. जातिव्यवस्थेविरोधी प्रश्नही फारसे घेणे जमले नाही. आज विचार करताना वाटते, कितीतरी अधिक तपशिलात शिरून मगच कामाला हात घालायला पाहिजे होता. आपणास नेमके काय करायचे आहे? आठवड्यातून दीड दिवस जाऊन शेतमजुरांचा असा मूलभूत लढा उभा करणे शक्य आहे का?

भागात एकूण शेतमजूर आहेत तरी किती? त्यांतले दलित किती? जातीय शोषणाचे कोणते प्रश्न तीव्र आहेत? गावातल्या सधन आणि राजकारणी मंडळींना आपला नेमका विरोध कसा असणार? याचा विचार झालाच नाही वा फारच प्रासंगिक झाला. परिणामी काम थंडावले.

सातारा शहरात हमाल-संघटन बांधण्याचा प्रयत्नही असाच फसला. हमालांना जमवले. मुद्दे पटवले. संघटनेचे बिल्ले दिले. पण तेवढ्याने काहीच होत नाही हे आमच्या लक्षात आले. सातारा शहरात मोठे मार्केट यार्ड नाही. त्यामुळे हमालांचे मालक वेगवेगळे. हमालांना ताब्यात ठेवायच्या त्यांच्या युक्त्या आणि धमक्या स्वतंत्र. त्याला पुरून उरणे तसे अवघडच. अजूनही सातारा शहरात ते कोणाला जमलेले नाही. परंतु आम्ही हा प्रयत्नही फार अपुऱ्या तयारीने केला असे वाटते.

सामाजिक चळवळी त्या मानाने आम्ही नेटाने पुढे रेटल्या. दरवर्षी आसपासच्या गावातून समता-मोर्चे काढायचो. गावातील सामाजिक वास्तव वेशीवर टांगायचो. त्याचा वृत्तपत्रीय गाजावाजाही बराच व्हायचा. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे झाली म्हणून सातार ते महाड आम्ही पदयात्रा काढली होती. समतेच्या संगराला पन्नास वर्षे उलटल्यानंतरही जाणवणाऱ्या सामाजिक वास्तवाचा पीळ मनाला पीळ पाडणारा होता. यातूनच पुढे त्रिपुटी परिषद झाली. 

त्रिपुटी हे साताऱ्यापासून सात मैलावरचे गाव. चवदार तळ्यासारखेच विस्तीर्ण बांधीव तळे. गुरांना पाणी प्यायला सदैव मोकळीक, पण दलितांचा मात्र पाण्याला बाट. सत्याग्रह करण्याची तयारी आजुबाजूच्या खेड्यांतून सहा महिने चालली होती. वातावरण विलक्षण तापले. आपल्या मतदारसंघातील ही आमची उठाठेव पाहून स्थानिक आमदार आधी संतापले. नंतर सावरले. त्यांनी आमच्या जाहीर सत्याग्रहाआधीच घाईघाईने एक कार्यक्रम करून पाणवठा खुला झाल्याचे जाहीर केले. याच्या परिणामी आमचा फुगा फुटेल अशी त्यांची कल्पना. झाले उलटे. यातला दंभ ओळखून झुंडीझुंडीने आजुबाजूच्या गावांतून स्त्रीपुरुष आले. जंगी परिषद झाली. तळे खुले झाले तो आनंद गहिवरून जाण्यासारखा होता. मात्र गावाला बरोबर घ्यायचे आमचे प्रयत्न कसोशी करूनही फसले. गावाच्या जिव्हारी हा सत्याग्रह लागला. पुढे जत्रेच्या वेळेस मुंबईचे गावकरी परतले. त्यांनी रोज आग्रहाने पाणी भरवणाऱ्या रामोशांच्या शिवाजी चव्हाणला धडा शिकवायचे ठरवले. देवळात त्यांच्या आणाभाका झाल्या. रातोरात शिवाजी पळत सातारला आला. सकाळी सातला आम्ही गाव गाठले आणि गावातील तिढा सरळ केला. या अनुभवातूनच पुढे नामांतरासाठी सातारा - औरंगाबाद चालत लाँगमार्च काढण्याची कल्पना आली. सातारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री रमाबाईंची समाधी आहे. तिथे ज्योत पेटवली आणि ती घेऊन चालत सातारा-बारामती-पुणे-नगर मार्गे गेलो. नगरला अटक झाली. तोपर्यंत सर्वत्र गावोगावी फार चांगल्या सभा झाल्या.

पाणवठा चळवळ, समता मोर्चे, लाँग मार्च.. सगळीकडे सवर्णांच्या बरोबर खुल्या संवादाची भूमिका होती. अनुभव आश्वासक येत गेले. ठराविक रटाळ भाषणे वा विकासाचे साचेबंद बोलणे यांपलीकडे जाऊन मूल्यपरिवर्तनासाठी संवाद घडू शकतो; लोक बोलतात, संतापतात, धमकावतात, पण समजूनही घेतात, कबूल करतात, बदलतात, याची प्रचिती आली.

नामांतर वा पाण्याचा न्याय तसा प्रतीकात्मकच. परंतु दलितांना प्रत्यक्ष काही देण्याचा प्रसंग आला की कसे ते जीवावर उठतात याचा भाटपरळीला अनुभव आला. सत्त्वशीला सोनावणेची महार इनामी वतनी जमीन कागदोपत्री मामलेदारांनी तिला कायद्यानुसार दिलेली. पण जमिनीचा मालक जमिनीत पाय ठेवू देईना. मी त्या गावी गेलो. मालकाला भेटलो. त्याने हग्या दम भरला : जमिनीत पाय ठेवून बघा - मुतणंच कापून ठेवतो! आणि वर मुडदा पाडतो. पाच मुलगं हायती मला. त्यांतला एक जाईल फासाला. त्याची पर्वा नाही. आणि त्यो तरी कशाला जातोय? कोर्टातून कसं सोडवून आणायचं आम्हाला चांगलं ठाऊक हाये. मामला इतका पुढे गेल्यावर आम्ही ठरवले की आसपासच्या गावांतून मंडळी जमवून मोठ्या संख्येने जमिनीत घुसायचे. सत्याग्रह जाहीर झाला तसा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाने मामलेदार टरकला. स्वतः जातीने पीएसआयसह आम्हाला घेऊन गेला आणि क्वचित दाखवला जाणारा सरकारी हिसका दाखवून जमीन खुली करून दिली.

दलितांची चळवळ हा माझा मुख्य भाग बनला. माझी ब्राह्मण जात माझ्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांनाच जास्त आडवी आली. "हा बामण तुमच्यात कसा? त्याला कसा एवढा पुळका?" या प्रश्नांना त्यांना उत्तरे द्यावी लागायची. जात पुसून काढणे तसे अवघडच; परंतु मला वाटते वरच्या प्रश्नातून वाटणारा अविश्वास सोडाच परंतु दुरावाही आता बराचसा दूर झाला आहे. आता जिल्ह्यातल्या कोणत्याही दलित वस्तीत आपला माणूस म्हणून स्वागत होताना जाणवते. जिल्ह्यात दलितांवर काही अन्याय घडले तर प्रकरणे प्राधान्याने माझ्या संघटनेकडे, माझ्याकडे लोक घेऊन येतात. ही कमाई मी तशी मोलाची मानतो.

"असलेले कायदे जरी नीट अंमलात आले तरी अर्धी क्रांती पुरी होईल." असे जे. पी. म्हणत. मुळात कायदा माहीत नसतो. माहीत असला तर अंमलबजावणीची इच्छा नसते. सामाजिक-सांस्कृतिक बाबतीत तर कायद्याचे पालन करून लोकक्षोभाचे नसते लचांड मागे लावून घ्यायला सर्वच जण शासन, वृत्तपत्रे, समंजस नागरिक घाबरतात. मग आमच्या कामाची "नसत्या उचापती" म्हणून संभावना होते.

देवदासी प्रतिबंधक कायदा 1934 सालचा. कोणत्याही वयातील तरुणीच्या, तिच्या इच्छेनेदेखील होणाऱ्या देवाबरोबरच्या लग्नाला विरोध करणारा. पण त्या कायद्याच्या आधारे पहिला खटला दाखल केला मी, त्याला 1971 साल उजाडावे लागले. फलटण हे महानुभाव पंथाचे मोठे केंद्र. महानुभावांत अल्पवयीन मुलींना संन्यास देण्यात येतो. त्याआधी त्यांचा देवाबरोबर लग्न लावण्याचा विधी असतो. अगदी विवाहसोहळ्यासारखा साग्रसंगीत आणि मग त्याच मांडवात मुलीचा चुडा फोडून कुंकू पुसून हळदीची वस्त्रे उतरवून जन्मासाठी काळी वस्त्रे तिच्या अंगावर चढवली जातात. केसाचा चमनगोटा केला जातो. हे लादलेले वैराग्य जन्मभर जपावे लागते. साऱ्या स्त्रीसुलभ भावनांचा होम करीत. देवाशी लग्न लावल्याशिवाय पुढचा संन्यास नाही. आणि मुळात ते लग्नच बेकायदा. पण आम्ही गुन्हा दाखल करायला फलटण पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तर नोकरीत काळ्याचे पांढरे झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने हा कायदाच आपण कधी न ऐकल्याचे सांगितले. मग त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड दाखविले. त्यांनी सातारला डीएसपींना फोन केला. तेही बुचकळ्यात पडले. रात्री बारा वाजता त्यांनी सरकारी वकिलांना बोलवून खातरजमा केली. गुन्हा दखलपात्र होता. रात्री दोन वाजता गुन्हा दाखल झाला. सकाळचा विवाह थांबला. दीक्षा देणाऱ्या मठाधिपतीस कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने निकाल लागेपर्यंत विवाहास स्थगिती दिली. 

महानुभवांचे प्रमुख केंद्र असलेल्या केवळ फलटणमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या पंथात प्रचंड खळबळ माजली. माझ्या निषेधाचे मोर्चे निघाले. नावाने शिमगा केला गेला. खटला मागे घेण्यासाठी एका बाजूस विनवणी आणि दुसऱ्या बाजूस दहशत चालू झाली. खटला अजून उभा राहायचाय. पूर्वीच्या निकालाचे रूलिंग त्याला नाही. याच निकालावर पुढची लढाई अवलंबून. कायद्याचा आधारही नसणाऱ्या सामाजिक झुंजी तर अधिकच अवघड असतात. त्यात समोरची व्यक्ती जनमानसात पूजनीय असली तर भलतीच जोखीम.

कांचीकामकोटीचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामीमहाराज यांचा लौकिक 'वॉकिंग गॉड' असा. हा देव पण सदैव हिंडणारा. एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त न राहणारा. सातारच्या शंकराचार्यांच्या मठात आला आणि तब्बल नऊ महिने राहिला. मग सातारा जणू भाविकांची आधुनिक पंढरीच बनली. दर्शनासाठी राष्ट्रपती संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी येऊन गेल्या. या गुरूंना भेटायला दुसरे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीमहाराज आले आणि सातारा हे परिवर्तनाच्या केंद्राऐवजी शंकराचार्यांचे पीठ बनणार का अशी साधार भीती वाटू लागली. 

सभा निदर्शने या नेहमीच्या मार्गांचा फायदा नव्हता. पहिल्यांदा शंकराचार्यांचे भांडे हुशारीने फोडून मग बोंब मारायला पाहिजे होती. आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजींच्या समवेत शंकराचार्यांची मुलाखत मागितली. प्रश्न आधी दिले. मुलाखत चालू झाली आणि चातुवर्ण्य, दलित वगैरे प्रश्न समोर आल्यावर शंकराचार्यांची ट्यूब पेटली. त्यांनी पहिल्यांदा दिलेली परवानगी नाकारून टेप बंद करायला सांगितले. आम्ही होकार देत पिशवीत टेप चालूच ठेवला. शंकराचार्यांचे सारे सनातन समर्थन टेप झाले. बाहेर येऊन मग पुराव्यानिशी बोर्ड लावले. प्रचंड खळबळ माजली. आता पुरता निकाल लावायचा असे ठरवून जाहीर सभा पुकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली. गावात प्रचंड तणाव. सभेला भरपूर गर्दी. अगदी शेवटच्या क्षणी यासाठी अटकही होण्याची आमची तयारी बघून पोलिसांनी परवानगी दिली. सभेत दंगल होईल, नंतर आमची घरे जाळतील, ही भीती निराधार ठरली. शंकराचार्यांशी आमचे भांडण कशाकरता आहे हे मी सांगितले. अन्य वक्ते बोलले. घोषणा देऊन अंडी फेकून एका गटाने दंगल माजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. लोकांनी त्यांना अजिबातच साथ दिली नाही. सामान्य माणूस समजून घेतो, विचार करतो, याचा तो सुखद प्रत्यय होता. बघता बघता वातावरण बदलले. आठ महिने तळ ठोकलेल्या गुरु-शिष्यांना आठ दिवसांत पोबारा करावा लागला.

या सगळ्याबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या अपरिहार्यपणे चालूच होत्या. व्यवसायापेक्षा वेगळे सामाजिक काम करण्याची ऊर्मी कॉलेजमध्ये असल्यापासून होती. त्यामुळे रोमॅन्टिकपणा जास्त होता. विचारांची अस्पष्टताही होती. तरीही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जुळवलेले लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडण्यास ही बाब पुरेशी झाली. माझ्या गप्पांतून डोकावणारा हा विचार प्रत्यक्षात येण्याची अस्पष्ट अशी चाहूल लागताच त्या मुलीने आयुष्यातून पोबारा केला. नंतर ठरवून लग्न जमवणे आले. पाहण्याच्या कार्यक्रमापेक्षा माझे मत तिला खुल्लमखुल्ला सांगण्यात मला जास्त रस होता. व्यवसायाच्या सुरुवातीला व्यवसाय सोडण्याचा विचार करणारा डॉक्टर हा त्या नाकासमोर वाढलेल्या मुलीला नकारयोग्य वाटल्यास नवल नाही. पण कसे कोण जाणे, थ्रील म्हणून हा अनुभव घेण्याचे तिने नंतर पुन्हा ठरविले. पाच वर्षे व्यवसाय करण्याचे मी कबूल केले. ती कबुली दामदुप्पट झाली. लग्न होऊन आता दहा वर्षे होऊन गेली. या वेळी मी पूर्ण बाहेर पडण्याच्या तयारीने उभा आहे. (अर्थात तिला हे मान्य नाही. माझी मदत ही 'असून अडचण नसून खोळंबा' अशा अर्धवट स्वरूपाची आहे असे शैलाला वाटते.)

लग्नापासून ताण आले, पण ते सोडवत गेलो. शैला अतिशय धार्मिक तर मी पूर्ण नास्तिक. त्यामुळे वैदिक लग्न करण्यापासून ते कुलदैवताला जोडीने जाणे, सत्यनारायण घालणे हे सर्व पूर्णतः नाकारले गेले. तिच्या अंधश्रद्धेवर मी टीका करत राहिलो. पण खूपच सौम्यपणे. गणपतीची स्थापना करून दहा दिवस ब्राह्मणाकडून त्याची पूजा करण्याच्या त्यांच्या घरचा प्रघात होता. देवाकडे मध्यस्थी करणारा हा दलाल मी तिला नाकारायला लावला. ते तिने मानले. बाकी उपवास, पूजाअर्चा ही मात्र प्रयत्न करूनही मला बंद करता आली नाही. मात्र माझ्या कामाआड ही गोष्ट कधीच आली नाही.

दवाखाना, हॉस्पिटल व घर हे सगळे एकाच जागेत. जागा गावाच्या मध्यभागी. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ. हॉस्पिटल प्रसूतीचे, त्यामुळे रात्री कधीच धड झोप नाही. पेशंटची फार काळजी करण्याचा शैलाचा स्वभाव, त्याचा मानसिक ताण. वर नोकरी, दोन मुलांची बाळतंपणे, आणि वाढ. या साऱ्याचा शारीरिक, मानसिक ताण तिच्यावर पडला. आता आता आम्ही याच्यातून बाहेर पडत आहोत.

माझ्या बरोबर काम करावे अशी तिची इच्छा होती. परंतु कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यामुळे ते तिला जमले नाही. खरे तर यासाठी मी किती तरी अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे होते. परंतु एका बाजूला तिच्यामार्फत मिळणाऱ्या व्यावसायिक व आर्थिक स्थैर्याची माझ्या मनात अभिलाषा होती असे आज वाटते. आर्थिक सुस्थिती लाभली हे खरे, पण त्यासाठी तिच्या व्यक्तिमत्त्वावर आघात झाला हेही खरे.

सामाजिक कामाचा परिणाम कौटुंबिक स्थैर्याविरुद्ध होणे काही वेळा अटळ असते. एकदा आमची चांगलीच परीक्षा झाली. 77 सालचा सरकारी नोकरांचा संप चालू होता. राजपत्रित अधिकारी असूनही मी दणादण भाषणे ठोकत होतो. त्याचा परिणाम झाला. नोकरी गेली. त्या वेळी मला दीड हजार रुपये पगार होता. त्यानंतर चार महिन्यांत सातारा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आंदोलन चालू केले. चौकाचौकात मी सभा घेतल्या. आंदोलन गाजू लागले. नगरपालिकेची सत्तारूढ मंडळी खवळली. शैला नगरपालिकेच्या प्रसूतिगृहात वैद्यकीय अधिकारी होती. तिला अडचणीत आणू अशा धमक्या चालू झाल्या.

"आपल्यालाही या भ्रष्ट नगरपालिकेत नोकरी करायची नाही." असे शैलाला ठणकावून माझ्या जोषात मीच तिला राजीनामा देऊन टाकायला लावला. तिला त्या वेळी सात-आठशे रुपये पगार होता. एकदम दोन-अडीच हजारांचा फटका बसला. शिवाय घराबाहेरच्या नोकरीत आणि त्यातील हुकमत जागवण्याच्या भूमिकेत शैलाला थोडा विरंगुळा मिळे तोही संपला.

माझ्यासारख्या बेभरवशाच्या माणसाला एकच मूल पूरे अशी माझी भावना होती. त्यामुळे पहिल्या मुलीवर ऑपरेशन करून घ्यायचा विचार होता. परंतु एका मुलाचे काही झाले तर? ही भावना प्रबळ ठरली. मात्र दुसऱ्या मुलानंतर अजिबात वेळ न दवडता स्वत:ची नसबंदी करून घेतली. या मुलाचे नाव हमीद ठेवले. तोही काहीसा चर्चेचा विषय झाला.

पैशांचा विचार आम्ही दोघांनीही संसारात कधी केला नाही. चळवळ चालवताना अगर अन्य कुणाला मदत देताना स्वतःच्या खिशाला प्रथम तोशीस लावावी हाच मार्ग पत्करला. मात्र घरी राहायला येणाऱ्या चळवळीतील पाहुण्याबद्दल आमचे मतभेद आहेत. घराच्या एकंदर रचनेत त्या कार्यकर्त्यालाही अवघडल्या सारखे  आणि आपणासही अडचणीचे. व्यवसायाच्या धावपळीत त्याच्या चहापाण्याकडे, जेवणाकडेही लक्ष देता येत नाही. त्यामुळे चांगल्या हॉटेलात त्यांची सोय आपल्या पैशाने करा हा शैलाचा आग्रह. मला यात परकेपणा दिसतो. आणि कार्यकर्त्याला घरीच ठेवण्याचा माझा आग्रह असतो. हा एक नेहमीचा वादविषय आहे.

स्वत:चे 'लिव्हिंग स्टँडर्ड' आणि कार्यकर्ता यांच्यातली दरी मला खटकते, परंतु त्याबाबत फारसे काही मी निग्रहाने करू शकत नाही. सुरुवातीच्या काळात दलात यावर फार विचार व्हायचा. माझ्या घरात सोफासेट आणि फॅन यायचा होता. तो घेणे कितपत योग्य यावर बरीच चर्चा होऊन शेवटी फॅन यावा पण सोफासेट नको असे ठरले. त्याला आता आठ वर्षं झाली. अजूनही माझ्या घरी सोफासेट नाही. घेणे शक्य असूनही फ्रीज, टी. व्ही., गाडी घेतलेली नाही. लग्न झाल्यापासून बायकोला अक्षरश: गुंजभर सोनेही घेतलेले नाही. (अर्थात स्वत:चा बंगला बांधला आहे.) चार पैसे जवळ आहेत म्हटल्यावर हे न घेण्याचे कौतुक करण्यासारखे काहीही नाही. त्याच्या फायद्या-तोट्याची चर्चा सतत मनात चालू असते. फ्रीज काही औषधे ठेवायला आणि जेवण एकदम करून ठेवायला फायद्याचा, टी.व्ही.चे काही कार्यक्रम चांगले असतात, वगैरे प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू सतत मनात असतात. मी थोडा सुखासीन बनू लागलो आहे याची अपराधी जाणीव अधूनमधून होते. परंतु ते झुगारण्यासाठी लागते तेवढे पुरेसे धैर्य स्वत:जवळ नाही असे वाटते. परवा नामांतरासाठी तुरुंगात होतो. त्या वेळी अ‍ॅल्युमिनियमची थाळी, एक वाडगा मिळाला आणि एवढ्यात खाण्या-पिण्याची सोय व्यवस्थित होते हे लक्षात आले. घरी गेल्यावर स्टीलचे ताट, दोन वाट्या, प्रसंगानुरूप काचेच्या डिशेस, स्टीलचे तांब्याभांडे हे सगळे नाकारून स्वतःची गरज एवढ्यावर मर्यादित करावी असे मनात वाटले; पण पार पाडू शकलो नाही. खरे तर डोळे फिरवणारे दारिद्र्य असणाऱ्या आपल्या देशात ऐषोआरामी उपभोग कशाला म्हणायचे हाही प्रश्न पडतो. त्या दृष्टीने विचार केला तर सध्या भलतीच चैन आहे. आणि तुलनेने घ्यायचे ठरल्यास तुलनेला आपल्या देशात कोणत्याही स्तरावर दोन्ही बाजूंची मापके आहेतच. शेवटी स्वतःचा प्रामाणिक कौल एवढेच खरे वाटू लागते. पण संभ्रम आहे.

या दहा-बारा वर्षांच्या चळवळीत मी काय मिळवले? एक चांगला ग्रुप एकमेकाला विकसित करत वाढत गेला. एकसंध भावनिक जिव्हाळा निर्माण झाला आणि टिकून राहिला हे मला सगळ्यात महत्त्वाचे वाटते. एखाद्या छोट्या गटातील प्रत्येक जण असा नावारूपास येणे आणि चळवळीशी इमान राखताना हे घडणे मला मोलाचे वाटते. आमचा गट तसा आठ-दहा जणांचाच. त्यात लक्ष्मण मानेचा 'उपरा' तर जगविख्यात झाला. राजा कोपर्डेला 'अनुष्टुभ'च्या दिवाळी अंकातले लघुकादंबरीचे पहिले बक्षीस मागच्या वर्षी मिळाले. किशोर बेडकिहाळचे संघावरचे पुस्तक गाजू लागले आहे. पार्थ पोळकेचे आत्मनिवेदन बहुधा ग्रंथालीमार्फत प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. नामांतरासाठी जाणीवपूर्वक आत्माहुती देणारा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा विलास राणे हा आमचा कार्यकर्ता. त्याने मराठा समाजातील स्त्रियांवरच्या व्यापक पाहणीबद्दल लिहिले असते तर ते फार ताकदीचे होते. ही सर्व मंडळी तिशीपस्तिशीमधली. काहीही मोठी ताकद मुळात असल्याची कोणतीच चिन्हे न दाखवणारी. मला वाटते, चळवळीच्या मुशीत एकमेकाच्या मानसाशी संवाद करीत आम्ही सर्व जण स्वतः घडत गेलो. सामान्यांत किती ताकद असते याचे हे बोलके उदाहरण. हे अपवादात्मक नसेल असे मला वाटते. व्यापक पातळीवर ही शोध घेण्याची घडण्या-घडविण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. असा प्रयत्न करायला हवा.

…आमची चळवळ ही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर परंतु प्रतीकात्मकच राहिली. हुंडा, पाणवठा, देवदासी हे काही काही ठिकाणच्या वा व्यक्तींच्या बाबतीतले लढे ठरले. पुढे पुढे याची एक स्ट्रॅटेजीच आम्ही बनवली. यशही लाभले. शासकीय अधिकाऱ्यांशी सामान्यपणे संबंध सलोख्याचे, पत्रकारांशी मैत्रीचे राहिले. याचाही फायदा चळवळीला मिळाला. महाराष्ट्रातील एकूणच परिवर्तवादी गट व व्यक्ती या सर्वांशी चांगले संबंध असणारा आमचा गट हा अपवादात्मक असावा. एका छोट्या गटामुळे आणि विचाराबरोबरच भावनेने जोडलेल्या संघटनांतर्गत वातावरणामुळे आम्ही हे करू शकलो.

पहिल्यांदा ताकद नाही म्हणून मूलभूत लढे घेतले नाहीत. जेव्हा शेतमजूर संघटन, दलितांची जमीनमुक्ती, यांसारखे लढे घेतले तेव्हा पुरेशा तयारीच्या व त्यागाच्या अभावी ते उभे राहू शकले नाहीत. गेली काही वर्षे सातारा जिल्ह्याचे वास्तव लक्षात घेऊन अशा स्वरूपाचा एकारलेला तीव्र लढा वा पॉकेटवर्क आम्ही करू शकू असे न वाटल्याने तो मार्ग टाळला. पॉकेटवर्कच्या महाराष्ट्रात एका मर्यादेनंतर होणाऱ्या राजकीय कोंडीचा अनुभवही आम्ही (अतिसावधपणे) विचार करून दूर रहाण्यास कारणीभूत झाला. सामाजिक-सांस्कृतिक पातळीवरच्या लढ्यातले संघटनेला मिळालेले यश, व्यक्तिगत प्रसिद्धी यामुळेही आमचा मार्ग ठरल्यासारखा झाला.

माझा स्वभाव मनस्वी नाही. नेमस्त आहे. कडवट टीका या टोकाची भूमिका मी करत नाही, घेत नाही. मला ते चुकीचेही वाटते. विरोधी वा वेगळे विचार असणाऱ्या लोकांचे अन्य क्षेत्रात मिळणारे मर्यादित सहकार्य घ्यावे असे मला वाटते. माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना हा बोटचेपेपणा, गुळगुळीतपणा वाटतो. सामाजिक प्रश्नाबाबत आणि व्यक्तीच्या तत्त्वभ्रष्ट वागण्याबाबत सर्व पातळ्यांवर कठोर घणाघाती आणि एक घाव दोन तुकडे करणारी भूमिका असावी असे त्यांना वाटते.

कामाची आखणी तपशिलात जाऊन करण्याचा माझा स्वभावही काही साथींना अतिसावधपणाचा वाटतो. चळवळीच्या अपेक्षित उसळत्या उत्साहाला त्यामुळे बाधा येते असे त्यांचे मत आहे. झोकून देऊन उडी घेतली पाहिजे असे त्यांना वाटते.

विचारात व कामात फार वाहून जायला होते. तासनतास डोक्यात तेच तेच विचार घर करून बसतात. मग काही वेळा ताजेपणा हरवल्यासारखे होते. सतत ताण असणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षातून काही काळ तरी सहेतुक अलिप्तता ठेवायला हवी असे वाटते.

मार्क्सवादी, गांधीवादी, जे. पी. वादी, लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन आयुष्य झोकून काम करणाऱ्या संघटना, त्यांचा विचार, तरुण उमदे कार्यकर्ते जवळून परिचित असल्याने एका आवर्तात सापडल्यासारखे वाटतात. कोंडी फोडून पुढे जाण्यासाठी नवचिंतनाची आणि नव्या कृतिशील वाटांची गरज जाणवत राहते.

-  डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर सामाजिक चळवळी अनुभव डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar Social Movements Personal Experiences Load More Tags

Comments: Show All Comments

Dharmaraj Mane

डोळे भरून आले... डॉक्टरांना अभिवादन!!!

माधव जगताप

हा लेख ऊपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले आभार... डॉक्टरांना विनम्र अभिवादन

Ashwini Ade

विनम्र अभिवादन.. डॉ. दाभोलकर

AJAY MADHUSUDAN MADHAVI AJAY SURVE

lekh khup chan ani prernadai aahe.

मकरंद पवार

अगदी आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडातील अनुभव सांगितलेला असला तरी. नवोदित कार्यकर्त्यां साठी प्रेरणादायी आहे. केलेलं काम, त्याच्या जाणवलेल्या मर्यादा, आलेलं यश- अपयश डॉक्टरांनी खूप प्रामाणिक पणे मान्य केलं आहे. मनापासून विनम्र अभिवादन.

प्रा. भागवत शिंदे

प्रथम स्मृती दिनानिमित्त डॉक्टरांना विनम्र अभिवादन ! डॉक्टरांचा हा लेख अनेक अर्थाने वेगळा आहे . पस्तिशीच्या वयात डॉक्टरांना आलेली समज व सामाजिक चळवळीतील ताणेबाणे आणि या सर्वामध्ये एक कार्यकर्ता म्हणून होणारी त्यांची स्वतःची जडणघडण विलक्षण महत्त्वाची वाटते.

Chandrakant shrihari Bhojane

डॉ . नरेंद्र दाभोलकर सरांना विनम्र अभिवादन .

Add Comment