चार्वाकांपुढील आव्हाने

चार्वाक लेखमालेचा भाग - 16

सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेल्या 'मन्वंतर' व 'युगांतर' या दोन छोट्याच पण मर्मभेदी लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या आणि नंतर त्यांची साधना प्रकाशनाकडून आलेली पुस्तकेही चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्याच साखळीतील तिसरी कडी म्हणावी अशी 'चार्वाक' ही लेखमाला 'कर्तव्य साधना' वरून 1 ते 16 मार्च 2021 या काळात रोज सायंकाळी प्रसिद्ध होत राहिली. ही संपूर्ण लेखमालाही पुस्तक रूपाने साधना प्रकाशनाकडून पुढील आठवडयात पुस्तकरूपाने येत आहे. साधना प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे व amazon वर आणि अर्थातच साधनाही कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असतात.
- संपादक

हे लिहिणे जेवढे साधेसोपे तेवढे ते प्रत्यक्षात आणणे व समाजमान्य करणे सोपे नाही. माणसांच्या जीवनावर मेंदूहून मोठा प्रभाव मनाचा आहे आणि मन विचार न करता विश्वासाच्या व श्रद्धेच्या आहारी जाणारे आहे. कोणत्याही धर्माची सामान्य माणसे आपले धर्मग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडत नाहीत. धर्मग्रंथ बासनात बांधून त्यांची भक्तिभावे पूजा करणेच त्यांना भावते व मानवते. बहुसंख्य हिंदूंनी व वैदिकांनी वेद वाचलेले वा पाहिलेलेही नसतात. सारेच मुसलमान कुराण शरीफ वाचत नाहीत व शरियत समजून घेत नाहीत. तेच बायबलचे व विशेषतः त्यातील जुन्या कराराचे आहे. (नवे बायबल अगदीच लहान व कथारूप असल्याने ते सहजपणे वाचता येते... त्यामुळे ते वाचले जात असावे असे समजायचे.) ज्यूंचे तोराह, बौद्धांचे त्रिपिटक, महावीरांचे आद्यग्रंथ, शिखांचा ग्रंथसाहेब हेही असेच श्रद्धेचे पण न वाचण्याचे वा न अभ्यासण्याचे ग्रंथ आहेत. 

पुराव्यावाचून वा प्रमाणावाचून ठेवलेला विश्वास म्हणजेच अंधश्रद्धा. धर्मग्रंथांबाबत व त्यांनी निर्माण केलेल्या रूढीपरंपरांबाबत ही अंधश्रद्धाच अशिक्षित व अडाणी समाजाएवढीच सुशिक्षित व ज्ञानी वर्गातही आहे. साधी गीता वा गीताई न वाचणारे श्रद्धावान हिंदू आपल्यात आहेत. तसे दर वाक्यागणिक अल्लाची शपथ घेणारे पण कुराण शरीफाकडे न वळणारे मुसलमानही फार आहेत. नरहर कुरुंदकर गमतीने म्हणायचे, ‘आपल्या मनात आपल्या धर्मग्रंथांविषयी जो अपार आदर आहे त्याचे महत्त्वाचे कारण आपण ते वाचत नाही हे आहे.’ 

न वाचलेल्या, न पाहिलेल्या व न समजलेल्या गोष्टींविषयी एवढी दृढ श्रद्धा मनात असेल तर त्या न पाहिलेल्या गोष्टी नाहीतच वा कधी नव्हत्याच या गोष्टी मनांना कशा रुचतील? तत्त्वज्ञ झाले, वैज्ञानिक झाले, ज्ञानी व विचारवंत झाले. गेली चारपाच शतके त्यांनी जगाला त्यांचे सत्य समजून सांगण्यासाठी जिवाचे रान केले... पण जगाचा फारच लहानसा भाग त्यांच्यामुळे प्रभावित झाला. निरक्षरांचे वर्ग सोडा... पण चांगले सुशिक्षित, पदवीधर व अभ्यासू म्हणवणारेही त्यांच्या जुन्याच श्रद्धांच्या अंधाऱ्या मार्गावरून जात राहिले व अजूनही ते त्यावरूनच चालतात. याची उदाहरणे शोधायला फार लांबवर जाण्याचे कारण नाही. ती आपल्या आवतीभोवतीच आहेत व आपणही त्यातलेच आहोत.

सत्य साईबाबाच्या चरणी लीन झालेले थोर वैज्ञानिक व देशाचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, क्रिकेटपटू, ग्रंथकर्ते आणि अनेक विद्वान आपण पाहिलेले आहेत. बलात्काराच्या आरोपावरून जन्मठेप भोगणाऱ्या आसाराम बापूच्या नादी लागलेले केंद्रीय नेते, पुढाऱ्यांचे व सुशिक्षितांचे तांडे, खुनाच्या आरोपावरून अटक झालेल्या शंकराचार्यांच्या भजनी लागलेले न्यायमूर्ती आणि गावोगावी आपल्या शिष्यांसाठी दुकाने उघडून बसलेले बाबा, बापू आणि बैरागीही आपण पाहिले. 

सगळ्या धर्मांच्या अशा ठोक व चिल्लर दुकानदारांची जोरात चालणारी दुकाने आपण पाहत असतो. रामकृष्णापासून साईबाबांपर्यंतच्या मंदिरात लागणाऱ्या भक्तांच्या रांगा, हज यात्रेला जाण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहणारे अल्लाचे बंदे, कुंभमेळ्याला लाखोंच्या संख्येने जमणारे भक्त, नद्यांच्या परिक्रमा करणारे सज्जन आणि रस्त्यात दिसलेल्या प्रत्येक गायीच्या शेपटीला नमस्कार करणारे भले लोक आपल्या पाहण्यातले आहेत. 

रोमच्या पोपचा इतिहास रक्तरंजित व लढायांचा आहे. त्यात अनैतिकतेचे नमुनेही आहेत... पण पोप चूक करत नाही ही श्रद्धा सगळ्या कॅथलिकांमध्ये अजूनही अढळ आहे. ज्यूंना जाळणे हा धार्मिक कार्यक्रम कसा असतो? किंवा परधर्मीयांच्या स्त्रियांच्या ठायी सक्तीने संतती उत्पन्न करण्याचा अधिकार देणारे धर्म कसे असू शकतात? त्या आज्ञा अजूनही प्रमाण का मानल्या जातात? आत्ताचे आधुनिक कायदे अस्तित्वात आले नसते तर या श्रद्धावानांनी अशा अनिष्ट प्रथा आणखी चालवल्या असत्या. 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरात माणसांचे बाजार भरवून त्यांची गुलाम होऊन विक्री होत आली. विधवा स्त्रीला जिवंत जाळण्याच्या प्रथाही धार्मिकच होत्या. आपल्या देवदेवतांच्या कथाही फार वाखाणाव्या अशा नाहीत. आपल्या मुलीच्या मागे वासनेने पीडित होऊन धावलेला ब्रह्मदेव, अनेक स्त्रियांशी कधी प्रेमात तर कधी लबाडीने जवळीक करणारा विष्णू, साधूंच्या बायकांना भ्रष्ट करणारा इंद्र, अग्निपरीक्षा दिलेल्या सीतेला गरोदरपणात अरण्यात सोडून देणारा राम, आपल्या भक्तांनी केवळ प्रसाद खाल्ला नाही म्हणून त्यांना उद्‌ध्वस्त करणारा सत्यनारायण. यांतले पूजनीय कोण व किती? परंतु त्यांची मंदिरे गावोगाव व गल्लोगल्ली आहेत... शिवाय थेट देशाच्या पातळीवर ती बांधण्याच्या राज्यकर्त्यांच्या योजना आहेत. 

देव आणि महंत असे असूनही त्यांची घरात, दारात व सर्वत्र पूजा केली जात असेल तर या समाजात बुद्धी मनावर मात कशी करील? बौद्धिक चर्चेत या प्रकारांवर अनेक जण टीका करतात... मात्र तेवढी वेळ गेली की पुन्हा ते पूजेला बसतात. ही मानसिकता हाच वैज्ञानिक मानसिकतेच्या उभारणीतला व चार्वाकांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. या प्रचंड समुदायाच्या डोक्यावरचे श्रद्धेचे ओझे आणि भक्तिभावाचे खापर कोण, केव्हा आणि कसे उतरवील?

गंडेदोरे विकणारे, स्त्रियांना मुलाबाळांचे अमिष दाखवणारे आणि भक्तांनी दिलेल्या देणग्यांच्या जोरावर ऐश करणारे किती भगवंत व दैवी पुरुष आणि स्त्रिया आपल्याला ठाऊक आहेत?. पिराला नवस बोलणारे हिंदू, मुसलमान व अन्यधर्मीय, कुठल्याही दगडाला नुसता शेंदूर फासलेला दिसला तरी त्यापुढे नतमस्तक होणारे किती जण आपल्या माहितीतले आहेत? मित्र आहेत, आप्त आहेत आणि शेजारचेही आहेत. या साऱ्यांशी तत्त्वज्ञ कसे आणि कुठवर लढणार? शिक्षणाने ज्यांचे डोळे उघडत नाहीत ते स्वतःच्या विचारांच्या बळावर आपले मेंदू कसे उघडे करणार? आणि पावसासाठी यज्ञ करणारे, देवाला बळी देणारे आणि श्राद्ध करून पूर्वजांचे आत्मे शांत करणारे त्यातून बाहेर कसे येणार? 

...शिवाय चार्वाकांना वा अनुभवजन्य ज्ञानाला केवळ श्रद्धेचाच विरोध नाही. या श्रद्धांच्या मागे सर्व तऱ्हेच्या सत्ता संघटितपणे उभ्या आहेत. भक्तिभावाची मानसिकताच केवळ या मार्गात अडचणीची आहे असे नाही. थेट एकविसाव्या शतकातही जगभरच्या सगळ्या सत्ता या भक्तीच्या संरक्षणार्थ त्यांच्या सगळ्या आयुधांनिशी सज्ज आहेत. त्यांत राजसत्ता, धर्मसत्ता व अर्थसत्ता यांबरोबरच सामाजिक संघटना, लहानसहान सामाजिक पक्ष व संस्थाही आहेत. या श्रद्धांना जो कोणी जरा धक्का लावील तो समाजात जिवंत राहू शकेल याचीही खातरी देता येत नाही. 

महाराष्ट्र हे देशातले सर्वाधिक प्रगत राज्य आहे... पण यात कमालीच्या कर्मठ व सनातनी मानसिकता आहेत. विज्ञानवादी व अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या दोन कार्यकर्त्यांचे बळी या मानसिकतेने घेतले आहेत. कर्नाटकात त्यांनी एका लेखकाची व एक महिला पत्रकाराची याचसाठी हत्या केली आहे. हे हल्लेखोर सरकारला सापडत नाहीत आणि त्यांच्या मागे असलेल्या संघटनांना सरकारही घाबरत असते. हे वर्तमानात घडत आहे. इतिहास तर याहून भीषण आहे. 

धर्म, ईश्वर व श्रद्धा यांच्या नावाखाली इतिहासात चौदा हजारांवर युद्धे झाली आणि त्यांत कोट्यवधी लोक मृत्यू पावले. त्याचे प्रायश्चित्त कोणी घेतले नाही व त्याचा कुणाला पश्चात्तापही नाही. सत्तांना आणि सत्ताधीशांनाही त्यांच्या पाठीशी धर्म, नीती किंवा निदान त्यांचे आभास लागत असतात. कौटिल्य म्हणाला, ‘राजाने दिसावे वाघासारखे पण असावे कोल्ह्यासारखे... पण नुसता वाघ कामाचा नाही. तो उपयुक्त व दयाधारकही दिसावा लागतो. त्यासाठी धर्माचे आणि ईश्वरांचे आभास सत्तेला लागतात. कोणी रामाचा वापर करतो, कोणी कृष्णाचा, तर कोणी भवानी मातेचा. 

हे सारेच सत्ताधीश चांगले असतात असे नाही. त्यांच्यातले काही कमालीचे क्रूर व दुष्ट असतात. जन. फ्रँको हा स्पेनचा हुकूमशहा स्वतःला कर्मठ कॅथलीक म्हणायचा. रोमचा शिष्य म्हणवून घ्यायचा आणि आपले देशातील टीकाकार हजारोंच्या संख्येने मारायचा. अल्लाऽऽ हो अकबर किंवा हरऽ हरऽऽ महादेव या पूजेच्या घोषणा नाहीत... त्या युद्धाच्या गर्जना आहेत. देवाचे नाव घेऊन लढताना मरण आले की स्वर्ग मिळतो ही भावना मग लढण्याचे व मरण्याचे बळ देते. जिथे सत्ता व धर्म असतो तिथे त्यांच्याच आश्रयाने धनसत्ताही उभी होते. ती सत्तेला पैसा देते व धर्मालाही आधार देते. या तीनही सत्ता परस्परांना बळ देत टिकतात व बलवान होतात. या सत्तांना त्यांचा पाया उखडून टाकणारा चार्वाक कसा चालेल? श्रद्धेला जराही तडा गेला की तिचे टवके उडतात... म्हणून साधीही टीका वा विरोध या सत्तांना सहन होत नाही. मग त्या तो विरोध एक तर विकत घेतात किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने नाहीसा करतात. 

मग चार्वाक जाळले जातात. त्यांची ग्रंथसंपदा नाहीशी केली जाते. सगळ्या धर्मांचे व पंथांचे ग्रंथ राहतात. फक्त चार्वाकांचे नाहीसे का होतात वा केले जातात? या प्रश्नाचे उत्तर त्यांना या सर्व सत्तांचा असलेला विरोध हे आहे. त्यांच्या बाजूने कोणीही नसते. सत्ता, संपत्ती, धर्म आणि परंपरागत मानसिकता जपणारा समाज या साऱ्यांच्या विरोधात ते एकटे कसे उभे राहतील?

शतकानुशतकांनी घडवलेली व परंपरांनी ठाम केलेली समाजाची मानसिकता हा यातला सर्वात मोठा अडसर आहे. ही रुजवणूक जन्माआधीच गर्भधारणेच्या काळात मंत्रांच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न होतो. मुलांना व मुलींना वेगळे वाढवले जाते. झालेच तर त्यांच्यावर धर्म, पंथ, जात इत्यादींचे संस्कारही तेव्हापासून केले जातात. त्यांना त्याच त्या गोष्टी सांगितल्या जातात व त्याबरहुकूमच ते वागतील याची काळजी कुटुंबे घेत असतात. 

आपल्याला आत्ता मिळालेला जन्म आपल्या पूर्वसंचितानुसार मिळालेला आहे. ते संचित नीट जगून आपण पूर्ण केले की मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल वा पुढचा जन्म अधिक चांगला मिळेल हा एका धर्माचा संस्कार तर कयामतच्या दिवशी अल्ला सर्वांच्या पापपुण्याचा निवाडा करून पुण्यवंतांना स्वर्ग व पाप्यांना नरक देईल ही दुसऱ्याची शिकवण. मग माणसे त्या समजुतीनिशी राहतात, वागतात, व्यवसाय करतात व जगतात. यात कोणताही बदल करणे त्यांना रुचत नाही वा ते पापकर्मे वाटत असते. ही व्यक्ती व समाज या दोहोंचीही मानसिकता असते. सत्तेशी लढता येते, धर्माशी वाद घालता येतो आणि धनवंतांशी दोन हात करता येतात... पण या मानसिकतेशी कसे लढणार? चार्वाक व सारे विज्ञानवादी या ठिकाणी दुबळे होतात. 

ग्रंथ नाही, प्रचारक नाही, वादात समावेश नाही ही कारणेही चार्वाकांचा विचार मर्यादित राहायला कारणीभूत झाली. याखेरीज त्यांच्याविरुद्ध सर्वच धर्मांच्या आचार्यांनी आणि अनुयायांनी चालवलेला विषारी प्रचार त्यांच्या विरुद्ध जाणारा होता. चंगळवाद, स्वैरपणा, अनैतिकता आणि अनाचाराचा विचार असेच त्यांच्याविषयी वारंवार सांगितले गेले. त्यांचे ग्रंथ वाचू नका, जवळ बाळगू नका, त्यांचा विचार करू नका... कारण तसे करणे हे पापाचरण आहे, ईश्वर व धर्मविरोधी आहे असेच त्यांच्याविषयी सारे धर्म सांगत आले. त्यांच्या विचारांना पाखंड ठरवल्याने तो करणाऱ्यांना जिवंत जाळण्यापासून मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षा सांगितल्या गेल्या. श्रद्धेचा अंधार जसजसा गडद होत गेला तसतसा चार्वाकांचा विचार लुप्त होत गेला. तो तसा होईल याचीच काळजी साऱ्यांनी घेतली.

तरीही चार्वाक राहिले. दर वेळी नवनव्या रूपांत ते समाजासमोर येत राहिले... कधी सुधारक म्हणून, कधी परंपरांना विरोध करणारे म्हणून, कधी विज्ञानवादी म्हणून तर कधी संशोधक या नात्याने. श्रद्धा बळकट होतात... पण त्या बुद्धीचा कायमचा विनाश करू शकत नव्हत्या. तिचे जिवंतपण कायमच राहिले. कालमानानुसार ते शक्तिशालीही होत गेले. 

पंधराव्या शतकाच्या आरंभी बुद्धिवादाने प्रथम समर्थपणे आपले डोके वर काढले व नंतर ते कधी खाली झुकले नाही. समाज चार्वाकांच्या दिशेने त्यांचे नाव न घेता मुकाट्याने चालू लागला. कधी माणसे एकेकटी होती... तर कधी समुदायाने पुढे जात राहिली. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर पंधराव्या शतकाआधीचा इतिहास धर्मश्रद्धांच्या वाढीचा व त्या शतकानंतरची वाटचाल चार्वाकांची. ही वाटचाल अनेक नावांनी, रूपांनी व मार्गांनी होत राहिली. क्रमाक्रमाने तिने ज्ञानाचे एकेक क्षेत्र व्यापायला सुरुवात केली.

मुळात विज्ञानावरचे ज्ञानग्रंथ भारतात पूर्वीही लिहिले गेले. दहाव्या शतकापूर्वी आयुर्वेद, रसायन, गणित व शिल्प इत्यादी विषयांवर इथे अभ्यासपूर्ण ग्रंथरचना झाली. भूमिती, व्याकरण, छंद यांचाही समावेश त्यांत होता. नंतर मात्र समाज व ज्ञानी म्हणवणारे योगसाधना, भक्तिमार्ग, मोक्षसाधना, परलोक व मृत्यूनंतरचे जीवन यांमागे अधिक लागले. त्यांचे मोक्षाचे आकर्षण वाढले, तसे विज्ञान व वैचारिक विचार मागे पडले. 

जडपदार्थ व नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यातील नियमबद्धता शोधणे हे विज्ञानाचे काम. भौतिक वस्तूंचे गुणधर्म व परस्पर संबंध समजून घेऊन त्यांतल्या सामान्य विषयांचा शोध घेणे, त्यांची तर्कशुद्ध प्रणाली तयार करणे आणि तिच्या आधारे जगाचे व भौतिक पदार्थांचे भविष्याविषयीचे अनुमान करणे हेही त्याचे काम. पाणिनीसह काहींच्या ग्रंथात असे भौतिक पदार्थांचे भविष्याविषयी अनुमान आढळते. ते समजून घेण्यावर आजच्या विज्ञानाचा सर्वाधिक भर आहे. निसर्गात गूढ व चमत्कार असे काही नाही. अनुभवाला न येणारेही काही नाही. 

जे आज गूढ असते त्याचे ज्ञान होताच ते उलगडतही असते. पाश्चात्त्य जगातील शास्त्रज्ञांनी या कार्यकारणभावाचा अभ्यास करून आपली आजची भौतिक प्रगती करून घ्यायला भारताआधी किमान पाचशे वर्षे सुरुवात केली. त्यांच्या ज्ञानाचा, विज्ञानाचा व तत्त्वशीलपणाचा परिणाम होऊन भारतानेही त्या मार्गाने उशिरा व मंदगतीने जायला सुरुवात केली... त्याचमुळे त्यांच्यातल्या भौतिक विकासातील अंतर फार मोठे राहिले.

पाश्चात्त्यांत गॅलिलिओपासून झालेली सुरुवात आत्ताच्या यंत्रयुगातील अव्वल दर्जाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञांपर्यंत होत राहिली. त्याच वेळी फ्रान्सिस बेकनपासून अलीकडच्या रसेल व चॉम्स्की यांच्यापर्यंत त्यांचे तत्त्वचिंतनही विकसित झाले. रुसो आणि व्हॉल्टेअर यांसारख्यांनी चर्च व धर्म यांची भरपूर टिंगलटवाळी करून त्यांचे सत्य स्वरूप जगासमोर आणले व त्यासाठी स्वतःला बहिष्कृतही करून घेतले. तिकडे मार्क्स झाला, फ्रॉईडही झाला आणि सेक्युलॅरिझमला आजचा अर्थ देणारा जॉन होलिओकही झाला. आईन्स्टाईनसारख्यांनी ऐन पौगंडावस्थेत धर्माचा त्याग केला. श्रद्धेच्या कचाट्यातून विचार मुक्त करण्याचे प्रयत्न असे गेली काही शतके सातत्याने तिकडे सुरू राहिले. ते धर्म पूर्णपणे नाकारत नसले तरी मनाने सेक्युलर होत गेले.

...मात्र यासाठी तेथील संशोधकांनी आणि वैज्ञानिकांनी जी किंमत मोजली ती फार मोठी होती. त्यांना आपली संशोधने लपवावी व मागे ठेवावी लागली. स्वतःचे यश नाकारावे लागले. देशोधडीला लागण्यापासून तुरुंगवास व प्रसंगी मृत्युदंड स्वीकारावा लागला. स्त्रियांमध्ये स्वतंत्र विचारांचा जागर जसजसा होऊ लागला तसतशा त्या रात्री सारे झोपल्यानंतर अंथरुणावर, पांघरुणाखाली हाती मेणबत्ती घेऊन आपल्या भावना लिहून काढू लागल्या. इंग्रजीत यालाच ‘ॲटिक लिटरेचर’ असे म्हणतात. समाजाचा बहिष्कार, धर्माचे वाळीत टाकणे, सत्तेचा रोष ओढवून घेणे, धर्मगुरूंचे शिव्याशाप व प्रसंगी घरच्या श्रद्धाशीलांचाही विरोध असे सारे अनुभवतच त्यांनी हे केले. त्यांचे मोठेपण हे की, सारे सोसूनही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. मग तिकडे धर्माला अफूची गोळी म्हटले जाऊ लागले. जन्ममृत्यूला ईश्वर कारण नाही असे म्हणणारा डार्विन आला. साहित्यात तोवर न आलेल्या गोष्टी उघडपणे येऊ लागल्या. स्त्रिया मुक्त झाल्या, देश स्वतंत्र झाला, धर्म मागे पडले व माणूसच उंच झाला. पोप आहे, रोम आहे व त्यांचा मानही आहे... पण त्यांना पूर्वीसारखी श्रद्धा जुळलेली नाही. हे काही प्रमाणात आपल्याकडेही होत आहे. 

पर्यटनाला जातात तसे लोक यात्रांना जातात, मानस सरोवरही त्यासाठीच केले जाते. रामेश्वरला जाऊन तेथील सौंदर्यानी वेडे होणारे लोक भक्तीविषयी बोलत नाहीत. तेच कन्याकुमारीचे आहे. अयोध्या आणि रोम हे तर आता राजकारणाचेच क्षेत्र बनले आहे. त्यांच्या ओढीने माणसांचे पक्ष जाताना दिसू लागले आहेत. राजकारण्यांनी इतिहासातील शिवाजी राजासारखे थोर पुरुषच पळवले नाहीत तर थेट ईश्वराचे नामाभिधान लाभलेली दैवतेही आपल्या कक्षात सामील करून घेतली. 

...मात्र अजूनही चार्वाकांसमोरची आव्हाने संपलेली नाहीत व दीर्घ काळपर्यंत ती संपणारही नाहीत. श्रद्धांचे ओझे कमी झाले असले तरी त्यांचे गारुड पूर्णपणे उतरले नाही. पंढरपूरच्या वाऱ्यांसारख्याच दीक्षाभूमीच्या वाऱ्याही सुरू झाल्या. अमृतसरची गर्दी ओसरली नाही आणि प्रवास म्हणून का होईना चारही धामांच्या यात्रा करणारे वाढले आहेत. समाजाची वाढलेली सुबत्ताही याला कारणीभूत आहे. 

...मात्र एवढे सारे होऊनही देव, ईश्वर, परमेश्वर, पुनर्जन्म व त्यांच्याशी जुळलेले विधी व यज्ञयाग आजही होतात. सत्यनारायणाची पूजा आता महापूजा झाली आहे. साध्या अंधश्रद्धांविरुद्ध बोलणाऱ्यांचे व लिहिणाऱ्यांचे प्राण आजही घेतले जात आहेत. त्याविरुद्ध माणसांचे उठाव होत नाहीत. उलट त्यात आनंद मानणारेही फार आहेत... मात्र काळ बदलत आहे. या काळासोबत इतिहास मागे पडून विस्मरणात जात आहे. या विस्मरणात ज्यांची आहुती पडेल त्यांत ईश्वर असेल, धर्म असतील, परंपरा-रूढी आणि सगळ्या जुन्या चालीरिती असतील. 

माणूस स्वतःच शक्तिशाली असेल व त्याच्या जोडीला नवे विज्ञान उभे राहील. माणूस आणि विज्ञान यांचे जग माणूस आणि श्रद्धा यांच्या जगाहून वेगळे असेल व प्रकाशमान असेल. तशाही माणसांच्या कार्यशक्ती आता वाढल्या आहेत. त्यांचे बौद्धिक व वैचारिक सामर्थ्य शिक्षणाच्या व ज्ञानाच्या स्फोटाने वाढवले आहे. माणसामाणसांत फरक करणारे धर्मपंथच जातील असे नाही. शंभरदीडशे वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या देशांच्या मर्यादाही जातील. जगाची वाटचालच ऐक्याच्या व एकात्मतेच्या दिशेने होईल. यंत्रांचे बळ वाढेल. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. विज्ञान साऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी व कसदार अन्न उपलब्ध करून देईल.  

आवडीनिवडीचे कालचे निकष आज बदलतील. आजचे उद्या राहणार नाहीत. जन्मदत्त श्रद्धांचा विळखा जाईल. मूल्यनिष्ठांनी त्यांची जागा घेतलेली असेल. न्यायाचा, स्वातंत्र्याचा व समतेचा काळ येईल. विषमता जाईल. माणसांतले दुरावे संपतील. माणूस एक होत असतानाच जगही एक होत जाईल. बर्ट्रांड रसेलने गांधींनी व अनेक थोरामोठ्यांनी पाहिलेले जगाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले असेल.

ते पाहायला आपल्या पिढ्या कदाचित राहणार नाहीत... पण या पिढ्या उद्याच्या नव्या व उन्नत जगाची पायाभरणी करणाऱ्या ठरतील. येणारे जग माणसांचे असेल. ईश्वरांचे ते पूर्वीही नव्हते व यापुढेही असणार नाही. माणूस आपल्या बुद्धीच्या बळावर आपले प्रश्न सोडवील. आजवर जे ईश्वरावर सोपवले तेही आपल्याला करता येते हे त्याला उमजले असेल. श्रद्धेची जागा विचार व पूजेची जागा विज्ञान घेईल. एकोणिसाव्या शतकाहून विसावे शतक प्रगत होते. एकविसावे त्याहून अधिक प्रगत असेल. 

तसेही गेल्या दोन शतकांत हे जग फार बदलले आहे. अरब व मुस्लीम देशांचा अपवाद वगळला तर जगातील सर्व देशांनी धर्मनिरपेक्षता हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारले आहे. भारतासारख्या कर्मठ देशातून अनेक दुष्ट प्रथा हद्दपार झाल्या आहेत. अफ्रिकेतील देशही प्रगतीच्या मार्गावर येऊन युरोपशी स्पर्धा करू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसामाणसांतले अंतर कमी केले व त्याने ईश्वराविषयीचे व धर्मांविषयीचे संशय उभे करून त्याला इतिहासजमा करण्याचे काम चालवले आहे. आदिवासींच्या व मागासलेल्या समाजाच्या त्यांच्या जुन्या श्रद्धा अजून राहिल्या असल्या तरी एके काळी सारा समाजच त्या श्रद्धांच्या आहारी होता. ते चित्र आता राहिले नाही. 

ईश्वर हा आता एक दिलासादायक मानसोपचार झाला आहे. देवळात गेल्याने, मशिदीत प्रार्थना केल्याने व चर्चमध्ये रविवारी हजेरी लावल्याने बरे वाटते... एवढेच काही अंशी आता मागे राहिले आहे. मंदिरे राहतील, मशिदी व चर्चेस राहतील... मात्र त्यातले देवत्व जाऊन त्यांचे ऐतिहासिक व पर्यटनविषयक माहात्म्य तेवढे टिकेल. माणसांना तिथे जायला आवडेल... पण त्यांची पूर्वीची त्याविषयीची भक्तिभावना लोप पावलेली असेल. हा माणसांचा व त्यांच्या बुद्धिमत्तेचा विजय असेल. त्यातून माणुसकी उभी राहील व श्रद्धा इतिहासजमा होईल.

चार्वाकांचा वा कोणताही नवा विचार एकाएकी सार्वत्रिक होत नाही... शिवाय नव्या काळात त्यातही नवे बदल येतात. एके काळी मार्क्सचा विचार अखेरचा मानणारे लोक जगात होते... पण आज तो तसा राहिला नाही. बदलला व संपलाही. ईश्वरही त्याच्या सगळ्या अंगांनिशी आता पूर्वीसारखा राहिला नाही. हे बदल समाजाच्या बदलासोबत होतच राहणार आहेत. या बदलांसोबत राहणे, जगणे व त्यांचे स्वागत करणे हेच आजच्या जगाचे कर्तव्य आहे.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Part 16 Load More Tags

Comments:

vijay band

तर्कहीन आणि तथ्यहीन गोष्टि दूर जाऊन ,वास्तवात जगूया .

संजय भोसले

अप्रतिम लेख... आपल्या सारख्या विचारवंतांनी असेच समाज प्रबोधन करत राहवे. अनेक शुभेच्छा

Aman Iisak Mulla

अतिशय उत्कृष्ठ लेख

Bajirao Aher

Atishay sundar,vaidnyan ik,purogami vichar shaili.sarvani vachali,itar ana vachnyas pathva vi.buddhicha vapar kara.sarv shraddha buddhi chya kashti var ghalun magach amlat ana.lekhakala anek anek dhanyavad.

Add Comment