स्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक

चार्वाक लेखमालेचा भाग - 13

चार्वाकांचा कोणताही ग्रंथ वा अधिकृत वचन उपलब्ध नसल्याने त्यांची स्त्रीविषयक भूमिका अधोरेखित करता येत नाही... मात्र त्यांच्या धर्मविरोधी व श्रद्धाविरोधी विचारसरणीचा विचार स्त्रियांच्या संदर्भातही करता येतो. जगातला कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही व त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा वा वागणूक देत नाही. धर्माच्या परंपरा व त्यांच्या पूजांची पद्धतच अशी की, त्यात पुरुषांना वरिष्ठ व स्त्रियांना कनिष्ठ स्थान असते. काही जागी तर त्यांना यायलाही मज्जाव असतो... कारण धर्म हा नेहमी सत्तेच्या बाजूने उभा राहतो... राज्यात राजाच्या वा इतर सत्ताकारण्यांच्या, अर्थकारणात धनवंतांच्या, समाजात समाजपुरुषांच्या व कुटुंबात तो पुरुषांच्या बाजूने असतो. आपल्याकडे वराला नवरदेव म्हणतात, वधूला फक्त नवरी म्हणतात. त्याचे कारणही याच परंपरागत अन्यायात शोधावे लागते.

आपला एकही वेदग्रंथ स्त्रीने लिहिलेला नाही. शंभरावर उपनिषदे झाली... पण त्यांतल्या एकाचेही कर्तेपण स्त्रीकडे नाही. महाकाव्ये, पुराणे, पोथ्या व धर्म यांच्याशी संबंध असलेल्या सगळ्या ग्रंथांचे कर्ते पुरुषच आहेत. या ग्रंथांतील वर्णनेही स्त्रीला दुय्यम ठरवणारी व तिच्यावर अन्याय करणारी आहेत. वैदिकात शेकडो ऋषी-मुनींची नावे सांगता येतात... पण त्यांतल्या ज्ञानी स्त्रियांची यादी गार्गी, मैत्रेयी अशा दोनतीन स्त्रियांवरच थांबते. 

रामायणात राम सीतेला अग्निदिव्य करायला लावतो व त्यानंतरही तिचा त्याग करून तिला अरण्यात सोडून देतो. द्रौपदीची विटंबना होते. नंतर झालेल्या एकाही ग्रंथाचा कर्तेपणा स्त्रीकडे नाही. सगळे आचार्य पुरुष होते. शंकराचार्यांच्या गादीवर गेल्या बाराशे वर्षांत एकही स्त्री आली नाही. तिकडे पोपचे पद पुरुषांसाठी राखीव आहे. मुल्ला आणि मौलवी हेही सारे पुरुषच असतात. आपले सगळे आचार्य व बुवाबाबा बहुधा पुरुष आहेत. 

संतांमध्येही स्त्रियांची नावे फारशी येत नाहीत. एक मुक्ताई, दुसरी जनाबाई व तिसरी बहिणाबाई बस. एवढ्‌यावर ही यादी थांबते. झालेच तर धर्मपरंपरांनी स्त्रीला पापाची खाण, मोहाची मूर्ती व सगळ्या अनिष्टांचे कारण मानले. अशुभ पाऊल स्त्रीचे असते, पुरुषांची पावले मात्र नेहमी शुभच असतात. 

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला जाळले जात असे व त्याला सती हे गोंडस नाव दिले जात असे. अल्पवयीन मुलगी विधवा झाली तर तिचे वपन केले जायचे. तिकडे रोमनांमध्ये सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याच्या कबरीत त्याच्या राण्यांनाही गाडले जायचे. आजही दत्तासारख्या काही कर्मठ देवतांच्या पूजेत स्त्रीला भाग घेता येत नाही. अधिकार, शिक्षण, दर्जा या साऱ्यांत ती दुय्यम व तिय्यम ठरली आणि ती मानसिकता एकविसाव्या शतकातही पूर्णपणे नाहीशी झाली असे नाही. 

मध्ययुगातील युद्धात पुरुष मारले जायचे आणि स्त्रियांना पळवून त्यांना भोगदासी बनवले जायचे. थेट ग्रीकांपासून व रोमनांपासून सतराव्या व अठराव्या शतकापर्यंत जगात हेच चालत आले. याला धर्माने कधी रोखले नाही वा हा अन्याय आहे असे कोणत्याही धर्मगुरूला वाटले नाही.

ख्रिश्चन धर्मात तर स्त्रीला स्वतंत्र जन्मच नाही. ईश्वराने प्रथम आदमला निर्माण केले व नंतर त्याच्या बरगडीपासून इव्ह तयार केली. त्या दोघांना त्याने स्वर्गाची बाग दिली... पण त्यातले ॲपल हे फळ न खाण्याची आज्ञा त्यांना केली. इव्हने मोहापायी ते फळ खाल्ले. ते स्त्रीचे जगातले पहिले पातक ठरले. त्यातून त्या दोघांत आसक्ती निर्माण होऊन नव्या पिढ्या जन्माला आल्या. या पिढ्यांचे जन्मही त्याच मूळ पापाची परिणती मानले गेले.

जन्म ही पूर्वसंचिताची परिणती आहे असे वैदिक धर्माने सांगितले. चौथ्या शतकात कॉन्स्टंटाईन राजाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून पोपची गादी स्थापन केली तेव्हा इव्हच्या पापाचे प्रायश्चित्त जगातील सर्व स्त्रियांनी घेतले पाहिजे असा फतवाच त्याने काढला. स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण ही वध्य आहे असे त्या फतव्याने सगळ्या कॅथलिकांना सांगितले. 

प्रत्यक्षात बायबल जिला वेश्या म्हणते ती मेरी मॅगडेलिनी ही येशूची पत्नी होती. आपल्या पश्चात धर्माची सूत्रे तिच्या हाती द्यावीत असे येशूला वाटत होते... पण आपल्या धर्मसत्तेवर एका स्त्रीचा अधिकार मान्य करायला त्याची शिष्यपरंपराच तयार नव्हती. त्यांच्यातल्या सेंट पॉलने मग मेरीला वेश्या ठरवून तिची तशी कथा बायबलात टाकली. आजचे बायबल येशूच्या पश्चात चारशे वर्षांनी संपादित झाले. त्या वेळी धर्मगुरूंसमोर येशूची 84 चरित्रे (गॉस्पेल्स) होती. त्यातले एक चरित्र प्रत्यक्ष मेरीने लिहिलेले होते... पण धर्मगुरूंनी त्या चरित्रासकट बाकीची सारी चरित्रे जाळून नाहीशी केली. चार धर्मगुरूंनी लिहिलेले आत्ताचे छोटेसे बायबल आपल्या हाती आहे. 

अगदी अलीकडे संतती-नियमनासाठी व त्याची साधने समजावून सांगण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपले पथक अफ्रिकेत पाठवले. त्याला विरोध करण्यासाठी पोपने तिथे धर्मगुरूंचे तांडे पाठवून ही साधने वापरणे व येणारी प्रजा थांबवणे हे धर्मविरोधी कृत्य असल्याचा  प्रचार केला. परिणामी ही साधने लोकांनीच फेकून दिली. इस्लामचाही संततीनियमनाला विरोध होता. आपल्या देशात त्याच्या प्रचारावर एवढा भर असतानाही पुत्रजन्म ही ईश्वरी बाब असल्याचे मानणारे व त्याला विरोध हे पाप समजणारे लोक अजूनही आहेतच.  

भारताच्या, पाकिस्तानच्या, श्रीलंकेच्या व बांग्लादेशच्या पंतप्रधानपदावर स्त्री आलेली आपण पाहिली... पण एकाही धर्मगुरूची गादी कधी स्त्रीला दिली गेली नाही. मानवंशशास्त्रज्ञांना जगात चौदाशे धर्म आढळले आहेत... पण त्यांतल्या एकाच्याही प्रमुखपदी स्त्री नाही. ती देवता होईल, तिची पूजा होईल, तिला संतत्व बहाल केले जाईल... पण तिला अधिकारपद मात्र नाकारले जाईल. ही सगळ्या धर्मांची आजवरची परंपरा आहे. धर्माने तिला दिलेली सवलत कोणती? तर कोणत्याही धार्मिक कार्यात व पूजेत नवऱ्याच्या हाताला हात लावून ‘मम’ म्हणण्याची... हीच तिची मर्यादा. 

इस्लामने एका पुरुषाला चार स्त्रियांशी लग्न करण्याची परवानगी दिली. मुळात ती परवानगी पैगंबराने एका सदिच्छेने दिली गेली. त्याच्या अगोदर कुरेश या त्याच्या जमातीत बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या सगळ्या स्त्रिया त्याच्या मुलाच्या वाट्याला येत. त्यांतल्या स्वतःच्या आईखेरीज इतरांशी संबंध ठेवण्याचा मुलाला अधिकारही असे. पैगंबराने ही प्रथा थांबवली... मात्र युद्धात पुरुषांची हानी होते व त्यांची संख्या कमी होते म्हणून त्याने चार लग्नांची परवानगी आपल्या अनुयायांना दिली... मात्र पुढे तिला विकृत स्वरूप आले. 

एका पुरुषाची साक्ष खोटी ठरवायला दोन स्त्रियांची साक्ष आवश्यक झाली. चार स्त्रियांपैकी कोणत्याही एकीला तीन वेळा तलाक म्हणून घराबाहेर काढता येऊ लागले. परिणामी लग्नाच्या बायका बदलण्याचा प्रकार धर्ममान्य झाला. अगदी अलीकडे युद्धात पकडून आणलेल्या मुलीचा भोग घेण्याआधी तिच्याशी निकाह लावायचा व भोग पूर्ण झाला की तलाक देऊन मोकळे व्हायचे हाही प्रकार जगाने पाहिला. अफगाणिस्तानातील व दक्षिण मध्य आशियातील स्वतःला भूमिगत बंडखोर म्हणवणाऱ्यांनी अशाच तऱ्हेने मुली पळवून त्यांचा भोग घेतला. तो अद्याप संपला नाही.    

आदिवासींच्या काही जमातींत स्त्रीला लग्नाआधी लैंगिक स्वातंत्र्य दिले जाते. त्यांतून तिने आपला नवरा निवडायचा असतो. त्याचसाठी गोटुलसारख्या संस्था त्यांच्यात निर्माण झाल्या... मात्र एकदा लग्न झाले की तिचे सारेच स्वातंत्र्य जाऊन ती नवऱ्याची गुलामच होत असते. त्याला त्यांचा धर्मही साथ देतो. धर्माचे हे स्त्रीविरोधी स्वरूप स्त्रियांनीच कधी फारसे मनावर घेतले नाही. उलट त्यात त्यांनी आपले संरक्षण पाहिले. तुरुंगातील कैद्यांनी बेड्यांवरच प्रेम करू लागावे असाच काहीसा हा प्रकार आहे.

वैदिक धर्मात स्त्रियांना गुलाम करण्यासाठी मनुस्मृतीला दोष दिला जातो व तो योग्यही आहे... मात्र त्याच वेळी वैदिकच नव्हे तर जगातील कोणताही धर्मग्रंथ, धर्मगुरू वा धर्मपरंपरा स्त्रीला स्वातंत्र्य व पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देत नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्ष गौतम बुद्धानेच आपल्या भिक्षू संघात स्त्रियांना प्रवेश न देण्याची भूमिका घेतली होती. आनंद या त्याच्या शिष्याने त्याचे मन वळवले व स्त्रिया भिक्षू संघात आल्या... मात्र त्याच वेळी आपल्या धर्माच्या अवनतीला आत्ताच सुरुवात झाली असे बुद्धाने म्हटले आहे. चीन, जपान, तिबेट, भूतान, ब्रह्मदेश व श्रीलंका इथे आजही हा धर्म मोठ्या वर्गाने स्वीकारलेला आहे... पण त्याने स्त्रीला मुक्ती दिली असे तिथेही दिसत नाही. 

ही स्थिती स्त्रिया, गरीब, श्रमिक व दुबळ्या वर्गांना धर्माने आणलेली दुःस्थिती सांगणारी आहे... मात्र हे वाट्याला येऊनदेखील हे वर्ग त्या अन्यायाविरुद्ध उभे राहू शकले नाहीत... कारण सारीच सत्तास्थाने व शक्तीस्थळे ईश्वरासह त्या अन्यायाच्या बाजूने उभी होती. चार्वाकांचा विचार मारला गेला नसता आणि समाज धर्मसत्तेचा गुलाम झाला नसता तर तो स्वतंत्र व समान राहिला असता. त्यात गुलामगिरी व विषमता राहिली नसती. माणसा-माणसांतला दुरावा जाऊन त्यांच्यात चांगल्या संबंधांची निर्मिती झाली असती. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांसारखी मूल्येच समाजधारणेचा आधार झाली असती. चार्वाक विजयी झाले असते तर आजच्या स्त्रीमुक्तीची, दलितमुक्तीची व अन्य सामाजिक चळवळींची गरज राहिली नसती. सारे मध्ययुग अंधारे न राहता प्रकाशाने भरलेले राहिले असते व आजचे वर्तमानही समाधान, सुख व शांतता यांचा अनुभव घेऊ शकले असते.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर स्त्रिया Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Women Part 13 Load More Tags

Comments:

अरुण कोळेकर ,सासवड

जगभरातल्या सर्व धर्मांनी केलेली स्त्री वर्गांची उपेक्षा आणि वंचना यावर लेखातील विवेचन हितसंबंधांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. हे नाकारुन चालत नाही. हे अतिशय वस्तुनिष्ठ , पररखड तितकेच संयमाने उतरले आहे.

Add Comment