आपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध

चार्वाक लेखमालेचा भाग - 2

फ्रेंच राज्यक्रांतीतील महत्त्वपूर्ण घटना - टेनिस कोर्टवरील प्रतिज्ञा | फोटो सौजन्य - Wikimedia Commons

विचार - मग तो पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य, तत्त्वज्ञान - मग ते प्राचीन असो वा अर्वाचीन, राजकारण - मग ते स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय, या सर्वांच्या केंद्रांवर व परिघांवर मुशाफिरी करत राहिलेले फार थोडे लेखक आजच्या महाराष्ट्रात आहेत; त्यांतील एक नाव सुरेश द्वादशीवार. त्यांनी लिहिलेल्या 'मन्वंतर' व 'युगांतर' या दोन छोट्याच पण मर्मभेदी लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच साखळीतील तिसरी कडी म्हणावी अशी 'चार्वाक' ही लेखमाला 'कर्तव्य साधना' वरून प्रसिद्ध करत आहोत, 1 ते 16 मार्च या काळात रोज सायंकाळी. चार्वाक सर्वांनाच माहीत असतो, मात्र बहुतेकांना त्याचे तत्त्वज्ञान परिचित असते ते दोन चार वाक्यांपुरते! आणि तेही बहुतांश वेळा चुकीच्या वा विपर्यस्त स्वरूपात! अशा पार्श्वभूमीवर, चार्वाक विचार केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आणि काल- आज - उद्या असा तिहेरी दृष्टिक्षेप टाकणारी ही लेखमाला सुबोध आहे, पण तरीही वाचकाला जरा जास्तीचे कष्ट पडणार हे निश्चित! 
- संपादक

शांती, सलोखा व सुरक्षा यांसाठी म्हणून उभी झालेली धर्माची ही व्यवस्थाच नंतर तुरुंग झाली. समाजाला संचिताचे नाव सांगून तिने त्याचे हातपाय साखळदंडांनी बांधले तर तोंडात धर्मग्रंथांची वचने घुसवून तोंडही बंद केले. परिणामी विचार करणारी माणसे श्रमावाचून सुख तर श्रम करणारी माणसे सुखावाचून श्रम करतच राहिली. या अन्यायाला वाचा फोडण्याचे व त्याची ही स्थिती समजावून सांगण्याचे काम तत्त्वज्ञांनी, सुधारकांनी व नवविचारांनी प्रेरित झालेल्यांनी केले. 

विल्‌ ड्युरांट म्हणतो, ‘फ्रान्स हा देश व्हॉल्टेअरसोबत विचार करू लागला. त्याने धर्मसत्तेचा उपहास व राजसत्तेच्या जुलमाचा पर्दाफाश असा केला की, फ्रान्सची जनताच अंतर्मुख झाली व स्वतःच्या दूरवस्थेचा विचार करू लागली. या सत्तांविरुद्ध पहिली क्रांतीच फ्रान्समध्ये झाली. तीत झालेल्या जनतेच्या उठावाने देशातले हजारो धर्मगुरू व पुरोहित गिलोटीनच्या पात्याखाली त्यांच्या माना उडवून ठार केले. अखेरीस तिने राजसत्तेचाही बळी घेतला. 

फ्रान्सची क्रांती स्वातंत्र्य, समता व बंधुता हा नारा देऊन झाली. तिने ईश्वर नाकारला व दैवत म्हणून विवेकाच्या मूर्तीची स्थापना केली. धर्म व राजतंत्र याविरुद्धची ती जगातली पहिली क्रांती होती... मात्र त्या क्रांतीचे नेतृत्व सरदारांच्या व सरंजामदारांच्याच हाती असल्याने तिने अर्थकारणाला वळण दिले नाही. उलट सगळ्याच सरंमाजदारांचे हितसंबंध परस्परविरोधी असल्याने त्यांच्यातच वितुष्ट येऊन त्यांनी एकमेकांना गिलोटीनखाली मारले. शेवटचा नेता रोबेस्पियर मारला गेला आणि तो रक्तरंजित संहार थांबला. 
 

 

या क्रांतीने राजसत्ता गेली... पण तिची जागा दरम्यान झालेल्या यादवी युद्धाचा बीमोड करणाऱ्या नेपोलियन या सम्राटाने घेतली. धर्मसत्ता मात्र दुबळी ठरली आणि तिने पोपचे वर्चस्व झुगारायला सुरुवात केली. विवेकाच्या मागे जाणारा समाज यथावकाश पुन्हा श्रद्धेच्या मागे गेला. फ्रान्समध्ये पुन्हा लोकशाही यायला व जनतेचे खरेखुरे राज्य यायला शेकडो वर्षे जावी लागली. आज तिथे जनतेची सत्ता आहे आणि धर्मसत्ता जनतेवर फारसे निर्बंध घालण्याएवढी समर्थ राहिली नाही.

धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांचा इतिहास व संस्कार मोठा आहे. त्याची समाजावरची पकडही मोठी आहे. एखाददुसऱ्या झटक्याने वा काही माणसांचा बळी देऊन ती बदलत नाही. आज अडचणीत दिसणारी ही सत्तास्थाने अल्पावधीत पुन्हा बळकट होतात वा तशा स्वरूपात समाजात उभी राहतात. जमीनदारांची जागा सरंजामदार घेतात आणि सरंजामदारांची जागा उद्योगपती घेतात. 

तिकडे राजांची सत्ता लष्करशहांच्या वा पुढे लोकशाही मार्गानेच सत्तेबरोबर येणाऱ्या हुकूमशहांच्या हाती जाते. धर्मसत्तेचे वारस तर ठरलेलेच असतात. ते वंशपरंपरेनेच निश्चित केले असतात... त्यामुळे त्यांचे आयुष्य त्रिकालाबाधित राहते. ते बदलायला माणसांची मानसिकता बदलावी लागते. विचार करणाऱ्या वर्गांना तुम्ही श्रममुक्त नाहीत आणि श्रम करणाऱ्यांना, तुम्हालाही विचार स्वातंत्र्य आहे हे कळावे लागते व ते त्यांच्यात रुजावेही लागते. त्यात शतके जातात. मने बदलायला क्रांतीच नको, उत्क्रांतीही लागत असते. ती केवळ मनाच्या बदलातून होत नाही. त्यासाठी व्यवस्थाच बदलावी लागते.

अशीच दुसरी क्रांती राजसत्ता, धर्मसत्ता यांच्याविरुद्ध  रशियात 1917च्या सुमारास झाली. या क्रांतीने राजसत्ता संपवली. धर्मसत्तेवर निर्बंध आणले. चर्चेसना व इतर पूजास्थानांना कुलपे लावली. अर्थकारण बदलले... पण हे बदल पुढच्या पन्नास वर्षांत पुसट व धुसर होत जाऊन पुन्हा तिथेही पूर्वस्थिती निर्माण झाली. लेनीननंतर ब्रझ्नेव्हपर्यंत तिचा अंमल टिकला... पण पुढे गोर्बाचेव्ह यांनी अर्थसत्ता खुली व स्पर्धात्मक केली. राजसत्ता गेली... पण हुकूमशाही मजबूत झाली. 

 

धर्मसत्तेवरील नियंत्रणे मजबूत होत नाहीत याची त्या देशाला व त्याच्या सरकारला जाणीव होण्याचा क्षण इंग्लडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी रशियाला भेट दिली तेव्हा आला. त्यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली तेव्हा त्यांच्यासोबत लक्षावधी रशियनही चर्चमध्ये आले. श्रद्धेने विचारांवर केलेली ती मात होती. रशियाच्या मागोमाग 1949मध्ये चीनमध्येही क्रांती झाली. तीही राजसत्ता, धनसत्ता व धर्मसत्ता यांविरुद्ध झाली. तिथली राजसत्ता गेली... पण नंतर आलेली हुकूमशाही कमालीची पाशवी होती. 

चीननेही माओच्या पश्चात, डेंगच्या राजवटीत खुल्या अर्थव्यवस्थेला वाट करून दिली. धर्मसत्तेवर अजून निर्बंध आहेत... पण धर्मगुरूंचा तिथला प्रभावच संपल्यागत आहे. कम्युनिस्टांची तेथील हुकूमशाही त्या देशातले सारेच सत्य बाहेरही येऊ देत नसल्याने त्याविषयीची विश्वसनीय माहिती जगापर्यंत पोहोचत नाही. 

एक गोष्ट मात्र खरी... त्या देशाने अल्पावधीत केलेली प्रगती नेत्रदीपक म्हणावी अशी आहे. आज चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता, लष्करी सत्ता व महासत्ता आहे. त्या देशाने नागरिकांना स्वातंत्र्य दिले नाही... मात्र जीवनावश्यक वस्तू मुबलक व स्वस्त दरात दिल्या... शिवाय उत्पादन वाढवून जगाच्या बाजारपेठा ताब्यात घेतल्या. या तुलनेत भारताने केलेली प्रगती मंद गतीने झाली. 

आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली त्या वेळी तिच्यासोबतची न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही, निश्चित राज्यघटना, मूलभूत अधिकार ही मूल्येही स्वीकारली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या कारकिर्दीत देशाचे उत्पादन 12 टक्क्यांनी वाढले. नंतर ते कमी होत जाऊन साडेतीन टक्क्यांवर आले. डॉ. मनमोहन सिंगांच्या काळात ते नऊ टक्क्यांवर गेले... मात्र पुन्हा ते त्याच्या मूळ वेगावरच रेंगाळले. 

भारताने स्वातंत्र्याच्या काळातच धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारले. त्याचे कठोर रूप वगळून त्याला सर्वधर्मसमभाव अशी मुलायम वस्त्रे चढवली. धर्मश्रद्धा राहिल्या, धर्मही राहिला... पण धर्माला राज्याची मान्यता राहिली नाही. सरकारी शाळेतून धर्म शिकवला जात नाही आणि ज्या शाळेत तो शिकवला जातो तिला अनुदान दिले जात नाही. व्यक्तीला धर्माची उपासना करण्याएवढाच हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकारही त्याने दिला. परिणामी, धर्माचे निर्बंध सैल झाले. 

...मात्र भारतात धर्मांइतक्याच जातीही प्रबळ आहेत. त्याचा वापर करून घेणारे राजकारणी भरपूर आहेत. त्यांनी धर्माकडे लक्ष दिले नाही... पण जाती संघटित करण्याचे प्रयत्न केले. मंडल आयोगाने त्याला साथ दिल्याने जातीच्या संघटना पुढे पोटजातींच्या झाल्या. त्यांतून आरक्षण वाढले, जातीय तणाव व तेढी वाढल्या. आर्थिक प्रगती झाली. कृषी क्षेत्रातही देश पुढे गेला... पण सामाजिक समता त्यापासून दूर राहिली. 

जाती राहणे याचा अर्थ धर्मांधता राहणे हाही होतो. जातींना धर्मांचा आधार व पाठबळ आहे. भारतातील जाती कष्टनिहाय आहेत. लोखंडाचे काम करणारे लोहार, लाकडाचे काम करणारे सुतार, शेतीत राबणारे शेतकरी, न्हावी, तेली अशा अनेक जातींत हा समाज वाढला आहे. त्यांच्या वेगळ्या वस्त्या आहेत... शिवाय अस्पृश्यांचे वर्ग आहेत. आता अस्पृश्यता कमी असली तरी एके काळी तिच्या वस्त्या गावकुसाबाहेर होत्या व जातींना त्यांची कामे पूर्वसंचितानुसार, ईश्वरी इच्छेने मिळाली आहेत ही धारणा होती. या जातींनी समाजाचे केलेले नुकसान धर्माएवढेच मोठे आहे. 

ईश्वराचे काम करणाऱ्या यांतील काही जातींना ईश्वराचे दर्शनही वर्ज्य होते. समाजात वैर नव्हते... कारण धर्माचे वंगण होते... पण विषमता होती. माणसामाणसांत दुरावा होता, त्यांच्यात कमीअधिक लेखणे होते... अस्पृश्यांमध्येही जातिभेद, विषमता व उच्चनीचता होती. धर्म सर्वव्यापी असल्याने त्याची बंधने सार्वत्रिक होती व सर्वमान्यही होती. जातीच्या नावाने लोक लवकर संघटित होतात हे दिसते तेव्हा लोकशाहीतले पक्षही त्यांच्या संघटना उभ्या करतात. काही पक्ष तर केवळ एकाच जातीचे पक्ष आहेत. दलितांमधील पूर्वाश्रमीच्या महारांचा रिपब्लिकन पक्ष, यादवांचा राष्ट्रीय जनता दल, मुसलमानांचा एमआयएम किंवा आंध्रात कम्मा आणि रेड्डी असे जातींचे पक्ष आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी कामकरी पक्ष असाच मराठ्यांचा. तात्पर्य, दुरावे व विषमता टिकवणाऱ्या व्यवस्था मोठ्या आहेत. त्यांना आरक्षण, मंडल आयोग इत्यादींमुळे केवळ कायद्याचीच नव्हे तर संविधानाची मान्यता मिळाली आहे. 

जातींच्या निर्मूलनासाठी निर्माण झालेल्या या व्यवस्था त्या मजबूतच करत गेल्या आहेत... शिवाय धर्म त्यांचे वेगळेपण आणि त्या वेगळेपणावर आपले राजकारण उभे करणारे पक्षही राहिले आहेतच. एवढ्या सगळ्या अडचणींकडून समाज न्याय, स्वातंत्र्य वा समता यांसारख्या मूल्यांकडे कसा जाईल? तशा चळवळी आहेत. त्या अशा प्रश्नांवर उभ्या होतात... पण प्रश्न मागे पडले तरी त्या विस्तारत नाहीत. स्वातंत्र्याच्या चळवळीने व्यवस्थेला मोठा धक्का दिला... पण नंतरचा काळ ती चळवळच विसरण्याचा आला. ती विसरली जाईल याचे प्रयत्नही झाले व ते अजून होत आहेत. त्यातला सर्वात मोठा पुढाकार धर्माचा व धर्माचे ठेकेदार म्हणवून घेणाऱ्यांचा आहे.

त्यात आपल्या देशातील जातींची व पोटजातींची वेगळी बोलीभाषा आहे. देशात आदिवासींच्या हजारो जमाती आहेत आणि एकेका जमातीत पुन्हा सात देवे, पाच देवे असे वर्ग आहेत. या जमातींचे व जातींचे स्वरूप, वर्गांचा विचार करणाऱ्या मार्क्सने कधी लक्षात घेतले नाही.

 

आणि आता धर्माचे नाव सांगत राष्ट्रीय म्हणवणारे पक्ष प्रबळ होताना देशाने पाहिले. सरकारचा पक्षच मंदिर बांधण्यावर व तथाकथित रामसेतू टिकवण्यावर जोर देऊ लागला. परिणामी सामान्य माणसातही धर्मांधता कमी व्हायची, ती वाढताना दिसू लागली आहे. पुन्हा राजकारणात मंदिर, मशीद, जात, पात अन्‌ वेगळेपण उसळू पाहत आहे. 

वास्तव हे की, जगातले सगळे देश आता स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवतात. इंग्लंडची राणी ही इंग्लंडची धर्मप्रमुखही आहे... पण इंग्लंड सेक्युलर आहे. अमेरिका व सगळी युरोपीय राष्ट्रे अन्‌ आफ्रिकेतले देशही स्वतःला सेक्युलर म्हणवून घेतात. परवापर्यंत स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवणारा नेपाळही आता सेक्युलर झाला आहे. स्पेन हा पूर्णपणे ख्रिश्चन देश आहे... पण तेथील बार्सिलोना या देखण्या शहराच्या मध्यभागी एक आधुनिक चर्च उभे होत आहे. त्याचे बांधकाम  दीड शतकांपूर्वी सुरू झाले. ॲन्टोनिओ जॉडी  या प्रतिभाशाली शिल्पकाराने ते थेट पिकासोच्या वळणाने घडवण्याचा घाट घातला... पण तो एका ट्रामखाली सापडून मृत्यू पावला... पण पुढले काम अजून त्याच वळणाने सुरू आहे. 

2018मध्ये प्रस्तुत लेखकाने ते देखणे बांधकाम पाहिले. पर्यावरणाला पोषक आणि पिकासोच्या वळणाचे ते चर्च पाहणाऱ्याची नजर फिरवणारे आहे. ते 2026मध्ये पूर्ण होईल असे तिथले व्यवस्थापक म्हणाले. याला काही प्रशासकीय मदत मिळते काय... असे विचारले असता ते म्हणाले, ‘मुळीच नाही. आमचा देश सेक्युलर आहे. या चर्चमध्ये येणारे भाविक, प्रेक्षक, प्रवाशी व सामान्य लोक जी मदत करतात त्यावर हे बांधकाम चालते.’

सारे जग असे धर्मांधतेकडून धर्मनिरपेक्षतेकडे जात असताना भारत मात्र पुन्हा उलट्या वळणाने धर्मांधतेकडे जाऊ लागला आहे. जगातली अरब राष्ट्रेच केवळ स्वतःला धार्मिक म्हणवून घेतात. भारतालाही त्यात सामील करण्याचा इथल्या एका राष्ट्रीय पक्षाचा प्रयत्न आहे. या स्थितीत याच देशात जन्मलेला व साऱ्या संकटांना तोंड देत टिकलेला चार्वाक इथे आणखी किती काळ तग धरणार? 

यातला भारताचा संदर्भ केवळ आनुषंगिक आहे. चार्वाक ही साऱ्या जगाला त्याच्या मानवी जीवनाच्या आरंभापासून लाभलेली देणगी आहे. या  देणगीच्या बळावरच त्याला आपली प्रगती साधता आली. हितसंबंध व स्वार्थ या गोष्टी स्वाभाविकच स्थितिवादी व प्रगतीला विरोध करणाऱ्या असतात. त्यांनी चार्वाकांचा विचार केवळ बदनामच नाही तर नाहीसा केला... पण चार्वाक व त्याचा विचार ही मानवी मनाची व बुद्धीची एक सामाजिक व अविभाज्य अशी बाजू आहे. 

‘का’ हा कारण विचारणारा प्रश्न त्यात सदैव राहणार आहे. प्रसंगी स्थितिवाद्यांच्या भीतीने तो विचारला जाणार नाही... पण कायम राहणारा मात्र आहे. या ‘का’ने विचारपरंपरा व तत्त्वज्ञाने उभी केली आणि धर्मांना व त्यांनी निर्माण केलेल्या श्रद्धांना प्रश्न विचारले. आरंभी त्यांची दखल, त्यांच्या दुबळेपणापायी कुणी फारशी घेतली नाही... पण समाजाच्या उत्क्रांतीसोबत विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन ही क्षेत्रेही विकसित झाली आणि चार्वाकांचे प्रश्नचिन्ह मोठा आकार घेऊ लागले. श्रद्धा मागे सरत गेल्या व विज्ञान पुढे जात राहिले. 

आजचे जग या सत्याचा अनुभव घेत आहे व येणारे जग या सत्याचे असणार आहे. (युरोपातील प्रगत देशांना जे जमले नाही ते आपण कधी आत्मसात करणार? विज्ञान, संशोधन आणि शोध हे संशयाचे विषय आहेत. त्यांच्या निकषावर श्रद्धा तपासण्याऐवजी इथे श्रद्धेच्या निकषावर त्यांची तपासणी होते. हा काळ जाईल... पण त्याला किती शतके लागतील याचा अंदाज वा निदान कोण करील...?)

 

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर धर्मनिरपेक्षता हिंदुराष्ट्र Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Secularism Hindurashtra Load More Tags

Comments:

अरुण कोळेकर ,सासवड

बहुश्रुत ,व्यासंगी , तर्कनिष्ठ विचारांची मांडणी ,कमालिची वाचनीय आणि उत्त्कंठा वाढविणारी आहे. सरांचे लेखन नेहमीच औत्सुक्याचे होत आले आहे. जागतिक परिप्रेक्षात केलेली विचारांची मांडणी वर्तमान ,भूत आणि भविष्याचा वेध घेत राहते.

Add Comment