चार्वाकांची विचारधारा

चार्वाक लेखमालेचा भाग - 5

लोकेषु आयतः इति लोकायतः... लोकांचे मत, जनतेचा आवाज, सामान्य माणसांची इच्छा व मागणी म्हणजे लोकायत अशी व्याख्या पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वचिंतकांनीही केली आहे. सामान्य माणूस किंवा जनमत हा प्रस्थापित व तथाकथित उच्चवर्णीय विचारवंतांच्या कुचेष्टेचा व विरोधाचा विषय राहिला आहे. लोकायत मताला विरोध करणाऱ्यांच्या अशा लोकविरोधी मानसिकतेचा विचारही यासंदर्भात होणे गरजेचे आहे. 

प्लेटो हा ग्रीक तत्त्वज्ञ लोकशाहीचा टीकाकार होता. तो तिला झुंडशाही म्हणत असे. झुंडीचे नेहमी एक मन असते व ते बहुधा विवेकाच्या अधीन नसून अभिनिवेषाच्या आहारी जाणारे असते. प्लेटोचा गुरू सॉक्रेटीस याला लोकांच्या न्यायासनाने (त्यावर पाचशे लोक न्यायाधीश म्हणून बसले होते.) मृत्यूदंड दिला... त्यामुळे प्लेटोचे लोकमताविषयीचे विचार कमालीचे टोकदार व विरोधी होते. याउलट म. गांधींच्या मते लोक व त्यांचा समाज वा विचार हा नेहमी सत्याच्या अधिक जवळ असतो... कारण त्यामागे हेतू वा स्वार्थ नसतो. कुणाचा तिरस्कार वा घृणा नसते. सामान्य माणसांच्या हिताचाच विचार त्यात प्रामुख्याने असतो... त्यामुळे लोकायत मत हे गांधींच्या अधिक जवळ जाणारे आहे.

लोकमताला तुच्छ लेखणारे अनेक विचारवंत व तत्त्वज्ञ इतिहासातही झाले. त्यांनी लोकांना विचारहीन, विवेकहीन व तत्त्वशून्य मानून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपली आहे व ती ईश्वरानेच आपल्यावर सोपवली आहे असे मानले. असे समजणाऱ्यांत काही राज्यकर्ते, हुकूमशहा व लष्करशहाही होते. 

हॉब्सच्या मते माणूस हा केवळ वाईट असतो. त्याला केवळ स्वार्थ व स्वतःचे सुख समजते. त्यासाठी तो काहीही, अगदी वाईटही करायला तयार असतो. त्याचसाठी त्याला कायद्याच्या व राज्याच्या बंधनात व धाकात ठेवणे भाग असते. हे राज्य त्याच्या मते ईश्वराने माणसांना शिस्त लावण्यासाठी निर्माण केले आहे. याहून वेगळा विचार करणारे हिटलरसारखे हुकूमशहा म्हणत, ‘निळ्या डोळ्यांचे, गौर वर्णाचे आणि सरळ नाकाचे नॉर्डिक आर्यन्स हे जगातले श्रेष्ठ लोक (पुरुष) आहेत. त्यांच्यावर सारं जग दुरुस्त करण्याची जबाबदारी नियतीनं सोपवली आहे. ती पूर्ण करायची तर या लोकांना जग जिंकून ते ताब्यात घेणं गरजेचं आहे.’ 

भारतात उच्चवर्णीयांनी इतरांना नेहमीच कनिष्ठ प्रतीचे व विचारशून्य मानले. ज्ञानाचा व धर्माचा अधिकार त्यांना नाही, तो फक्त आपल्या एकाधिकाराचा विषय आहे असे मानून त्या वर्गांना ज्ञानग्रंथांपासून वा धार्मिक विचारांपासून दूर ठेवले. इंग्रजांचे राज्य देशात येईपर्यंत ही अवस्था कायम होती. स्वातंत्र्यानंतरच ज्ञानाची दारे साऱ्यांना खुली झाली. 

विचार करणारे व त्याबरहुकूम श्रम करणारे असे दोन वर्ग समाजात असतात असे सांगून त्यातला दुसरा वर्ग पहिल्याच्या नियंत्रणात व सत्तेत असतो हेच आपल्या दास कॅपिटलमध्ये मार्क्सने सांगितले. जगातल्या बहुतेक सर्व धर्मांनी सामान्यांची अशी उपेक्षा करून त्यांना कमी लेखले. मेंदूचा वापर करणारे श्रेष्ठ व देहाचा वापर करणारे कनिष्ठ मानले. ही वर्गवारी ईश्वरांना (प्रश्नार्थक) मोडून काढता आली नाही. धर्मांनी तर तिला हातभारच लावला. राज्यसंस्था (एक कम्युनिस्टांचा अपवाद सोडला तर व तोही अखेरीस हरला...) त्यात बदल घडवायला पुढे झाली... पण तिलाही हे काम काही फारसे जमले नाही. 

मोनिएर विल्यम्सच्या मते लोकायत ही मटेरिअलिस्टिक बाब आहे आणि ती नास्तिकतेच्या जवळ जाणारी आहे. पिटर्सबर्ग डिक्शनरीत या मताचा अर्थ मटेरिऑलिझम एवढाच सांगितला आहे. सामान्य प्रजाजनांचा संबंध वास्तवाशी येतो. परमात्मा किंवा या जगापलीकडच्या गोष्टींचा विचारही त्यांच्या मनात नसतो. त्यांची मने विचारांऐवजी श्रद्धेने भारलेली असतात. त्यांना मूर्तीत देव पाहता येतो. तसे  नसलेल्यांसाठी केवळ हे इंद्रियगोचर जगच खरे असते. 

पंचानन तर्क कारणानेही लोकायत विचार हा जगाचा विचार मानला. या जगाखेरीज तो सारे काही नाकारतो असे तो म्हणतो. मराठीतही लोक या शब्दाचा अर्थ जग असा होतो. संस्कृतोद्‌भव अशा सगळ्या भाषांत तो तसाच होतो. लोकायत हे त्याचमुळे जगाचे अध्ययन ठरते. या विषयाचे आणखीही प्राचीन पुरावे येथे नोंदवता येतील. पाचव्या शतकात झालेल्या बुद्ध घोषाने म्हटले, ‘आयत म्हणजेच आयतन. आयतन म्हणजे मूलभूत...’ त्यामुळे लोकायताचा अर्थ लोक वा जग हीच जिची मूलभूत भूमिका आहे ती विचारसरणी. मणिभद्राच्या मतेही लोक म्हणजे इंद्रियगोचर जगत. 

तात्पर्य... लोकायत म्हणजे लोकांचे तत्त्वज्ञान वा त्यांच्या अनुभवाने त्यांना दिलेले ज्ञान. हे ज्ञान अर्थातच अनुभवसिद्ध म्हणजे वस्तुमानाचे ज्ञान. डॉ.राधाकृष्णन आणि दासगुप्ता या आधुनिक तत्त्वचिंतकांनीही लोकायताचा अर्थ अनुभवाला येणारे ज्ञान वा वस्तुमानाचे ज्ञान असाच केला आहे. हे सारे एवढ्या पुराव्यानिशी सांगायचे कारण या दृश्य व इंदियगोचर जगाची सत्यता हे आहे. शंकराचार्य म्हणतात तसे हे जग मिथ्या नाही. तेच एकमेव सत्य आहे आणि मिथ्या असेल तर ते त्यांनी सांगितलेले व इतर कुणालाही अनुभवता व न दाखवता आलेले ब्रह्मच आहे. 

ब्रह्म खरे मानून जगाला मिथ्या ठरवण्यात आजवरची सगळी श्रद्धावादी ग्रंथरचना वा पुराणे राबली, हाच एक मिथ्यावादाचा प्रकार आहे. जगाला मिथ्या व टाकाऊ ठरवण्यामागे जगात चंगळ करणाऱ्यांचे जग सुरक्षित करणे एवढाच हेतू आहे. प्रत्यक्ष शंकराचार्य त्यातले पक्षपाती नसतील... पण ते त्या ज्या बाजूचे आहेत व ज्या बाजूचे म्हणणे त्यांच्या ज्ञानपूर्ण शब्दांत मांडत आहेत ती बाजू हेच मुळात एक असत्य आहे हे येथे स्पष्ट केले पाहिजे. भारतीय विचारपरंपरेचे वैशिष्ट्यच हे की, तिने व्यक्तीच्या अंतरंगावर आपले लक्ष केंद्रित केले व तसे करताना तिने तिचे बाह्यजीवन पार दुर्लक्षित केले.

माणसांचे प्रत्यक्ष जीवन व जग यांविषयीच्या या तत्त्ववेत्त्यांनी व ग्रंथकर्त्यांनी एवढी उदासीनता का दाखवली असावी? माणूस व जग यांना केवळ त्यांनी उपदेशासाठीच का स्वीकारले असावे आणि तो उपदेशही कसा... तर या जीवनात तू रमू नकोस, हे जीवन हा भ्रम आहे. जग हे मिथ्या आहे किंवा जग क्षणभंगुर व केवळ दुःखमय आहे असे त्यांनी का म्हटले? त्यातही एक बाब सामान्यपणे कोणी अधोरेखित करत नाही... ती ही की, ज्यांच्याजवळ काहीच नव्हते... त्यांनाच या साऱ्यांनी ‘सर्वम्‌ दुःखम, सर्वम्‌ क्षणिकम्‌ ।’ हे सांगितले. 

ज्यांच्याकडे सत्ता, पैसा व मानमरातब असे सगळे आहे त्यांना या धर्मवेत्यांनी असा उपदेश का केला नाही? बुद्धाने हे बिंबिसाराला किंवा अजातशत्रूला का सांगू नये आणि कृष्णाने तरी मायामोह त्यागून  युद्ध वा अन्य काही करायला अर्जुनाला व इतरांना का सांगावे? त्यागाचा, मायामोह सोडण्याचा उपदेश ज्यांच्याजवळ सारी सूत्रे आहेत त्यांना सांगण्यासाठी करायचा की युद्धासाठी? राजेरजवाडे, सेनापती वा सरंजामदार यांसारखे लोक त्याग करू शकणारे होते. टाळावेत असे मोह त्यांच्यापाशी फार होते. त्यांना या धर्मपुरुषांनी हे का सांगितले नाही? गरिबांना त्याग सांगून त्यांना कुणाचे भोग सुरक्षित करायचे होते?

या ग्रंथकर्त्यांना व धर्मवेत्यांना त्यांचे म्हणणे मनातून खरे वाटत असावे काय की सामान्यांना सामान्य व आहे तसे सज्जन राखण्याच्या हेतूने त्यांनी हे लिहिले असेल... पण त्यांच्या मागे सगळ्या सत्ता होत्या आणि त्याच वेळी या साऱ्यांना मानणारा सामान्य माणूसही हात जोडून उभा होता. यात कोण कुणाला खुलवत होते वा ती साऱ्यांचीच आत्मवंचना होती.

एवढ्यावरच हे प्रकरण थाबंणारे नाही. सगळे धर्म जन्म हेच पाप समजणारे आहे. मागले संचित शिल्लक राहिले म्हणून हा जन्म मिळाला. याही जन्मी ते तसेच राहिले तर पुन्हा नवा जन्म घेणे आले. (या अर्थाने जन्म ही संचित पूर्ण न केल्याची शिक्षा ठरते.) ‘पुनरपि मरणम्‌ पुनरपि जननम्‌ । पुनरपिः जननी जठरे शयनम्‌ ।। हे शंकराचार्यांचे म्हणणेही जन्माला शिक्षा (वा पाप) ठरवणारे आहे. संचित पूर्ण न केल्याचे पाप वा त्याची चूक याचीच शिक्षा मोक्षप्राप्तीने टाळता येते. मोक्ष मिळेपर्यंत मात्र ती शिक्षा भोगणे अटळ असते आणि मोक्ष कसा मिळतो... तो मिळतो ब्रह्माशी सायुज्यता प्राप्त केल्यानंतर. ती प्राप्त कधी होते... त्याचे स्पष्ट उत्तर पुण्याच्या प्राप्तीने हे आहे. ते कधी पूर्ण प्राप्त होते... याला पुन्हा उत्तर नाही.

ख्रिश्चन धर्मात तर जन्म ही शिक्षा वा पाप... तो घेणाऱ्याचेच केवळ नाही, ते त्यांच्या आद्यपूर्वजांचे म्हणजे आदम आणि इव्ह यांचे आहे. परमेश्वराने या दोघांना जन्माला घातल्यानंतर त्यांनी सफरचंदाचे मोहफळ खाऊ नये अशी आज्ञा त्यांना केली... पण इव्हला तो मोह आवरला नाही. तिने ते फळ खाल्ले व आदमलाही ते खायला दिले... त्यामुळे त्यांची कामवासना जागी होऊन त्यांनी समागम केला. 

परमेश्वराची आज्ञा न पाळल्याचे पाप केल्याची समागम ही पहिली शिक्षा व पुढे परमेश्वराने त्यांना स्वर्गातून ढकलून पृथ्वीतलावर पाठवले ही दुसरी शिक्षा. त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या आजवरच्या सगळ्या पिढ्या त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त आजही घेत आहेत. हे त्या धर्माचे सांगणे. जन्म ही शिक्षा, प्रेम हे पाप आणि नव्या पिढ्यांचे पृथ्वीवर येणे हे सारे पापाचरण असेल आणि धर्म ते सांगत असेल तर मग त्या परमेश्वराने हे सारे पापाचे व्यवथापन उभे तरी का केले असावे आणि आपले संचित आज पूर्ण झाले हे माणसाने तरी कसे समजायचे असते?

या जन्मातून ईश्वरच माणसांची सुटका करील असे ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांनी म्हटले आहे. तोवर माणसांनी मेल्यानंतर आपापल्या कबरीत पडून राहायचे आहे. एकदा कधीतरी कयामतचा दिवस येईल. त्या दिवशी परमेश्वर साऱ्यांना कबरीतून काढून त्यांना पापाच्या शिक्षा व पुण्याचे बक्षीस देईल. पाप्यांना नरकात तर पुण्यवानांना तो स्वर्गात पाठवील... पण तो कयामतचा दिवस कधी उजाडेल? या प्रश्नाचे उत्तर यातला कोणताही धर्म देत नाही. त्यांतला कोणताही धर्म माणसांच्या अखेरीचे उत्तर सांगत नाही हेच इथे लक्षात घ्यायचे. त्याची कारणे अनेक आहेत.

एका आणखीही महत्त्वाच्या विषयाची नोंद इथे केली पाहिजे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ आणि भारतीय श्रद्धावादी तत्त्वज्ञ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अनुभवाला येणारे जग हे सत्य मानतात व त्याआधारे अज्ञात मूल्यांचा शोध घेतात. भारतात याउलट स्थिती आहे. येथील विचारवंत अनुभवता न येणारे ब्रह्म वा परमात्म तत्त्व हे सत्य मानतात व त्याची सत्यता पटवण्यासाठी इंद्रियांच्या अनुभवाला येणारे जग असत्य व मिथ्या ठरवण्याचा आटापिटा करतात. 

वेगळ्या व सरळ शब्दांत सांगायचे तर पाश्चात्त्य विचारवंत ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याचा प्रयत्न करतात तर आपले विचारवंत अज्ञाताकडून ज्ञाताकडे सरकण्यासाठी धडपडतात. जग सत्य मानणारे विज्ञानवादी तर तेच असत्य वा मिथ्या मानणारे आदेशवादी का मानले जातात हा यातील खरा प्रश्न आहे. कदाचित त्यांना भाववादी किंवा आभासवादी म्हणण्याची हिंमत आपल्याला होत नसावी. चार्वाक आणि लोकायतीत हे ज्ञाताच्या बाजूने सत्यवादी तर श्रद्धेच्या मागून जाणारे सारेच तथाकथित आदर्शवादी हेच असत्यवादी आहेत. 

...पण हे सत्य का दडवले गेले? वर्षानुवर्षेच नव्हे तर शतकानुशतके जनमानसावर प्रस्थापितांनी हा असत्य व अप्रमाणित संस्कार रुजवून त्याद्वारे आपली हुकुमत कशी कायम केली? धर्म, सत्ता, विद्वत्ता आणि शक्तिशाली राज्यकर्ते हे सारेच सत्याच्या जिवावर का उठले? असत्याविषयी, आभासाविषयी  आणि मिथ्यवादाविषयी त्यांनी एवढी श्रद्धा का बाळगली? सत्तेचे सत्यावरील नियंत्रण हे त्यातले प्रमुख कारण. 

...शिवाय लोकायतिकांच्या अध्ययनातील मुख्य अडचण त्यांचा एकही प्रमाणग्रंथ उपलब्ध नसणे ही आहे. महाभारतात आलेला उल्लेख वगळला तरी अनेक संशोधकांनी त्यांचा एकही ग्रंथ उपलब्ध नसल्याचा निर्वाळा आता दिला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या ऱ्हिस डेव्हिस यांनी त्यांचे ग्रंथ नसल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे... मात्र त्यांचे ग्रंथ पूर्वी नव्हते असे नाही. 

चंद्रकिर्तीच्या प्रज्ञाशास्त्रात, आर्यदेवाच्या सत्‌शास्त्रात त्यांची चर्चा, त्यातील उताऱ्यांसह आली आहे. विशेषतः हे उतारे बृहस्पतिशास्त्रातून घेतले आहेत. बृहस्पती हा चार्वाकांचा पहिला आचार्य मानला जातो हेही इथे लक्षात घ्यायचे... शिवाय पुष्पदंताने त्याच्या ग्रंथात चार्वाकांच्या ग्रंथाचा व त्याच्या रचयित्याचा उल्लेख केला आहे. 

पतंजलीच्या आणि भास्करचार्यांच्या लेखनातही चार्वाकांच्या ग्रंथांचा उल्लेख आहे. दिव्यावदानसुत्तात व बौद्ध ग्रंथात चार्वाकांच्या ग्रंथांसह त्यांवरील भाष्यग्रंथांची नोंद आहे... शिवाय कात्यायनातही त्यांचे उल्लेख आहेत. दासगुप्ता यांनी या साऱ्याच्या आधारे चार्वाकांचा एक ग्रंथ इ.स.पूर्व 300 वर्षे उपलब्ध होता आणि त्यावरील एक भाष्य इ.स.पूर्व 150 वर्षांपूर्वी उपलब्ध होते असे म्हटले आहे.

...मात्र यांतले कोणतेही ग्रंथ, भाष्य वा अधिकृत म्हणावे असे लेखन आज आपल्यासमोर नाही. सामान्यांच्या व प्राकृतजनांच्या समजांविषयीचा प्रस्थापितांचा तिरस्कारच त्यांच्या ग्रंथांनी धर्म, सत्ता यांना लावलेले सुरुंग याची ही परिणती आहे. एस.के. बेलवणकर व गुरुदेव रानडे यांच्या मते चार्वाकांच्या तत्त्वज्ञानाचे दुर्दैव हे की, त्यांचा प्रमाण अर्थ सांगणारा एकही ग्रंथ आज नाही... त्यामुळे त्यांचा अभ्यास त्यांच्या टीकाकारांच्या ग्रंथांच्या आधारेच करावा लागतो. हे टीकाकार त्यांचा विचार विधायकरीत्या व सहानुभुतिपूर्वक मांडणार नाहीत हे उघड आहे. जेवढी निंदा करता येईल आणि जेवढी नालस्ती करता येईल तेवढी करूनच त्यांनी ही चर्चा केली आहे. माधवाचार्यांचे असे उदाहरण याआधी नोंदवले आहेच. 

...शिवाय वेगवेगळ्या धार्मिक परंपरा चार्वाकमताचे खंडन त्यांच्या पद्धतीने भिन्न-भिन्न संदर्भात करत होत्याच... त्यामुळे टीकाकारांची टीका एकत्र केली तरी चार्वाक मात्र पूर्णपणे व संघटितरीत्या सापडत नाही. माधवाचार्याने ते विस्ताराने दिले असले तरी त्याची दृष्टी नकाराची व टीकाकाराची आहे... त्यामुळे या मताचा अनुभव या आद्य ज्ञानपरंपरेशी संबंध जोडायला आपल्यालाच पुढे धजावे लागते. 

यातली विसंगती ही की, असे पुढे येतानाही आपल्याला माधवाचार्यांचाच आधार घ्यावा लागतो... कारण त्याने टीकेच्या हेतूने का होईना... पण लोकायताची बरीचशी सरळ मांडणी केली आहे. ते म्हणतात, ‘लोकायितकांच्या मते इंद्रियगोचर ज्ञानच तेवढे खरे असते. त्याखेरीज येणारे ज्ञान हे लोकायतिकांच्या मते मिथ्या असते.’ 

जगात देव नाही, आत्मा नाही; पूर्वजन्म, पूनर्जन्म, मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग वा नरक यांतले काहीही खरे नाही. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नसते. स्वाभाविकच लोकायतिक धर्म नाकारतात आणि धर्माने निर्माण केलेल्या सर्व नैतिक वा अन्य परंपराही नाकारतात. इंद्रियांना सुख देणारी बाबच त्यांना पुण्यमय व नीतीची वाटते. माधवाचार्यांचे मत अनेक आधुनिक विचारवंतांना व प्रस्थापितांनाही मान्य होणारे आहे. त्या वर्गांना मूल्ये कळत नाहीत आणि जे केवळ इंद्रियसुखातच सारा आनंद मानतात... ती खालच्या समजुतीची माणसेच धर्माच्या  तिरस्काराचा विषय असल्यानेही असे होते. वास्तववादापासून दूर असणारे आणि आपल्या समजुतीप्रमाणे उच्च कोषात वावरणारे ज्ञानी जनही असेच मानतात.

काही अभ्यासकांच्या व तत्त्वचिंतकांच्या मते लोकायत विचार ही भारतीय समाजातील अस्वस्थतेच्या काळाची निर्मिती आहे. इ.स.पूर्व 600च्या सुमारास बौद्ध व जैन धर्मांच्या झालेल्या स्थापनेमुळे व त्यांच्या शिकवणीमुळे समाजातील जुन्या श्रद्धांना तडे गेले. बौद्ध धर्म ईश्वर नाकारतो, स्वर्ग व मृत्यूही नाकारतो, मृत्यूनंतरचे जीवनही नाकारतो. त्याचा परिणाम समाजातील एका मोठ्या वर्गाला कल्पनांचे स्वातंत्र्य देणारा व श्रद्धामुक्त करणारा ठरला. त्यात श्रद्धा व जुनी मूल्ये हरवली. 

माणूस इंद्रियांच्या सुखांमागे लागला व त्याचेच पुढे विचारात रूपांतर होऊन लोकायत तयार झाले. काहींच्या मते लोकायत विचार भारतीय नसून परकीय होता. दासगुप्तांच्या मते तो सुमेरिअन संस्कृतीतून इथे आला. याउलट काही विचारवंत लोकायत मत हे विखुरलेल्या समाजाला पुन्हा काहीसे संघटित करण्यासाठी व त्याला पुन्हा जुन्या मूल्यात अडकवण्यासाठी निर्माण झाले. परंपरा, वेदांवरील विश्वास व रुढींच्या मजबुतीसाठी हे झाले. असे मानणाऱ्यांत डॉ. राधाकृष्णन यांचा समावेश आहे. 

तात्पर्य, समाजाच्या विचलित व परिवर्तनाच्या काळाने ज्या गोष्टी वा विचार जन्माला घातले त्यांत लोकायतचा समावेश होता. ही अस्थिर मनोवृत्ती व काळाची निर्मिती आहे. भारताच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत सर्वाधिक उत्पात हुणांनी केला. तो गुप्तांनंतरचा (455 ते 567) आहे... मात्र या काळाने चार्वाक विचारांना प्रोत्साहन दिले नाही. जन्म देणे तर दूरच राहिले. जो विचार वेदपूर्व असेल तो हुणोत्तर कसा होईल? 

दासगुप्तांनी लोकायतिकांना असूरही मानले व तसे मानताना त्यांनी छांदोग्य उपनिषदाचा आधार घेतला हा यातला आश्चर्याचा भाग. हे उपनिषद आत्मा व शरीर हे एकच असल्याचे मानते... त्यामुळे मृत शरीराला सजवून व शृंगारून त्याच्यासोबत त्याच्या आवडीच्या वस्तू जमिनीत पुरायला सांगते. शरीर व आत्मा यांची एकात्मता सांगण्याच्या छांदोग्याच्या बळावर त्यांनी लोकायतिकांना असूर मानले व प्राचीन असुरियन संस्कृतीत मृत देहाला मूठमाती देण्याची व त्याच्या आवडत्या वस्तू त्याच्यासोबत पुरण्याची प्रथा होती. 

नंतरचे व त्याआधीचे संशोधनही दासगुप्तांचा हा सिद्धान्त अमान्य करतात. ट्युशीसारखे तत्त्वचिंतक व अनेक भारतीय विचारवंत लोकायत ही भारतीय चिंतनपरंपरा असल्याचे मान्य करतात. तिची निर्मिती अतिप्राचीन... अगदी वेदपूर्व असल्याचेही सांगतात. वेदांच्या अगोदरही अनुभवज्ञान होते व तीच लोकायताची मांडणी असेल तर ती भारताबाहेरची ठरवता येणार नाही.  मानली तर मग तीच जागतिक होते.

ट्युशीच्या मते धर्म व अर्थ यांतील संघर्षातून अर्थकारणी वर्गाने धर्म व धर्मगुरू यांच्याविरुद्ध बंड  पुकारले. त्यांतून धर्मवाद्यांनी त्यांना चंगळवादी व अनीतिमान ठरवण्याचा चंग बांधला. या संघर्षाची परिणती पुढे माधवाचार्यांच्या चार्वाकांवरील टीकेत झाली. त्याआधीही डॉ.शास्त्रींसारख्या अभ्यासकांनी लोकायतचा संबंध बृहस्पतिसूत्राशी आणि जैन गुरू गुणरत्नासारख्यांच्या लेखनाशी आणि बौद्धांच्या सहजयानाशी व  हिंदूमधील कापालिकांच्या देहभोगाशी जोडला. 

या मतानुसार देह हाच सर्वस्व असून जीव, आत्मा या भ्रामक गोष्टी आहेत. देहाला सुखी करण्याचा मार्ग यासाठी स्त्री-पुरुष समागमाचा मार्ग त्यांनी सांगितला. या समागमसुखाचा काळ वाढवणे हाच खरा देहधर्म असल्याचे म्हटले. (आचार्य रजनीशांचा ‘संभोगातून समाधीकडे’ हा विचार इथे अनेकांना आठवावा.) तथापि या संशोधकांनी माधवाचार्यांना खोडून काढण्याचे सामर्थ्य मात्र दाखवले नाही.

धर्मकारण आणि अर्थकारण यांच्यातील तेढ प्राचीन आहे व ती आजही टिकून आहे. राजकारणातल्या काही विचारसरणीच त्यावर उभ्या आहेत. माधवाचार्यांचा ज्ञानाधिकार मानला जाण्याचे एक अप्रस्तुत कारण आणखी हेही होते. ते केवळ धर्माचार्य नव्हते. राजकरणाचेही धुरंधर होते. ते व त्यांचे बंधू सायणाचार्य यांनी विजयानगरच्या साम्राज्याच्या संस्थापनात राजगृहासोबत सहभाग घेतला होता. नंतर ते त्या साम्राज्याचे मुख्य प्रधानही झाले. (इथे आपल्या सगळ्याच प्रमुख आचार्यांविषयीची नोंद करण्याजोगी आहे. पाणिनी हा राजा नंद तर पतंजली हा पुष्यमित्र शुंगाचा प्रधानमंत्री होता.) 

राजसत्ता, धर्मसत्ता व ज्ञानसत्ता या तिन्हींवर त्यांची मालकी होती. बहुजन समाज विद्येपासून दूर होता आणि राजसत्तेला ज्ञानसत्तेचा व धर्मसत्तेचा आधार महत्त्वाचा वाटत होता. माधवाचार्यांचा यातील अधिकार व अनाधिकार एवढा मोठा की, त्याने चार्वाकांची मांडणी करताना त्यांच्या मुखात बृहदारण्यकातलेही त्याला अनुकूल वाटणारे श्लोक घातले.

माधवाचार्यांच्या प्रभावामुळेच काही विचारवंतांनी चार्वाकांना तर्क मान्य नसल्याचे त्यांच्या लेखनात आणले. वास्तव हे की, तर्काखेरीज कोणताही विचार पुढे जात नाही आणि तर्कावाचून विचार संभवतही नाही. जे प्रत्यक्ष दिसले तेच प्रमाण, अनुमान हे प्रमाण नाही व तर्कही प्रमाण नाही हे माधवाचार्यांचे लोकयताविषयीचे म्हणणे कमालीचेच तर्कदुष्ट आहे. 

माधवाचार्यांनी चार्वाकांच्या कुचेष्टेचा प्रयत्न कोणत्या पातळीवर जाऊन केला याचा एक नमुना इथे नोंदवण्याजोगा. चार्वाक अनुभव व प्रत्यक्ष किंवा अनुभावाधारित प्रत्यक्ष यांना प्रमाण मानतात. शब्द हे त्यांचे प्रमाण तत्त्व नव्हते. इंद्रियगोचर जग हेच त्यांच्या मते सत्य होते. यावर टीका करताना माधवाचार्य म्हणतात, ‘चार्वाकांच्या घरात ते जोवर दिसतात तोवरच त्यांची पत्नी सधवा असते... कारण पती इंद्रियगोचर आहे. चार्वाक बाहेर गेले व घरात दिसेनासे झाले की त्याची पत्नी विधवा होते... कारण तिचे तसे असणेच केवळ इंद्रियगोचर असते. 

एखाद्या विचारपरंपरेची कुचाळी कोणत्या पातळीवरून करावी याचा मध्ययुगातही धरबंध नव्हता याचा हा पुरावा आहे. चार्वाकांना प्रत्यक्ष व अनुभवासोबतच त्यावर आधारित अनुमान वा तर्कही प्रमाण होता... परंतुमाधवाचार्यांनी या अनुमानाला वेगळे करून त्यांचा राजकीय तर्क चालवला. हाच त्यांच्या लेखनप्रमादाचा प्रत्यय आहे.

बौद्ध ग्रंथांनी लोकायताला वितंड व वाद ठरवले. त्यांच्या मते चार्वाक हे विचारभंग करणारे व विचारांचे विनाशक आहेत. हे दासगुप्तांचेही मत. तर नवव्या शतकातील जयंत भट्टांनी म्हटले, ‘बौद्धांनी वितंड व वाद ही एकच गोष्ट आहे...’ असे म्हटले... शिवाय पाली ग्रंथांच्या प्रतिपादनातून याविषयीचा गोंधळच अधिक पुढे येतो. सबब या साऱ्यांच्या मागे जाऊन चार्वाकांचा वेध घ्यावा लागतो. 

शुक्रनीतिसाराने नास्तिकांना (चार्वाकांना) विज्ञान, कला व तर्क यांत पारंगत मानले आहे. कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रात चार्वाकांना सांख्य व योग यांसोबतचे मानून त्याला तर्काचे विज्ञान (अन्विक्षकी) म्हटले आहे. तर्क करणे हे मानवी बुद्धीच्या वाट्याला अपरिहार्यपणे येणारे कर्तव्य आहे. तो व्यक्तीचा स्वभाव आणि विचारांचा मार्ग आहे... मात्र श्रद्धावानांना तर्क अमान्य करणे भाग आहे. तसा तो माधवाचार्यांपासून नंतरच्या व काही अगोदरच्या वेदान्त्यांनीही अमान्य केला आहे. श्रद्धाशीलांना व वेदान्त्यांना तर्क चालतो... मात्र त्यांची अट ही की, तर्क हा नेहमी वेदानुकूलच असला पाहिजे. तो श्रद्धा, परंपरा, धर्म आणि वेद यांना विरोध करणारा नसावा. 

या श्रद्धावाद्यांपैकी काहींची मजल तर इथवर गेली की, त्यांच्या मते तर्काच्या आधारे उद्या स्वर्ग नर्क, पुर्वजन्म, पुनर्जन्म आणि ईश्वर असिद्ध ठरला तर सारी समाजव्यवस्था व समाजजीवन उद्धवस्त होईल. समाजाच्या ऐक्यासाठी, त्याच्या समाधानी जीवनासाठी या श्रद्धा आवश्यकच नव्हेत तर निष्ठारूप आहेत. त्यांनीच जीवनाला जीवनाचे रूप दिले आहे. त्या श्रद्धा केवळ साध्या खऱ्या नाहीत तर मूर्तिमंत सत्यस्वरूप आहेत. लोकायतिक तर्काच्या आधारे पुराव्यांची मागणी करून या स्वयंसिद्ध गोष्टी उद्या नाकारू लागलो तर जनजीवनाची स्थितीच बिघडेल.

यज्ञात बळी दिल्याने बोकड सरळ स्वर्गात जातो ही श्रद्धा आहे आणि यज्ञ हा वैदिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे... पण लोकायतिक विचार की, ‘बोकडाचा बळी दिल्याने तो स्वर्गात जात असेल तर त्याऐवजी आपल्या बापालाच किंवा आप्तालाच बळी का द्यायचे नाही?’ चार्वाकांचा प्रश्न तर्कशुद्ध असला तर श्रद्धा मोडीत काढणारा व यज्ञसंस्था संपवणारा आहे. या श्रद्धेवर आधारलेल्या संस्था उद्या नाहीशा झाल्या तर त्यावर ज्यांची उपजीविका व लौकिक सुखे अवलंबून आहेत. त्यांचे व त्यांच्या वर्गांचे काय होईल?  पुरोहित, पुजारी, यज्ञकर्ते, ऋत्विज आणि त्यावर ज्यांचे जगणे चालले आहे ते कुठे जातील? त्याचमुळे मनूने व मेधातिथीने या त्याच्या प्रमुख भाष्यकारानेही तर्क विनाशकारी ठरवला.

तर्क संपला की विचार संपतो आणि विचार थांबला की मानवी प्रगती थांबते. जीवनात स्थितिवाद येतो. त्यालाच स्थैर्य मानून जगणारे आजचे प्रस्थापित सुरक्षित होतात. त्यांचा दरारा कायम राहतो. तो तसा राहायचा तर तर्क नको आणि तो असलाच तर तो श्रद्धेला व वेदांना अनुकूल पाहिजे अशी ही मांडणी आहे. 

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Part 5 Load More Tags

Comments:

anjani Kher

१. सुमेरिअन आणि असुरिअन एकाच आहेत का ? कारण एकदा सुमेरिअन आणि पुढे असुरिअन अस त्याच लोकायतांसाठी म्हंटल आहे आहे. २. वितंडचा शब्दशः अर्थ काय ? संस्कृतचा अभ्यास नसलेल्यांना वितंडवाद हा जोडशब्दच परिचित आहे.

Add Comment