सामान्य माणसे बहुधा असल्या विचारांची कास न धरता मतांच्या व अनेकदा लहरींच्या मागे जातात. तसे जाताना धर्म सोयीचा असेल तर ती त्यांनी नकळत धरलेली धर्माचीही कास होते... पण त्यांचे मन धर्माच्या निकषांविरुद्ध जात असेल तर ते धर्म बाजूला सारून आपल्या मतानुसारच वागत असतात. या गोष्टीला अपवाद फक्त धर्माच्या बाबतीत कर्मठ मतवाल्यांचाच असतो... पण ती माणसे नेहमी अल्पमतात असतात. सामान्यांना धर्म सोयीचा असला तरी ठीक नसला तर त्यावाचूनही ठीकच. त्यांच्या मनात सदैव पापपुण्याचा वा ईश्वरधर्माचा विचार नसतो. आजचा दिवस, त्याची गरज आणि आपली उपयुक्तता याच बाबी त्यांच्या मते त्यांच्या वागणुकीची व निर्णयाची दिशा ठरवणाऱ्या असतात.
वास्तव हे की, ही माणसेच बहुसंख्य असतात... पण तत्त्वचिंतकांपैकी कोणीही त्यांचा विचार गंभीरपणे करत नाहीत. सगळे समाज असेच. त्यांतील बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार वागतात असेच त्याही क्षेत्रात समजले जाते. राजसत्ता, हुकूमशाही, लष्करी सत्ता व मध्ययुगातील धर्मसत्ता यांचाच त्याला काय तो अपवाद... त्यामुळे या वर्गाचा विचार स्वतंत्रपणे केल्याखेरीज कोणतीही सामाजिक चर्चा पूर्ण होत नाही. तीत करणाऱ्या विचारसरणी फक्त वैचारिक राहतात, सामाजिक होत नाहीत.
आपल्या अनेक विचारसरणी व धर्मदर्शने समाजातील मोठ्या वर्गाच्या जीवनाला स्पर्श करत नाही याचे एक कारण हेच आहे. विचारांचे मार्ग, धर्माचे रस्ते आणि माणसांच्या वाटा अशा वेगळ्या असण्याचे कारण विचारातून माणूसच वजा होत असतो काय? विचार माणसांचा, तत्त्वे माणसांसाठी आणि धर्म हे समाजासाठी... पण मग त्यांचे हे वेगळेपण त्यांच्यातील नाते दुबळे असल्याचे वा संपत चालले असल्याचे सांगणारे आहे काय?
सॉक्रेटीस हा असामान्य बुद्धिमत्तेचा तत्त्वज्ञ होता. गांधीजींनी त्याला जगातला पहिला सत्याग्रही म्हटले. त्याच्या ज्ञानाएवढेच त्याच्या पत्नीचे, झांटिपीचे अज्ञान व कजागपण जगप्रसिद्ध आहे. ही झांटिपी सॉक्रेटीसहून 25 ते 30 वर्षांनी लहान होती. वयांतले हे अंतर त्या ज्ञानी माणसाला तिचे कजागपण लक्षात आणून देणारे नव्हते काय? ग्रीक नगरराज्ये आकाराने लहान असत, त्यांची लोकसंख्याही दीड ते दोन लाखांहून अधिक नसे. ती वाढू नये म्हणून त्यात पुरुष उशिरा लग्न करत. अविवाहित असताना त्यांना समलिंगी संबंध ठेवता येत असत. सॉक्रेटीसही याला अपवाद नव्हता. त्याची पत्नीविषयीची वृत्ती त्याच्या ज्ञानी असण्याला बाधित करत नव्हती काय?
ॲरिस्टॉटलने चारशेंहून अधिक विषयांवरचे मूळ ग्रंथ लिहिले. त्याच्या अगाढ ज्ञानाचा दरारा एवढा की, त्याची चूक दाखवायला पुढली सतराशे वर्षे कोणी पुढे आले नाही... पण हा ॲरिस्टॉटल गुलामगिरीचे समर्थन करत होता. गुलामांना आत्मा नसतो असेच तो म्हणायचा. त्याचे हे अमानुषपण त्याचा ज्ञानाधिकार अपुरा ठरवत नाही काय? की हा सारा त्या काळाचा परिणाम समजून त्यांचे अभ्यासू व ज्ञानी असणे त्यांच्या माणूस असण्याहून वेगळे मानायचे?
भारतातील शंकराचार्यांसारखे तत्त्वज्ञ व धर्मज्ञ अद्वैताच्या, मनुष्यमात्राच्या व जडवस्तूंच्या एकात्मतेचा विचार सांगत... पण त्याने अस्पृश्यतेकडे, विषमतेकडे व त्यांतील अन्यायाकडे दुर्लक्ष का केले? त्यांच्याअगोदर झालेल्या ऋषी-मुनींनीही समाजातील विषमता व तिच्यातील अन्याय याकडे दुर्लक्ष का केले? की ते त्यांनी क्षम्यच मानले?
फार दूर न जाता अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या व विचारांच्या क्षेत्रात मोठे नाव मिळवलेल्या माणसांचाही विचार इथे केला पाहिजे. बेंजामीन फ्रँकलीन, जॉर्ज वॉशिंग्टन, अलेक्झांडर हॅमिल्टन व थॉमस जेफरसन यांच्यासारखे थोर नेते अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडशी लढले व स्वातंत्र्याचे मानकरी ठरले... पण त्यांच्यातला प्रत्येकच जण अफ्रिकेतून पकडून आणलेल्या काळ्या माणसांची गुलाम म्हणून खरेदीविक्री करणारा व्यापारीही होता.
अमेरिकन माणसांच्या स्वातंत्र्याएवढेच अफ्रिकेतील काळ्या माणसांचे स्वातंत्र्य त्यांना महत्त्वाचे का वाटले नाही? अब्राहम लिंकनने एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला गुलामगिरी नष्ट करणारे कायदे करीपर्यंत त्या स्वतंत्र देशात गुलाम होतेच. भारतातही इंग्रजांनी गुलामगिरी नष्ट करणारे कायदे केल्यानंतर या देशातील गुलामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला संपली. यातला खरा प्रश्न विचार करणाऱ्यांनी विचारांचे पालन करायचे नसते काय हा आहे.
हिंदू धर्मशास्त्र म्हणते, ‘सारी सजीव व जडसृष्टी ब्रह्मापासून निर्माण होते. इस्लामच्या मते सारी माणसे एका अल्लाची संतती आहे. ख्रिश्चनांचा धर्मही होली घोस्टपासून माणसांची निर्मिती सांगतो... मात्र या सर्व धर्मांचे वागणे त्या शिकवणीविरुद्ध जाणारे राहिले आहे असे का? यातील न समजणारी गोष्ट विचार करणाऱ्या तत्त्वज्ञांची आहे. त्यांचा विचार समाजाचा का होत नाही? ज्यांच्या लाभासाठी त्यांनी तो केला ती माणसे तो विचार का स्वीकारत नाही? विचार स्वीकारायला लावण्यासाठी ईश्वर लागत असतो काय? माणसांचे मन सारे सत्य त्याच्या मूळ स्वरूपात समजून घेण्याएवढे मोठे का होत नाही? ईश्वराच्या व धर्माच्या कुबड्या त्यांना का सोडवत नाहीत? विचारांहून श्रद्धांची बळकटी सांगणारी ही बाब आहे की विचार व तत्त्वज्ञान बहुसंख्य माणसांना समजले तरी ते त्यांना आपले वाटत नाही हे आहे? विचारांचे हे दुबळेपण जाऊन ते समाजात जुन्या श्रद्धांएवढे जोवर रुजत नाही तोवर विचार व तत्त्वज्ञान अधांतरीच राहील काय? गेल्या दीडशे वर्षांत ही स्थिती बदलताना दिसली. काही प्रमाणात ती बदललीही... पण तिला पुरते बदलायला आणखी किती शतके लागतील?
आजही शाळा-कॉलेजांत जुनेच धर्म, त्यांतले श्रद्धा मजबूत करणारे विचार व जुनाट परंपरांना बळकटी देणारे आंधळेपण का शिकवले जाते? किमान त्यांतील अनिष्ट बाजू वजा का केल्या जात नाहीत? जगातील एकशे पंधरा कोटी लोकांनी ते सेक्युलर असल्याचे आता म्हटले आहे... पण जगाची लोकसंख्या नऊशे कोटींहून अधिक आहे. धर्मांनी व त्यांच्या परंपरांनी आधुनिक मूल्यांचा संस्कार केला तर तो कोणी अमान्य करणार नाही... मात्र त्यांच्यात लवकर सुधारणा व परिवर्तन होत नाही. माणसे बदलतात पण ग्रंथ तसेच राहतात आणि ग्रंथांच्या आधारे जगणाऱ्यांना त्यांचे माहात्म्य टिकवायचे असते. त्या ग्रंथांचे जुनेपण त्यांचे माहात्म्यही वाढवत असते... त्यामुळे अशा स्थितीत न्याय, स्वातंत्र्य व समता यांसारख्या मूल्यांसाठी क्रांतीची वा मोठ्या परिवर्तनाच्या स्वीकाराची तयारी करावी लागते काय?
तशी तयारी आजवर अनेकांनी केली. त्यांत त्यांना काहीसे यशही आले... पण संपूर्ण यश यायचे तर त्यासाठी फार मोठ्या तयारीची व तीही स्वतःमधील तयारीची गरज असते. नाहीतर सॉक्रेटीस त्यांच्या जागी मोठे राहतील आणि झांटिपी कजागच म्हटली जाईल. तसे सुधारक व प्रबोधनकार आजही दूर ठेवले जातात. वाळीत टाकले जातात. महाराष्ट्र व कर्नाटक यांसारख्या प्रगत राज्यांत ते मारलेही जातात. धर्मांच्या लहानसहान लढाया आजही चालू आहेत. वर्णांचे वेगळेपण व त्यांतील अन्याय आजही शाबूत आहेत. स्त्रियांचे दुय्यम असणे हा तर साऱ्यांचा आजही धर्मविषय आहे. हे बदलायचे तर समाजाएवढेच माणसांना व स्त्रियांनाही बदलावे लागणार आहे. हा बदल वर्तनाचाच केवळ नाही तर मनाचाही असावा लागणार.
विचारांनी माणसे पुढे जातात, विचारांनीच ती बदलतात... मात्र विचार ही व्यक्तीची निर्मिती आहे. तो समूहाच्या वा संघटनेच्या उत्पादनाचा भाग नाही. धर्म हे संघटन आहे. आदिवासींचे समुदाय, लष्करातील पथके व एकत्र येऊन गर्दी करणारे लोक विचार करत नाहीत. धर्मांनी विचारांना अनुमती दिली... पण विचार धर्मानुसारच केला पाहिजे असे बंधन त्यावर घातले. परिणामी धर्म विचारी झाले नाहीत, श्रद्धेचे समुदाय झाले. ते पुढे गेले नाहीत, स्थिर झाले. विचार करणारी व विशेषतः स्वतंत्र विचार करणारी माणसे धर्मात किंवा गर्दीत बसणारी नव्हती. ती समाजाच्या टीकेचा व तिरस्काराचा, हेटाळणीचा व टवाळीचा भाग झाली. त्यांच्यातल्या एखाद्याचा विचार समुदायाला लाभदायक वाटला तर त्याने त्याचे काही काळ नेतृत्वही स्वीकारले, त्याला मोठे मानले... पण मोठी माणसे मोठ्या संख्येने जन्माला येत नाहीत. समाजात विचारवंत, महात्मे, संशोधक यांचा वर्ग नेहमीच अल्पसंख्य राहत आला आहे.
एक प्रश्न आणखीही. चित्रकार, गायक व कलाकार नेहमीच वा सदैव त्यांच्या त्याच भूमिकेत जगतात की माणूस म्हणूनही त्यांना जगावे लागते? कलावंत व विचारवंत ही एक भूमिका आणि माणूस असणे ही दुसरी. ही दुसरी भूमिका नेहमीच दुय्यम राहत असते काय? सॉक्रेटीस चोवीस तासही तत्त्वज्ञ असतो काय? आईन्स्टाईन सदैव संशोधकाच्याच भूमिकेत राहिले काय? नेत्यांनाही त्यांचे सामान्य आयुष्य असते की नाही? हे आयुष्य त्यांची विचारशक्ती कधी दुबळी वा धुसर बनवते की नाही? विचारवंतांनी व ज्ञानवंतांनीही चुका केल्याच्या घटना इतिहासात आहेत.
अशा वेळी विचारांचा व तर्काचा प्रभाव कमी होत असेल वा त्याविषयी समाजाचा त्यांच्याविषयीचा अविश्वास वाढत असेल तर समाजाला दोष तरी किती द्यायचा? समाज नेहमीच चुकतो काय? आणि व्यक्ती वा विचारवंत नेहमीच बरोबर असतात काय? गांधी म्हणायचे सामान्य माणसे बहुधा सत्याच्या अधिक जवळ असतात आणि त्यांची दृष्टी कलावंतांसारखी वा संशोधकांसारखी एकाच गोष्टीवर स्थिरावली वा दीर्घ काळ टिकतही नसते. सामान्य माणसे सामान्यपणे सर्वच गोष्टी थोड्या प्रमाणात का होईना ध्यानात घेत असतात की नाही? दरवेळी ती स्वार्थीच असतात काय? त्यांच्यातही दया, माया व ममत्व यांसारखे गुण असतात की नाही?
...मात्र विचारवंतांच्या मर्यादांचा हा विषय लक्षात घेऊनही त्यांच्यामुळेच समाजाला पुढे जाता येते व मोठे होता येते ही गोष्ट अमान्य करता येत नाही. इतिहासात पुढे गेलेले व जागच्या जागी राहिलेले लोक केवळ डोळ्यांसमोर आणले तरी यातले सत्य प्रत्येकाला समजावे.
- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.
Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर श्रद्धा विज्ञान Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Belief Science Part 15 Load More Tags
Add Comment