आपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध 

चार्वाक लेखमालेचा भाग - 1

विचार - मग तो पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य, तत्त्वज्ञान - मग ते प्राचीन असो वा अर्वाचीन, राजकारण - मग ते स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय, या सर्वांच्या केंद्रांवर व परिघांवर मुशाफिरी करत राहिलेले फार थोडे लेखक आजच्या महाराष्ट्रात आहेत; त्यांतील एक नाव सुरेश द्वादशीवार. त्यांनी लिहिलेल्या 'मन्वंतर' व 'युगांतर' या दोन छोट्याच पण मर्मभेदी लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच साखळीतील तिसरी कडी म्हणावी अशी 'चार्वाक' ही लेखमाला 'कर्तव्य साधना' वरून प्रसिद्ध करत आहोत, 1 ते 16 मार्च या काळात रोज सायंकाळी. चार्वाक सर्वांनाच माहीत असतो, मात्र बहुतेकांना त्याचे तत्त्वज्ञान परिचित असते ते दोन चार वाक्यांपुरते! आणि तेही बहुतांश वेळा चुकीच्या वा विपर्यस्त स्वरूपात! अशा पार्श्वभूमीवर, चार्वाक विचार केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आणि काल- आज - उद्या असा तिहेरी दृष्टिक्षेप टाकणारी ही लेखमाला सुबोध आहे, पण तरीही वाचकाला जरा जास्तीचे कष्ट पडणार हे निश्चित! 
- संपादक

मानवी विकासाचा मार्ग श्रद्धा आणि तर्क यांच्या संघर्षातून जाणारा आहे. बुद्धी आणि मन, विचार आणि प्रचार, नवता आणि परंपरा यांच्यातील लढ्यातूनच एकविसावे शतक उगवले व आजच्या विकसित अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहे. परंपरा व श्रद्धा स्थितिवादी तर विचार व तर्क गतिवादी असतात. स्थितिवाद समाजाला एका जागी दीर्घकाळपर्यंत रोखून धरणारा असतो तर विचार ती बंदिस्त स्थिती मोडून काढणारा असतो. 

हा संघर्ष कायम चालणारा व समाजाला अखंडपणे अस्वस्थ करत राहणारा आहे. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आणि खरी. या संघर्षात उशिरा का होईना पण विचारच आजवर विजयी होत आला आहे. समाजाच्या विकासाची तऱ्हाच अशी की तो प्रथम स्थितीबाहेर एक नवे व स्वतंत्र पाऊल टाकतो. त्याभोवती संरक्षक व्यवस्था उभी होण्याची काही काळ वाट पाहतो. यशावकाश कधी शांतपणे तर कधी लढाऊपणे तो स्थितीबाहेर येऊन पुढे जातो. दरवेळी त्याचे पाऊल असे पुढे गेलेलेच इतिहासाने पाहिले आहे. 

कधीतरी परंपरा वरचढ होते आणि ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. ग्रीकांची अशी अडवणूक प्रथम रोमनांनी व नंतर ख्रिश्चन धर्माने, अरबांची इस्लामने तर भारताची वैदिक धर्माच्या परंपरांनी केली. या अडवणुकीतून प्रथम युरोप, नंतर भारत व चीन बाहेर पडले. अरब जगत या पुढाकारात अजून बरोबरीने सहभागी झाले नाही. स्थितिवादाच्या बाजूने धर्मसत्ता, आपल्या आयुधांनिशी उतरते तर परिवर्तनाची बाजू ज्ञान, विज्ञान, विचार व तर्क लढवत असते.  

जगातले सारे समाज सारखेच नाहीत. त्यांची स्थिती वा गतीही सारखी नाही. त्यामुळे येणारे परिवर्तन समाजपरत्वे वेगळे असते. काही समाज लवकर प्रगती पावतात तर काहींचा स्थितिवाद दीर्घकाळ टिकतो. जिथे श्रद्धा बळकट तिथे ही गती कमजोर तर जिथे विचार सामर्थ्यशाली असतो तिथे तीही बलशाली असते. मात्र, दोन्ही जागी संघर्ष अटळ आहेत. 

समाजाच्या प्रत्येक अवस्थेत काही ताकदवान वर्गांचे हितसंबंध दडलेले असतात. येणारे परिवर्तन त्यांच्या हितसंबंधांना बाधा आणत असते. मग ते वर्ग या परिवर्तनाला साऱ्या शक्तीनिशी विरोध करतात. परिवर्तनाच्या शक्ती त्या तुलनेत दुबळ्या असतात. शिवाय त्या बहुधा संघटितही नसतात. कारण परिवर्तनाची कळ अनेकदा एकेकट्या संशोधकाच्या, विज्ञानवाद्याच्या वा समाजाच्या पुरोगामी नेत्याच्या हाती असते. त्यांच्या मागे समाजाचा लहानसाच भाग असतो आणि धर्मसत्तेसह साऱ्या सत्ता त्यांना प्रतिकूल असतात. परिवर्तनाची लढाई त्यामुळेच दीर्घकाळ चालणारी व मंद गतीने पुढे जाणारी असते. मात्र, तिची दिशा विजयाचीच असते. 

युरोपात ही लढाई विज्ञानाने लवकर, 15 व्या शतकाच्या अखेरीस जिंकली व आपली वाटचाल गतिमान केली. आपण मात्र मागे राहिलो. चीनमध्ये व रशियात धर्म व धर्माच्या श्रद्धा - दोन्ही मार्क्सवाद्यांनी मोडून काढले. भारतात हे युद्ध संपले नाही. प्रसंगी धर्माचे संतही सुधारणांच्या बाजूचे झाले. पण, श्रद्धांची बळकटी कायम राहिली. आताचे राजकारण पुन्हा धर्माची मंदिरे बांधण्याच्या मागे लागले असल्याने तेथील विज्ञान बरेचसे पुस्तकात व काहीसे जीवनात राहील अशीच शक्यता मोठी आहे.

समाज व व्यक्ती या साऱ्यांच्या जीवनात दोन निष्ठा आपापल्या सामर्थ्यानिशी उभ्या असतात. एक जन्माधिष्ठित तर दुसरी मूल्याधिष्ठित. देश, धर्म, पंथ, जात यांच्या विषयीच्या निष्ठा जन्मदत्त व श्रद्धेवर आधारित तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, नीती व माणुसकी यांविषयीच्या निष्ठा मूल्यदत्त व विचारांवर आधारलेल्या असतात. 

समाज प्रगती करतो वा त्याचे प्रबोधन होते याचा अर्थ तो जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यदत्त निष्ठांकडे जातो. ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर सारे मध्ययुग जन्मदत्त निष्ठांच्या नियंत्रणात होते. आधुनिक जग त्या निष्ठा मागे टाकून मूल्यांच्या दिशेने जाऊ लागले आहे. भारतात या परिवर्तनाचा आरंभ एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला. राजा राममोहन रॉय त्यात अग्रस्थानी होते. महाराष्ट्रात या परिवर्तनाचा आरंभ याच सुमारास नव्याने इंग्रजी शिक्षण व मूल्ये आत्मसात करणाऱ्यांकडून झाला. त्यांचे सर्वांत लढाऊ नेते जोतिबा फुले तर त्याला देशव्यापी व सर्वस्पर्शी स्वरूप प्राप्त करून देणारे नेते म. गांधी हे होते. 

मध्ययुगापूर्वी धार्मिक सक्ती एवढी जबर की तो केवळ जुलमाचा भाग आहे, असे तो जुलूम भोगणाऱ्यांनाही वाटू नये. हे आपले प्राक्तन आहे, ते आपल्या पूर्वजन्माच्या संचितांचे फळ आहे, हे असेच अनुभवले तर कदाचित पुढला जन्म सुखाचा मिळेल, ही वैदिकांनी समाजात रूजवलेली आणि तशी मानसिकता निर्माण केलेली बाब होती. 

तिकडे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांच्या मते आताचे जीवन आहे तसे जगा. ईश्वराशी व त्याच्या प्रेषिताशी इमान राखा. मृत्यूनंतर कधीतरी कयामतचा दिवस येईल. त्या दिवशी तो अल्ला वा होली घोस्ट साऱ्यांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढील व त्यांचा न्याय करील. जे इमान राखत होते त्यांना स्वर्ग मिळेल, जे त्यात चुकले त्यांच्या नशिबात कायमचा नरक राहणार आहे ही श्रद्धा त्या दोन महान धर्मांनी आपल्या अनुयायांत रूजवली.

परिणामी, गरीब गरिबीत जगले आणि त्यामुळे धनवंतांची चैनही सुरक्षित झाली. मार्क्सने हा विचार वर्गांच्या संदर्भात श्रमिकांच्या बाजूने मांडला. घाम गाळणाऱ्या श्रमिकाला स्वतःचा विचार करण्याचे वा बुद्धी वापरण्याचे काम नसते. तशी गरजही नसते. कारण विचार करणारे, त्याच्या कामाचे, अवजारांचे व वेतनाचे निर्णय घेणारे व त्याचे नियोजन करणारे कुणीतरी वर बसलेले असतात. ते विचार करतात, नियोजन करतात, श्रमिकांनी त्याबरहुकूम नुसते काम करायचे असते. त्यातून विचार करणारा एक आणि नुसतेच राबणाऱ्यांचा दुसरा असे दोन वर्ग उभे होतात. त्यांच्यात संघर्ष वा वाद उभा होणार नाही याची काळजी धर्मासारख्या संस्था करतात. 

धर्मातही असे वर्ग असतात. एक विचार करणाऱ्यांचा व सांगणाऱ्यांचा वा लिहिणाऱ्यांचा. बाकीच्या साऱ्यांनी त्याबरहुकूम जगायचे तेवढे असते. त्या जगणाऱ्यांनी विचार करणाऱ्यांना प्रश्न विचारायचे नसतात वा त्यांच्या योजनेतील दोष सांगायचे नसतात. तसे करणारे मग पाखंडी वा धर्मद्रोही ठरवले जातात. म्हणून मालकाचा द्रोह नको आणि धर्माच्या आचार्यांचाही रोष नको, अशी मानसिकता घेऊन समाज जगत असतो. त्यातून धर्म माणसांवर स्वार होतो आणि राजे व सम्राट यांच्या सत्ताही मजबूत होतात.  

पहिला जेम्स म्हणायचा, राजा हा ईश्वराचा अंश आहे, त्याची आज्ञा ही प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा आहे. तिचा अनादर करणे हे पाप आहे. आपल्याकडील धर्मात अशाच कथा आहेत. पृथ्वीवर अत्याचार माजला तेव्हा ती गायीचे रूप घेऊन ईश्वराकडे गेली. तिला शांत करून तिच्यावर व्यवस्था निर्माण करण्यासाठी मनू नावाचा राजा पाठवण्याचे आश्वासन परमेश्वराने तिला दिले. तसा तो आला आणि त्याने समाजाला आपल्या नियंत्रणात बांधून टाकले.

साऱ्या गोष्टींप्रमाणे राज्यव्यवस्थाही ईश्वराने निर्माण केली ही श्रद्धा सार्वत्रिक आहे व तिला सर्व धर्मांची साथ आहे. रोमन सम्राट त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ईश्वर म्हणून सिनेटकडून मान्यता पावत व त्यांची मंदिरे उभारली जात. इस्लाममध्ये पैगंबर स्वतः ईश्वराचा प्रतिनिधी व राजा होतो. खलिफा हे त्याच्या पश्चात त्याची गादी सांभाळणारे आणि धर्मसत्तेवर व राजसत्तेवर ताबा ठेवणारे होते. जगभरचे मुस्लीम राजे त्यांच्याकडून खिलाफत, म्हणजे मान्यता मिळवत. 

ख्रिश्चनांमध्येही रोमची सत्ता सर्वमान्य होती व पोप तिचे प्रमुख होते. युरोपातील ख्रिश्चन राजे त्याची मान्यता घेत व त्यासाठी त्याला खंडणीही देत. पुढे त्यांच्यात वाद होऊन इंग्लंडसारख्या देशांनी आपली चर्चेस वेगळी केली. तर जर्मनीने व फ्रान्सने स्वतःच पोपच्या गाद्या स्थापन केल्या. सध्या जगात पोप एक आहे व तो ख्रिश्चन धर्माचा प्रमुख आहे. कॅथलीक पंथ व त्याच्या श्रद्धावंतांची निष्ठा, पोप कधी चूक करत नाही अशी आहे.

धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्यांच्या ताब्यात ते समाजाचे स्वामी झाले तर यातले काहीही हाती नसणारे आणि यांच्या चैनीसाठी श्रम करणारे चाकर झाले ही समाजाची अशी विभागणी कशी झाली? रानटी अवस्थेत समाज शिकार व अरण्यातले अन्न मिळवण्यासाठी धडपडणारा व काम करणारा होता. त्यात कोणी मालक वा कोणी चाकर नव्हते. त्यात समाजाच्या, टोळीच्या नेत्याचा सहभाग होता. पण त्यांचे नेतेपण केवळ शक्तीच्या वा बळाच्या जोरावर उभे होते. पण राबणाऱ्या इतरांसोबत तोही राबत होता. 

ही अवस्था मार्क्सच्या मते अप्रगत समाजातील साम्यवादाची होती. मात्र मार्क्स म्हणतो तसा हा समाजही समानतेवर उभा नव्हता. त्यात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते. त्यातल्या शक्तिशाली स्त्रियाच तेवढ्या स्वतंत्र होत्या. टोळीतही बलवान, दुबळे, तरुण, वृद्ध अशी विभागणी होती. एक गोष्ट खरी, ही विभागणी नैसर्गिक व समाजाच्या संदर्भात स्वाभाविक होती. तीत आर्थिक, धार्मिक, राजकीय वा वैचारिक विभागणी नव्हती. ही नैसर्गिक विभागणी समाजाच्या पशुपालनाच्या काळातही तशीच राहिली. तीत बदल झाला तो समाज कृषिप्रधानतेकडे वळला तेव्हा. 

ही अवस्था येण्यापूर्वी सारीच माणसे निसर्गावर अवलंबून व त्यावर श्रम करून उपजीविका मिळवणारी होती. त्याआधी निसर्ग, वन, वनस्पती इत्यादींची निगा हीदेखील त्याचीच जबाबदारी होती. नंतरचे शिकारी जसे एकाच वेळी पाच-पाच अन्‌ दहा-दहा वाघ मारत तसे तेव्हा घडत नव्हते. आजच्या वाघासारखे व सिंहासारखे आपले पोट भरेल एवढ्याच शिकारी करणारे होते. या माणसांची अवस्था देखील शिकार व मिळालेले अन्न साठवण्याएवढी मर्यादित होती आणि त्यांच्या अन्न मिळवण्याच्या मोहिमेतही सारेच सहभागी होत असत. त्यात स्त्रियाही असत. काहीजण राबत आहेत आणि घरचे बसून खाताहेत अशी अवस्था नव्हती. ही अवस्था म्हटले तर समतेची व समाधानाची पण कमालीची अप्रगत होती.

कृषीचा शोध माणसांची वर्गवारी करणारा ठरला. कारण शेतीला जास्तीचे श्रम करण्यासाठी माणसे लागू लागली. जमिनीची आवश्यकता भासली, मशागत, बी-बियाण्यांची निवड करणारे व प्रत्यक्ष शेतीत राबणारे लोक लागू लागले. त्याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारा शेतमालक लागू लागला. जमीन जेवढी मोठी तेवढे जास्तीचे मजूर लागू लागले आणि मालक जास्त धनवंत होऊ लागले. 

मार्क्स म्हणाला, मालकी हक्काची भावना प्रथम स्त्रीविषयीच्या मालकीतून येते. मात्र, इतिहास त्याहून तिची वेगळी कारणे सांगतो. श्रमाची गरज, शेतीसाठी राबणाऱ्यांची गरज, ती राखणाऱ्यांची आवश्यकता आणि पुढे तिच्या रक्षणासाठी माणसे (सैन्य) ठेवण्याची गरज निर्माण झाली. या कर्मठ संस्कृतीने मग धर्म तयार केले, जाती निर्माण केल्या, श्रमविभागणीतून समाजाचे वेगवेगळे थर निर्माण झाले आणि संघटित व एकजिनसी असणारा समाज अनेक बाजू व अनेक कडा असणारा समाज तयार झाला. याचसोबत कामाच्या स्वरूपात वर्ग, जाती, पंथ निर्माण झाले. ज्यांच्या वाट्याला घाणेरडी कामे आली ते लोक अस्पृश्य ठरले व कालांतराने गावाबाहेर गेले. 

अमेरिकेतदेखील डाऊन टाऊन नावाची गरीब वस्ती असते. कृष्णवर्णीयांच्या वस्त्या वेगळ्या असतात. भारतात धर्मवार, जातवार मोहल्ले उभे झाले. मध्ययुग गेले. वर्तमान आले तरीही वर्गीय व जातीय मानसिकता अजून तशीच राहिली आहे. दुर्दैव याचे की या वेगळेपणात दुरावा, तेढ व वैरे आली. उच्च-नीच अशी विषमता आली. या विषमतेला मान्यता देणारे व त्यातील अन्यायावर पांघरूण घालणारे धर्म आले. या धर्मांनी कनिष्ठ वर्गांना मागल्या जन्मातील संचितांचे कारण सांगून व पुढल्या जन्माचे आमिष दाखवून शांत केले. परिणामी, वर्ग स्थिर झाले. धनवंतांचे ऐश्वर्य सुरक्षित व श्रम करणाऱ्यांच्या प्राक्तनातले श्रम कायम झाले.

श्रम करणाऱ्यांचीही एक मानसिकता असते. उत्पन्नाची साधने, (जमीन व स्त्रीही) अवजारे यांत ते गुंतले व त्यांचीच पूजा व आराधना करू लागले. भूमीची पूजा, शेतीच्या अवजारांची, उत्पन्नाच्या साधनाची पूजा त्यातून आली. त्यातून त्यांची दैवतेही (विश्वकर्मा) आली. धनवंत लक्ष्मीची पूजा करू लागले. 

याच वेळी एक गोष्ट आणखीही झाली. श्रमिकांच्या या मानसिकतेचे वर्णन मार्क्सने फार विस्ताराने केले आहे. अवजारांशी मैत्री व त्यांचा सहवास हा त्यांच्या जीवनाचा अंगभूत भाग झाला. अवजारे अधिक परिणामकारक कशी होतील, त्यातून उत्पादन कसे वाढेल व त्यातून मालकांची धनसत्ता कशी मोठी होईल हाच त्यांचा धर्मविचार होतो. 

श्रम हाच धर्म व मालक हाच त्यांचा संयोजक व नियंत्रक झाला. तो विक्रेता व लाभार्थीही होता. श्रमिकाला भक्ताची मानसिकता लाभते व मालकच त्याचा देव होतो. त्याने दिलेली चिरीमिरीही त्याला देणगीसारखी मोठी वाटू लागते. मालकाचे दान हाच आशीर्वाद आणि त्याची भक्ती ही स्थिती लाभाची ठरते. ती स्थिती बळकट करण्याची साधनेही मग ते शोधतात अधिक श्रम करणाऱ्यांना बक्षिसे देणे, कमी करणाऱ्यांना धाकदपटशा दाखवणे असे प्रकार यांतून होतात. अमेरिकेत तर एकेकाळी गुलामांना ठार मारणे हा गुन्हाही मानला जात नसे हे इथे लक्षात घ्यायचे.

ज्या देशात गुलामगिरी नव्हती तेथील मालक-मजुरांचे संबंधही समानतेचे नव्हते. त्यात विषमता होती, जुलूम होता. प्रसंगी थोडीशी दाखवायला दयाबुद्धी होती. या दयेचे कारणही श्रमिकाने त्याचे काम इमानदारीने करावे हेच होते. मार्क्स म्हणाला, मालक श्रमिकाला मजुरी देतो ती त्याचा जीव व देह एकत्र राहावा आणि त्याने दुसऱ्या दिवशीही कामावर यावे यासाठी. 

समाजातील ही वर्गीय विषमता कमालीची जुलमी होती व तिला धर्म आणि राज्य यांचे संरक्षणही होते. सामान्य माणूस निराधार होता. त्याच्याजवळ धर्म नव्हता, सत्ता नव्हती, पैसा नव्हता अशा माणसांजवळ जे असू शकते तेच आणि तेवढेच त्याच्याजवळ होते. कधी तरी, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आपल्या वाट्याला चांगले दिवस येतील ही श्रद्धा फसवी आणि त्याला जगवणारी होती.

श्रमिकांना दुसऱ्यांनी केलेले नियोजन, त्यांचा उत्पादनविषयक विचार अंगवळणी पडला. परिणामी विचार करणारे वेगळे आणि श्रम करणारे वेगळे झाले. जे विचार करतात, धार्मिक व तसली कामे करतात ते श्रममुक्त झाले आणि त्यांच्या विचारानुसार काम करणारे श्रमाचे बंधक झाले. यातून समाजाची एक आर्थिक वर्गवारीच झाली नाही, कामाच्या स्वरूपात त्यांचे आणखीही वर्ग झाले. 

राजकारण, साहित्यकारण, धर्मकारण, सांस्कृतिक क्षेत्रे, शिक्षण या क्षेत्रांत कामे करणारी माणसे शरीर श्रमातून बाहेर पडली. स्वच्छता, शेती, नांगरणी, साफसफाई ही कामे करणारे लोक वेगळे झाले. त्याहून ओंगळ वा अनिष्ट कामे करणारे, संडासाची सफाई, मर्तिकाची व्यवस्था अशांसारखी कामे करणारे नुसते श्रमिकच झाले नाहीत तर अस्पृश्य व गावकुसाबाहेरचे झाले. 

या वर्गांत कधी मैत्र, स्नेह वा आपुलकी नव्हती. श्रम करणाऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मनात ते करणाऱ्यांविषयीचा दुरावा वा प्रसंगी तुच्छ भाव होता. परिणामी, कनिष्ठांच्या मनातली आरंभीची प्राक्तन अनुभवत असल्याची जागा वैराने व सुडाने घेतली. मग या वर्गाला शांत करायला दैवते, मंदिरे, मशिदी, चर्चेस अशा गोष्टी आपापल्या ईश्वरांसह आल्या. पुजारी, पुरोहित, मुल्ला, मौलवी, पादरी अन्‌ धर्मगुरू आले. धर्माचे वंगण घालून समाजाच्या या गाड्यांची वाटचाल ते सुलभ व शांत करू लागले.

समाजाची मानसिकताही अशी सहनशील आणि वेडगळ की ती त्याची होणारी पिळवणूक फार काळ त्याच्या मोठ्या वर्गाच्या लक्षातही येऊ देणारी नव्हती. आपल्यावरील जुलमाला आपले नशीब व प्राक्तन समजण्याची त्याची तऱ्हा त्याला त्या अवस्थेच्या खऱ्या कारणांपर्यंत पोहोचू देत नव्हती. ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले. ते नेहमी धनवंतांच्या व सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि श्रमिकांना त्यांचे जगणे हे त्यांच्याच प्राक्ततनाने त्यांना दिले हे सांगू लागले. 

यातला ईश्वर कोणी पाहिला नाही आणि धर्माची अशी चिकित्सा करावी असेही कोणाच्या मनात आले नाही. कारण तसे करणे हेच पाखंड आणि पाप आहे ही समजूत काळाने त्यांच्यात रूजवली होती. समाजाच्या सगळ्या परंपरा हीच समजूत मजबूत करत राहिल्या. धनवंतांना त्या स्थितीशी काही घेणे देणे नव्हते आणि ज्यांना ते होते ते आत्मविस्मृतीत गढले होते.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर मार्क्स Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Marx Load More Tags

Comments: Show All Comments

Ganesh Chondhe

प्रल्हाद मिस्त्री सर.. आपण 'ईश्वर आणि धर्म हे लाबडीतून जन्माला आले आहेत' हे विधान चुकीचं कसं आहे याचं अगदी योग्य विश्लेषण केलेले आहे. त्याच बरोबर 'ईश्वर आणि धर्माचा' आपल्या स्वार्थासाठी गैरवापर करण्यात आला आहे याचे अत्यंत सुंदर विश्लेषण केले आहे. आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद..!

Pralhad Mistri

पहिल्या लेखातील शेवटून दुसरा परिच्छेद, त्यातील एक विधान असे - <<< .. . आपल्यावरील जुलमाला आपले नशीब व प्राक्तन समजण्याची त्याची तऱ्हा त्याला त्या अवस्थेच्या खऱ्या कारणांपर्यंत पोहोचू देत नव्हती. *ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले.*>>> ईश्वर व धर्म या लबाडीतून जन्माला आले. ईश्वर आणि धर्म हे लबाडीतून जन्माला आले हे विधान नुसतेच धार्ष्ट्याचे नसून हे विधानच चुकीचे आहे. भारतातच नव्हे तर जगभरात ज्या कोणी धर्मसंस्थापकांनी धर्म स्थापले त्यांनी मानवतेबाबत जे काही चांगले कर्तव्य करावयाचे असे त्यांना वाटले व प्रत्येकाने स्वतःच्या आतील सद्गुणांचा विकास करीत निर्दोष जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. आकाशातील कोणत्या तरी देवावर विश्वास ठेवा हा या मार्गदर्शनाचा अविभाज्य भाग अवश्य होता. परंतु तशा त्या मार्गदर्शनामागे त्यांचा कोणत्याही लबाडीचा हेतू नसावा, किंबहुना नव्हताच. उलट अनेक धर्मसंस्थापकांनी ‘स्वतः अन्याय सहन करू नका आणि दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने निर्भयपणे उभे राहा’ असेच मार्गदर्शन केले. भारतातील भगवद्गीता सुद्धा तेच सांगते आणि अन्याय दूर करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करायचा सल्ला देते. नंतरच्या लोकांनी, ज्यांनी धर्माची दलाली केली त्यांनी, या धर्मसंस्थापकांच्या मार्गदर्शनाचा आपल्या सोयीने विकृत अन्वयार्थ लावला आणि लबाडी केली. लोकांना शोषणाच्या वेदना जाणवू नयेत यासाठी या लबाडांनी धर्माचा अफूसारखा विकृत वापर केला. म्हणून ईश्वर व सर्व धर्म लबाडीतूनच जन्माला आलेत हे विधान पूर्णपणेच चुकीचे आहे.

Anjani Kher

साफसफाई करणारे सगळ्याच समाजांमध्ये असणार, असतात. त्यांच्या नशिबी फक्त भारतात का अस्पृश्यता आली ?समाजाची विभागणी भारता शिवाय अन्य देशांमध्येही झाली होती. पण त्या समाजांमध्ये जाती का आणि कशा नाही निर्माण झाल्या ?

सर, डोळस करणारा व आत्मभान देणारा लेख.

सर, डोळस करणारा व आत्मभान देणारा लेख

अरुण कोळेकर ,सासवड

मर्मग्राही आणि चिंतनशील लेख.

Rahul Ramesh Gudadhe

खूपच सुंदर आणि समाधानकारक लेख आहे

Ravi

अप्रतिम विश्लेषण

Com Adv RGMhetras

अतिशय तर्कशुद्ध मांडणी दुर्दैवाने सद्य परिस्थती लोकांच्या डोक्यावरऊन जात हे

varsha.bashu

समाज व मानवी मन यांची परस्परांवर आधारित राहिलेली वाटचाल आणि त्याचे तत्कालीन व्यवस्थेकरिता काढले गेलेले सापेक्षी निष्कर्ष आणि या सर्वाचा व्यक्तीच्या हाडीमाशी खिळलेला संबंध याचे यथार्थ वर्णन. अत्यंत स्पष्ट आणि थेट मांडणी. वर्षानुवर्षांच्या जळमटांचे टवकेच नाही तर थप्प्या उखडून टाकणारी शैली.. लेखमालेचे स्वागत आणि प्रतिक्षा.

दत्ताराम जाधव.

द्वादशिवार सरांनी सुलभ करून सांगितले आहे.श्रमांच्या विभागणितून जातींची आणि देवांच्या निर्मितीमागील अर्थनीती .

Add Comment