विश्वगुरूचे अज्ञान 

जो माणूस वा नेता आपल्या पक्षाच्या जन्मदात्या संघाला विसरतो, त्याने गांधी लक्षात ठेवला नसेल तर ती फारशी खेदाची बाब नाही!

23 सप्टेंबर 1931 रोजी लंडन येथे गांधीजी | gandhistory.in

गांधीजींचे वैश्विक असणे नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, आंग सान स्यू की आणि बराक ओबामा यांसारख्या दूरस्थ माणसांना आणि जगभरच्या विद्यापीठांना ठावूक होते; ते भारताच्या पंतप्रधानांना ठावूक नसावे हे आपले राष्ट्रीय दुर्दैव आहे.

1) सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला 'गांधी' हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील टॉलस्टॉय आश्रमाचे चित्रीकरण पुण्याजवळ पनवेलच्या परिसरात झाले. त्यावेळी त्यांना भेटायला सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजदत्त हे गेले होते. त्यांनी अ‍ॅटनबरोंना विचारले, “जगातल्या सर्व देशांत स्वातंत्र्यासाठी लढलेले महापुरूष झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन, आयर्लंडमध्ये इमॉन द व्हॅलेरा, युरोपात लेनिन, आशियात माओ हे सारे झाले. या साऱ्यांना सोडून तुम्ही गांधींवर चित्रपट का काढला?” त्यावर अ‍ॅटनबरो म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढलेले देशभक्त जगातल्या सर्व देशांत झाले. पण हाती शस्त्र न घेता देशाचे स्वातंत्र्य मिळवणारा महात्मा फक्त तुमच्या देशात झाला आणि त्याचे नाव गांधी होते." पुढल्या काळात राजदत्त यांनी माझ्याच कादंबरीवर एक चित्रपट काढला. त्यावेळी त्यांनी ही कथा मला सांगितली तेव्हा आम्ही दोघेही गहिवरलो होतो. पण गांधींचे मोठेपण अ‍ॅटनबरोंएवढेच साऱ्या जगाने कधीचेच ओळखले होते. 

2) 1869 मध्ये जन्माला आलेले गांधी बॅरिस्टर होऊन 1893 मध्ये द.आफ्रिकेत गेले. तेथील 21 वर्षांत त्यांनी जी किमया केली, तिनेच हे जग अचंबित झाले. त्या काळात झालेल्या बोअर युद्धात स्वयंसेवकांचे पथक उभारून रणांगणावर जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांना दवाखान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. त्यात एका सैनिकाला त्यांच्या पथकाने 40 मैलांपर्यंत उचलून नेले. त्यातले काही मैल एकट्या गांधींनी त्याला आपल्या खांद्यावर घेतले होते. त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा आपला सर्वोच्च लष्करी सन्मान त्यांना बहाल केला. (पुढे जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी तो परत केला.)

द. आफ्रिकेत असतानाच त्यांनी तेथील गोऱ्या सरकारने कृष्णवर्णीयांवर केलेल्या अत्याचाराची कैफियत लिहिली. ती साऱ्या जगातील वृत्तपत्रांनी प्रकाशित केली. त्यामुळे संतापलेल्या तेथील गोऱ्यांनी ते समुद्रावर असताना त्यांची बोट अडविली. परिणामी त्यांना 21 दिवस सहकुटुंब त्या बोटीवर राहावे लागले. नंतरही त्यांच्यावर दगडफेक झाली व ते रक्तबंबाळ झाले, त्यावेळी तेथील गोऱ्या वकिलांनीही त्यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. “पण ज्यांच्यासोबत मला राहायचे आहे, त्यांच्याविरुद्ध मी तक्रार करणार नाही” असे उत्तर देऊन गांधीजींनी त्यांना शांत केले. याच काळात त्यांना त्यांच्या सामानासह रेल्वेतून फलाटावर फेकून देण्याची घटना जोहान्सबर्गमध्ये झाली. या सबंध काळात ते अनेक दिवस तेथील सरकारच्या तुरुंगातही राहिले. त्यांच्यासोबत 1200 मैलांची पदयात्रा करणाऱ्या कस्तुरबाही तुरुंगात राहिल्या. 

3) 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी 'सावरकरांची सुटका करा' असा ठराव 1917 मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीत मंजूर करून घेतला. पुढे तसाच ठराव त्यांनी 1919 मध्ये काकिनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही मंजूर करून घेतला. (सावरकरभक्तांना आता याची आठवण नसावी.) नंतरच्या काळात गांधी कस्तुरबांना भेटून सावरकरांच्या भेटीला रत्नागिरीलाही जाऊन आले. 


द मेकिंग ऑफ गांधी (गांधी चित्रपटावरील 50 मिनिटांची डॉक्युमेंटरी)

4) याच दरम्यान त्यांच्या नेतृत्वात चंपारणचा शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा सारा अहवाल प्रत्यक्ष अमृतसरमध्ये राहून त्यांनी लिहून काँग्रेस पक्षाला सादर केला. 

5) याच काळात राष्ट्रनेते असलेल्या लोकमान्य टिळकांनी 'माझ्या पश्चात गांधी या देशाचे नेतृत्व करील' असे म्हटले. 

6) 1919 च्या मॉन्टेस्क्यू चेमस्फर्ड कायद्यानुसार झालेल्या निवडणुकीत गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने देशाच्या केंद्रीय विधीमंडळात बहुमत मिळविले आणि बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल हे वल्लभभाईंचे थोरले बंधू त्याचे अध्यक्ष झाले. नंतरच्या काळात 1937 पर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रीय व प्रांतिक निवडणुका गांधीजींच्या नेतृत्वात या देशाने जिंकल्या. याच काळात खिलाफत, असहकार, दांडी मार्च, व्यक्तिगत सत्याग्रह याही गोष्टी गांधींच्या नेतृत्वात देशात झाल्या. 

7) या काळातच रवींद्रनाथांनी गांधीजींना ‘महात्मा’ म्हटले तर नेताजी सुभाषचंद्रांनी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरव केला. 

8) 1942 मध्ये त्यांच्या नेतृत्वात ‘चले जाव’चे जागतिक कीर्तीचे आंदोलन झाले. त्यानंतर 1945 पर्यंत ते तुरुंगात राहिले. भारतात त्यांनी आयुष्याची 13 वर्षे तुरूंगात काढली. 

9) 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी साऱ्या आयुष्याचा संग्राम केला, ते स्वातंत्र्य त्यांना फक्त सहा महिने अनुभवता आले. 30 जानेवारी 1948 या दिवशी गोडसेने गांधीजींचा खून केला. 

10) अ‍ॅटनबरोंचा चित्रपट त्यानंतर 35 वर्षांनी प्रकाशित झाला.

11) गांधीजींचे पहिले मराठी चरित्र 1918 मध्ये अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले. त्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना आहे. नंतरच्या काळात रोमारोला या नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच लेखकाने 1927 मध्ये त्यांचे समग्र चरित्र लिहिले. पुढे लुई फिशर, विल ड्युरांट यांनीही त्यांची चरित्रे लिहिली. गांधीजींची चरित्रे वा त्यांच्याविषयीचे संदर्भ असलेले जगात एक लाखाहून अधिक ग्रंथ आज जगात उपलब्ध आहेत. 

12) गांधीजींनी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला भेट दिली तेव्हा त्या देशाचे सारे नेते, अभिनेते, लेखक, चित्रकार, कलावंत आणि सामान्य जनता यांनी त्यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी गर्दी केली. एकटे चर्चिल त्यांच्यावरील रागामुळे त्यांना भेटायला आले नाहीत. पुढल्या काळात घनश्यामदासजी बिर्ला आणि मीराबेन यांनी चर्चिलना गांधीजींच्या अद्वितीय आयुष्याची कथा सांगितली तेव्हा आपल्या कृतीचा त्यांना विलक्षण पश्चात्ताप झाला आणि ‘गांधींनी मला पत्र पाठवल्यास मी त्यांना भेटायला येईन,’ असे त्यांनी हिंदुस्थानचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वॅव्हेल यांना लिहिले. गांधीजींनी, ‘मी साऱ्यांच्या स्वागताला तयार आहे’ एवढेच त्या गव्हर्नर जनरलला कळविले. 

13) सन 2000 मध्ये बी.बी.सी. न्यूजने जगभरच्या दहा हजार लोकांची निवड एका प्रश्नासाठी केली. या लोकांत वेगवेगळ्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, सेनापती, संशोधक, प्रतिभावंत, नोबेल पारितोषिक विजेते आणि ग्रंथकार यांचा समावेश होता. या साऱ्यांना त्या नियतकालिकाने विचारलेला प्रश्न, ‘इ.स. 1000 ते 2000 या हजार वर्षांत जगात झालेला सर्वश्रेष्ठ माणूस कोणता’ हा होता. या दहा हजारांपैकी 8,886 लोकांनी ‘गांधीजीं’चे नाव घेतले. 

गांधीजींचे वैश्विक असणे नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, आंग सान स्यू की आणि बराक ओबामा यांसारख्या दूरस्थ माणसांना आणि जगभरच्या विद्यापीठांना ठावूक होते; ते भारताच्या पंतप्रधानांना ठावूक नसावे हे आपले राष्ट्रीय दुर्दैव आहे.

एवढे विलक्षण आयुष्य आणि एवढी वैश्विक लोकप्रियता मिळवणारा महापुरुष या देशात झाला, त्याची ओळख जगाला आणि नरेंद्र मोदींना अ‍ॅटनबरोंच्या चित्रपटाने झाली असेल तर ती स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या त्या गृहस्थाचे अपुरेपण सांगणारी बाब ठरावी. मात्र त्याच्या या अपुरेपणाचे आपण आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. जो माणूस वा नेता आपल्या पक्षाच्या जन्मदात्या संघाला विसरतो, त्याने गांधी लक्षात ठेवला नसेल तर ती फारशी खेदाची बाब नाही. 

जाता जाता एवढेच विचारायचे, की गांधी हे जन्माने गुजराथी होते हे तरी त्या गुजराथ्याला ठावूक आहे काय.. 

-  सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)


वाद निर्माण झालाच आहे, तर हे पुस्तक खरेदी कराच..! 

'गांधी' हा चित्रपट येईपर्यंत महात्मा गांधींना जगात फारसे कोणी ओळखत नव्हते, अशा आशयाचे अज्ञानमूलक व हास्यास्पद विधान परवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतरचे दोन दिवस ते देश-विदेशात प्रचंड मोठ्या टीकेचा व उपहासाचा विषय बनले आहेत.. अशा पार्श्वभूमीवर, ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या (1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या) हिंदी व इंग्रजीत उपलब्ध असलेल्या त्या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. सात ऑस्कर अवॉर्ड मिळालेला तो सिनेमा उत्तम आहेच, त्यामुळे तो जरुर पाहायला हवा. 

मात्र तो सिनेमा निर्माण करण्यासाठी व त्याची पटकथा लिहिण्यासाठी मुख्य आधार होता : अमेरिकन लेखक लुई फिशर यांनी 1949 मध्ये लिहिलेले Mahatma Gandhi : His Life and Times हे इंग्रजी पुस्तक.. अर्थातच हे इंग्रजी पुस्तक अप्रतिम आहे. आणि या पुस्तकाचा तितकाच अप्रतिम मराठी अनुवाद वि. रा. जोगळेकर यांनी केलेला आहे. हे मराठी पुस्तक साधना प्रकाशनाने 2019 मध्ये प्रकाशित केले आहे. हार्डबाउंड स्वरूपातील 750 पानांच्या त्या पुस्तकाची किंमत 800 रुपये आहे. 

हे पुस्तक amazon वरून आणि साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरूनही खरेदी करता येईल. अर्थातच साधना प्रकाशनाच्या कार्यालयातूनही मागवता येईल. 

साधना प्रकाशन 
431, शनिवार पेठ, पुणे 30
Mob 70582 86753  
sadhana.prakashan@gmail.com 

महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ 
हे पुस्तक amazon वरून खरेदी करण्यासाठी लिंक.. 
https://amzn.in/d/9H4WMPy

 

Tags: महात्मा गांधी नरेंद्र मोदी चित्रपट mahatma gandhi narendra modi suresh dwadashiwar Load More Tags

Comments: Show All Comments

श्रीराम जाधव

सुरेश द्वादशीवार यांची लेखणी ऐतिहासिक आधारित मांडणी,सत्य आधारितकता असा अभ्यास.एक तटस्थ,डोळस,निर्भीड,निस्पृह पत्रकार आणि लेखक.खरं तर अंध-भक्तांना अंजन घातलंय.पण संघ काय.. आणि माफीवीर काय.. यांनी ठरवलंय, भूमिका एकच..... ! हम नहीं सुधरेंगे !

श्रीराम जाधव

सुरेश द्वादशीवार यांची लेखणी ऐतिहासिक आधारित मांडणी,सत्य आधारितकता असा अभ्यास.एक तटस्थ,डोळस,निर्भीड,निस्पृह पत्रकार आणि लेखक.खरं तर अंध-भक्तांना अंजन घातलंय.पण संघ काय.. आणि माफीवीर काय.. यांनी ठरवलंय, भूमिका एकच..... ! हम नहीं सुधरेंगे !

Ranjit Dadasaheb Dhure

श्री. सुरेश द्वादशीवार सरांनी आपल्या वरील लेखातून म. गांधीजींचे महान जीवन कार्य अतिशय मुद्देसूद व सोप्या भाषेत सर्वांना समजेल असेच लिहिले आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार . हा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, अशी मी सर्वांना विनंती करतो. हे आपले कर्तव्यच आहे.

म गांधी म्हणजे जगाचे भूषण

म गांधी म्हणजे जगाचे भूषण

Suyog Kawale

Marvelous Article Sir... Mahatma Gandhi is easily the best human being the world has ever seen! Mahatma Gandhi is my idol, my God!!!

Anup Priolkar

Worth reading article on Gandhiji. Better not to speak on uneducated people.

Vijay Kore

मोदींबद्दल काय बोलायचं विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा

Anuradha Harale

Nice,unic content

Add Comment