तंत्र आणि चार्वाक

चार्वाक लेखमालेचा भाग - 8

तंत्राशी लोकायतांना जुळवण्याच्या प्रयत्नाचे एक कारण भारतीय समाजव्यवस्थेत आहे. ही व्यवस्था वैदिक व अवैदिक अशा दोन वर्गांत विभागाली गेली आहे. यातील अवैदिकांचे वर्ग प्रामुख्याने शेतीवर व शिकारीवर अवलंबून राहणारे आहेत. या दोन्ही गोष्टी त्यांनी तंत्रमंत्रासारख्या अंधश्रद्धांशी जोडलेल्या आहेत. पिके येण्याआधी जमिनीची पूजा, नांगराची वखरीची व त्या अवजारांची पूजा, उत्सव करून पिकांच्या पेरणीच्या व मळणीच्या वेळी दिली जाणारी जेवणे, मंत्रतंत्राचे उच्चारण या गोष्टी बहुतेक सर्व मागास जमातींत आढळणाऱ्या आहेत. निर्मितीची व उपजीविकेची साधने हीच दैवते मानणारी ही मानसिकता आहे. 

भूमिपूजन, गृहपूजा, तोरणे, रांगोळ्या या गोष्टीही याच तंत्राच्या विकसित बाबी आहेत. ब्रिफॉल्टने अशा गोष्टींची भली मोठी यादी, त्या-त्या जमातींच्या नावांसह आपल्या ग्रंथात दिली आहे. ‘हो’ नावाची भारतीय जमात पिकांशी संबंधित सात सण साजरे करते. संथाल जमात श्रावणात तसे सण आयोजित करते. त्या सणामुळे धानाचे पीक उत्तम येते असा तिचा समज आहे. मध्य भारतातील अनेक जमातींत जंगली भाताची रोपे घरात टांगून ठेवण्याची पद्धत आहे. बिहारातले कुर्मीही असे सण करतात. भुरिया, कोळी, बिंदा या जमातींचेही पिकांशी संबंधित सण आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागांत पाऊस यावा म्हणून जलयज्ञ होतात. पीक चांगले यावे म्हणून पूजा होतात. पेरणी, मळणी अशा वेळी व घरात धान्य आणतानाही अशा सणांचे आयोजन होते.

हे सण वा उत्सव यांचा पिकांच्या वाढीशी वा त्याच्या जास्तीच्या उत्पन्नाशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नसतो याची जाण नसल्यानेच हे होत असते. इंग्रजांनी आपल्या सत्ताकाळात कोणतेही सण न करता भरघोस पिके घेतली याचेही या जमातींना आश्चर्यच वाटत राहिले. आपले पितर आपल्या पिकांची पाहणी करतात. त्यांचे रक्षण करतात म्हणूनही हे सण होतात. कौटिल्यासारख्या विद्वानानेही असे सण साजरे करूनच शेतकऱ्यांनी शेतीची कामे करावीत असे त्याच्या अर्थशास्त्रात म्हटले आहे. 

वेदांतसुद्धा पिकवाढीचे मंत्र आहेत. अथर्ववेदात तर त्याचा फार मोठा भरणाच आहे. निवळ श्रद्धा आणि अंधभक्ती यांखेरीज या गोष्टींना महत्त्व नाही. भरल्या पिकात स्त्रीपुरुषांनी समागम केला वा त्यात रजस्वला स्त्रियांनी निजवल्या तरी तेथील पीक वाढते अशा समजुती काही भागांत आहेत. त्यांनाही केवळ परंपरागत श्रद्धा व भक्ती यांखेरीज दुसरा आधार नाही.

खरेतर दसरा, दिवाळी, होळी, रंगपंचमी हे आपले मान्यताप्राप्त सणही अशाच पारंपरिक आठवणींवर व स्मरणांवर उभे आहेत. ते आनंदाचे आहेत. ते श्रद्धापूर्वक सर्वत्र साजरेही होतात... पण त्यांचे आधार कोणते म्हटले तर त्याचे वैज्ञानिक वा तर्कशुद्ध उत्तर आज देता येत नाही. श्रद्धा हा मानवी जीवनातला अतिशय बळकट भाग असल्याचा व त्यांनी तर्कावर मात केली असल्याचा हा पुरावा आहे. या श्रद्धांना तंत्राशी जुळून असणे व तंत्राला त्यामुळे अवैदिकांच्या विचारसरणीशी जुळवणे वैदिकांना शक्य होते. तेच त्यांनी केले. तसे करताना त्यांनी चार्वाकांची वैचारिकता व तर्कशुद्धी यांकडेही दुर्लक्ष केले. 

त्याच संदर्भात त्यांनी चार्वाकांचा संबंध सांख्यांशीही जोडला. ही गोष्ट कौटिल्याच्या लेखनात आली आहे. वैदिकांचेही मंत्रतंत्र होते, त्यांचीच कनिष्ठ आवृत्ती त्यांनी अवैदिकांच्या मंत्रतंत्रात पाहिली... मात्र या तंत्राचा वापर केवळ भारतातच होत नव्हता. मंत्रतंत्र व त्याचे परिणाम ही जागतिक बाब आहे. वैदिकांच्या क्षेत्राबाहेर चीनपासून दक्षिण अफ्रिकेपर्यंतच्या जमाती मंत्रतंत्राच्या साहाय्याने शेती करण्याचा, शिकार मिळवण्याचा व आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याचसाठी मंत्राचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे. 

मंत्राचा सारा भर भ्रम जागवण्यावर असतो. ज्या गोष्टी करायच्या, मिळवायच्या वा हाताळायच्या त्या साऱ्यांवर आपले पूर्ण नियंत्रण आहे व ते ठेवण्याची शक्ती आपल्यात आहे असा भ्रम मंत्रशक्तीचा वापर करणाऱ्यांना व्हावा लागतो. हा भ्रम जेवढा शक्तिशाली तेवढा त्याचा त्या शक्तीवरील प्रभावाचाही भ्रम वाढतो. या प्रभावामुळेच मग आपले हातचे काम, शेती, शिकार वा अन्य काही आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो. ही मंत्राची जादू वा तिच्याबाबतचा गैरसमज आहे. 

एक गोष्ट मात्र खरी की, तंत्राचा हा मार्ग तांत्रिकांना समाजात वजन आणि उपजीविका मिळवून देतो आणि त्यांच्यासोबत वा मागे जाणाऱ्यांच्या आशा जिवंत व पल्लवीत ठेवतो. त्याचे प्रत्यक्ष परिणाम कोणी पाहत नाहीत वा त्यांची कोणी शहानिशाही करत नाहीत. आपण केले यावर करणारे प्रसन्न आणि आपल्याला झालेल्या मिळकतीवर तांत्रिकही खूश. वैदिकांचे पुरोहित, ख्रिश्चनांचे फादर्स, मुसलमानांचे मुल्ला-मौलवी यांहून वेगळे कुठे असतात आणि त्यांचा त्यांच्या भाविकांच्या भावनाही यांहून निराळ्या कुठे असतात. जादूटोण्याची लागण मग प्रस्थापित धर्मांनाही होते. त्यात देणाऱ्यांच्या जागी कधी गुरू, कधी साधू-मुनी तर कधी एखादे दैवत उभे असते. 

मंत्रतंत्राने, काहीएक न करता असाध्य गोष्टी साध्य होतात ही भावना समाजात रुजली की तिच्या बरोबरीने समाजात श्रद्धेच्या बळावर वामाचारही सुरू होतात. तसे ते सर्व समाजांत व धर्मांत आहेत. वैदिकांमधला कापालिकांचा पंथ, बौद्धांमधले वज्रयान व सहजयान, ख्रिश्चनांमधले वामाचार ही त्याचीच निर्मिती आहे. मद्य, मांस, मीन, मुद्रा व मैथुन यांसारखी या आचाराची साधने (पंचमकार) मग धर्माचे स्वरूप घेऊन अनैतिकतेला धर्माचे बळ मिळवून देतात. यातला कापालिकांचा पंथ तर मैथुनाविषयी म्हणतो, ‘हे मैथुन स्वपलीकडे केले तर हा आनंद शतगुणित होतो. मैथुनाचा काळ वाढवत नेणे ही साधना होते.’  

‘संभोगातून समाधीकडे’ या रजनिशांच्या पुस्तकात याहून वेगळे काय सांगितले आहे? मात्र हा वामाचार व त्यातली अनैतिकता धर्मसंबद्ध आहे. चार्वाकांना तिच्याशी जोडण्याचे कारण नाही. त्यांचा आप्तसंबंध,  नाती व रक्तसंबंध यांवर भर आहे. आप्तांशी केलेला हिंसाचार वा गैरव्यवहार त्यांच्या नीतिमार्गात बसणारा नाही. 

इथे नीतीविषयीही एक गोष्ट नमूद केली पाहिजे. नीती ही सदासर्वकाळ व सर्व स्थळी सारखी नसते. एका समाजाचे नैतिक व्यवहार दुसऱ्यात अनीतीचे ठरण्याची शक्यता असते. आदिवासींच्या अनेक जमातींत मुलींना लग्नाआधी लैंगिक स्वांतत्र्य दिले जाते. ते मुलांनाही असते. त्यांना मैथुनाचे धडे द्यायला गोटूल ही संस्थाही काही जमातींत असते. हिंदूंमध्ये सगोत्री विवाह निषिद्ध तर मुसलमानांमध्ये तेच सर्वाधिक पवित्र असतात. महाराष्ट्रात मामेबहिणीशी लग्न चालते. कर्नाटकात व आंध्रात मामाचे व भाचीचेही लग्न धार्मिक ठरते. आजच्या जगाने जातिबाह्य व धर्मबाह्यच नव्हे... तर आंतरराष्ट्रीय लग्नेही मान्य केली आहेत. त्याहीपुढे जाऊन अनेक देशांनी समलैंगिक विवाहांना मान्यता दिली आहे. आयनरँड ही तत्त्वचिंतक विदुषी त्याचमुळे म्हणते, नीती ही समाजाची लहर आहे. ती बदलत असते आणि तिचे निश्चित व सार्वकालिक नियमही नसतात. प्रत्येक समाज व वर्ग आपल्या सुरक्षेच्या व स्वास्थाच्या संदर्भात असे नियम तयार करतो. त्यांत कालानुरूप बदल करतो. मग जुने नियम कालबाह्य होतात व त्यांची जागा नव्या नियमांनी घेतलेली दिसते. 

वामाचार व त्यातील अनैतिक वाटावेत असे विधी दिसत असले तरी त्यांना धर्म चिकटून असल्याने ते पवित्र ठरतात व त्याकडे कोणी टीकात्मक दृष्टीने पाहत नाहीत. स्त्रिया मुलांना जन्म देतात तशी भूमीही पिके जन्माला घालते. त्यांच्यातले हे साम्यच स्त्रियांशी संबंधित कुलाचार कृषिसंस्कृतीत मोठ्या प्रमाणात आले. भर उन्हात खांद्यावर मुले घेऊन शेतात राबणाऱ्या स्त्रियांना पाहून शेतकऱ्यांना दोष देणाऱ्या एका ख्रिश्चन मिशनऱ्याला त्यांनी हेच उत्तर दिले. पुरुषांना मुले होत नाहीत, ती स्त्रियांना होतात... म्हणून समाज वाढतो. त्यांचा पिकांशी संबंध आला की पिकेही वाढतात हे त्यांचे उत्तर होते. 

हा साराच केवळ समजुतींचा व तोही परंपरेने आणलेल्या समजुतींचा भाग आहे. त्यामागे जाऊन त्यांची वैज्ञानिक शहानिशा करण्याची क्षमता, इच्छा वा बुद्धी तेव्हा नव्हती व अजूनही ती फारशी नाही. तरीही ही तंत्रविषयक चर्चा पुढे चालवण्याचे खरे कारण त्यांचा धार्मिक श्रद्धांशी व व्यवहारांशी असलेला संबंध आहे. हे तंत्र केवळ अवैदिकांनीच नव्हे तर वेगळ्या स्वरूपात वैदिकांनीही वापरले आहे. 

मार्कंडेय पुराणात वेणीमाहात्म्य या नावाचा अध्याय येतो. त्यात ती देवी (दुर्गा) देवांना उद्देशून म्हणते, ‘मी साऱ्या जगाला पुरेल एवढे अन्न व भाजीपाला पुरवीन. तो सारा माझ्या देहातून व आत्म्यातून निर्माण झालेला असेल. पावसाळ्यात हे सारे मी देईन. त्यातून मी ‘शाखांबरी’ या नावाने ख्यातनाम होईल. हडप्पा, मोहेंजोदारो या संस्कृतींसह जगातल्या अनेक जमातींत स्त्रीच्या डोक्यातून व योनीतून पाने, फुले व झाडे उगवली आहेत अशा मूर्ती व चित्रे आढळली आहेत. या साऱ्या वर्णनात येणारे अश्लील वास्तव दडवण्याचा प्रयत्न काही पुराणग्रंथांनी करून त्यांना देवत्व चिकटवण्याचा प्रयत्न केला तर काही संशोधकांनी या घटनांचा स्त्रीच्या व भूमीच्या निर्मितिक्षमतेशी संबंध जोडून त्याविषयीच्या त्या जमातींच्या मनातील तंत्रविषयक श्रद्धा अधोरेखित केल्या. भग (योनी) साधना किंवा लता साधना हाही याचाच भाग आहे. 

चीनपासून ग्रीसपर्यंत आणि उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेतील व अफ्रिकेतील अनेक जमाती शेतीमध्ये काम करताना स्त्रियांनी विवस्त्र असावे, पेरणीपूर्वी त्यांचा त्याच अवस्थेत नाच व्हावा अशा चाली आहेत. निर्मितीची दोन साधने (स्त्रीयोनी व भूमी) यांच्यातील जवळीक पीक वाढवते व प्रजाही वाढवते हा यामागचा समज आहे. 

सोबतचे समाज प्रगत झाले, त्यांनी या संदर्भातले सत्य जवळ केले... पण प्रथांच्या व परंपरेच्या जुनाट श्रद्धांच्या अधीन असलेल्या या जमाती त्यांच्या समजांना अजून घट्ट धरून आहेत. भारतातील अशा जमातींची नोंद मानववंशशास्त्रात आहे. उत्तरपूर्व भारतात व दक्षिणेत या प्रथा अजून शिल्लक आहेत. हे सारे समाजनिर्मितीशी, पिकांच्या व पुत्रांच्या संबंधित आहे.

आजचा काळ लहान कुटुंबांचा आहे... पण प्राचीन समाज कुटुंब विस्तारावर भर देणारा होता. स्वतः श्रीकृष्ण हा वासुदेवाच्या सहाव्या पत्नीचा आठवा मुलगा होता. वासुदेवाला आणखी पाच बायका होत्या. रुक्मिणीला बारा तर सत्यभामेला अकरा मुले होती. गांधारीला स्वतःची बारा तर तिच्या पतीला धृतराष्ट्राला दासींपासून झालेली आणखी 88 मुले होती. वाढणारे हात कामाला येतात. शेतीपासून शिकारीपर्यंत व युद्धापासून गृहोद्योगांपर्यंत त्यांचा उपयोग होतो. हा समजही त्यामागे होताच. 

मातापूजन ते लेकुरवाळ्या, अंगावर खूप मुले खेळवणाऱ्या स्त्रियांची मंदिरे, मोठे स्तन व योनिमार्ग असणाऱ्या स्त्रीदैवतांच्या मूर्ती सर्वत्र आढळतात. भारतात प्रचलित असलेली शिवलिंगाची पूजाही याच श्रद्धेचा भाग आहे. ही पूजाही जगात सर्वत्र व सर्व जमातींत आहे. लिंग व शाळुंखा (योनी) यांच्या जोडमूर्ती आपण आपल्या शहरी व प्रगत समाजातही पाहतो. त्यामागेही निर्मितीची पूजा हेच उद्दिष्ट आहे. 

गणपतीसारखीच अशी कथा गौरीचीही आहे. गौरी ही सर्जनाची देवता आहे. तिच्या पूजेतला कलश हा स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक असतो तर त्या कलशाबाहेर आलेली पाने ही भूमीच्या निर्मितिक्षमतेची प्रतीके आहेत. तंत्रमार्ग आणि धर्म हे एकमेकांना नावे ठेवत पण समांतर कसे चालत याचेच हे चिन्ह आहे. तुमचे हे तंत्र आणि आमचा तो धर्म अशी यांतली वैदिकांची व धार्मिकांची भूमिका आहे. त्यांच्यातले अंतर श्रद्धेचे कमी अन्‌ समाजव्यवस्थेतील विषमतेशी व जातीयवादाशी संबंध राखणारे अधिक आहे. 

एक गोष्ट मात्र स्पष्ट... याचा विचारांशी, तर्काशी वा विवेकाशी संबंध नाही. धार्मिक वा श्रद्धेय मानल्याने त्यात नीतीचा व अनीतीचाही विचार नाही. हे जीवन आहे आणि ते जगायचे तर जे करावे लागणार ते करणे ही या साऱ्यांची दिशा आहे.

तंत्र हा शब्द मूळ तन्‌ या धातूपासून तयार झाला आहे. तन्‌चा अर्थ ताणणे, विस्तारणे, फैलावणे असा होतो. सन्मान किंवा तन्मय हे शब्दही त्यांतूनच साकारले आहेत. मोनिएर विल्यम्सच्या मते यांचा संबंध वंशविस्ताराशी आहे. आपल्या मागे आपला वंश टिकावा व आपले वंश जगात नांदत राहावेत ही त्यामागील मूळ भावना आहे. स्वाभाविकच त्याचा संबंध स्त्रीपुरुष समागमाशी व त्यातून जन्माला येणाऱ्या वंशवेलीशी आहेत. 

तंत्र हा प्राचीन व मानवी जीवनाचा भाग आहे. झालेच तर तो प्राणिजीवनाचाही भाग आहे. या तंत्रावर आधारित शास्त्र मागाहून बरेच उशिरा जन्माला आले आहे. अगोदर अनुभव व त्याचे ज्ञान आणि अखेरीस शास्त्र हीच अध्ययनाची व शास्त्रमांडणीची परंपरा आहे.

तंत्राचा उगम कधी झाला याचा शोध ग्रंथाच्या आधारे अनेकांनी घेतला... मात्र त्यामुळे ग्रंथनिर्मितीचा काळ समजला, प्रत्यक्ष तंत्राचा आरंभ कळला नाही. तंत्रावरचे काही ग्रंथ अगदी अलीकडचे आहेत. महानिर्वाण तंत्राचा काळ 1772 ते 1833 हा आहे तर काही तंत्रविषयक ग्रंथांत इंग्रजांचे व लंडनमधील त्यांच्या रहिवाशांचे उल्लेख आहेत... त्यामुळे तंत्राचा शोध मागे न्यावा लागतो. त्यासाठी थेट आदिम जमातींपर्यंत व त्यांच्या तांत्रिक चालीरितींपर्यंत जावे लागते. 

बंदोपाध्याय या तंत्रशास्त्रज्ञाच्या मते हा काळ थेट वेदांपर्यंत जातो... कारण तेव्हाही जमाती होत्या आणि त्याच्या जगण्याच्या अप्रगत श्रद्धा होत्याच. काहींच्या मते त्यांचा भारतातला प्रवेश असिरिअनांसोबतचा तर काहींच्या मते आर्यांसोबतचा. जॉन मार्शल तर त्यांची उपस्थिती हडप्पा-मोहेंजोदारोंच्या संस्कृतीत असल्याचे सांगतात. तथापि या विषयावरील अभ्यासकांत व ग्रंथकर्त्यांतच त्याविषयीचे मतभेद आढळले आहेत. 

तंत्र हे साऱ्या समाजाचे एक दुर्लक्षित अंग असताना, त्यांचा संबंध जगभरातील सामाजिक वर्गांशी व धर्मांशी असताना आपल्यातील काहींनी तंत्राला महायान बौद्धांच्या शिकवणीचा भाग मानले. तंत्र वेदांऐवढे जुने असताना व वैदिक काळातील अवैदिकांचे समूह त्या मार्गाचा अवलंब करत असताना त्याचा उदय महायान बौद्धात शोधणे हा प्रकारच तंत्राचे खरे स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. 

हरिप्रसाद शास्त्रींसारख्या अधिकारी विद्वानाने तसे लिहिले म्हणून ते खरे मात्र ठरत नाही. त्यांच्यासारख्याच चुका इतर अभ्यासकांनी केल्या आहेत... त्यामुळे तंत्राविषयीचे ग्रंथ अनेक विसंगतींनी व परस्परविरोधी विचारांनी भरले आहेत. तंत्र हा एका मोठ्या सामाजिक वर्गाचा जीवन सुखी करण्याच्या वा सुखद करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे ही वस्तुस्थितीच यात हरवली आहे. 

तंत्र हा कोणत्याही एका धर्माचा भाग नाही. तो मानवी जीवनाचा भाग आहे. त्यावर आपले शिक्के उमटवण्याचा प्रयत्न वैदिकांनी केला, बौद्धांनी केला तसा इतरांनीही केला. प्रत्येक धर्माने त्याला आपल्या विचारसरणीनुसार नावे दिली व आकार दिले... मात्र एवढे सारे असले तरी तंत्र हा एकाच मानवी जीवनाचा भाग आहे. धर्मांनी माणसे वाटून घेतली... तशी त्यांची साधने, तंत्रासह आपली असल्याचे सांगितले... शिवाय त्यांना साथ देणारे विद्वान तेव्हा होते व आजही आहेत. एवढेच यातले सत्य.

याखेरीज इतर अनेक अभ्यासकांनी बौद्ध तंत्रात असलेल्या अनेक बाबी, श्रद्धा, पूजा, दैवते या गोष्टी हिंदू (वज्रसत्त व वज्रडाकिणी) तंत्रातही असल्याचे दाखवून दिले आहे. शिव, दुर्गा यांसारख्या दैवतांनी बौद्ध तंत्रात वेगळी नावे धारण केली आहेत. स्वतः गौतम बुद्धाने पंचमकाराचा निषेध केला असला तरी त्याच्या पश्चात आलेल्या महायानी पंथाच्या तांत्रिक अनुयायांनी त्यांचाही स्वीकार केल्याचे आढळले आहे. 

याखेरीज आणखीही एक बाब हरिप्रसाद शास्त्रींचे म्हणणे निराधार ठरवणारी आहे. जगाच्या पाठीवर अतिप्राचीन काळात असाव्या तशा मूळ स्वरूपात जगणाऱ्या जमाती आहेत. अंदमानात व काही दूरस्थ बेटांवर अजून विवस्त्र वावरणाऱ्या रानटी जमाती आहेत आणि त्याही काही विधींचा वापर उत्पन्न व जमात यांच्या वाढीसाठी करताना आढळल्या आहेत. हे विधी त्यांच्या समजुतीनुसार फल प्रदान करणारे असले तरी प्रगत समाजाला ते केवळ अज्ञानमूलकच नव्हे तर असभ्य वाटावेत असे आहेत.

...शिवाय तंत्राचा वापर पिकांच्या वाढीसाठी, शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, चांगल्या प्रजेच्या उपजासाठी करणारे वैदिकही आहेत. अमुक यज्ञ केल्याने तमुक फळ प्राप्त होते हा समज वा विश्वास हा तंत्रावरील व त्यातील विधींवरील विश्वासच आहे. वंशवाद, वंशविस्तार, संपत्तीत वाढ इत्यादी गोष्टींसाठी होणारे पूजेचे आयोजन हेही खऱ्या अर्थाने तंत्रातच जमा होणारे आहेत. पॉसीन या अभ्यासकाच्या मते याचमुळे बौद्ध तंत्र हे प्रत्यक्षात हिंदुत्वातले बौद्धत्व वा बुद्धाच्या तत्त्वज्ञानातले शैवतंत्र आहे. 

प्रत्यक्ष हरिप्रसाद शास्त्रींच्या व अन्य अभ्यासकांच्या मते तंत्राचा बौद्धांशी वा वैदिकांशी प्रत्यक्ष संबंध नाही. तंत्राचे वा मंत्राचे प्रकार त्या धर्मांत त्यांच्या अवनतीच्या काळात शिरले. धर्म जसजसे लोकांनी मोठ्या संख्येने स्वीकारले तसतशी त्यांत त्यांनी आपली जुनी मंत्रसंस्कृतीही आणली. 

शाक्त, वज्र यांसारखे तंत्र कमालीच्या अनिष्ट व अनैतिक विधींशी जुळलेले आहेत. त्यांतले प्रमुख विधी खानपान, मद्य-मांस व मैथुन यांच्याशी जुळले आहेत आणि या संबंधांना नातेसंबंधाची, बहीणभावाच्या वा अन्य निकट आप्तांच्या संबंधांचीही मर्यादा नाही. जेव्हा दोन भिन्न धर्म वा आचारधर्म एकत्र येऊन त्यांची सरमिसळ होते तेव्हा असे घडतच असते. 

चौथ्या शतकात कॉन्स्टंटाईनच्या सम्राटाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला व तो धर्म पाळण्याची आज्ञा सर्व प्रजाजनांना केली तेव्हा त्यात ख्रिश्चन आचारधर्म व रोमन साम्राज्यातील नागरिकांचे जुने आचारधर्म यांची सरमिसळ झाली. मूळचा सूर्योपासकांचा धर्म येशूच्या पूजकांचा बनला. त्यासाठी येशूचा 1 जानेवारीचा जन्म 25 डिसेंबरला आणला गेला. पोप आले, येशूची प्रार्थना आली... पण त्याच वेळी रोमनांची जुनी तंत्रसाधना संपली नाही. उलट तिला ख्रिश्चनाच्या धर्मात वसवण्याचे प्रयत्न तेव्हाच्या धर्मगुरूंनी केले. 

राजा दुबळा होता, धर्मगुरू बलवान होते... पण प्रजेला सांभाळायला व तिला शांत करायला रोमन साम्राज्यातील मूळ ख्रिश्चन धर्मात रोमनांचे जुने विधी स्वीकारले गेले. येशूचा जन्म 1 जानेवारीचा... पण प्राचीनांच्या सूर्योपासक धर्मात 25 डिसेंबर हा दिवस शुभ मानला जाणारा... म्हणून येशूचा जन्म 25 तारखेला आणून त्या दोन संप्रदायांत एकवाक्यता साधली गेली. 

ख्रिश्चन धर्माने काळानुरूप व क्षेत्रानुरूप पुढेही आपल्यात फार बदल घडवून आणले. ल्युथर मार्टिनने जुन्या परंपरांविरुद्ध बंड उभारून त्यासाठी स्वतःचा बळी दिला... पण त्याच्यापासूनच प्रोटेस्टंट या नव्या पंथाची सुरुवात झाली. आज जगात या प्रोटेस्टंटांची संख्या मूळ कॅथलिकांहून अधिक आहे. इंग्लडने रोम नाकारले व आपल्या राजपदाला सर्वश्रेष्ठ धर्मगुरू मानायला सुरुवात केली. फ्रान्सने व जर्मनीनेही रोमविरुद्ध असेच बंड केले. पुढे फार वर्षांनी फ्रान्सने व जर्मनीने पोप पदावरचा आपला दावा मागे घेऊन रोमच्या पोपला मान्यता दिली... मात्र त्याच वेळी आपली स्वायत्तताही त्यांनी पोपकडून मान्य करून घेतली.

वैदिक धर्माच्या अवनतीच्या काळात असेच काहीसे घडले. शंकराचार्यांनी त्यांच्या अद्वैत विचारांची स्थापना करताना, कापालिकांचे व शाक्तांचे आश्रम उद्‌ध्वस्त केले व त्यांची पूजास्थाने बंद पाडली हे सांगणाऱ्या कहाण्या दक्षिण भारतात प्रचलित आहेत. श्रीशैलम् येथील जी स्थाने त्यांनी उद्‌ध्वस्त केली... त्यांच्या कथा तिथे आजही सांगितल्या जातात. 

तंत्राचा संबंध देहवादाशी वा देहतत्त्वाशी आहे. देह हेच विश्वाचे सजीव व संपूर्ण रूप असल्याने विश्वात वा निसर्गात जे जसे घडले तसेच ते मानवी देहात घडते. देह (स्त्रीदेह) व भूमी मुलांना व पिकांना जन्म देतात. तंत्रमंत्राच्या वापराने त्यांना परस्परांची सर्जनता वाढवता येते. शेतीतला समागम किंवा समागमाचा शेतीतंत्राशी संबंध जुळवणे व त्या दोहोंची सर्जनता वाढवणे हे तंत्राचे काम आहे. तंत्राचे त्याचमुळे असे म्हणणे आहे की, जसे पीक येते वा जसा मुलांचा जन्म होतो तसेच हे विश्वही निसर्गनियमाने अस्तिवात आले व तसेच ते चालत असते. देहतत्त्व व विश्वतत्त्व यांच्यात एकवाक्यता, एकरूपता व एकात्मता साधता येणे हेच सर्जनाचे प्रमुख सूत्र आहे. 

दुर्दैवाने धार्मिक श्रद्धांनी व धर्मातील मंत्रतंत्राने तंत्राचे हे रूप बदलले व विकृत केले. निसर्गाला वाढीसाठी व विनाशासाठी ईश्वर, आत्मा व मृत्यूनंतरचे जग लागत नाही तसे ते माणसांनाही लागत नाही. धर्मांनी या सत्यात त्याच्या भ्रमाचा समावेश करून तंत्राला श्रद्धेच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या प्रयत्नामुळे तो यशस्वी झालेला दिसला तरी तो खरा नाही. 

तंत्राचा आत्म्याशी वा परमात्म्याशी संबंध नाही. ते  केवळ निसर्गावर व निसर्गनियमांनुसार चालणारे सूत्र आहे. बंदोपाध्याय या तंत्राच्या अभ्यासकाच्या मते तंत्राचे दोन भाग होतात. एकाचा संबंध विश्वाशी वा निसर्गाशी आणि दुसऱ्याचा देहाशी... देह हे विश्वाचेच रूप असल्याने या दोन जगातील... संबंध सहजसाधा व निर्बंधरहित असतो. ते तसे अनुभवणे व दोन्ही भागांचे सामर्थ्य जागवणे व वाढवणे ही या क्षेत्रातील सिद्धी आहे.

इंद्रियगोचर जगावाचून दुसरे काहीही अस्तित्वात नाही आणि अनुभव हेच विश्वातील प्रमाण आहे हे एकवार मान्य केले की मंत्रतंत्र वा जादूटोणा किंवा चमत्कार यांचे अस्तित्वच संपते. त्यांच्या अस्तित्वाचा आधार केवळ श्रद्धा हाच राहतो. त्याच आधारावर ईश्वर आणि धर्म टिकतात. 

हेवरजा तंत्रात एक गुरुशिष्य संवाद येतो. त्यात शिष्य गुरूंना विचारतो, ‘या जगात, या देहापासून व प्रत्यक्ष जगावाचून काहीच नाही. सारे आभासरूप आहे असे म्हटले जाते. या स्थितीत या जगाला व देहाला काही महत्त्व आहे काय?’ गुरू उत्तर देतात, ‘देहावाचून कोणत्याही आनंदाला, सिद्धीला व उंचीला अर्थ नाही. जग हे त्याच्या मापाचे साधन आहे. देह नाही तर सिद्धी नाही आणि सिद्धीवाचून मिळवायचे काय असते?’ 

देहत्व वा देहच अंतिम असल्याचे मानणे व त्यावाचून दुसरे काही नाही अशी बुद्धी बाळगणे हे चार्वाकांचेही सांगणे आहे... त्यामुळे तंत्राचा चार्वाकांशी संबंध जोडला गेला. तेवढ्यावर न थांबता काहींनी तर मंत्रतंत्राशी व जादूटोण्याशीही संबंध जोडला. अथर्ववेदातील चमत्कारांपर्यंत चार्वाकांना नेण्याचे प्रयत्न अलीकडे झाले. मंत्र, तंत्र वा चमत्कार विज्ञानवादात बसत नाहीत आणि त्याचमुळे त्यांना चार्वाकापासून वेगळे मानणे भाग आहे. 

तांत्रिकांचा देहविचार व त्यांच्याशी जुळवलेला चार्वाकांचा वास्तववाद यांमुळे मानवी देह व त्याच्या भोवतीचे विश्व यांचा अतिशय सविस्तर व खोलवर अभ्यास झाला. त्यातून वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यांना मोठी चालना मिळून त्या क्षेत्रात समाज प्रगत होऊ शकला. माणसाच्या संवेदनांचे खरे स्थान त्याचे हृदय नसून मेंदू आहे हे तांत्रिकांनीच प्रथम सांगितले. चरक आणि सुश्रुत हे वैदिक वैद्य ॲरिस्टॉटलप्रमाणेच हृदयाला संवेदनांचे स्थान मानत असताना तांत्रिकांनी मेंदूचे हे महत्त्व सिद्ध केले. मानवी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पतींचा व इतर बाबींचा शोध घेतला. 

शरीर व जीव यांचा शोध घेणाऱ्यांची धडपड आणि मृतदेहाविषयी वैदिकांना वाटणारा तिरस्कार यांतून त्यांचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले. उलट तांत्रिकांना हेच विषय नसलेल्या ईश्वराहून अधिक महत्त्वाचे वाटले. पतंजलीने योग ही इंद्रिय साधना मानली. त्यात देहविचार असला तरी तो अनुषंगिक महत्त्वाचा होता. मृत देहाविषयीचा तिटकारा व त्याला अस्पर्श्य मानणारी मानसिकता किंवा एकूणच देहाविषयीची काहीशी निम्न भावना एवढी जबर की, तिच्यामुळे कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजला आरंभी विद्यार्थी मिळत नसत. देह ही महत्त्वाची, मध्यवर्ती शोधाची बाब आहे ही भावना रुजल्यानंतरच या महाविद्यालयांना विद्यार्थी लाभले. आजही मृतदेहांविषयीची अशी धारणा अनेक समाजांत आहे. 

पूर्वी राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या राण्यांनाही त्याच्याच कबरीत गाडले जायचे व त्यांचे नाते कायम ठेवण्याचा प्रयत्न व्हायचा. आजही आदिवासींच्या अनेक जमातींत मृतांच्या आवडीच्या गोष्टी त्यांच्यासोबत पुरण्याची प्रथा आहेच... त्यामुळे मृतदेहाला इजा करणे ही बाबच मग वर्ज्य ठरली. 

न दिसणारे ब्रह्मसत्य आणि सभोवतीचे सजीव जगत मिथ्या ही भावना जीवनाविषयीची तुच्छता वाढवते. एक सुतकी विचार, या जगातून मुक्त होण्याचा (मोक्षाचा) बळावतो. ही स्थिती देह व जग यांची काळजी कशी करायला लावील? त्यातून आत्मसाधना करणाऱ्यांची महती आपल्या प्राचीन पुराणात मोठी आहे. जीवनेच्छाच त्यांनी तुच्छ व त्याज्य ठरवली आहे. ज्यांची आयुष्ये सुखी व समृद्ध आहेत व होती त्यांनी ज्यांच्याजवळ काही नाही त्यांच्यासाठी लिहिलेली ही पुराणे कोणत्या शास्त्राची (मानवी शास्त्राची) प्रगती होऊ देतील? 

आत्मा, परमात्मा, मृत्यूनंतरचे स्वर्गातले सुख आणि मोक्ष हे साध्य असेल तर जीवनाला साधनमात्र मोलही उरत नाही. हे भारतातच झाले असे नाही. चीनमध्ये ताओने हेच रुजवले. पोप, चर्च व ख्रिस्ती धर्म यांनी आनंदालाच पाप मानले. समागमाचासुद्धा आनंद होता कामा नये, ते केवळ एक कर्म म्हणून करायचे आहे हे त्यांनी म्हटले. इस्लामही मृत्यूनंतरच्या जगाची सुखे सांगतो. हा जन्म निरिच्छपणे जगायची शिकवण देतो. धर्मांनी जीवन नासवण्याचे व त्यातला आनंद घालवण्याचे व त्याला अधिकाधिक सुतकी करण्याचे काम केले. हे धर्म ज्ञान, विज्ञान, तर्कज्ञान आणि भौतिक शास्त्र यांची प्रगती कशी होऊ देतील?  

कामवज्रायन या बौद्धतंत्रातील एका शाखेचा उल्लेख याच संदर्भात केला पाहिजे. त्यानुसार माणसाचा जन्म जसा स्त्रीपुरुषांच्या समागमातून होतो तसा या विश्वाचा जन्मही स्त्री व पुरुष तत्त्वांच्या समागमातूनच झाला आहे. समागम सर्वत्र आहे. वैराण जमिनीवर (स्त्रीतत्त्व) आकाशातून (वीर्याची) वर्षा होते आणि पिके जन्माला येतात. तसेच विश्वाच्या जन्माचेही आहे. 

या शाखेने विश्वाच्या निर्मितीच्या कमालीच्या ओंगळ व अश्लील वाटाव्यात अशा कहाण्या सांगितल्या आहेत. त्यात अर्थातच ईश्वराचा समावेश नाही. तो कोणत्याही धर्माच्या तंत्रात, चार्वाक विचारांसारखाच नाही. तंत्राच्या मते समागम ही सृष्टी व माणूस यांच्यात समन्वय व शांती साधणारी बाब आहे. त्यांच्या साधनांच्या जागांवर कामसूत्रातील चित्रे व मूर्ती असतात. ओडिशामधील कोणार्कच्या शिवालयावरील काममूर्ती याचाच पुरावा आहे. 

एक गोष्ट मात्र नमूद करण्याजोगी. तांत्रिकांनी मानलेले देहतत्त्व आणि चार्वाकांनी नाकारलेला ईश्वर यांनी ज्या अध्ययनाला जन्म दिला त्यांचे मोल मोठे आहे. साऱ्या जगात चीनपासून ग्रीसपर्यंत व अरब देशांपासून युरोपापर्यंत हे अध्ययन धर्मशास्त्राचा प्रभाव झुगारत तर कधी त्याकडे दुर्लक्ष करत प्रभावी झाले. 

भारतात नालंदा, मगध, विक्रमशीला या प्राचीन विद्यापीठांत खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरसाधना यांचे व इतर आरोग्यविषयक विद्यांचे अध्ययन झाले. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक ती साधना, शेतीसाठी खते व इतर सोयी, पाणीपुरवठ्याच्या बाबी या विद्यापीठांत शोधल्या व अभ्यासल्या गेल्या. 

तिकडे गॅलिलिओने पृथ्वी गोल असल्याचा व ती सूर्याभोवती फिरत असल्याचा बायबलविरोधी सिद्धान्त मांडला. पुढे बायबलच्या व चर्चच्या धाकाने त्याने तो मागे घेतला... तरी त्याचे अनुयायी व विद्यार्थी त्याचे अध्ययन पुढेच नेत राहिले. अखेर चर्च नरमले व गॅलिलिओ श्रेष्ठ ठरला. बायबल आणि कुराण यांतील माणसांची आयुष्ये व ईश्वराने निर्माण केलेले जग यांचा एकत्र इतिहास पाहिला तर जगाचे वय दहा हजार वर्षांमागे जात नाही. आजचे जग हे अमान्य करते. ती मान्यता नाकारणे मध्ययुगातच सुरू झाले होते. त्यात सगळे देश व त्यातले वैज्ञानिक पुढे होते. स्वतःला तांत्रिक वा चार्वाक मताचे न मानणारे संशोधकही यात पुढे होते.

तांत्रिकांच्या एका (गैर) समजाचा उल्लेखही इथे आवश्यक आहे. रसायने, औषधे, प्राणायामासारखे श्वासाचे व्यायाम व शरीराचे सुदृढपण टिकवण्यासाठी अन्य साधने, त्यांत खानपानादी व्यवहार व त्यावरील नियंत्रणे या साऱ्यांचा योग्य वापर करून मानवी देहच अमर करता येतो असा काही तांत्रिकांचा समज होता. त्यासाठी मृत्यूनंतरही देह मागे ठेवणे, त्यावर प्रयोग करत राहणे असेही प्रकार त्यांतील काहींत होते. 

जिवंतपणीच विशिष्ट तऱ्हेच्या वनस्पतींचा, फळांचा व समागमाचा इष्ट वापर करून माणसाचे आयुष्य मोठे करता व लांबवता येते ही बाब त्यांनी मनावर घेतली होती. त्यासाठी काही चांगले, काही अनिष्ट तर काही ओंगळ वाटावे असे प्रयोगही त्यांनी केले... जीव अमर करणे त्यांनाही साधले नाही... मात्र त्यांच्या या प्रयत्नांनी औषधिशास्त्रात फार मोलाची भर घातली. 

आयुर्वेद व सुश्रुत यांच्या अनेक औषधिद्रव्यांत त्याचमुळे तांत्रिकांच्या औषधिद्रव्यांचा समावेश झाला. दुर्दैवाने त्यांची नावे वैदिक आचार्यांएवढी मोठी झाली नाहीत व ती कुणी स्मरणातही ठेवली नाहीत... मात्र त्यांचे अस्तित्व व त्यांचे प्रयोग यांचा इतिहास आता नाकारता येत नाही. पाश्चात्त्यांचा इतिहास यात पुढे आहे... तर आपण अजूनही त्यांना कचरत मान्यता देत आहोत. 

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर तंत्र Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Part 8 तंत्र Tantra Load More Tags

Add Comment