'राजकारणाच्या भाषा' म्हणजे काय?

'राजकारण-जिज्ञासा' या सदरातील तेरावा लेख

लेखातील सर्व चित्रे: गिरीश सहस्रबुद्धे

सगळ्या नागरिकांनी राजकारणात सहभागी व्हावे असे लोकशाहीत अपेक्षित असले तरी काही लोक राजकारणात इतरांपेक्षा खूप जास्त सक्रिय असतात आणि त्यांना आपण ‘राजकारणी’ किंवा राजकीय कार्यकर्ते/नेते, वगैरे नावांनी ओळखतो. जणू काही राजकारणी नावाची एक वेगळीच सामाजिक वर्गवारी अस्तित्वात येते. अशा व्यक्ती नेहमीच समाजात वेगळ्या उठून दिसतात, कारण त्यांचा पेहेरावदेखील वेगळा असतो! अर्थात हे इतर अनेक देशांपेक्षा भारताच्या बाबतीत जास्त तंतोतंत लागू आहे. साधे तुमच्या-माझ्यासारखे कपडे घालून वावरणारे राजकारणी विरळाच असतात. (याला अर्थातच काही पक्षांचे कार्यकर्ते अपवाद म्हणता येतील; उदाहरणार्थ, कम्युनिस्ट कार्यकर्ते बरेच वेळा इतर चार-चौघांसारख्याच पेहेरावात दिसतात.)

तर, असे वेगळे दिसणारे राजकारणी बोलतात तेही वेगळ्या भाषेत यात आश्चर्य ते काय? म्हणजे ते आपल्यासारखेच मराठी किंवा तमिळ किंवा हिंदी भाषेतून बोलत असतील, पण तरीही त्यांची भाषा वेगळीच असते. हा वेगळेपणा माध्यमाचा नसतो, तर आशयाचा आणि भाषेच्या स्वरूपाचा असतो. इथे सोयीसाठी राजकारणाची भाषा असा शब्द वापरला असला तरी खरा मुद्दा अभिव्यक्तीचा आहे. म्हणजे राजकारण करणारी माणसे कशी व्यक्त होतात, हे पाहण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे. 

गेल्या वर्षी, राजकारण-जिज्ञासा हे सदर सुरू करतानाच्या पहिल्या लेखात राजकारण म्हणजे काय असते याची चर्चा केली होती. त्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राजकारण करणारी व्यक्ती आणि इतर समाजघटक यांच्यात सतत संवाद असणे आवश्यक आणि अपरिहार्य असते. प्रश्न आहे तो हा संवाद कोणत्या चौकटीत किंवा कसा व्यक्त होतो. 

भारतातील राजकारण करणारी मंडळी ‘वेगळ्या’ भाषेत बोलतात याकडे पूर्वीच म्हणजे १९६०च्या दशकात मॉरिस-जोन्स यांनी लक्ष वेधले होते. तेव्हा त्यांनी राजकारणाच्या तीन बोली प्रचलित आहेत असे म्हटले होते: नेहरू-आंबेडकरसारख्यांची ‘आधुनिक’ बोली, बहुसंख्य राजकारणी मंडळी लोकांशी संवाद साधताना जिचा वापर करतात ती ‘पारंपरिक’ बोली (म्हणजे परंपरा-निष्ठ विचार आणि बोलीची चौकट) आणि महात्मा गांधींनी प्रचलित केलेली (विनोबा-जयप्रकाशसारख्यांची) संत-स्वरूपी (saintly) भाषा, या तीन भाषा त्यांनी नोंदल्या होत्या. 

आजघडीला जर राजकारण करणार्‍यांच्या भाषेची वर्गवारी करायची झाले तर अशाच चार समकालीन राजकीय भाषा दाखवून देता येतील. त्या भारतातील राजकीय अनुभवावर बेतलेल्या असल्या तरी एका परीने कुठेही त्यांचा वापर होऊ शकतो, आणि भारतात जरी पहिली भाषा खास करून जास्त प्रचलित असली, तरी बाकीच्या तीन भाषांची उदाहरणे भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही मिळू शकतील.  

सेवेची भाषा

राजकारण करणार्‍यांच्या दृष्टीने, ते सामाजिक कार्य आणि सेवा करीत असतात हे आपण मागे पाहिलेच आहे. या भूमिकेतून जेव्हा राजकारणी मंडळी ‘जनतेशी’ बोलतात तेव्हा ते एका नैतिकदृष्ट्या उंच अशा व्यासपीठावर स्वतः असल्याची कल्पना करतात आणि ‘वरून’, म्हणजे त्या उंचीवरून आपण बोलतो आहोत याचे भान बाळगून बोलतात. उपदेश, संदेश, मार्गदर्शन, युक्तीच्या चार गोष्टी, यांचा वापर या भाषेत होतो. जणू श्रीकृष्ण युद्धावर निघालेल्या अर्जुनाला शिकवत असल्याप्रमाणे अवतारी संदेश देणे हे या भाषेचे वैशिष्ट्य म्हणता येईल (मग प्रसंग विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्याचा असो, की देशाला एखाद्या संकटाच्या वेळी आवाहन करण्याचा असो). एकूणच, आपले कार्य हे अवतार कार्य आहे हे स्वतःला आणि लोकांना सतत लक्षात येईल अशा प्रकारे या प्रकारे या नेत्यांच्या भाषेचा डौल आणि वावर असतो. 

या भाषेत सत्ता हा सेवेसाठी स्वीकारावा लागणारा एक कःपदार्थ नाईलाज असतो. खरा दावा असतो तो त्यागाचा. कुटुंब, आप्तेष्ट, स्वतःच्या भावभवना, खाजगी सुखदुःखे या सगळ्याचा त्याग करून आपण सेवा करतो आहोत, हे कृती आणि उक्तीमधून सतत ठसवले जाते. त्यासाठी संन्यास, विरक्ती, फकिरी इत्यादी बाबींचा संदर्भ दिला जातो. कोणी भगवी वस्त्रे परिधान करून आपल्या संन्यस्त असण्याचा पुरावा देतात, तर कोणी त्याच वस्त्रांमधून आपल्या योगिक सामर्थ्याची प्रचिती देतात. 

सेवेच्या या भाषेत परंपरा असतेच, पण ती मॉरिस-जोन्स यांनी सांगितलेल्या प्रकारची नव्हे. ही परंपरा धर्मकल्पनेवर बेतलेली असते. ही सगळी भाषा संतत्वाची असते तशीच ती परंपरेशी असलेला नातेसंबंध अधोरेखित करणारी असते. एखादी व्यक्ती सेवा आणि त्याग यांच्यावर भर देत असेल तर आपोआपच ती परंपरेची पाईक असणार, परंपरेची बूज राखणारी असणार, असे लोक मानतात आणि त्या नेत्यावर जास्त आपुलकीने भिस्त ठेवतात 

सत्ता आणि सेवा यांच्यातील द्वंद्व अधोरेखित करून आपण वेगळे राजकारण करतो आहोत, त्यामागे मोठी ईश्वरी योजना आहे असे ठसवण्याचा प्रयत्न या भाषेत असतो. लोक राजकारणाला स्वार्थाचे, संकुचित फायद्याचे आणि कारस्थानांचे क्षेत्र मानतात; म्हणून त्या लोकप्रवादापेक्षा आपण करतो आहोत ते कसे वेगळे आहे यावर भर देण्यासाठी अशी भाषा प्रभावी ठरू शकते. शिवाय, सेवेच्या आणि संन्यासाच्या भाषेत सुष्ट आणि दुष्ट यांचे किंवा चांगले आणि वाईट यांचे युद्ध कल्पिलेले असते, त्यामुळे राजकारण हे दोन भिन्न प्रवृत्तींचे युद्ध आहे, हे लोकांवर ठसवता येते. 

अस्मितेची भाषा 

दुसरी, आणि भारताच्या पलीकडेदेखील मुबलकपणे वापरली जाणारी भाषा असते ती अस्मितेची. समाजाचे एखाद्या तटबंदीत रूपांतर करून कोण आपले आणि कोण परके हे ठरवायचे आणि ‘आपल्यांचे’ राजकारण करायचे, अशी ही भाषा असते. अर्थातच देशपातळीवर ती राष्ट्राच्या नावाने करता येत असल्यामुळे जास्त प्रकर्षाने आढळते. देशप्रेम ही लोकांच्या मनात असलेली नित्यभावना वापरुन आणि ओलांडून त्यांना इतिहास, परंपरा आणि स्मृती यांच्यामध्ये गुंतवून ठेवणारी प्रभावी भाषा म्हणजे राष्ट्राची भाषा. नेता जे काही करतो आहे ते त्याच्या पक्षासाठी नाही, तर देशासाठी करतो आहे, देश/राष्ट्र हे अव्वल आणि अंतिम मूल्य आहे, लोकांनी देखील देशासाठी त्याग करायचा असतो आणि देशासाठी सर्व अडचणी सोसणे म्हणजे देशसेवा असते, इत्यादी युक्तिवाद या राजकीय भाषेत केले जातात. 

पण या भाषेचे खरे वैशिष्ट्य असते ते तिच्या पर-लक्षी स्वरुपात. आपले राष्ट्र, आपली भाषा, आपला प्रदेश, आपला धर्म, आपली जात, श्रेष्ठ आहे हा दावा  केला जातो. कारण अस्मितेची भाषा ही ‘वगळण्याची’ भाषा असते. कोण आपले नाहीत, आणि कोण शत्रू आहेत याची चर्चा हा या भाषेचा गाभा असतो. जे राजकारणी अशी भाषा करतात त्यांची भाषणे, जाहीरनामे, घोषणा या सगळ्यांवर खरी छाप असते तो आपले आणि परके यांच्यात सीमाभिंती तयार करण्याच्या प्रयत्नांची. मग कधी या भिंतीच्या पलीकडे दुसरे ‘शत्रूदेश’ असतात, कधी आंतरराष्ट्रीय कारस्थान असते, कधी आपल्याच देशातले विशिष्ट धर्माचे-जातीचे लोक असतात तर कधी आपल्या भाषेपेक्षा वेगळी भाषा असणारे समूह असतात. 

या भाषेत सतत, आक्रमण, शत्रू, लढाई, इतिहास, समर्पण, यांची रेलचेल असते; इतिहासातील सगळ्या घडामोडी, आपण आणि परके यांच्या चौकटीत बघितल्या जातात आणि बघायला सांगितल्या जातात. देशाची, राज्याची, प्रदेशाची, धर्माची, अशी कशाची तरी अस्मिता मध्यवर्ती मानून ही भाषा रचली जाते. आणि मग नेत्याला, त्याच्या राजकारणाला विरोध करणारे हे शत्रू, गद्दार, फितूर, वगैरे मानले जातात. अस्मितेची भाषा एकाचवेळी आक्रमक आणि भावनांना हात घालणारी असते. किंबहुना त्यागाच्या भावनिक आवाहनापेक्षा अस्मितेचे भावनिक आवाहन जास्त आकर्षक आणि म्हणूनच जास्त ताकदीचे असते. या भाषेत अर्थातच, वर म्हटल्याप्रमाणे, राष्ट्राच्या अस्मितेचे स्थान सर्वांत उंच असते. कारण त्या अस्मितेला सर्वांत जास्त व्यापक मान्यता असते आणि त्यात ‘परकीय’ शत्रू उपलब्ध असतात. पण शिवाय, देशभरात ठिकठिकाणी विशिष्ट अस्मितांची भाषा बोलून राजकारण करणे ही अगदी नित्याची बाब असते. 

अधिकारांची भाषा 

राजकारणात बरेच वेळा प्रभावीपणे वापरली जाणारी तिसरी भाषा असते ती न्याय आणि अधिकारांची. एखाद्या विशिष्ट समूहाच्या अधिकारांचा दावा करून त्यांना स्फूर्ती देणारी, त्यांना जागृत करू पाहणारी, त्यांना कृतिप्रवृत्त करणारी अशी ही भाषा असते. त्यात सामाजिक रचनेच्या चिकित्सेवर भर असतो. मात्र, याचा अर्थ ती भाषा केवळ वैचारिक असते असे नाही; तिच्यात देखील प्रतीके, घोषणा यांना महत्त्व असतेच, पण त्यांचा रोख हा न्याय-अन्याय यांच्या परिभाषेवर असतो. 

अधिकारांची भाषा ही बव्हंशी लढाऊ आणि सामाजिक विभागणीवर आधारित अशी असते. म्हणजे, समाजाची विभागणी दोन प्रतिपक्षांमध्ये झाली आहे हे गृहीत धरून, त्यांच्यातील मतभेद हे वास्तविक कसे जास्त खोलवरचे हितसंबधांचे भेद आहेत, आणि एक समूह आपल्या फायद्यासाठी दुसर्‍या समूहाचे अधिकार कसे नाकारतो याची उजळणी करण्यावर या राजकारणाचा भर असतो. अशी भाषा स्वतःला न्यायाची किंवा सामाजिक न्यायाची भाषा असल्याचे मानते आणि तशीच मांडणी करून लोकांपुढे जाते. मुख्यतः वर्ग, जात, वर्ण, लिंगभाव अशा संरचनात्मक आधारांवर जेव्हा राजकारण उभे केले जाते तेव्हा त्याची भाषा ही न्यायाची आणि अधिकारांची बनते. 

अर्थातच, या भाषेतही प्रतिपक्ष हा धोकादायक, कारस्थानी, शत्रूवत वगैरे कसा आहे, हे सांगण्यावर भर असतोच. कारण राजकीय संघर्षासाठी एखाद्या समूहाला उद्युक्त करायचे असेल तर त्यासाठी आक्रमक, भावनिक आणि टोकदार मांडणीची गरज असते. असे संघर्ष आपल्याच नेतृत्वाखाली व्हावेत आणि आपण सांगतो तेच सामाजिक अंतराय हे राजकारणाच्या केंद्रस्थानी राहावेत याची दक्षता या भाषेला घ्यावी लागते. त्या भाषेच्या प्रभावाखाली येणार्‍यांच्या दृष्टीने, राजकीय संघर्षाचे त्या भाषेतून केले जाणारे विश्लेषण हेच अचूक आणि खरेखुरे (अस्सल) असते. त्यामुळे इतर सर्व विश्लेषणांबद्दल तुच्छता आणि पर्यायी मार्गांबद्दल संशय हे देखील अशा लढाऊ भाषेचे भाग असतात. 

व्यवसायाची भाषा 

अनेक राजकारणी हे अट्टल व्यवसायिकपणे शिस्तीने राजकारण करीत असतात. ते सोयीने कधी सेवेची तर कधी आणखी कुठली भाषा वापरतीलही, पण त्यांची मुख्य भाषा ही पद्धतशीर व्यवसायची भाषा असते. म्हणजे एकीकडे स्वतःशी बोलताना-विचार करताना ते स्वच्छ नफ्यातोट्याची चौकट वापरतील तर दुसरीकडे लोकांशी बोलताना देवाणघेवाण आणि ऐहिक फायद्यांची भाषा करतील. 

यालाच व्यावसायिक राजकारणाची भाषा असे म्हणता येते. ती वापरणारे राजकारणी हे मुख्यतः राजकीय उद्योजक या वर्गवारीतले असतात. लोक किंवा जनता हे आपले ग्राहक आहेत, त्यांना समाधानी ठेवले नाही, बांधून ठेवले नाही तर ते ग्राहकांप्रमाणे दुसर्‍या दुकानात जातील याची जाणीव ठेवून नागरिकांना बांधून ठेवण्याची ही भाषा असते. असे बांधून ठेवण्यासाठी इतर कोणाही चतुर उद्योजकाप्रमाणे, वेगवेगळ्या स्कीम्स चालवणे, त्यांची चांगली जाहिरात करणे, लोकांना आवडेल अशी राजकीय रोषणाई करणे, डिस्काउंट, कमिशन यांचे आकर्षण दाखवणे, असे उपाय अवलंबले जातात. 

ही भाषा राजकारणात सर्रास वापरली जाते, कारण त्यात टप्प्याटप्प्याने सत्ता मिळवत जाणे हे मध्यवर्ती उद्दिष्ट असते आणि नागरिक हे आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठीचे मुख्य साधन आहे याचे भान असते. त्यामुळे नागरिकांना हवे ते देऊ करून त्यांचे पाठबळ मिळवणे असा व्यावहारिक हिशेब या राजकारणात ठेवलेला असतो. मग नागरिकांना बेकायदेशीर सुविधा देऊ करून, सार्वजनिक कल्याणाच्या परिभाषेत एक रुपयात धन्य किंवा पाच रुपयांत जेवण देऊ करून, किंवा त्यांच्यासाठी यात्रा आयोजित करून नाहीतर दिवाळीत शहरी भागात वसुबारसेला गायी उपलब्ध करून, एकप्रकारे प्रोफेशनल संबंध स्थापन केले जातात आणि टिकवले जातात. 

कधी-कधी राजकारणाच्या याच भाषेमधून पाठिराख्यांचे याचक किंवा आश्रितांमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न देखील केले जातात, कारण त्यातून जास्त टिकावू पाठिंबा मिळण्याची शक्यता असते असे मानले जाते. सेवेच्या भाषेप्रमाणेच ही भाषा देखील खास ‘भारतीय’ वाटू शकते; पण प्रत्यक्षात मात्र ती जगात अनेक देशांमध्ये प्रचलित आहे. तिच्यात खास भारतीय असे काही नही. 

सार्वजनिक विवेकाचा प्रश्न 

जनतेला आणि आपल्या अनुयायांना ‘संदेश देणे’ या कृतीला राजकारणात मध्यवर्ती महत्व असते, आणि त्यासाठी राजकारण करणारी व्यक्ती आणि समूह (संघटना/पक्ष) यांची त्यांच्या संदेशाला साजेशी प्रतिमा निर्माण करणे आवश्यक असते. त्यामुळे नेते आणि पक्ष हे आपापल्या निवडीप्रमाणे एक भाषिक चौकट निवडून, तिच्या आधारे लोकांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न करीत असतात. म्हणजेच, कोणते राजकारण करायचे यावर भाषेची निवड ठरते.  

मात्र, राजकारणाच्या भाषेचा संबंध समाजातील सार्वजनिक विश्व कोणत्या कल्पनांभोवती साकारते याच्याशी देखील असतो. राजकारणाच्या प्रत्येक भाषेतून एकेका विशिष्ट प्रकारचा सार्वजनिक विवेक साकार होत असतो. त्यागाच्या भाषेतून जनतेला भोळसट बनवण्याचा परिणाम साधतो; अस्मितेच्या भाषेतून लोकांचे आक्रमक हत्यारात रूपांतर होते; न्यायाच्या भाषेतून कधी लोक ‘नागरिक’ बनतात तर कधी अप्रत्यक्ष अस्मितांचे वाहक बनतात; आणि  व्यावसायिक भाषेतून लोक स्वतःला ग्राहक-याचक मानू लागतात आणि दुकानदारीचे साधन बनतात. या प्रत्येक परिणामशी सुसंगत अशा रीतीने नेत्यांची एकेक प्रतिमा तयार होते, आणि राजकारण नावाच्या व्यवहाराचे देखील भाषा-निहाय प्रारूप तयार होते. 

म्हणूनच आपले राजकारण करताना नेत्यांना या चारपैकी कोणत्या भाषेची चौकट ही आपली ओळख म्हणून पुढे आणायची याचा काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला कोणत्या प्रकारचा, किती लोकशाहीवादी, किती संकुचित किंवा किती आक्रस्ताळा अथवा किती साधनमात्र (म्हणजे केवळ साधन म्हणून असलेला—मूल्य म्हणून नव्हे, असा) सार्वजनिक विवेक हवा आहे, त्यानुसार नेते/पक्ष भाषेची निवड करतात. या अर्थाने, या भाषांचे मूल्यमापन करताना, केवळ अमुक एक भाषा वापरुन नेत्यांचा काय फायदा होतो एवढेच पाहाणे पुरेसे नाही, तर या प्रत्येक भाषेतून राजकारण नावाच्या व्यवहाराबद्दल कोणत्या प्रकारची सार्वजनिक प्रतिक्रिया तयार होते आणि त्या भाषेतून कोणता सार्वजनिक विवेक साकारणे शक्य होते याचेही भान ठेवावे लागते.   

- सुहास पळशीकर
suhaspalshikar@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. 'राजकारणाचा ताळेबंद' (साधना प्रकाशन) आणि 'Indian Democracy' (Oxford University Press) ही त्यांची दोन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.)

विशेष नोंद: 

सहा महिन्यांपूर्वी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्याशी भाषा, साहित्य व संस्कृती या विषयावर अनौपचारिक गप्पा चालल्या होत्या. तेव्हा बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, "ग. प्र. प्रधान सरांचा राजकारणी लोकांची भाषा हा एक अफलातून लेख 'भाषा आणि जीवन' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. तो आम्ही दहा वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या एस. वाय. बी. एससी. च्या व्यावहारिक  मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात लावला होता;  आणि आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या साहित्यभूषण परीक्षेसाठीच्या पुस्तकातही घेतला आहे."  तेव्हा प्रस्तुत संपादकाचे कुतूहल बरेच जागृत झाले. कारण प्रधान सरांच्या कोणत्याही पुस्तकात तो लेख समाविष्ट नाही आणि त्यांच्याशी शेवटच्या  सहा वर्षांत जवळून संबंध आला तेव्हाही त्यांच्याकडून त्या लेखाचा संदर्भ कधी ऐकला नव्हता. म्हणून योग्य वेळी तो लेख मिळवून साधना किंवा कर्तव्य वर  पुनर्मुद्रित करायचा आणि प्रधान सरांच्या असंग्रहित लेखांचे पुस्तक करायचे आहे, त्यातही घ्यायचा असे मनोमन ठरवले होते.

गेल्या आठवड्यात 'राजकारण जिज्ञासा' या सदरासाठी सुहास पळशीकर यांचा लेख 'राजकारणातील भाषा' या विषयावर आला, तेव्हा डॉ. धोंडगे यांच्याशी झालेला तो संवाद पुन्हा आठवला. मग त्यांना विनंती केली, "तो लेख शोधून  पाठवा, म्हणजे दोन्ही लेख एकाच दिवशी कर्तव्यवरून प्रसिद्ध करता येतील, वाचकांना दुधात साखर असा काहीसा अनुभव देता येईल.." त्यांनी तत्परतेने तो लेख पाठवला. सोबतच्या लिंकवर क्लिक करून तो वाचता येईल. 

- संपादक

राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि त्यांची भाषा- ग. प्र. प्रधान 

Tags: राजकारण सुहास पळशीकर राजकारणाची भाषा Suhas Palshikar Politics Politics of language Load More Tags

Comments:

श्रद्धा झोले

राजकीय भाषेची vayshishtay कोण ते.

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

सुहास पळशीकर आणि ग. प्र. प्रधान या दोघांही अभ्यासु माणसांचे राजकारणातील भाषा या विषयावरील लेख वाचले. आवडले. लेख उत्सुकता वाढविणारे आहेत. प्रत्येकजण भाषा जशी वेगवेगळ्या पध्दतीने वापरतो तशीच प्रत्येक क्षेत्रांची , वर्गांची ,वयोगटांची , भाषाही वेगवेगळ्या प्रकारात वापरली जाते. भाषा ही जशी संवादाची वाहक आहे ,तशीच ती अभिव्यक्तीचे आविष्काराचे साधनही आहे. .भाषेचे म्हणून काही एक सामर्थ्य आहे ,त्याचा आपण वापर कसा करतो , ते त्या भाषकांवर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या साहाय्याने जशी सत्ता मिळवता येते तशीच ती घालवताही येते. कधी ती शोषणाचे हत्यार बनविता येते. तर कधी ती क्रांतीला सहाय्यक ठरते. त्यानुसार राजकीय क्षेत्रातील नेते ,मुत्सुद्दी तिचा वापर अगदी कटाक्षाने , जाणिवपूर्वक , हेतू पुर्वक करताना आढळतात. अशी भाषा वापरणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व , त्यांच्यावरील संस्कार ,प्रभाव , शिक्षण , सभोवताल ची , कुटुंबाची परिस्थिती या सगळ्यांतून भाषा घडते ,घडविली जाते. त्यामुळे नावाजलेले राजकारणी भाषा कशी वापरतात आणि कोणत्या कारणांसाठी वापरतात यांचे नेमके विश्लेषण दोघांच्याही लेखांत वाचायला मिळते. ग .प्र. प्रधान सरांचा लेख तर महत् प्रयासाने मिळवून वाचकांच्या भेटीला आणल्याबद्दल संपादकांना धन्यवाद द्यायला हवेत.

डॉ अनिल खांडेकर

डॉ पळशीकर यांच्या लेखाची नेहमीच वाट पहात असतो. राजकारणाची भाषा , याबद्दल उत्सुकता होती. ठसठशीत आणि रेखीव , बांधलेला लेख आहे. एक महत्त्वाचे म्हणजे .. लेख चित्रदर्शी आहे. प्रत्येक मुद्ध्या संबंधात विचार वाचताना तो विचार स्पष्ट करणारी व्यक्ती आपोआपच समोर येते.. म्हणजे अगदी नावाने नसली तरी व्यक्ती चित्र नजरे समोर येते. धन्यवाद.

PRABHU SHRIRAM PURNAVALE

Khup Chan lihata Sir Tumhi... Tumche likhan vachun vicharaychi unchi nakki vadat aahe... Tumhi nehami asecha lihat raha....

Add Comment

संबंधित लेख