हॅक्सॉ रिज : निःशस्त्र सैनिकाच्या पराक्रमाची कहाणी

युद्धपटांवरील लेखमाला : 9

काही चित्रपट आपण पाहतो तेव्हा त्यातील घटना आपल्याला अविश्वसनीय वाटतात पण नंतर जेव्हा आपल्याला कळते की, त्या सत्य घटना होत्या तेव्हा आपण त्यावर अधिक संशोधन करतो आणि प्रत्यक्षात ‘हिरो’ असलेल्या या चित्रपटाच्या पडद्यावरील आविष्काराला मनोमन सलाम करतो. याच पठडीतला ‘हॅक्सॉ रिज’ (Hacksaw Ridge) हा 2016मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट अमेरिका – जपानच्या ओकिनावा बेटावरील युद्धावर आधारित आहे.

जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला केल्याची तार तेव्हा विन्स्टन चर्चिल यांना मिळाली तेव्हा ते गदागदा हसायला लागले. त्यांच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांनी तार वाचून “ह्यात हसण्यासारखं काय आहे? ही तर चिंतेची बाब आहे” असे म्हटले तेव्हा चर्चिल म्हणाले, “अमेरिकेचा नाविक तळ उध्वस्त झाला म्हणून मी हसत नाहीये तर आपण हे महायुद्ध आता जिंकणार याची खात्री झाल्याने हसत आहे.”

जपानने पर्ल हार्बरवर केलेला हल्ला हा अमेरिकेच्या अस्मितेवर केलेला हल्ला होता त्यामुळे अमेरिका पेटून उठली आणि आपली अलिप्ततेची झूल झुगारून पूर्ण ताकदीने महायुद्धात उतरली. विजयाचे पारडे दोस्त राष्ट्रांकडे झुकले आणि चर्चिलचे द्रष्टेपण अधोरेखित झाले.

दुसऱ्या महायुद्धाचा पैस खूप मोठा होता आणि त्यात अनेक घनघोर युद्धे झाली. त्यात सर्वाधिक द्वेषाने आणि त्वेषाने लढलेली युद्धे अमेरिका आणि जपानमधील होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हिरोशिमा आणि नागासाकीमुळे जपानला अजूनही सहानुभूती मिळते पण दुसऱ्या महायुद्धात जपानने दाखवलेले क्रौर्य, अत्याचार नाझींनी केलेल्या अत्याचारांपेक्षा भयानक होते.

काही चित्रपट आपण पाहतो तेव्हा त्यातील घटना आपल्याला अविश्वसनीय वाटतात पण नंतर जेव्हा आपल्याला कळते की, त्या सत्य घटना होत्या तेव्हा आपण त्यावर अधिक संशोधन करतो आणि प्रत्यक्षात ‘हिरो’ असलेल्या या चित्रपटाच्या पडद्यावरील आविष्काराला मनोमन सलाम करतो. याच पठडीतला ‘हॅक्सॉ रिज’ (Hacksaw Ridge) हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट अमेरिका – जपानच्या ओकिनावा बेटावरील युद्धावर आधारित आहे. एप्रिल ते जून 1945 असे तीन महिने चाललेल्या या युद्धात अमेरिकेचे सुमारे 12000 सैनिक गतप्राण झाले. जपानचीदेखील अपरिमित हानी झाली. यावरून या युद्धाची संहारकता किती होती ते समजून येते. पर्ल हार्बर नंतर अमेरिकन सैन्य जपानमध्ये थेट मुसंडी मारण्याचे निकराचे प्रयत्न करत होते पण भू-राजकीय परिस्थितीमुळे त्यांना यश येत नव्हते. अमेरिकन आरमार जरी प्रबळ होते तरी जपानची वायुसेना आणि पाणबुड्या यांच्या क्षमतेमुळे विमानवाहू नौका जपान जवळ पॅसिफिक समुद्रात नेणे आत्मघात करण्यासारखे होते त्यामुळे अमेरिकेला जपान जवळ ‘बेस’ तयार करण्याची आवश्यकता होती. 

ओकिनावा बेट जपानच्या दक्षिणेला फार्मोसाच्या मध्ये सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते आणि या बेटाला बेस बनवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता. हे बेट मिळाले तर जपान हरणार होते आणि दुसरे महायुद्ध संपणार होते कारण हिटलरने आत्महत्या केलेली होती आणि जर्मनीचा पाडाव झालेला होता. येथे हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे की हे युद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या सहा वर्षांच्या काळातील जपानच्या भूमीवर झालेले पहिले युद्ध होते आणि दुसऱ्या महायुद्धातील शेवटचे मोठे युद्ध होते.

चित्रपटाची सुरवात होते ती स्लो मोशन मध्ये. टॉप अँगलने लावलेला कॅमेरा धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे छिन्नविछिन्न मृतदेह दाखवतो. मग फिरता कॅमेरा आजूबाजूला घडणारे युद्ध दाखवतो. अशा वेळी सर्वसाधारणपणे पार्श्वसंगीत कर्णकर्कश (युद्ध दृश्यांना साजेसे) असण्याऐवजी इथे पार्श्वसंगीत म्हणून पियानो आणि व्हायोलीनची धून ऐकू येते. दिग्दर्शक एकाच वेळी क्रौर्य ‘दाखवतो’ आणि कारुण्य ‘ऐकवतो’. सजग प्रेक्षकाला दिग्दर्शक कदाचित सांगतो आहे की, हा चित्रपट ‘बघण्याचा’ नाही तर ‘अनुभवण्याचा’ आहे.

हार्पर ली या लेखिकेचे 1960मध्ये प्रकाशित झालेले पुलित्झर पुरस्कारप्राप्त पुस्तक आहे - ‘To Kill A Mockingbird’. त्यात एक वाक्य आहे, ‘Courage is not a man with a gun in his hand’. या एकाच वाक्यात हॅक्सॉ रिज या चित्रपटाचे संपूर्ण सार सांगता येईल.  हा चित्रपट एका निःशस्त्र सैनिकाच्या अतुलनीय पराक्रमावर बेतलेला आहे.

या चित्रपटात - पटकथेची गरज म्हणून असेल कदाचित - मध्ये मध्ये फ्लॅशबॅकचे तंत्र वापरले असले आणि हे अवस्थांतर (transition) कधी कधी लक्ष विचलित करणारे असले तरी स्थूलमानाने हा चित्रपट दोन भागांत विभागला गेलेला आहे. पहिला भाग नायकाची कौटुंबिक पार्श्वभूमी, सैन्यात जाण्याची निवड आणि ट्रेनिंग यांनी व्यापलेला आहे. तर दुसरा भाग (बहुतेक मध्यंतरानंतर) पूर्णपणे युद्धाने व्यापलेला आहे.

हा युद्धपट असला तरी ही एका प्रेमळ,पापभिरू, सश्रद्ध, धार्मिक, संवेदनशील अशा डेसमंड डॉस या अमेरिकन तरुणाची कथा आहे; जो महायुद्धातील अमेरिकेची परिस्थिती डोळसपणे बघतो आणि आपल्या कर्तव्यबुद्धीला स्मरून सैन्यात दाखल होतो. त्याच्या काटकुळया शरीरयष्टीमुळे त्याच्या कंपनीचा अत्यंत रांगड्या शिस्तीचा ट्रेनर सार्जंट हॉवेल त्याची “जोराचा वारा आला तर लांब राहा!” अशी फिरकीही घेतो. पण प्रत्यक्ष ट्रेनिंगमध्ये तो बलदंड शरीरयष्टीच्या इतर सैनिकांच्या तोडीस तोड किंबहुना काकणभर सरसच ठरतो.

ट्रेनिंगचा महत्त्वाचा भाग म्हणून रायफल शुटींगचा सराव सुरु होतो. ट्रेनर प्रथम रायफलला ‘गर्लफ्रेंड’ची उपमा देतो आणि सांगतो, “आता ही रायफल हेच तुमचं सर्वस्व आहे”. सर्वजण रायफल उचलून सरावाला तयार होतात पण डेसमंड रायफल उचलत नाही. ट्रेनर उपहासाने विचारतो, “काय रे रायफल का उचलली नाहीस, तुला रायफलचा रंग आवडला नाही का?”
“नाही सर, कोणतेही शस्त्र हातात घेणार नाही अशी शपथ मी फार पूर्वीच घेतली आहे आणि मी हे आर्मीला कळवले होते.”

हा संवाद ऐकून प्रेक्षकाला वाटते हा काय वेडेपणा चालला आहे ? पण प्रेक्षकाचा संभ्रम पुढील 30 मिनिटांत दूर होणार असतो आणि त्याचे विचार ‘यू टर्न’ घेणार असतात. कोणत्याही संवेदनशील, ‘अनुभवण्याच्या’ चित्रपटाची जमेची बाजू असते ती म्हणजे ‘संवाद’. या चित्रपटातील संवाद संतुलित, विचारप्रवृत्त करणारे आहेत आणि मुख्य म्हणजे ते एकांगी नाहीत.

ट्रेनर त्याला कंपनी कमांडर कॅप्टन ग्लोवरकडे घेऊन जातो. कॅप्टन ग्लोवर त्याची फाईल वाचून म्हणतो, “तू Conscientious Objector आहेस तर.” 

(Conscientious Objector चा शब्दशः अर्थ ‘सदसदविवेकबुद्धीशी प्रामाणिक’ असा होतो. प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्मात स्वेच्छेने Conscientious Objector होण्याची दीक्षा घेता येते आणि असे लोक हिंसा करत नाहीत. डेसमंड Conscientious Objector होण्याची कारणे चित्रपटात पटकथेच्या ओघात आपल्याला कळतात.)

“हिंसा करणे ही युद्धात नैसर्गिकरीत्या घडणारी गोष्ट आहे”
“सर मी सर्व कर्तव्य निभावीन, झेंड्याला सलाम करीन, युनिफॉर्म घालीन. पण शस्त्र उचलणार नाही, हत्या करणार नाही.”
कॅप्टन ग्लोवर उपहासाने विचारतो, “तुझ्या आणखी काही इच्छा असतील तर त्यापण सांग. जेणेकरून तुझं इथलं वास्तव्य आरामदायी होईल.”
“सर शनिवार हा माझा Sabbath (ईश्वरचिंतन)चा दिवस असतो. त्या दिवशी मी काम करणार नाही.”
“ठीक आहे मग जपान्यांना सांगू, शनिवारी हल्ला करू नका.”

विषय संपवण्याच्या दृष्टीने कॅप्टन ग्लोवर म्हणतो, “हे बघ डेसमंड. मूर्खपणा बास झाला. आता मी काय सांगतो ते ऐक. माझी इच्छा तुझ्यासारखी गुंतागुंतीची नाही तर थेट आहे, ती म्हणजे इथे माझ्या ऑर्डर्स पाळाव्या लागतील. तू इथे माझ्या ऑर्डर्स पळणार नसशील तर युद्धभूमीवर पाळशील यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.”
“सॉरी सर, मी शस्त्र उचलणार नाही”
“ठीक आहे, मी तुला सेक्शन आठ अंतर्गत मानसिक अवस्था ठीक नसल्याकारणाने बरखास्त करतो.” 

अमेरिकन सैन्याच्या नियमानुसार डेसमंडला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवले जाते कारण त्याने अहवाल दिल्यानंतरच ‘सेक्शन आठ’खाली बरखास्त करता येणार असते. मानसोपचार तज्ज्ञ आणि डेसमंड यांमधील संवाददेखील वेधक आहे. 
“तर तुझं असं म्हणणं आहे की, तुझा देवाशी संवाद होतो.”
“सर, मी वेडा नाही. मी देवाला समजून घेतो पण देवाशी माझा संवाद होत नाही. जसा आता आपला संवाद होत नाहीये.”
“मग आता आपण काय करतोय?”
“सर, हा संवाद नाहीये. तुम्ही मला मनोरुग्ण ठरवून मला बरखास्त करण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. पण मी जो/जसा नाही तो/तसा आहे असा भासवण्याचा प्रयत्न करणार नाही. मी जसा आहे तसा आहे.”
“तुला देवाने असं सांगितलं आहे का की, रायफलला हात लावायचा नाही.”
“सर देवाची सर्वात महत्त्वाची शिकवण आहे की, हिंसा करू नका.”

डेसमंडचा युक्तिवाद बिनतोड ठरतो आणि मानसोपचार तज्ज्ञ अहवाल देतो की, डेसमंडचे विचार ‘युनिक’ आहेत पण तो मनोरुग्ण नाही आणि तो इतर ट्रेनिंग पूर्ण करतोय त्यामुळे सेक्शन आठ खाली बरखास्त करण्यास पात्र नाही. कॅप्टन ग्लोवर विचारात पडतो. त्याचे म्हणणेही योग्यच असते. एकाने शिस्त पाळत नाही म्हटल्यावर संपूर्ण सैन्यात बेशिस्त निर्माण होण्याची शक्यता असते. डेसमंडने स्वेच्छानिवृत्ती घ्यावी म्हणून कॅप्टन आणि ट्रेनर अनेक क्लृप्त्या लढवतात. त्याला शौचालय साफ करायला ठेवले जाते, त्याच्यात आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांत फूट पाडली जाईल, त्यांना त्याच्याबद्दल चीड येईल असे प्रयत्न केले जातात. त्याला सतत “तू भ्याड आहेस” असे हिणवले जाते. त्याला मारहाण करून जखमी केले जाते. त्याची अवस्था पाहून शिस्तप्रिय ट्रेनरदेखील थोडा खजील होतो आणि मृदू सुरात म्हणतो, “मुला, हा वेडा हट्ट सोड. हे कोणासाठीही चांगलं नाही. निवृत्त हो,त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. चल मी तुला सोडून येतो.”
“नाही सर, सॉरी. आज माझी गार्ड ड्युटी आहे.”


हेही वाचा : व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल : वर्तमानावरचं भाष्य - मीना कर्णिक


डेसमंड ऐकणार नाही हे कळल्यावर ट्रेनर त्याला मारहाण केलेल्यांची नावे घ्यायला सांगतो. 

डेसमंड कोणाचही नाव घेत नाही आणि म्हणतो, “सर, कोण म्हटलं की, मला मारहाण झाली?”
“मग तू झोपेत पडलास आणि तुला मार लागला का?”
“असू शकेल कारण मी खूप गाढ झोपतो.”
ट्रेनरला कळते की, हे पाणी काहीतरी वेगळेच आहे.

ट्रेनिंग संपते आणि युद्धावर जाण्याआधी सैनिकांना काही दिवसांची रजा मिळणार असते. डेसमंडने रजा मिळेल असे गृहीत धरून लग्न समारंभ ठेवलेला असतो. पण रायफल ट्रेनिंग पूर्ण झालेले नाही या कारणास्तव त्याला रजा नाकारली जाते आणि त्याच्यासमोर दोन पर्याय ठेवले जातात, ते म्हणजे स्वेच्छा निवृत्ती किंवा कोर्ट मार्शलला सामोरे जाणे. डेसमंड स्वेच्छानिवृत्ती अर्थातच नाकारतो त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवले जाते आणि त्याचे लग्नदेखील रद्द होते.

कॅप्टन ग्लोवरला डेसमंडबद्दल वैयक्तिक आकस नसतो पण राष्ट्रहिताच्या दृष्टीने डेसमंडची भूमिका त्याला पटत नसते. डेसमंड तुरुंगात राहावा अशीदेखील त्याची इच्छा नसते. त्यामुळे तो तुरुंगात पुन्हा त्याला समजावायला जातो.
“माझाही बायबलवर विश्वास आहे. पण इथे सारं जग उध्वस्त व्हायची वेळ आली आहे आणि तू हे काय खूळ घेऊन बसला आहेस?”
“सर, माझ्याकडे इतक्या क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं नाहीत पण माझ्या मूल्यांवर हल्ला होऊन ती उध्वस्त होताना मी पाहू शकत नाही.”
“जपान्यांनी हल्ला केला तर तू काय बायबल वाचणार आहेस का?”
“सर माझ्या सहकाऱ्यांसाठी मी मरायलादेखील तयार आहे.”
“मरून युद्ध जिंकली जात नाहीत. तू तुरुंगात राहावंस अशी कोणाचीच इच्छा नाही. त्यामुळे कोर्ट मार्शलमध्ये गुन्हा कबूल कर, कोर्ट तुला दया दाखवून सोडून देईल. मग शांतपणे ईश्वरचिंतन कर. फक्त शूर पुरुषांना युद्धावर जाऊ दे.” इथे कॅप्टन ग्लोवरचा युक्तिवाद बिनतोड वाटतो.

शेवटचा प्रयत्न म्हणून त्याची प्रेयसीही त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करते. डेसमंड तिला म्हणतो, “मी कोणाचाही जीव घेणार नाही असं म्हणतोय तर हे लोक मला गुन्हेगार का ठरवत आहेत?” डेसमंडही काही चुकीचे बोलत नाही आहे असे इथे वाटते. 

आता समस्या आणखी जटील झालेली असते कारण कोर्ट मार्शलमध्ये गुन्हा कबूल करून, कोर्टाच्या दयेवर सुटणे हे आयुष्यभर मानहानीचे ठरणार असते आणि गुन्हा नाकबूल केला तर तुरुंगवास अटळ असतो. कोर्ट मार्शल सुरु होते, सर्वांना अंधुकशी आशा असते की, डेसमंड गुन्हा कबूल करेल पण तो “Not Guilty” म्हणतो. प्रतिपक्षाचा वकील कोर्टाला म्हणतो की, आरोपीला एकच प्रश्न विचारावा, “तू तुझ्या कमांडरच्या आज्ञा पाळल्या नाहीस हे तुला मान्य आहे का?” कोर्ट डेसमंडला विचारते. 
“मला मान्य आहे सर”
“मग तू हा खटला का लढत आहेस? युद्धभूमीवर निःशस्त्र जाणे हे तुझ्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे?”

यावर डेसमंड जे उत्तर देतो ते उतर म्हणजे या चित्रपटाचा परमोच्च बिंदू आहे. 
“कारण सर, जेव्हा पर्ल हार्बरवर हल्ला झाला तेव्हा मला वाटलं हा माझ्यावर वैयक्तिक हल्ला झालेला आहे. इतर लोक देशासाठी मरत आहेत अशावेळी मी घरात स्वस्थ बसणं योग्य नाही. मला कुठलाही धोका पत्करून माझे कर्तव्य बजावायचे आहे. इतर लोक जीव घेत असतील, पण मी जीव वाचवत असेन. जग स्वत:ला फाडायला निघालंय, मी एक ठिगळ लावायचा प्रयत्न करतोय तो मला करू द्या.”

त्याचे निवेदन ऐकून सगळे सद्गदित होतात पण कोर्ट नियमाला बांधील असते आणि त्यानुसार डेसमंडला शिक्षा सुनावणार तितक्यात डेसमंडचे वडील - जे स्वत: शौर्य पुरस्कार प्राप्त निवृत्त सैनिक असतात, ते बिग्रेडियर जनरलचे पत्र कोर्टाच्या हातात देतात, त्यात असा निर्वाळा दिलेला असतो की, डेसमंड डॉसचे Conscientious Objector म्हणून असलेले अधिकार अमेरिकन राज्यघटनेने संरक्षित केलेले आहेत आणि त्याचा संकोच करता येणार नाही. 

कोर्ट निकाल देते, “Desmond Doss you are free to run into the war without a single weapon to protect yourself.”

दोन तास एकोणीस मिनिटांच्या या चित्रपटाचा पुढील साधारण एक तास ओकिनावा युद्धभूमीवरील आहे. ओकिनावा बेटावर उंच कडा आहे, त्याच्या विक्राळ स्वरूपामुळे अमेरिकन सैनिकांनी त्याला स्लँग (slang) नाव ठेवले आहे – हॅक्सॉ रिज (Hacksaw Ridge). 

कॅप्टन ग्लोवरच्या कंपनीत डेसमंड ‘मेडिक’ म्हणून सहभागी झालेला असतो. अमेरिकन सैनिक कडा वर चढून जातात. डेसमंड सकट सर्वच सैनिक कर्तव्यतत्पर आहेत, त्यांचं त्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे, ते शूर आणि निडर आहेत. डेसमंड आणि इतर सैनिकांत एकच महत्त्वाचा फरक आहे की, डेसमंड निःशस्त्र आहे. घनघोर लढाई सुरु होते ज्यात प्रथम अमेरिकेची सरशी होते. संपूर्ण लढाईत डेसमंड प्राण पणाला लावून जखमी सैनिकांना वाचवतो. त्याचा ‘निःशस्त्र’ पराक्रम इतरांपेक्षा जराही कमी नसतो. त्याला ‘भ्याड’ म्हणणाऱ्या काही सहकाऱ्यांचा जीव त्याने वाचवलेला असतो. त्यामुळे डेसमंडबद्दल असलेल्या तुच्छतेच्या भावनेची जागा आपुलकीने घेतलेली असते. 

अमेरिकेची सरशी फार काळ टिकत नाही, भूमिगत बंकरमध्ये लपलेले जपानी सैनिक प्रचंड संख्येने प्रतिहल्ला करतात. हा हल्ला इतका संहारक असतो की, अमेरिकन सैन्याला माघार घ्यायला लागते आणि माघार घ्यायला उसंत मिळावी म्हणून कॅप्टन ग्लोवर नौदलाला बॉम्बवर्षाव करायला सांगतो. जपान्यांची आगेकूच थांबते आणि अमेरिकन सैन्य खाली उतरते.डेसमंडही कडा उतरायच्या तयारीत असतो, आजूबाजूला प्रचंड धुमश्चक्री चालू असते. अचानक सर्व म्यूट होतं. कॅमेरा क्लोजअप घेऊन गुडघ्यावर बसलेल्या डेसमंडच्या चेहऱ्यावरचे सर्व व्यामिश्र भाव टिपतो. डेसमंड म्हणतो, “ईश्वरा, हे काय चाललंय? तुझ्या मनात काय आहे? मला ऐकू येत नाहीये.” तितक्यात त्याला मदतीची हाक ऐकू येते, देवाच्या मनात काय आहे ते त्याला कळते आणि क्षणार्धात निराश/हताश झालेला डेसमंड प्रचंड निर्धाराने उठतो. बॉम्बस्फोट होत असतात, आगीचे लोळ उडत असतात अशा भयावह, साक्षात मृत्यू दिसत असलेल्या युद्धभूमीकडे काटकुळा डेसमंड निर्धाराने पावले टाकताना दिसतो. काही काळापूर्वीच ‘भ्याड’ म्हणून हिणवला गेलेला डेसमंड सर्वात शूर सैनिक आणि दयाळू माणूस ठरलेला असतो कारण त्याने माघार न घेता जखमी सैनिकांना वाचवण्याचा निर्णय घेतलेला असतो. 

आता Hacksaw Ridge वर फक्त डेसमंड डॉस, मदतीची याचना करणारे जखमी अमेरिकन सैनिक आणि जपानचे शत्रू सैन्य असते. डेसमंड स्वत:च्या जीवाची परवा न करता जखमी सैनिकांचे प्राण कसे वाचवतो ते चित्रपटात प्रत्यक्ष पाहणे योग्य ठरेल. पण काही प्रसंग सांगणे उचित ठरेल. नौदलाचा बॉम्बवर्षाव थांबल्यामुळे जपानी सैन्य बाहेर पडलेले असते. अशात डेसमंडला एक सैनिक विव्हळत असलेला दिसतो. त्या प्रचंड घाबरलेल्या सैनिकाला डेसमंड म्हणतो, “माझ्यावर विश्वास ठेव आणि श्वास घेत राहा. तो त्याला मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवतो आणि स्वत: एका मृत सैनिकाचे प्रेत अंगावर ओढून घेतो. जपानी सैन्य ‘सर्च’ करून परत जाते आणि डेसमंड जखमी सैनिकाच्या अंगावरील माती दूर करतो तेव्हा आपल्याला दिसते ती त्या सैनिकाच्या डोळ्यात दाटून आलेली कृतज्ञता. 

या ‘रेस्क्यू’ मोहिमेत जपानी हल्ल्यापासून वाचण्यासाठी डेसमंड भूमिगत भुयारात जाऊन लपतो. तिथे एका कोपऱ्यात एक जपानी सैनिक जखमी होऊन पडलेला असतो. दोघांची नजरानजर होते. जपानी सैनिकाच्या डोळ्यात दिसते ते भय आणि डेसमंडच्या डोळ्यात दिसते ती करुणा. तो त्याच्या जखमेला हात लावायला जातो तर जपानी घाबरून मारामारी करायचा प्रयत्न करतो. तेव्हा डेसमंड त्याला शांत करतो आणि जखमेवर बँडेज लावतो. “ही मोर्फिन आहे, तुला बरं वाटेल” असं म्हणून डेसमंड जातो तेव्हा जपानी सैनिक आश्चर्यचकित झालेला असतो. 

संवेदनशील,भावनाप्रधान, दयाळू असलेल्या डेसमंडमध्ये असलेला सैनिकी बाणा, प्रसंगावधान, हरहुन्नरीपणा यांचे दर्शन आपल्याला एकामागून एक प्रसंगात होत राहते आणि कोणत्याही प्रसंगात तो ‘Larger than life’ आहे असे दाखवण्याचा दिग्दर्शक प्रयत्न करत नाही. डेसमंडची बचाव मोहीम रात्रभर चालू राहते, प्रचंड थकलेल्या शरीराला आत्मबळ देण्यासाठी तो एकच मंत्र उच्चारत राहतो, “God... One more please.”
कड्यावरून एकामागून एक सैनिक खाली येत राहतात.
कॅप्टन ग्लोवर एका जखमी सैनिकाला विचारतो, 
“हे सगळं कोण करतंय”
“डेसमंड डॉस”
“एकटा..?”
“हो. एकटाच”
कॅप्टनच्या मागचा सैनिक अनवधानाने म्हणतो, “तोच तो भ्याड डेसमंड डॉस”

दुसऱ्या दिवशी सकाळी डेसमंडसुद्धा जखमी होऊन खाली येतो तेव्हा तो प्रचंड भांबावलेला असतो, त्याला भानावर यायला वेळ लागतो. तो भानावर येतो तेव्हा त्याला दिसतो तो सर्व सैनिकांच्या डोळ्यात त्याच्याप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता. 

ओकिनावा बेट ताब्यात येणे अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी नव्याने हल्ला करण्याचे नियोजन होते. आदल्या दिवशीच्या संहारक युद्धामुळे माघार घेतलेल्या शस्त्रधारी सैनिकांचे मनोबल पूर्णपणे खच्ची झालेले असते. पण डेसमंडच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे त्यांच्यात थोडी धुगधुगी टिकून असते. 


हेही वाचा : फोर डेज ऑफ नेपल्स : युद्ध येता दारी - आ. श्री. केतकर


हल्ल्याचा नियोजित दिवस शनिवार असतो. डेसमंड डॉसच्या निर्धाराची आणि धीरोदात्तपणाची महती पटलेला कॅप्टन ग्लोवर त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, “उद्या आपल्याला हल्ला करायचा आहे. मला माहीत आहे उद्या शनिवार आहे आणि तो तुझ्या ईश्वरचिंतनाचा दिवस आहे. पण सर्व सैनिकांचं म्हणणं आहे की, डेसमंड येणार असेल तरच आम्ही युद्धात सहभागी होऊ.” मनात द्वेष असलेले शस्त्रधारी सैनिक शेवटी निःशस्त्र आणि करुणेने ओथंबलेल्या डेसमंडच्या संरक्षणात लढायला तयार होतात. युद्धात अमेरिकेचा विजय होतो. डेसमंड गंभीर जखमी होतो पण त्याचा प्राण वाचतो. कारण बहुतेक तो ‘अल्लाचा बंदा’, ‘देवदूत’, ‘येशूचे लेकरू’ असे सर्व काही असतो. त्याची माणुसकी, करुणा भेदभावरहीत-मानवाने आखलेल्या भौगोलिक सीमा ओलांडणारी असते.

या युद्धात डेसमंड डॉस 75 अमेरिकन सैनिकांचे प्राण वाचवतो आणि शेकडो जखमी सैनिकांवर उपचार करतो. त्याच्या असामान्य कार्यासाठी त्याला ‘Medal Of Honor’ ने सन्मानित केले जाते. बंदुकीची एकही गोळी न झाडता ‘Medal Of Honor’ चा सन्मान मिळवलेला डेसमंड डॉस हा अमेरिकन सैन्यातील एकमेव सैनिक आहे. चित्रपटाच्या शेवटी डेसमंड डॉस आणि त्याच्या कमांडरचे प्रत्यक्ष निवेदन आहे. ते बघेपर्यंत आपण काहीतरी फिक्शन पाहतोय असे वाटत राहते पण नंतर कळते की, ही तर (सिनेमॅटिक लिबर्टी न घेता दाखवलेली) सत्यघटना आहे. 

पटकथा थोडी विस्कळीत वाटली तरी दिग्दर्शन, संवाद आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. डेसमंड डॉसच्या भूमिकेसाठी Andrew Garfield या अभिनेत्याने आपले सर्वस्व दिले आहे. Mad Max, Gallipoli मधील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या, Braveheart साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ‘ऑस्कर’ जिंकलेल्या Mel Gibson ची Hacksaw Ridge हीसुद्धा सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण धार्मिक कर्तव्य – देशाप्रती कर्तव्य, व्यक्ती – समाज, व्यक्ती स्वातंत्र्य – सामाजिक जबाबदाऱ्या, हिंसा – अहिंसा, प्रेम – द्वेष यांमध्ये असलेला संघर्ष कधीही संपणारा नाही. अशा वेळी कोणत्याही तत्त्वाची एकांगी मांडणी न करता हा चित्रपट संतुलन गाठतो. युद्धाची आवश्यकता विदित करताना शांततेची अपरिहार्यता आणि शाश्वतता ठळकपणे अधोरेखित करतो. 

हा चित्रपट अमेरिकन लोकशाही मूल्यांवरदेखील भाष्य करतो. कारण अमेरिकन लोकशाही डेसमंड डॉसच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून आपले कर्तव्य बजावायला परवानगी देते. Franz Jagerstatter सारखे Conscientious Objector नाझी राजवटीत फासावर लटकले गेले होते. या पार्श्वभूमीवर लोकशाहीची उपयुक्ततादेखील महत्त्वाची ठरते.

युद्धात लढताना सैनिकांना विवेकबुद्धीने वागून चालत नाही. त्यांना वरून येणाऱ्या ऑर्डर पाळाव्या लागतात. त्यामुळे सगळेच डेसमंड डॉस होणेसुद्धा परवडणारे नाही. पण प्रत्येक सैन्यात एक तरी डेसमंड डॉस हवाच. मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो. आणि परिस्थिती कशीही असली तरी सदसदविवेकबुद्धीशी प्रामाणिक राहा असा संदेश मनावर बिंबवणारा हा चित्रपट खरोखरच ‘एपिक’ (Epic) ठरतो. 

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


हॅक्सॉ रिज या सिनेमाचा ट्रेलर 

 

Tags: युद्धपट Hacksaw Ridge Hollywood Film Cinema War Film Load More Tags

Comments:

Makarand

It's available on Telegram via below link. https://t.me/hacksaw_Ridge_mov/4

Sachin Badre

Fantastic description. But where can i watch this movie. Not available on any ott platform

Satish Raje

Very interesting narration of a movie. I will surely watch this movie. Didn't know about Desmond Doss.Thanks Sadhana team for such article series.

Add Comment