केरळ हे भारताच्या नैऋत्य दिशेला असलेले किनारी राज्य आहे. मल्याळी ही केरळची मातृभाषा किंवा राजभाषा आहे. केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य आहे. उपहासाने असे म्हटले जाते की ‘असे असले तरी’ केरळी लोक शिकायला डी.यू.ला (दिल्ली विद्यापीठात) किंवा जे.एन.यू.ला जातात, वैद्यकीय उपचार घ्यायला बंगळुरूला जातात आणि नोकरीसाठी गल्फ देशात जातात. उपहासाचा किंवा विनोदाचा भाग सोडला तर केरळ हे तुलनेने उदारमतवादी राज्य आहे. भाषिक अथवा वांशिक अस्मितेचे मुद्दे इतर दक्षिणात्य राज्यांच्या मानाने इथे कमी तीव्रतेचे आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी धार्मिक व डावे-उजवे अशी वैचारिक मिश्र वस्ती असल्याने इथे वैचारिक घुसळण सातत्याने चालू असते. या वैचारिक घुसळणीचे प्रतिबिंब तेथील चित्रपटांत उमटत नसेल तर नवलच!
ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीला अनौपचारिकपणे बॉलीवुड, तमीळ-तेलुगु चित्रपटसृष्टीला टॉलीवुड अशी संज्ञा आहे त्याप्रमाणे मल्याळम चित्रपटसृष्टीला मॉलीवुड अशी संज्ञा आहे. गेल्या काही वर्षांत हे मॉलीवुड कात टाकत आहे आणि मल्याळी साहित्याप्रमाणेच अनेक अभिजात, आशयघन व संहितेच्या दृष्टीने ‘ओरिजनल’ अशा चित्रपटांची निर्मिती इथे होत आहे.
‘द ग्रेट इंडिअन किचन’ हा असाच एक अभिजात, आशयघन सिनेमा आहे. ‘नितांतसुंदर’ असेही एका शब्दात याचे वर्णन करता येईल. चित्रपटाचे नाव आणि त्यातून व्यक्त होणारा आशय यांचा परस्परांशी व्यत्यास आहे. आपण भारतीय रुढी-परंपरा कितीही भव्य, उदात्त मानत असलो, एकत्र कुटुंबव्यवस्थेला आदर्श म्हणत असलो तरी ती वर्षानुवर्षे स्त्री-पुरुष असमानतेवर आणि पर्यायाने स्त्रीशोषणावर आधारित आहे आणि आपण ज्याला ग्रेट म्हणतोय ते तितके ग्रेट नाही हे वास्तव हा चित्रपट मांडतो.
ही एका केरळी उच्च मध्यमवर्गीय घरातील नववधूची कथा आहे. शिक्षित असलेल्या या तरुणीला नृत्याची आवड असते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलाशी तिचे लग्न ‘बघून’ होते. लग्न होऊन सासरी गेल्यानंतर सासरशी जुळवून घेताना होणारी तिची कसरत, घुसमट, ससेहोलपट यांभोवती हा सिनेमा फिरतो. इथे संपूर्ण कथा सांगण्याचा उद्देश नाही.
या मुलीच्या सासरी करती सासू असते आणि ती सांभाळून घेणारी असते, त्यामुळे सुरुवातीची या नववधूची भूमिका केवळ मदतनिसाची असते. पण मुलीच्या बाळंतपणाला सासूला परदेशी जावे लागते आणि सर्व जबाबदारी या नव्या नवरीवर येऊन पडते तेव्हा तिला आपल्या सासरच्या कर्मठपणाचा, नवरा-सासऱ्याच्या विचित्र सवयींचा प्रत्यय येऊ लागतो. सासऱ्याला प्रेशर कुकरमधला भात आवडत नसतो. त्यामुळे तिला चुलीवर भात शिजवावा लागतो. (सासरा तिच्या नवऱ्याला कॉलेजमध्ये फोन करून ‘तिला चुलीवर भात शिजवायला सांग’ असे सांगतो.) त्याला पाट्यावर वाटलेली चटणी लागत असते, कपडे हाताने धुतलेले लागत असतात, त्यामुळे घरात कुकर, मिक्सर, वॉशिंग मशीन अशा सर्व सुविधा असूनसुद्धा तिला गाढवमेहनत करावी लागते. नवऱ्यालासुद्धा यात काही अन्याकारक वाटत नाही. संपूर्ण चित्रपटभर पुरुष आराम करताना, मोबाईल बघताना, योगा करताना दिसतात आणि स्त्रिया स्वयंपाक, धुणीभांडी, साफसफाई इत्यादी घरची कामे करताना दिसतात.
नवऱ्याला आणि सासऱ्याला जेवताना उष्टे टेबलावर टाकायची घाण सवय असते. एकदा हॉटेलमध्ये गेल्यावर ती नवऱ्याला उष्टे वेगळ्या प्लेटमध्ये टाकताना पाहून सहजपणे म्हणते ‘तुला जेवणाचे मॅनर्स आहेत म्हणायचे...’ यावर नवरा चिडतो आणि म्हणतो ‘माझ्या घरात मी काहीही करेन’. हे इथेच संपत नाही तर घरी गेल्यावरही तो चिडून अबोला धरून असतो. ती समजूत काढायला जाते तर तो म्हणतो ‘तुला खरंच वाईट वाटत असेल तर माझी माफी माग.’ थोडा वेळ शांतता पसरते पण ती माफी मागते. नवरा ‘लाईट बंद’ करण्याची सूचना करतो आणि स्क्रीनवर तिचा वेदनेने तळमळणारा चेहरा दिसतो. पुढच्याच प्रसंगात तिला टेबलवरचे उष्टे साफ करताना आपण पाहतो आणि लगेचच पुढच्या प्रसंगात नवरा कॉलेजमध्ये ‘कुटुंब’ या विषयावर लेक्चर देताना दिसतो. या उपहासाने प्रेक्षक सुन्न होऊन जातो.
तिला मासिक पाळी येते तेव्हा ती नवऱ्याला सॅनिटरी पॅड आणायला सांगते, तेव्हा काही वेळ नवऱ्याला काहीच सुचत नाही. त्याच्या चेहऱ्यावर अवघडलेपणा स्पष्ट दिसत असतो. तो तुटकपणे हो म्हणून निघून जातो. ‘त्या दिवसात’ तिला एका खोलीत ठेवले जाते आणि कामे करायला तिची आत्तेसासू येते. ती आल्या-आल्याच गादीवर का झोपलीस म्हणून ओरडते आणि एक चटई जमिनीवर अंथरून देते. याच पार्श्वभूमीवर शबरीमला मंदिराचा वाद, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यावरून समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रिया दाखवल्या जातात. तथाकथित धर्मरक्षक सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्तीला घरी जाऊन धमकावताना, तिची स्कूटर जाळताना दाखवले आहे. ही मुलगी त्या कार्यकर्तीची फेसबुक पोस्ट ‘लाईक, सबस्क्राईब आणि शेअर’ करते तेव्हा हे तथाकथित धर्मरक्षक तिच्या सासऱ्याला व नवऱ्याला तिचे फेसबुक अकाउंट डिलीट करायला सांगतात. ‘ती पोस्ट मनाला पटली म्हणून मी लाईक केली. मी ती डिलीट करणार नाही.’ असे ती नवऱ्याला स्पष्टपणे सांगते. ‘या घरात राहायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागावे लागेल.’ असे उत्तर नवरा देतो. इथून पुढचा तिचा स्वत्वाचा प्रवास कसा होते हे पडद्यावर बघणे इष्ट ठरेल.
दिग्दर्शक जीओ बेबे यांचा हा चित्रपट विषयाच्या दृष्टीने अनुरूप प्रसंग मांडत संयतपणे पुढे जातो. यात पल्लेदार संवाद, गाणी नाहीत. स्त्रीशोषणावर भाष्य करणारा चित्रपट असूनदेखील रडारडी नाही. किंबहुना सासूचा छळ, नवऱ्याची मारहाण म्हणजेच शोषण या रूढ विचारालाच तो तगडे आव्हान देतो. या मुलीचा नवरा तिला मारतो का? शिव्या देतो का? तर नाही पण त्याला बायकोच्या जाणिवांची किंमत नाही, तिच्या शारीरिक-मानसिक अपेक्षांची पूर्तता करण्याची आवश्यकता त्याला वाटत नाही आणि मुख्यतः तिच्या स्त्रीत्वाबाबत, स्वतंत्र अस्तित्वाबद्दल त्याला आदर नाही. चित्रपटातील सासू तर समंजस दाखवली आहे पण तिला शोषणाची जाणीव नाही. नवऱ्याचा ब्रश हातात आणून देताना, त्याचे जोडे पायाशी ठेवताना, नवरा निवांत झोपलाय आणि आपण राबतोय यात एमए झालेल्या स्त्रीला क्षणभरदेखील गैर वाटत नाही, असमानता दिसत नाही. मुलीची आईदेखील तिला जुळवून घेण्याचाच सल्ला देते. एका दृश्यात शबरीमला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध स्त्रिया आंदोलन करताना दाखवल्या आहेत. हे अदृश्य शोषण कल्पकपणे मांडतानाच ते एकांगी होणार नाही याची काळजी दिग्दर्शक घेतो आणि त्यातून त्याचा वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
शंभर मिनिटांच्या या चित्रपटातील किमान सत्तर मिनिटे केवळ किचनमध्येच चित्रित केलेली दिसतात. किचन हा स्त्रीशोषणाचा प्रमुख अड्डा असल्याचे अधोरेखित करतो आणि हे करताना दिग्दर्शकाने वेगवेगळ्या अँगलने कॅमेरा लावून सर्व बाजूंनी किचन दाखवतो. ‘मी सर्व कोनांतून पाहिलं पण शोषण काही माझ्या नजरेतून सुटलं नाही, तुमच्या नजरेला काय दिसतंय ते जाणिवा जागृत ठेवून पाहा.’ असं दिग्दर्शकाला सुचवायचं असावं.
चित्रपट शेवटाकडे जात असताना एका दृश्यात दिग्दर्शकाने भिंतीवरील जोडप्यांचे फोटो दाखवले आहेत. सोबत कुकरच्या शिट्टीचा आवाज, नळ गळण्याचा आवाज, फोडणीचा आवाज, भांड्यांचा आवाज यांचा पार्श्वसंगीत म्हणून वापर केलेला आहे. ही कथा केवळ या कुटुंबापुरती मर्यादित नाही तर स्थळ, काळ, धर्म-जात निरपेक्ष असे त्याचे सार्वत्रिकीकरण झालेले आहे हे अधोरेखित करताना दिग्दर्शक चित्र आणि ध्वनी यांचा सुरेख मेळ साधतो.
निमिषा सजयन या गुणी अभिनेत्रीने नववधूच्या मध्यवर्ती भूमिकेत जीव ओतला आहे. नववधूची उत्कंठा, नवीन संसाराची स्वप्ने, नवीन चालीरितींशी जुळवून घेतना होणारी तारांबळ, नवऱ्याची साथ मिळत नसल्याने प्रथम होणारे दुःख आणि नंतर होणारा संताप, तिचे होणारे आत्मचिंतन आणि स्वत्वाच्या जाणिवेचा होणारा प्रवास चेहऱ्यावरच्या हावभावांमधून सुरेखपणे दर्शवला आहे. तिला याधी केरळ सरकारचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकही मिळालेले आहे. बाकी सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चोख केलेल्या असल्या तरीही हा चित्रपट निमिषाने तोलून धरला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. काही स्वयंघोषित राष्ट्रवादी ‘भारतीय समाजाचे चुकीचे चित्रण करतो’ म्हणून विरोध करतीलही मात्र हा चित्रपट भारताकडून ऑस्करला गेल्यास ते स्वाभाविक ठरेल.
सर्वसाधारण अनुभव असा की, आपण एखाद्या पुरुषाशी बोलताना ‘तू घरकाम करतोस का?’ असे विचारत नाही. ‘तू बायकोला/आईला मदत करतोस का?’ असे विचारून सरळ कामाची वाटणी करून टाकतो आणि कर्तव्याला ‘मदत’ हे लेबल लावतो. अशा चुकीच्या ‘फंडाज्’ना हा चित्रपट जबरदस्त धक्का देतो. आपण विकासाच्या, प्रगतीच्या, सांस्कृतिक उत्थानाच्या कितीही वल्गना करत असलो तरी आपण अजूनही प्राथमिक पातळीवर आहोत आणि निर्मळ-निकोप समाजाच्या निर्मितीसाठी खूप मजल मारायची आहे हे हा चित्रपट अप्रत्यक्षपणे सुचवतो. केवळ प्रसंगांची परिणामकारक मांडणी करून प्रेक्षकाला जाणिवेच्या आणि नेणिवेच्या पातळीवरदेखील अंतर्मुख करण्याची किमया दिग्दर्शकाने साधलेली आहे. या चित्रपटाचा शेवट एकाच वेळी आश्वस्त आणि अस्वस्थ करणारा आहे. हेच त्याचे सार्वकालिक यश ठरणार आहे. बाकी हा चित्रपट पुरस्कारांच्या कधीच पुढे गेला आहे.
- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
दिग्दर्शक जीओ बेबे याची इंग्रजी मुलाखत इथे वाचता येईल
The Great Indian Kitchen
कालावधी - 100 मिनिटे
भाषा - मल्याळम्
सबटायटल - इंग्लीश
ओटीटी - अमेझॉन प्राईम
Tags: द ग्रेट इंडिअन किचन मकरंद शैला गजानन स्त्री शोषण स्वयंपाकघर cinema the great indian kitchen makarand shaila gajanan woman Load More Tags
Add Comment