सनदशीर मार्गाचा जहालपणे पाठपुरावा करणारा उदारमतवादी विचारवंत

ना.गोपाळकृष्ण गोखले यांच्या 107व्या पुण्यतिथीनिमित्ताने...

स्वतंत्र राष्ट्रात एतद्देशियांविरुद्ध आंदोलनाचे मार्ग अनागोंदीकडे जाणारे असतात. अशावेळी सनदशील मार्गच प्रभावी ठरतात. तद्वत सनदशील मार्ग, लोकशाही परंपरांची ओळख करून देण्याचे आणि त्या रुजवण्याचे कार्य गोखले व त्यांच्या समविचारी व्यक्तींनी सुरू केले आणि गांधी व त्यांच्या अनुयायांनी लोकपाठींब्याने ते पूर्णत्वास नेले. कळस लक्षात राहतो, तो बांधणारे लक्षात राहतात पण ज्या मजबूत पायावर उभा आहे तो पाया आणि पाया घालणारे मात्र विस्मृतीत जातात. खरेतर त्यांचे योगदान चिरंतन असते. 

आपल्यापैकी कोणी शालेय जीवनात नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर निबंध लिहिला असल्याची शक्यता फार कमी आहे. त्यांची आपल्यापैकी बहुतेकांना त्यांची असलेली ओळख म्हणजे ‘ते मवाळ होते’ आणि ‘ते गांधीजींचे गुरु होते’ इतकीच. त्यांची ही ओळख बरीचशी अपूर्ण आहे.

19 फेब्रुवारी या त्यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीवर्षातही (इ.स 2015मध्ये) उत्सवी स्वरूप आलेले नव्हते. सध्या उपराष्ट्रपती असलेल्या, तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना टिळकांचा फोटो लावला होता! सध्याच्या ‘हिंस्र राष्ट्रवादाच्या’ काळात संयत, संयमी, सहिष्णू व सनदशील अशा गोखल्यांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याचा आढावा घेणे आणि त्यांच्या भूमिकांचा अन्वयार्थ लावणे विशेष औचित्याचे ठरेल.

अवघे 49 वर्षे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांचा जन्म 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोठलूक नावाच्या लहानशा गावात झाला. 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. संपूर्ण आयुष्यात त्यांनी शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रांत भरीव योगदान दिले.

घरची आर्थिक परिस्थिती दारिद्रयाची, नातेवाईकांच्या घरी आश्रिताचे जीवन कंठावे लागणे अशी तत्कालीन समाजात हमखास आढळणारी पार्श्वभूमी गोखल्यांनादेखील होती. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच गोखल्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. 1884मध्ये एलफिस्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त करेपर्यंत आणि नंतरही गोखल्यांनी उदंड व्यासंग केला. पदवी प्राप्त झाल्यानंतर सरकारी नोकरी न करता ते फर्गसन महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले आणि 1902मध्ये प्राचार्यपदावरून निवृत्ती घेईपर्यंत आपल्या आयुष्याची जवळपास 25 वर्षे, ‘डेक्कन एजुकेशन सोसायटी’संबंधित संस्थांमध्ये त्यांनी शिक्षणयज्ञात समर्पित केली.

समकालीन राष्ट्रीय जीवनाचा अनुभव घेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिल्स, बेन्थम, बर्क, स्मिथ या पाश्चात्य उदारमतवाद्यांच्या विचारांशी आलेला संबंध यातून गोखल्यांचे राजकीय चिंतन प्रकट झालेले आहे. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचार उदारमतवादाच्या विचारातून परिपोषित झालेले आहेत. गोखले ज्या काळात कार्यरत होते तो काळ ‘जहाल-मवाळ’, ‘आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा’ या वादांनी भारलेला आहे. गोखल्यांच्या मते, सामाजिक व राजकीय अश्या बंदिस्त कप्प्यांमध्ये सुधारणांचे विभाजन करता येत नाही. सर्व सुधारणा एकसमयावच्छेदेकरून झाल्या पाहिजेत तरच त्या चिरंतन टिकतील. राजकीय व सामाजिक अशा दोन्ही सुधारणा महत्त्वाच्या आहेत पण त्यांत क्रम ठरवायचा झालाच तर सामाजिक सुधारणाच महत्वाच्या आहेत. कारण सामाजिक यंत्रणा सदोष असेल, त्यात न्यून असेल तर राजकीय सुधारणा कुचकामी ठरतील असे त्यांचे मत होते. ‘भारताच्या दुरवस्थेला परकीय शासनच एकमेव जबाबदार आहे’ या भूमिकेशी गोखले सहमत नव्हते. त्यामुळे ‘पूर्ण स्वातंत्र्य’ या दूरस्थ लक्ष्याच्या मागे लागण्यापेक्षा सध्याचे कार्य तडजोडीच्या, समन्वयाच्या माध्यमातून करणे आणि समाजातील वैगुण्ये दूर करून न्याय व समताधिष्ठीत समाजाची उभारणी करणे आणि राज्यकर्ते व त्यांच्या कायद्यांशी एकनिष्ठ राहून जबाबदार व सनदशील शासन अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करणे हे गोखल्यांच्या कार्याचे सूत्र होते.

विरोधकांबाबत सहिष्णू वृत्ती बाळगून तर्क आणि अभ्यासाच्या आधारे त्यांनी केलेली टीका किंवा विरोध परतवून लावणे, राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवून व त्यांना सहकार्य करून पण त्यांच्या अन्याय्य धोरणांवर वस्तुनिष्ठ माहितीच्या व आकडेवारीच्या आधारे टीका करणे अशी समतोल वृत्ती गोखल्यांनी बाळगली. 1897मध्ये वेल्बी कमिशनसमोर साक्ष देताना ‘ब्रिटीश सरकार कल्याणकारी योजनांपेक्षा अनुत्पादक कामांवर जास्त खर्च करत आहे’ हे त्यांनी आकडेवारीनिशी सिद्ध केले होते.

गोखल्यांचे राजकारण नैतिकतेच्या कसोटीवर आणि शक्याशक्यतेच्या खात्रीवर आधारलेले होते. त्यांना प्रचलित अर्थाने ‘राजकारणी’ म्हणता येणार नाही पण ‘राजकीय तत्वचिंतक’ नक्कीच म्हणता येईल. राजकारणाशी संबंधित व्यक्ती त्याची राजकीय उद्दिष्टे व ध्येये यांच्याबरोबरच ती ध्येये किंवा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अवलंबल्या गेलेल्या मार्गाचा आणि तत्वज्ञानाचाही पुरस्कार करत असते. गोखल्यांनी साध्य-साधनशुचितेवर अढळ विश्वास ठेवला. कोणतीही सुधारणा बुद्धीच्या निकषावर आणि सर्वांगीण सामाजिक हिताच्या कसोटीवर तपासून पाहणे आणि त्या सुधारणा अमलात आणण्यासाठी सर्व सनदशील मार्गांचा आणि संसदीय आयुधांचा वापर करणे हे गोखल्यांचे राजकारण होते. त्यांचे राजकारण हे प्रामुख्याने संसदीय राजकारण होते. 1899मध्ये त्यांची तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नेमणूक झाली. 1903 मध्ये त्यांची ‘कौन्सिल ऑफ इंडिया’मध्ये गव्हर्नर जनरल नियुक्त प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. मोर्ले-मिंटो सुधारणा अस्तित्वात आल्यानंतर केंद्रीय कायदेमंडळात त्यांची नियुक्ती झाली. कोणत्याही कायदेमंडळात जरी ते लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हते तरीही त्यांनी सदैव लोकांचे प्रतिनिधित्व केले. सरकारच्या आर्थिक धोरणांची, केंद्रीभूत शासनाची चिरफाड केली आणि उत्कृष्ट संसदपटू कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला. अर्थसंकल्पावरील त्यांच्या भाषणासाठी लॉर्ड कर्झन आवर्जून उपस्थित राहत असे. गोखल्यांच्या  व्यक्तिमत्वामुळे आणि अभ्यासपूर्ण भाषणांमुळे कर्झन इतका प्रभावित झालेला होता, की “गोखले इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आज माझ्याऐवजी तेच गव्हर्नर जनरल म्हणून आले असते” असे प्रशंसोद्गार त्याने काढलेले आहेत.

इंग्लंडचा राजा, संसद आणि प्रजा यांना भारतीयांच्या परिस्थितीची खरी जाणीव करून दिली तर इंग्रज सरकारची धोरणे अधिक लोकाभिमुख होतील अशी गोखल्यांची धारणा होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी इंग्लंडमधील लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. 1906मध्ये बंगालच्या फाळणीविरोधात इंग्लंडमधील लोकांचा पाठिंबा मिळावा यासाठी आणि भारतातील वस्तुस्थितीची तेथील लोकांना जाणीव करून द्यावी या उद्देशाने इंग्लंडचा दौरा केला. या 49 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी 47 सभा घेतल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रांतिकार्यासाठी पाठिंबा मिळवण्याच्या सावरकरांच्या धोरणाचा जितका गौरव केला जातो, त्या मानाने  आंतरराष्ट्रीय पातळीवर उदारमतवादी विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्या गोखल्यांच्या कार्याची दखल मात्र घेतली जात नाही.

मोर्ले-मिंटो सुधारणांचा आराखडा बनवण्याच्या कार्यातदेखील गोखल्यांचा लक्षणीय सहभाग राहिला. “गोखले नसते तर मोर्ले-मिंटो सुधारणा तयार करण्यात बऱ्याच अडचणी आल्या असत्या” असे विधान तत्कालीन भारतमंत्री मोर्ले याने केलेले आहे. मोर्ले-मिंटो कायदा ‘भारतात हिंदू-मुस्लीम फुटीची बीजे रोवणारा कायदा’ म्हणून ओळखला जातो. त्यात तथ्यांश असला तरी या कायद्यान्वये मतदानाचा अधिकार रुंदावला, कायदेमंडळातील सदस्य संख्येत वाढ झाली आणि जबाबदार शासनपद्धतीची मागणी तात्विकदृष्ट्या मान्य करण्यात आली या जमेच्या बाजूही होत्या. आणि त्यामागे गोखल्यांचे अथक परिश्रम होते हे अमान्य करता येणार नाही. त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या आणि मैलाचा दगड मानला गेलेल्या ‘मोंटेग्यू-चेम्सफोर्ड’ कायद्यावरदेखील त्यांचा प्रभाव होता.


हेही वाचा : लोकमान्य टिळकांचे मंडाले तुरुंगातील दिवस - अ. के. भागवत, ग. प्र. प्रधान


जनतेच्या इच्छा-आकांक्षा अर्ज, विनंत्या, निवेदने यांच्यामार्फत सरकारपर्यंत पोहोचवणे, त्यांचा पाठपुरावा करणे, सरकारच्या धोरणांवर साधार टीका करणे यामागे संसदीय राजकारणाबरोबरच ‘लोकशिक्षण’ हेदेखील एक सूत्र होते. त्याद्वारे आपली व्यवस्था काय आहे, कोणत्या हक्कांस आपण पात्र आहोत आणि कोणते हक्क आपल्याला मिळत आहेत, कोणते हक्क मिळवता येतील आणि त्यासाठी कोणते कार्यक्रम आखावेत याचे शिक्षण लोकांना मिळत होते. मात्र ते व्यापक पातळीवर झाले नाही ही गोखल्यांच्या राजकारणाची मर्यादा होती. गोखले हे ‘राजकारणातील संत’ आणि ‘संतप्रवृत्तीचे राजकारणी’ होते; अशा संतांना फारसे अनुयायी मिळत नाहीत हे कटू सत्य येथे मान्य करावे लागेल.

गोखल्यांचे राजकारण नैतिकतेवर; अर्थकारण व्यवहारवादावर; आणि समाजकारण विवेकवाद, बुद्धिनिष्ठा व प्रत्यक्ष कार्यप्रवृत्त होण्यावर आधारलेले होते. त्यांच्या उक्तीत आणि कृतीत फरक नव्हता त्यामुळे न्या. रानड्यांपेक्षा अधिक आदर त्यांना लाभला.

इतर अर्थतज्ञांप्रमाणे सरकारच्या आर्थिक धोरणांची त्यांनी आकडेवारीनिशी नुसतीच चिरफाड केली नाही तर त्याची विधायक चिकित्साही केली आणि पर्यायी व्यवस्था काय असावी याचा उहापोह करून आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग दाखवला.

संसदीय राजकारणाबरोबरच त्यांनी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून राजकारण केले. 1889मध्ये त्यांचा राष्ट्रीय सभेशी संपर्क आला. टिळकांबरोबर ते राष्ट्रीय सभेचे सह-सचिवदेखील राहिले. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. हा काळ वंगभंग आंदोलनाने देश पेटून उठल्याचा काळ आहे. गोखल्यांच्या काळात जहाल-मवाळ, नवविचारवादी-पुनरुज्जीवनवादी असा वाद जोरात होता. समन्वयाचे राजकारण समोरच्या माणसाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असल्याने यात त्यांना मर्यादित यश आले आणि 1907मध्ये सुरत अधिवेशनात कॉंग्रेसमध्ये पडणारी फूट ते रोखू शकले नाहीत. पण असे असले तरी त्यांच्या उभ्या हयातीत जहालांना राष्ट्रीय सभेचा पूर्ण ताबा घेता आला नाही, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या जहाल चतु:सुत्रीचा अवलंब करणारे टिळकही 1916पर्यंत ‘प्रतियोगी सहकारिता’ तत्वापाशी आले हेदेखील गोखल्यांचे दायित्व मानता येईल. होमरुल लीग आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचा ‘लखनौ करार’ यामागेदेखील गोखल्यांची प्रेरणा होती याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

गोखल्यांनी कायम विधायक राजकारण केले, साध्य-साधनशुचितेचे महत्त्व अधोरेखित केले, हिंदू-मुस्लीम संबंधांना सहिष्णुतेच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. जिनांचा त्यांच्याबाबतचा आदरभाव पाहता गोखल्यांना दीर्घायुष्य लाभते तर जिनांनी कॉंग्रेसपासून फारकत घेतली नसती, आणि कदाचित इतिहास बदलला असता.

ज्या दोन व्यक्तींचा भारतीय उपखंडाच्या सर्वांगीण जीवनावर वेगवेगळ्या अर्थाने अजूनही प्रभाव आहे अशा गांधी आणि जिना या दोघांचेही गोखले (म्हणजे गोखल्यांचे विचार व भूमिका) हे एकाच वेळी आदर्श होते आणि ते दोघेही गोखल्यांना गुरु मानत होते. “मला मुस्लीमांचा गोखले व्हायचे आहे” हे जीनांचे विधान त्यांनी प्रत्यक्षात उतरवले असते तर..?

राजकारण आणि समाजकारण यामध्ये अन्योन्य संबंध आहे हे गोखल्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. 1905मध्ये त्यांनी केलेली भारत सेवक समाजाची स्थापना हे त्याचे निदर्शक आहे. भारत सेवक समाजाने  कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, शिक्षणाची व्यवस्था करणे अशी पुष्कळ कामे केली. 1905मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले गोखले भारत सेवक समाजाचे संस्थापक सदस्य होते हे लक्षात घेतले तर त्यांच्या उक्तीत आणि कृतीत फरक नव्हता हे लक्षात येईल.

आज केवळ पुण्यातच नव्हे तर भारतातदेखील अस्तित्वात असलेल्या अनेक संस्थांच्या उभारणीत आणि जडण-घडणीत गोखल्यांचा हातभार होता.  ‘फर्गसन’चे ते संस्थापक सदस्य होतेच पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचेही ते सदस्य होते.

गांधी भारतात परत आल्यानंतर (9 जानेवारी 1915) त्यांना संपूर्ण भारत पाहण्याचा आणि वस्तुस्थितीचे आकलन करून घेण्याचा सल्ला गोखल्यांनी दिला होता. या भारतदर्शनानंतर गांधींच्या भूमिका, त्यांचा पेहराव आणि त्यांच्या एकूणच व्यक्तीमत्त्वातच आमूलाग्र बदल घडून आलेले दिसतात. गांधी त्यांना गुरुस्थानी मानत असत. वस्तुतः , ‘माझे जीवन हाच माझा संदेश’ असे म्हणणारे गांधी कोणा व्यक्तीस आपले गुरु किंवा आयडॉल मानत असणे संभवत नाही. त्यामुळे या महान व्यक्तींच्या उक्तींतील शब्दार्थापेक्षा त्यातील मतितार्थाकडे लक्ष देणे योग्य ठरते. गोखल्यांचे विचार त्यांना गुरुस्थानी होते. गोखले व टिळक या समांतर वाटचाल करत असलेल्या दोन रस्त्यांना एकत्र करून स्वातंत्र्यलढ्याचा एक प्रशस्त हमरस्ता गांधींनी तयार केला, हे इतिहासाचे अवलोकन केल्यावर लक्षात येईल. गांधींनी टिळकांना सागराची तर गोखल्यांना गंगेची उपमा दिलेली आहे. आपल्या आत्मचरित्रातील साधारण सात भाग त्यांनी गोखल्यांवर लिहिलेले आहेत. गोखल्यांचे वर्णन करताना गांधी म्हणतात, “Pure as a crystal, gentle as a lamb, brave as a lion, chivalrous to a fault and the most perfect man in political field”


हेही वाचा : 'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश) - अशोक चौसाळकर


गोखल्यांच्या विद्वत्तेचा गौरव म्हणून लॉर्ड कर्झनने त्यांची 1904मध्ये सी. आय. एस (Companion of the order of the Indian Empire) साठी शिफारस केली आणि ती मान्य झाली. मृत्युपूर्वी त्यांची ‘नाईटहूड’ या प्रतिष्ठेच्या किताबासाठी निवड झाली होती, पण त्यांनी तो किताब नाकारला.

दुराभिमान, दुराग्रह, अट्टहास यांना गोखल्यांच्या विचारांत स्थान नव्हते, कोणत्याही बाबतीत टोकाला जाणे त्यांच्या वृत्तीत बसणारे नव्हते. समाजकारण-राजकारण असो; व्यक्तिवाद-राष्ट्रवाद असो किंवा उदारमतवाद-अर्थकारण असो, परस्पर अंतर्विरोध असणाऱ्या या सर्व बाबतींत त्यांनी समन्वयाची भूमिका आणि मध्यममार्ग निवडला. त्यांचे धोरण तडजोडीचे असले तरी बोटचेपेपणाचे नव्हते.

सुधारकांच्या प्रयत्नांना तात्विक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न न्या. रानड्यांनी केला आणि तो वारसा गोखल्यांनी समर्थपणे चालवला.

गोखल्यांचे विचार झगझगीत, प्रखर नाहीत पण प्रगल्भ आहेत. त्यांची वाणी प्रसंगानुरूप कठोर आणि मृदू आहे, त्यांचे व्यक्तिमत्व ओजस्वी नसेल पण तेजस्वी आहे. त्यांचे तत्वज्ञान संथ असले तरी सम्यक आहे. त्यांचे आयुष्य रोमहर्षक घटनांनी भारलेले नसले तरीही कृतार्थ आहे. अभ्यासाची व्याप्ती, समजुतीचा आवाका, धोरणांची स्पष्टता, हेतूंची शुद्धता, व्यक्तिमत्त्वाची परिपक्वता आणि दृष्टीचा टप्पा याबाबतीत गोखल्यांशी तुलना होऊ शकेल अशा फारच थोड्या समकालीन व्यक्ती अस्तित्वात होत्या. भूतकाळाचे यथार्थ आकलन असलेला, वर्तमान वास्तवाचे अचूक भान असलेला, भविष्यकाळाचा साक्षेपी वेध घेणारा आणि कोणत्याही काळातील पिढीचा ‘मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक’ होण्याची क्षमता असलेला असा हा थोर विचारवंत होता.

पण असे असले तरी गोखले कोणत्याही गटाचे झाले नाहीत. हे त्यांचे वैशिष्ट्य होते की वैगुण्य हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. इंग्रज शासकांवर आणि त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास यांमुळे स्वपक्षीयांनी त्यांच्याकडे संशयी वृत्तीने पाहिले; आणि सरकारच्या आर्थिक व इतर अन्याय्य धोरणांवर सातत्याने कठोर टीका केल्यामुळे इंग्रजांनीही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही. गोखल्यांचे एकंदर व्यक्तिमत्व अजातशत्रू असल्यामुळे त्यांना आदर मिळाला पण मोठी लोकप्रियता लाभली नाही आणि ती उच्चवर्गापर्यंत मर्यादित राहिली. व्यापक जनसंघटन न मिळण्याचा आगरकर, न्या. रानडे यांचा दुर्दैवी वारसा गोखल्यांनी पुढे चालवला. इतर सुधारकांप्रमाणेच इंग्रज सरकारचा मुखवटा आणि चेहरा वेगळा आहे, त्यांचा उदारमतवाद आणि त्यांचे अर्थकारण यांत नुसतेच द्वैत नाही तर अंतर्विरोध आहे हे त्यांनी म्हणावे त्या प्रमाणात लक्षात घेतले नाही आणि त्यामुळेच त्यांच्या मर्यादित यशाला अपयशाची किनार राहिली. मात्र त्यांची योग्यता यामुळे कमी होत नाही. भारतीय समाजकारण-राजकारण-अर्थकारण यांतील त्यांचे योगदानदेखील नाकारले जाऊ शकत नाही.

व्यासंगी संसदपटू, अभ्यासू वक्ता, चिकित्सक अर्थतज्ञ, विवेकवादी समाजकार्यकर्ता, तळमळीचा शिक्षक, ‘मराठा’ व ‘ज्ञानप्रकाश’ यांमधून लेखन करणारा निर्भीड पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या गोखल्यांनी आपली बुद्धी, वाणी, लेखणी, विद्वत्ता, संपदा समाजासाठी समर्पित केलेली होती.

पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, कोलकात्याचे ‘गोखले मेमोरियल गर्ल्स कॉलेज’, चेन्नईचा ‘गोखले हॉल, बंगळूरची ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अफेअर्स’ अशा देशपातळीवर पसरलेल्या संस्था त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य करत आहेत.

‘मवाळ’ हा शब्द गोखल्यांची चुकीची ओळख करून देईल, नेमस्त हा शब्द त्यांची अर्धवट ओळख करून देईल. ‘अहिंसेचे हिंस्र पुजारी’ अशी सरदार पटेलांची ओळख गांधी करून देत असत. त्याच न्यायाने, ‘सनदशीर मार्गाचा जहालपणे पाठपुरावा करणारा उदारमतवादी विचारवंत’ अशी गोखल्यांची ओळख करून देण्यात अभ्यासकांचे दुमत असणार नाही.

स्वतंत्र राष्ट्रात एतद्देशियांविरुद्ध आंदोलनाचे मार्ग अनागोंदीकडे जाणारे असतात. अशावेळी सनदशील मार्गच प्रभावी ठरतात. तद्वत सनदशील मार्ग, लोकशाही परंपरांची ओळख करून देण्याचे आणि त्या रुजवण्याचे कार्य गोखले व त्यांच्या समविचारी व्यक्तींनी सुरू केले आणि गांधी व त्यांच्या अनुयायांनी लोकपाठींब्याने ते पूर्णत्वास नेले. कळस लक्षात राहतो, तो बांधणारे लक्षात राहतात पण ज्या मजबूत पायावर उभा आहे तो पाया आणि पाया घालणारे मात्र विस्मृतीत जातात. खरेतर त्यांचे योगदान चिरंतन असते.     

ना.गोपाळकृष्ण गोखले यांस पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली!

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com

Tags: जहाल मवाळ कॉंग्रेस स्वातंत्र्यलढा विचारवंत राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्यपूर्व भारत पुण्यतिथी Load More Tags

Add Comment

संबंधित लेख