येत्या 16 सप्टेंबरला प्रख्यात कायदेतज्ज्ञ ए.जी.नूरानी उर्फ अब्दुल गफूर अब्दुल मजीद नूरानी यांच्या वयाची 94 वर्षे पूर्ण होणार होती. पण त्याच्या अगदी अठराच दिवस आधी 29 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याचा हा माझा प्रयत्न.
मला जवळपास दहा वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत अयोध्या कंसॉर्टियममध्ये सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली होती. भूतपूर्व कॅबिनेट सचिव व माझे चांगले मित्र जफर सैफुल्ला यांच्या आग्रहाने मी या प्रक्रियेत सहभागी झालो होतो. त्यात माझ्याशिवाय स्वतः जफर सैफुल्ला, ‘फ्रंटलाइन’चे संपादक एन.राम, अॅड.ए.जी. नूरानी, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी आयुक्त डॉ.बी.डी.शर्मा, आचार्य जुगलकिशोर शास्त्री व ‘हिंदुस्थान टाइम्स’चे संपादक संजय नारायण हे सदस्य होते. या फोरमच्या दोन-तीन बैठका इंडिया इंटरनॅशनल सेंटर, दिल्ली येथे पार पडल्या व पुढील बैठक अयोध्येत घेण्याचे ठरले. मात्र, तेव्हा जफर सैफुल्ला आजारी पडले व त्या आजारपणातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर अयोध्या कंसॉर्टियमची प्रक्रिया थांबली. पण या प्रक्रियेदरम्यान माझा मोठा व्यक्तिगत लाभ झाला. ए.जी.नूरानींना प्रत्यक्ष भेटायला मिळाले. सांप्रदायिकतेच्या प्रश्नावर एजींचा जो व्यासंग होता, त्याचा मला माझ्या कामात खूप उपयोग झाला.
16 सप्टेंबर 1930 रोजी मुंबईत जन्म झालेल्या या तरुणाने मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायला नुकतीच सुरुवात केली असताना, शेख अब्दुल्ला यांच्या अटकेची कारवाई झाली. तेव्हा त्यांचे वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.टी.रामाराव व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे.जयललितांच्या केसेसमध्ये पण ते वकील होते. व्यवसायाने अत्यंत व्यस्त वकील असूनही त्यांनी वृत्तपत्रांमधून व काही दर्जेदार नियतकालिकांमध्ये नियमित स्तंभलेखक म्हणूनही काम केले. उदाहरणार्थ, ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘डॉन’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘स्टेट्समन’, ‘हिंदू’, ‘फ्रंटलाइन’, ‘आउटलूक’, ‘ईपीडब्ल्यू’ इत्यादी. आजही त्या-त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या लेखांचे संदर्भ म्हणून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपयोग करत आहे.
आपल्या 94 वर्षांच्या वाटचालीत आपला वकिलीचा व्यवसाय सांभाळून नूरानींनी जवळपास एक डझन पुस्तके लिहिली आहेत. त्यात प्रामुख्याने आर.एस.एस, काश्मीर, भारतीय स्वातंत्र्य संग्राम, धर्मनिरपेक्षता तथा भारतीय मुस्लिमांची परिस्थिती या विषयांवरील अभ्यासपूर्ण पुस्तकांचा अंतर्भाव आहे. भारतीय इतिहासातील अठराव्या शतकातील स्वातंत्र्याच्या उठावांपासून ते विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत झालेल्या घडामोडींवर एजींच्या व्यासंगाला भारतीय उपमहाद्वीपात तोड नाही.
त्यांनी 2013 मध्ये ‘द कश्मीर डिस्प्यूट - 1947-2012’ या शीर्षकाचा जवळपास बाराशे पानांचा तपशीलवार दीर्घ प्रबंध दोन खंडांत लिहिला. अत्यंत वादग्रस्त आर्टिकल 370 वर पाचशे पानांचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे; जे त्यांनी आर्टिकल 370 वर सर्वोच्च न्यायालयात स्वतः दाखल केलेल्या याचिकेत 2023 मध्ये परिशिष्ट म्हणून दाखल केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर 2019 मध्ये दिलेल्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यासाठीची कागदपत्रे ते जमा करत होते.
एजी राजकीय घडामोडींवर अत्यंत विद्वत्तापूर्ण व नेमकी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध होते. उदाहरणार्थ, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली, त्या वेळी भारतातील फारच निवडक लोकांनी आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली, त्यात एजींचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. आणीबाणीच्या काळातल्या सेंसॉरशिपच्या विरोधात त्यांनी ‘ओपिनियन’ नावाचे दोन पानांचे एक बुलेटिन सुरू केले होते. त्यात त्यांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीची इतर मूलभूत तत्त्वे’ या विषयांवर अतिशय सुंदर लेख लिहिले आहेत. आजदेखील लोकांनी ओपिनियनचे अंक संग्रही ठेवले आहेत.
‘द आर.एस.एस.: अ मेनस टू इंडिया’ 547 पानांच्या डाव्या विचारांच्या पुस्तकात संघाने 1925 पासून प्रथम सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांच्या काळापासूनच रामनवमी, दुर्गापूजा, गणेश पूजा तथा विभिन्न सणांचा उपयोग सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी कशी सुरुवात केली आहे, याची माहिती दिली आहे. नागपूर येथे झालेल्या 1926 च्या दंगलीत संघाची कशी सदोष भूमिका होती, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. व तोच प्रकार भागलपूर, गुजरात, भिवंडी, जळगाव, जमशेदपूर, जबलपूर, अहमदाबाद, मुजफ्फरपूर, बिहार शरिफ, मुजफ्फरनगर, मेरठ, मलियाना, केरळ मध्ये माल्यपुरम या ठिकाणी झालेल्या दंगलींच्या बाबतीतही दाखवून दिला आहे. कन्याकुमारी येथे 1963 पासून विवेकानंद केंद्राच्या निर्माणाची सुरुवातच सांप्रदायिकतेचे ध्रुवीकरण करून झालेली आहे, हे एजींनी सप्रमाण दाखवून दिले आहे. व आज भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच भारतीय जनता पार्टीचे दोन संघ स्वयंसेवक पंतप्रधान पदावर यायला हे सर्व सांप्रदायिक वातावरण निमित्त झाले आहे - याच धाग्यावर या संपूर्ण पुस्तकाची मांडणी केली आहे.
‘इंडियन पोलिटिकल ट्रायल्स 1775 – 1997’ या 316 पानांच्या पुस्तकात भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहासच दिसतो. दोनशेहून अधिक वर्षांच्या काळात न्यायालयासमोर आलेले 12 अत्यधिक महत्त्वाचे राजकीय खटले या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. बंगालचा पहिला व्हाईसरॉय वॉरन हेस्टिंग्स याने महाराजा नंदकुमारला बाजूला सारण्यासाठी त्याची हत्या करून; म्हणजेच 5 ऑगस्ट 1775 रोजी कलकत्त्यात त्याला जाहीर फाशी देऊन; स्वतःला बंगालचा सर्वेसर्वा करून घेतले होते. आणि त्यामुळे हेस्टिंग्सला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंपिचमेटच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. पण त्यातून तो शेवटी सहीसलामत सुटलाही होता. त्या खटल्याचा तपशील पुस्तकात दिला आहे. तसेच शेवटचे बादशाह बहादूरशाह जफर यांच्यावर चाललेल्या 1858 मधील खटल्याची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली असून, 1943 मध्ये चाललेल्या ग्रेट वहाबी खटल्याचाही तपशील दिला आहे. लोकमान्य टिळकांवर 1897, 1908,आणि 1916 मध्ये दाखल करण्यात आलेले तथाकथित देशद्रोहाचे खटले आणि टिळकांचे होमरूल चळवळीमधील सहकारी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी केलेल्या टिळकांचा बचाव याविषयीचा त्यांनी लिहिलेला तपशील तर मुळातूनच वाचायला हवा. तसेच या पुस्तकात त्यांनी अरविंद घोषांवर घातलेला माणिकतला षडयंत्र खटला, शारदापीठाचे शंकराचार्य व अली बंधूंवर लादलेल्या कराची षडयंत्र खटला, 1921 ला मौलाना आझादांवर केलेला देशद्रोहाचा खटला, 1922 मध्ये महात्मा गांधींवर दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला, कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांचा 1930 मधील मीरत षडयंत्र खटला, 1945 मध्ये आजाद हिंद सेनेच्या सैनिकांवर केलेला लाल किल्ल्यातील खटला यांचीही तपशीलवार माहिती दिली आहे. सगळ्यात शेवटी शेर-ए-कश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यावर जो खटला गुदरला होता, त्याचीही माहिती या ग्रंथात दिली आहे.
मला एजींची पुरावे सादर करून मुद्देसूद लिहिण्याची पद्धत खूप आवडते. माझ्यासारख्या, अर्धेअधिक जीवन सांप्रदायिकतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुष्कळ वेळा त्यांच्या लिखाणातून तपशील घेऊन बोलण्यासाठी वा लिहिण्यासाठी मदत होत असते.
एजींनी 94 वर्षांपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास केला. स्वतःची जवळजवळ पाऊण हयात त्यांनी भारतातील वेगवेगळे हिंदू-मुस्लीम विवादाचे प्रश्न व त्या अनुषंगाने आर.एस.एस., बाबरी मशीद आणि काश्मीरच्या प्रश्नांची योग्य सोडवणूक यांचा अभ्यास करण्यासाठी व्यतीत केलेली आहे, म्हणून मला ते माझे सहोदर वाटतात.
अशा माझ्या फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- डॉ. सुरेश खैरनार, नागपूर
sureshkhairnar59@gmail.com
(लेखक निधर्मी विचारवंत आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष आहेत.)
Tags: obituary ag noorani suresh khairnar ayodhya fanaticism कायदा वकील अयोध्या सांप्रदायिकता आरएसएस rss काश्मीर कलम 370 Load More Tags
Add Comment