चिद्‌गगनाचे भुवनदिवे : निकोप समाजनिर्मितीची वाट प्रकाशमान करणारी व्यक्तिचित्रे

मिलिंद बोकील यांच्या 'चिद्‌गगनाचे भुवनदिवे' या पुस्तकाचा परिचय

मिलिंद बोकीलांनी या विशिष्ट आठ व्यक्तीच का निवडल्या असतील या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा जाणवते की, ही माणसे विद्वान व कर्तृत्ववान होती, त्यांचे समाजासाठी दिलेले योगदान मोठेच होते पण इतक्याच कसोटीवर त्यांची निवड झाली असेल का? प्रस्तुत लेखकाचा उद्देश पुस्तकाचे परीक्षण करणे हा नाही, समीक्षा करणे तर त्याच्या क्षमतेबाहेरचे आहे पण तो लेखकाच्या, त्याच्या भूमिकेच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करतो आहे. या प्रामाणिक प्रयत्नांती असा निष्कर्ष निघतो की, वरील कसोटीबरोबरच ह्या व्यक्ती बहुश्रुत होत्या, आत्मनिष्ठ होत्या, त्यांची मूल्यनिष्ठा अभेद्य होती, त्यांच्या कार्याप्रती ते समर्पित होते, त्यांना लोकांविषयी कणव व आपुलकी होती, पुढच्या पिढीविषयी आदर व प्रेम होते, जीवन समरसून जगण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती, कोणाविषयी कटुता न बाळगता आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहून त्यांनी कार्य केले.

चिद्‌गगनाचे भुवनदिवे हे शब्द ज्ञानेश्वरी मधील आहेत. चिद्.गगनाचे भुवनदिवे असा सलग शब्द ज्ञानेश्वर चिद्‌गगनाचे | भुवन दिवा || असा विभक्त शब्द ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायातील सहाव्या ओवीत आहे. समग्र ओवीचा अर्थ असा होतो की, आपल्या आयुष्यात येणारी काही माणसे आपले अंतर्मन उजळून टाकतात. अशा माणसांना ज्ञानेश्वर दिव्याची उपमा देतात.

‘चिद्‌गगनाचे भुवनदिवे’ हे मिलिंद बोकील यांचे व्यक्तीचित्रणाच्या अंगाने जाणारे पुस्तक आहे.या पुस्तकात एकूण आठ व्यक्तींचे चित्रण केलेले आहे आणि ह्यातील कोणतीही व्यक्ती हयात नाही.

मिलिंद बोकील यांच्यासारख्या बहुआयामी व्यासंग, बहुपेडी प्रतिभा असलेल्या व्यक्तीचा लोकसंग्रह हा तितकाच बहुआयामी, बहुपेडी असणार हे ओघाने आलेच. आणि त्यातून त्यांनी चित्रण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्ती तितक्याच तोलामोलाच्या असणार.

या आठ व्यक्तींपैकी दोन व्यक्ती या बोकिलांच्या आई आणि वडील आहेत. त्यांच्याविषयी सर्वसामान्य वाचकाला माहीत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु इतर सहा व्यक्तींपैकी एक श्री.पु. भागवत सोडले तर इतर व्यक्ती प्रस्तुत लेखकाला अपरिचित होत्या (काहींची नावे ओझरती ऐकली होती) त्यांच्या कार्याविषयी फारशी माहिती नव्हती.

जागतिकीकरणानंतर (चार-पाच वर्षं मागे पुढे) जन्माला आलेल्या आणि वाचनापासून दुरावलेल्या पिढीला हे सांगून पटणार नाही की, मौज, सत्यकथा, किर्लोस्कर, हंस अशा मासिकांनी लोकांवर संस्कार केले. पण या मासिकांनी तसे संस्कार केले कारण त्या मासिकात समाविष्ट केलेले साहित्य श्री.पुं.सारख्या विचक्षण व साक्षेपी संपादकांच्या काटेकोर चाळणीतून गेलेले असल्याने सकस व दर्जेदार होते. त्यामुळे वाचकांवर झालेल्या संस्काराचे श्रेय लेखकांबरोबरच संपादकांनादेखील द्यायला पाहिजे.

आपल्याकडे संपादक आणि सिनेमाचा एडिटर यांचे काम म्हणजे ‘काटछाट’ करणे हे असल्याचा गैरसमज आहे. एखादा साक्षेपी, उच्च निर्मितीमूल्य असलेला संपादक लेखाच्या अभिव्यक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवू शकतो हे या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात समजू शकते. ‘साहित्याचा भूमिपुत्र’ असे शीर्षक असलेला हा लेख श्री.पु. भागवत यांच्यावर आहे. या लेखात श्री.पु. संपादक म्हणून आणि माणूस म्हणून कसे होते याचे दर्शन घडते. तसेच त्याकाळी (नवोदित) लेखक आणि संपादक यांच्यामध्ये घडणाऱ्या चर्चा कशा प्रकारच्या होत्या आणि लेखकाच्या अभिव्यक्तीला आणि वाचकांच्या अभिरुचीला एक वेगळीच उंची मिळवून देण्यात त्या कशा सहाय्यभूत ठरल्या हे समजते. त्यावेळच्या साहित्यातील प्रवाहांचे आकलन होते. या लेखात श्री.पुं.च्या वाङ्मयीन जाणीवेवर भाष्य करताना मिलिंद बोकील म्हणतात, “साहित्य ही जीवनवेधी कला आणि लेखकाचे जीवन किंवा जीवन जगण्याची पद्धत ही त्यातून वजा करता येत नाही. तिचा निर्मितीवर परिणाम होतोच. प्रतिभासंपन्न पण मूल्यहीन लेख एका मर्यादित उंचीपर्यंतच उडी मारू शकतो.”

'साहित्याचा भूमिपुत्र' या शीर्षकाची समयोचितता या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदातून व्यक्त होते. लेखकाच्या आत्मनिष्ठेचे भान असणाऱ्या आणि त्याची प्रतिभा बहरून कशी येईल याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या श्री.पुं.सारख्या संपादकाचे योगदान विषद करताना मिलिंद बोकील म्हणतात “साहित्य ही जर भूमी मानली तर मग श्रीपु तिचे अस्सल भूमिपुत्र होते. या भूमीचे म्हणून जे काही गुणधर्म आहेत, ते सगळे त्यांच्यामध्ये होते. या भूमीमधूनच आपला जीवनरस आणि सत्व जोपासून ते उभे राहिले आणि आपले सगळे आयुष्य त्यांनी त्या भूमीच्या मशागतीसाठी वापरले. निर्माण होणाऱ्या पिकावर त्यांना अधिकार सांगता येणार नव्हता, तरीही.”

या पुस्तकातील इतर व्यक्ती विद्वान, बहुश्रुत, आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ होत्या आणि त्या त्या काळात त्यांनी आपल्या कार्याने ठसा उमटवला होता हे त्यांच्यावरील लेख वाचल्यावर लक्षात येते आणि या व्यक्ती आपल्याला यापूर्वी माहीत नव्हत्या वा फारच त्यांच्याविषयीचे पुसटसे संदर्भ माहीत होते हे लक्षात आल्यावर खेद वाटतो.

या लेखांची शीर्षकेसुद्धा त्यांच्या कार्याशी समर्पक व उद्बोधक आहेत. किंबहुना हे लेख वाचल्यावर पुन्हा शीर्षकांवर नजर टाकली तर कळते या लेखाचा सारांश या शिर्षकातच आला आहे.

उदा. ‘समाजअर्थाचा ‘सह’योग’ या लेखात त्यावेळी महाराष्ट्राच्या स्वयंसेवी चळवळीशी संबंधित जे अभ्यासक होते त्यातील अग्रणी, ज्यांनी शिक्षण हक्क कायद्याची संकल्पना 30 ते 35 वर्षांपूर्वीच मांडली होती आणि स्त्रियांच्या उन्नतीबाबत ज्यांनी सखोल चिंतन व अभ्यास केला होता अशा प्रा.स.ह.देशपांडे यांच्याबाबत विवेचन आलेले आहे.

‘सायंटिस्ट आजी’ या लेखात पद्मभूषण कमल रणदिवे, ज्या टाटा कर्करोग संशोधन संस्थेत जीवशास्त्र विभागप्रमुख म्हणून कर्करोगावरील मुलभूत संशोधनाचे काम दीर्घकाळ काम केले होते, त्यांचे विवेचन आले आहे.

‘समाजकार्याचे अशोकवन’ या लेखात अशोक सासवडकर या मिलिंद बोकिलांच्या समवयस्क असलेल्या हाडाच्या समाजसेवकाचे विश्व रेखाटले आहे. त्याच्या स्वभावातील काही गुणदोषांमुळे वा अपूर्णतेमुळे अत्यंत तळमळीचा व सचोटीचा कार्यकर्ता असूनही अपेक्षित लक्ष्य गाठू शकत नाही त्याचा उहापोह केलेला आहे.

डॉ.जयंतराव पाटील हे थोर कृषीशास्त्रज्ञ होते. त्यांनी शेती किफायतशीर व्हावी यासाठी अभ्यास व संशोधन तर केलेच पण शेतीला फळबाग लागवडीची जोड देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावता येते हे बोर्डी भागात चिकूच्या लागवडीचे नाविन्यपूर्ण तंत्र शोधून तेथील आदिवासींच्या जीवनात स्थिरता कशी आणली, तसेच ते नियोजन आयोगाचे सदस्य असताना सरकारला धोरण बदल कसा करायला लावला याचे विस्तृत विवेचन येते. विनोबा भावे यांच्यावरील गुजराथीत लिहिलेल्या लेखांचे मराठी भाषांतर करून मिलिंद बोकीलांना प्रस्तावना लिहायला सांगून ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’च्या रूपाने विनोबा-विचारांची कवाडे सर्वसामान्यांसाठी कशी खुली झाली याचेही वर्णन येते. ‘किनाऱ्यावरचा कल्पवृक्ष’ असे शीर्षक असलेल्या या लेखातील एक प्रसंग लक्षात राहण्याजोगा आहे.

एकदा जयंतराव मिलिंद सरांना त्यांचं फार्म दाखवायला घेऊन जातात आणि एका नारळाच्या झाडाखाली थांबून विचारतात, “बाकी लोकांना जिथे वर्षाकाठी 15-20 नारळ मिळतात, तिथे हे झाड मला 40-50 नारळ देते.” मिलिंद बोकीलांनी कारण विचारल्यावर ते सांगतात, “कारण मी झाडावर चढून नारळ काढत नाही. मी खालीच थांबतो आणि झाड देईल ते नारळ घेतो. या उंच वाढणाऱ्या झाडाचा मला हाच संदेश आहे की, तू खालीच थांब, वर चढून हातपाय मोडून घेऊ नकोस आणि मलाही त्रास देऊ नकोस. नारळ खाली पडून फुटणार नाही याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. त्याच्याभोवती योग्य ते पॅकिंग दिलेले आहे. मग तू कशाला फुकाचे श्रम करतोस?” या प्रसंगाचे वर्णन करताना मिलिंद बोकील म्हणतात की, ते स्तिमित झाले आणि नैसर्गिक शेतीची शंभर पुस्तके वाचून जे समजले नसते ते या चार वाक्यांतून समजले.

‘सोशल डेव्हलपमेंट कुलकर्णी’ या लेखात शरद कुलकर्णी या सामाजिक जीवन समरसून जगलेल्या, सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेल्या, देणगीदार संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये दुवा बनून राहिलेल्या संशोधक व अभ्यासकाचे चित्रण केलेले आहे. त्यांच्याविषयी मिलिंद बोकिलांच्या शब्दांत सांगणे इष्ट ठरेल. ते लिहितात, 'आपल्या आयुष्याचा एक मोठा काळ एस.डी. यांनी आदिवासी म्हणवल्या जाणाऱ्या लोकांसाठी खर्च केला. मात्र ते सगळे लोक लांब जंगलात, दऱ्या-खोऱ्यांत अबोलपणे राहतात. त्यांना कदाचित कल्पनाही नसेल की, असा एक माणूस होता जो आपल्यासाठी श्रमला, आपल्याला उपयुक्त असे नियम आणि कायदे असावेत म्हणून त्याने आपली बुद्धी झिजवली, आपल्यासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भल्याची चिंता वाहिली आणि दुनिया थोडी तरी बदलावी म्हणून निष्कामपणे कार्य केले.

त्यांना माहीत नसेल; पण आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही एसडींचे कायमचे ऋणी आहोत. त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या मौल्यवान होत्या. त्यांनी जी रीत घालून दिली ती चिरस्मरणीय होती. ते असताना आम्ही होतो, हा आमच्या आयुष्यातला सुंदर योगायोग होता.”


हेही वाचा : आपणांबाहेरी । न लगे ठाव धुंडावा - मकरंद ग. दीक्षित


‘वाघिणीचे दूध’ आणि ‘स्थितप्रज्ञ का भाषा’ हे लेख मिलिंद बोकिलांच्या आई-वडिलांवर आहेत. मिलिंद सर वैयक्तिक आयुष्याबाबत फार खोलात जाऊन बोलल्याचा अनुभव नव्हता त्यामुळे हे लेख पाहून मी चकित झालो. हे दोन लेख जरी स्वतंत्र असले तर मी त्याचा एकत्रित विचार करणार आहे कारण हे लेख मध्यमवर्गीय जीवन, कुटुंबव्यवस्था, मध्यमवर्गाचे समाजातील स्थान, त्यांच्यातील ताणे-बाणे, ग्रामीण ब्राह्मणी कृषी परंपरा यावर विस्तृत विवेचन करतात. धार्मिक मूलतत्त्ववादी विचारांचा पहिला घाला स्त्रियांच्या शिक्षणावर व स्वातंत्र्यावर येतो असे निरीक्षण नोंदवतात. मध्यमवर्गीय जगण्याचा साहित्यात उपहास केलेला असला तरी मध्यमवर्गाच्या कुटुंबाप्रती असलेल्या निष्ठा व बांधिलकी यामुळेच समाजाचे भरण-पोषण झाले हे नमूद करताना या वर्गाचे ‘Civilizational Contribution’ अधोरेखित करतात. या लेखातील ब्राह्मणसमाजाविषयी केलेले एक विश्लेषण पटले नाही ते म्हणजे, "ब्राह्मणांमध्ये संत पुष्कळ होऊन गेले तरी सर्वसाधारण ब्राह्मणांच्या मनात अजूनही दुसऱ्या जातींविषयी प्रेमभाव किंवा कळवळा नाही. दुसऱ्याच्या दु:खाने किंवा परिस्थितीने त्यांचे मन तुटत नाही."

तर त्यांच्या आई-वडिलांचे स्वभाव परस्परविरोधी होते. आई उग्र,महत्त्वाकांक्षी, स्वत्व जपणारी तर वडील शांत, समाधानी, नेमस्त होते.

आईचा स्वभाव असा का झाला असावा याचे ते ‘जेन्डर स्टडीज’च्या अंगाने समाजशास्त्रीय विश्लेषण करतात. पोस्टात नोकरी करणारे त्यांचे मध्यमवर्गीय वडील मिलिंद बोकीलांना प्रेमाने ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्हणत असत ही आठवण सांगताना ते बाप-मुलाच्या उमलत जाणाऱ्या नात्याचा आढावा घेतात. दोन पिढ्यांमध्ये वैचारिक संघर्ष अटळ असतो. घरातील वादविवादाचे परिणाम मुलांच्या जडणघडणीवर पडतात. कुटुंबात संवाद राहत नाही, मने दुभंगतात.

पण असे घडते ते ‘respond’ करण्याऐवजी ‘react’ करतात म्हणून. माणसाची वैचारिकता बदलता येते पण मूळ स्वभाव बदलता येत नाही आणि या वस्तुस्थितीचा स्वीकार करावा लागतो.

मिलिंद बोकिलांच्या घरात वरील सर्व (मध्यमवर्गीय जाणिवांना साजेशा) गोष्टी होत्या तरी त्यांचे त्यांच्या आईवडिलांशी नाते निकोप, नितळ व प्रेम, ओलाव्याने भरलेले आदरयुक्त राहिले. असे का झाले हे सांगताना मिलिंद बोकील ‘मातृतत्त्व’ आणि ‘पितृतत्त्व’ याकडे निर्देश करतात आणि त्यांनी 'respond' कसे केले, काय भूमिका घेतली हे त्यांच्याच शब्दांत सांगावे लागेल. “आपल्या आईचा स्वभाव गोड, सोज्वळ आणि शांत का नाही असा प्रश्न मला अनेकवेळा पडायचा. तसा तो असता तर किती चांगलं झालं असतं असं वाटून जायचं. पण नंतर अर्थातच माझ्या लक्षात आलं की तसं कसं असेल? मी माझ्या आईकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता ‘मातृतत्त्व’ म्हणून पाहायला पाहिजे. आणि मातृतत्त्व हे ओबडधोबडच असणार. किंवा जसं असेल असेल तसं असणार! आपली आई 'श्यामच्या आई'सारखी किंवा विनोबांच्या आईसारखी कशी असेल? किंवा सिनेमातल्या आईसारखी तरी कशी असेल? एकदा ते मातृतत्त्व आहे हे समजल्यानंतर त्याचा बाह्य आविष्कार कसा आहे याच्याशी आपला काहीच संबंध नाही. ती आपली ‘आई’ आहे ना? मग विषय संपला. आपलं कर्तव्य त्या मातृतत्त्वाचा सन्मान करण्याचं आहे आणि आपण ते केलं पाहिजे.” पुढे जाऊन ते असंही म्हणतात, “ज्या व्यक्तींना सत्वाची जाणीव झालेली नाही, त्यांना ही समस्या वाटणार नाही परंतु ज्यांची तशी जाणीव जागृत आहे त्यांना मात्र पदोपदी संघर्ष करावा लागतो. माझ्या लक्षात आले की, माझ्या आईचा संघर्ष हाच आहे आणि मी जर तिचा मुलगा असेन तर मग तिच्या या संघर्षात मी तिची साथ द्यायला पाहिजे. मी तिचा राग धरून चालणार नाही. मला तिच्याकडे मायेनेच पाहिले पाहिजे.”

हे वाचल्यावर लक्षात आले की, हे स्वभावदोष सार्वत्रिक आहेत आणि हे कमीअधिक फरकाने सगळ्यांनाच लागू होतं आणि सगळ्यांनी आपल्या जाणिवांना असा घाट, आकार दिला तर खूपसे प्रश्न सुटू शकतील.

आपल्या लेखकपणाची गुणसूत्रे आईकडून आल्याचा निर्वाळा देताना आणि या ‘वाघिणीच्या दुधाचा’ गौरव करताना मिलिंद बोकील म्हणतात, “उद्या राज्यसंस्थेशी झगडा करण्याची वेळ माझ्यावर आली तर मला महात्मा गांधी उपयोगी पडतील, पण त्याहीपेक्षा माझ्या आईने पाजलेले दूधच माझ्या कामाला येईल!”

या पुस्तकातील प्रत्येक लेखात मिलिंद बोकीलांनी त्या त्या व्यक्तीच्या जडणघडणीविषयी, त्या काळाविषयी विश्लेषण केलेले आहे. त्यांच्यातील औपचारिक संबंधाचा आलेख घरगुती, मायेच्या संबंधाकडे कसा वळला हे वाचताना विलक्षण वाटते. त्या त्या व्यक्तीचे मोठेपण मान्य करून (आपल्या आईवडिलांसकट) सर्वांच्या गुणदोषांची चिकित्सा केलेली आहे. व्यक्तीचित्रणाचा उद्देश व्यक्तीचे ‘चित्र’ उभे करणे हा असेल तर हे पुस्तक तो उद्देश साध्य करते. प्रसिद्ध व्यक्तींबाबत आपल्या मनात एक चित्र आधीच तयार असते त्यामुळे त्यावर आलेले लिखाण आपल्या मनातील चित्राशी केवळ ताडून पाहावे लागते पण आपल्याला काहीच माहीत नसलेल्या व्यक्तीचे चित्र 30-35 पानांत उभे राहत असेल तर ते लेखकाचे श्रेयस ठरते.

व्यक्तीचा विविधांगी डोळस वेध घेण्याची क्षमता, 'पर्सनल स्पेस'ला धक्का न देता व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याची वृत्ती असल्याने एखाद्या फुलाच्या पाकळ्या उमलाव्या तसे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मिलिंद बोकील उमलून दाखवतात. असे करताना लिखाणाचा साचा ठरलेला आहे, ती व्यक्ती आयुष्यात कशी आली ते सांगणे, त्या व्यक्तीची माहिती देणे, कार्याचा आढावा घेणे, त्या कार्याचे मोल समजावून देणे, त्यांच्या विचारांशी ओळख करून देण्यावर न थांबता त्यांची विचारप्रक्रिया कशी होती याचा वेध घेणे, त्या व्यक्तीचे स्वतःच्या आयुष्यातील स्थानमाहात्म्य कृतज्ञपणे सांगणे असा तो साचा आहे. पण लिखाण साचेबद्ध नाही, एकाच साच्यातून बाहेर पडणाऱ्या मूर्ती मात्र स्वत:चं लयतत्व घेऊन आलेल्या प्रेरक, आश्वासक आणि लोभस.

प्रस्तुत लेखकाने हे पुस्तक प्रथम व्यक्तीचित्रण म्हणूनच वाचले. पण काहीतरी चुकल्यासारखे वाटल्यामुळे आणि काही प्रश्न पडल्यामुळे - जसे की, मिलिंद बोकीलांनी व्यक्तीचित्रण का केले असेल? त्याकरता ह्याच व्यक्ती का निवडल्या असतील? आणि त्यांचा हे लिहिण्यामागे उद्देश/भूमिका काय असावी? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक पुन्हा वाचले.

पुनर्वाचन केल्यानंतर लक्षात आले की, या लिखाणाला व्यक्तीचित्रण म्हणणे चुकीचे होईल. या लेखांचा परीघ, पट, पैस खूप मोठा आहे. इ.स. 1900 मध्ये जन्म झालेल्या मिलिंद बोकिलांच्या आजोबांविषयीचे भाष्य धरून तर हे लेख 100 वर्षांचा विस्तृत पट समोर मांडते आणि व्यक्ती मध्यभागी ठेवून समाजाचेच चित्रण करते. या काळातील साहित्यिक, सामाजिक, राजकीय प्रवाह कसे होते? दोन पिढ्यांमध्ये (घरगुती आणि औपचारिक) संबंध कसे होते? एकमेकांमध्ये मतभिन्नता असून देखील वैयक्तिक आदर कसा टिकून राहत असे, वैयक्तिक संबंधात कटुता येऊ नये म्हणून कसे वागायचे असते? समाजकार्याचे बदलत जाणारे स्वरूप, विकास की समानता या द्वंद्वात सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारा संभ्रम, वैचारिक घुसळण, मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे, खेड्यातील जीवन, शहरी मध्यमवर्गीय राहणीमान त्यांच्या जाणीवा व वैशिष्ट्ये या सगळ्याचे अभ्यासपूर्ण, ओघवते व मर्मज्ञ विवेचन करते. साहित्याच्या विचक्षण वाचकांसाठी आणि लेखकांसाठी देखील हे पथदर्शक ठरणारे आहे.

या पुस्तकात प्रत्येक लेखाच्या सुरवातीला मनोज आचार्य यांनी काढलेली त्या त्या व्यक्तीची रेखाचित्रे आहेत. मिलिंद बोकीलांविषयी संपूर्ण आदर बाळगून सांगावेसे वाटते की, त्यांनी लिहिलेली 30-35 पाने जी किमया साधतात तीच किमया या रेखाचित्राचे एक पान साधते. ही चित्रे व त्यांतील भाव पाहून असे वाटते की, त्या व्यक्तीशी आपली फार जुनी ओळख आहे.

मिलिंद बोकीलांनी या विशिष्ट आठ व्यक्तीच का निवडल्या असतील या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा जाणवते की, ही माणसे विद्वान व कर्तृत्ववान होती, त्यांचे समाजासाठी दिलेले योगदान मोठेच होते पण इतक्याच कसोटीवर त्यांची निवड झाली असेल का? प्रस्तुत लेखकाचा उद्देश पुस्तकाचे परीक्षण करणे हा नाही, समीक्षा करणे तर त्याच्या क्षमतेबाहेरचे आहे पण तो लेखकाच्या, त्याच्या भूमिकेच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करतो आहे. या प्रामाणिक प्रयत्नांती असा निष्कर्ष निघतो की, वरील कसोटीबरोबरच ह्या व्यक्ती बहुश्रुत होत्या, आत्मनिष्ठ होत्या, त्यांची मूल्यनिष्ठा अभेद्य होती, त्यांच्या कार्याप्रती ते समर्पित होते, त्यांना लोकांविषयी कणव व आपुलकी होती, पुढच्या पिढीविषयी आदर व प्रेम होते, जीवन समरसून जगण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती, कोणाविषयी कटुता न बाळगता आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहून त्यांनी कार्य केले.

ही माणसे विस्मृतीत गेली होती आणि त्यांच्या स्मृती उजळणे हे अंतिमत: समाजासाठी भल्याचे ठरणार आहे. निकोप समाजाच्या निर्मितीची वाट प्रकाशमान करणारे हे ‘चिद्‌गगनाचे भुवनदिवे’ मोलाचे ठरतात ते यासाठीच.

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Tags: मिलिंद बोकील व्यक्तिचित्रणे समाज साहित्य संस्कृती नवे पुस्तक Load More Tags

Add Comment

संबंधित लेख