सय्यदभाईंच्या ‘दगडावरच्या पेरणी’तून ‘गुलिस्तान’ तयार झाल्यावाचून राहणार नाही!

सय्यदभाईंच्या जाण्याने मुस्लीम समाज प्रबोधनातील एका युगाचा अंत झाला आहे.

‘मुस्लीम पॉलिटिक्स इन इंडिया’च्या शेवटच्या प्रकरणात हिंदू-मुस्लीम प्रश्नावर उपाय सुचवताना दलवाई म्हणतात, ‘Scientific Humanism is only solution’. हाच विचार सय्यदभाई कोळून प्याले. ‘दगडावरची पेरणी’ हे त्यांचं आत्मचरित्र. (ज्याला त्यांनी ‘कार्यकथन’ म्हटलं आहे.) त्याच्या सुरुवातीला ते म्हणतात, ‘या कार्यकथनातून नवा समाज घडावा, धार्मिक समस्या नसलेला देश उभा राहावा, इथला माणूस निखळ माणूस म्हणून सुखी, शांत जगावा ही नम्र अपेक्षा आहे. अर्थात समाज सुखी, शांत करणं हे दगडावरच्या पेरणीचं काम आहे. पण भविष्यातल्या पिढ्या हे काम पुढं नेतील असा मला विश्वास आहे.’  

वयाच्या 87 व्या वर्षी सय्यदभाई गेले. अकालीच गेले. त्यांचा सहवास लाभलेल्यांसाठी त्यांचं जाणं अकालीच होतं. तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्या ठायी होता. तो अगदी शेवटपर्यंत टिकून होता. शरीराने ते थकलेत असं कधीच वाटलं नाही. तजेलदार चेहरा, भारदस्त शरीरयष्टी, तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती... आयुष्यभर ‘दगडावरची पेरणी’ करत असूनही त्यांच्या मुद्रेवर निराशेचा, उद्विग्नतेचा कधी लवलेश नाही. उलट दरवेळी भेटले की गप्पांमध्ये एखादा विनोद, खुसखुशीत किस्सा, नकला, मिमिक्री यांची पेरणी असायची. त्यामुळे विषय कितीही गंभीर असला, त्यावर तासनतास चर्चा करत असलो तरी त्यांच्या विचारांचं ओझं वाटलं नाही, की डोंगराएवढे बरे-वाईट अनुभव ऐकूनही माघार घ्यावी असं वाटली नाही. उलट त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर रिचार्ज होऊन आल्यासारखं वाटायचं.

सय्यदभाईंची पहिली भेट साधारण दशकभरापूर्वी झाली असावी. मुस्लीम सत्यशोधक मंडळात ते बऱ्यापैकी सक्रिय होते. अध्यक्षच होते ते. मात्र तोवर त्यांच्या सामाजिक कार्याचा सूर्य क्षितिजावर आला होता. 1984 चं शहाबानो प्रकरण, 1992-2002च्या दंगली यांसारख्या मुस्लीम मानस (आणि उदारमतवादी हिंदू मानस) ढवळून काढणाऱ्या घटनांचा प्रभाव आणि हँगओव्हर बऱ्यापैकी उतरला होता. त्यामुळे माध्यमांमध्ये ‘रमजान ईद-बकरी ईद’च्या बातम्यांचा सोपस्कार सोडला तर मुस्लीम समाज आणि त्यांचे प्रश्न यांना फारसं प्रतिनिधित्व नव्हतं. एखाद्या हिंदुत्ववादी संस्थेने किंवा व्यक्तीने आगळीक केली की, ‘दोन्ही बाजू वाचकांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न’ म्हणून माध्यमांतून सुधारणावादी मुस्लीमांच्या प्रतिक्रिया छापून यायच्या. या परंपरेला अपवाद ठरले सय्यदभाई आणि त्यांचे मुस्लीम सत्यशोधक मंडळ (मु.स.मं.) मुसलमान समाजात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी, उदारमतवादी आणि चिकित्सक वृत्ती असणारा वर्ग तयार करण्यासाठी 1970 पासून ‘धडपडणाऱ्या’ मंडळाच्या उपक्रमांच्या बातम्या पुण्यातील प्रमुख वृत्तपत्रांत वरचेवर यायच्या. मराठी माध्यमांच्या चर्चाविश्वात अदखलपात्र असलेला मुस्लीम समाजाला मंडळामुळे का होईना ‘फुटेज’ मिळते हे बघून अस्वस्थता कमी व्हायची. ‘सय्यदभाई’ या नावाविषयी कुतूहल त्यामुळेच निर्माण झाले होते.

व्यक्तिशः त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली होती. अजून हाताशी काठी आली नव्हती. ब्रॉंकाईटीसचा त्रास असल्यामुळे बोलताना ठसका मात्र तेव्हाही लागायचा. मलाही त्यावेळी ब्रॉंकाईटीस छळत असल्यामुळे मला ते ‘हमदर्द’ वाटायचे. सामाजिक जीवनात - त्यातही अभिजन, इंटेलेक्च्युअल वर्गात - इतका आदर मिळवणारा पहिला ‘मुसलमान’ मी पाहिला होता. (कदाचित त्याकाळी माझा परीघ अतिशय लहान असल्यामुळेही तसं असावं.) त्यामुळे त्यांच्याविषयी आदर, उत्सुकता होतीच. भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि बुलंद आवाजामुळे समोरच्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडायची. बरेचदा समोरची व्यक्ती दबकून राहायची. मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, अनुभवाचं ओझं समोरच्या व्यक्तीवर पडणार नाही याची ते काळजी घेत. नवा दमाचा तरुण कार्यकर्ता असला की, ते याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देत आणि एकदम त्याच्या पातळीवर येऊन बोलत.

मंडळाचं कार्यक्षेत्र मर्यादित असलं तरी अर्ध्या शतकापासून मुस्लीम समाजात धर्मचिकित्सेचं आणि समाजप्रबोधनाचं काम चिकाटीने करणारी ही एकमेवाद्वितीय संघटना आहे. सय्यदभाई मंडळाचे संस्थापक सदस्य होते. जवळपास पन्नास वर्षांहून अधिक काळापासून सय्यदभाई हे मुस्लीम समाजसुधारणेतील अग्रणी नाव होतं. 1966 च्या सात मुस्लीम महिलांच्या मोर्चानंतर सुधारणावादी मुस्लीम ‘तरुण तुर्कांचे’ संघटन सुरू करण्याचा विचार हमीद दलवाईंच्या मनात घोळत होता. त्यासाठी भाई वैद्य, बाबा आढाव, अ. भि. शहा यांच्यासह त्यांची चाचपणी सुरु होती. तिशीत असलेले सय्यदभाई बहिणीला मिळालेल्या एकतर्फी तलाकमुळे अस्वस्थ झाले होते. बहिणीवर झालेल्या अन्यायावर धर्माच्या चौकटीत उत्तर मिळेल या आशेने ते मुल्ला-मौलवींकडे धाव घेत होते, आणि त्यांच्या उत्तरांनी अधिक अस्वस्थ होत होते. याच काळात ‘युक्रांद’च्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत त्यांनी हमीद दलवाईंना ऐकलं, आणि या माणसाकडून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची त्यांना खात्री पटली. मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे असं म्हणणाऱ्या सय्यदभाईंना दलवाई म्हणाले, “आपण सोबतच काम करू”. अशाप्रकारे दोघे एकत्र आले. रुमी म्हणतो, ‘what you seek is seeking you!’ हे काहीसं तसंच होतं.

22 मार्च 1970 रोजी साधनेच्या कार्यालयामध्ये मंडळाची स्थापना झाली. पुढची चार-पाच वर्षं मंडळ आणि दलवाई यांचा झंझावात देशभर चर्चेचा विषय बनला. या काळात मुस्लीम महिला परिषद, शिक्षण परिषद, जिहाद ए तलाक परिषद यांसारख्या अनेक ऐतिहासिक परिषदांचे आयोजन मंडळाने केलं. त्यांच्या आयोजनात अर्थातच सय्यदभाईंचाही मोठा वाटा होता. टाइम्स ऑफ इंडिया, अलिगढ जर्नल पासून फ्रीथिंकर, द एथिस्ट पर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रं-नियतकालिकांमध्ये मंडळाच्या उपक्रमांविषयी, दलवाईंविषयी छापून येत होतं. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत मंडळ, दलवाई आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न यांवर चर्चा झडू लागली होती. आजवर दुर्लक्षित राहिलेले (किंवा ठेवले गेलेले) प्रश्न ऐरणीवर आले होते. यामुळे साहजिकच परंपरावादी, जमातवादी मुस्लीमांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. (विशेष म्हणजे ‘राष्ट्रीय मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या तत्कालीन उदारमतवादी मुस्लीम विचारवंतांमध्येही अस्वस्थता पसरली होती.)

याला प्रतिक्रिया म्हणून रेडियन्स, शोधन आणि तत्सम जमातवादी माध्यमांमध्ये मंडळ आणि दलवाई यांच्याविषयी विखारी, प्रक्षोभक लेखन प्रसिद्ध होऊ लागले होते. त्याचाच परिपाक म्हणून दलवाई, सय्यदभाई आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. (यापूर्वी दोन-तीन वेळा दलवाई आणि कार्यकर्त्यांवर पुणे मुंबई इथे हल्लेही झाले होते.) त्यासाठी तथाकथित ‘ब्लॅक डिसेंबर’ या नावाने माथेफिरूंचा दस्ता अ‍ॅक्टिव्ह झाला होता, आणि जाहीर धमक्या देत होता. यापूर्वी झालेल्या हल्ल्यात सय्यदभाई दलवाईंसोबत अंगरक्षकाप्रमाणे राहिले. नव्या धमक्यांनाही ते तितक्याच धैर्याने सामोरे गेले. त्यांचे हे धैर्य पाहून हल्लेखोरांचे अवसान गळून जायचे. सय्यदभाईंच्या कणखर वृत्तीचा हा परिपाक होता.

अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या लढाऊ बाण्याने आणि समयसूचकतेने अनेक अवघड प्रकरणं मार्गी लावली. अशीच एक आठवण ‘दगडावरची पेरणी’मध्ये आहे, त्यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज येईल. रफी सय्यद नावाचे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. स्वभावाने अतिशय संवेदनशील. एकेकाळी देशात वाढलेल्या जमातवादी वातावरणामुळे ते मानसिक संतुलन गमावून बसले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. दफनासाठी कबर खोदली गेली. मात्र आत्महत्या करणाऱ्या मुसलमानाचा दफनविधी होऊ शकत नाही, असा पवित्रा काही धर्मांधांनी घेतला. सय्यदभाई कब्रस्तानात गेले. वादावादी झाली. सय्यदभाईंनी त्यांना विचारले, “अब इस खोदी हुई कबर का क्या करेंगे? इसे अब मय्यत की आस लगी है. इसे ऐसेही बुझा नहीं सकते. इसमें किसी को तो दफनानाही होगा.” सय्यदभाईंचा हा अवतार बघून धर्मांधांनी काढता पाय घेतला.  

मार्च 1977 ला दलवाई गेले. त्याआधी दोन-तीन वर्षे ते फारच आजारी होते. म्हणजे सय्यदभाईंना त्यांचा अल्पसाच सहवास मिळाला. फार फार तर नऊ-दहा वर्षांचा. या काळात ते दलवाईंसोबत सावलीसारखे राहिले. त्यांच्या मनात उभे राहिलेल्या प्रश्नांचे काहूर आता शमले होते. अस्वस्थता संपली होती, वैचारिक स्पष्टता आली होती.

हमीद दलवाईंचा इतका जवळून लाभलेला सहवास, पाच दशकं मंडळात सक्रिय, राष्ट्रीय स्तरावर ओळख असं भलं मोठं संचित गाठीशी असतानाही सय्यदभाई शेवटपर्यंत स्वतःला कार्यकर्ता म्हणवत राहिले. सय्यदभाई माझ्यापेक्षा पन्नासहून अधिक वर्षांनी मोठे होते. माझ्या वयाच्या जवळपास दुप्पट वर्षं ते समाजजीवनात कार्यरत होते. मात्र चर्चा करताना, गप्पा मारताना ते ‘मोठेपणा’चा आव आणत नसत. उलट ‘बेटा मी विचारवंत नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तुम्हा तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत. पण नवे विषय निवडून घ्यावे लागतील. त्यांच्यासाठी गाडून घ्यावं लागेल.’ असं ते सांगायचे. ‘मंडळ आता शमुच्या (डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्या) सक्षम हातात आहे.’ असं समाधानही ते व्यक्त करायचे.

सय्यदभाई मुळचे हैदराबादचे. वयाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे 1940 मध्ये ते पुण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मात्र ते बहुभाषिक होते. हिंदी, उर्दूवर त्यांचं प्रभुत्व होतं. रस्त्यावरच्या पाट्या वाचून मराठी शिकलो असं ते म्हणायचे. पुढे मराठीवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. तुमचे शिक्षण काय झालं असं कुणी विचारलं तर ते म्हणायचे, ‘बी.पी. आणि एम.एस.एम.’ म्हणजे जिथे त्यांनी नोकरी केली तो भारत पेन्सिल कारखाना आणि जिथे समाजकार्य केलं ते मुस्लीम सत्यशोधक मंडळ. या दोन विद्यापीठांतून मी आयुष्याचं शिक्षण घेतलं असे ते म्हणत.  

विचारवंत नव्हे कार्यकर्ता, असं ते म्हणवून घेत असले तरी त्यांच्याकडे वैचारिक स्पष्टता होती. मंडळावर अनेक संकटं आली. दलवाई यांच्या अकाली निधनानंतर मंडळ संपलं म्हणून अनेकांनी पेढे वाटले. पण सय्यदभाई आणि इतर कार्यकर्त्यांनी मंडळ आणि दलवाईंचे विचार जगवले. पुढे मंडळातील अनेक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांनी आणि विद्वान विचारवंतांनी लोकक्षोभामुळे मंडळ सोडलं. सय्यदभाईंनी मात्र दलवाई विचार आणि मंडळाची भूमिका यांच्याशी इमान राखलं. उलट या सुधारणावादी विचाराशिवाय समाजाला तरणोपाय नाही हे त्यांचं मत उत्तरोत्तर अधिक दृढ होत गेलं.

सय्यदभाई एका विचाराचे पाईक असले तरी त्यांच्यात भाबडेपणा नव्हता. देशातली बदलती परिस्थिती पाहून निराश होऊन ‘इस रात की सुबह नहीं’ असं म्हणत त्यांनी प्रबोधनाचं हत्यार टाकलं नाही, की फाजील आशावाद दाखवत ‘वो सुबह कभी तो आयेगी’ म्हणत ते स्वस्थही बसले नाहीत. कृतीशीलतेबरोबरच संयतपणाही त्यांच्याठायी होता.

दलवाई यांच्याप्रमाणेच त्यांचेही उजव्या परिवारातील काही मंडळींशी मित्रत्वाचे संबंध होते. त्यांना ते ‘विरोधक मित्र’ असाच शब्द वापरायचे. चर्चेने मार्ग निघतो, आपण बसून बोलू असं ते कायम म्हणायचे. या विचारातूनच त्यांनी बाबरी खटल्यातील सर्व याचिकाकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून चर्चेने मार्ग काढण्याचा पर्याय सुचवला होता. पुढे स.ह.देशपांडे यांच्यासोबत या प्रश्नावर आपल्या परीने तोडगा काढण्याचं ‘सूत्र’ही मांडलं होतं.  

सय्यदभाईंनी उजव्या विचारांच्या संस्थांकडून पुरस्कार स्वीकारले, पद्मश्री स्वीकारला म्हणून अनेक समविचारी मित्र त्यांच्यावर नाराजही झाले होते. मात्र सय्यदभाई स्पष्टवक्ते होते. ते म्हणाले, ‘संस्थेचे पुरस्कार स्वीकारणे किंवा नाकारणे हा माझ्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. मंडळाशी त्याचा संबंध नाही.’ पद्म सन्मानाच्याबाबतीतही त्यांची भूमिका ठाम होती. ‘हा पुरस्कार भारतीय जनतेने निवडून दिलेल्या सरकारने दिला आहे. कोणत्या पक्षाने किंवा संघटनेने तो दिलेला नाही.’ हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

मात्र आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचा आणि राजकारणाचा, समाजकारणाचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे मुस्लीमांवर केवळ मुस्लीम म्हणून शा‍ब्दिक, शारीरिक हल्ले होत असताना, किंवा त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना ते ठामपणे मुस्लीमांच्या बाजूने उभे राहिले. (‘कर्तव्यसाधना’वरील व्हिडिओ मुलाखतीत याविषयी त्यांनी विस्ताराने मत मांडलं आहे.)

‘सत्यशोधकवाले सामान्य मुस्लीमांमध्ये मिसळत नाहीत, त्यामुळे मुस्लीमांचे ‘खरे’ प्रश्न त्यांना कळत नाहीत’ असा आरोप सर्रासपणे केला जायचा. (आजही केला जातो.) दुसरीकडे, ‘आपल्याला समाजाने बहिष्कृत केले आहे, आमच्या जीवाला धोका आहे’ असा समजही काहीजण करून घ्यायचे. परिणामी ते समाजापासून एकटे पडायचे, संवादाचे मार्ग बंद व्हायचे. सय्यदभाईंनी हे कटाक्षाने टाळलं. हा संवाद सुरु राहिल याची त्यांनी काळजी घेतली. कोंढव्यासारख्या मुस्लीमबहुल भागात ते राहिले. इतकंच नव्हे तर त्यांचा कारखाना असलेल्या ‘बुऱ्हानी इंडस्ट्रीयल इस्टेट’चे चेयरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. कारखान्यात येणाऱ्या सर्वसामान्य मुस्लीम उदबत्ती विक्रेत्याशीही ते संवाद करायचे आणि हळूच आपला विचार त्याच्यासमोर मांडायचे. या कर्तव्यात त्यांनी कधीच कसूर केला नाही, कमालीचे ऑप्टिमिस्टिक वाटायचे ते.      

सय्यदभाईंचं अजून एक वैशिष्ट्य इथे आवर्जून नोंदवलं पाहिजे. प्रसिद्धीपराङ्मुख राहून निरपेक्षपणे समाजकार्य करत राहणे हा सद्गुण असला तरी या कार्याचं डॉक्युमेंशनच न ठेवणे हा गहाळपणा झाला. पुरोगामी वर्तुळात याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. सय्यदभाई मात्र याला अपवाद होते. 1967 पासून ते अगदी अलीकडेपर्यंतची मंडळ, दलवाई आणि स्वतःविषयी वेळोवेळी वृत्तपत्रांत आलेल्या सर्व कात्रणांचे त्यांनी व्यवस्थित फायलिंग केले आणि ते जीवापाड जपले. ती कात्रणं नजरेस पडली नसती तर ‘मुस्लीमांसोबत हिंदूंचेही भारतीयीकरण झाले पाहिजे’ यांसारखी दलवाईंची अप्रतिम वाक्यं हवेतच विरून गेली असती.

‘मुस्लीम पॉलिटिक्स इन इंडिया’च्या शेवटच्या प्रकरणात हिंदू-मुस्लीम प्रश्नावर उपाय सुचवताना दलवाई म्हणतात, ‘Scientific Humanism is only solution’. हाच विचार सय्यदभाई कोळून प्याले. ‘दगडावरची पेरणी’ हे त्यांचं आत्मचरित्र. (ज्याला त्यांनी ‘कार्यकथन’ म्हटलं आहे.) त्याच्या सुरुवातीला ते म्हणतात, ‘या कार्यकथनातून नवा समाज घडावा, धार्मिक समस्या नसलेला देश उभा राहावा, इथला माणूस निखळ माणूस म्हणून सुखी, शांत जगावा ही नम्र अपेक्षा आहे. अर्थात समाज सुखी, शांत करणं हे दगडावरच्या पेरणीचं काम आहे. पण भविष्यातल्या पिढ्या हे काम पुढं नेतील असा मला विश्वास आहे.’  

इक़्बाल आपल्या एका शेरमध्ये म्हणतो,

‘हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है
बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा’

सय्यदभाई असेच ‘दीदावर’ म्हणजे द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांच्या निधनाने मुस्लीम समाज प्रबोधनातील एका युगाचा अंत झाला असला तरी त्यांच्या दगडावरच्या पेरणीला बहार येऊन त्यातून ‘गुलिस्तान’ तयार झाल्यावाचून राहणार नाही, हे खरे!

- समीर शेख, पुणे 
sameershaikh7989@gmail.com 


हेही वाचा : जीवाची बाजी लावून लढेन! - सय्यदभाई 

Tags: सय्यदभाई मुस्लीम सत्यशोधक मंडळ समीर शेख हिंदू मुस्लीम प्रबोधन मराठी मुसलमान हमीद दलवाई कार्यकर्ता समाजकार्य चतुरंग Load More Tags

Add Comment