अजि मी व्याघ्र पाहिले (पूर्वार्ध)

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील पेंच व्याघ्रप्रकल्पातील सफारीचा अनुभव...

आमची गाडी मातीच्या आठ फुट रुंदीच्या मातीच्या कच्च्या रस्त्यावरून पुढे चालली होती. चितळ घाऊकपणे दिसत होते त्यामुळे त्यांचे अप्रूप संपले होते. इंडिअन गौरसुद्धा दिसत होत्या. माकडे तर झाडांवर टूनटून उद्या मारतच होती. इतक्यात गाईड ओरडला “कॉल आया कॉल आया”. आमची गाडी थांबली. मला वाटलं की, त्याला कुणाचा तरी फोन आला म्हणून त्याने गाडी थांबायला सांगितली. पण वास्तविक त्यांच्या परिभाषेतील तो वाघाच्या अस्तित्त्वाचा अलर्ट होता.

काही गोष्टी घडायच्या नशिबात लिहिलेल्या असतील तर त्या घडतातच. झालं असं की, आम्हा मित्रांचा पेंच अभयारण्याला भेट द्यायचा प्लॅन ठरला. रेल्वे-हॉटेल-सफारी इ. बुकिंग्जसुद्धा झाली. पण ऐनवेळी काही अपरिहार्य कारणामुळे मित्रांचा प्लॅन रद्द झाला. मी बुकिंग्ज रद्द केली पण का कोण जाणे, माझं रेल्वेचं तिकीट मी रद्द केलं नाही. म्हटलं जाऊ नागपूरपर्यंत तरी.. मग बघू पुढचं पुढे.

अशा प्रकारे आमची ‘ग्रुप टूअर’ ‘सोलो टूअर’ मध्ये ‘कन्व्हर्ट’. मांडू या मध्यप्रदेशमधील ‘एकला चलो रे’ नंतर पुन्हा मध्यप्रदेशच आणि पुन्हा ‘एकला चलो रे’ च. 

ठरल्याप्रमाणे नागपूरला उतरलो आणि सरळ ‘पेंच’साठी कॅब बुक केली. नियंत दुबे (‘नियंत’ हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो.) हा कॅबचालक (आणि मालकदेखील) ‘ओला’च्या ‘रेट’मध्ये न्यायला तयार झाला. कारण त्याने सकाळी एक ‘भाडं’ पेंचवरून आणलं होतं आणि तो ‘खवासा’ या पेंचपासून 10 किमी अंतरावरील गावाचा असल्यामुळे त्याचा एका दिवसाचा धंदा पूर्ण होणार होता. 

“कौन से रिसोर्ट में बुकिंग है सर जी?” या त्याच्या प्रश्नावर “अभी बुकिंग किया नही है वहां चल के देखते है” असं म्हणून ‘मला सर जी म्हणू नकोस’ असेही मी त्याला बजावले. 
“तो क्या बुलाऊ आपको?” 
“भाऊ म्हण”  
“ठीक है भाऊ जी चलेगा”
“हा दौडेगा” 

नागपूरमधून बाहेर पडून कामठी हा छावणी परिसर मागे टाकून आम्ही एन.एच. 41 या राष्ट्रीय महामार्गाला लागेपर्यंत मला दोन गोष्टी समजल्या होत्या. त्या म्हणजे, तो हिंदुत्ववादी (आर.एस.एस.चा प्रथमवर्गशिक्षित) असूनही मोदी विरोधक होता. ‘शिवराज मामा जी के साथ कपट हुआ’ इथपासून ते ‘नव्या लोकांना संधी द्यायची तर मग मोदींच्या पण दोन टर्म्स पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे पंतप्रधानपदासाठी देखील नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे’ अशी त्याची गाडी सरळ रेषेत चालली होती. दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या ‘बंबइया हिंदी’चा त्याच्या मध्यप्रदेशी ‘साफ जबान’वर (कानांवर) अत्याचार होत होता. त्यामुळे मी शांत बसून नुसते ऐकण्याचे ठरवले. 

रस्त्यावर एक हॉटेल लागले. तिथे ‘नाश्ता करणार?’ या प्रश्नावर मी त्याला म्हणालो, “मला लोकल कुझीन खायला आवडेल.” त्यावर गडी खुश झालेला दिसला. म्हणाला, “मग आपण माझ्या गावी खवासाला नाश्ता करू.” 

मी पुढे अशीही पुस्ती सोडली की, मला जास्तकरून होम स्टेमध्ये राहायला आवडतं. कारण त्यामुळे त्या भागातील संस्कृती जास्त चांगली समजते.” “होम इस्टे ऐसा तो यहां कोई सिस्टीम नही चलता भाऊ जी” 

रस्ता अत्यंत चांगला होता. तो रस्ता पेंच व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनच होता. त्यामुळे बऱ्यापैकी जंगल दिसत होते. या महामार्गावर येऊन वन्य प्राण्यांचे मृत्यू होऊ नयेत म्हणून वाहनांसाठी पूल बांधलेले होते व वन्य प्राण्यांसाठी ‘अंदरपास’ तयार केलेले होते. जंगलात बहुतांश सागाची झाडे दिसत होती.

“वैसे, रिक्वायरमेंट और बजेट क्या है आपका” त्याने मला हळूच प्रश्न केला. 
“रिक्वायरमेंट तो बंधू ज्यादा नही है, टोयलेट होना चाहिये और मच्छर ना हो”

त्यावर तो गप्प राहिला पण विचारात पडल्यासारखा दिसला. थोड्या वेळाने त्याने विचारले, 
“नाम क्या लिखते है?” 
“मकरंद”
“सरनेम क्या लिखते है जी?”
“दीक्षित”

तो माझी जात कोणती असावी याचा अंदाज घेत आहे हे मला लगेच कळले पण मी काही बोललो नाही. 

खवासाला एका टपरीवजा दुकानात आम्ही नाश्ता करायला थांबलो, स्वच्छतेच्या नावाने बोंब होती पण नाश्त्याला दिलेला ‘भाजीवडा’ स्वादिष्ट होता आणि आले घातलेला वाफाळता चहा पिऊन थंडी कमी झाली. 

आता राहण्याची जागा व सफारी यांच्या बुकिंगसाठी बघावे लागणार होते. तितक्यात तो म्हणाला, “आप चाहे तो मेरे निवास पर ‘होम इस्टे’ कर सकते है.” मी मनात म्हणालो, “नेकी और पुछ पुछ.”

त्याचं घर शेतात होतं. शेतातली घरं असतात तशा आटोपशीर चार खोल्या आणि गच्चीसमोर कुंपण केलेलं अंगण असं ते एक टुमदार घर होतं. मला तिथे राहण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. एका कॅबचालकाकडे चांगलंच घर आहे असा विचार माझ्या मनात आला, तो विचार जायच्या आधीच त्याने तो पकडला आणि म्हणाला, “माझी 20 एकर शेती आहे. हे सगळं दिसतंय ते माझं, म्हणजे माझ्या वडिलांची शेती आहे. वडील नुकतेच कुठून तरी आले होते त्यांची एम 80 पाहून मला अत्यानंद झाला. मी म्हणालो, “कितनी भी गाडिया क्यू न आये बाजार मे.. लेकीन एम 80, राजदूत और बजाज चेतक जैसी गाडी कभी नही होगी. त्यावर त्याच्या (सत्तरीच्या घरातल्या, पण कायम शुद्ध सात्विक जेवण व हवा घेतल्यामुळे तंदुरुस्त) वडिलांनी होकार दर्शविला व त्यांच्या एम 80 ची कहाणी सांगितली म्हणजे इतकी वर्षं तरी इंजिन कसं मस्त आहे, मायलेज किती भारी आहे, कितीही वजन कसं पेलू शकते इथपासून याची आई गरोदर असताना तिला एम 80 वरूनच कशी हॉस्पिटलपर्यंत नेली, वगैरे वगैरे.

आता माझ्या राहण्याचा प्रश्न सुटला होता. पैशाचं आपण नंतर बोलू असं तो म्हणाला, “मी पण विषय जास्त ताणला नाही कारण त्याच्या एकंदरीत वागण्यावरून त्याला पैशाचा हव्यास नाही हे मला कळले होते.”

त्याच्या शेतावर फेरफटका मारून आम्ही पुन्हा चहा घेतला. त्याआधी त्याने मला “चाय लेंगे?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी त्याला वन-टाईम म्हणतात तसं उत्तर दिले, “यह प्रश्न मुझे मत पुछना बंधू, मै चाय के लिये कभी ना नही बोलता”. आता आमचे महत्त्वाचे काम म्हणजे सफारी बुकिंग करणे. त्याने त्याच्या एक-दोन गाईड मित्रांना फोन लावला पण तो लागला नाही. “गाईड सफरीवर जंगलात गेले असतील त्यामुळे आपण थेट तुरीया गेटला जाऊन चौकशी करू” या त्याच्या बोलण्यावर मी त्याच्या आधी एम 80 चे चालकपद हातात घेतले. माझं त्या चॉकलेटी-पांढऱ्या एम 80 चं ऑबसेशन पाहून सगळे हसायला लागले. 

खवासा गावापासून तुरीया गेट 10 किमी लांब होते. 

पेंच व्याघ्र प्रकल्प हे आधी अभयारण्य होते पण नंतर त्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा दिला गेला. वाघासाठी किंवा मार्जार कुळातील प्राण्यांसाठी जेव्हा एखाद्या जंगलाचा भाग संरक्षित केला जातो तेव्हा त्याला ‘व्याघ्रप्रकल्प’ म्हणतात. त्यातही दोन भाग असतात. एक म्हणजे, ‘कोअर क्षेत्र’, ज्यात नैसर्गिक अधिवास सोडून काहीही नसतं. त्या भागात लोक - मुख्यत्वेकरून आदिवासी - राहत असतील तर त्यांचे पुनर्वसन केले जाते. बफर क्षेत्रामध्ये नियम थोडे शिथिल असतात. मध्य प्रदेशमध्ये एकूण सात व्याघ्रप्रकल्प आहेत. हल्लीच मान्यता मिळालेले दोन प्रकल्प धरले तर भारतात एकूण 54 व्याघ्रप्रकल्प आहेत आणि जगातील एकूण व्याघ्र संखेच्या 70 टक्के वाघ या व्याघ्रप्रकल्पांत आहेत. 

पेंच अभयारण्य महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांत विभागलेला आहे. 60% क्षेत्र मध्यप्रदेशमध्ये आहे तर उर्वरित क्षेत्र महाराष्ट्रात आहे. सातपुडा रांगांमध्ये उगम पावलेल्या आणि या अभयारण्यामधून वाहणाऱ्या पेंच नदीमुळे या अभयारण्याचे नाव पेंच असे पडले आहे. हे जंगल ‘पानझडी वन’ या प्रकारात मोडते त्यामुळे उन्हाळ्यात सर्व वृक्ष निष्पर्ण असतात.

खुर्सापार, सिल्लारी, मौडी, चोरबाहुली अशी महाराष्ट्राच्या बाजूची गेट्स आहेत तर मध्य प्रदेशमधील तुरीया हे एक महत्त्वाचे गेट आहे. (‘गाईड’ने दिलेल्या माहितीनुसार) सुमारे 1190 चौ किमीच्या या प्रकल्पात सुमारे 411 चौ किमी ‘कोअर’ क्षेत्र आहे. या व्याघ्र प्रकल्पात ‘बफर’मध्ये साधारण 85 आणि ‘कोअर’मध्ये 40 वाघ आहेत. एकूण क्षेत्राच्या केवळ 20% भागात सफारी होते व त्यात 8 ते 10 वाघांचे दर्शन नित्यनेमाने होते. 

या प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची - जसे की, सांबर, चितळ यांची संख्यादेखील जास्त म्हणजे सुमारे 45000 आहे. त्यामुळे वाघाला मुबलक शिकार (अन्न) उपलब्ध होते त्यामुळे वाघांचा अधिवास सुकर होतो. इथे लंगुर, इंडिअन गौरसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. वाघाव्यतिरिक्त बिबटे, लांडगे, आणि अस्वलेदेखील आहेत पण अस्वलाचे दर्शन फारच दुर्लभ आहे. 

आम्ही तुरीया गेटला चौकशी करायला पोहोचलो तर सकाळच्या सफारीवरून लोक परत येत होते. नियंतने एका गाईडला विचारले “कुछ मिला क्या?” त्यावर जीपमधल्या एका प्रवासी पाहुण्याने (‘पैसे वाया गेले’ असे भाव त्याच्या आणि जीपमधल्या इतर सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते) त्रासिकपणे उत्तर दिले, ‘कुछ भी नही मिला’. त्या सकाळी कोणालाच वाघ दिसला नव्हता पण मला त्या माणसाच्या ‘करंट्या’ दृष्टीविषयी राग न येता करुणा दाटून आली. मी मनात म्हणालो, ‘अरे भल्या माणसा, तू जंगलात जाऊन आलास आणि म्हणतोस की काहीच नाही दिसलं म्हणजे तुला डोळे आहेत पण दृष्टी नाही’. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही वन विभागाच्या सफारी बुकिंग कक्षाकडे गेलो. त्या दिवसाच्या दुपारच्या सफारी फुल होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ‘कॅनटर’मध्ये जागा होती आणि दुपारच्या दोनच जीप शिल्लक होत्या. मी लगेच दोन्ही सफारींचे बुकिंग केले. 

पेंचला जाण्याआधीच मी ठरवले होते की वाघ दिसला(च) पाहिजे असा भाव बाळगून जायचे नाही. कारण ‘दिसला पाहिजे’ ही इच्छा वेगळी आणि ‘दिसला(च) पाहिजे’ हा हव्यास वेगळा. हा कंसातला ‘च’ फारच घातक असतो. हव्यास-निराशा-दु:ख या ‘लूप’मध्ये नेण्याचा तो एक हमरस्ता असतो आणि या हमरस्त्यावर फिरून आलेला एका प्रवासी मला नुकताच दिसला होता.

सकाळची सफारी सात वाजता सुरु होते आणि दुपारची साडेतीनला. खरे तर सकाळची सफारी लवकर सुरु होते असे मी ऐकले होते, पण सध्या सरकारकडून व्याघ्रगणना सुरु असल्यामुळे सफरीची वेळ बदलली होती.

संध्याकाळचा पूर्ण वेळ मोकळा होता म्हणून मी मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंचधार या गावात जाऊन आलो. या गावाची विशेषता म्हणजे त्या गावात सर्व कुंभार (मध्य प्रदेशच्या हिंदी भाषेत ‘कुमहार’) वस्ती आहे आणि मातीची मडकी, खेळणी, पेले, पणत्या, वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराच्या पिगी बँक, शो पीस इथे मिळतात. या सर्व वस्तू मातीच्या व हाताने बनवलेल्या आहेत. त्या मानाने किमतीसुद्धा रिझनेबल आहेत. मी तिथून हत्तीच्या आकारात बनवलेल्या दोन पिगी बँक घेतल्या. हे गाव खवासापासून सुमारे पाच किमी अंतरावर आहे. येताना एम 80 ला हार बांधून आणला. नियंतच्या वडिलांना ते बघून आनंद झाला.

नियंत दुबेचं (मी त्याला मराठी उच्चारानुसार ‘डुबे जी’ म्हणत होतो, त्यामुळे त्याने एकदा न राहवून ‘डुबे’ नही ‘दुबे’ असं मला करेक्ट केलं.) चौकोनी कुटुंब होतं. अवधेश सातवीमध्ये होता तर अवनी पाचवीमध्ये होती. त्याच्या बायकोचं नाव नीला होतं, ती बारावी पास होती तर नियंत फर्स्ट इयर बी.कॉम फेल होता. गड्याने बारावी पास असं सांगण्याऐवजी फर्स्ट इयर फेल असं सांगितलं, बायकोपेक्षा जास्त शिकल्याचं बहुदा त्याला सांगायचं असावं. 

रात्री बैंगन भरता, डाळ, फुलके, भात असा बेत होता. भात घरच्या शेतातला होता. बैंगन भरता अप्रतिम होता. “अगर मै राजा होता, तो ऐसा बैंगन भरता खाने पर भाभी जी को दो-चार गांव इनाम दे देता” असं मी नियंतकडे बघून बोललो. (घरातल्या बाईशी एखाद्या आगन्तुकाने थेट बोलणे त्यांच्या संस्कृतीत बसत नसावे हे मला उमगले होते पण मला मेसेज तर कन्व्हे करायचा होता, त्यावर हा उपाय मी शोधला) त्यावर सगळे हसले. नीला भाभींनी पदर तोंडाला लावला. 

नियंतने झोपायच्या खोलीत तयारी करून ठेवली होती. “आप चाहे तो टेरेस पे सो सकते है. अभी इतनी थंड नही है. दो रजाई ले लेना. मी पुन्हा मनात म्हणालो, “नेकी और पुछ पूछ” “लेकीन मच्छर ?” मी त्याला विचारले. “ इस समय मच्छर नही रहते फिर भी मै मच्छरदानी का प्रबंध करता हुं” त्याने बाजेवर दोन गोधड्या टाकल्या, मला दोन पांघरायला दिल्या आणि त्या बाजेच्या पायांना काठ्या बांधून मच्छरदाणी लावून दिली आणि एका कोपऱ्यात लाकडाची धुनीपण करून दिली.  

मी त्या बाजेवर उताणा पडलो. कित्येक वर्षांनी मला स्वच्छ व निरभ्र आभाळ दिसत होते. ओरायनचा पट्टा, सप्तर्षी, ध्रुव तारा, अश्विनी नक्षत्र, कृतिकेचा पुंजका इत्यादी मला ओळखता येत होते. सर्व आकाश पांघरून घेतल्यासारखे वाटत होते. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मी - गच्चीवर का असेना पण - उघड्यावर झोपलो होतो. मला शाळेच्या मराठीच्या पुस्तकातील सुनिता देशपांडे यांचा ‘दर्शनमात्रे’ हा त्यांच्या व्याघ्रदर्शनाच्या अनुभवावरील धडा आठवत होता. त्यातील “व्याघ्र दर्शन झाल्यावर लेखिकेच्या मनात कोणत्या भावना उत्पन्न झाल्या?” हा प्रश्नदेखील आठवला. खरंच मला वाघ दिसला तर त्याक्षणी माझ्या मनात काय भावना येतील ? हा विचार करत असतानाच मला झोप कधी लागली ते कळलेच नाही.

सकाळचं ‘फॉल इन’ 7 वाजता होतं पण आम्ही पावणे सातला तुरीया गेटच्या बाहेर पोहोचलो. आमचा कॅनटर म्हणजे टप काढलेला एका मध्यम आकाराचा ट्रक होता आणि त्यात आठ सीटस् होत्या. मी आदल्या दिवशी निरीक्षण करून ठेवले होते की, गाईड सर्वात मागच्या डाव्या बाजूच्या सीटवर बसतो त्यामुळे मी मागची उजव्या बाजूची सीट पकडली. त्याचे दोन उद्देश होते, एक तर गाईडशी संवाद साधता येईल आणि या सीटस् जरा उंचावर असल्याने जंगल जास्त चांगले पाहता येईल, तसेच गाईड कुठे बघतोय त्यानुसारही बघता येईल. 

नियंतने एक कापडी पिशवी हातात ठेवली. “मेथी का पराठा है, बिरेक फास्ट कर लीजिये गाडी रूकेगी तब” हा मला सुखद धक्का होता. ब्रेकफास्टची थोडी चिंता मला लागलीच होती कारण इतर पर्यटकांनी त्यांच्या रिसोर्टवरून ब्रेकफास्ट पॅक करून आणले होते. नियंतला ही पद्धत माहीत असणार पण त्याने लक्षात ठेवून मला ब्रेकफास्ट दिल्याचे मला खूप अप्रूप वाटले. 

बरोबर साडेसातला सर्व गाड्या एकामागून एक निघाल्या. आमच्या गाडीमध्ये एक कुटुंब होतं, दोन माझ्यासारखे सडाफटिंग होते व गोल हॅट घातलेला, आकड्यासारखं पण फुगीर नाक असलेला एक ‘फिरंगी’ होता. आमच्या गाईडचं नाव होतं प्रमोद दुबे.

तुरीया गेट मधून जंगलात जाताना तीन रस्ते आहेत. आम्ही रस्ता क्र. 2 ने निघालो. हा ‘स्वस्तिक’ वाघाचा एरिया होता. हे वाघ, त्यांना दिलेली नावे व त्यांची माहिती खूप रोचक आहे. त्यामुळे त्याची प्राथमिक माहिती देणे औचित्याचे ठरेल. पेंच प्रकल्पात बरेच वाघ असले तरी ते सर्वच दिसतात असे नाहीत. नित्यनेमाने दिसतात असे 8 ते 10 वाघ आहेत. ते म्हणजे पाटदेव, लंगडी, लक्ष्मी, काला पहाड, बिंदू या वाघिणी तर स्वस्तिक, एल मार्क, बी एम डब्लू हे वाघ. या प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेली पण आता हयात नसलेली वाघीण म्हणजे ‘कॉलरवाली’. या वाघिणीने 17 वर्षांच्या आयुष्यात 29 पिलांना जन्म दिला. हा एक रेकॉर्ड आहे. तिचा आणखी एक रेकॉर्ड म्हणजे तिने एकदा एका प्रसूतीमध्ये पाच पिलांना जन्म दिला. अन्यथा वाघीण जास्तीत जास्त चार पिलांना एका प्रसुतीवेळी जन्म देऊ शकते. आणि दोन प्रसुतींमध्ये तीन वर्षांचा काळ असतो. पण कॉलरवाली दीड ते दोन वर्षांतच पुन्हा प्रसूत झाली आहे.  कॉलरवालीच्या एका नराचे नाव ‘चार्जर’. तो देखील आता हयात नाही. वाघाचे सरासरी आयुष्य 15 वर्षांचे असते.

वर उल्लेख केलेली ‘लंगडी’ वाघीण या कॉलरवालीची बहीण आहे. लक्ष्मी ही लंगडीची मुलगी आहे तर पाटदेव ही कॉलरवालीची मुलगी आहे. पाटदेवने आतापर्यंत 21 पिलांना जन्म दिला आहे.

वाघ हा कुटुंबवत्सल प्राणी नाही. वाघीण तिच्या पिल्लांची दोन वर्षांपर्यंत काळजी घेते. त्यांना जगण्यासाठी लायक बनवते व आपल्यापासून अलग करते. नंतर त्यांच्यात कौटुंबिक संबंध राहत नाहीत. वाघांमध्ये अधिकारक्षेत्रावरून तुंबळ युद्ध होते. उदा. लक्ष्मी व पाटदेव या मावसबहिणी आहेत पण त्यांनी एकमेकींच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण केल्यास त्यांच्यात युद्ध होते. अशावेळी दोन्ही वाघांपैकी कुणी एक जिंकतो व दुसरा एकतर मरतो किंवा त्या अधिकार क्षेत्रावरचा दावा सोडून दुसरीकडे जातो. ही नावे वाघांच्या वैशिष्ट्यांवरून दिली आहेत. उदा. लंगडी वाघीण लंगडत चालते, स्वस्तिकच्या पायावर स्वस्तिकचे चिन्ह दिसते, एल मार्कच्या चेहऱ्यावर ‘एल’ आकार दिसतो तर ‘काला पहाड’चे काळे पट्टे जास्त गडद व उठावदार दिसतात. वन विभागाने मात्र या वाघ-वाघिणींना टी-1, टी-2 अशी नावे अधिकृतपणे दिली आहेत. त्यानुसार पाटदेवचे अधिकृत नाव टी-4 आहे.

मी कॅनटरमध्ये मागच्या उंच सीटवर बसलो होतो. साग, कुसुम, आंबा, पळस, मुंडी, तेंदू असे डेरेदार वृक्ष दिसत होते. त्या सर्वांमध्ये एक पांढरा निष्पर्ण वृक्ष अधून मधून दिसत होता. त्याबद्दल मी विचारणार, इतक्यात गाईडने अशाच एका वृक्षाजवळ गाडी थांबवली आणि त्या वृक्षाची माहिती द्यायला सुरवात केली. हा वृक्ष म्हणजे ‘इंडियन घोस्ट ट्री’. हा वृक्ष अंधारात चमकतो आणि त्याचे रंगदेखील बदलतात त्यामुळे त्याला घोस्ट ट्री हे नाव दिले गेले. या वृक्षाच्या अनुषंगाने गाईडने वाघ आपल्या क्षेत्रावर ‘दावा’ कसा सांगतो तेदेखील सांगितले. या वृक्षावर बरेच खवले (ओरखडे) दिसत होते. ते ओरखडे वाघाने केलेले होते. वाघ अशा झाडांवर विशिष्ट फुटांवर ओरखडे करतो व मूत्रविसर्जन देखील करतो आणि आपला ‘एरिया’ मार्क करतो. प्राण्यांची घ्राणेन्द्रिये तीक्ष्ण असल्याने सर्वांना वाघाचे अस्तित्व समजते. दुसऱ्या एखाद्या वाघाने त्या वृक्षावर जास्त उंचीवर ओरखडे आणि मूत्रविसर्जन केले तर तो आधीच्या वाघाला इशारा असतो की, अधिक बलवान वाघ या भागावर अधिकार सांगतो आहे. मग त्या वाघासमोर या वाघाशी युद्ध करून जिंकायचा किंवा त्याला मारायचा पर्याय असतो. अथवा, निमुटपणे हार मान्य करून दुसऱ्या भागात जाण्याचा पर्याय असतो. एक वाघीण साधारण 25 ते 30 चौ किमी क्षेत्रात आपला अधिकार निर्माण करू शकते तर वाघ सुमारे 100 चौ किमी क्षेत्रात आपला अधिकार निर्माण करू शकतो. 

आमची गाडी मातीच्या आठ फुट रुंदीच्या मातीच्या कच्च्या रस्त्यावरून पुढे चालली होती. चितळ घाऊकपणे दिसत होते त्यामुळे त्यांचे अप्रूप संपले होते. इंडिअन गौरसुद्धा दिसत होत्या. माकडे तर झाडांवर टूनटून उद्या मारतच होती. इतक्यात गाईड ओरडला “कॉल आया कॉल आया”. आमची गाडी थांबली. मला वाटलं की, त्याला कुणाचा तरी फोन आला म्हणून त्याने गाडी थांबायला सांगितली. पण वास्तविक त्यांच्या परिभाषेतील तो वाघाच्या अस्तित्त्वाचा अलर्ट होता. विविध प्राणी - जे विशेष करून वाघाची शिकार होऊ शकतात - ते वाघाचे अस्तित्व त्यांच्या इंद्रियांना जाणवले तर इतरांना सावध करण्यासाठी विशिष्ट आवाज काढतात. पक्षी असे संदेश देत नाहीत पण मोर मात्र विशिष्ट केकारव करतो. एरवी माणसांना हे कोड वर्ड समजले नसते पण गाईड व ड्रायव्हर यांचे रोजचे जगणेच ते असल्यामुळे (आणि पर्यटकांना वाघ बघायचा(च) असल्याने) त्यांना ते कोड वर्ड समजतात आणि त्यालाच ते म्हनतात “कॉल येणे”. या वेळी चितळ लांबून “कुsकुs” असा आवाज करत होते. ते चितळ दिसत नव्हते पण त्याचा आवाज डाव्या बाजूने येत होता. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एक पाणवठा होता आणि तिथे वाघ असण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही तिथेच थांबून राहिलो. आमची गाडी तिथे थांबलेली बघू “कॉल है क्या, कॉल है क्या,” म्हणत आमच्यामागे पुढे थांबल्या. 10 मिनिटे आम्ही थांबून राहिलो पण काहीच घडले नाही. “कुsकुs” असा आवाजदेखील बंद झाला, वाघ बहुतेक पाणी पिऊन उलट्या दिशेला गेला असावा. गाईड्सची एकमेकांमध्ये चर्चा झाली. हा रस्ता थोडा पुढून वळसा घेऊन पाणवठ्यावर जात होता त्यामुळे आम्ही पुढे निघालो. पाच मिनिटांनंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांना “कुछ साईटींग हुआ क्या?” असे गाईडने विचारले पण उत्तर नकारार्थी आले. वाघ आपला कार्यभाग आटपून लगेच निघून गेला असावा. त्यामुळे तेथे जाण्यात अर्थ नव्हता. एव्हाना पावणे दहा वाजत आले होते आणि 11 वाजता गेटवर पुन्हा परतायचे होते. त्यामुळे आमची गाडी ब्रेकफास्ट करायच्या ठिकाणी पोहोचली.

तिथे ‘मोगली सप्ताह’ चालू होता. त्यामुळे शाळेची बरीच मुले व वन विभागाचे लोक होते. प्रधान वन संरक्षक दर्जाचा कोणीतरी अधिकारी असावा असे एकंदर बंदोबस्तावरून वाटत होते. मुलांना वन संवर्धन, पर्यावरण/निसर्ग संरक्षणाचे भान यावे म्हणून दरवर्षी हा सप्ताह आयोजित केला जातो. सर्व मुले त्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होते. माझ्या मनात विचार आला की, हा सप्ताह ल्युटेन्स दिल्ली मध्ये पी.एम.ओ, पर्यावरण, उद्योग व खनिकर्म मंत्रालयात आयोजित केला पाहिजे, जेणेकरून प्रधान सेवक व इतर होयबा मंत्री व ‘बाबू’ लोकांमध्ये जागृती होईल. खरी गरज तर त्याची आहे. पण सध्याच्या उत्सवी काळात मुलभूत प्रश्नांना अशीच बगल दिली जाणार, प्रश्न तसाच राहून किंवा अधिक जटील होऊन तो सोडवण्याचा उत्सव मात्र झगमगाटात साजरा होणार. 

(या लेखाचा उत्तरार्ध येथे वाचा)

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com 
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)


हेही वाचा : 

 

Tags: सोलोट्रीप वाघ प्रवासवर्णन जंगल सफारी पर्यावरण साहित्य बॅगपॅक मकरंद दीक्षित Load More Tags

Comments:

Sanket

Excellent Makarand. Pratyasha jaun aloy pan tya peksha jast mahiti lekha vachoon milali. Ekdam jeep madhe basoon jungal madhe firtoy asa feel ala..very nice. Waiting for part 2....

Add Comment