‘नंदा’दीप मालवला

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे वयाच्या 76व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांचा व्यासंग, लोकसंग्रह, परोपकार, सहृदयता, तळमळ अनंत होती. त्यांची कारकीर्द यशवंत होती आणि ‘सत्य बोलायची गरज आहे तोपर्यंत बोलत राहणार, लिहित राहणार ही त्यांची भूमिका ‘खरे’ या आडनावाशी साधर्म्य सांगणारी होती. ते अनेकांचे मार्गदर्शक, आधारवड होते. एखाद्या निबिड रानात दिग्मूढ अवस्थेत असलेल्या वाटसरूसाठी दूरच्या मंदिरात शांतपणे तेवत असणारा ‘नंदा’दीप जसा आश्वस्त करणारा, काळोखाला दिप्तीमान करणारा असतो, तसे काका होते. हा नंदादीप मालवला आहे. पण त्यातून निघालेला प्रकाश अविनाशी व ‘अनंत’ असणार आहे. 

नंदा (काका) उर्फ अनंत यशवंत खरे यांच्या निधनाने तर्क-विवेकाच्या विश्वात कधीही भरून न येणारी वैचारिक पोकळी निर्माण झालेली आहे. सापेक्षतावाद, साक्षेपीपणा या दोघांना घट्ट पकडून तार्किक मांडणी चिकित्सकपणे करणारा सहृदय विचारवंत आज हरपला आहे. 

चार्वाक, सॉक्रेटिस-प्लेटो-ॲरिस्टॉटल, शंकराचार्य अशा स्थलकालनिरपेक्ष तर्कवादी-बुद्धिवादी परंपरेचे नंदाकाका हे पाईक होते.

इतिहास, भूगोल, भूगर्भशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, सौंदर्यशास्त्र हा व्यासंगाचा आवाका व संशोधनग्रंथ, कथा-कादंबरी, समीक्षा, अनुवाद या प्रांतात मुशाफिरी करणारा हा थोर साहित्यिक होता. त्यांनी भारतीय दर्शनशास्त्राच्या अस्तंगत पावत असलेल्या ‘खंडन-मंडन’ परंपरेचा सतत पाठपुरावा केला. या न्यायाने त्यांना ‘पुरोगामी पुनरुज्जीवनवादी’ म्हटले पाहिजे.

डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांनी सुरु केलेल्या ‘निर्माण’ या युवकांच्या चळवळीचे मार्गदर्शक होणे ही त्यांच्याकडे ओघाने येणारी गोष्ट होती आणि त्याचे अध्वर्यूपण (आजच्या भाषेत मेंटोरशिप) त्यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता सांभाळले.

प्रस्तुत लेखक निर्माण प्रक्रियेचा सदस्य राहिलेला आहे. उन्हा-पावसात ‘फिल्ड’वर काम केल्याचे निर्देशित करणारा रापलेला रंग, जाड काडीचा चौकोनी चष्मा, खांद्यावर छोटीशी बॅग, चेहऱ्यावर शांत भाव, तोच शांतपणा आवाजात उतरलेला, बोलण्यात ठामपणा, समोरच्याला दडपण वाटणार नाही अशा पद्धतीने देहबोलीतून उमटणारी विद्वत्ता, त्याच्या जोडीला नर्मविनोदीपणा आणि कमालीची ऋजुता असलेला हा माणूस ‘नंदाकाका’ म्हणून आयुष्यात आला तो आलाच.

निर्माण शिबिरातील त्यांनी आम्हाला दिलेले पहिले टास्क मोठे विलक्षण होते. प्रत्येकाच्या हातात त्यांनी चिठ्ठ्या दिल्या आणि त्यावर ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’ ही तीन मूल्ये ज्याच्या-त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावण्यास सांगितले. “कोणतेही उत्तर चुकीचे नसेल” असे सुरुवातीलाच सांगितले. “हा ‘यूपीएससी’चा प्रश्न नाही” असे देखील नर्मविनोदी शैलीत सांगितले. ('निर्माण'मध्ये काही UPSC Aspirants असत आणि कोणतीही उत्तरे ठोकळेबाजपणे देण्याची त्यांनी सवय जावी हा त्यामागील उद्देश). प्रत्येकाने आपापल्या चिठ्ठ्या भरल्या आणि त्यावर साधकबाधक चर्चा/वादविवाद घडून आला. त्या चर्चेचा निष्कर्ष असा निघाला की, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ व ‘बंधुता’ ही तिन्ही मूल्ये समान महत्त्वाची व उपयुक्त आहेत आणि त्यात प्राधान्यक्रम लावता येणार नाही. संपूर्ण शालेय जीवनात इतिहास, नागरिकशास्त्र, मूल्यशास्त्र ‘घोकून’ जे कळले नाही त्याचे आकलन अवघ्या अर्ध्या तासात काकांनी करून दिले. त्या निष्कर्षाप्रत जाण्याची प्रक्रिया देखील नाविन्यपूर्ण होती. हेच त्यांना समोर उभे राहून ‘लेक्चर’ देऊनही करता आले असते पण त्यांनी खऱ्या अर्थी ‘वैचारिक घुसळण’ घडवून आणली. अमेरिकन किंवा युरोपातील राज्यक्रांती असो किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ; ती प्रामुख्याने ‘स्वातंत्र्य’ या मुल्यासाठी घडून आली. रशियन राज्यक्रांतीच्या केंद्रस्थानी ‘समता’ हे मूल्य प्रामुख्याने होते. मनात विचार आला की हे ‘टास्क’ जर या क्रांतीच्या धुरिणांना दिले असते तर प्रत्येक क्रांतीचे स्वरूप, उद्दिष्ट आणि उपलब्धी यामध्ये मूलभूत बदल झाला असता का? आणि आजचे जग आजच्यापेक्षा अधिक चांगले असते का?

तर्कवादाची अवजड मांडणी न करता ते सोप्या, समजेल अशा भाषेत सांगताना काकांचे प्रतिपादन असे की, कोणतीही बाब स्वीकारण्या/नाकारण्याआधी ती तर्क-बुद्धीच्या कसोटीवर दोन सूत्रांमधून घासून पाहा, ती सूत्रे म्हणजे M.K (म्हणजे काय?) आणि K.M (कसं मोजलं/मोजणार?). ही सूत्रे पथदर्शक ठरली. 

निर्माण शिबिराच्या वेळी आम्ही सर्व शिबिरार्थी जंगल भ्रमंतीला गेलो होतो, आम्ही आमच्या पद्धतीने मजामस्ती करत खिदळत होतो. तेव्हा काका म्हणाले, “मी एक सुचवू का?” आम्ही “हो” म्हणालो. काका म्हणाले, “आता पुढची दोन मिनिटे सगळ्यांनी तोंड बंद आणि कान उघडे ठेवा.” आम्ही तसे केले आणि आम्हाला जंगलातल्या पशु-पक्ष्यांचे, झऱ्याच्या खळखळीचे, झाडांच्या सळसळीचे आवाज, त्यातील माधुर्य या सगळ्याचा अनुभव घेता आला. निसर्गाशी तादात्म्य पावणे म्हणजे काय याचा प्रत्यय काकांनी आम्हाला दिला होता. त्या दोन मिनिटांची किती मिनिटे झाली माहीत नाही पण काकांनीच तंद्री भंग केली. त्यानंतर आमचा सर्वत्र भारून असलेल्या परमतत्त्वाशी संवाद सुरु झाला होता. काकांचे हे ऋण विसरणे शक्य नाही.

त्यांच्या साहित्याचा आढावा घेणे हे सदर लेखाचे परिप्रेक्ष नाही त्यामुळे त्यांच्या साहित्यसंपदेची यादी देणे येथे टाळले आहे. पण परवापासून माध्यमांवर काही बातम्या/प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. ‘त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारण्याने खळबळ उडाली होती’ अशी एक बातमी वाचली. वास्तविक खळबळ तेव्हाच उडते जेव्हा खळबळ उडवून द्यायचा उद्देश असतो. नंदाकाकानी शांतपणे पुरस्कार नाकारला आणि त्यांच्या वाचकांनी ते शांतपणे स्वीकारले. ‘पुरस्कार नाकारण्याचे कारण राजकीय नाही’ असेही त्यांनी सांगितलेले होते. पण असे विचारवंत जेव्हा काही विधाने करतात, तेव्हा Between the lines, Before the lines आणि After the linesचा देखील विचार करायचा असतो. विचारवंत जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्यामागे एक निश्चित विचार असतो आणि त्या विचाराचा वेध आपण त्याच्या जीवनपटावरून घ्यायचा असतो.

आठवण निघालीच आहे तर या सर्व प्रकरणात नंदाकाकांच्या मिश्कील स्वभावाचे जे दर्शन घडले ते वाचकांसमोर ठेवावे लागेल. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर एका स्थानिक वृत्तवाहिनीची तरुण पत्रकार ‘प्रतिक्रिया’ घ्यायला त्यांच्याकडे गेली. पुरस्कार नाकारण्याच्या राजकीय कारणाचा शोध घेण्याचा तिने खूप प्रयत्न केला; पण शेवटी ती म्हणाली, “...पण पुरस्कारांनी नवीन लिहायची प्रेरणा मिळते त्याचं काय?” त्यावर नंदाकाकांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये थोडा पॉझ घेतला आणि अस्फुट हसून ते म्हणाले, “अगं मुली, मी 75 वर्षांचा आहे..” तर्कवादी-बुद्धिवादी माणसाला विनोदाचे वावडे असते, असा एक सार्वत्रिक गैरसमज असतो. तसा तो माझादेखील झाला होता; पण तात्पुरताच.. एकदा निर्माण शिबिरात एक व्याख्याते आले होते, विषय तसा औत्सुक्यपूर्ण होता पण त्यांनी प्रचंड बोअर तर केलेच पण त्यांची मांडणीदेखील विस्कळीत होती. त्याचे सत्र संपल्यावर मी काकांना विचारले, “काका तुम्हाला पटले का, ते काय बोलले ते?” तेव्हा काका म्हणाले, “अरे, मी डुलक्या घेत होतो.. या चष्म्याचा फार उपयोग होतो अशा वेळी!”

माध्यमातील बातम्यांनी त्यांच्या ‘दगडावर दगड विटेवर वीट’ या पुस्तकाचे वर्गीकरण आत्मचरित्र असे केले आहे. ते चुकीचे आहे असे वाटते कारण आत्मचरित्र ही एकप्रकारची स्व-स्तुती असते आणि अशी माणसे त्या भानगडीत पडत नाहीत आणि दुसरे म्हणजे सहसा आत्मचरित्र लिहिल्यानंतर काही लिहिले जात नाही. ‘दगडावर दगड विटेवर वीट’ नंतर काकांची बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना त्यांचे वर्णन Encyclopedia असे केलेले आहे. त्यामागील भावना समजून घेऊनही असे सांगावेसे वाटते की, काका हे Encyclopedia च्या खूप वरचे होते. Encyclopedia मध्ये माहिती ठासून भरलेली असते, त्या माहितीचे विश्लेषण, पृथक्करण नसते. काकांनी नुसती माहिती देण्याचे काम लिखित व मौखिकदृष्ट्या देखील कधीच केले नाही.

नंदाकाकांच्या ‘उद्या’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ पुण्यात झाला होता तेव्हा प्रस्तुत लेखक उपस्थित होता. कादंबरी विकत घेऊन तो त्यांच्याकडे स्वाक्षरी घ्यायला गेला तेव्हा त्याच मिश्कीलपणे हसून काका म्हणाले, “तू माझं पुस्तक विकत घेतलं आहेस त्यामुळे मी स्वाक्षरी देणार नाही. माझी स्वाक्षरी हवी असेल तर पुस्तक भेट म्हणून घेऊन जा.” पुढच्या पुस्तकावर स्वाक्षरी घेऊ असे ठरवून तो विचार सोडून दिला, पुस्तक वाचायचेही राहून गेले. याच पुस्तकाला साहित्य अकादमी जाहीर झाला, त्यानंतर ते पुस्तक वाचले आणि त्यांना अभिप्रायाचा इमेल केला, त्यात त्या पुस्तकाच्या विवेचनाबरोबर त्याचे वर्गीकरण मी ‘दीर्घकथा’ असे केले होते. “तुझा इ-मेल मिळाला आहे, सविस्तर रिप्लाय देईन” अशी त्यांची पोचपावती मिळाली पण त्यांचा सविस्तर रिप्लाय आता कधीही येणार नाही. एवढा मोठा साहित्यिक माझ्यासारख्या वाचकाला पोचपावती देतो यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वातील नेमस्तपण लक्षात येईल.

काकांच्या दोन विधानांचे आकलन मात्र मला अजून पर्यंत झालेले नाही आणि तो दोष सर्वस्वी माझा आहे. त्यांच्या ‘संप्रति’ आणि ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ या पुस्तकांवर अभिप्राय दिला; तेव्हा त्यांनी सांगितले, “पुढचे वर्षभर काहीही वाचू नकोस.” एकदा ‘शोधग्राम’मध्ये ‘वन टू वन’ चर्चा करताना त्यांना विचारले, “काका नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सर्वात जास्त काय महत्त्वाचे आहे? प्रेम, विश्वास की आदर?” तेव्हा काकांनी उत्तर दिले “Don’t try to fix when it is not broken..”

नंदाकाका कोणत्याही ‘इझम’मध्ये बसणारे नव्हते. डाव्या आणि उजव्या लंबकाच्या देखील ते मध्यभागी होते. त्यामुळे किंचितही डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेल्या माणसांना ते पूर्णपणे पचणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रतिपादित केलेली मार्क्सवादाची मुलभूत अडचण आणि संघाच्या बौद्धिकातील फोलपणा त्या-त्या विचारसरणीच्या माणसांना पटणारा नव्हता.

पण त्यांचे विवेचन तर्काच्या शुद्ध कसोटीवर इतके घासलेले होते की त्या विवेचनाला टाळणे किंवा त्याची टवाळी करणे शक्य नव्हते. काकांनी मतभिन्नता व्यक्त करण्यासाठीचा अवकाश कायम प्रशस्त ठेवला. त्यामुळे मोकळेपणाने अनेक लोक त्यांच्याशी चर्चा करू शकत, त्यांनी मांडलेला एखादा मुद्दा पटला नाही त्यावर वादविवाद करू शकत, व्यासपीठ कुठलेही असो, काकांचा स्वर दोन डेसिबलनेसुद्धा कधीही वर-खाली झाला नाही. बऱ्याचदा असे व्हायचे की, एखादा न पटलेला मुद्दा घेऊन त्यांच्याशी भांडायला जावे आणि नंतर समजावे की, त्यांचाच मुद्दा आपण वेगळ्या शब्दांत मांडत आहोत. अंधानुकरण, बाबावाक्यं प्रमाणम याची त्यांना मनस्वी चिड होती. त्यामुळेच त्यांनी तरुणांना लंबकाच्या मध्यभागी आणण्यासाठी, विवेकी, साक्षेपी, बुद्धिप्रामाण्यवादी बनवण्यासाठी आणि वैचारिक घुसळण कायम चालू राहण्यासाठी आणि पर्यायाने डोळस समाजाच्या निर्मितीसाठी आपली लेखणी, वाणी व व्यक्तिमत्व पणाला लावले. 

काका अनेकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी न मागता कोणालाही सल्ला दिला नाही, पण कोणी विचारले तर त्याचे वय, लिंग, जात, धर्म इ. निकष न लावता संभाव्य मार्गक्रमणातील धोके, खाचखळगे दाखवून दिले आणि असे करताना त्या-त्या व्यक्तीचा मित्र, वडील या भूमिका लीलया स्वीकारल्या तसेच वास्तवाची जाणीव करून देताना कोणी नाऊमेद होणार नाही याची दक्षता घेतली.

तर्कवादी माणसाच्या आयुष्याला येणारी रुक्षता त्यांनी आपल्या वाट्याला येऊ दिली नाही, त्यामुळेच त्यांना जीवनाचा विविध अंगाने समरसून आस्वाद घेता आला. त्यामुळेच मानवाच्या उत्क्रांतीचा शोध घेणारा हा अवलिया नितांतसुंदर सिनेमांचे संदर्भ त्यातील गुणवैशिष्ट्यासकट देऊ शकत होता. जीवनाचा अर्थ ज्यांना कळलेला असतो, त्यांचा मृत्यूदेखील आदरणीय असतो. त्याला हौतात्म्याचा कडकडाट नसेल, प्रायोप्रवेशनाचे कारुण्य नसेल; पण मृत्यूच्या अटळतेचा कृतार्थ अवस्थेत केलेला स्वीकार लोभस असतो. एखादी नदी ज्या सहजपणे उगम पावते, बाजूच्या जमिनीला झोकदार काठ देऊन वाहते आणि तितक्याच सहजपणे समुद्रात मिळते तसे यांचे जीवन समृद्ध करणारे असते.

स्वर्ग-नरक या संकल्पना बुद्धिवादाच्या कसोटीवर टिकणाऱ्या नाहीत. त्यामुळे त्या त्यांना मान्य असणे शक्य नव्हते. त्यामुळे आता त्यांचा उल्लेख ‘स्वर्गवासी’ असा न करता ‘अनंतवासी’ असा करायला हवा. हा अनंत खरंच अनंताच्या प्रवासास निघून गेला. पण आपल्याला दुःख करण्याचे काही कारण नाही. कारण या अनंतात काका मजेत असतील. डार्विन आणि सॉक्रेटीसबरोबर त्यांची चर्चेची पहिली फेरी पार पडली असेल; आता ते रुसो, व्हॉल्टेअरचा शोध घेत असतील. गो.स.सरदेसाई, त्र्यं.ज.शेजवलकर, जदुनाथ सरकार इ. इतिहासकार त्यांच्याशी वादविवाद करण्यास उत्सुक असतील. त्यांचे आवडते केशवसुत ‘तुतारी’ कवितेची प्रत घेऊन वाट पाहात असतील, मर्ढेकर ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ आणि बालकवी ‘औदुंबर’ची नव्याने समीक्षा करून घेण्यास उत्सुक असतील. जॉर्ज ऑरवेलने 1949 मध्ये ‘1984’ लिहिली त्यामुळे त्याला काकांनी ‘2050’ कशी लिहिली हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल आणि त्यासाठी त्याने एक पूर्ण संध्याकाळ त्यांच्यासाठी राखून ठेवली असेल. एकंदरीत काकांचं बर चाललं असेल. 

आपलं नाव, आडनाव - इतकेच नाही - टोपणनावालासुद्धा तंतोतंत जागलेला काकांसारखा माणूस खरंच दुर्मिळ आणि त्यांच्या काळात आम्ही जन्माला आलो हे आमचे भाग्य.

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांचा व्यासंग, लोकसंग्रह, परोपकार, सहृदयता, तळमळ अनंत होती. त्यांची कारकीर्द यशवंत होती आणि ‘सत्य बोलायची गरज आहे तोपर्यंत बोलत राहणार, लिहित राहणार ही त्यांची भूमिका ‘खरे’ या आडनावाशी साधर्म्य सांगणारी होती. ते अनेकांचे मार्गदर्शक, आधारवड होते. एखाद्या निबिड रानात दिग्मूढ अवस्थेत असलेल्या वाटसरूसाठी दूरच्या मंदिरात शांतपणे तेवत असणारा ‘नंदा’दीप जसा आश्वस्त करणारा, काळोखाला दिप्तीमान करणारा असतो, तसे काका होते. हा नंदादीप मालवला आहे. पण त्यातून निघालेला प्रकाश अविनाशी व ‘अनंत’ असणार आहे. 

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Tags: अनंत यशवंत खरे नंदाकाका स्मृतीलेख मराठी साहित्य साहित्यिक श्रद्धांजली Load More Tags

Comments: Show All Comments

नवनाथ नागरगोजे

छान लेख आहे, यातून नंदा खरे काकांचे व्यक्तिमत्व आपन बऱ्यापैकी उलगडून दाखवले आहे.

Avinash Yamgar

उत्तम लेख... साक्षेपी विचार आणि समर्पक उदाहरणे यामुळे वाचनीय...

Rajendra Awate

अतिशय सुंदर लेख, नंदा खरे यांचं साहित्य वाचायला हवं अशी उर्मी जागृत करणारा लेख

सूर्यकांत वैद्य

खूपच छान लेख. खरे "खरेखुरे"समजायला मदत झाली ! धन्यवाद !

विष्णू दाते

"अनंतवासी" नंदा खरे , उत्कृष्ट लेख!

Santosh Padmakar Pawar

अतिशय उत्तम मृत्यूलेख...

Add Comment