ओपनहायमर : काळाच्या परिप्रेक्षातील अस्वस्थ वर्तमानाचे चित्रण

या चित्रपटातील अणुबॉम्बच्या जागी तर आपण एआय, चॅट जीपीटी ठेवले व चित्रपट पुन्हा पाहिला तर काय दिसेल?

जाता जाता या चित्रपटातील ज्या प्रसंगावरून वाद सुरु झाले आहेत, ‘चित्रपटावर बंदी घालावी’ अशी मागणी करण्याइतपत तथाकथित संस्कृतीरक्षकांची मजल गेली आहे. त्या प्रसंगाविषयी भाष्य करणे समयोचित ठरेल. तो प्रसंग असा आहे की, ओपनहायमर त्याच्या प्रेयसीबरोबर संभोग करत असताना तिचे लक्ष त्याच्या शेल्फवरील भगवद्गीतेकडे जाते व तो ग्रंथ हातात घेऊन ती त्यातील श्लोकाचा अर्थ त्याला विचारते. हे दृश्य 30 सेकंदांपेक्षा मोठे नाही आणि ते कथेच्या प्रवाहात येते. अशा दृश्यांमुळे अपमान होण्याइतका हा ग्रंथ छोटा आहे का? अर्थात, हा प्रसंग नसता तरी चित्रपटात फार फरक पडला नसता हे देखील नमूद केले पाहिजे. पण या तथाकथित संस्कृती रक्षकांबाबत चीड न वाटता कणव वाटते.

श्रीनगरच्या लाल चौकातील ‘आयनॉक्स’ थिएटरमधील सर्व खेळ अडव्हान्स बुकिंगला 'हाऊसफुल' झाल्याच्यी बातमी एका आघाडीच्या वृत्तपत्रात वाचली. ही ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपनहायमर' या बहुचर्चित/बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची नांदी ठरली.

तसेही चित्रपटरसिकांना नोलानच्या चित्रपटाची आतुरता व उत्सुकता असतेच. विषयाची निवड, मांडणी आणि त्यातून संपन्न होणारा आशय या सर्वच बाबतीत नोलान समकालिनांपेक्षा वेगळा ठरतो. त्याचे चित्रपट किमान दोन वेळा पाहिल्याशिवाय कळत नाहीत, अशी (प्रेमळ) टीकादेखील होते. नोलानचा चित्रपट हा पॉपकॉर्न खात पाहण्याचा नसतो तर ती एक जबाबदारीने केलेली वैचारिक कृती असते हे ज्यांना समजते, ते त्या कलाकृतीशी तादात्म्य पावू शकतात.

ओपनहायमर हा चित्रपट मात्र एकदा पाहून कळतो, त्यामुळे या आधीच्या त्याच्या इंसेप्शन, इंटरस्टेलार, टेनेट, इत्यादी पूर्वसुरींच्या बाबतीत अपवाद ठरतो. ते साहजिकच आहे कारण या चित्रपटात रहस्य नाही पण तरीही शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता आहे.

आपल्याला आज जरी ‘तुम्हाला माहीत असलेल्या शास्त्रज्ञांची नावे सांगा’ असे विचारले तर पटकन तोंडावर येतील अशी नावे म्हणजे न्यूटन,आईनस्टाईन,जेम्स वॅट, इ. त्यात रॉबर्ट जे.ओपनहायमर हे नाव दूर दूर पर्यंत येत नाही. ओपनहायमरने अमेरिकेसाठी अणुबॉम्ब बनवला. त्याने कोणताही नवीन सिद्धांत मांडला नाही तर उपलब्ध सिद्धांत/प्रमेये यांचे उपयोजन केले. त्यामुळे तो ‘शास्त्रज्ञ’ नव्हे तर सिद्धांतांना व्यवहारात आणणारा ‘वैज्ञानिक’ ठरतो. ओपनहायमरला संस्कृतचे ज्ञान होते व त्याने वेद/भगवद्गीता यांचा अभ्यास केला होता.

सदर चित्रपट 1945 ते 1949 या चार वर्षांचा पट आपल्यासमोर मांडतो. 'प्रोजेक्ट मॅनहॅटन' अंतर्गत झालेली अणुबॉम्बची निर्मिती ही घटना केंद्रस्थानी ठेवून त्याच्या परिघावर असणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारण, अतिरेकी राष्ट्रवाद, अंतर्गत हेवेदावे, शस्त्रास्त्र स्पर्धा, असूया, प्रेम यावर भाष्य करतो.

अनेक डबक्यांत साचलेले शांत पाणी आहे आणि त्यावर एक थेंब पडतो व असंख्य तरंग निर्माण होतात. या तरंगांकडे ओपनहायमर पाहतो आहे, या दृश्याने चित्रपटाची सुरवात होते. कालांतराने तरंग निवळतात व पाणी पुन्हा स्थिर होते पण पूर्वीसारखे होत नाही. अणुबॉम्बच्या निर्मितीने जगात प्रचंड उलथापालथ झाली, कालांतराने सर्व पूर्वपदावर आले (निदान तसा आभास तरी निर्माण झाला)पण जग पूर्वीसारखे राहिले नाही. या सर्व घडामोडी नोलान ओपनहायमरच्या नजरेतून पण स्वतःच्या खास शैलीत मांडणार असतो.

हॉलीवूडपटांचा विचार करता या चित्रपटाची लांबी 3 तास 10 मिनिटे म्हणजे त्या मानाने जास्तच आहे. पण चित्रपटाची उंची ही त्याच्या खोलीवरून ठरत असते. ढोबळमानाने हा चित्रपट तीन भागांत विभागला गेलेला आहे.अणुबॉम्ब निर्मितीपूर्व घटना,अणुबॉम्ब निर्मिती आणि अणुबॉम्ब निर्मित्योत्तर घटना. पण या घटना घडल्या त्या क्रमाने चित्रपटात येत नाहीत. यासाठी ‘टॉगलिंग’चे (toggling) माध्यम वापरले आहे. ओपनहायमरवर रशियासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली चौकशी आयोग व सिनेटमध्ये चौकशी सुरु आहे त्या अनुषंगाने त्याला प्रश्न विचारले जात आहेत व त्याचे उत्तर म्हणून भूतकाळातील घटना दाखवल्या जातात. हा फॉर्म वापरतानाचे दिग्दर्शकाचे कौतुक असे की, भूतकाळात जाताना (‘ट्रांझिशन’ करताना) तो कृष्ण-धवल छटांचा वापर करतो आणि काही वेळानंतर (प्रेक्षक स्थिरस्थावर झाल्यानंतर) अलगदपणे रंगीत छटा दाखवतो. 

मुळात अमेरिका अणुबॉम्ब निर्मितीचा विचार करते ते नाझी अणुबॉम्ब बनवत आहेत ही कुणकुण लागलेली असते म्हणून. जगातील या पहिल्या अणुबॉम्बच्या चाचणीची तारीख आहे 16 जुलै 1945. म्हणजेच हिटलरच्या मृत्युला सुमारे चार महिने उलटल्यानंतर... चित्रपटात ओपनहायमर हा रास्त प्रश्न विचारतो की, नाझीवादाचा अंत झालेला आहे मग आता ही चाचणी का करावी? त्याला उत्तर मिळते की, ‘जपानने अजून शरणागती पत्करलेली नाही आणि अणुबॉम्बचा संहार पाहूनच जपान शरण येईल. आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्याचा हाच एक मार्ग आहे.’ अतिरेकी राष्ट्रवादाच्या नावाखाली शास्त्रज्ञांचाही कसा बुद्धिभेद होतो हे येथे ठळकपणे अधोरेखित केलेले आहे.

या चित्रपटात अनेक पात्रे आहेत, त्यातील बहुतांश शास्त्रज्ञ आहेत. यातील बहुतांश शास्त्रज्ञ आपल्याला अपरिचित असतात. त्यातील नील्स बोर व ओपनहायमर यांच्यातील प्रसंग पाहण्यासारखे आहेत. एका प्रसंगात नील्स बोर म्हणतो, “बीजगणित हे संगीतासारखं आहे. नुसतं समजून चालत नाही तर ऐकूही यावं लागतं.”

या चित्रपटातील, किंबहुना त्या काळाच्या परिप्रेक्षातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे, आईनस्टाईन! या संपूर्ण चित्रपटात आईनस्टाईन विवेकनिष्ठ विज्ञानाचे प्रतीक म्हणून आपल्यासमोर येतो. आईनस्टाईनच्या वाट्याला काही मोजकेच प्रसंग आले आहेत [टॉम कौंटी (Tom Conti) या अभिनेत्याने त्याचे सोने केले आहे.] यातील एक प्रसंग आईनस्टाईन महान का होता हे कळण्यासाठी उपयुक्त आहे. होते असे की, अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रक्रिये/संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांच्या असे लक्षात येते की, अणूभंजनाची प्रक्रिया नियंत्रित करता आली नाही तर या चाचणीदरम्यान संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल. या गहन पेचप्रसंगातून बाहेर काढण्याची क्षमता केवळ आईनस्टाईनकडे आहे यावर सर्व वैज्ञानिकांचे एकमत होते. त्यामुळे ओपनहायमर आपले निष्कर्ष घेऊन आईनस्टाईनकडे जातो. त्यावर उपाय सांगण्याऐवजी आईनस्टाईन म्हणतो की, तुम्ही तुमचे हे निष्कर्ष नाझींना दाखवा म्हणजे त्यांनादेखील कळेल की, अणुबॉम्ब बनवणे अशक्य आहे. त्यामुळे ते त्यांचे काम थांबवतील व तुम्हीदेखील थांबवाल. आईनस्टाईनचा जीवनप्रवास ज्यांना थोडाफार माहीत आहे, त्याची उद्धृते (quotes)  ज्यांनी जागरूकपणे वाचली आहेत. त्यांना जाणवेल की, (नोलानदेखील हे सुचवू इच्छितो) वास्तविक आईनस्टाईनला याची पूर्ण कल्पना असते की, हे निष्कर्ष अतिशयोक्त आहेत पण तरीही तो असे सांगणे टाळतो. ज्ञान व विवेक यांच्या मिलाफातून त्याने जगाला विनाशापासून वाचवण्याची भूमिका घेतलेली दिसते. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारा हा महान शास्त्रज्ञ किती साक्षेपी होता हेच ही घटना अधोरेखित करते. 

आईनस्टाईन आणि ओपनहायमर यांचे मूळ छायाचित्र 

ओपनहायमर हताशपणे परत येतो. सर्व शास्त्रज्ञ पुन्हा सर्व प्रमेये मांडतात व निष्कर्ष असा निघतो की, अणूभंजनाची प्रक्रिया अनियंत्रित होण्याची शक्यता नगण्य (Almost zero) आहे, पण पूर्णपणे नष्ट झालेली नाही.

हीच बाब ओपनहायमर जनरल लेस्ली [मॅट डॅमन (Matt Demon] जो या प्रकल्पाचा मुख्य असतो, त्याच्या निदर्शनास आणून देतो.

‘Almost zero’ या शब्दांवर दोघांचा खल होतो. आता ही अखिल मानवजातीच्या विनाशाची शक्यता काही मोजके शास्त्रज्ञ व जनरल लेस्ली यांनाच ठाऊक असते. ही बाब तत्कालीन अध्यक्ष ट्रुमन यांच्यापर्यंत न्यायची म्हणजे पुन्हा विलंब होणार असतो आणि जपान शरण येत नसल्याने तो विलंब परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे निर्णय आता दोघांनाच घ्यायचा असतो. पण शेवटी राष्ट्रवादच विवेकबुद्धीवर भारी पडतो व अखिल मानवजातीला विनाशाच्या खाईत लोटून अणुबॉम्बची चाचणी करण्याचा निर्णय होतो. (ही ‘Almost zero’ ची शक्यता एका पूर्णांकाने जरी मागेपुढे झाली असती तरी आपण आज हयात नसतो ही कल्पना अंगावर काटा आणते.)

या चित्रपटात जाणूनबुजून ‘व्हीएफएक्स’चा वापर केलेला नाही. व्हीएफएक्सचा वापर न करता अणुबॉम्ब चाचणीचे दृश्य दाखवणे व त्याची तीव्रता प्रेक्षकाला जाणवणे याबद्दल चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीमचे कौतुक करणे क्रमप्राप्त ठरते. कारण असे दृश्य जर लुटूपुटूचे वाटले तर प्रसंगाचे गांभीर्य जाण्याचा धोका असतो. ही अणुबॉम्बनिर्मितीची प्रक्रिया पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.

अणुबॉम्ब लष्कराला सुपूर्त करताना ओपनहायमर सावधगिरीचा सल्ला देताना सांगतो की, जितक्या जास्त उंचीवरून बॉम्ब डागाल, संहार तितका जास्त होईल. त्यावर लष्कराचा प्रतिनिधी थंडपणे उत्तर देतो, “ते तुम्ही आमच्यावर सोडा, तुमचे काम तुम्ही केले आहे.”

हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर बॉम्ब टाकल्यानंतर झालेला संहार पडद्यावर दाखवणे टाळले आहे, (काय दाखवू नये हे माहीत असणे हेदेखील उत्तम दिग्दर्शकाचे लक्षण आणि ते स्पिलबर्गशी साधर्म्य सांगणारे) पण त्याचे वर्णन रेडिओवरील बातम्या व संवादांमधून व्यक्त झाले आहे. बॉम्बच्या यशाचा उत्सव साजरा करणे, सत्कारमूर्ती म्हणून ओपनहायमरला पाचारण करणे, त्यावेळी त्याची झालेली अवस्था हे सर्व प्रत्यक्ष पडद्यावर पाहून अनुभवणे योग्य. स्वतः नोलानदेखील म्हणतो की, त्याचे चित्रपट समजून घेण्यापेक्षा अनुभवण्याचे आहेत. 

ख्रिस्तोफर नोलान (हात उंचावलेला) आपल्या उच्च दर्जाच्या 70 mm आयमॅक्स कॅमेरासह

राष्ट्रवाद आणि विवेकवाद यांची जेव्हा टक्कर होते तेव्हा विवेकवाद नुसता पराभूतच नाही तर हतबल कसा होतो हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन व ओपनहायमर यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या प्रसंगातून ठळकपणे पुढे येते. ट्रुमन ओपनहायमरचे कौतुक करण्यात दंग असतानाच ओपनहायमर अभावितपणे म्हणतो, “मि. प्रेसिडेंट, मला माझे हात रक्ताने माखल्यासारखे भासतात.” या अनपेक्षित वाक्याने ट्रुमन देखील गोंधळून जातो, तसेच ते त्याला औद्धत्याचेदेखील वाटते. पण तसे न भासवता तो कोटाच्या खिशातील पांढरा रुमाल काढून ओपनहायमरसमोर नाचवतो (‘या रुमालाने तुझे हात पूस’ असे अप्रत्यक्षपणे व खोचकपणे सुचवतानाच तो ओपनहायमरच्या भावनांची टिंगलदेखील करतो.) व उद्दामपणे म्हणतो, “अणुबॉम्ब बनवण्याचा व तो डागण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे कोणाचे हात रक्ताने माखले असतील तर ते माझे आहेत.” ट्रुमनला पुढील वार्तालाप करण्यात स्वारस्य नसते व ओपनहायमरला ऑफिसमधून अक्षरशः बाहेर काढले जाते. “या माणसाला पुन्हा माझ्यासमोर आणू नका” असे ओपनहायमरला ऐकू जाईल अशा आवाजात बोलले जाते. याआधीच्या क्षणापर्यंत कौतुकाचा विषय असलेला ओपनहायमर केवळ विवेकाचा आवाज ऐकवला म्हणून हेटाळणीचा विषय ठरतो.

हा प्रसंग असाच्या असाच घडला किंवा नाही हे स्पष्टपणे सांगणारा पुरावा उपलब्ध नाही. उपलब्ध रेकॉर्डनुसार ट्रुमन व ओपनहायमर यांची भेट 25 ऑक्टोबर 1946 रोजी ओव्हल ऑफिस येथे झाली. सदर भेटीवेळी ट्रुमन व ओपनहायमर यांच्याव्यतिरिक्त ट्रुमनचा सचिव उपस्थित होता. या तिघांपैकी कोणीही या भेटीचा वृतान्त दिलेला नाही. पण ट्रुमनने या सचिवाला लिहिलेल्या पत्रात ओपनहायमरचा उल्लेख ‘Crybaby scientist’ असा केला होता. तसेच ट्रुमनची अध्यक्षपदावरून केलेली युद्धखोरीची भाषणे व ओपनहायमरचे शस्त्रास्त्र स्पर्धा रोखण्याचे प्रयत्न पाहिले की, चित्रपटात चित्रित केलेला हा प्रसंग अतिशयोक्त वाटत नाही.

नाझीवाद व जपानचा धोका दाखवून अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला. दुसरे महायुद्ध संपले तसे हे दोन्ही धोकेसुद्धा संपले मग रशियाप्रणित साम्यवादापासून जगाला असलेला धोका व रशियाच्या अण्वस्त्रांचा धोका दाखवून अधिक संहारक अशा हायड्रोजन बॉम्बचा प्रकल्प हाती घेतला. ही स्पर्धा कधीही संपणारी नाही. विज्ञानाच्या कार्यकारणभाव सिद्धांतानुसार अणूभंजन प्रक्रिया/ अणूंचे वर्तन नियंत्रित करता येईल पण अविवेकी माणसाचे वर्तन मात्र नियंत्रित करता येणार नाही.


हेही वाचा : माईक फ्लॅनॅगन :भीतीला पैलू पाडणारा दिग्दर्शक - किरण क्षीरसागर


स्वतः ओपनहायमरने अणुबॉम्ब निर्माण केल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. पण त्याचे वर्तन मात्र पूर्ण जबाबदारीचे, अण्वस्त्र प्रसार रोखण्याचे, त्यावर सामुहिक नियंत्रण ठेवण्याचे राहिले. पण त्याचे हेच वर्तन रशियाधार्जिणे ठरवून त्याच्यावर देशद्रोहाचा (विरोधी विचारांना - मग ते विवेकी असले तरीही - राष्ट्रद्रोही ठरवण्याचे सूत्र हे स्थलकालनिरपेक्ष आहे.) खटला दाखल होतो. त्या खटल्यादरम्यान त्याची होणारी अवहेलना व आपल्या तत्त्वांवर विश्वास ठेवून अजस्र यंत्रणेशी त्याने दिलेला लढा हा प्रत्यक्ष पाहणे रोमांचकारी ठरेल.

जाता जाता या चित्रपटातील ज्या प्रसंगावरून वाद सुरु झाले आहेत, ‘चित्रपटावर बंदी घालावी’ अशी मागणी करण्याइतपत तथाकथित संस्कृतीरक्षकांची मजल गेली आहे. त्या प्रसंगाविषयी भाष्य करणे समयोचित ठरेल. तो प्रसंग असा आहे की, ओपनहायमर त्याच्या प्रेयसीबरोबर संभोग करत असताना तिचे लक्ष त्याच्या शेल्फवरील भगवद्गीतेकडे जाते व तो ग्रंथ हातात घेऊन ती त्यातील श्लोकाचा अर्थ त्याला विचारते. हे दृश्य 30 सेकंदांपेक्षा मोठे नाही आणि ते कथेच्या प्रवाहात येते. अशा दृश्यांमुळे अपमान होण्याइतका हा ग्रंथ छोटा आहे का? अर्थात, हा प्रसंग नसता तरी चित्रपटात फार फरक पडला नसता हे देखील नमूद केले पाहिजे. पण या तथाकथित संस्कृती रक्षकांबाबत चीड न वाटता कणव वाटते. यापैकी 98% लोकांनी हा ग्रंथ एकदाही वाचलेला नसेल, त्याचे आकलन त्यांना नसेल, त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या रोजच्या समस्यांवर त्यांच्याकडे उपाय नाही, त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य नाही त्यामुळे त्यांच्या मनात साचलेला असंतोष या मार्गाने व्यक्त होतो.

पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर हा नोलानच्या चित्रपटाचा युएसपी ठरतो. त्याच्या चित्रपटातील मुख्य प्रसंगांना पार्श्वसंगीत असते व प्रसंगाची तीव्रता जशी वाढत जाईल, तशी पार्श्वसंगीताची तीव्रतादेखील वाढत जाऊन अपेक्षित परिणाम साधला जातो.

‘नेटफ्लिक्स’वरील ‘पीकी ब्लाइंडर्स’ (Peaky Blinders) ही वेबसिरीज ज्यांनी पहिली असेल त्यांना सिलियन मर्फी (Cillian Murphy) हा कसदार अभिनेता परिचयाचा असेल. ओपनहायमरची व्यक्तिरेखा त्याने प्रभावीपणे साकारली आहे. मॅट डॅमनला जास्त वाव नाही. त्याने ही व्यक्तिरेखा बहुदा नोलानच्या चित्रपटाचा भाग व्हायला मिळत आहे म्हणून स्वीकारली असावी.

दिग्दर्शन, पटकथा, संवाद, अभिनय व तांत्रिकदृष्ट्यादेखील हा सिनेमा उत्तमरित्या जुळून आला आहे. संकलनात थोड्या त्रुटी जाणवतात पण त्यामुळे चित्रपटाने साधलेल्या एकंदर परिणामात घट होत नाही.

‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे की मनोरंजनाचे साधन (की दोन्ही)’ हा चर्चेचा विषय आहे. चित्रपटाच्या उद्दिष्टाबरोबरच चित्रपट निर्मितीच्या मूल्यांची चर्चा होणे जास्त आवश्यक आहे. ख्रिस्तोफर नोलानचा हा बारावा चित्रपट आहे. त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या शीर्षकांकडे नजर टाकली तर असे दिसते की, ही शीर्षके विशिष्ट घटना, स्थळ, काल यांच्याकडे निर्देश करणारी होती. या सर्व चित्रपटांत घटना केंद्रस्थानी ठेवून मानवी व्यवहारांचे विश्लेषण केलेले दिसते. पण या चित्रपटाच्या शीर्षकाकडे बघता ‘माणूस’ हाच त्याच्या केंद्रस्थानी आलेला दिसतो. महात्मा गांधीजींनी सात प्रकारची पापे सांगितली आहेत. त्यातील एक पाप आहे, ‘माणुसकीशिवाय विज्ञान’ (Science without Humanity). हा चित्रपट माणुसकी, विवेकीपण आणि शांतता या शाश्वत व चिरंतन मूल्यांभोवती फिरतो.

आजचा काळ हे पाप प्रकर्षाने जाणवण्याचा आहे. ‘एआय’, ‘चॅट जीपीटी’ हे परवलीचे शब्द झाले आहेत. त्यामुळे जगात प्रचंड उलथापालथ होत आहे. अणुबॉम्बचे दुष्परिणाम त्या त्या भागापुरते मर्यादित होते पण या शोधाच्या प्रभावापासून कोणीही अलिप्त राहू शकणार नाही. यावर काहींचे प्रतिपादन एआय, चॅट जीपीटीच्या फायद्यांकडे लक्ष वेधणारे असेल पण सद्यस्थितीत तरी त्याचे तोटे अधिक प्रकर्षाने दिसतात.

मानवाने वैज्ञानिक प्रगती केली म्हणजे काय तर त्याने प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधले. या प्रगतीची इतकी झिंग त्याला चढली की आता एआयच्या रूपाने मानवाने मानवाचाच पर्याय शोधला आहे.

या चित्रपटातील अणुबॉम्बच्या जागी तर आपण एआय, चॅट जीपीटी ठेवले व चित्रपट पुन्हा पाहिला तर काय दिसेल? असे जग दिसेल ज्यातील बुद्धिमत्ता, संवेदना, मनोव्यापार, कलास्वाद हे ‘कृत्रिम’ असतील. अशा जगाची व त्यातील आपल्या अस्तित्वाची कल्पना अस्वस्थ करणारी नाही काय?

हा चित्रपट कदाचित या अस्वस्थपणाचाच कालसुसंगत आविष्कार आहे.

- मकरंद ग.दीक्षित  
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)


ओपनहायमर या चित्रपटाचा ट्रेलर : 

 

Tags: christophernolanfilm hollywood chrisevans filmstagram nightmarealley newmovierelease therussobrothers ryangosling anadearmas visitlosalamos losalamosnm brianmay borhap benhardy manhattanproject newmexico movieswithmike Load More Tags

Comments: Show All Comments

विष्णू दाते

सुंदर परिक्षण, सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढवणारे!

Sanket

उत्कृष्ट. सिनेमा बघताना समजाऊन घ्यायला लेखाची मदत होईल. Thanks.

Satish Raje

Very nice article. I am following this writer's film critique since 'The Great Indian Kitchen' . He gives perspective about how to watch a movie. This article will help me to 'understand' the movie, though Nolan expects viewers to rather 'experience' it.

हिरा जनार्दन

उत्तम विवेचन!

Rahul Ramesh Gudadhe

खुपचं रास्त आणि अप्रतिम वर्णन व विश्लेषण केले आहे...

Sandip Rahul

शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक या दोन्हींसाठी इंग्रजीत Scientist हाच शब्द वापरला जातो. पण तुम्ही प्रमेय/सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ आणि त्याचे उपयोजन करणारा वैज्ञानिक असा भेद केला आहे. ही बाब काही समजली नाही. शक्य असेल तर खुलासा करावा.

Damodar Lele

व्वा. अप्रतिम माहीतीपूर्ण लेख. सिनेमा बघायची ऊत्सुकता लागली आहे.

Shashikant Shinde

अप्रतिम लेख...

Add Comment