सिनेमाचा दर्जा आणि तिकीटबारी यांचा संबंध नसतो हे बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडलादेखील लागू होते (शेवटी माणूस सगळीकडे सारखाच!) त्यामुळे त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या मायकल बेच्या ‘आर्मगेडन’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटापेक्षा या चित्रपटाने कमी गल्ला जमवला. पण घसघशीत पाच ऑस्कर पुरस्कार मात्र पटकावले. स्पीलबर्गला दिग्दर्शनाचा दुसरा ऑस्कर मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मात्र या चित्रपटाला मिळाला नाही. त्यावरून परीक्षक समितीवर टीकादेखील झाली. पुढच्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात तत्कालीन परीक्षक समितीने जाहीर कबुली दिली की, आम्हाला भूतकाळात जाता आले तर आम्ही ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’लाच ऑस्कर देऊ.
काही चित्रपट आपल्याला आवडत नाहीत, काही चित्रपट एकदाच पाहण्याजोगे (One Time Watch) असतात, काही चित्रपट आपल्याला खूप आवडतात आणि कितीही वेळा आपण ते पाहू शकतो तर काही चित्रपटांनी आपल्या हृदयाचा एक छोटासा हळवा कोपरा व्यापून ठेवलेला असतो. त्यामुळे ते चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जात नसले तरी त्यातील काही प्रसंग, संवाद मनावर कोरले गेलेले असतात आणि एखादा दूरचा संदर्भ आला तरी ते आपल्याला लख्खपणे आठवतात.
1998 साली प्रदर्शित झालेला ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ हा चित्रपट प्रस्तुत लेखकासाठी त्याच धाटणीचा आहे. दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग, मुख्य अभिनेता टॉम हॅन्क्स, सहाय्यक अभिनेता मॅट डेमन, संगीत/पार्श्वसंगीत जॉन विलियम्स असा तगडा ‘कृ’ (crew) आहे म्हटल्यावरच या चित्रपटाच्या दर्जाचा, अभिजाततेचा अंदाज दर्दी सिनेरसिकांना येईल.
या चित्रपटाचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाचा (सन 1944) आहे. जर्मनीची पीछेहाट सुरु झालेली आहे तरीही अत्याधुनिक शस्त्रांच्या जोरावर जर्मन फौजा निकराचा लढा देत आहेत आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा तुटपुंज्या शस्त्रांच्या आधारे धीरोदात्तपणे लढत आहेत.
चित्रपटाची सुरुवात होते ती जॉन विलियम्सच्या, काळजाला भिडणाऱ्या पार्श्वसंगीताने. लष्करी बिगुलाच्या धीरगंभीर ध्वनीबरोबर संपूर्ण पडदा व्यापलेला अमेरिकेचा झेंडा दिसतो आणि नंतर दिसतो तो एका विशाल युद्धस्मारकावर आपल्या कुटुंबियांबरोबर आलेला एक वृद्ध. त्याचे कुटुंबीय त्याच्यापासून थोडे अंतर राखून चालत आहेत. नजर पोहोचत नाही इतक्या हिरवळीवर पांढऱ्या क्रॉसची थडगी दिसत आहेत. या एक छोट्या दृश्यातून दुसऱ्या महायुद्धाच्या संहारकतेची कल्पना दिग्दर्शक आपणास देतो.
या वृद्धाच्या चालण्यावरून तो सैनिक असल्याची आपल्याला कल्पना येते. एका थडग्यासमोर त्याचे अवसान ढळते आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो. कॅमेरा त्या वृद्धाच्या अश्रूभरल्या डोळ्यांना भिडतो आणि -कट टू- आपण 6 जून 1944च्या फ्रान्सच्या 'ओमाहा बीच'वरील घनघोर युद्धक्षेत्रात पोहोचतो. हा जवळपास 22 मिनिटांचा युद्ध सिक्वेन्स आहे. ही 22 मिनिटे अत्यंत थरारक आहेत. 1998 मधील व्ही.एफ.एक्स. तंत्रज्ञानाची मर्यादा पाहता हा इतका वास्तवदर्शी युद्ध सिक्वेन्स फक्त स्पीलबर्गच करू जाणे! सध्याच्या वेबसिरीजमध्ये ज्या प्रमाणात क्रौर्य व हिंसा दाखवली जाते त्या मानाने हा युद्ध सिक्वेन्स मवाळ वाटू शकेल पण त्याकाळी या ‘सीन’ची खूप चर्चा झाली होती, काही समीक्षकांनी त्यातील हिंसेच्या चित्रीकरणावर टीकादेखील केली होती व असा सीन अनावश्यक असल्याचे मत मांडले होते. पण त्याच बरोबर दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिक अधिकाऱ्यांनी “काही काळ आम्हाला आम्ही युद्धभूमीवर उभे असल्याचा भास झाला” अशी प्रतिक्रिया देऊन त्याच्या वास्तवदर्शीत्वावर मोहोर उमटवली आहे.
इथे चित्रपटाची कथा सांगून रसभंग करण्याचा उद्देश नाही. हा चित्रपट रहस्यपट असणार नाही हे स्पीलबर्गच्या दृष्टीने निश्चित आहे याची खूण पटते (आपल्या सिनेमात काय दाखवायचं आहे आणि ते कसं दाखवायचं नसतं हे स्पीलबर्गला पक्कं ठाऊक असतं!) कारण, या सिनेमाचा हिरो मेलेला आहे हे तो सिनेमाच्या ओपनिंग सीनलाच (अप्रत्यक्षपणे) जाहीर करतो. इतरही काही प्रसंग सांगून या लेखात स्पीलबर्गची निर्मितीमुल्ये जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे.
युद्धभूमीवर (‘ओमाहा बीच’वर) दोस्त राष्ट्रांच्या फौजा जर्मनीच्या प्रखर गोळीबाराला तोंड देत दाखल होतात. जर्मनीचा प्रहार इतका भयानक आहे की, काही कळायच्या आधीच अनेक सैनिकांच्या चिंध्या उडतात. त्या फौजेत आहे सेकंड रेंजर बटालियनचा कॅप्टन जॉन मिलर (टॉम हॅन्क्स) आणि त्याचे सहकारी. ते कसेबसे किनाऱ्यावर पोहोचतात. इथे स्पीलबर्गच्या दिग्दर्शकीय कौशल्याचा आणि आशय मांडण्याच्या त्याच्या पद्धतीचा आपल्याला प्रत्यय येतो. इथे अचानक सगळं म्युट होतं आणि कॅप्टन जॉन मिलर सुन्न झालेला दिसतो. त्याला दिसणारे दृश्य आपल्यालाही दिसते. आपल्याला दिसतात - शरीराच्या चिंध्या उडणारे सैनिक, घाबरून जप करत ईश्वराचा धावा करणारा सैनिक, जिवंत जळणारा सैनिक, आपला तुटलेला एक हात दुसऱ्या हाताने उचलणारा सैनिक, संपूर्ण आतडे बाहेर आलेला सैनिक आणि तिथेच त्याची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करणारा डॉक्टर सैनिक, कॅप्टन मिलरच्या चेहऱ्यावर पडणारा रक्ताचा सडा... आपण देखील हे सर्व पाहताना सुन्न होऊन जातो कारण आपण माणूस आहोत! स्पीलबर्ग हेच सांगतो. कॅप्टन मिलर हा सैनिक नंतर, पण आधी हाडामांसाचा, भावना असलेला माणूस आहे आणि कॅप्टन जॉन मिलरमधला माणूस सुन्न झालेला आहे. या पुढे आपल्याला उलगडत जाणार आहे की, हा युद्धपट नाही तर युद्धभूमीवरील माणूस, माणूसपण यांचा घेतलेला मनोज्ञ वेध आहे.
(सेव्हिंग प्रायव्हेट रायन या चित्रपटातील ओमाहा बीचवरील एक दृश्य)
आता कॅप्टन मिलर मधला सैनिक भानावर येतो आणि लढाईची सूत्रे हाती घेतो. दोस्त राष्ट्रांकडे आधीच तुटपुंजा दारुगोळा आहे. रेडिओ खराब झाल्याने कुमक येण्याची शक्यता नाही. अशावेळी कॅप्टन मिलर प्रसंगावधान राखून ‘लोकल जुगाड’ करून पहिली तटबंदी उध्वस्त करतो. पण अजून दुसऱ्या तटबंदीवरून ‘हेवी फायर’ येत आहे. ते थांबवायचे तर मोक्याचा बंकर नष्ट करावा लागेल आणि त्यासाठी बंकरवर थेट मारा करता येईल अशा जागेवर सैनिक पाठवावे लागतील. कॅप्टन एक जागा हेरतो आणि त्याचा हुकमाचा एक्का ‘स्नायपर जॅक्सन’ला त्या जागेवर पाठवायचा निर्णय घेतो. जॅक्सन तिथे पोहोचला की ही लढाई संपणार असा मिलरला विश्वास असतो. यासाठी शत्रूचे लक्ष विचलित करण्याची गरज असते. ती जोखीम मिलर स्वत: घेतो आणि सरळ शत्रूला दिसेल असा उभा राहतो, एक सेकंद जरी उशीर झाला तर मिलरचा जीव जाणार असतो. काही काळापूर्वी सुन्न झालेला मिलर यावेळी प्राणाची आहुती देण्याइतपत धैर्यवान झालेला आहे. शत्रूचे लक्ष विचलित होते आणि बंकरवरून मिलरच्या दिशेने गोळीबार सुरु होतो, तितक्या वेळात जॅक्सन मोक्याच्या जागी पोहोचतो आणि कामगिरी फत्ते होते. मिलरच्या तुकडीतला सार्जंट होवार्त म्हणतो, “कॅप्टन तुमच्या आईने हे पाहिलं असतं तर तिला खूप दुखः झालं असतं ना?” मिलरचा प्रवास सुन्नतेकडून धैर्यतेकडे आणि आता धैर्यतेकडून मिस्किलपणाकडे झालेला आहे. तो म्हणतो, “मी समजलो की, तूच माझी आई आहेस.”
ओमाहा बीच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात येते. सार्जंट होवार्तला प्रत्येक युद्धभूमीवरील माती विजयाचे प्रतीक म्हणून डब्यात भरायची सवय असते. त्याच्या सॅकमध्ये ग्रीस, इटली, फ्रान्स असे नाव लिहिलेले डबे दिसतात. म्हणजेच मिलरच्या बटालियनने बरेच पराक्रम केलेले आहेत. (हे एकाच फ्रेममधून, एका शब्दाशिवाय उलगडून दाखवणे हे पुन्हा स्पीलबर्गचे दिग्दर्शकीय कौशल्य.)
आता टॉप अँगलने कॅमेरा ओमाहा बीचवरून फिरतोय, लाटांबरोबर वाहत येणारी सैनिकांची प्रेते दिसत आहेत. त्यात तडफडणाऱ्या माशांच्यामध्ये पालथा पडलेल्या सैनिकाच्या युनिफॉर्मवरील ‘Ryan’ ही अक्षरे आपल्याला दिसतात.
‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ हे व्याकरणाच्या दृष्टीने ‘चालू वर्तमानकाळातील’ वाक्य शीर्षकाला दिलेले आहे. हे शीर्षक थोडे ‘odd’ आहे आणि सिनेमाच्या ‘genre’चा अंदाज न देणारे आहे. पण त्याचा उलगडा आता होणार आहे. अमेरिकन लष्करात एक अलिखित नियम आहे की, एकाच कुटुंबातले सदस्य सैन्यात असतील आणि लढाईत धारातीर्थी पडले असतील आणि त्यातील एक जिवंत असल्याची अंधुकशी जरी आशा असेल तर त्याला ‘प्रायव्हेट’ ठरवून कोणत्याही परिस्थितीत युद्धभूमीवरून सुखरूप आणणे हे सैन्याचे कर्तव्य आहे. या रायन कुटुंबातील चार मुलगे सैन्यात आहेत आणि त्यातील तीन धारातीर्थी पडल्याचे नुकतेच समजले आहे. चौथा मुलगा जेम्स रायन सध्या बेपत्ता असून त्याची रेजिमेंट न्यू गिनी भागात उतरल्याची शेवटची माहिती आहे.
पण हे साधेसुधे युद्ध नसून महायुद्ध आहे आणि ओमाहा, नोर्माडी, न्यू गिनी, रोमेल या भागांत दोस्त राष्ट्राकडून खूप चुका झाल्या आहेत आणि रायनला शोधणे हे गवताच्या गंजीतून टाचणी शोधण्यासारखे आहे. हा यक्षप्रश्न थेट तत्कालीन सेनाप्रमुख जॉर्ज.सी.मार्शलपर्यंत जातो. कनिष्ठ अधिकारी हे कृत्य अव्यवहार्य असल्याचे निदर्शनास आणतात. पण जॉर्ज.सी.मार्शल अब्राहम लिंकनचे पत्र वाचून दाखवतात आणि प्रायवेट रायनला वाचवण्याचा आदेश देतात.
आता सिनेमा मुख्य आशयाकडे येतो. (सिनेमा खऱ्या अर्थाने सुरु होतो)
रायनला वाचवण्याची जबाबदारी कॅप्टन मिलरवर सोपवली जाते. कॅप्टन मिलर आठ जणांची टीम निवडतो, त्यात एक थोडासा धांदरट असलेला अर्धसैनिक दुभाषा कम कारकून असतो. या सैनिकांच्या शरीरयष्टीवरून समजत असते की, हे सगळेच काही पूर्णवेळ सैनिक नाहीत तर महायुद्धाच्या काळात थोडेसे प्रशिक्षण घेऊन आलेले सर्वसामान्य लोक आहेत. कॅप्टन मिलरसुद्धा पूर्णवेळ सैनिक नाही पण त्याची पार्श्वभूमी त्याने कोणालाही सांगितलेली नाही आणि यावरून त्याच्या सैनिकांत ‘कॅप्टनची पार्श्वभूमी काय असावी?’ यावरून पैज देखील लागलेली आहे. कॅप्टनचा हात कायम थरथरतो, कदाचित ही पक्षाघाताची सुरुवात असू शकेल. (या आधारावर कॅप्टनला रजा मिळू शकेल. पण तो आजार लपवतो आहे.) कॅप्टनच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कुवतीबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे. त्यांचा कॅप्टनवर दृढ विश्वास आहे. पण तरीही ‘एका प्रायव्हेट रायनसाठी, जो जिवंत आहे याचीदेखील खात्री नाही इतर सैनिकांचा जीव धोक्यात घालणं सयुक्तिक आहे का?’ हा प्रश्न कॅप्टनला विचारला जातो. कॅप्टन सरळ उत्तर न देता चर्चा घडवून आणतो. कुणी म्हणते, “रायनची आई एकटी आहे.” त्यावर इतर म्हणतात, “आमचीपण आई एकटी आहे.” चर्चा वादाकडे जायला लागते तेव्हा कॅप्टन “वरून ऑर्डर आली आहे आणि ऑर्डर पाळणे हे आपले कर्तव्य आहे” असे सांगून तूर्तास वादावर पडदा टाकतो.
छोट्या मोठ्या चकमकी होत आणि आपले एक एक साथीदार गमावत कॅप्टन मिलर रायनपर्यंत कसा पोहोचतो, कॅप्टन मिलर खरा कोण असतो हे सिनेमात प्रत्यक्ष पाहणेच योग्य ठरेल. पण त्यातील एक प्रसंग - जो माझ्या मते या सिनेमाचे सार सांगतो - नमूद करणे औचित्याचे ठरेल. रायनच्या शोधमोहिमेदरम्यान कॅप्टन मिलरची टीम एका चर्चमध्ये मुक्कामाला थांबते. सगळे झोपायचा प्रयत्न करत आहेत पण स्नायपर जॅक्सन लहान निरागस मुलाप्रमाणे हात मुडपून शांत झोपला आहे. “हा इतका शांतपणे कसा झोपू शकतो?” या प्रश्नावर कॅप्टन उत्तरतो, “त्याचं मन साफ आहे म्हणून”.
कॅप्टन सर्वांची चौकशी करता करता कोर्पोरल दुभाष्याकडे येतो आणि विचारतो, “कसं वाटतंय?” त्यावर कोर्पोरल उत्तरतो, “बरं वाटतंय. खूप शिकतोय. युद्ध आपल्याला खूप काही शिकवतं. काय करायचं, काय नाही करायचं... कठीण परिस्थितीत माणसांना जवळ आणतं आणि माणुसकीची ओळख करून देतं.”
त्याच प्रसंगात कॅप्टन सार्जंट होवर्तला म्हणतो, “तुला माहीत आहे का, मी किती सैनिक गमावले? ...94! त्याचं मला अतीव दुःख आहे. पण याचं समाधानही आहे की, त्या बदल्यात मी त्याच्या 10 पट कदाचित 20 पट जास्त माणसं वाचवू शकलो. रायनला वाचवणं इतकं आवश्यक आहे का असं सगळे विचारतात, मला खरंच माहीत नाही. पण एक मात्र वाटतं, हा रायन तितक्या लायकीचा निघाला पाहिजे.”
रायन सापडायची आशा मावळत चाललेली असताना अचानक एका चकमकीदरम्यान रायन (मॅट डेमन) सापडतो. त्याला सर्व कल्पना दिली जाते व त्याला सुखरूप परत नेण्यासाठी किती किंमत मोजावी लागली आहे हेपण सांगितले जाते. रायनच्या तुकडीकडे एका महत्त्वाच्या पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी असते आणि त्यांच्याकडे मनुष्यबळ संसाधने सगळीच तुटपुंजी असत. हा पूल पडला तर जर्मनी पुन्हा वरचढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे रायन ठामपणे सांगतो की, “मी माझ्या सहकाऱ्यांना सोडून जाणार नाही. तुम्ही वाटल्यास वरिष्ठांना कळवा की, रायन मेलाय.” रायन भावनेच्या भरात बोलत नसतो पण त्याचा निर्धार पक्का असतो. त्याचा सैनिकी बाणा, सहकाऱ्यांना सोडून न जाण्याची माणुसकी पाहून कॅप्टन मिलरची खात्री पटते की, रायन खरंच लायकीचा आहे.
(बिहाईंड द सिन्स - सेव्हिंग प्रायव्हेट रायन)
आता रायनला वाचवणे ही वरिष्ठांची आज्ञा किंवा कर्तव्य राहत नाही, तो माणुसकीचा धर्म होतो. हा माणुसकीचा धर्म कॅप्टन मिलर कसा पाळतो हे, आणि कॅप्टन मिलर शेवटचा श्वास घेण्याआधी रायनच्या कानात जे पुटपुटतो आणि पुन्हा -कट टू- वर्तमानकाळात वृद्ध रायन कॅप्टन मिलरच्या थडग्यापाशी जी कबुली देतो ते प्रत्यक्ष बघून गहिवरून येण्याची जी ‘फिलिंग’ आहे ती त्यांचे वर्णन करून हिरावून घेणे अन्यायाचे ठरेल.
युद्ध हा केवळ एक पट आहे. या चित्रपटात राष्ट्रभावना चेतवणारे असे संवाद नाहीत. ‘लार्जर दॅन लाईफ’ हिरो नाहीत. हा चित्रपट सैनिकांचा नाही; तर सर्वसामान्य माणसांचा, त्यांच्या भावभावनांचा आहे. सगळ्या जगावर प्रभाव टाकणाऱ्या, हिंसा व क्रौर्य अत्युच्च पातळीवर नेणाऱ्या महायुद्धात माणुसकीचा झरा कसा जिवंत राहतो हे सांगणारा आणि माणुसकी हेच शाश्वत मूल्य आहे हे मनावर ठसवणारा आहे. या चित्रपटात स्पीलबर्ग कोणाचीही बाजू घेत नाही. कॅप्टन मिलरसुद्धा सैनिकी पेशात शिरतो ते त्याच्या राष्ट्रासाठी, अस्मितेसाठी नाही तर हिटलरने जगावर लादलेले युद्ध माणुसकीविरुद्ध आहे म्हणून. त्यामुळे हा चित्रपट हॉलीवूडचा किंवा अमेरिकेचा होत नाही तर माणुसकीच्या झऱ्यांच्या जिवंतपणावर विश्वास असणाऱ्या सगळ्यांचा होतो.
टॉम हॅन्क्स हा सार्वकालीन महान व अष्टपैलू (Versatile) अभिनेता आहे. ‘फॉरेस्ट गंप’मधील थोड्या काळापुरती केलेली सैनिकाची भूमिका सोडली तर अशा भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नव्हत्या. या संधीचे त्याने सोने केले आहे. कॅप्टन मिलर त्याने जीव ओतून साकारला आहे. त्याचे माणूसपण, हळवेपण, सैनिकी बाणा, कर्तव्यदक्षता, सहकाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा, मूल्यनिष्ठा त्याने शब्दफेक, चेहऱ्यावरील हावभाव आणि काहीवेळा फक्त डोळ्यांनी व्यक्त केली आहे. या कॅप्टन मिलरला मनोभावे ‘सलाम’ करावासा वाटतो.
(टॉम हॅन्क्सचा 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन'विषयी बोलतानाचा व्हिडिओ)
सिनेमाचा दर्जा आणि तिकीटबारी यांचा संबंध नसतो हे बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडलादेखील लागू होते (शेवटी माणूस सगळीकडे सारखाच!) त्यामुळे त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या मायकल बेच्या ‘आर्मगेडन’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटापेक्षा या चित्रपटाने कमी गल्ला जमवला. पण घसघशीत पाच ऑस्कर पुरस्कार मात्र पटकावले. स्पीलबर्गला दिग्दर्शनाचा दुसरा ऑस्कर मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मात्र या चित्रपटाला मिळाला नाही. त्यावरून परीक्षक समितीवर टीकादेखील झाली. पुढच्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात तत्कालीन परीक्षक समितीने जाहीर कबुली दिली की, आम्हाला भूतकाळात जाता आले तर आम्ही ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’लाच ऑस्कर देऊ. त्यावर्षीचे गोल्डन ग्लोब, ग्रामी, बाफ्ता अशा मानाच्या सर्वच पुरस्कारांवर या चित्रपटाने मोहोर उमटवली.
सहसा युद्धपट संपल्यावर प्रेक्षकांना स्फुरण चढलेले असते, अंगावर रोमांच उभे राहिलेले असतात. इथे मात्र डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या असतात. हा चित्रपट अभिजात ठरतो तो याचमुळे!
- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..
'सेव्हिंग प्रायव्हेट रायन'चा ट्रेलर :
Tags: युद्ध सिनेमा जागतिक महायुद्धे युद्धपट मकरंद दीक्षित Load More Tags
Add Comment