जोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात

'सुनो' या शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं... 

'मॅरिटेल रेप' किंवा 'विवाहांतर्गत बलात्कार' ही बाब आपल्याला संकल्पना म्हणूनच माहिती नाहीये. आपण असं घडतं हे मान्य करत नाही, त्याविषयी बोलत नाही. आणि म्हणूनच अशा नाजूक विषयावर माध्यमांतून सयंत, संवेदनशीलपणे चर्चा, मांडणी होत राहणं आवश्यक आहे आणि असाच एक प्रयत्न लेखन-दिग्दर्शन शुभम योगी यांनी केलंय. आजच्या काळातील उच्चशिक्षित, कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असणाऱ्या जोडप्यातले नातेसंबंध, त्यातले पेच आणि बलात्कारासारखा मुद्दा 'सुनो' ही शॉर्ट फिल्म सटलपणे मांडते. दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या तेरा मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये सुमीत व्यास आणि अमृता पुरी यांची प्रमुख भूमिका आहे. त्या शॉर्ट फिल्मविषयीचा हा लेख...

पुरुषांच्या कानांचा काही प्रॉब्लेम असेल का? त्यांना ऐकण्यात काही अडचणी असतील का? आपण आपल्या आसपासच्या पुरुषांशी बोलत असतो, शेअर करत असतो आणि ते ऐकता ऐकता अचानक कुठंतरी फिरायला जातात अनेकदा. अर्थात थेट शरीरानं नव्हे तर मनानं. आपण त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत राहतो आणि ते मस्त त्यांच्या डोक्यात एक चक्कर मारून येतात. मग आपण पहिल्यापासून पुन्हा सारं काही सांगतो, असा अनुभव अनकेदा आला असेल. काही वेळा त्यांना एखादं काम सांगितल्यावर ते उत्तरादाखल ‘हूं...हूं’ही करतात. त्यांनी ऐकलंय असं गृहीत धरून आपण वेगळ्या कामात गुंतावं आणि काही वेळानं त्यांना त्यांच्याच कामाची आठवण द्यावी तर ते आपल्याकडं आपण परग्रहावरून आलोय का असा लुक देतात. त्यांना कामच आठवत नसतं. त्यांच्याशी आपण काय बोललो हे त्यांनी ऐकलेलंच नसतं. भांडण-बिंडण असेल किंवा काही रुसवाफुगवा- तर त्यांनी कानांआड केलं तर हरकत नाहीच; पण काही वेळा सूचना, सल्ल्यांनाही त्यांनी बगल दिलेली असते. कहर तर तेव्हा असतो जेव्हा त्यांच्या कानांवर शब्द पडलेले असतात; पण ते त्यांच्या मेंदूपर्यंतच पोचलेले नसतात. उच्चारलेले शब्द डी-कोड होऊन त्या अनुसार प्रतिक्रिया किंवा वागायचं असतं हे त्यांच्या लक्षातच येत नसेल का?

हे सगळं आठवण्याचं कारण ‘सुनो’ नावाची शॉर्ट फिल्म. असीम कौल यांच्या कथेवर आधारित आणि शुभम योगी यानं दिग्दर्शित केलेली अगदी बारा-तेरा मिनिटांची फिल्म. या शॉर्ट फिल्ममधे सुमीत व्यास आणि अमृता पुरी यांनी अभिनय केलाय. ही शॉर्ट फिल्म पाहताना जाणवतं ही अगदी आजच्या काळातली, आजच्या जगण्यातली  फिल्म आहे. या फिल्ममधे ऐकायला कमी येणाऱ्या नायकाची गोष्ट आहे. अंहं... नायक काही बहिरा नाहीये. म्हणजे बाकी सगळं तर त्याला व्यवस्थितच ऐकू येत असतं. फक्त बायको काय बोलतेय तेच ऐकू येत नसतं. तो बिझी आहे, त्याच्या कामात, मोबाइलमधे आणि त्याच्या-त्याच्याच इच्छा-गरजांमधे. त्यामुळं बायकोचं ‘हूं...हूं’ करत ऐकणं आणि मग पुन्हा तिनं कशाहीविषयी विचारल्यावर ‘असं कधी बोललीस’ असं म्हणणं हे घरोघरचं टिपिकल दृश्य यात सहज येऊन जातं आणि तरीही आपण हादरून जातो. सांसारिक घडामोडींत एखादवेळेस कानांनी ऐकलं नाही किंवा ऐकलंच नाही, तरी तसा फार काही मोठा फरक पडणार नसतो, असा आपला एक उगाच समज आहे. पण तसं नसतंच मुळी; हे अतिशय वेगळ्या तऱ्हेनं या शॉर्ट फिल्ममधे मांडलं आहे.

या फिल्ममधे अतिशय खेळीमेळीनं राहणारं, एकमेकांशी गप्पागोष्टी करणारं सुखवस्तू जोडपं आहे. बायको नोकरीला जाते. नवरा 'वर्क फ्रॉम होम' करणारा आहे. बायको थकून भागून घरी येते तेव्हा तिच्यासाठी ‘दाल तडका’ वगैरे बनवणारा नवरा आहे. कुणालाही अशा जोडप्याकडं पाहून हेवा वाटावा असं. सोशल मीडियावर तर अशा सुखानं नांदणाऱ्या जोडप्यांना पाहून तर ‘आमच्यासारख्या घरात भांड्यालाभांडं लागतं,’ म्हणत भांडणाऱ्या जोडप्यांना तर तीव्र निराशाच यायची बाकी उरते. हं... म्हणजे हा काही सोशल मीडियावर मिरवणाऱ्या जोडप्यांमधला पुरुष नसतो. तर खरोखरच पुरुष असतो, आय मिन ‘भला’ पुरुष असतो.

पण पहिल्या फ्रेमपासून गॉगलमधे वावरणारी नायिका अमृता पुरी गॉगल काढते तेव्हा तिच्या डोळ्याला झालेली इजा पाहून आपण गोंधळात पडतो. तेवढ्यात ती नायकाला सांगते की, माझ्या या काळंनिळं झालेल्या डोळ्याकडे पाहून माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना वाटतंय की तू बायकोला मारणाऱ्यांपैकी आहेस- लाइक वाइफ बिटर. यावरही नवऱ्याची प्रतिक्रिया 'कूल' आहे. तो बायकोच्या ऑफिसमधे कसलीतरी चर्चा झालीय किंवा त्याला ‘मारकुटा’ समजलंय या गोष्टीनं अजिबात चिडचीड करत नाही. कूल आहे अगदीच. तिच्या डोळ्याला झालेली इजा एक अपघात होता हे त्याला ठाऊक आहेच आणि तो त्याच्या बायकोला याच गोष्टीची आठवणही करून देतो. हे ऐकून आपणही हुश्श करतो. म्हणजे हा काही मारकुट्या नवरा नाही. पण म्हणून त्यांच्यात सारंच आलबेल आहे असं कसं म्हणावं? ते एकाच घरात राहत आहेत, बोलत आहेत, एकत्र जेवत आहेत, एकत्र झोपत आहेत म्हणून म्हणावं की डोळेझाक करावं. आणि मग तसंच असेल तर ती डोळ्याभोवतीची इजा? त्याचा काय अर्थ...? त्याचा अर्थ नवऱ्यानं ऐकलं नाही इतकाच.

बायकोवर आणि किंवा बायकोला ‘प्रयोग’ करायला भाग पाडणं हे तिच्या जिवावर बेतणारं असू शकतं हे कसं दिसत नसतं. आपलं सुख, आपला आनंद या एका गोष्टीत आपण समोरच्याच्या चेहऱ्यावरचे भावही पाहू शकत नसू तर त्याला सरळ बलात्कारच म्हंटलं पाहिजे. रादर तो बलात्कारच असतो. छान-छौकीन दिसणाऱ्या, आनंदी भासणाऱ्या कितीतरी कुटुंबांत असे बलात्कार होतात तेव्हा बायकोनं केलेला प्रतिकार ऐकू येत नाही म्हणूनच. विशेष म्हणजे, अशा प्रसंगांत कुणाही जोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही इतर अनेक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात आहे असं मानायला हरकत नसते. त्यामुळे तर अनेकदा आपल्याला नको असतानाही नवऱ्याची ‘इच्छा’ होती, त्याचा फार ‘मूड’ झाला होता, त्याला खूश नाही ठेवलं तर कसं... म्हणत स्त्रिया स्वत:देखील स्वत:चं ‘ऐकत’ नाहीत.

सामूहिक बलात्काराच्या, विवाहांतर्गत बलात्काराच्या घटना सतत घडत असतात. काही नोंदल्या जातात. काही विरल्या जातात आणि काही घटनांमधे क्रूरताही गाठली जाते. अनेकदा रस्त्यावर जबरदस्ती करताना पीडितेच्या किंकाळ्या, त्रास ऐकू येत नसणार म्हणूनच इतकं धैर्य होत असणार... मग अशा बलात्काराच्या घटनांत आपण सजग समाजाचा मुखवटा पांघरून लगेचच हळहळायला लागतो, प्रसंगी आक्रमकही होतो. पण लग्न नावाच्या व्यवस्थेत नवरा आपल्या बायकोबरोबर कसं वागतोय, तिच्या लैंगिक शोषणाविषयी आणि तिच्या लैंगिक गरजांविषयी संवेदनशीलता कधी दाखवणार आहे, लग्नाची व्यवस्था आहे तर तिथं बायकोवर जबरदस्ती केली, तिची इच्छा नसताना तिच्या शरीरावर हक्क दाखवला तर चालतो आणि तो या व्यवस्थेत खपतोही; हा समज मोडकळीस कधी निघणार?

‘नो मीन्स नो’ असं भलेही आता ओरडून सांगावं लागत असलं तरी सूक्ष्म, हळुवार आवाजही कानांना ऐकू यायला हवं इतका 'कान तयार करावा' लागेल. इथं प्रत्येकाला ‘गुड लिसनर’ व्हावं लागेल. नुसतं ऐकायचं नाहीये तर सहअनुभूती घेत ऐकावं लागेल. स्त्री-पुरुष दोघांनाही एकमेकांशी बोलावं लागेल आणि एक जण बोलत असताना दुसऱ्यांनं कान देऊन अर्थ समजून ऐकावं लागणार आहे. दोन व्यक्तींच्या संवादात दोन्ही व्यक्तींनी नीट लक्षपूर्वक ऐकणं, ऐकलेलं नीट समजून घेणं आणि मग त्या अनुसार वागणं ही किती महत्त्वाची गोष्ट असते, हे आपल्याला का सांगायला लागतं! ती तर मुदलातच सगळ्यांनी जगण्याची गोष्ट आहे. ऐकण्याचं आणि त्याबरहुकूम वागण्याचं महत्त्वाचं इंद्रिय कान टक्क उघडं असायला हवं. इतर साध्यासुध्या गोष्टींत कानानं दगा दिला तरी एक वेळ क्षम्य असेल, पण जर त्यामुळं इजा, दुखापत किंवा मनावर ओरखडा उमटणार असेल तर... हे टाळण्यासाठी उपाय तरी काय आहे, इतकंच ना की, ‘लक्षपूर्वक ऐका’. काहीच अवघड नाहीये... हा बिनपैशांचा साधा उपाय पती-पत्नी संबंधांतच नव्हे तर इतर सर्वच नातेसंबंधांत जान आणणारा आहे, मग ऐकताय ना?

- हिनाकौसर खान
greenheena@gmail.com


सुनो (शॉर्ट फिल्म)

 

Tags: शॉर्ट फिल्म सुनो हिनाकौसर खान सुमीत व्यास अमृता पुरी कौटुंबिक हिंसाचार short film suno Heenakausar Khan Sumit Vyas Amrita Puri marritul rape domestic violence Load More Tags

Comments: Show All Comments

Dattaram Jadhav

लेख आणि लघुचित्रपट दोन्ही अंतर्मुख करतात.

लतिका जाधव

मार्मिक विश्लेषण!

विनोद काकडे

सुंदर लेख

Vishwas Sutar

अंतर्मुख करायला लावणारी फिल्म !

Deepa pillay

Khup chan very true

Vishwas Khod

'कन्सेंट' घेऊन वखवख शमवणं हे म्हणजे अगदीच संस्कृत, सभ्य, आणि शामळूपणाचं लक्षण आहे आजही...बाईवर ' मालकी' जोपर्यंत आहे, तोपर्यंत अशा गोष्टी होणं सहज आणि नैसर्गिक मानलं जातं. हे बहुतेकांच्या आयुष्यात होऊन जातं.. पण इथं फक्त पुरुष खलनायक ठरवणंही थोडं अन्यायाचं ठरेल.. बाया पुरुषाची 'अडवणूक' जाणीवपूर्वक सुध्दा करतात.. काही मनाविरुद्ध घडलं तर. अशा वेळी पुरुषी शरीरशास्त्र, शमन अपरिहार्यताही लक्षात घेतली पाहिजे. अनावर होत पाहिजे ते ओरबाडण्याची वेळ पुरुषांवर येत असते, हेही वास्तव आहे.. काही 'नेभळट' खरं तर समजूतदार नवरे अपरिहार्य स्खलन इच्छा नाईलाज म्हणून 'स्वावलंबी' होत पूर्ण करुन तो प्रसंग पार पाडतात. मनाशी चरफडत पुन्हा बायकोला हात न लावण्याचा पणही करतात, पण तो बायकोच्या हुशारीनं उधळून लावते.. लगट करून..

Add Comment