घटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील!

आयेशा खान आत्महत्या प्रकरण 

अहमदाबादच्या आयेशा आरीफ खानचा व्हिडिओ पाहिला. 23 वर्षांच्या या तरुणीनं वैफाल्यानं मृत्यूला कवटाळलं. सासरच्यांच्या पैशांच्या लोभाची/हुंड्याची ती बळी ठरली. आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ आहे म्हटल्यावर तो पाहण्याची हिंमत होत नव्हती... पण धाडस करून पाहिला आणि पाहिल्यापासूनचं व्हिडिओतलं तिचं कथन डोक्यातून जात नाहीये.

साबरमतीच्या नदीत आत्महत्या करण्यापूर्वी आयेशानं दोनेक मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात तिनं नवर्‍याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध आणि सासरच्या मंडळींविरुद्ध केलेली कौटुंबिक हिंसाचाराची केस वडलांनी मागं घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केलीये. आरीफवर प्रेम आहे, अपनों से कैसी लड़ाई? आयेशा लड़ाईयों के लिए नहीं है... मोहब्बत दोतर्फा होनी चाहिए। असं तुटकतुटक शब्दांत तिनं तिचं मन मोकळं केलंय, तेही हसतमुखानं. बहुतांश वेळा कौटुंबिक त्रासातून आत्महत्या होतात तेव्हा त्यात उद्विग्नता असते. सहनशीलतेचा कडेलोट झालेला असतो. विशिष्ट व्यक्तीविषयी राग आणि क्वचित समोरच्याला धडा शिकवण्याची भावना असते. आयेशाच्या व्हिडिओत धडा शिकवण्यापेक्षाही वैफल्य-हतबलता जास्त दिसते. उलट तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा, आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा नवराच असतानाही ती त्याला सोडून देण्याच्या, क्षमा करून टाकण्याच्याच पक्षात दिसते... आणि तिची ही भावना, ही क्षमाशीलता तिच्या मृत्यूइतकीच त्रासदायक आहे....

आयेशाचे राजस्थानच्या जालौर इथं राहणाऱ्या आरिफ खानसोबत 6 जुलै 2018 रोजी लग्न झाले.  मात्र त्यांनी हुंड्याची मागणी सुरु केली. त्यासाठी तिला माहेरीही पाठवून दिलं. तिच्या वडलांनी एकदा दीड लाख रुपये दिल्यानंतर त्यानं तिला सासरी नेले मात्र पुन्हा पैशांच्या हव्यासानं तिला माहेरी पाठवून दिलं. जाच वाढतोय म्हणून वडलांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली पोलीस तक्रार केली. यावरून तर तो अधिक बिथरला. 10 मार्च 2020 पासून आयेशा अहमदाबाद इथं आपल्या माहेरीच राहत होती. दरम्यानच्या काळात मानसिक त्रासानं तिचा गर्भपातही झाला. आयेशा इकोनॉमिक्‍समध्ये एम.ए. करत होती, त्याबरोबरच ती एका बँकेत नोकरीही करत होती.   

आपल्या जीवनसाथीनं आपला जाच केल्यावर, छळ केल्यावर आणि अगदी पहिलं अपत्यही त्याच्या मानसिक ताणतणावामुळं गमवावं लागलं असेल तर त्याला क्षमा करू नये का... तर नक्कीच केली जाऊ शकते... पण तेव्हाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीची/गुन्ह्यांची जाणीव असेल, अपराधभाव असेल आणि परिस्थिती पुढं नेऊन गुन्ह्याचं क्षालन करण्याची इच्छा असेल. याउलट जर समोरची व्यक्ती निर्लज्जपणे तुमच्या मृत्यूची कामना करते आणि मृत्यूपूर्वी व्हिडिओही पाठव म्हणते तेव्हा त्या व्यक्तीसाठी प्रेम कसं काय वाटू शकतं? आणि का वाटावं? एखाद्या व्यक्तीत पराकोटीचा चांगुलपणा असेल तर कदाचित इतकी हीन मागणी केल्यानंतरही त्याविषयी द्वेष वाटणार नाही पण क्रूर आणि दुःखद वर्तमान देणार्‍याविषयी प्रेम? प्रेम कसं वाटेल?

...आणि म्हणूनच वेड्यासारखं प्रेम करणार्‍या आयेशाचा प्रचंड राग येतोय. तिनं मृत्यूला कवटाळावं या पात्रतेचा खरंतर लायकीचा होता का तो? तिच्या या प्रेमाची प्रचंड चीड येतीये. राहूनराहून वाटत राहिलं हे असं संतत्वाला नेणारं प्रेम... असं प्रेम करण्याची शिकवण का देतो आपण... विशेष करून मुलींना? का वाढवतानाच त्यांना सबमिसिव्ह व्हायला शिकवतो? त्या घरात सबमिसिव्ह होतात तेव्हाच त्यांना आपण इतकं लोटांगण घालायची गरज नाही म्हणून कान का धरत नाही...? उलट शिकवतो, खुळ्यासारखं प्रेम करत राहा, खुळ्यासारखे आपल्या पार्टनरचे अवगुण-दोष-चुका-गुन्हे लपवत राहा, खुळ्यासारखं उभं आयुष्य प्रेमहीन नात्यात रखरखीतपणे कंठत राहा... खुळ्यासारखं! वर आपली हीच भारतीय संस्कृती, कुटुंब संस्कृती, विवाह संस्कृती म्हणून ऊर बडवत राहायचं. अमक्यातमक्या देशांत कसे, किती घटस्फोट होतात म्हणून शिमगा करत राहायचा... आणि निवांत जांभया देत आपल्या टीव्हीचा चॅनेल बदलून टाकायचा. मनोरंजन तर हवंच की आपल्याला, आपलं काय आणि कुणाचं काय जगणं सुखद होवो न होवो तिकडं....

लग्न आणि कुटुंब व्यवस्थेचं प्रचंड माहात्म्य आणि घटस्फोटाच्या सोयीतला अशक्य कोटीचा अपराधगंड या दोन्ही गोष्टी समान पातळीवर आणायला पाहिजेत... म्हणजे मग लग्नातून सुटकेचा मार्ग असा मृत्यूकडं जाणार नाही. लग्नाचं माहात्म्य, त्यातून व्यक्ती म्हणून (बहुतकरून मुलगी म्हणून) आयुष्याला लाभणार्‍या पूर्णत्वाचा इतका बागुलबुवा करून टाकलाय की, लग्न नसेल, अयशस्वी असेल तर आपण या पृथ्वीवर जगण्याच्या पात्रतेचेच नाहीत असं कथन तयार करून ठेवलेलं असतं... त्यामुळं बर्‍याचदा मुली लग्न ठरल्याबरोबरच होणार्‍या नवर्‍याचा मनोमन स्वीकार करून मोकळ्या होतात. ‘पती परमेश्‍वर’टाईप संस्कारांची पखरण करायला लागतात. नवऱ्यामुलीलासुद्धा पतीला रिझवणं, खूश ठेवणं, उठबस बघणं, कुक्कुलं बाळासारखं सांभाळणं अशा भयंकर गोष्टी पढवून सासरी धाडलं जातं आणि शिकल्यासवरल्या मुलीही आपल्या आसपास हेच पाहत वाढल्यानं त्यांना हे भेद आणि या लग्न व्यवहारातले दोष दिसत असतानाही त्यांच्या नेणिवांनी असे संस्कार सहज अंगीकारून मोकळ्या झालेल्या असतात.

...आणि आपल्याकडे बर्‍यापैकी या कथित ‘घरेलू संस्कारां’चा मारा दूरचित्रवाणी माध्यमांतूनही होत असतो. टीव्हीवरच्या बर्‍याचशा मालिकांमध्ये स्त्रीपात्राने सोशीकतेचा कहर केलेला असतो. केंद्रस्थानी विवाहित स्त्री असेल तर सहनशीलतेबाबत काही विचारता कामा नये. या मालिकांतला नवरा वेडसर असो, गुंड-मवाली असो, दारुडा आणि नशेत धुंद असणारा असो, प्रचंड कोपिष्ट आणि बायकोचा छळ करणारा असो... आईवडलांमुळं स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्न केलेला आणि पत्नीचा अस्वीकार करणारा असो, बाहेरख्याली असो, फसवून-बळजबरीनं लग्न करणारा असो, बदला म्हणून किंवा कमीपणा दाखवण्यासाठी लग्न करणारा असो अशा प्रत्येक लग्नातली बायको ममत्वाच्या पाकातून आणि सहनशीलतेच्या साच्यातूनच काढलेली दिसते.

मालिकांमध्ये पदरी पडलेल्या अशा तर्‍हेच्या नवऱ्याला पवित्र करण्याचा चंगच तिनं बांधलेला दिसतो. विजोड अशा नवर्‍याविरुद्ध बायको एकदाही न जाता, उलट त्याला प्रोजेक्टप्रमाणे सुधरवण्याचा, रिझवण्याचा प्रयत्न करताना दिसत राहते. यावर कडी म्हणजे पतीचा काडीचा आधार वा प्रेम नसतानाही त्याच्या कुटुंबावरच्या संकटाविरुद्ध या बायका ढाल म्हणून उभ्या राहिलेल्याच दाखवल्या जातात. लग्नाच्या पहिल्या दिवशी किंवा काही दिवसांतच नवर्‍याची ही ‘असलियत’ कळल्यावर ती वळवून न घेता लपवून टाकण्यासाठीच्या असंख्य प्रयत्नांत त्या दिसतात.

उलट मारहाण करणार्‍या, घराबाहेर काढणार्‍या, उपाशी ठेवणार्‍या, निंदानालस्ती करणाऱ्या किंवा संशय घेणार्‍या या नवर्‍यांवर या बायका प्रचंड प्रेम करत राहतात. मग कालांतरानं त्यांचे पतीसुद्धा सुधारणा पावतात आणि मग त्यांचा रोमॅन्टीकपणा पार अगदी उतू जायला लागतो. ही ‘टॉक्झिक मस्क्युलॅनिटी’ दिवसदिवसभर दाखवली जाते आणि मग अशाच प्रकारच्या सोशीकतेची, परफेक्शनची अपेक्षा कळत-नकळत बायकाही खर्‍याखुर्‍या आयुष्यात करायला लागतात. सहन करत राहण्याचं आणि सहन करणार्‍या बायकांचं ग्लोरिफीकेशन व्हायला लागतं आणि मग कसाही नवरा असला तरी प्रेमच केलं पाहिजेच हे वेगळंच कथानक खुळ्यासारखं मुलामुलींच्या डोक्यात भिनायला लागतं.

वर या तर्‍हेच्या संस्कारांना लोकलाजेची फोडणी घातलेली असते. चुकूनमाकून कुणी अशा नात्यातून बाहेर पडण्याचं धाडस करायचं ठरवलं तरी लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मागच्यापुढच्या भावंडांचं काय होईल, आईबापाचं काय होईल अशी यादी वाढत जाते... पण त्यात खुद्द जी व्यक्ती सहन करत असते तिला काय वाटेल वा तिची कशी सुटका होईल याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही. हांऽ पण गावगप्पांमध्ये मात्र प्रचंड हिरिरीनं सहभागी होणारे बरेच जण असतील आणि तरीही समजा हे सगळंच लाथाडून कुणी नातं संपवलं, स्वतःची सोडवणूक करून घेतलीच तर एकटीनं स्वतंत्र, सुरक्षित आयुष्य जगू शकतील अशी आपण व्यवस्थाच घडवत नाही. लग्नाच्या नात्यातून बाहेर पडून आयुष्यभर लोकांच्या विशिष्ट नजरा आणि टोचण्या सहन करण्यापेक्षा माणसं विषवत्‌ नात्यात स्वतःला बुडवून घेतात आणि म्हणूनच पतीनं वा सासरच्या मंडळींनी कितीही आणि कसाही त्रास दिला तरी बायका ठामपणे त्याविरुद्ध उभं राहण्याचं बळच एकवटू शकत नाहीत.

आयेशाच्या घटनेत तर तिच्या पालकांनी हुंड्याची दीड लाख रक्कम अदा केली. तरीही पुन्हापुन्हा मागणी सुरूच राहिली आणि त्यासाठी मुलीला त्रास दिला जातोय म्हटल्यावर पालकांनी सुज्ञपणे कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली. या स्वरूपाच्या तक्रारीचा उद्देश बर्‍याचदा समोरच्या व्यक्तीला तिच्या गुन्ह्याची जाणीव करून देणं आणि भविष्यातल्या गुन्ह्याला पायबंद घालणं हा असतो. शिक्षा देणं यापेक्षा समज देणं ही भावना त्यात अधिक असते. शहाण्याला एक इशारा पुरे ठरेल अशी अपेक्षा असते... मात्र तक्रार ज्यांच्याविरुद्ध केली जाते ते बर्‍याचदा स्वतःचा दोष समजून न घेता तक्रारच दाखल का केली म्हणून उलट अधिक कांगावा करतात, तक्रारदार मुलीला त्रास देतात... पण दोन मिनटं शांतपणे थांबून हा विचार करत नाहीत की, आपल्या वागण्याचा हा कुठला स्तर होता की, ज्याचं एक टोक पोलीस-तक्रारीपर्यंत न्यावं लागलं. आपल्या दारात पोलीस आले किंवा आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागलं याला आपणच जबाबदार आहोत हे सपशेल विसरून, त्याचा दोष तक्रारदार मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना दिला जातो... म्हणजे यांनी गुन्हे करायचे, छळ करायचा आणि वर त्याची कुठं फिर्यादही करायची नाही.

आयेशानं वडलांशी मृत्यूपूर्वी केलेल्या पाच मिनटांच्या संवादातही म्हटलंय ‘वो कहता है, पोलीस केस नही करते तो सोचता था, पर अब कुछ नहीं हो सकता ।’ मृत्यूपर्वीसुद्धा तिच्या मनात या केसची दहशत होती आणि अशा कित्येक दहशती मुलींच्या मनात असतात. त्या येतात कुठून... याचा विचार आपण कधी करणार आहोत? हे घडतं त्याला बर्‍याचदा स्त्रियांच्या जगण्यावागण्याबाबत केलेल्या नियमावलींचा सातत्यानं होणारा मारा जबाबदार आहे, हे आपण मानायलाच तयार नसतो.

पालकांचं पाठबळ, त्यांची सोबत असतानाही प्रेमाच्या आणि समर्पणाच्या कल्पनांनीच आयेशाच्या श्‍वासांची कोंडी केली. आपलं प्रेम खरं आहे... त्यासाठी आपण समर्पित होऊच शकतो हे कुठंतरी तिच्या मनात घर करत गेलं असणार आणि त्यातूनच हे पाऊल तिनं उचललं. आरीफ आणि त्याचे कुटुंबीय या लोभी प्रवृत्तीच्या माणसांपायी आयेशाला मरावं लागलं. पोलिसांनी आरीफला अटक केली आहे. कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कस्टडीही सुनावली आहे. यथावकाश कोर्टात केस उभी राहील. आयेशाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न होतील आणि तिला तो न्याय मिळावाच अशी आपण अपेक्षाही करू.

...पण स्त्रियांवर अत्याचाराच्या अनुषंगानं सगळ्या जबाबदाऱ्या दुसर्‍याच्या ‘कोर्टात’ ढकलून चालणार नाही. काही गोष्टींची जबाबदारी आता आपणही घ्यायलाच हवी. नाही तर आज हुंडा आहे... उद्या कदाचित आणखी काही कारण असेल. कारणं बदलत राहतील आणि आत्महत्या होत राहतील... तेव्हा पहिल्यांदा लग्नाचं अवडंबर कमी केलं पाहिजे आणि मुलामुलींना... दोघांनाही ना लग्नाइतकंच न पटणार्‍या नात्यातून वेगळं होण्याच्या मार्गांसाठीही तयार केलं पाहिजे. सबमिसिव्ह होण्यापासून दूर लोटलं पाहिजे. मुलींना तर स्वतःसाठी खंबीर व्हायला आणि स्वतःवर प्रेम करायला आधी शिकवावं.

जोडीला त्या प्रेमाच्या, समर्पणाच्या आणि संस्कारांच्या भ्रामक कल्पना धुडकावून लावण्याची कला मुलामुलींना शिकवून ठेवावी. काहीही झालं तरी आपलं आयुष्य महत्त्वाचं आहे, ते कुणाही व्यक्तीकडून होणार्‍या द्वेषापेक्षा मोठं होऊ शकत नाही. हे आपण अगदी लहानपणापासून कानीकपाळी सांगायला हवं. आयुष्यात वाईट माणसं भेटणार आहेत, नकारात्मकतेनं ग्रासलेली आणि छळणारीसुद्धा... पण म्हणून आयुष्य तिथं नेऊन थांबवायचं नसतं हे समजवायला हवं. त्यांना टाळून वा तोडून आपला रस्ता चालत रहावा, सोशीकतेलाही मर्यादा आहेत हे वेळीच लक्षात आणून द्यावं. असहनीय होणार्‍या गोष्टी तातडीनं त्यागून सुटं मोकळं व्हावं आणि तसं केल्यानं आपण अजिबात दुर्बल ठरणार नाही हेही ठणकावून सांगावं.

तेवीस हे काय वय झालं, आयुष्य संपवण्याचं...! लग्न/संसारापलीकडंही आयुष्य आहे आणि आनंदी वाटावं, जिवंत असण्याचं सुख मिळावं असे असंख्य घटनाप्रसंग आपली वाट पाहत असणारेत... त्यावर पाणी फिरवून चालणार नाही. ज्याचं आपल्यावर प्रेम नाही, आपल्या शरीरावर आणि पैशावरच ज्याचा जीव आहे त्याच्यासाठी तर नक्कीच आयुष्य संपवू नये आणि असली नाती तोडूनमोडून शांतपणे आयुष्य जगू देण्याची व्यवस्था आपण, आपल्या समाजव्यवस्थांनी आणि माध्यमांनी निर्माण करायला हवीये. घटस्फोटित वा एकटं राहणार्‍या स्त्रीपुरुषांविषयीच्या बाजारगप्पांना लगाम घातला पाहिजे.

लग्न केलं की तडजोड करावी लागते, थोडं सहन करावं लागतं, समजून घ्यावं लागतं, अमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं, याव करावं लागतं, त्याव करावं लागतं. हे सारं शिकवलं जातं तेव्हा हेही सांगून ठेवावं की, फार त्रास देणारा माणूस लाभला तर सरळ वेगळं व्हावं. अशी व्यक्ती मिळाली म्हणजे तुझ्यात काही दोष आहेत वा तुझ्या नशिबात हे आहे हे वाटणं सोडून द्यावं. तू, तुझं जगणं सुंदर आहे हे सांगून ठेवावं. ‘तू कोणयेस... गेलास उडत...’ असं म्हणून स्वतःच्या आयुष्यासाठी खंबीरपणं उभं राहावं. नातं टॉक्झीक झाल्यानंतर त्यातच गुरफटत राहण्यापेक्षा किंवा पार मानसन्मान बाजूला ठेवून शरण जाण्यापेक्षा ते सोडून द्यावं. रीतसर घटस्फोटच घ्यावा. घटस्फोटाचं नॉर्मलायझेशन करावं, काही बिघडत नाही. काही आभाळ कोसळत नाही. घटस्फोटाचं गंड तर अजिबात बाळगायचं कारण नाही. एखाद्या देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तरी किमान तिथं आनंदी जीवन कंठण्याच्या पर्यायांचा विचार तरी केला जातोय हे अधिक डोळसपणे बघावं.

कोर्टकचेर्‍या करून आपल्या मुली आपल्या घरी आल्या किंवा मुलगा सुटा झाला म्हणून टाहो फोडण्यापेक्षा त्यांच्यासोबत धीरानं कुटुंबानं आणि समाजानं उभं राहावं. नातं तुटणार असेल तर तुटू द्यावं. तोडावंसं वाटतं तेव्हाच ते तुटलेलं असतं. पुन्हा जर ते जुळायचं असेल तर जुळेलही पण आत्ता ते जहराचा प्याला असेल तर त्याची चव चाखत राहू नये... विषाची परीक्षा घेऊ नये... आत्महत्या तर अजिबात करू नये...!

हिनाकौसर खान
greenheena@gmail.com

Tags: महिला आयेशा आरिफ खान अहमदाबाद आत्महत्या प्रकरण कौटुंबिक हिंसाचार हिनाकौसर खान-पिंजार हिनाकौसर खान ayesha arif khan ambdabad suicide case woman heenakausar khan feminism domestic violence स्त्रीवाद Load More Tags

Comments: Show All Comments

Rekha adhav

खरय लेखात जे लिहिलंय ते अगदी खर आहे घटस्फोटाचे नोरमलायझेशन होणे अत्यंत आवश्यक आहे. लग्न निभावून नेणं ही फक्त मुलीची जबाबदारी नसून मुलगा किंवा पुरुष यांची ही तेवढीच जबाबदारी आहे.सहजीवन सुखद,सुसंवादी नसेल तर अशा नात्याला पूर्ण विराम देणे आवश्यक आहे

सिसिलिया कार्व्हालो

खूप स्पष्ट शब्दात कानउघाडणी केली आहे.एवढं शिक्षण घेऊनही मुली स्वतःचं उत्थापन का करु शकत नाहीत?याची खंत वाटते.

विष्णू दाते

...आत्मनिर्भर, आर्थिक दृष्ट्या प्रबळ आणि उच्चशिक्षित मुलीने खर तर इतकं दुबळं असू नये!

Madan Shelar

आत्म्ह्यात्या करणं खूप मोठं पाप आहे. कोणत्याही धर्मात मृत्यू नंतर आपण ईश्वर अथवा अल्ला अथवा येशू यांना मिळतो असे सांगितले नाही. मानव जन्म खूप मोलाचा आहे. अशा कारणासाठी जीवन संपविन मोठं पाप आहे. जीवनाचा खरा अर्थ न समजल्यामुळे असं घडतं. मुलींना व मुलांना लहानपणाासूनच या बाबी समजून सांगाव्या

Pro. Bhagwat Shinde

लेखातील आयेष्याच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.लेखिकेने हे दाहक वास्तव खूप पोटतिडकीने व अत्यंत परखडपणे मांडले आहे. यातील लग्नानंतरच्या सहजीवनाचा प्रश्न खूप वेगळ्या अंगांनी आपण सर्वांनीच विचारात घेणे गरजेचे आहे. लग्न म्हटलं की सगळ्या चांगल्याच गोष्टी... सगळ्ं सहनच करायचं. असल्या पारंपारिक विचारातून मुलगी आणि मुलगा अशा दोघांनीही बाहेर पडलं पाहिजे आणि सहजीवन जर असहय होत असेल तर विचारपूर्वक मनामध्ये कसलीही कटुता न ठेवता घटस्फोटाचा मार्ग खूप मोकळेपणाने स्वीकारला पाहिजे.समाजानेही त्यावर कसल्याही प्रकारची आग पाखड करता कामा नये. याशिवाय प्रगती पाटील यांनी आपल्या प्रतिसादांमध्ये ईश्वर विषयक मांडलेल्या भ्रामक , चुकीच्या कल्पना मधूनही शक्य तितक्या लवकर सर्वांनीच बाहेर पडणे गरजेचे आहे.

प्रगती पाटील

आयेशाचा विडिओ बघितला तेव्हा अजून एक गोष्ट ध्यानात आली की तिचे अल्लाहवर फार प्रेम आहे, तो मृत्यूनंतर तिचा इंसाफ करेल असा तिला भरवसा वगैरे आहे. ईश्वर, अल्लाह, गॉड यांच्यावरील अतिविश्वासाने मनुष्याची फार हानी झाली आहे. आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकाला असे वाटते की या जगात त्यांना सुख मिळाले नसले तरी मृत्यूनंतर त्यांना सुख, शांती मिळेल. या विचारांचे पाठबळ नसेल तर कुणीच आत्महत्या करायला धजावणार नाही. ईश्वर, स्वर्ग, नरक या फक्त mythological संकल्पना आहेत, वास्तविक नव्हे या गोष्टी लहानपणापासून मुलांच्या मनात ठसवायला हव्यात. एकच जन्म मिळालाय ही जाणीव ज्यादिवशी दृढ होईल त्यादिवशी कारण कुठलेही असो पण मनुष्य आत्महत्या करणार नाही.

लतिका जाधव

मुस्लिम धर्मात अशा वैवाहिक तणावात स्त्री 'खुला' मागण्याचा अधिकार आहे. पण मुली व पालक 'खुला' करून घेतात का? याबद्दल काहीच प्रबोधन करताना कोणी दिसत नाही. नेहमी केवळ पुरुषांकडून दिला जाणारा तलाक चर्चिला जातो. आयेशाचे आयुष्य अशा पद्धतीने संपावे, हे 2021 मधील दु:ख. सविस्तर व तडफदार शैलीत लेख लिहिला हा दिलासा आहे.

Add Comment

संबंधित लेख