पुण्याचं शाहीन बाग

फोटो: सुरज निर्मळे

“हमको चाहिए- आझादी । हमको हमारी - आझादी । हमको तुम्हारी - आझादी । जानसे प्यारी - आझादी । इस भेदभाव से - आझादी । इस संघवाद से - आझादी । इस दमनवाद से- आझादी । इस मनुवाद से - आझादी । हम लेके रहेंगे - आझादी । इस लुटपूट से- आझादी । भूकमरीसे - आझादी । आंबेडकरवाली - आझादी । बुद्धवाली - आझादी । चौकीदारो से, तडीपारोंसे - आझादी । सीएएवाद से- आझादी । एनपीआर से आझादी । एनसीआर से आझादी । हम लेके रहेंगे - आझादी"

रात्रीच्या 9 वाजता, बोचऱ्या थंड वाऱ्यांतही या घोषणांचे निखारे फुलत होते आणि उपस्थित शे-दीडशे जणी उत्साहाने प्रतिसाद देत होत्या. स्थळ होतं पुणे शहरातल्या कोंढवा परिसरातील कौसर बाग. आजच्या स्थितीत त्याचं दुसरं नाव आहे शाहीन बाग!

'अब हर शहर शाहीन बाग' अशी दिल्लीतल्या शाहीन बागेतून घोषणा आली आणि सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट(सीएए), नॅशनल रजिस्टर्ड सिटिझन(एनआरसी), नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) यांच्या विरोधाचा वणवा खरोखरच देशभर पसरत गेला. या तिन्ही कायद्यांविरोधात  पुण्यातही महिलांनी 10 जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आणि आता आंदोलनाचा हा पस्तिसावा दिवस होता. इतक्या सलगपणे अहोरात्र आंदोलनाची धग पेटती ठेवण्याचं काम दिल्लीतल्या शाहीन बागनंतर कोंढव्यातील या महिला करताना दिसत होत्या.

मागे बिझिनेस कॉम्प्लेक्स आणि रस्त्याच्या पलीकडे भाजीमंडई अशा ठिकाणी रस्त्याच्या एका कडेला मांडव घातलेला दिसतो. मांडवाच्या बाहेरही खुर्च्या टाकलेल्या होत्या. बॅरीकेड्स लावून आंदोलनकर्त्यांच्या बसण्याची जागा निश्चित केलेली होती. मांडवाच्या आत महिला आपल्या मुलाबाळांसह होत्या. तरुणी होत्या. एका नजरेत सर्वाधिक दिसत होत्या बुरखा घातलेल्या महिला. इतरही होत्याच. बॅरिकेड्सला लागून पुरुष, मुले उभी होती. मांडवाबाहेरच्या खुर्च्यांवर सुरुवातीच्या दहा-बारा लाइनीत महिलाच होत्या. त्यामागच्या खुर्च्यांवर पुरुष बसलेले होते. समोर घोषणा सुरू होत्या आणि घोषणा देणाऱ्यांच्या आवाजात उपस्थित स्त्री-पुरुष आपला आवाज मिसळून तो अधिक बुलंद करत होते.

त्याच वेळी आठ-दहा वर्षांच्या एका मुलीनं आझादीवरचं एक गीत सादर केलं. उपस्थितांनी टाळ्यांनी तिचं कौतुक केलं. पण तिचं अजून कौतुक व्हावं असं वाटून एका तरुणानं माईक हाती घेतला. तो म्हणाला, “तालियाँ और जोर से बजनी चाहिए. इस नन्ही बच्ची की हौसला अफजाई करो. हमसे पहले दो नस्लोंने कुछ भी नहीं कहा इसलिए आज ये लडकी कुछ कह रही है तो हौसला अफजाई करो, ताकि कल वो सवाल भी करने लगेगी. हौसला अफजाई करो और जोर से." उपस्थितांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. त्या तरुणाचा हा एवढासा विचारही फार महत्त्वाचा वाटत होता. हे नुसतं आंदोलन नव्हतं. नव्या विचारांची बीजपेरणी करणारी शेतभूमी ठरत होती. मागाहून कळलं त्या तरूणाचं नाव जव्वाद सय्यद.
***
“कितने दिनों से आप आ रही हो?” शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या पन्नाशीच्या आसपासच्या नफिसा शेख यांना विचारलं.
“पहले दिनसे ही. माझ्या घरातून मी, माझी नणंद, सून आम्ही तिघी जणी येतो. संध्याकाळी मगरीबची नमाज झाली की येतो आणि मग रात्री बारापर्यंत थांबतो.”
“सीएए, एनसीआर, एनपीआरविषयी माहितीये?”
“हां, इधर सब बोलते ना. उधर खडे ना, वो बाजी को पुछो. तुम कबसे आरे? तुमको नहीं पता क्या?”
“आजच आयी.’’
“फिर देखो रोज आना मंगता. क्या है की मोदीजी को भी कुछ खबर होती ही होंगी. मालूम तो करके लेते रहींगेच तो.” नफीसा शेख गृहिणी आहेत. त्या पुढे सांगत राहिल्या की, आपण वेळीच विरोध केला नाही तर मोदींना कळणार नाही आणि त्यासाठी त्यात सातत्य हवं.
“आणि असं नाही की फक्त मुस्लिम हा प्रश्न इथल्या सगळ्या नागरिकांचा आहे. इथं फक्त कोंढव्यातीलच नाही तर दूरुनही लोक येतात. लोहियानगर, कॅम्प, लक्ष्मीनगर वस्ती, मोमिनपुरा, खडकी, दौंडहून, साताऱ्याहूनही काही जणी आल्या होत्या. सोलापूरहून येणार आहेत. दुरून दुरून बायका येत आहेत.” गजाला शेख म्हणाल्या. त्याही पन्नाशीच्या आसपासच्या. आम्हाला मुस्लिमेतर भगिनींचाही सपोर्ट आहे. दुपारीच वंचित बहुजन विकास आघाडीतल्या महिला येऊन गेल्या. इथंही परिसरातील हिंदू भगिनी येतात. इथल्या प्लॅटफॉर्मवरून कुणीही आपला विरोध, आपलं मत, आपला प्रश्न् मांडू शकतं. त्यामुळं शाहीन बाग फक्त मुस्लिम महिलांचं नाहीच.”

"पुण्यात महिलांनी एकत्र येण्याचं कसं ठरवलं?"
या प्रश्नावर नफीसा म्हणाल्या, “मस्जिदोंमे ऐलान हुआ था. घरमें आकर शौहरने सारी बाते समझायी. पहले दिन आकर देखा और बात समझ आयी कि ये तो बहुत जरूरी काम है."
अ‍ॅड. सिमीन अहमद यांनी पुण्यातल्या शाहीन बागची संकल्पना दिल्लीच्या धर्तीवरच असल्याचं सांगितलं. "दिल्ली में बैठी अपनी बहनों को देखकर हम इन्स्पायर हुए. अगर वो बहने रस्ते पर उतरकर रात-रातभर बैठ सकती है तो हमारा भी फर्ज बनता है की हम उनका साथ दे. हमारे अंदर भी वह जजबा आया. सिर्फ तीन औरतोंने शुरू किया था फिर कारवाँ बना... हमने भी बस वही बात ध्यान में रखी. शुरू करते है, लोग जुड जायेंगे. पुणे की सारी मुस्लिम जमातोंका एक फोरम बना है, 'कुल जमाते तंजिम'.  उन्होंने भी इस काम में हमे सपोर्ट किया है.”

अ‍ॅड. सिमीन यांनी माहिती दिली की या ठिकाणी फक्त गृहिणी महिलाच नाहीत तर शिक्षित, उच्चशिक्षित महिलाही आहेत. एकेक दिवशी वकिल महिलांचा, डॉक्टर महिलांचा, शिक्षक महिलांचा असा आंदोलनाचा दिवसही पाळला. कॅन्डल मार्च केला, पोस्टर तयार केली. हातावर सीएए, एनआरसीला विरोध करणाऱ्या घोषणा मेहंदीतून हातावर लिहिल्या. महिला रोज नवनव्या घोषणा लिहून आणतात. अशा निरनिराळ्या अ‍ॅक्टव्हिटीतून आम्ही आमचं आंदोलन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं अ‍ॅड. सिमीन यांनी सांगितलं.

“पहिल्यांदाच असं होतंय की, धर्माच्या आधारावर नागरिकत्व देण्याचा मुद्दा पुढे येत आहे. धर्मावरून नागरिकत्व देण्याचा मुद्दा मांडणंसुद्धा देशद्रोह मानायला हवा, कारण ते आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेवरच काट मारत आहे. ते जर दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांना कळत नसेल, तर सर्वसामान्यांना पुढं येऊन सांगावंच लागेल.” पस्तिशीतल्या रजिया म्हणाल्या. “हम तो हाऊस वाईफ है. मगर जब बात घर पर आती है तो घरके बाहर निकलना ही पडा. एक भी दिन छूटा नहीं, रोज आते है." सुमैय्या खान म्हणाल्या. रोज भाजी घ्यायला मंडईत येत होते. या बायकांचं काय सुरू आहे, हे पाहायला आले. मग या कायद्याची माहिती कळाली आणि इथं येऊन बसायला सुरुवात केली, असंही एक आजी सांगू लागल्या.

"तुम्ही आधी कधी अशा रीतीनं रस्त्यावर उतरलात, इतर कुठल्याही मुद्दयावर?" या प्रश्नावर डॉ. अलसबा शेख पुढं आल्या. “आम्ही कोंढव्यातच राहणाऱ्या आहोत. इथल्या सोशल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असतो. असं नाही की पहिल्यांदाच रस्त्यावर आलोय. या आधी तलाकाचा मुद्दा होता, असिफाचा मुद्दा होता, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असो; आम्ही या मुद्दयांवर नेहमीच आंदोलनं केली आहेत. आणि आता तर मुद्दा संविधानाचा आहे; मग आम्ही मागे कसे राहणार. सगळ्यांनाच सहभागी व्हावं लागणार.”

“और इनव्हॉल्ह होना जरूरी है ना, जब हमको कुछ बात पता है की गलत हो रहा है. और अगर हम आगे नहीं आयेंगे तो जिन्हे कुछ नहीं पता वे आगे कैसे आयेंगे. हमारा काम बनता है की सोसायटी में उस चीज का अवेरनेस लाये. लोगों को बताये की आसपास हो क्या रहा है. ये शाहीन बाग उसके लिए भी जरुरी है.” यास्मिन खान म्हणाल्या.

“खरं तर आम्हाला तर अशी आंदोलनं ऐकूनच माहीत होती. थोडीफार इतिहासात वाचली होती. कधी तरी आपण असं रस्त्यावर उतरू, असं वाटलं नव्हतं.” चाळिशीतल्या शबाना म्हणाल्या. चांगल्या सोईसुविधा असलेल्या सोसायटीत राहणाऱ्या शबाना यांनी अरबी शिक्षणात पदवी घेतली आहे. त्यांच्याकडे दुपारनंतर मुलं अरबीचे शिक्षण घेण्यासाठी येतात. सीएए, एनआरसी, एनपीआर या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर महिलांनी यावं, यासाठी त्यांच्या सोसायटीतल्या बायकांना जमवण्याचाही प्रयत्न केलेला होता. “हमारे मुल्कसे हमको निकालने की कोई भी साजिश करें तो रस्ते पर आना पडेगा. वो बहुत कहते की ऐसा कुछ नहीं. यहाँ का मुसलमान तो बिलकुल सेफ है, पर उस बात की बुनियाद क्या है ये तो समझ नहीं आती.”

शाहीन आपला मुद्दा पुन्हा अधोरेखित करत होत्या. त्या नखशिखान्त बुरख्यात होत्या. पण केवळ डोळ्यांतूनही त्यांचा राग, वैताग जाणवत होता. त्यांच्याच म्हणण्यात डॉ. शेख यांनी मुद्दा जोडला, “मोदी-शहा संस्कृतीचे गोडवे गातात. संस्कृती जपण्याविषयी बोलतात. गाईंना माता मानतात आणि मग हाडामांसाच्या स्त्रिया त्यांना दिसत नाहीत का? गाईंना घरं दिलीत आणि आम्हाला रस्त्यावर आणलंय. ही आंदोलनं म्हणजे  तरी काय आहेत. रस्ते पर ही तो ला रखा है, असं वागताना यांना संस्कृती वगैरे आठवत नाही का?”

"अद्यापपर्यंत दिल्लीतल्या शाहीन बागेत ना पंतप्रधानांनी भेटी दिल्यात ना गृहमंत्र्यांनी; मग इथं तुम्ही जे करताय त्यातून काही हालचाल घडतेय, असं वाटतंय का?"
“बिलकुल”- घोळका. “घडत नसतं तर वारंवार कशाला सांगतायत की, इथल्या मुसलमानांना त्रास नाही. इथल्या नागरिकांना का म्हणत नाहीत? स्पेसिफिक मुस्लिम का म्हणतायत? रस्त्यावर ते दिसत आहेत म्हणून?”- सफिया. “हमारे बच्चों पर क्यों हमला कर रहे है...इसीलिए तो कर रहे है! दिल्ली में बच्चों पर लाठीकाठी मारी, वो क्यों? उससे क्या मिलेगा? बच्चों को डराकर, भगाकर आप देश को क्या अनपढ रखना चाहते हो? ये असर ही तो है जो वो तिलमिला रहे है!"

“एक तर आम्ही इतके दिवस बसू, असं काही ठरवलंच नव्हतं. 22 जानेवारीला निकाल येईल आणि विश्वास होता की, त्यात आमची बाजू लक्षात घेतली असेल. त्यानंतर आम्ही आंदोलन थांबवणार होतो. अगदी कायद्यावर स्टे ऑर्डर आली असती तरी. पण त्या दिवशी काहीच घडलं नाही. आमच्या विरोधातच गेला दिवस म्हणू. मग आम्ही आमचा लढा सुरू ठेवला.” सिमीन यांनी स्पष्ट केलं.

गजाला म्हणाल्या, “वो डिले करेंगे और सोचेंगे की हमारे इरादे को तोड देंगे, मगर अब आंदोलन इस लेवल पर आया है की पीछे हटने का तो कोई सवाल ही नहीं. बल्कि अलग-अलग लोग आ कर सपोर्ट कर रहे है. निवेदन दे रहे है. खरं तर मोदींना धन्यवादच द्यायला हवेत. या निमित्ताने आम्ही महिला एकत्र आलो. सीएएचा प्रश्न मिटला तरी आम्ही एकत्रित काम करायचं ठरवत आहोत. औरते जो बाहर आयी है अब उनको फिर अंदर नहीं ढकेलना. नहीं तो दिनभर सिरीयल के शिकंजे मे फॅंसी रहती है. अब भी हम यहाँ उनके लिए तरह तरह की अ‍ॅक्टिव्हिटी ले रहे है. कुछ दुनियादारी बता रहे है. तो औरतों को चार दिवारी से बाहर लाना और फिर उनको एक बनाकर खडे करना भी कोई छोटी बात नहीं.”

त्याच वेळी तिथून अल्ताफ शेख नावाचा तिशीच्या आत बाहेरचा तरुणाकडे निर्देश करत गजाला म्हणाल्या, "हा ऑटोरिक्षा चालवतो. रात्रीच्या वेळी ज्यांना घरी जायचं असेल त्यांना मोफत घरी नेऊन सोडतो. पुर्णवेळ थांबतो." अल्ताफकडे पाहिलं. कुर्ता-पायजमा-टोपी घातलेला तरूण. कौतुकानं ओशाळलेला. त्याला विचारलं, "हे सगळं कशासाठी करतोयस तू?"
“उनको उनकी मंजिल मिल जाये, उसमें थोडा अपना उत्ताच साथ.”
“और उनकी मंजिल क्या है?”
“यही की कोई किसी पे हुकूम ना चलाये, कोई किसीका गुलाम न बने, कोई किसी का हक ना मारे, कोई किसी को दबाकर ना रखे इसके वास्तेच खडी है ये सारी माँ बहने. सीएए, एनआरसी के कोई गुलाम न बने, हुकूमत न करे. बराबरी का हक मिले. यही तो है इनकी मंजिल. हमको तो ज्यादा कुछ करने आता नहीं, तो बस्स इस तरह से रिक्षा चलाकर उनको मदद कर रहा हूँ.” तो पुन्हा भरपूर हसत-लाजत उभा राहिला. त्याची आई फातिमा शेख यादेखील आल्या होत्या. आजारी असूनही येत होत्या. “शासनच 'मारो नहीं तो मरो' पर आया है तो जो होगा वो होगा सोचकर चले आते है. डटकर खडे रहेंगे.”

जव्वाद सय्यद -ज्याचा सुरवातीला उल्लेख केला तो- घोषणा देण्यात अग्रेसर दिसत होता, म्हणून त्याच्याशी बोलले तर कळलं की, तो कविमनाचा तरुण आहे. तो पर्वती दर्शन या ठिकाणाहून रोज कोंढव्याच्या शाहीन बागला हजेरी लावतो. तो म्हणतो, "महिला या आंदोलनात उतरल्यानंतर आपल्याला मागं राहून चालणार नाही, हे पटत होतं. शिवाय सध्या जे काही वातावरण आहे त्याचा राग आणि दु:ख असं दोन्ही होतंच. मग शायरी असेल किंवा कुठल्याही अन्य माध्यमातून विरोध करण्याचा प्रयत्न मी करत होतोच; त्याला इथं व्यासपीठ मिळालं. या आंदोलनामुळं घडलं असं की- इथला मुस्लिम तरुण जो कधीही बोलत नव्हता, मोकळेपणानं स्वत:ला मांडत नव्हता; तो आता समोर येऊ लागला आहे आणि निडर होऊन येऊ लागला आहे.

महिला जरी या आंदोलनात दिसत असतील, तरी पुरुषांचा सहभागही लक्षणीय आहे. उलट मी म्हणेन, बंदिस्त घरातून स्त्रिया बाहेर पडल्या आणि आंदोलनाला उभ्या राहिल्या, ही अधिक महत्त्वाची घटना आहे. कदाचित याला सांस्कृतिक क्रांतीचं पहिलं पाऊल म्हणता येईल. स्त्रिया घरातली कामं टाकून येतात, इतकं त्यांना हे महत्त्वाचं वाटत आहे. हाच मुद्दा त्यांना इतका महत्त्वाचा का वाटला असेल, तर त्याचं कारण त्या फार संवेदनशील असतात. त्या स्वत:वरचे अन्याय कदाचित सहन करून जातील; पण कुटुंबावरची गोष्ट असली की, सर्वाधिक हिमतीनं त्याच पुढे येतात.” या आंदोलनातून जव्वाद व काही तरुणांनी मिळून 'फ्रेंडस ऑफ कॉन्स्टिट्युशन' नावाचा ग्रुप केला आहे, त्या माध्यमातून ते अशा विषयांवर बौद्धिक चर्चा करत आहेत आणि बौद्धिक मुद्दयांनी लढा देऊ पाहत आहेत.

तिथे लहान-लहान मुलीदेखील होत्या.  हे जे काही चाललंय ते आता रोज-रोज येऊन त्यांना कळायला लागलं होतं. सीएए, एनआरसी, एनपीआर ऐकून माहीत झालं होतं. धिटाईनं त्या त्याबाबत बोलतही होत्या.

कौसर बाग उर्फ शाहीन बागेत येणाऱ्या महिलांबरोबरच मोहल्ल्यांमध्ये जाऊनही त्या महिलांना कायद्याविषयीची जनजागृती करत आहेत. सिमीन म्हणाल्या, “लोकांच्या मनात भीती आहे, माध्यमातूनही तसंच दिसतं. फायरिंग होत आहे, गोळ्या झाडल्या जात आहेत. लोक घाबरून पुढे येत नाहीत. त्यामुळं ती भीती जावी, कायदा कळावा म्हणून मोहल्ला मीटींग किंवा कॉर्नर मीटींग म्हणू, असं आम्ही करत आहोत. जी कुणी उपलब्ध असेल ती व्यक्ती ही जबाबदारी उत्स्फूर्तपणे घेते.” हे फार महत्त्वाचं वाटत होतं. वस्त्यांमध्ये फिरून एखाद्या कायद्याची जनजागृती करणं आणि मग त्यातून मत तयार होऊ देणं.
***
दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबरला दुपारी तीनच्या आसपास कॉर्नर मीटिंगला जायचं ठरलं. शिवनेरी गल्ली नंबर 9 मध्ये शिरलो. सोबत अ‍ॅड. सिमीन अहमद होत्या. एका बैठ्या घराच्या पार्किंगमध्ये परिसरातील तीस-पस्तीस जणी जमल्या होत्या. बैठकीसाठी शाळकरी मुलींपासून ज्येष्ठ महिला ही आल्या होत्या. ही बैठक होती सीएए, एनआरसी, एनपीआर कायदा समजून घेण्यासाठीची.

अ‍ॅड. सिमीन यांनी बैठकीचा ताबा घेतला. त्यांनी महिलांना प्रश्न केला की, कुणाला सीएए, एनसीआर, एनपीआरविषयी काहीही माहीत आहे का?
- वो कुछ तो जनम के दाखले गोला करके रखने बोल रे.
- कुछ तो मुसलमानों के खिलाफ है ना वो कानून.?
- क्याकी हमना यहाँ से निकालने वास्ते है बोल्ते.
- ऐसा कैसा कौन हमको निकालते. हम जायेंगेच नहीं
- कागदपत्तरा दिकाने का नहीं बोलते
- दिल्ली में औरतां बैठी है ना, गोल्या भी मार रे

त्यांना जे जितकं माहित होतं ते उपस्थित महिला ही सांगत होत्या. अ‍ॅड. सिमीन सांगू लागल्या. “मोटी मोटी बाते समझाऊँगी. ये कानून पहले तो हमारे संविधान के खिलाफ है. मैं वकील हूँ तो ये कायदा वकालत के हिसाब को ध्यान में रखकर भी गलत ही है. बराबरी का हक छिनता है.” महिला नीट ऐकू लागल्या. “सीएए आधी नुसतं बिल होतं आणि आता तो कायदा बनून आपल्यावर लागू झालाय. याची सुरुवात आसामपासून झाली. या कायद्यामुळं बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथल्या हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे. हेच देश का घेतले? तर, तिथं मुस्लिम लोकांची संख्या जास्त. श्रीलंका, भूतान, म्यानमार ही शेजारील राष्ट्रे पण ती मुस्लिम राष्ट्र नाहीत. तर तिथल्या हिंदूंना नागरिकत्व देणार."
“और वो लोग कहाँ रहेंगे?”
“इथंच. आपल्या देशात. गर्दी करून किंवा माहीत नाही.”- सिमीन

“..हं तर याची सुरुवात आसामपासून झाली. तिथं जेव्हा नागरिकत्व रजिस्टर करण्यात आले, तेव्हा त्यातून 19 लाख लोक असे होते ज्यांच्याकडे भारतात रहिवासी असल्याचा काहीही पुरावा नाही. त्यातील 14 लाख हिंदू होते आणि उर्वरित पाच लाख मुस्लिम. त्या हिंदूंना देशाचं नागरिकत्व देता यावं म्हणून हा सीएए कायदा आला. या कायद्यामुळं हिंदू-मुस्लिम दोघांनाही आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. ते सिद्ध करू न शकणारी लोकं डिटेन्शन कॅम्पमध्ये जाणार आहेत. म्हणजे हिंदूंनासुद्धा त्रास होणार आहे, पण हिंदूंना सीएए कायद्यातून पुन्हा भारताचं नागरिकत्व मिळेल; मात्र ज्या मुसलमानांना सिद्ध करता येणार नाही, त्यांची मग ट्रिब्युनल कोर्टापुढं सुनावणी होणार. बरं, कोर्टात बसवायला न्यायाधीश नाहीत म्हणून ज्यांची पाच वर्षांची वकिली  झाली, ते न्यायाधीश बनून निवाडा करणार. अशा स्थितीत इथलाच रहिवासी असणारा मुस्लिम नागरिक न्याय मिळेलच याची आस कशाच्या आधारे करणार? त्यांना मग कदाचित घुसखोर ठरवलं जाईल, हुसकावून लावलं जाईल किंवा काहीही होऊ शकतं. म्हणून आपण याचा विरोध करत आहोत.”

“पण वो कौन होते है हमको हकालनेवाले?”
“खाला, इसिलिए डटकर इसका विरोध करना है... सबका एक होकर विरोध करेंगे. आपके घर आ कर तो आपकी बात नहीं सुनेंगे.”
“आता तुम्हाला कायद्यानुसारही सांगते की, हा विरोध का महत्त्वाचा आहे. या कायद्यानुसार संविधानचे कलम 14 म्हणजे 'राईट टु इक्वालिटी' चा भंग होतो. 'राईट टु इक्वालिटी' मतलब मसावत का हक. सबको बराबर का हक है, कोई आला नहीं कोई अदना नहीं. कायद्यानंच आपल्याला समानतेचा हक्क दिला आहे. पण सध्या आपले पंतप्रधान आणि गृहमंत्रीच या कलमाचा भंग करत आहेत. कलम 15 ज्यात लिंग, वर्ण, धर्म, जात, आणि जन्मस्थळावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही. आज काय होतंय तर, आपल्या धर्मावरून आणि आपण कुठं राहतो यावरूनच प्रश्न निर्माण केला आहे. कलम 21 ज्यात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे,  पण इथं त्यावरच गदा आणून डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्याची सोय केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले तेव्हा त्यांनी कधी देशाला, माणसांना वाटण्याचा प्रयत्न केला नाही आज त्याच संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून विरोध करायचा आहे.”

“एनपीआर- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन म्हणजे जनगणना. याचा यापूर्वी कधीही विरोध नाही झाला, ती तर दहा वर्षांनी होतेच. एनपीआरमध्ये पूर्वी फक्त 14 प्रश्न होते, आता त्यात 7 प्रश्न नवे टाकले आहेत आणि त्यातला एक प्रश्न आहे की तुमच्या आईवडिलांचा जन्मदाखला असेल तरच तुम्हाला नागरिकत्व देणार आहेत. याच्याआधी तुम्हाला तोंडी विचारलं जायचं की, घरात किती माणसं आहेत, मोठं कोण, लहान कोण वगैरे. पण आता 7 असे प्रश्न  आहेत जे असांविधानिक आहेत. आधी आपल्याकडे सिटिझनशिप अ‍ॅक्ट 1955 होताच. त्यात आपल्याला जन्मामुळे किंवा एखादा नागरिक 11 वर्षांपासून इथेच राहत असल्यास, कुणी अर्ज करून आपल्या देशाचं नागरिकत्व मिळवलं असल्यास किंवा एखाद्याच्या पालकांपैकी एक जण जरी भारतीय असला तरी त्यांना नागरिकत्व मिळत होते. त्यात कुठंही धर्माचा मुद्दा नव्हता; मात्र आता तो आहे, म्हणून विरोध करायचा आहे.”

सिमीन सर्वसामान्य भाषेत महिलांना कायद्याची भाषा समजावत होत्या. महिलाही ते सारं समजून घेत होत्या. आपापला विरोध एकेकट्यानं दाखवू शकणार नाही म्हणून दिवसातला कुठला तरी वेळ कौसर बागेतल्या आंदोलनाला उपस्थिती लावून पूर्ण करण्याचा निश्चय करत होत्या. मनातल्या शंका सांगत होत्या. कोणी काही मोफत देऊन मिस्ड कॉल देण्यास सांगत आहे, कुणी आधार कार्ड काढायला राजकीय कार्यालयात बोलवत आहेत, अशाही तक्रारी सांगत होत्या. सिमीन त्यांच्या शंकांचं निरसन करत होत्या. तुमच्याकडे सगळी कागदपत्रे असतील तरी,  ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी उभं राहायचं आहे म्हणून त्या आवाहन करत होत्या. बोलत होत्या. त्यांना बोलतं व्हा म्हणून बजावत होत्या. त्या तेवढ्या वेळात एक सूक्ष्म गोष्ट तीव्रतेनं जाणवत राहिली -भयाची. आपल्या गोंधळलेल्या अवस्थेची, आसपासच्या वातावरणाची, फाटाफूट करण्याच्या व्यवस्थेची आणि मग शेवटी आपण नेमकं करायचं काय, अशा कित्येक प्रश्नांची भीती!

अशा वेळी जव्वाद सय्यदने कौसर बागेत म्हटलेल्या कवितांमधल्या ओळी आठवत राहिल्या... आशावाद निर्माण करत राहिल्या..
सितमगरों के हर इक सितम का अभी तो खुलकर हिसाब होगा
हर इक जुमले के बदले में अब हर एक नारा जवाब होगा
कई जमाने के गुँगे लोगों में बोलने का हुनर है आया
इसी हुनर की वजह से मेरे वतन में अब इन्कलाब होगा

- हिनाकौसर खान
 greenheena@gmail.com

Tags:Load More Tags

Comments:

उमेश शिवाजी जगताप

हम सब आपके साथ है.

दत्ता चव्हाण

We The People O fIndia

Munir mulla

Shahin bag tum sangharsh karo hum tumhare sath hai.

C.d.deshpande

1.I noted that the information is initially released from majid 2.The advocate lady is not talking about the reason why Hindus from pakistan are coming to India.She conveniently keeps mum about the religious atrocities made by muslims on hindus in Bangladesh desh and pakistan

Add Comment

संबंधित लेख