पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक

अतुल देऊळगावकर लिखित 'ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना?' या पुस्तकाचा परिचय

'फुलपाखराने एका ठिकाणी पंख फडफडवले, तर जगाच्या दुसर्‍या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं' असा सिद्धांत गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी 1993मध्ये मांडला होता. यालाच केऑस थेअरी (कोलाहल सिद्धांत) असंही म्हणतात. हा सिद्धांत आत्ता पुन्हा आठवण्याचं कारण आहे- ग्रेटा थुनबर्ग!

एक शाळकरी मुलगी हवामान संरक्षणासाठी 'शाळा बंद' करण्याचा निर्णय घेते. तिच्या देशात शाळा चुकवणं हा कायद्याने गुन्हा आहे हे ठाऊक असतानाही धाडस करते. आपल्या देशाच्या संसदेबाहेर तब्बल 21 दिवस धरणे देऊन बसते. हळूहळू तिच्या या कृतीत जगभरातील 80 लाखांहून अधिक मुले सहभागी होतात आणि जागतिक स्तरावर बंद करून दाखवतात. एक ग्रेटा पर्यावरणासाठी जगभरातल्या मुलांचं चक्रीवादळ उभं करून दाखवते आणि 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही चळवळ उभी करते. भविष्यातील पर्यावरणासाठी शुक्रवारी शाळा बंद अशी ही चळवळ.  इतकंच नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत विचार मांडायला या 16 वर्षाच्या ग्रेटाला आमंत्रण येतं. अशी घटना ही आजवर कधीही घडलेली नव्हती. जगातील 66 राष्ट्रप्रमुखांसोबत जगातल्या जनतेचं खरं प्रतिनिधित्व करणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे ग्रेटा!

ग्रेटाने त्या परिषदेत 66 राष्ट्रप्रमुखांना ठणकावून विचारलं, 'मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परिकथा सांगत बसता, तुमची हिंमत होतेच कशी? तुमचं आम्हांला फसवणं आता आम्ही सहन करणार नाही.' एवढ धारिष्ट्य तिच्याकडे आले ते पर्यावरणाबद्दलच्या तळमळीतून. त्यावेळी तिचा भावूक झालेला चेहरा, तिची आर्त हाक त्यावेळी संपूर्ण जगाने पाहिली.

पर्यावरणाची, प्रदुषणमुक्त वातावरणाची गरज जगातल्या प्रत्येकच जीवजंतूंना आहे. पर्यावरण बदल, वाढतं प्रदूषण, वाढती उष्णता, अवकाळी बेभरवशाचा पाऊस, जंगलांना लागणारे वणवे, हिमपर्वतांचं विरघळणं, कार्बनपदचिन्ह अशा कितीतरी गोष्टी आपण सगळेच ऐकतो पण करत काहीच नाही. वैज्ञानिक उपाय शोधतील, धोरणकर्ते पाहून घेतील असं म्हणून सोडून देतो. ग्रेटा मात्र अपवाद होती. लहान मुलांच्या भविष्याचा विचार न करता आजवर पृथ्वीचा भरपूर नाश झाला आहे. किमान आता तरी जागं व्हायलाच हवं असं या मुलीला वाटून गेलं आणि मग तिनं पहिलं पाऊल उचललं.

कर्बउत्सर्जनाच्या विरोधात आणि हवामान संरक्षणासाठी ग्रेटानं केलेले प्रयत्न आणि त्याचे घडलेले परिणाम 'ग्रेटाची हाक - तुम्हाला ऐकू येतेय ना?' या पुस्तकात वाचता येतात. पत्रकार-लेखक अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक 'मनोविकास प्रकाशन'नं प्रसिद्ध केलं आहे.

ग्रेटा स्वीडन देशातल्या स्टॉकहॉम शहरात राहते. आईवडिल आणि एक बहिण असं तिचं कुटुंब. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे तिसरीत असणार्‍या ग्रेटाने हवामानबदल आणि तापमानवाढ हे शब्द प्रथम ऐकले. वाढता उन्हाळा, जंगलांना लागणार्‍या आगी, चक्रीवादळे, महापूर यांच्या दृश्यफिती पाहत होती. प्राणी-वनस्पतींच्या जाती कायमस्वरूपी नाहीशा होत आहेत हे ती ऐकत व पाहत होती. शाळेत निसर्गाला जपण्याविषयी सांगितलं जात होतं. ती मिळेल तिथून पर्यावरणावरच वाचत, ऐकत होती. हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढण्यामागे श्रीमंत देशातली जीवनशैली कारणीभूत असल्याचं लक्षात येताच ग्रेटानं घरातल्या लोकांचा मांसाहार बंद केला. आईचा विमान प्रवास बंद केला. तिने स्वत:देखील जाणिवपूर्वक साधी जीवनशैली स्वीकारली आहे. अशा जीवनशैलीमुळे आपण पृथ्वीची तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सीयस खाली रोखू शकू असा ग्रेटाला विश्वास आहे.

पृथ्वीचा ऱ्हास होण्यासाठी माणूसच कारणीभूत आहे हे माहित झाल्यानंतर ती अधिक अस्वस्थ झाली. तिच्या संवेदनशील मनाला माणसाच्या वागण्या बोलण्यातील विरोधाभास डाचू लागला. इतका की ती अंतर्मुख झाली. अबोल झाली. पण दुसरीकडे तिचा कर्बउत्सर्जन, कार्बनपदचिन्हे असा अभ्यास सुरूच राहिला. 2018 च्या आगॅस्टमध्ये स्टॉकहोमला संसदेचं अधिवेशन भरणार होतं. हे अधिवेशन तिला संधी वाटली. आपल्या देशाच्या नेत्यांकडे जाऊन आपण पर्यावरणसंदर्भात मागणी करण्याची हीच वेळ आहे. 'पर्यावरणासाठी शाळा बंद' असा फलक घेऊन संसदेबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबियांचा, शाळेतल्या मैत्रिणींचं पाठबळ नव्हतं.

स्वीडनमध्ये शाळा चुकवणं गुन्हा आहे. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला समजावलं, विरोध केला मात्र ती ठाम राहिली. शेवटी वडिलांनी निर्वाणीचं असं सुनावलं, 'शाळेत न जाण्याचा निर्णय आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तुझीच राहिल. त्यावेळी आम्ही मदतीला येणार नाही.' वडिलांच्या या धमकीनंतरही ती डगमगली नाही आणि आपल्या निर्णयावर अढळ राहत ती संसदेबाहेर एकटीच जाऊन बसली. सुरूवातीला कुणीही तिची दखल घेतली नाही मात्र हळूहळू प्रसारमाध्यमांचे तिच्याकडे लक्ष गेलं. पर्यावरण रक्षणासाठी लढणारी मुलगी अशी तिची ओळख तयार झाली.

या धरणे आंदोलनानंतर जगभरातील मुलांनी तिच्या कृतीला पाठिंबा देण्यास सुरूवात केली. 2019 हे वर्ष 'बालकांचे वर्ष' ठरले. एका वर्षात जगभरातील मुलांच्या सक्रियतेमुळे 'पर्यावरण संकट' हा विषय ऐरणीवर आला. शास्त्रज्ञ ओरडून सांगत राहिले तरी त्यांचं  म्हणणं कुणाही पाॅलिसीमेकर्सनी कधीही मनावर घेतलं नाही. पण ग्रेटाच्या वादळानंतर जगभरातील मुलेच आपल्या भविष्याविषयी प्रश्‍न विचारू लागली. या लढ्यात मुलांसोबत शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. अशा सगळ्या घटनांची तपशीलवार माहिती पुस्तकात आहे. ग्रेटामुळे चळवळीत ओढल्या गेलेल्या ठिकठिकाणच्या मुलांच्या आंदोलनांची दखलही पुस्तकात घेतली आहे. अगदी 2019च्या सप्टेंबरमध्ये मुंबईतल्या ‘आरे’ वृक्षतोडीवरून उठलेल्या आंदोलनाविषयीदेखील तपशीलवार माहिती पुस्तकात येते. आरे वसाहत, तिथली वृक्षतोड, शाळेतील मुलांपासून वृद्धांचा विरोध, आरे वाचावा मोहिम, त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरण, शासनाची भूमिका असे सगळे अँगल्स या पुस्तकात आलेले आहेत.

पर्यावरणाविषयी असलेली ग्रेटाची तळमळ आणि ती करत असलेलं धाडस पुस्तकात सविस्तर वाचायला मिळते. शिवाय तिचा सम्यक दृष्टीकोन ही यात मांडलेला आहे. तिने केलेल्या भाषणांचा आधारही त्यासाठी घेण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर तिच्यावर होत असलेली टीकाही पुस्तकात आलेली आहे. ग्रेटाच्या आजारपणाविषयी किंवा 'ती कुणाच्या तरी हातची कळसूत्री बाहुली आहे' अशा तर्‍हेच्या टीकेवर तिचे म्हणून असणारे म्हणणेही पुस्तकात मांडण्यात आले आहे.

पुस्तकाचा मध्यवर्ती बिंदू ग्रेटा इतकंच पर्यावरण आहे. त्यामुळे पर्यावरणर्‍हास रोखण्यासाठी जगभर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी, कृतीशिलतेविषयीदेखील हे पुस्तक बोलतं. जागोजागी दाखल झालेल्या याचिकांकडेही लक्ष वेधतं. या याचिका आजी-माजी शास्त्रज्ञांनी दाखल केलेल्या आहेत. त्याला वयाने मोठ्या झालेल्या माणसांचा प्रतिसाद मिळत नाहीये मात्र लहान मुलं या याचिकांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. या तर्‍हेच्या विविध प्रयत्नांविषयी हे पुस्तक बोलतं. पर्यावरण बचावाच्या प्रयत्नासाठी नजीकच्या काळात घडलेल्या परिषदा, शास्त्रज्ञांची आंदोलनं, उठाव, अशा लहान मोठ्या प्रयत्नांची एकत्रित नोंद या पुस्तकाने घेतली आहे. पर्यावरणासंदर्भात झालेले करार आणि त्यांची वाताहत असेल किंवा पर्यावरणाचं होणारं राजकारण असेल त्याचा समाचारही पुस्तकात घेतला गेला आहे. पर्यावरणासारखा महत्त्वाचा तरी रुक्ष वाटू शकणारा हा विषय देऊळगावकरांच्या सोप्या आणि रंजक विवेचनामुळे वाचनीय झाला आहे.

पर्यावरण र्‍हासाच्या या पार्श्‍वभूमीवर ग्रेटा ही संधी आणि निमित्त आहे. पर्यावरण रक्षणासाठी ती देत असलेली आर्त ऐकण्याचीं आणि कृतिशील प्रतिसादाची जोड देण्याची गरज हे पुस्तक पानोपानी अधोरेखित करतं.

- हिनाकौसर खान
greenheena@gmail.com

ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना?
अतुल देऊळगावकर
मनोविकास प्रकाशन
पाने: 208
किंमत: 250 रुपये
 

हा व्हिडीओही पहा: 
लेखक अतुल देऊळगावकर सांगताहेत ग्रेटाच्या लढ्याची गोष्ट

Tags: पुस्तक परीक्षण ग्रेटाची हाक अतुल देऊळगावकर पर्यावरण हिनाकौसर खान-पिंजार ग्रेटा थुनबर्ग Book Review Greta Thunberg Atul Deulgaonkar Heenakausar Khan-Pinjar Load More Tags

Comments:

Sharvari kedar punde

I have read this book. This is very important book from our generations point of view. I recommend it should be included in today's curriculum also. Or at least parents should tell their kids to read. Realistic and eye opener.

मंजिरी देशमुख

हे पुस्तक मी दोन वेळा वाचले.. अतिशय अभ्यासपूणॅ हे पुस्तक लिहीले आहे.. ग्रेटाची गोष्ट आपल्या देशांतील लहान मुलांपयॅंत पोहचली पाहीजे.. शाळाशाळांमधून तिचे फोटो माहीती गेली पाहीजे..

Mrs. P. S. Chavan udupi

Greata the great. Let's follow her movement and support for great work.

Add Comment