आज 14 फेब्रुवारी. व्हॅलेन्टाईन दिन! प्रेमीजीवांचा दिवस! प्रेमाच्या पाठीशी उभा राहिलेला संत व्हॅलेन्टाईन इसवी सन 270 मध्ये फासावर गेला तो याच दिवशी... प्रेमाच्या बाजूनं उभं राहणंं आणि प्रेम करणार्या जीवांचं लग्न लावून देणं हाच काय त्याचा गुन्हा होता...! कालांतराने व्हॅलेन्टाईनचा मृत्यूदिवस 'प्रेमाचा दिवस' म्हणून मुक्रर करण्यात आला. पण म्हणून जगात प्रेम आणि प्रेमीजनांच्या सहजीवनाचा मार्ग सोपा झाला, असं नाही. इष्काला ‘आग का दरिया’ म्हणतात ते कदाचित याचसाठी.
भारतीय परिप्रेक्ष्यात विचार केला तर आपल्याकडे लग्नाला अनन्यसाधारण महत्त्वं. आपल्याकडे बहुतांश वेळा मुलगी वयात येत नाही... तर ती थेट लग्नासाठीच तयार होते आणि मग तिच्यासाठी शिक्षण-नोकरी-स्वप्नं याला काहीही अर्थ न उरता तिचं लग्न ‘उरकणे’ एवढंच सोपस्कर महत्त्वाचं ठरतं. मुलांच्याही बाबत असंच काहीसं. बऱ्याचदा तर कामधंदा-नोकरी-शिक्षण-स्वप्नं असं मुलाकडे काहीही नसलं तरी तो एका गोष्टीसाठी कायम पात्र असतो ते म्हणजे लग्न. उलट कंगालावस्थेत किंवा व्यसनाधीनतेत लग्न झाल्यास लग्नकर्त्याला आपोआप ‘अक्कल’ येते अशी पिढ्यानपिढ्या समजूत आहे... आणि या सगळ्या प्रक्रियेत ‘प्रेम’ या भावनेला नावापुरतासुद्धा थारा देण्याची कुणाला जरूर वाटत नाही. किंबहुना लग्न ठरवताना प्रेमाचा विचार केला जातो असं फारच कमी वेळा दिसतं.
आयुष्यभराच्या सहजीवनाची जिथं सुरुवात होणार आहे तिथं प्रेम-जिव्हाळा-ओढ-आकर्षण यांतलं काहीही असलं काय अन् नसलं काय काहीही फरक पडणार नाही, अशी आपली समाजरचना! लग्न, ज्यामुळं दोन व्यक्ती एकमेकांच्या आयुष्याचे भाग होणार आहेत...एक-दोन दिवस किंवा वर्ष नव्हे तर संपूर्ण आयुष्य शेअर करणार आहेत...त्याबाबतचा निर्णय विवेकी असावा. जोडीदाराची निवड समजून-उमजून व्हावी इतक्या मुलभूत अपेक्षाही समाज म्हणून आपण विचारात घेत नाही. नोकरीधंद्यासाठी लागणारी सगळी कौशल्ये आणि प्रशिक्षणं दिली जातात. पण सहजीवनासाठी लागणार्या कौशल्यांबाबत कुठलंही शिक्षण दिलं जात नाही. सहजीवनातील समज-समंजसपणा रुजेल, वाढेल, समतेचं मूल्य त्यात अंतर्भूत राहील आणि जगणं दिलखुलास आनंददायी होईल यासाठी शिकवणी घेण्याची, मार्गदर्शन देण्याची आपल्याकडे रीत नाही. सोयही.
आणखी एक गमंत म्हणजे, बघण्याच्या-ठरवून करण्याच्या लग्नाबाबत जिथं प्रचंड गोंधळ आहे तिथं स्वत:हून जोडीदार निवडणार्या..प्रेमविवाह करणार्या लग्नाबाबत विचित्र अढी मात्र असते. हा आकस तर आंतरधर्मीय विवाह असेल तर अधिकच. अशा लग्नाबाबत, सहजीवनाबाबत आपल्याला काहीही माहीत नसतं, कदाचित हेच त्या अढीमागचं मुख्य कारण असेल. आपल्याला अशा लग्नांविषयी कुतूहल असायला हरकत नसते. पण ग्रह-पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली अढी-आकस बाळगणे याला तसा काहीही अर्थ नाही. बर्याचदा आंतरधर्मीय लग्नाबाबत आपल्याजवळची माहिती देखील अपूर्ण आणि ऐकिव असते. त्याआधारे तयार होणारी मतं देखील घातकच असतात कारण त्यात सत्याचा अभाव असतो. कमकुवत मनाच्या व्यक्ती अशा मतांवर अंधविश्वास ठेवून द्वेष आणि हिंसेला बळी पडतात. काहीवेळा तर हिंसा घडवूनही आणतात.. त्यामागचा ट्रिगर भीती आणि अज्ञानच असते. वर्तमानकाळात तर अशा तर्हेच्या भीती आणि अज्ञानाच्या जागा दिवसेंदिवस वाढत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आंतरधर्मीय विवाहाबाबतचं कुतूहल शमविण्यासाठी आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांची मनोगतं ऐकणं योग्य ठरेल असं वाटू लागलं. त्यासाठी कर्तव्यवर एक लेखमाला घेऊन येत आहोत. या निमित्ताने धर्माच्या भिंती ओलांडून प्रेम करणार्या आणि ती निभावणार्या जोडप्यांकडून त्यांचे अनुभव वाचून आपली समज वाढवता येईल. आणि माहितीअभावी धार्मिक भेदांच्या जन्मलेल्या जाळ्यांवर फटकाही मारून पाहता येईल.
या लेखमालेत केवळ आंतरधर्मीय विवाहितांना समविष्ट करून घेतले जाणार आहे. आंतरजातीय विवाहितांना तूर्तास तरी नाही. अलीकडे आपल्या समाजात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढू लागले आहे. शिवाय कमी अधिक प्रमाणात त्याबाबत चर्चा घडवून आणली जाते. सध्यस्थितीत आंतरजातीय विवाहांचा काही प्रमाणात का होईना स्वीकारही वाढीस लागला आहे. तीच बाब आंतरधर्मीय विवाहांना अजून तरी लागू होत नाही. एकतर आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण ही फार कमी आहे आणि त्यांना सहज स्वीकारलेही जात नाही.
शिवाय महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये अशा विवाहांची स्थिती खूप भयानक आहे. तिथं अशा विवाहांना राजकीय वळण दिलं जातं. घटनेचं स्वरूप येतं आणि त्यांचा विवाह हा दोन व्यक्ती, कुटुंबाचा मामला न उरता काही राजकीय पक्ष, संस्था, संघटना त्या घटनांचा दुरुपयोग करतात. राजकारण करतात. अनेकदा नाटक सिनेमा किंवा उच्चभ्रू वर्गात आंतरधर्मीय विवाह होतात तेव्हा मात्र त्याबाबत फार वाद होत नाहीत. किंबहुना त्या वर्गात झालेले असे विवाह लक्षातही येत नाही. मात्र सर्वसामान्य, मध्यमवर्गात अशा स्वरूपाचे विवाह करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्रास सहन करावा लागतो. जोडप्यांचे अनुभव हे कितीही वैयक्तिक पातळीवरचे असले तरी तो एका अर्थाने तो त्या त्या काळचा राजकीय-सामाजिक आरसाच असेल. आणि ते सारे डॉक्युमेंट करण्याचा हा प्रयत्न राहणार आहे.
तर या लेखमालेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी अशा जोडप्यांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक-सांस्कृतिक पटलावरच्या शिवाय सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणार्या 15 ते 20 व्यक्ती या लेखमालेत भेटणार आहेत. या जोडप्यांनी सुरवातीच्या काळात परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी कशापद्धतीनं जुळवून घेतलं. त्यांच्या एकमेकांविषयीच्या, धर्माविषयीच्या समजूती मोडल्या अगर त्यात नव्या समजेची भर पडली, तर ती काय आहे. अशा तर्हेच्या सहजीवनात तुमच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सहजीवनाचा साधारण एक टप्पा ओलांडल्याने या लेखमालेतील मंडळी आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकतात. त्यामुळेच त्यांच्याकडून मिळणारं संचित हे अमूल्य असेल.
या लेखमालेचा उद्देश आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात एवढाच आहे. आजच्या भितीच्या काळात या अनुभवकथांतून तरूणांना आश्वस्त वाटावं. त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम, सहजीवनाविषयी मार्गदर्शन मिळावं ही सुप्त भावना आहे. शिवाय हे करत असतानाच आपल्या आसपास किती सहज धार्मिक अभिसरण होत राहतं हे चित्रं जात असेल तर ते आम्हाला हवंच आहे. एकीकडे सामाजिक अभिसरण होण्यासाठी असे विवाह व्हायला पाहिजेत हे सत्य आहे आणि दुसरीकडे त्यातले टक्केटोणपेही समजून घेतले पाहिजेत हेही खरे.
आजच्या प्रेमादिनाच्या निमित्तानं या नव्या लेख-मुलाखतींची ही भूमिका मांडणं संयुक्तिक वाटलं म्हणून हा सारा लेख प्रपंच. चालू वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील दुसर्या आणि चौथ्या रविवारी एकेका जोडप्याची मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. या मुलाखती एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरतील याची आम्हाला खात्री आहे.
जाता जाता इतकंच, कित्येक कविता/गीत/शायरीतनं आपण ऐकतो की प्रत्येकाच्या वाट्याला प्रेम मिळत नाही. प्रेम ही सार्वकालिक आणि सार्वत्रिक भावना असली तरी ती सर्वांच्याच ओंजळीत नाही. प्रेम करण्याचा जिगराही प्रत्येकाकडे नसतोच. त्यामुळंच नदीसारखं खोल आणि आकाशासारखं खुलं प्रेम करणार्या..समाजरचनेच्या निखार्यांवर स्वत:ला धगधगत ठेवून त्याच मंद आचेवर आपलं सहजीवन फुलवणार्या या कहाण्या नुसत्या कहाण्या नाहीत. त्या प्रेमाच्या निळाईनं भरलेल्या उत्कट आणि प्रेरक संघर्षगाथा असणार आहे..आपल्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरणार्या!
- हिनाकौसर खान (लेखमाला समन्वयक)
greenheena@gmail.com
Tags: प्रेम प्रेम विवाह प्रेम कथा love story inter faith marriage Load More Tags
Add Comment