अनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम

कुलसूम पारेख यांच्या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाच्या निमित्ताने... 

आपल्या आयुष्याचा खराखुरा लेखाजोखा मांडणं ही अतिशय कठीण बाब आहे. त्यातच जर तुमचं आयुष्य इतरांसाठी कायमच औत्सुक्याचं, सामाजिक चौकटी मोडणारं आणि कथित अर्थाने वादग्रस्त असेल तेव्हा तर हे काम आणखीच कठीण होऊन बसतं. पण ज्या बाईंनी उभं आयुष्यचं कमालीच्या धाडसानं जगलं असेल त्यांच्यासाठी आत्मकथन करणं ही बाब तशी क्षुल्लकच असणार. प्रा. कुलसूम पारेख यांचं 'उम्मे कुलसूम' हे आत्मचरित्र वाचताना अनेक ठिकाणी तशी जाणिव होत राहिली. उलट पुस्तक वाचताना सतत वाटत राहिलं, प्रचंड चढउतार आणि मानसिक वेदनांचा दाह सोसूनही मनासारखं जगण्याचं बळ या कुलसूमबींना कुठून मिळत असेल?

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि  85 वर्षांचं आयुष्य जगलेल्या-भोगलेल्या प्रा. कुलसूम पारेख यांचं 'उम्मे कुलसूम' हे आत्मचरित्र खरंतर एका शतकातली हिंदू-मुस्लिम नातेसंबंधातली नोंदवही आहे, असं म्हणायला हरकत नाही. चालू वर्ष प्रो. कुलसूम पारेख यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दीनिमित्त कुलसूमबी यांच्या 'कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन अग्नोस्टिक' या इंग्रजी आत्मचरित्राचा प्रमोद मुजूमदार यांनी मराठी अनुवाद केला आहे.

जूनागड संस्थानातील सामाजिक-राजकीय चळवळींनी प्रेरित असलेल्या मेमन कुटुंबात कुलसूमबी यांचा 1920 मध्ये जन्म झाला. त्याकाळी मेमन समाज अंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी असला तरी धार्मिक सांस्कृतिक-सामाजिक पातळीवर तो एक जमात म्हणूनच वावरत होता. शैक्षणिकदृष्ट्या तो मागसलेला होता. अशा या समाजात कुलसूम पारेख वाढल्या आणि नावारुपाला आल्या.

पुण्यात शालेय शिक्षण झाल्यानंतर कुलसूमबी यांनी मुंबईतील ईस्माईल युसूफ महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. 1940 मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी एम. ए. केले आणि पुढे 1945 मध्ये त्याच महाविद्यालयात त्या इतिहासाच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. फाळणीनंतर हे महाविद्यालय बंद पडण्याच्या अवस्थेत असताना, ते सुरु राहावे यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींमध्ये कुलसूमबी आघाडीवर होत्या. इतकंच नव्हे तर फाळणीच्या कालखंडात पाकिस्तानात त्यांना उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी चालून आल्यानंतरही त्यांनी ती डावलण्याची हिंमत दाखवली. 

मुंबईतील इस्माईल युसूफ महाविद्यालयात त्यांनी पस्तीस वर्षे अध्यापन केले आणि प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्या. मुंबई-पुण्यातले त्यांचे घर विद्यार्थ्यांसाठी कायमच खुले असायचे. अडी-अडचणीतले विद्यार्थी त्यांच्या घरी मुक्कामी असत. इंडियन सेक्युलर सोसायटी, मुस्लिम सत्यशोधक मंडळ या प्रखर सुधारणावादी संघटनांशी त्यांची नाळ जुळली होती. भारतात समान नागरी कायदा लागू करावा यासाठी त्या विशेष आग्रही होत्या. वाचन आणि वैचारिक परिपक्वतेला अनुषंगून घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना बरेचदा दहशतीला आणि धमक्यांना सामोरं जावं लागलं. वयाच्या उत्तरार्धातही त्या स्त्रीमुक्ती चळवळ, परिवर्तनवादी चळवळींमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत राहिल्या. पंच्याऐशी वर्षांच्या जीवनात त्या कायमच राजकीय, सामाजिकदृष्ट्या जागृत व्यक्ती म्हणून वावरल्या. 

कुलसूमबींच्या आयुष्याचा सर्वसाधारण गोषवारा इतकंच सांगून थांबवता येणार नाही. कुठलाही बडेजावपणा न करता धाडसी निर्णय घेत, सामाजिक चौकटींचा विचार न करत केवळ आपल्या मनासारखं त्या जगत राहिल्या, ते अजिबातच सहज नव्हतं. कुलसूमबींची कहाणी वाचताना वाटतं राहिलं की या बाई त्यांच्या काळातच नव्हे तर आजच्या काळातही काळाच्या पुढे होत्या. 

वयाच्या 21 व्या वर्षी त्यांचा विवाह अब्दुल सत्तार पारेख यांच्याशी झाला आणि काही वर्षांतच या नात्यातला फोलपणा त्यांना जाणवू लागला. दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक हिंदू ब्राह्मण व्यक्ती आली. लग्न व्यवस्थेतून ज्या प्रेमाची अभिलाषा त्या करत होत्या त्याची पूर्तता या व्यक्तीच्या रूपाने होईलंसं त्यांना जाणवू लागलं. मात्र त्यातही बर्‍याच अडचणी होत्या. ती व्यक्तीही विवाहित होती. साधारण एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या काळात एका मुस्लिम स्त्रीने उघडपणे एका हिंदू ब्राह्मणाच्या प्रेमात पडणं आणि त्यासाठी सततचा अपमान, बदनामी आणि मन डागाळणार्‍या निनावी पत्रांशी सामाना करणं किती अवघड असेल! त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होण्याआधी मैत्रीच्या काळातील एक आठवण त्या लिहीतात, 'दुर्दैवानं त्यावेळच्या राजकीय, सामाजिक वातावरणात एक ब्राह्मण पुरुष आणि मुस्लिम स्त्री यांच्या मैत्रीविषयी काही फार चांगलं बोलणं जाणं शक्यच नव्हतं.' अशा प्रसंगांशी त्यांचा रोजचा सामना होता. इतकंच नव्हे तर कुलसूमबींनी आपल्या पहिल्या नात्यातून स्वत:हून पुढाकार घेऊन सुटका करुन घेतली आणि पुनर्विवाह केला, त्यासाठीचा पुढाकार ही त्यांनीच घेतला.

काय ताकदीच्या बाई असतील या? गहजबीच बाई म्हणावं लागेल. आजही जिथं दोन धर्म आणि दोन जातींची माणसं एकत्र यायचा विचार होतो तिथं ऑनर किलींगसारखे प्रकार घडतात पण या बाईंनी त्या काळात आपल्या माहेरच्या-सासरच्या माणसांना जपत, त्यांची आर्थिक जबाबदारी स्विकारत, नव्या माणसाच्या कुटुंबाचाही भार पेलत आपलं प्रेम पुर्णत्वास नेलं हे सोपं नव्हतं. दुसर्‍या विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून प्रा. गुंजीकर या त्यांच्या दुसर्‍या पतीने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्विकारला. मात्र याबाबत गुंजीकरांच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. त्यांनी पुन्हा हिंदू होण्याचं मनावर घेतलं. अज्ञेयवादी असणार्‍या कुलसूमबींनी त्यांना मनाई केली नाही. रीतरिवाजांचं पालन न करणार्‍या व्यक्तीची उलघाल पाहून त्यांना हसू येत होतं. त्या लिहीतात, 'धर्मांतराबाबत गुंजीकरांच्या अशा अतार्किक वागण्याचं मला अजिबात कौतुक वाटलं नाही. खरंच माणूस कधीतरी विवेकी होईल का? देशाचे कायदे कधीतरी नि:ष्पक्ष आणि समतोल होतील का?'

कुलसूमबी या स्वत:विषयी, स्वत:च्या अपेक्षांविषयी पुरेशा जागरुक स्त्री असणार हे त्यांच्या चरित्रातून जाणवतं. संसारात आपल्याला काहीही किंमत नाही आणि आपलं कुठलंच अर्थार्जन नसल्याने आपण अगदीच शून्य ठरत आहोत हे लक्षात आल्यावर कुलसूमबींनी स्वयंपाकघरातून निघून थेट प्राध्यापकीचा स्विकार केला. शिक्षणानंतर पाच-सहा वर्षांचा खंड पडल्यामुळे ज्ञानावर जळमटं जमा झाली, तरी त्याची तमा न बाळगता त्यांनी कष्टानं आत्मविश्‍वास पुन्हा मिळवला. सामाजिक प्रतिष्ठेबाबत नव्हे तर शाररिक गरजांविषयीही त्या जागरूक होत्या. स्वत:च्या लैंगिकतेविषयी त्यांनी अतिशय खुलेपणाने मांडणी केली आहे. आपल्याला काय हवं होतं आणि काय मिळालं याबाबत आडपडदा न ठेवता त्या बोलतात. 

मुळातच निडर, पारदर्शी स्वभावाच्या कुलसूमबींनी आयुष्यात भेटलेल्या माणसांविषयीही खुलेपणाने लिहीले आहे. या माणसांच्या वागण्यात कालांतराने, कुठल्याही कारणाने फरक पडला तरी त्यांच्यासोबतच्या प्रारंभीच्या आठवणी लिहीताना त्यांनी त्यांचा चांगुलपणा नक्कीच मान्य केला आहे. यात अगदी ज्या नवर्‍याने त्यांना सतत छळलं, त्यांचंही श्रेय अमान्य केलेलं नाही. यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व लक्षात येतं. 'माझ्या विचारातील सेक्युलर राष्ट्रवादी विचारांच्या रोपणाचे श्रेय निश्‍चितपणे सत्तारचे आहे. त्यात गुंजीकरांचा काहीही सहभाग नाही. उलट 'मी स्वत: आधी एका विवेकवादी म्हणता येईल अशा मुस्लिम पुरुषाशी लग्न केले आणि नंतर एका मुस्लिमविरोधी म्हणता येईल अशा हिंदू पुरूषाच्या प्रेमात पडले!' कायमच मुस्लिमद्वेष करणार्‍या पुरुषासोबत राहूनही कुलसूमबी प्रा. ए. बी. शहा आणि हमीद दलवाई यांच्या विचारांनी प्रेरित होत राहिल्या. त्यांच्या कामात सहभागी होत राहिल्या. हा संघर्षही त्यांनी ताकदीनं पेलला असणार.

पुस्तकात हिंदू-मुस्लिम संबंधांचेही कुलसूमबी यांनी विवेचन केले आहे. 'मी हिंदू पुरुषाबरोबर राहते म्हणून मुस्लिमांनी मला धर्मांतरीत ठरवलं आणि हिंदू मला 'राष्ट्रीय मुसलमाना'चा बुरखा घेतलेली पाकिस्तानी हेर म्हणत!' या म्हणण्यातल्या वेदना त्यांना कायम दुखावत राहिल्या. मुस्लिम समाजाविषयी व प्रश्‍नांविषयी त्यांना आस्था होती. एके ठिकाणी त्या म्हणतात, 'मी मुसलमानांचा नेहमीच आवश्यक असेल तेव्हा उघडपणे धिक्कार केला. तरी अनेकवेळा काही बाबतीत त्यांना मी सहानुभूतीही दाखवते, त्यांना समजून घेण्याचाही प्रयत्न करते. मला वाटतं मुस्लिम त्यांच्या वेडगळ चुकीच्या कल्पनांमुळे नीट विचार करू शकत नाहीत. मुस्लिमांना भारतातच चांगले भविष्य आहे हे येथील मुस्लिम समजू शकत नाहीत. मुस्लिमांनी त्यांच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री नेत्यांवर विश्‍वास ठेवत आपली वेगळी ओळख जपली आणि सवतासुभा चालूच ठेवायचं ठरवलं तर ते आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतील.'  

कुलसूमबींचा हा सर्व प्रवास वाचताना सतत वाटत राहिलं, की त्यांना प्रेम मिळालं तरी त्या कायमच एकट्या होत्या. त्या एकट्याच सर्व आघाडींवर लढत होत्या. जाहीरपणे प्रेम करण्याचं बळही त्यांच्याकडेच होतं आणि त्याला मूर्त रुप देण्याची ताकदही. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्तरावरही त्यांना आधार देणारं कुणीही नव्हतं. गुंजीकर सोबत होते तरीही. सगळ्या तर्‍हेची धावपळ ही स्त्री एकटीच करत होती. एके ठिकाणी त्यांनीच लिहीलं आहे की, 'माझ्या मते, सामजिक परिस्थितीला तोंड देण्याच्या बाबतीत पुरुष बरेचसे भेकड असतात.' हे त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांच्या अनुभवांतूनच आले असणार! त्यामुळे हे कथन स्त्रीच्या ताकदीचा वस्तुपाठ मांडत असूनही मनात कुठंतरी करूणादेखील निर्माण करतं.

कुलसूमबींनी आपलं आयुष्यकथन 1976 पर्यंतचेच केलेलं आहे. मात्र गुंजीकरांच्या मृत्यूनंतर पुढे कुलसूमबींच्या आयुष्यात एक स्थित्यंतर आलं. निकटच्या एकमेव व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. साधारण ऐंशीच्या दशकातील ती गोष्ट. स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले तरी ते अजून रुजले नव्हते त्या काळात अत्यंत समंजसपणे अभय कांता या तरुणाबरोबरचे त्यांचे सहजीवन अनेक विचारशील माणसांच्या आकलनापलिकडे होते. त्या सहजीवनाचं खुद्द अभय कांता यांनी कथन करून कुलसूमबींच्या आयुष्य कथानाचा तो टप्पाही उलगडा आहे. त्यामुळे  'उम्मे कुलसूम' मधील कथनाला आपोआपच एक परिपूर्णता लाभली आहे.

'मी नेहमीच अनेक लढाया हरत राहते, शेवटी युद्ध मात्र जिंकते.' असं म्हणणार्‍या कुलसूमबींनी खरंच त्यांच्या आयुष्याचं युद्ध जिंकलं. आपल्या तात्विक भूमिकांचे अवडंबर न माजवता, मनाला पटलेल्या मूल्यांचा स्विकार करून त्यांनी त्यांचं आयुष्य भरभरून जगलं. त्यासाठी त्यांनी बरीच मोठी किंमत मोजली. पण मनासारखं आयुष्य, प्रेम, सहजीवनाच्या मोबदलत्यात ती किंमत कवडीमोलच असणार यात शंका नाही! आणि हे सारं मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

या पुस्तकात एकच कमतरता जाणवली, ती म्हणजे कुलसूम पारेख यांच्या वादळी आयुष्याचा वेध घेणारी छायाचित्रे पुस्तकात नाहीत. किमानपक्षी कुलसूम पारेख यांचा एखादा तरी फोटो असायला हवा होता, असं सतत वाटत राहिलं. 

- हिनाकौसर खान
greenheena@gmail.com

उम्मे कुलसूम - कुलसुम पारेख
अनुवाद - प्रमोद मुजूमदार
सायन प्रकाशन
पृष्ठे- 299, किंमत- 400

Tags: पुस्तक परीक्षण हिनाकौसर खान- पिंजार कुलसुम पारेख हमीद दलवाई मुस्लीम सत्यशोधक मंडळ इस्लाम मुस्लीम आत्मचरित्र Book Book Review Heenakausar Khan- Pinjar Kulsum Parekh Hamid Dalwai Muslim Satyashodhak Mandal Autobiography Biography Load More Tags

Comments:

दत्ताराम जाधव

हे पुस्तक संग्रही असायला हवे आणि वाचायला हवेच

लतिका जाधव

मुळात पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाढली. धन्यवाद.

Add Comment