• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • लग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    सिनेमा लेख

    लग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग

    'लव्ह अ‍ॅन्ड शुक्ला' या सिनेमाच्या निमित्ताने...

    • हिनाकौसर खान
    • 13 Jun 2021
    • 2 comments

    सौजन्य:नेटफ्लिक्स

    प्रेमाचा आणि लग्नाचा तसा काहीही संबंध नसतो हे आता सर्वश्रुत आहे.  प्रेमाची परिणती लग्नात होतेच असं नाही आणि व्हायलाच हवी असंही नाही, इथवर प्रेमाच्या आणि लग्नाबाबतच्या संकल्पनेत मोकळेपणा आलाय. मुळात प्रेम ही भानगड असते तरी काय? एखाद्यासाठी प्रेमाची जी व्याख्या असेल तीच दुसर्‍यासाठीही असेलच असंही नाही म्हणजे प्रेम ही अमुक एक गोष्ट आहे... त्याचा रंग, आकार, वास तमका आहे असं नेमकंसं, नीटसं उलगडून सांगता येतंच कुठं? ते काहीतरी मनाशी-हृदयाशी संबंधित असतं किंवा कदाचित मेंदूशी किंवा संप्रेरकांशी. ते काही का असेना पण शरीरात काहीतरी गोड उलथापालथ जाणवणं, समोरच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि त्या सार्‍या प्रक्रियेनंच आनंदित आनंद होत राहणं अशाच कशाकशाला तरी प्रेम म्हणत असतील किंवा या सगळ्या ‘वाटण्या’चा प्रेमाशी तरी संबंध असेल. हे काय गोल गोल जिलेबीसारखं सुरूये असं वाटत असेल पण जे सरळ, स्पष्ट, सोप्पं नाहीच ते एकरेषीय सांगणार तरी कसं?

    लग्नाचा प्रेमाशी काहीही संबंध नसला तरी तो नसावा असं कुणालाही वाटत नाही. हं... म्हणजे प्रेम आणि लग्न या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे कितीही सत्य असलं तरी प्रत्येकच जण काही प्रेमात पडत नाही. मनात प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी तशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी लागते. प्रेमात पडणं किंवा एखाद्याविषयी प्रेम वाटण्यासाठीसुद्धा तसा मोका आपल्या आयुष्यात यावा लागतो. स्त्री-पुरुष प्रेमसंबंधासाठी (इथं याच मर्यादित अवकाशात बोलत असल्यानं) पहिल्याप्रथम स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची, वेळ घालवण्याची, सहवास घडण्याची संधी तरी मिळावी लागते. बर्‍याचदा ही मूलभूत गोष्ट बहुतेक स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातून वजा असते. अगदीच जरी ओळखीपाळखी, सहवास आणि मैत्री वगैरे असली तरी त्याच्यापैकी कशाचंच प्रेमात रूपांतरण झालेलं नसतं. संस्कार नावाची भानगडही काही वेळा त्याला जबाबदार असते. प्रेम होऊ नये यासाठी लहानपणापासूनच संस्कारांचं मनाभोवती वेष्टण पडलेलं असतंच. त्या वेष्टणातून मनाला बाहेर काढेपर्यंत घरच्यांनी दोनाचे चार केलेले असतात.

    अशा ठरवून केलेल्या लग्नातही अत्यंत सॉलीड केमिस्ट्री असणार्‍या, सर्वोतपरी एकमेकांना ओळखणार्‍या-जाणणार्‍या, एकमेकांवर भरभरून प्रेम करणार्‍या असंख्य जोड्या आपल्याभोवती दिसतात. बहुतांश माणसं आपापल्या जोडीदाराशी साध्या, सरळ तर्‍हेनं घट्ट जोडून घेतात. एकमेकांत घट्टमुट्ट विरघळून जातात. एकमेकांना जपत, एकमेकांची काळजी करत छान संसार करतात. भांडणांवर, रुसव्याफुगव्यांवर प्रेमाचाच उतारा करतात. अत्यंत अनोळखी असलेल्या माणसाशी असे एकरूप होतात की, जणू ते अनोळखी नव्हतेच एकमेकांसाठी. एकमेकांची ही अशीच साथसोबत प्रामाणिकपणे देत-देत कधीतरी त्यातली एक व्यक्ती दुसर्‍याला एकटं करत एकट्यानंच निघूनही जाते. इतकं सॉलीड बाँडिंग प्रेमाशिवाय झालेल्या लग्नानंतरच्या नात्यात दिसतं आणि मग वाटतं की, लग्नाचा आणि प्रेमाचा संबंध नाहीचयेऽ असं तरी कसं?

    थोडक्यात काय तर आपल्याकडे (अन्यत्रही असावं) बर्‍याचदा बर्‍याच जणांच्या आयुष्यात प्रेमाचा शिरकाव लग्नाच्या मांडवातूनच होतो. तोवर बर्‍याच जणांचा प्रेमाशी कुठलाही संबंध आलेला नसतो. प्रेम करायची, प्रेमात पडायची अब्जावधी इच्छा असली तरी तसं कुणी भेटलेलं नसतं आणि काही वेळा तर लग्नानंतरच प्रेम होतं या बेभरवशाच्या भावनेवर भरवसा ठेवलेला असतो. अगदी आयुष्यभराचा जोडीदार निवडतानाही प्रेम नसलं तरी भविष्यात अशा विशिष्ट व्यक्तीसोबत राहून प्रेम वाटू शकेल का  ही शक्यता चाचपडण्याचं, एक्स्प्लोर करण्याचं मनावरच घेतलं जात नाही त्यामुळं लोक प्रेमाचा शोध घेण्यापेक्षा सामाजिक चौकटीत लग्नाचं अधिष्ठान मिळवून मोकळे होतात.

    ...आणि पुढं, लग्न केलेल्या व्यक्तीविषयी आधी कुठलीही भावना नसली, काहीच वाटत नसलं तरी हळूहळू सोबत राहून, एकमेकांना ओळखत, जाणत, उलगडून घेत-घेत एकमेकांचे होऊन जातात म्हणजे टेक्निकली हे प्रेम असतं का आणि मुळात प्रेमाची टेक्नॅकॅलिटी असतेच काय? आणि हे प्रेम नसेल तर मग हे काय असतं? उफ्ऽ प्रेमाच्या अडीच अक्षरांची उकल करण्याच्या भानगडीत न पडता या सगळ्या प्रक्रियेलाच प्रेम म्हणू यात की त्यापेक्षा. प्लीज आता इथं मन मारून, आता केलंच आहे आणि झालंच आहे लग्न म्हणून स्त्री-पुरुष एकत्र राहतात, तसं भासवतात असं काहीही म्हणू नका कारण अशा तडजोडीच्या जोडप्यांविषयी बोलत नाहीचये. मनापासून जे या प्रक्रियेचा भाग होतात आणि प्रेम करतात त्यांच्यासंदर्भातच ही सगळी बडबड आहे.

    अगदीच मजेशीर आणि न आकळणारं आहे हे... समोरच्या व्यक्तीविषयी अज्ञान, मनाची पाटी कोरी आणि म्हणून भावनाही शून्य अशा स्थितीतून बदलत-बदलत पुढं मग आतूनबाहेरून ओळखण्यापासून मनावर अधिराज्य गाजवण्यापर्यंतचा आणि शारीर जवळकीतेच्या पुढं जाणारा हा प्रवास असतो. काय अफलातून मजा असेल या प्रवासात! 

    हे सगळं असं सांगण्याचं कारण 2017मध्ये आलेला ‘लव्ह अ‍ॅन्ड शुक्ला’ हा सिनेमा. सिद्धार्थ जाटला आणि आमंडा मुने यांनी लिहिलेला आणि सिद्धार्थनं दिग्दर्शित केलेला. या सिनेमात सहर्ष कुमार शुक्ला आणि तानिया राजावत हे मुख्य भूमिकेत आहेत आणि या दोघांनी शारीरिक-भावनिक पातळीवर अत्यंत कच्चे (रॉ) असलेल्या शुक्ला आणि लक्ष्मी यांची पात्रं तितकीच अनघड, कच्ची उभी केली आहेत. यांच्यासोबत हिमा सिंग, अपर्णा उपाध्याय आणि लोकनाथ तिवारी हे कुटुंबियांच्या भूमिकेत आहेत. 

    ‘लव्ह अ‍ॅन्ड शुक्ला’मध्ये नुकतंच लग्न झालेला रिक्षा ड्रायव्हर मनू शुक्ला आणि त्याची लाजरी, अबोल बायको लक्ष्मी अशा दोघांच्या लग्नातल्या नव्या-नव्या अवघडलेपणाची गोष्ट आहे. मुंबईच्या चाळीतल्या वन आरकेमध्ये आईवडलांसोबत राहणारं हे जोडपं. लग्नाआधी कसलीही ओळख नाही, बोलणं नाही, एकमेकांविषयी काहीच माहिती नाही, स्वभाव माहीत नाहीत की आवडीनिवडी. यांवर कडी म्हणजे नवीन जोडपं म्हणून त्यांना रात्रीसाठीसुद्धा वेगळी स्पेस नाही. आईवडलांच्या आणि सासरहून भांडून आलेल्या बहिणीच्या बिछान्यासोबतच मध्ये दोन सुटकेसचं पार्टिशन टाकून दिलेली जागा तेवढी त्यांच्या पदरी.

    प्रेम करायला माणूस मिळत नाही तसं शरीरसंबंधांसाठीही... म्हणून तर आपल्याकडे स्पर्शाचा, शारीर आनंद घेण्याचा भक्कम आणि समाजमान्य मार्ग कोणता तर लग्न. तर नव्या नवर्‍यालाही आपल्या बायकोला किमान स्पर्श करायचा असतो पण त्याचा हात पोटावरून सरकत छातीच्या दिशेने जाऊ लागतो तशी ती दचकते, घाबरते, किंचाळून उठते. मग बराच वेळ थरथरत राहते. तिच्या भेदरलेल्या अवस्थेकडं पाहून सासू तिला आपल्या जवळ घेऊन झोपते. दुसर्‍या दिवशी नवर्‍याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटते. तो तसं तिला बोलूनही दाखवतो. माफीही मागतो. अर्थात हे सारं तो प्रत्यक्ष नव्हे फोन करून सांगतो. घरातल्या माणसांमुळं, अपुर्‍या जागेमुळं त्यांना बोलण्याची सोयही नाही. त्याच्या माफी मागण्यावर, बोलण्याची सोय नाही अशी खंत व्यक्त केल्यावरही तिला काय बोलावं हे सुधरत नाही. ती नुसतीच ऐकत राहते. आपला नवरा नेमका कसा माणूस आहे याची तिला अजून ओळख पटलेली नसल्यानं ती गोंधळलेली असते.

    पुढं मग एक दृश्य आहे. आईवडील-बहीण बाहेर जाणार हे माहीत होताच मनू कामावर जाण्याचं नाटक करून घरी परत येतो. तिला थेट एका हॉटेलरूमवर घेऊन जातो. दोन तासांचे हजार रुपये मोजतो. त्याआधी तिच्यासाठी मेकअपचं आणि तिला चित्रं काढायला आवडतं म्हणून चित्रकलेचं असं काही सामानही खरेदी करतो. सिनेमातल्या तोवरच्या घडामोडींवरून तो तिला रूमवर घेऊन जातो त्या प्रयोजनाविषयी आपण एक अंदाज बांधलेला असतो आणि त्या अपेक्षित अंदाजाला एक अनपेक्षित धक्का बसतो तेव्हा आपला अंदाज चुकला असं वाटून हिरमोड होत नाही. उलट मजाच येते. रूममध्ये लक्ष्मी अवघडून बसलेली असते. मनू चेहर्‍यावर पाणी मारून येतो. तिच्या शेजारी बसतो आणि तिच्याशी अडखळत, अंदाज घेत बोलायला लागतो, ‘आप ठीक है? आपको डरवर तो नहीं लग रहा? ...मैं आपको बस इसलिए लाया की मुझे आपसे बात करनी थी । मुझे पता है कि, आप बहुत अच्छी लडकी हो मगर आप मेरे बारे में क्या सोचती हो मैं नहीं जानता... बस इतना कहना चाहता हूँ, मैं आपको खूश रखूँगा... मुझसे या मेरे घरवालों से आपको डरने की जरूरत नहीं ।’

    ती उत्तरात हलकीशी होकरार्थी मान हलवते. काहीच बोलत नाही. मग तो तिला आणलेल्या भेटवस्तू देतो, बांगड्या भरतो. टीव्ही लावू का म्हणून काही वेळानं विचारतो आणि तिच्या होकारावर तो टीव्ही चालू करतो. ते बदनाम हॉटेल असल्यानं पुढं मग पोलीस येऊन धडकतो आणि त्याची धुलाई करतो. ती रडत राहते. ती अर्थातच मनूसाठी रडत नसते. त्या सगळ्या प्रसंगानं घाबरून, पोलिसांच्या विचित्र प्रश्‍नांनी भेदरून रडते.

    सुरुवातीला नवर्‍याचं मन राखावं म्हणून लक्ष्मी त्याच्यासोबत रूमवर गेलेली असते. प्रवाहाप्रमाणे वाहत राहायचं इतक्या साध्या पद्धतीनं ती वागत राहते. तिच्या मनात मनूविषयीच्या कुठल्याच भावना जन्मलेल्या नसतात म्हणजे अगदी काळजी किंवा सहानुभूतीही... पण पुढं बरंच काही घडतं आणि मग ती एका प्रसंगात त्याच्या दुखण्यानं कळवळून रडत-रडत म्हणते, ‘हमें आपके बारे में कुछ भी पता नहीं ।’ आणि तो उत्तरात म्हणतो, ‘तो जान लीजिये ।’

    लग्नातून प्रेमाकडं जाणारा मार्ग म्हणतेय तो असाच असेल ना... अशाच कुठल्या-कुठल्या प्रसंगांतून दोन अनोळखी माणसं एकमेकांना जाणून घ्यायला उत्सुक होत असणार आणि मग त्यातूनच अलगद एकमेकांमध्ये गुंतत असणार...! साधीसरळ माणसं. जीवनाच्या गाड्याशी जुंपून घेतलेली. निरनिराळ्या संकटांतून, चणचणीतून, अडीअडचणींतून मार्ग काढत पुढं जाणारी आणि गाठीशी असं मधुर साथ देणारं नातं असलेली. सहजपणे जोडीदाराचं मन जपणारी. प्रेमात असल्याचा, प्रेम करत असल्याचा कुठलाही अभिनिवेश न ठेवता लग्नात-प्रेमात स्वतःला झोकून दिलेली.

    सुरुवातीला लग्नसंबंध प्रस्थापित करण्यासाठी बेचैन असलेला आणि पुढं आपण आपल्या पत्नीला आधी समजून घ्यावं, तिचं मन जाणावं, तिला खूश करावं यासाठी धडपडणारा नवरा... तोही तिच्या प्रेमात पडलेला नाही पण बोलावं, वेळ घालवावा असं मात्र त्याला मनापासून वाटतंय... आणि काही काळानं तीही तुला जाणून घ्यायचंय म्हणत मनापासून पुढाकार घेणारी... हा प्रवास सुंदर आहे. प्रेमात आकर्षण आणि ओढ असावीच लागते. लग्नानंतर अशा तर्‍हेचे मोमेंटस गोळा करत, त्या क्षणांचा सोहळा करत कित्येक जोडपी प्रेमात बुडून जातात. कुटुंबीयांनीच ठरवून दिलेला जोडीदार असतानाही त्याच्याशी मनानं मनापासून जुळणारी माणसं पाहिली की अरेंज मॅरेजही सुखद वाटायला लागतात.

    सिनेमात केवळ मान डोलवून होकार-नकार देणारी नायिका सिनेमाच्या फारच कमीवेळा बोलते. फक्त एकाच सीनमध्ये दोनचार वाक्यं बोलते. तेही आत्ताच पंख फुटू लागलेल्या फूलपाखरासारखी... किंचितसं अवघडत, विचारपूस करत, काहीसं हसत... ते ऐकताना तर बावीस-तेवीसच्या वयात नुकतंच लग्न झालेली लाजरी-शांत-घुमी अशी आपण पाहिलेली एखादी तरी वधू आपल्या डोळ्यांसमोर तरळतेच. सर्वसामान्य आयुष्य जगणार्‍या शुक्लाच्या आयुष्यात भलेबुरे बरेच प्रसंग येतात. त्यांतूनच प्रारंभीचं असणारं दोघांचं भाबडेपण, अवघडेलपण जाऊन मैत्री, संवाद, सोबतीची ओढ देणारा प्रवास दोघांकडून घडतो. मग प्रेमाचा आणि लग्नाचा संबंध आहे असंच म्हणावंसं वाटतं. सिनेमा सुरुवातीपासूनच संथ गतीनं पुढे सरकतो. संवादांमध्ये दीर्घ पॉजेस आहेत. काही ठिकाणी तर केवळ संगीत. असं असूनही ती संथ लयबद्धता टाळावी वाटत नाही...!

    Tags: सिनेमा लव्ह अ‍ॅन्ड शुक्ला सहर्ष कुमार शुक्ला तानिया राजावत सिद्धार्थ जाटला हिनाकौसर खान cinema love and shukla saharsh kumar shukla taniya rajawat Siddharth jatla heenakausar khan हिनाकौसर खान-पिंजार हिनाकौसर खान पिंजार Load More Tags

    Comments:

    Alfiya nadaf

    Diii.....amazing...and exactly true lines...wow

    Jun 22, 2021

    Shantaram Bhuravne

    छान लिहिलय. आमचंही अरेंज मॅरेज आहे. सुरवातीला शारीरिक जवळीक आणि नंतर प्रेम भावना वाढीस लागते. सहवासाने प्रेमाचे बंध निर्माण होतातच. सुरवातीचे काही दिवस एकमेकांचा अंदाज घेण्यात जातात. पण नंतर तुम्ही सरळमार्गी असाल तर विश्वास आणि प्रेम नक्कीच निर्माण होतं.

    Jun 13, 2021

    Add Comment

    संबंधित लेख

    इंग्रजी

    Hellaro: A journey from suppression to expression

    Abhishek Shah 08 Nov 2019
    ऑडिओ

    गिटारचा ध्यास घेणारी धुनु

    मृद्‌गंधा दीक्षित 20 Oct 2022
    लेख

    जोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात

    हिनाकौसर खान 21 Dec 2021
    लेख

    जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग : प्रेक्षकांवर स्वार होणारा चित्रपट

    नीलांबरी जोशी 12 May 2022
    लेख

    काश्मीरच्या अर्धवट फाईल्स (पूर्वार्ध)

    कलीम अजीम 22 Mar 2022

    लेखकाचे इतर लेख

    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    ऑडिओ

    सांग वू आणि त्याची आजी

    हिनाकौसर खान
    19 Oct 2022
    ऑडिओ

    पूर्णा मलावत (तेलंगणा) : तांड्यातून एव्हरेस्टवर

    हिनाकौसर खान
    29 Apr 2022
    वृतांत

    मराठी संशोधन मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष 

    हिनाकौसर खान
    02 Feb 2022
    लेख

    बोलती हुई औरतें...

    हिनाकौसर खान
    18 Jan 2022
    लेख

    जोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात

    हिनाकौसर खान
    21 Dec 2021
    ऑडिओ

    ऑडिओ : मोहम्मदला दिसलेले रंग | चित्रपट - कलर ऑफ पॅराडाईज

    हिनाकौसर खान
    23 Oct 2021
    ऑडिओ

    ऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी

    हिनाकौसर खान
    09 Sep 2021
    लेख

    शिक्षणातला डिजिटल डिव्हाईड कमी करणारा कम्युनिटी रेडिओ 'विश्वास 90.8' 

    हिनाकौसर खान
    08 Sep 2021
    लेख

    लग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग

    हिनाकौसर खान
    13 Jun 2021
    लेख

    घटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील!

    हिनाकौसर खान
    05 Mar 2021
    लेख

    कोरोनाकाळातील सांप्रदायिकरण

    हिनाकौसर खान
    20 Feb 2021
    लेख

    धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या

    हिनाकौसर खान
    14 Feb 2021
    व्यक्तिवेध

    ‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील

    हिनाकौसर खान
    22 Jan 2021
    परिचय

    पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक

    हिनाकौसर खान
    08 Jun 2020
    लेख

    अनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम

    हिनाकौसर खान
    30 Mar 2020
    रिपोर्ताज

    पुण्याचं शाहीन बाग

    हिनाकौसर खान
    14 Feb 2020
    कथा

    मुमताज

    हिनाकौसर खान
    07 Jan 2020
    लेख

    हेल्लारो- गरब्यातून स्त्री मुक्ती मांडणारा चित्रपट

    हिनाकौसर खान
    09 Nov 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....