बेगम रुकय्या: फुले दाम्पत्याचा बंगाली वारसा

कर्तव्य साधना

जोतीबा आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीदास्यमुक्तीसाठी आपले आयुष्य वेचले. समाज सुधारणेतील स्त्री शिक्षणाचे महत्त्व सर्वप्रथम ओळखले ते फुले दाम्पत्याने. पुण्यात मुलींची शाळा सुरु केल्यावर सावित्रीबाई तेथे शिकवू लागल्या तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आपले समाजकार्य सुरु ठेवले. या दोघांच्या कार्याशी साधर्म्य राखणारी बंगाली स्त्री म्हणजे रुकय्या सखावत हुसेन. सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (11 मार्च) रुकय्याच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख.  

1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव करून इंग्रजांनी बंगालवर आपली सत्ता प्रस्थापित केली. (आणि पुढच्या शंभर वर्षांतच संपूर्ण भारतीय उपखंड त्यांच्या ताब्यात आला.) पुढे प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी 1773 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. त्यांच्या प्रशासनाची भाषा अर्थातच इंग्रजी होती. त्यामुळे प्रशासकीय नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने अनेक हिंदूंनी इंग्रजी शिकण्याची उत्सुकता दाखवली आणि बंगालमध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली.

कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आपल्या घरी युरोपियन आणि हिंदू ‘भद्रलोक’ (विचारवंत) मंडळींची एक बैठक बोलावली. हिंदू समाजातील मुलांना आधुनिक आणि उदारमतवादी शिक्षण देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. बैठकीला उपस्थित असलेल्या राजा राम मोहन रॉय यांनी या ठरावाला पाठींबा देत संपूर्ण सहकार्याची तयारी दाखवली आणि यातूनच पुढे 1818 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना झाली.

युरोपमध्ये ‘एज ऑफ एनलाईटंमेंट’ अर्थात ज्ञानोदयाचे युग अंतिम टप्प्यात होते. तेथील व्यक्तीस्वातंत्र्य आणि समानता ही मुल्ये इंग्रजी शिकलेल्या बंगाली हिंदूंनी आत्मसात केली. त्यातूनच राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर या ‘भद्रलोक’ मंडळींनी भारतीय प्रबोधनाचा पाया रचला. आधुनिक शिक्षणामुळे हिंदूंच्या पहिल्या पिढीने रूढी परंपरा आणि स्त्रियांचे प्रश्न यांवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती. सतीप्रथा आणि बालविवाह यांविषयी कायदे करण्यास इंग्रजांना भाग पाडले.

1835 मध्ये प्रादेशिक भाषांमधील शिक्षणातील सवलती बंद करणारा कायदा येईपर्यंत मुस्लीम समाज इंग्रजी शिक्षणापासून फटकूनच राहत होता. इंग्रजी शिक्षण म्हणजे आमच्या मुलांचा धर्म भ्रष्ट करण्याचे मिशनरी प्रयत्न असल्याचा आरोप ही मंडळी करत होती. मात्र नव्या कायद्यामुळे इंग्रजी भाषेविषयी असणारी कटुता कमी करून ही भाषा आत्मसात करण्याशिवाय मुस्लीम समाजापुढे गत्यंतर नव्हते. त्यामुळे इंग्रजी शिक्षण घेणारी मुस्लीम पिढीही बंगालमध्ये उदयास येऊ लागली होती.

‘स्त्रीहक्कासाठी लढणारे पुरुष’ हे त्यावेळच्या भारतीय प्रबोधनाचे स्वरूप असले तरी मुस्लीम समाजातील चित्र मात्र याहून वेगळे होते. मुस्लीम समाजात इंग्रजी शिक्षण केवळ मुलांना दिले जात असे. मुलींसाठी बंगाली आणि उर्दू या दोनच भाषांतून शिक्षण दिले जात असे. हिंदुप्रमाणेच मुस्लीम पुरुषही इंग्रजी शिकत असले तरी धर्म सुधारणा आणि स्त्रीप्रश्नांना त्यांनी हात लावला नाही. एकीकडे हिंदू स्त्रियांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना; त्यांचे जीवन सुकर करणारे, दास्यातून मुक्ती करणारे कायदे होत असताना मुस्लीम समाजातील स्त्रियांचे प्रश्न मात्र दुर्लक्षितच राहिले होते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या समाजातील स्त्रियाच पुढे आल्या. रुकय्या बेगम हे त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे नाव. 

बंगालमधील रंगपूर येथे 09 डिसेंबर 1880 रोजी रुकय्याचा जन्म झाला. तिचे वडील जहिरुद्दिन उच्चशिक्षित होते. त्यांना इंगजी आणि बंगाली या दोन्ही भाषा येत. तिच्या चार भावंडांपैकी दोन भावांना इंग्रजी शिक्षण मिळत असे, मात्र तेव्हाच्या रिवाजाप्रमाणे रुकय्याला धार्मिक शिक्षणावरच समाधान मानावे लागे. तिचा मोठा भाऊ इब्राहीम तिला गुपचूप इंग्रजीचे धडे देऊ लागला. या भावाकडूनच ती इंग्रजी शिकली. रुकय्यातील बंडखोरी आणि प्रतिभा यांचा प्रत्यय भावाला आला होता त्यामुळे तिला उदारमतवादी पती मिळावा यासाठी भावाने खूप प्रयत्न केले आणि त्याला यश आले. इंग्रजी अधिकारी असलेल्या सखावत हुसेन यांच्यासोबत वयाच्या सोळाव्या वर्षी रुकय्याचे लग्न झाले.

रुकय्या लग्नानंतर सखावत हुसेन यांच्यासोबत बिहारमधील भागलपूर येथे आली. या काळात तिच्या विचारांना आणि कल्पनांना पंख फुटू लागले. बंगालमधून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांमध्ये तिचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. सखावत हुसेन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना रुकय्या लिहिते, ‘नवऱ्याचे सहकार्य मिळाले नसते तर मी लिहिण्याची हिम्मत करू शकले नसते’. पडदा पद्धती, स्त्री पुरुष समानता असे अनेक महत्त्वाचे विषय तिने आपल्या लेखांतून हाताळले. 1904 मध्ये तिच्या लेखांचा संग्रह ‘मोतीचूर’ या नावाने प्रकाशित झाला.

सरोजिनी नायडू संपादिका असलेल्या ‘द लेडीज मॅगझीन’ या प्रतिष्ठित नियतकालिकात रुकाय्याची ‘सुलतानाचे स्वप्न’ ही दीर्घकथा प्रसिद्ध झाली. एका वेगळ्या विश्वाची कल्पना या कथेत करण्यात आली होती. या काल्पनिक जगात स्त्री आणि पुरुषांच्या भूमिकांची अदलाबदल करण्यात आली होती. 1905 मध्ये प्रकाशित झालेल्या या कथेला भारतातील पहिली विज्ञानकथा म्हणता येईल. स्त्रीवादावर अतिशय वेगळे भाष्य करणाऱ्या या इंग्रजी कथेने रुकय्याला ओळख मिळवून दिली. रवींद्रनाथ टागोरांची समकालीन असलेल्या रुकय्याचे नाव साहित्य विश्वात आदराने घेतले जाऊ लागले.

रुकय्याचे स्त्रीवादी आणि सुधारणावादी विचार मुस्लीम समाजातील अनेकांच्या पचनी पडणारे नव्हते. मात्र सखावत हुसेन यांच्या पाठिंब्यामुळे ती लिहित राहिली. 'स्त्री जातीची अवनती' (स्त्री जातीर अबोनिती) या लेखात ती लिहिते, ‘पुरुषाचा स्वार्थ आणि आमचा स्वार्थ एकच आहे, वेगळा नाहीये. त्यांच्या आयुष्याचे जे ध्येय आहे, आमचेही ध्येय तेच आहे. हा लेख वाचणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला स्वतःच्या या दुरवस्थेविषयी कधी चिंता वाटते का? या विसाव्या शतकात आमची स्थिती गुलामापेक्षा वेगळी नाही. या पृथ्वीतलावर गुलामगिरी संपुष्टात आल्याचे आम्ही ऐकतो. काय आमची गुलमगिरी संपलीये? पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू. स्वतंत्र होण्यासाठी आम्हाला पैसा कमवावा लागला तरी आम्ही तो कमवू.’

मुस्लिमांनी आधुनिक (म्हणजे इंग्रजी) शिक्षण घ्यावे यासाठीची सर सय्यद अहमद खान यांनी उत्तर भारतात चळवळ सुरु केली होती. मुस्लीम स्त्री शिक्षणाबाबत मात्र त्यांच्या चळवळीने फार सावध भूमिका घेतली होती. मुस्लीम स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळेच या समाजावर मोठे अरिष्ट ओढवले आहे असे रुकय्याचे ठाम मत होते. स्त्री शिक्षणावरील आपल्या एका लेखात ती म्हणते, ‘एक सांगू इच्छिते, आम्ही समाजाचा अर्धा हिस्सा आहोत. आम्हाला अंधकारात ठेवून समाज कशी प्रगती करू शकेल? एका व्यक्तीचा एक पाय बांधून ठेवला तर तो लंगडत किती दूरचा प्रवास करेल?’ मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली तर या समाजाचे अनेक प्रश्न सुटतील असे रुकाय्याचे  मत होते. त्यामुळे मुलींची शाळा सुरु करण्यासाठी तीची खटाटोप सुरूच होती. 

अशातच 1909 मध्ये सखावत हुसेन यांचे कोलकात्यात निधन झाले. त्यांनी मागे ठेवलेल्या पैशातून रुकाय्याने त्याच वर्षी मुलींसाठी ‘सखावत मेमोरियल स्कूल’ची स्थापना केली. तिच्या सासरी म्हणजे भागलपूर, बिहार येथे सुरु केलेल्या या शाळेत पाचच मुली होत्या. पण सासरची आणि परिसरातील मंडळी या शाळेला विरोध करू लागली आणि त्यांनी शाळा बंद पाडली. मग रुकय्या कोलकात्याला आली ती कायमचीच. येथे आल्यावर 1911 मध्ये तिने त्याच नावाने मुलींची शाळा सुरु केली. आठ मुलींनी सुरु झालेल्या या शाळेत आता ऐंशीहून अधिक मुली शिक्षण घेऊ लागल्या. भारताच्या व्हाईसरायच्या पत्नीने या शाळेला भेटही दिली. 

शिकविण्याचा अनुभव नसल्यामुळे रुकय्याला तारेवरची कसरत करावी लागे. आपल्या लहान बहिणीला, हुमेराला सोबत घेऊन ती ही शाळा चालवू लागली. मात्र तिने आपल्या लिखाणात खंड पडू दिला नाही. आपले विचार ती अतिशय धैर्याने मांडत राहिली. शाळा स्थिरस्थावर झाल्यावर 1915 मध्ये रुकय्याने ‘अंजुमन ए खवातीन ए इस्लाम’ अर्थात मुस्लीम महिला परिषदेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून तिने महिला संमेलने आणि त्यांच्या प्रश्नांवरील चर्चा यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

1925 मध्ये भरविण्यात आलेल्या मुस्लीम महिला परिषदेत अध्यक्षीय भाषण करताना रुकय्याने मुस्लीम पुरुषांना खडे बोल सुनावले. ती म्हणाली, ‘धर्माचा वापर करून आज हे पुरुष आमच्यावर हक्क गाजवतात. धर्माच्या नावाखाली सुरु असलेला हा अत्याचार आपण मूकपणे सहन करता कामा नये.’ मुस्लीम स्त्रियांमधील पडदा पद्धती आणि त्यामुळे तिच्या वाट्याला येणारे भोग यांच्याविषयीचे अनुभव लिहायला रुकाय्याने सुरुवात केली. त्यात तिने व्यंगाचा प्रभावी उपयोग केला. या विषयावरील तिचे लेखन ‘एकांतवासिनी’ (अबोधबासिनी) या शीर्षकाखाली 1931 मध्ये प्रकाशित झाले. त्यात ती म्हणते, ‘वर्षानुवर्षे पडद्यात (बुरख्यात) राहिल्यामुळे आपल्याला आता त्याची सवयच होऊन गेली आहे. त्यामुळे पडदा पद्धतीच्या विरोधात बोलण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही. मासेमारी करणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारले की सडलेल्या माशांचा वास चांगला वाटतो की वाईट?- यावर ती तरी काय उत्तर देणार? जी महिला जितकी अधिक पडदा पद्धतीचा अवलंब करून घरातील एका कोपऱ्यात घुबडासारखे बसून राहते, आज ती तितकी जास्त सुसंस्कृत समजली जाते’

हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी राजा राम मोहन रॉय, विद्यासागर यांसारखी पुरुष मंडळी लढा उभारत असताना मुस्लीम पुरुष मात्र आपल्या समाजातील स्त्रियांच्या हक्कासाठी लढत नाहीत. किंवा असा लढा उभारणाऱ्या स्त्रियांना पाठिंबाही देत नाहीत याची खंत आणि चीड रुकय्याच्या लेखनातून दिसून येते. आपल्या समजातून होणाऱ्या विरोधावर व्यंग करत ती उपरोधाने म्हणते, ‘कार्सियांग आणि मधुपूरला फिरायला जायचे तेव्हा मी तिथले सुंदर दगड गोळा करायचे. उडीसा आणि मद्रासच्या समुद्रकिनाऱ्यावरून मी शंख शिंपले गोळा करायचे. आयुष्याची पंचवीस वर्षे समाजसेवेत खर्ची घातल्यावर आता मी धर्मांधांचे शिव्याशाप जमवत फिरते.’

आधुनिक शिक्षण आणि आधुनिक विचार यांच्याशी जुळवून घेताना विसाव्या शतकातील मुस्लीम समाजाची (विशेषतः पुरुषांची) दमछाक होत होती. या समाजात सामाजिक सुधारणेचे अतिशय अवघड काम करणारी बेगम रुकय्या स्त्रियांच्या हक्कासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहिली. 09 डिसेंबर 1932 च्या सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुकाय्याचे निधन झाले. आदल्याच रात्री तिने लिहून ठेवलेला लेख तिचा अखेरचा लेख ठरला. त्या लेखाचे शीर्षक होते, ‘स्त्रियांचे अधिकार’(नारीर अधिकार).    

रुकय्याच्या जन्मगावी म्हणजे आजच्या बांगलादेशातील रंगपूर येथे 2008 मध्ये बेगम रुकय्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 09 डिसेंबर हा तिचा स्मृतिदिन बांगलादेशात ‘रुकय्या दिवस’म्हणून साजरा केला जातो. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये ‘रुकय्याचा स्त्रीवाद’ शिकवला जाऊ लागला आहे. भारतीय स्त्रीवादाला वेगळा आयाम देणाऱ्या रुकय्याला भारतीय मुस्लीम स्त्रीवादाची प्रणेती म्हणून आता हळूहळू ओळख मिळू लागली आहे. विसाव्या शतकात रुकय्याने आपल्या साहित्यातून मांडलेली मुस्लीम महिलांची स्थिती आणि त्याद्वारे उपस्थित केलेले प्रश्न आज एका शतकानंतरही तितकेच सुसंगत वाटावेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. भारतीय मुस्लीम महिलांचे प्रश्न आणि सामाजिक सुधारणा हे प्रश्न गेल्या काही वर्षांपासून ऐरणीवर आले आहेत. ते समजून घेण्यासाठी रुकय्याने मांडलेल्या विचारांची उजळणी करणे आज आवश्यक आहे.   

-समीर शेख 
sameershaikh7989@gmail.com 

Tags: मुस्लीम महिला स्त्रीवाद प्रबोधन बंगाल बांगलादेश समीर शेख बुरखा Rokeya Begum Rukayya Begum Feminism Bengal Muslim Women Muslim Burqa Sameer Shaikh Load More Tags

Comments: Show All Comments

प्रा. भूषण भस्मे

सावित्रीबाई फुले दामंत्याना आपल्या कट्टरपंथी समाजाकडून जो त्रास सहन करावा लागला त्याहीपेक्षा जास्त हेटाळणी बेगम रुकय्या यांची झाली परंतू त्यांनी जी सुरुवात केली ती प्रेरणादायी आहे आजही फारशा मुस्लिम महिला पुढे येत नाही बुरखा आजही त्यांना सडक्या माशांचा वास जसा कोळीनला येत नाही तसा आपल्याच अन्याचे जोखड वाहत आहे त्याला धर्माचे गोडस नाव देवून गोंजारत आहे.

Daniel M

माहितीपूर्ण लेख. त्यांच्या लिखाणाविषयी अधिक जाणून घेण्यास आवडेल

अपर्णा कडसकर

बेगम रुकय्या याची हिम्मत आणि चिकाटी दाद देण्याजोगी आहे. आत्ताही मुस्लिम स्त्रियांचे प्रबोधन हे अवघड काम आहे. त्याकाळी तर खूपच अवघड असणार.

लतिका जाधव

बेगम रुकय्या यांची महत्त्वपूर्ण माहिती लेखातून दिल्याबद्दल, धन्यवाद. यांचे साहित्य हिंदीत उपलब्ध असेल, असे वाटते.

डॉ अनिल खांडेकर

एका नवीन विषयावरील लेख वाचून खूपच समाधान मिळाले. धन्यवाद... बेगम रूकय्या यांच्या कार्याची ओळख झाली. फाळणीनंतर त्या तत्कालीन पू. बंगाल मध्ये गेल्या असाव्यात. येथील स्त्रियांना आणि कार्यकर्त्यांना। .. स्त्री वादी कार्य कर्त्यांना पण किती माहिती आहे . या लेखाच्या निमित्ताने महाराष्ट्रात अन्यत्र औत्सुक्य निर्माण झाले पाहिजे. धन्यवाद

Dattajirao patankar

Need for action

Add Comment