01 फेब्रुवारी हा दिवस जगभर 'वर्ल्ड हिजाब डे' म्हणून साजरा केला जातो. हिजाब म्हणजे मुस्लिम स्त्रियांनी आणि मुलींनी आपले डोके आणि केस झाकण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बांधलेला स्कार्फ. या हिजाब व त्याभोवती घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 2013 मध्ये ही प्रतिकात्मक चळवळ सुरू झाली.
09 सप्टेंबर, 2011 रोजी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करत इस्लामी दहशतवाद्यांनी या दोन्ही इमारती उध्वस्त केल्या. दोन हजारांहून अधिक लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या भूमीवर झालेला हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला होता. साहजिकच अमेरिकन जनमानस या हल्ल्यामुळे ढवळून निघाले. या घटनेनंतर अमेरिकेतील मुस्लीम समाज आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय संस्था, त्यांची संस्कृती आणि पेहराव यांविषयी अमेरिकन समाजात संशय निर्माण होऊ लागला. मुस्लिमांच्या आजवर आक्षेपार्ह न वाटलेल्या गोष्टीही आता त्यांना संशयास्पद वाटू लागल्या होत्या.
एकूणच सर्वत्र संशयाचे आणि अविश्वासाचे वातावरण होते. या संशयी वातावरणाच्या सर्वाधिक बळी ठरल्या अमेरिकन मुस्लीम स्त्रिया. विशिष्ट धार्मिक पेहरावामुळे त्यांची धार्मिक ओळख मुस्लीम पुरुषांपेक्षा लवकर स्पष्ट होत असे. त्यामुळे बुरखा किंवा हिजाब घालणाऱ्या या स्त्रियांना अपमानित करण्यात येऊ लागले. त्यांच्याशी भेदभाव केला जाऊ लागला. या कृतीला प्रत्युत्तर देणे आवश्यक बनले. मुस्लिम चालीरीती, त्यांची संस्कृती, आहार आणि पोशाख यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी समाजातील अनेक मंडळी पुढे आली. नजमा खान ही त्यांपैकीच एक.
मूळची बांगलादेशी असणारी नजमा अकरा वर्षांची असताना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात वास्तव्याला आली. शाळेत 'बॅटमॅन' किंवा 'निन्जा' म्हणून प्रसिद्ध असलेली नजमाला 9/11 नंतर तिच्या धार्मिक पोशाखामुळे 'ओसामा बिन लादेन' म्हणून ओळखली जाऊ लागली. सामाजिक कार्यकर्ती असणाऱ्या नजमाने समाजातील अविश्वास दूर करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे ठरवले. ज्या हिजाबमुळे तिला सर्वाधिक भेदभाव सहन करावा लागला त्याविषयी जनजागृती करण्याचे तिने ठरवले.
मुस्लिमेतरांना आपल्या धर्मातील हिजाब या पोशाखाविषयी माहिती देणे, त्यांचे गैरसमज दूर करणे हे नजमाच्या कामाचे स्वरूप होते. बीबीसी, अलजझिरा, टाईम मॅगझीन आदी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिच्या या कृतीची दखल घेतली आणि ही चळवळ जगभर पोहोचली. जगभरातील अनेक मुस्लिम महिलांना कमीअधिक प्रमाणात नजमासारखाच अनुभव आला होता. (फ्रांस, डेन्मार्क, स्पेन आणि बेल्जियम या देशांमध्ये तर हिजाब घालण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे). जगभरातील स्त्रिया मग आपोआपच या चळवळीशी जोडल्या गेल्या आणि न्यूयॉर्क मधील हिजाब डे पुढे 'वर्ल्ड हिजाब डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.
'हिजाब डे' ची दुसरी बाजू
'हिजाब डे' ही चळवळ आंतरधर्मीय सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी सुरु झाली. मात्र समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी आधुनिक युगात धार्मिक रुढींचा, आणि त्यातही स्त्रियांच्या धार्मिक पोशाखाचा आधार घेतल्यामुळे मुस्लीम समाजातील काही सुधारणावादी मंडळींनी 'हिजाब डे' वर आक्षेप घेतला. अमेरिकेसारख्या आधुनिकतावादी देशात हिजाब घालणे सक्तीचे नसले तरी इराणसारख्या देशांतील स्त्रियांना मात्र हिजाब घालणे बंधनकारक आहे. या सक्तीच्या विरोधात इराणमधील महिलांनीही चळवळ सुरु केली आहे. त्यामुळे 'हिजाब डे'सारख्या चळवळी मुस्लीम देशांतील हिजाब सक्तीच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणाऱ्या आहेत असे मत आसरा नोमानीसारख्या अनेक सुधारणावादी महिला विचारवंतांनी नोंदवले.
आपले चारित्र्य, पावित्र्य जपण्यासाठी हिजाब किंवा तत्सम धार्मिक पोशाख परिधान करणे हा या पेहरावामागची प्रेरणा असली तरी त्यात मुलभूत अडचण आहे. कारण असा पोशाख न करणाऱ्या मुस्लीम स्त्रिया या अपवित्र किंवा चारित्र्यहीन आहेत, असा संदेशही त्यातून जाण्याचा धोका असतो. शिवाय, असा पेहराव न करण्याचा पर्याय पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या स्त्रियांना उपलब्ध आहे. इराणसारख्या इस्लामी देशांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना असा पोशाख सक्तीचा आहे. तो नाकारल्यास त्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते.
'हिजाब'ची राजकीय गुंतागुंत
इस्लामचे सर्वांत प्रतिष्ठित धर्मकेंद्र म्हणून नावलौकिक असणाऱ्या इजिप्तमधील अल अजहर विद्यापीठाच्या मते हिजाब इस्लामी स्त्रियांसाठी सक्तीचा कधीच नव्हता (मात्र आज अनेक इस्लामी राष्ट्रांत सक्तीचा आहे). इजिप्तचे माजी अध्यक्ष (आणि नेहरूंच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अलिप्त राष्ट्र चळवळीतील त्यांचे सहकारी) गमाल अब्दुल नासेर यांनी 1953 मध्ये दिलेले एक भाषण इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या भाषणात नासेर एक किस्सा सांगतात. नासेर इजिप्तचे अध्यक्ष झाले त्यावेळी 'मुस्लीम ब्रदरहूड' या आधुनिक काळातील सर्वांत प्रभावी इस्लामी राजकीय संघटनेचे नेते त्यांना भेटायला आले. त्यांनी नासेर यांच्याकडे मागणी केली, ‘महिलांसाठी हिजाब सक्तीचा करा.’ नासेर हा किस्सा सांगतात तेव्हा सभेत हास्यकल्लोळ माजतो. पन्नासच्या दशकात 'हिजाब सक्तीची' मागणी हास्यास्पद वाटणारी होती.
इराणमध्ये स्त्रियांसाठी हिजाब सक्तीचा आहे. याच इराणमध्ये आजच्याच दिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी रोजी एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण घटना घडली होती. वर्ष होते 1979. आपला 14 वर्षांचा वनवास संपवून धार्मिक नेते आयतुल्ला खोमेनी याच दिवशी इराणमध्ये पोहचले आणि काही दिवसांतच तेथे इस्लामिक क्रांती झाली. पुढे स्त्रियांवर अनेक निर्बंधही लादण्यात आले. एकेकाळी हिजाब सक्तीविरोधात रस्त्यावर येणारी इराणी स्त्री खोमेनीच्या इस्लामी क्रांतीनंतर अनेक दशके हा निर्बंध मुकाट्याने सहन करत आली होती. या निर्बंधाच्या विरोधात आता कुठे इराणी स्त्री रस्त्यावर उतरते आहे.
सक्तीच्या हिजाब विरोधातील ‘व्हाईट वेनेस्डे’ आणि ‘माय स्टिल्थी फ्रीडम’सारख्या चळवळी इराणसारख्या इस्लामी राष्ट्रात मूळ धरत असताना दुसरीकडे अमेरिकेसह जगभर हिजाब डे ही साजरा केला जातोय. एकाच धर्मातील महिला एकाच प्रथेविषयी दोन पद्धतीने व्यक्त होत आहेत. वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या संकल्पनांना छेद देणाऱ्या या दोन्ही चळवळी एकाच काळात घडत असल्यामुळे त्याविषयी आपली भूमिका काय असावी याविषयी मुस्लिमेतर सुधारणावादी मात्र संभ्रमात आहेत.
कुण्याही व्यक्तीला विशिष्ट पोशाख घालण्याची (किंवा तो न घालण्याची) सक्ती करणे हे आधुनिकतावादाच्या ( आणि उदारमतवादाच्याही) विरोधात जाणारे आहे. त्यामुळे ‘हिजाब डे’ आणि ‘व्हाईट वेनेस्डे’ या दोन चळवळी वरवर परस्परविरोधी वाटत असल्यातरी त्यामध्ये- स्त्रियांना पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे- ही भावना समान आहे.
-समीर शेख
sameershaikh7989@gmail.com
Tags: Islam Muslim Women वर्ल्ड हिजाब डे मुस्लीम महिला इस्लाम हिजाब Load More Tags
Add Comment