और वो कब्र में नहीं लोगों के दिलों में उतर गया...

आयुष्यात असे प्रसंग फार कमी येतात जेव्हा काही गोष्टी घडणार हे माहीत असल्या, तरी घडल्यावर मात्र त्या अनपेक्षित, अकल्पनीय वाटू लागतात. मन सुन्न तर मेंदू बधीर होऊन जातो. 28 एप्रिल रात्री इरफान खानला कोलन इन्फेक्शनमुळे मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी आली आणि थोडीशी धाकधूक वाटली. आपल्याला एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरने ग्रासले असल्याचे इरफानने एक फिलॉसॉफिकल पत्र लिहून दोन वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र त्याची विजीगीषू वृत्ती आणि जिगरबाजपणा कॅन्सरवर मात करेल असा विश्वास माझ्यासह त्याच्या कोट्यावधी चाहत्यांना होता. 'नो न्यूज इज गुड न्यूज' अशी समजूत करून घेऊन तो आता आजारातून बरा होतोय, लवरकरच पुनरागमन करतोय वगैरेच्या बातम्या तीन-तीन वेळा वाचून काढत मी सुद्धा समाधान मानून घेतले होते. आजारपणातून किंचित बरा झाल्यावर त्याने 'अंग्रेजी मिडीयम' या सिनेमाची शुटींग संपवली होती, लॉकडाऊन सुरु होण्याआधीच तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि इरफानच्या पुनरागमनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या, मात्र त्या भाबड्या ठरल्या. 29 एप्रिलच्या दुपारी इरफानच्या अकाली निधनाची बातमी आली आणि अख्खा देश हलून गेला. दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले तेव्हाच इरफानने त्याच्या मनाची तयारी केली होती असे त्याचे पत्र, जवळच्या मित्रांशी झालेले संवाद यांवरून वाटते, मात्र त्याच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्यांची मात्र  तयारी नक्कीच झाली नव्हती हे ही तितकेच खरे. 

या बातमीनंतर इतरांप्रमाणेच माझ्याही नजरेसमोरून इरफानचा अभिनय, त्याचे सिनेमे, त्याच्याशी निगडीत आठवणी तरळून गेल्या. इरफानचा आजवरचा प्रवास रुळलेल्या वाटा नाकारणारा आणि स्वत्व शोधण्यासाठी धडपडणारा कलाकार असाच राहिलाय. त्याचे फीचर्स अतिशय सामान्य. त्यामुळे बॉलीवूडमध्ये लीड रोल मिळवण्याचे स्वप्न खुद्द त्यानेही कधी पाहिले नसेल. अभिनय करायचा हे मात्र त्याने फार सुरुवातीलाच ठरवले होते. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षीच. 

सिनेमात काम करणे तर लांबच, घरी तो पाहण्याचीही परवानगी नव्हती. कुटुंबाला राजघराण्याची पार्श्वभूमी होती. पण ती शब्दश: फक्त नावापुरतीच होती. त्यामुळे त्याचे मूळ नावही या पार्श्वभूमीला साजेसे होते, साहबजादे इरफान अली खान. वडिलांचा छोटा व्यवसाय होता, घरची परिस्थिती मात्र यथातथाच होती. मुलाने आपल्या जवळच नोकरी करावी अशी आईची इच्छा होती. 'नोकरी-धंदा अपने बस की बात नहीं' हे इरफानने जाणले होते. पण करायचे काय हे मात्र माहित नव्हते. क्रिकेटमध्ये इरफानला चांगली गती होती. फर्स्ट क्लास क्रिकेटचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सी. के. नायडू चषकासाठीच्या अंडर 23 संघात त्याची निवडही झाली, मात्र पुरेशा फंडाअभावी त्याला सहभागी होता आले नाही.  

वर्षातून एकदा मामा घरी आला की इरफानला त्यांच्यासोबत सिनेमा पाहता यायचा. बंगालचे महान दिग्दर्शक मृणाल सेन यांचा मृगया त्याने पाहिला. त्याला तो आवडला ते मुख्य भूमिकेत असलेल्या मिथुन चक्रवर्तीमुळे. इतके साधारण फीचर्स असलेल्या व्यक्तीला लीड रोल मिळते याचे त्याला अप्रूप वाटले, आणि त्यात आशेचा किरणही दिसला. आपण अभिनय करू शकू असे त्याला वाटले. 'तू मिथुनसारखा दिसतोस' हे मित्रांकडून अनेकदा सांगूनही झाले होते. नसीरुद्दीन शाहांच्या सिनेमानेही तो पुरता प्रभावित झाला होता. अभिनय करायचा तर त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे याउद्देशाने पदवी झाल्यावर त्याने अभिनयाचे प्रशिक्षण देणारी सर्वोत्तम संस्था ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ अर्थात एनएसडीमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले.  मात्र एनएसडीमध्ये प्रवेशासाठी एक अट होती. प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीचे दिव्य पार करणे पुरेसे नव्हते. दहा नाटकांमध्ये अभिनय केल्याचा अनुभव तुमच्या गाठीशी आवश्यक होता, जो साहजिकच इरफानकडे नव्हता. मात्र आपल्याकडे अनुभव असल्याचा 'अभिनय' त्याने खुबीने केला आणि 1984 मध्ये एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला.

जयपूरवरून दिल्लीला येण्यासाठी आणखी एक अभिनय इरफानला करावा लागला. सिनेमाविषयी घरच्यांची मते माहित असल्यामुळे, 'दिल्लीत अभिनयाचे शिक्षण पूर्ण झाले की पुन्हा जयपूरला येऊन प्राध्यापकी करेन.' अशी थाप त्याने आईला मारली आणि दिल्ली गाठली. एनएसडीमध्येच त्याला त्याची भावी पत्नी सुतपा सिकदर भेटली. ती त्याची वर्गमैत्रीण. तिला अभिनयात रुची नव्हती. क्रिएटीव्ह रायटिंगकडे तिचा कल होता. तिला मात्र खरच थिएटर शिकून प्राध्यापकी करायची होती. इरफान इथे शिकत असतानाच फिल्ममेकर मीरा नायर एनएसडीमध्ये आली होती. तिथे नाटकाचा प्रयोग सुरु होता, इरफान त्यात मुख्य भूमिकेत होता. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने मीरा नायर प्रभावित झाली. ‘सलाम बॉम्बे’मध्ये त्याला प्रमुख भूमिकांपैकी एक भूमिका द्यायचे ठरले, पण इतर पात्रे वयाने लहान होती, त्यामुळे त्याला तोंडी लावण्यापुरती भूमिका मिळाली. 

'सलाम बॉम्बे' मीरा नायरचा (आणि इरफानचाही) पहिलाच सिनेमा. 1988 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा इरफानच्या भूमिकेला कात्री लागली. अगदी काही सेकंदच त्याच्या वाट्याला आले. सिनेमाला ऑस्कर नामांकनही मिळाले. आपल्या भूमिकेला कात्री लागल्यामुळे त्याने मीरा नायरला फोन केला व तो तिच्याजवळ  खूप रडला. ‘मी पुन्हा  सिनेमा बनवला तर तू त्यात प्रमुख भूमिकेत असशील’ असे वचन त्याला मीराने दिले. तिने बहुदा इरफानमधील स्पार्क हेरला होता. 

'एनएसडी' नंतर इरफानला बासू चटर्जींच्या ‘कमला की मौत’मध्ये छोटी भूमिका मिळाली. सिनेमाच्या पोस्टरवर इरफान झळकला ते तेव्हा पहिल्यांदा. ही गोष्ट 1989 ची. देशात तेव्हा केबल टीव्हीचे प्रस्थ नव्हते. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. या काळात त्याने श्रीकांत, भारत एक खोज, चाणक्य, चंद्रकांता या मालिकांमध्ये भूमिका केल्या. देशातील उत्तमोत्तम दिग्दर्शक तेव्हा खास दूरदर्शनसाठी टेलिफिल्म्स बनवायचे. इरफानने छोट्या पडद्यावर आपली छाप पाडली ती या टेलिफिल्म्सच्या माध्यमातून. श्याम बेनेगल यांची कथा सरिता मधील चेखावच्या एका गोष्टीवर आधारलेली वार्ड नंबर 6, गोविंद निहलानी यांच्या पिता, दृष्टी, जझिरे यांमध्ये त्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

दरम्यानच्या काळात तपन सिन्हा यांचा ‘एक डॉक्टर की मौत’ येऊन गेला. त्यात पंकज कपूर आणि शबाना आझमी या तगड्या कलाकारांच्या तोडीचा अभिनय त्याने केला. इरफानच्या सुरुवातीच्या काळातील या कामाविषयी नसीरुद्दीन शाह एके ठिकाणी म्हणालाय, ‘इरफानच्या वयाचा असताना काश मला त्याच्यासारखा अभिनय करता आला असता.’  

रूढार्थाने हिरोसाठी पात्र ठरणारे 'फीचर्स' इरफानमध्ये कधीच नव्हते. त्यामुळे मुख्य प्रवाहातील सिनेमे मिळण्याची शक्यता नव्हतीच. समांतर सिनेमा चळवळही तोवर थंडावली होती. त्यामुळे दूरदर्शनवरील कार्यक्रमांत छोट्या मोठ्या भूमिका करण्यावाचून त्याच्यासमोर पर्यायच नव्हता. याच दरम्यान केबल टीव्हीचे आगमन झाले आणि स्टार प्लसवर 'स्टार बेस्टसेलर्स' ही मालिका सुरु झाली. 

'स्टार बेस्टसेलर्स'मध्ये वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या टेलिफिल्म्स असायच्या. आजच्या घडीच्या महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी अनेकांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात याच कार्यक्रमापासून केली होती. दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया हा इरफानचा एनएसडीपासूनचा मित्र. त्याने या मालिकेतील एका एपिसोडसाठी इरफानला घेतले. मुख्य प्रवाहातील रोमांटिक म्हणता येईल अशी भूमिका इरफानला करता आली ती स्टार बेस्टसेलर्समध्ये. याच मालिकेततील एका भागाचे त्याने दिग्दर्शनही केले.

1990 मध्ये आलेल्या ‘एक डॉक्टरकी मौत’ नंतर सिल्व्हर स्क्रीनपासून इरफान तब्बल एक दशक दूर होता. या काळात कोणत्याच सिनेमात त्याला भूमिका मिळाली नाही. आसिफ कपाडिया हे ब्रिटीश माहितीपटकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या माहितीपटांना ऑस्कर, बाफ्टा यांसारखे महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेत. त्यांनी आपल्या पहिल्या सिनेमात इरफानला मुख्य रोल देऊ केला. सिनेमाचे नाव होते ‘द वॉरियर’. वर्ष होते 2001. या सिनेमाची नामावली संपते तरी स्क्रीनवर राहतात इरफानचे भेदक डोळे. या सिनेमाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इरफानला आंतरराष्ट्रीय ओळखही. 

इरफानचा मित्र आणि दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया याने 2003 मध्ये ‘हासील’ बनवला. त्यात  इरफानच्या भूमिकेला निगेटिव्ह शेड होती. या भूमिकेत त्याने कमाल केली. मात्र हा सिनेमा चालला नाही. विशाल भारद्वाजच्या 'मकबूल'चीही काहीशी तशीच गत झाली. शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ'वर बेतलेल्या या सिनेमातील मियां मकबूलची भूमिका इरफानने ज्या पद्धतीने साकारली त्याला तोड नाही. नसिरुद्दीन, ओम पुरी, पंकज कपूर, तब्बू या दिगज्जांपेक्षा तोच वरचढ ठरला. पण हा सिनेमाही ठराविक प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहिला.

इरफानला अभिनयाची पहिली संधी देणाऱ्या मीरा नायरने ‘द नेमसेक’ मध्ये मुख्य भूमिका दिली आणि त्याला दिलेला शब्द पाळला. झुम्पा लाहरीच्या कादंबरीवर आधारित या सिनेमात इरफानने रंगवलेल्या अशोक गांगुलीमुळे इरफानचे नाव हॉलिवूडमध्ये आदराने घेतले जाऊ लागले. तत्पूर्वी महेश भट्ट यांच्या ‘रोग’मधून त्याला हिंदी सिनेमात पहिला रोल मिळाला, पण न चित्रपट चालला, न भारतीय प्रेक्षकांचे इरफानकडे लक्ष गेले. या नंतर अनेक छोटे-मोठे हिंदी सिनेमे इरफानने केले.  

दरम्यान ‘ए मायटी हार्ट’, ‘दार्जीलिंग लिमिटेड’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये छोटी-मोठी भूमिका इरफानच्या वाट्याला येतच होती. हिंदी सिनेमात मात्र त्याच पठडीबद्ध भूमिका आणि संकुचित अवकाश यातच त्याला वावरावे लागले. तरीही ‘लाईफ इन अ मेट्रो’ आणि ‘मुंबई मेरी जान’ या मल्टीस्टारर आणि अनेक कथांची गुंफण असलेल्या सिनेमांतून इरफानने आपले वेगळेपण दाखवून दिले. ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ मध्येही त्याची छोटी भूमिका होती. मात्र त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देईल असा यांपैकी कुठलाच सिनेमा नव्हता. 
 
आमीर, सलमान, शाहरुख या तीनही खानांची चलती असणाऱ्या या काळात, किंग खानला म्हणजे शाहरुखला इरफानसोबत काम करायचे होते, म्हणून खास इरफानसाठी त्याने ‘बिल्लू’ बनवला. तेव्हा कुठे अनेकांना इरफान माहिती झाला. सुधीर मिश्रांनी ‘ये साली जिंदगी’ मध्ये त्याला भूमिका दिली, आणि त्याने पुन्हा कमाल केली. आर्ट आणि कमर्शियल सिनेमा या दोहोंचा अनुभव असलेल्या सुधीर मिश्रांनी इरफानला या सिनेमात छान वापरून घेतला. मात्र सिनेमा मल्टीस्टारर असल्यामुळे त्याला तसा खूप वाव नव्हता. 

इरफानची घुसमट खऱ्या अर्थाने संपली ती 2012 मध्ये. यावेळी पुन्हा मित्र तिग्मांशुच त्याच्या मदतीला आला. शेखर कपूरांच्या बँडीट क्वीनमध्ये तिग्मांशु कास्टिंग डायरेक्टर होता. या सिनेमाचा अनुभव वापरून त्याने ‘पानसिंग तोमर’ हे बायोपिक बनवायचे ठरवले. दोन्ही सिनेमात अनेक गोष्टी समान होत्या. लीड रोलमध्ये अर्थातच इरफान होता. सिनेमा प्रचंड गाजला. क्रिटीक्स आणि मास दोघांनीही या सिनेमाला आणि इरफानला उचलून घेतले. या प्रकारचा प्रतिसाद फार कमी हिंदी सिनेमांना मिळालाय. ‘पानसिंग तोमर’मुळे इरफान खऱ्या अर्थाने हिंदी सिनेमात स्थिरावला. 

‘पानसिंग तोमर’ या सिनेमाविषयी आणि तो करण्यामागच्या भूमिकेविषयी जेएनयुमध्ये बोलताना इरफान म्हणाला होता की, ‘मैं बहुत छोटेसे गाँव की पैदाइश हुं. सिनेमा में जाने का ख्वाब देखता तो था, पर शर्माते हुए... सिक्रेटसा ख्वाब था. पानसिंग के बाद इंटरव्यू के दौरान मुझे एक पत्रकार ने पूछा की आप ये ‘आम आदमी’ टाइप फिल्मेंं ही क्यूँ करते है. मैंने उन्हें समझाने की कोशिश नहीं की के आम आदमी ही तो हीरो होता है, उसीसे तो हीरो निकलता है. बिते दस-बारा साल से मैं और तिग्मांशु मिलकर एंटरटेन्मेंट की परिभाषा बदलने की, उसे रीडिफाइन करने की कोशिश कर रहे थे. स्टार बेस्ट सेलर्स, हासिल और अब पानसिंग इसी जद्दोजहद का नतीजा है. हम उस तरह का सिनेमा बनाना चाहते थे जिसका दौर पहले रहा है. जब हमारा देश आज़ाद हुआ था. उम्मीदे जवान थी, लग रहा था की मंजिल करीब है. एक ऐसी दुनिया बनेगी जो सपनो की दुनिया है. गुरुदत्त, के आसिफ, बिमल रॉयने जो आम आदमी का सिनेमा बनाया वो आगे खो गया. तो हमारी भी यही कोशिश थी की हमारी अपनी, जमीन से जुडी हुई कहानी हो. और उसमे एंटरटेन्मेंट भी हो. पर हमारे यहाँ हीरो आने लग गए जो पता नही कहाँ की पैदाइश है, बिलकुल जमीन से जुड़ाव नहीं था, पर उन्होंने ऑडीयन्स कॅप्चर किया और सिनेमा का पतन हुआ. पर अब दर्शकोंकी नयी पीढ़ी आयी है, जो अपनी कहानी देखना चाहती है. पानसिंग की कामयाबी इसी का सबूत है.’    

'पानसिंग'मुळे इरफानच्या अभिनय क्षमतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. यानंतर हॉलीवूडमधून त्याला पुन्हा अनेक ऑफर्स येऊ लागल्या. त्याने त्या स्वीकारल्याही. ‘लाईफ ऑफ पाय’ या ऑस्कर विजेत्या सिनेमातील त्याच्या अभिनयाने हॉलीवूडकर पुन्हा चकित झाले. यानंतर बहुदा इरफानमधील अस्वस्थता संपली असावी. आपल्या नावातील साहबजादे काढून त्याने नावापुरत्या असलेल्या आपल्या नवाबी पार्श्वभूमीचे ओझे त्याने पूर्वीच उतरवले होते. आता आडनावातील खानही काढून त्याने आपल्याला फक्त इरफान म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याने स्वतःला पठडीत अडकवून न घेता मुक्त राहणे पसंद केले.

एकाच वेळेला तो ‘लंचबॉक्स’मध्ये साजन फर्नांडीस साकारून आपल्या अभिनयाने क्लासला अवाक करत करत होता, ‘हैदर’मध्ये रुहदारसारखे मिस्टीकल पात्र रंगवत होता तर ‘साहिब बीवी और गंगस्टर’मध्ये दुष्यंत कुमारच्या ‘एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ सारख्या डायलॉगद्वारे मासेसच्या टाळ्या आणि शिट्याही मिळवत होता. एकीकडे ‘किस्सा’ सारख्या अतिशय संवेदनशील समांतर सिनेमात म्हाताऱ्या सरदाराची भूमिका करत होता, ‘तलवार’ या मर्डर मिस्ट्रीमध्ये गंभीर पोलीस अधिकारी, तर संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ सारख्या मसाला फिल्ममध्ये ‘मुहब्बत थी इसलिए जाने दिया, ज़िद होती तो वो मेरे साथ होती.’ सारखे जोरदार फ़िल्मी जुमले टाकणारा आशिकही बनत होता.

‘पिकू’, ‘करीब-करीब सिंगल’ यांसारख्या रॉमकॉममधून आपण रोमान्स आणि कॉमेडीही किती शिताफीने करू शकतो हे इरफानने दाखवून दिले. रोमँटिक हिरोबाबत भारतीयांच्या मनात असलेल्या प्रतिमेला इरफानने हलकासा धक्का दिला. गार्डियनमध्ये गेली 25 वर्षे फिल्म क्रिटिक असलेल्या पीटर ब्रॅडशो यांच्या मते इरफान कमालीचा आकर्षक आणि स्ट्रॉंग रोमांटिक अपील असलेला अभिनेता होता. ब्रॅडशो यांनी तर त्याचे वर्णन मुंबईचा जॉर्ज क्लुनी असे केले आहे. 

सर्वसाधारण चेहरेपट्टी मात्र कमालीचे भेदक डोळे असलेल्या या कलाकाराने सर्वसामान्यांना सुसह्य वाटणाऱ्या, कॉम्प्लेक्स न देणाऱ्या मात्र तरीही मनोरंजन करणाऱ्या सशक्त भूमिका साकारल्या आणि 30 वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर हिंदी सिनेमाच्या ‘एंटरटेन्मेंट की परिभाषा’ बदलण्याची किमया केली. दक्षिण आशियायी सिनेमा आणि हॉलीवूड यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आर्ट फिल्म/समांतर सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा आणि त्यांचे चाहते या दोन बेटांना जोडणारा इरफान एक पूल होता. 

इरफानचा अकाली मृत्यू जगभरातील सिनेमाप्रेमींना चटका लावून गेलाय. चीनी सोशल मिडिया साईट्सवर कोट्यावधी लोकांनी त्याच्या सिनेमा आणि अभिनयावर चर्चा करणारे थ्रेड्स सुरु केलेत. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार आणि दिग्दर्शक इरफानच्या अभिनयाची, त्याच्या अकाली जाण्यामुळे जागतिक सिनेमाच्या झालेल्या हानीची भावूकपणे चर्चा करताहेत. ऑस्कर्स अर्थात अ‍ॅकॅडमी अवार्ड्स देणाऱ्या संस्थेपासून ते त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही आपल्या जवळचा, घरातला कुणीतरी गेल्यासारखे दु:ख झालेय. इरफानच्या या युनिवर्सल अपीलचे रहस्य काय असावे? त्याच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘हम जितना पर्सनल होंगे, जमीन से जुडी फिल्मे करेंगे उतनेही हम युनिवर्सल होते चले जायेंगे...’

आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात इरफानने ज्या अनेक दूरदर्शन मालिका केल्या, त्यात उर्दू कवींवर आधारित ‘कहकशां’ ही मालिकादेखील होती. त्यातील एक एपिसोड शायर आणि ट्रेड युनियन लीडर मखदूम मुहिउद्दीन यांच्यावर होता. मखदूम यांच्या भूमिकेत अर्थातच इरफान होता. परवा इरफान गेल्यावर सर्वत्र व्यक्त होणारी हळहळ, कुणीतरी आपला गेल्याची भावना अनुभवताना, मखदूमच्या मृत्युनंतरचे अली सरदार जाफरींच्या आवाजातील वाक्य माझ्या कानांत घुमु लागले... ‘यकायक मखदूमका इन्तेक़ाल हो गया और वो कब्र में नहीं लोगों के दिलों में उतर गया’... 

 - समीर शेख
 sameershaikh7989@gmail.com

Tags: obituary समीर शेख इरफान खान सिनेमा Load More Tags

Comments: Show All Comments

Ajay Madhusudan surve

Khup chan apratim lekh thank you

Prashant

Badhiya likha...tapshil maasstt hote...ni tyaacha parinam asa ki janu...irfaan yaanchyaa bhumikaan baddal vistrut lekh lihitaya...marnottar ahe ase visrun gelo..aso...

जमीर शेख

अ प्रतिम लेख वाचत असताना इरफान स्वतः डोळ्यासमोर उभा असल्याचं भास झालं

योगेशबाबू

मस्त लिहलस समीर. माहितीपर आणि काही किस्से सांगून त्या पात्राची आठवण करुन देणारं. झकास.

Daniel M

छान लेख. इरफान खानला मी प्रथम 'कसूर' (crime - thriller) ह्या हिंदी चित्रपटात पाहील्याचे स्मरते. त्याच्यानंतर 'मकबूल', 'हैदर', 'साहेब, बीवी और गँगस्टर' अश्या चित्रपटातून तो भेटत गेला.. आवाज, संवादफेक, चेहऱ्यावरील हावभाव ह्यात काहीही dramatic बदल न करता विविध भूमिकेत 'संयमित आणि तरल' पणे चपखल बसणं हे फक्त त्यालाच जमायचं. 'लाइफ इन अ मेट्रो' मध्ये त्याला पाहून हा विनोदी अभिनयही किती सहज करतो म्हणून त्याच्या अभिनय वैविध्याचं तेव्हा अप्रूप वाटलं होतं .. हॉलिवूड मध्ये त्याला जसे लोकप्रिय चित्रपटात काम मिळाले तसे बॉलिवूडमध्ये आणखीन कोणाला मिळाले नसेल. जुरासिक वर्ल्ड मध्ये त्याचा blink and miss असा रोल नसून चक्क ७-८ मिनिटांचा significant रोल आहे हे चित्रपटगृहात पाहून काय अभिमान वाटला होता त्याचा.. तिकडेही तो हिंदी सिनेमासारखा सहजपणे वावरायचा..कुठलाही अभिनिवेश नाही ..कसलंही बंधन नाही... कदाचित तो जेवढा पडद्यावर 'सामान्य दिसला' तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही सामान्यच असावा ! त्यामुळेच ह्या कलानगरीत तो घट्ट पाय रोवून उभा राहिला .....

नीती बडवे

चपखल सुरात लिहिलेला सुंदर लेख. इरफानच्या व्यक्तिमत्वाला साजेसा.

Add Comment