भारतीय साहित्य आणि भाषा यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणजे साहित्य अकादमी. त्यामुळे अकादमीद्वारे आयोजित परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे विशेष महत्त्व असते. एखादी व्यक्ती, साहित्य, विचार राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अकादमीचे कार्यक्रम उत्प्रेरक ठरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अकादमीने 25 मे 2021 रोजी ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले होते. अकादमीच्या वेबलाईन साहित्य शृंखलेतील या सत्राच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले होते. या वेळी मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य एकनाथ पगार यांच्यासह प्रा. नीतीन रिंढे, विनोद शिरसाठ, अन्वर राजन आणि अझरुद्दीन पटेल या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
साहित्य अकादमी, मुंबईचे प्रभारी ओम प्रकाश नागर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. हमीद दलवाई यांचे साहित्य आणि व्यक्तित्व यांचे विविध पैलू या परिसंवादाच्या माध्यमातून जाणून घेता येतील अशी आशा व्यक्त करत त्यांनी लेखक, समीक्षक आणि साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य एकनाथ पगार यांना परिसंवादाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित केले.
हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देताना एकनाथ पगार म्हणाले, ‘दलवाईंचे व्यक्तित्व विचारवंत, लेखक, संघटक आणि उद्बोधानाचे कार्यकर्ता अशा विविध भूमिकांनी साकारलेले आहे. लेखक-पत्रकार-विचारवंत या भूमिकांच्या केंद्रस्थानी उद्बोधनकार, कर्ता सुधारक या भूमिकाच आहेत.’
पगार पुढे म्हणाले, ‘दलवाई हे सेक्युलर विचारवंत होते तसे समाजवास्तवाचा अन्वयार्थ लावणारे ललित लेखकही होते. आपल्या विचारांना कृतीने आविष्कृत करण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या; सत्यशोधक मंडळ स्थापन केले; मेळावे-मोर्चे-अभ्यासवर्ग घेतले; पाहणी दौरे, लोकसंवाद उपक्रम आखले. असे हे ‘विचार आणि कृती’ यांचे अद्वैत साधणारे विवेकी व्यक्तित्व होते.’
दलवाईंच्या कथा आणि कादंबरी यांविषयी पगार म्हणाले, ‘त्यांच्या ‘लाट’ कथासंग्रहातील कथांमधून ग्रामीणता, ग्रामीण वास्तव, मुस्लीम भावविश्व, स्त्रीजीवनातील दमन, दारिद्र्य आणि सामाजिक विषमता अशा आशयवस्तू यांचे हे चित्रण आहे. दलवाईंची ‘इंधन’ ही कादंबरी आपल्या वास्तवलक्ष्यी कथाकथनातून अप्रत्यक्षपणे स्त्रीजीवनाची आणि समूहजीवनाची शोकात्म जाणीव करून देते. धर्माच्या आधारे उभे राहिलेले संघर्षक्षण असहायता, हतबलता कसे निर्माण करतात याची कथारेषा इथे प्रबळ आहे.’
दलवाईंच्या भूमिकेविषयी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवताना पगार म्हणतात, ‘मुस्लिमांचे सर्वांगीण उत्थान व्हावे आणि विश्वनागरिकत्वाचे भानही जागे व्हावे म्हणून त्यांनी आपल्या वैचारिक साहित्यातून इहवादी सेक्युलर, उदारमतवादी विचारविश्व उभारले आहे. वैचारिक प्रबोधन आणि मुस्लीम समाजाची सुधारणा यांची सांगड घालणारे हे त्यांचे लेखन महात्मा फुले-आगरकर-लोकहितवादी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक लेखनाच्या परंपरेतले पुढचे पाऊल ठरते.’
परिसंवादाच्या प्रास्ताविकाचा समारोप करताना पगार म्हणतात, ‘आधुनिक मूल्यसरणी ही बुद्धिप्रामाण्य, वैज्ञानिक दृष्टी यांवर आधारलेली आहे. निखळ मानव्य हेच त्यांचे इप्सित होते. मुस्लीम स्त्रीजीवनाकडे निखळ मानव्य विचाराने पाहणारे दलवाई हे पहिलेच कृतिशील विचारवंत आणि इहवादी प्रतिभावंत लेखक ठरतात.’ (एकनाथ पगार यांचे संपूर्ण भाषण कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध झाले असून, ते इथे वाचता येईल.)
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी रचना महाविद्यालय, मुंबई इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे लेखक नीतीन रिंढे यांना दलवाईंच्या ‘इंधन’ या कादंबरीविषयी मनोगत मांडण्याची विनंती केली. या वेळी प्रा. रिंढे यांनी या महत्त्वाच्या परिसंवादासाठी साहित्य अकादमीचे आभार मानले. मनोगत मांडताना प्रा. रिंढे म्हणाले, ‘इंधन’ ही माझी आवडती कादंबरी आहे. दलवाई हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. व्यावसायिक लेखकांप्रमाणे त्यांनी पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले नव्हते. तरीही आपल्या अवघ्या एका कादंबरीतून त्यांनी जे चित्रण केले ते करणे प्रथितयश लेखकांनाही जमत नाही. अनेक कादंबऱ्यांच्या लेखनानंतर त्यांना सूर गवसतो. साठोत्तरी कादंबरीचा प्रवाह सुरू झालेला असताना 1965मध्ये ‘इंधन’ प्रसिद्ध झाली होती. या कादंबरीने मराठी साहित्यात निर्माण केलेले स्थान जर आपण पाहिले तर लेखक म्हणून दलवाई यांचे मोठेपण काय आहे हे आपल्याला प्रामुख्याने कळते.’
आपल्या मनोगताच्या शेवटी प्रा. रिंढे म्हणतात, ‘इंधन ही कादंबरी जरी कोकणच्या पार्श्वभूमीवरील असली तरीसुद्धा त्या कादंबरीमधला प्रदेश हा आपल्याला आपले समाजवास्तव, आपले जाती आणि धार्मिक वास्तव यांच्यावरती अधिक प्रकाश टाकण्यासाठी हमीद दलवाईंनी वापरलेले आहे. ते केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही. एक विचारक म्हणून त्यांनी या प्रदेशाकडे पाहिल्यामुळे या कादंबरीत हा अधिकचा भाग आलेला आहे. साठोत्तरी काळातील अनेक कादंबरींच्या नायकांप्रमाणे इंधनचा नायकही तरुण आहे, बंडखोर आहे पण ही बंडखोरी मानवी अस्तित्वाचे पेच सोडवणारी आहे. या कादंबरीने जातवास्तव आणि स्त्रीवाद यांविषयीचा जो दृष्टीकोन 1965मध्ये मांडला तो आजही तितकाच ताजा आहे म्हणून ही कादंबरी अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्यातली वर्णने अगदी मोजक्या शब्दांत आहेत, कुठेही फापटपसारा नाही की पात्रे मुख्य आशय सूत्रापासून वेगळी होत नाहीत आणि जे काही आपण वाचतो ते मनाला खोलवर भिडणारे, अस्वस्थ करणारे असल्याचा अनुभव वाचकाला येतो. पन्नास वर्षांनंतरही कादंबरीचा आशय तितकाच ताजा असेल, ती तितकीच अस्वस्थ करत असेल आणि त्यातले लेखकाचे प्रतिपादन तितकेच रिलेव्हंट वाटत असेल तर या सगळ्यांवरून तो लेखक द्रष्टा असल्याचेच आपल्याला म्हणावे लागते म्हणून इंधन ही कादंबरी लिहिणारे हमीद दलवाई हे द्रष्टे लेखक होते असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो.’
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना ‘हमीद दलवाईंच्या कथा’ या विषयावर बोलण्यासाठी पाचारण केले. या वेळी शिरसाठ म्हणाले, ‘अवघ्या पाच वर्षांपूर्वीपर्यंत हमीद दलवाईंच्या कथा म्हटले की 13 कथांचा ‘लाट’ हा एकमेव कथासंग्रह वाचकांसमोर होता. त्यानंतर 2016मध्ये ‘जमीला जावद’ हा कथासंग्रह साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केला. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2021मध्ये ‘वंगण’ हा कथासंग्रह प्रसिद्ध होणार आहे. या तीन कथासंग्रहांत मिळून दलवाईंच्या 40 कथा आहेत... दलवाईंच्या या कथा 1952 ते 66 या चौदा वर्षांच्या काळात लिहिल्या गेल्या, म्हणजे दलवाईंनी वय वर्षे 20 ते 34 या काळात त्या कथा लिहिल्या... दलवाईंच्या सर्व 40 कथा विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील 15 कथा श्री.पु. भागवत संपादक होते त्या ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. उर्वरित कथा धनुर्धारी, नवयुग, मराठवाडा, साधना, वसुधा इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे संपादक अनुक्रमे प्रभाकर पाध्ये, आचार्य अत्रे, अनंतराव भालेराव, यदुनाथ थत्ते, विजय तेंडुलकर हे रथीमहारथी होते. वर उल्लेख केला आहे ती नियतकालिके, त्यांचे संपादक आणि तो काळ म्हणजे मराठी नवकथा उदयाला आल्यानंतरची दोन दशके समोर ठेवली तर दलवाईंच्या कथांचा दर्जा निर्विवादपणे ‘उत्तम’ होता हे त्या कथा वाचलेल्या नाहीत असा साहित्याचा वाचकही म्हणू शकेल.’
दलवाईंच्या कथेची भाषा समजावून सांगताना शिरसाठ पुढे म्हणाले, ‘दलवाईंच्या लेखनातील भाषेची विशेष नोंद घेतलीच पाहिजे. त्यांच्या काही कथांमधील संवादांत कोकणातील मराठी आणि त्या वेळच्या मुस्लीम कुटुंबात बोलली जात असलेली मराठी यांची झलक पाहायला मिळते मात्र उर्वरित निवेदन वा वर्णन प्रमाण मराठीत आहे आणि ही प्रमाण मराठी इतकी प्रवाही आहे, तिच्यातील शब्दरचना आणि वाक्यरचना इतकी नेमकी आहे की, केवळ उत्तम भाषा हा निकष लावला तरी दलवाईंचा समावेश मराठीतील आघाडीच्या लेखकांमध्ये करावा लागेल.’
आपल्या मनोगताच्या शेवटी शिरसाठ म्हणतात, ‘दलवाईंच्या अनेक कथांच्या मध्यवर्ती स्त्रिया आहेत. त्या बदलांच्या मोठ्या वाहक होऊ शकतात मात्र त्यांच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण केले जातात असा अर्थ त्या कथांच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणता येते. दुसरा मुद्दा असा की, दलवाईंच्या अनेक कथा जुन्या रूढी आणि परंपरा यांचा काच आणि त्यामुळे समाजजीवनाला आलेला बंदिस्तपणा दाखवतात. त्याचे प्रमुख कारण धर्माचे जोखड. मग तो धर्म कोणताही असो... हिंदू वा मुस्लीम. धर्माधर्मांमध्ये आंतरिक सलोखा असतो परंतु त्यांच्यात ताणतणाव होण्याच्या शक्यताही अधूनमधून निर्माण होत असतात... शिवाय धार्मिक वातावरणामुळे सामाजिक सलोखा निर्माण होण्यास हातभार लागत असला तरी धर्मामुळेच समाजजीवनाला साचलेपणही आलेले असते, असा आशय पुनःपुन्हा सूचित होतो. तिसरा मुद्दा असा की, दलवाईंच्या लेखनातील सर्व व्यक्तिरेखा मग त्या अन्यायग्रस्त वा अन्याय करणाऱ्या असोत किंवा सहनशील वा बंडखोरी करणाऱ्या असोत, प्रतिगामित्वाचा अहंकार मिरवणाऱ्या असोत वा आधुनिकतेच्या दिशेने जाण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या असोत... त्या सर्व व्यक्तिरेखा एवढेच नव्हे तर त्या प्रकारचे पर्यावरण वा सभोवताल भारताच्या आणि जगातील अनेक अविकसित देशांच्या कानाकोपऱ्यांत आजही आहे मात्र शोधक नजरेने ते पाहता यायला हवे. त्या अर्थाने दलवाईंच्या कथांची सार्वत्रिकता खूप जास्त आहे. या कथा अन्य देशीविदेशी भाषांमध्ये गेल्या तर त्याचा प्रत्यय येईल याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.’ (विनोद शिरसाठ यांचे संपूर्ण भाषण साधना साप्ताहिकाच्या 5 जून 2021च्या अंकात प्रसिद्ध झाले असून ते वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांना त्यांचे मनोगत मांडण्याची विनंती केली. या वेळी अन्वर राजन म्हणाले, ‘आज आपण सर्व जण साहित्य अकादमीद्वारा आयोजित परिसंवादात हमीद दलवाईंच्या साहित्यावर चर्चा करत आहोत ही आनंददायी बाब आहे... कारण हमीदभाई हयात असताना त्यांना साहित्य संमेलनामध्ये वक्ता म्हणूनही आमंत्रित करण्यात आले नव्हते की त्यांच्या साहित्यावर इतकी साधकबाधक चर्चा घडून आली नव्हती त्यामुळे ही उणीव आपण भरून काढत आहोत. हमीदभाईंच्या वैचारिक मांडणीत ‘मुस्लिमांनी प्रादेशिक भाषेत शिक्षण घ्यावे ही महत्त्वाची मागणी होती. दलवाई ज्या संस्कृतीतून आले त्या कोकणी संस्कृतीने हिंदूंना आणि मुस्लीमच नव्हे तर ते ज्यूंना आणि ख्रिश्चनांनाही सामावून घेतले. त्यांची ही मागणी धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणारीच आहे. कारण संस्कृती आणि भाषा या दोन्ही गोष्टी यांचा धर्माशी संबंध नसतो या बाबी धर्मनिरपेक्ष असतात.’
आपल्या मनोगतात अन्वर राजन पुढे म्हणतात, ‘उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे असा समज हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजांनी करून घेतला आहे आणि हेच खोडून काढण्याचे काम हमीदभाईंनी केले होते. भाषेचे असे राजकारण चालू असताना हमीदभाईंचं मराठीमधील साहित्य... मग त्या कथा असोत, कादंबरी असो की वैचारिक लेखन असो... हे महत्त्वाचं आहे त्यामुळे हमीद दलवाईंना समजून घ्यायचं असेल तर आधी धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आपल्याला समजून घ्यावा लागेल.’
यानंतर परिसंवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या हमीद दलवाई स्टडी सर्कलचे प्रमुख अझरुद्दीन पटेल यांना हमीद दलवाई यांच्या व्यक्तित्वाविषयी मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. ‘हमीद दलवाई यांचे मुस्लीम मन’ या विषयावर मांडणी करताना अझरुद्दीन पटेल म्हणाले, ‘निर्भीडपणा हा हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा गुण होता. ते विरोधाला घाबरणारे सुधारक नव्हते. अनेक कठीण प्रसंगांतही ते कधी डगमगले नाहीत की घाबरले नाहीत. धैर्याने ते अशा प्रसंगांना सामोरे गेले.’
हमीद दलवाई हे वास्तववादी सुधारक असल्याचे प्रतिपादन करताना पटेल म्हणाले, ‘ज्या सुधारणांचा पुरस्कार हमीद दलवाई करत होते त्या सुधारणा समाज लगेच स्वीकारणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्यांच्या कार्याला समाजातून, त्यातल्या त्यात उदारमतवादी हिंदू आणि समाजवादी गटांतून प्रचंड पाठिंबा मिळत होता. त्यांच्या कार्याचे प्रचंड कौतुक होत होते. धर्माची पोलादी पकड असणाऱ्या मुस्लीम समाजातूनही अल्पावधीतच त्यांना दोनशेतीनशे अनुयायी मिळाले. त्यांचे कार्य विस्तारत गेले मात्र दलवाई स्तुतीने हुरळून जाणारे सुधारक नव्हते. त्यांना वास्तवाची जाणीव होती आणि आपण ज्या सुधारणांचा पुरस्कार करत आहोत त्यांच्यासाठी दीर्घ काळ चळवळ करावी लागणार आहे याचीही जाणीव होती.’ (अझरुद्दीन पटेल यांचे संपूर्ण भाषण कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध झाले असून, ते इथे वाचता येईल.)
साहित्य अकादमी आयोजित ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ या परिसंवादात सर्व मान्यवरांच्या मांडणीनंतर न्यायमूर्ती हेमंत गोखले अध्यक्षीय समारोपात म्हणाले, ‘सर्व वक्त्यांची भाषणे अतिशय उद्बोधक होती. या परिसंवादातून हमीद दलवाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे, साहित्याचे विविध पैलू आपल्यासमोर आले. त्यांचा विरोध धार्मिकतेला नव्हता की ते त्यात हस्तक्षेपही करत नव्हते. त्यांचा विरोध होता तो सामाजिक आचारणामध्ये धर्माच्या हस्तक्षेपाला. तो थांबला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. समाजातील कुप्रथा, अनिष्ट रूढी थांबल्या पाहिजेत म्हणून त्यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली. 1966मध्ये तीन तलाक व इतर कुप्रथा यांविरोधात त्यांनी काढलेला सात मुस्लीम महिलांचा मोर्चा त्यामुळेच ऐतिहासिक होता. दुर्दैवाने त्यांना अवघे 44 वर्षाचे आयुष्य लाभले आणि या अल्पायुष्यातही त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि उभी केलेली आंदोलने हे कार्य पथदर्शक आहे.’
शेवटी न्यायमूर्ती हेमंत गोखले म्हणाले, ‘हमीदभाईंच्या विचारांत आणि लेखनात वैश्विकता असूनही दुर्दैवाने हमीदभाई महाराष्ट्राबाहेर तितकेसे परिचित नाहीत. त्यांच्या कार्याचा आणि साहित्याचा देशभर प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय संस्थेने ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ हा परिसंवाद आयोजित करून त्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. त्याबद्दल मी अकादमीचे, वक्त्यांचे आभार मानतो.’
(वृत्तांकन – समीर शेख)
sameershaikh7989@gmail.com
Tags: वृत्तांत साहित्य अकादमी हमीद दलवाई हेमंत गोखले नीतीन रिंढे अन्वर राजन अझरुद्दीन पटेल विनोद शिरसाठ एकनाथ पगार इंधन कथा मुस्लीम हिंदू कादंबरी Report Sahitya Akademi Hamid Dalwai Hemant Gokhale Nitin Rindhe Anwar Rajan Azahruddin Patel Vinod Shirsath Eknath Pagar Indhan Story Muslim Hindu Novel Load More Tags
Add Comment