29 सप्टेंबर 1932 ते 3 मे 1977 असं अवघं 44 वर्षं आयुष्य लाभलेल्या हमीद दलवाई यांची आज 89वी जयंती. देशात पुरोगामी आणि राष्ट्रवादी असे दोन गट पडलेले (की पाडलेले?) असताना एखादी व्यक्ती अत्यंत पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी मात्र त्याच वेळी प्रखर राष्ट्रभक्त असू शकते यावर कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हमीदभाई हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. राजकीय आणि सामाजिक भूमिका टोकाच्या झालेल्या असतानाच्या काळात कोणत्याही विचारधारेला 'न परवडणारं' व्यक्तिमत्त्व म्हणजे हमीदभाई. कोणत्याही एका साच्यात न बसू शकणारे हमीदभाई 'न परवडणारे' का आहेत हे समजून घ्यायचं असेल तर 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' हे त्यांचं पुस्तक नक्की वाचायला हवं.
हमीदभाईंनी ललित आणि वैचारिक असं दोन्ही स्वरूपाचं लेखन केलं. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे 1952मध्ये त्यांनी 'दहा रुपयांची नोट' ही पहिली कथा लिहिली. त्यानंतर समाजसुधारणेचं कार्य हाती घेईपर्यंत त्यांनी तत्कालीन मराठी साहित्यात अभावानंच आलेलं मुस्लीम भावविश्व रेखाटणारं ताकदीचं ललितलेखन केलं मात्र पुढे सामाजिक सुधारणेचं कार्य हाती घेतल्यानंतर मूलगामी चिंतक असलेले दलवाई कृतिशील विचारवंतही झाले.
आघाडीचा ललितलेखक ते शेवटचा आधुनिकतावादी - समाजसुधारक हा हमीदभाईंचा प्रवास थक्क करणारा असला तरी तो अविश्वसनीय वाटतो. तो त्यांना मिळालेल्या अल्पकाळात त्यांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याकरता... मुस्लीम समाजसुधारणेचं कार्य हाती घेतल्यामुळे त्यांना ललितलेखन थांबवावं लागलं. 1966च्या ऐतिहासिक मोर्च्यानंतर त्यांचं लेखन प्रामुख्यानं वैचारिक स्वरूपाचं राहिलं. आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 1977पर्यंत त्यांचं लेखन चालूच राहिलं. वैचारिक लेखनासाठी त्यांना केवळ दशकभराचा वेळ मिळाला. अगदी अलीकडेपर्यंत त्यांची दोनच वैचारिक पुस्तकं उपलब्ध होती. त्यांपैकी एक म्हणजे दिलीप चित्रे यांनी थेट इंग्लीशमध्ये आणलेलं आणि ज्याला धर्मनिरपेक्षतेचा जाहीरनामा म्हणता येईल असं 'मुस्लीम पॉलिटिक्स इन इंडिया' हे पुस्तक तर दुसरं पुस्तक म्हणजे त्यांनी मराठामध्ये लिहिलेल्या निवडक लेखांची पुस्तिका 'इस्लामचं भारतीय चित्र'. गेल्या काही वर्षांत साधना प्रकाशनानं हमीदभाईंच्या काही लेखांची 'कानोसा' ही छोटेखानी पुस्तिका प्रसिद्ध केली. त्याबरोबरच इंग्लीश पुस्तकाचा मराठी अनुवादही प्रसिद्ध केला. याशिवाय त्यांची मुलाखत आणि काही पत्रं असलेली 'अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट' हे पुस्तकही प्रसिद्ध केलं.
हमीदभाईंचं वैचारिक चिंतन मुख्यत्वे 'स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं मुस्लीम राजकारण' या विषयाभोवती होतं... मात्र त्यांच्या उपलब्ध पुस्तकांमध्ये या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षांनी म्हणजे 2002मध्ये त्यांचं आजवर अप्रकाशित राहिलेलं 'राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान' हे पुस्तक साधना प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आणि या विषयावर विस्तृत भाष्य करणारं त्यांचं लेखन समोर आलं.
पुस्तकाच्या सुरुवातीला साधनेचे भूतपूर्व संपादक ग. प्र. प्रधान यांनी प्रकाशकीय भूमिकेत या पुस्तकाच्या प्रवासाविषयी प्रांजळपणे आणि तरीही ठामपणे लिहिलं आहे. ते म्हणतात, "भारतीय समाजाच्या परिवर्तनासंबंधीचे हमीद दलवाई यांचे विचार मराठी वाचकांपर्यंत जावेत असे मला तीव्रतेने वाटे.... हमीद दलवाई हे त्यांचे लेखन प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याच्या मसुद्यात आवश्यक त्या सुधारणा करीत. या पुस्तकाचे लेखन झाल्यावर हमीद दलवाई हे फार आजारी पडले त्यामुळे पुस्तकातील लेखनावर त्यांना अखेरचा हात फिरवता आला नाही... हमीद दलवाई यांचे विचार आहे तसे देणे हेच प्रकाशकाचे नैतिक कर्तव्य आहे असे मी मानतो म्हणून त्यांचे अप्रकाशित लेखन आहे तसे 'साधना प्रकाशन' प्रसिद्ध करत आहे."
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि हमीदभाईंचे सहकारी आणि स्नेही भाई वैद्य यांनी पुस्तकाला विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी हमीदभाईंचा जीवनप्रवास तर रेखाटला आहेच शिवाय हे पुस्तक कुणी वाचलं पाहिजे, का आणि कसं वाचलं पाहिजे याविषयीही लिहिलं आहे. हमीदभाईंचं हे पुस्तक प्रत्येक विचारधारेच्या वाचकाला/पाइकाला अस्वस्थ करणारं, आरसा दाखवणारं आणि आत्मचिंतन करायला लावणारं असल्यामुळे त्यांनी प्रस्तावनेतच या पुस्तकाच्या वाचनाचं मॅन्युल दिलं असावं.
15 ऑगस्ट 2012 रोजी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती सुगावा प्रकाशनानं प्रसिद्ध केली. 208 पानांच्या या पुस्तकात आठ प्रकरणं आहेत. सत्तरीच्या दशकात राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या फार क्वचित पुस्तकांत इतिहास, वर्तमान राजकारण आणि त्या काळी अस्तित्वात असलेल्या राजकीय विचारधारा यांची इतकी सखोल आणि रूढ समजुती मोडणारी मूलगामी चिकित्सा करण्यात आली असावी.
भारतीय मुस्लीम प्रबोधन हा हमीदभाईंचा कृतिकार्यक्रम असला तरी त्यांचं अंतिम लक्ष्य भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावं असंच होतं. पुस्तक वाचताना त्यांची ही भूमिका पानोपानी जाणवते. धर्मचिकित्सा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे या पुस्तकातल्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी इस्लाम धर्मातल्या आणि इतिहासातल्या अनेक घटनांचा आणि व्यक्तींचा चिकित्सक आलेख मांडतात. निखळ मानवी मूल्यांच्या आड येणाऱ्या गोष्टींवर परखड टीका करतात मात्र ती करत असताना ते मुस्लीम द्वेषानं आंधळे होत नाहीत. इस्लामच्या इतिहासावर निर्भीडपणे भाष्य करताना मुहम्मद पैगंबरापासून ते औरंगजेबापर्यंत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची साक्षेपी चिकित्सा ते करतात.
मुस्लिमांच्या धार्मिक चळवळी या दुसऱ्या प्रकरणात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुस्लिमांच्या धार्मिक चळवळी, त्यांच्या प्रेरणा आणि त्या चळवळींनी घडवलेले बरेवाईट परिणाम यांचा ते आढावा घेतात. राजकीय इस्लामचा हिरिरीनं पुरस्कार करणाऱ्या शाह वलीउल्लाहच्या इस्लामी पुनरुत्थानवादी चळवळीपासून ते सर सय्यद अहमद खान यांच्या मुस्लीम आधुनिकीकरणाच्या अलिगढ चळवळीपर्यंतचा लेखाजोखा हमीदभाई या प्रकरणात मांडतात. तो मांडत असताना धर्मनिरपेक्षता आणि मानवी मूल्य यांच्या आड येणाऱ्या मुस्लीम व्यक्ती आणि चळवळी यांच्यावर ते प्रखरपणे टीका करतात. त्यांनी मांडलेली निर्भीड मतं वाचताना बरेचदा वाचकावरच दडपण येतं. रूढ समजुतींना धक्के बसायला लागल्यामुळे काही वेळा तो अस्वस्थही होतो मात्र त्यातून हमीदभाईंची रॅशनल म्हणता येईल अशी भूमिका दृढतेनं पुढे येते आणि तत्कालीन विचावंतांच्या तुलनेत दलवाई यांचं मोठेपणही अधोरेखित होतं.
पाकिस्तानची चळवळ या प्रकरणात अर्थातच भारताच्या फाळणीपर्यंतच्या मुस्लीम राजकारणाची परखड चिकित्सा हमीदभाईंनी केली आहे. काही अपवाद वगळता तत्कालीन मुस्लीम राजकारण्यांचा दुटप्पीपणा, अभिजन मुस्लीम वर्गानं जीनांभोवती केलेली गर्दी, जीनांचा आक्रस्ताळेपणा यांच्यावर हमीदभाईंनी केलेलं भाष्य मुळातूनच वाचण्यासारखं आहे पण फाळणीसाठी काँग्रेस किंवा नेहरू, गांधी यांना दोष देणाऱ्यांविषयी आश्चर्य व्यक्त करताना हमीदभाई जी व्यावहारिक भूमिका मांडतात ती त्यापूर्वी क्वचितच कुणी मांडली असावी. हमीदभाईंच्या ठायी असलेली कमालीची वैचारिक स्पष्टता यांतून दिसते.
हिंदू-मुस्लीम संबंधाबरोबरच भारत-पाक संबंधावर हमीदभाई पुढच्या प्रकरणात भाष्य करतात. या वेळी त्यांचा पवित्रा 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असा आक्रमक आहे. त्यासाठी ते खुद्द जिना आणि तत्कालीन पाकिस्तानधार्जिण्या नेत्यांच्या भाषणांचे आणि लेखनाचे दाखले देतात. पाकिस्तानचं भारतविरोधी धोरण, इस्लामी राष्ट्र, काश्मीर प्रश्न आदी प्रश्नांवर या प्रकरणातून ते परखड भाष्य करतात. हे सर्व करत असतानाच ते भारतातल्या तत्कालीन मुस्लीम राजकीय, सामाजिक प्रवाहात उमटणाऱ्या प्रतिक्रियाही नोंदवतात. त्यासाठी रेडियन्ससारख्या जमातवादी मुखपत्रांतल्या लेखनाचे पुरावे ते देतात.
'भारतीय मुसलमान' या प्रकरणात ते स्वातंत्र्योत्तर काळात बदललेल्या तत्कालीन मुस्लीम राजकारणाचा आणि विचारवंतांच्या भूमिकांचा चिकित्सक आढावा घेतात. मुस्लीम नेते, वृत्तपत्रं आणि संघटना यांच्या दुटप्पी आणि धर्मनिरपेक्षतेला हरताळ फासणाऱ्या कृत्यांचे अनेक दाखले हमीदभाई देतात. अलिगढ विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी झालेली त्यांची 'चर्चा' आणि अशा अनेक घटनांचा उल्लेख करत असतानाच ऐहिक प्रश्नांची उत्तरं धर्मग्रंथात शोधणाऱ्या मुस्लीम मानसिकतेवरही ते भाष्य करतात.
शेवटच्या प्रकरणाकडे येईपर्यंत हमीदभाई तत्कालीन विचारप्रवाहांना आणि समजांना चांगलेच धक्के देतात. त्यांच्या चिकित्सक लेखनातून पुरोगामी, समाजवादी आणि कम्युनिस्टही सुटत नाहीत. या सर्वांवर त्यांनी अनेक ठिकाणी जबरदस्त कोरडे ओढतात. समारोपाच्या प्रकरणाआधीच्या प्रकरणाचं शीर्षक आहे हिंदुत्ववाद. 'भारतात केवळ हिंदू उरले तरी हा देश धर्मनिरपेक्षच राहिला पाहिजे...' असं म्हणणाऱ्या हमीदभाईंचे आजवर विस्तृतपणे पुढे न आलेले हिंदुत्ववादाची चिकित्सा करणारे विचार या प्रकरणातून समोर येतात. हमीदभाईंच्या मृत्यूपर्यंत हिंदुत्ववादानं भारतीय राजकारणाचं विश्व व्यापलेलं नव्हतं. त्या वेळी या विचारधारेचा प्रवाह क्षीण होता मात्र तरीही या प्रकरणात ते संघ, हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्या कार्याची परखड चिकित्सा करतात. निखळ, निधर्मी आणि प्रखर धर्मनिरपेक्षतावादी असलेल्या हमीदभाईंनी या प्रकरणात वि.दा. सावरकर यांची केलेली चिकित्सा मुळापासून वाचण्यासारखी आहे.
हमीदभाई लिहितात, ‘सावरकरांच्या आधुनिकतेला मुस्लिमविरोधाची बैठक लाभलेली आहे. या त्यांच्या आधुनिक विचारांच्या बैठकीचा संदर्भ ध्यानी घेतला म्हणजे सावरकरांना मुस्लिम समाजाची भीती वाटत होती हे लक्षात येते. भारतीय मुस्लिम समाजाच्या तीनपट मोठा असलेला हिंदू समाज कालांतराने नष्ट होणार आहे, मुसलमान समाज त्याला गिळंकृत करणार आहे, या भीतीने ते पछाडलेले होते आणि मग अफगाणिस्तान भारतीय मुसलमानांच्या संगनमताने भारतावर हल्ला करणार आहे असे त्यांना वाटू लागले आणि ते भारतीय वृत्तपत्रांतून अफगाणिस्तानच्या अमीराला हल्ला न करण्याची ताकीद देत. त्याला असाही इशारा देत की आम्ही एकटे नाही. नेपाळ हे हिंदू राष्ट्र आपल्या मदतीला धावून येईल. राष्ट्रवादाच्या प्रेरणांविषयी कमालीचे अज्ञानी असलेल्या सावरकरांची ही विधाने हास्यास्पद होती.’ (पृ. 173)
इस्लामची निर्भीड चिकित्सा करून, मुस्लीम मानसिकतेवर टीका करत असतानाच भारतीय मुस्लीम मन बदलू शकतं यावर हमीदभाईंचा पूर्ण विश्वास होता. या पुस्तकात ते हा आशावाद व्यक्त करताना दिसतात. त्याची अनेक उदाहरणंही देतात.
प्रकाशकीय मनोगतात लिहिल्याप्रमाणे पुस्तकावर हमीदभाईंना शेवटचा हात फिरवता न आल्यामुळे त्यात स्वाभाविकपणे काही त्रुटी राहिल्या आहेत. पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणातल्या पहिल्याच परिच्छेदात 'इस्लामचे भारतातील आगमन हे हिंसक मार्गाने झाले असल्याचे' ते नोंदवतात. गेल्या चाळीस वर्षांत भारतीय मुस्लिमांशी संबंधित नवनवे संशोधन पुढे आले. इस्लामचं भारतात आगमन प्रेषित मुहम्मद यांच्या हयातीत अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शांततेच्या मार्गानं झालं ते केरळमध्ये, हे तथ्यही त्यातूनच समोर आले. लेखनसीमेमुळे या इतिहासाच्या तपशिलात इथे जाता येणार नाही.
या पुस्तकातल्या हिंदुत्ववाद या प्रकरणाविषयी हिंदुत्ववादी वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असत. 'हे प्रकरण हमीदभाईंनी लिहिलेले असूच शकत नाही. ते गेल्यावर कुणीतरी (विशेषतः भाई वैद्य यांनी) ते प्रकरण लिहून दलवाई यांच्या नावाने ते खपवले आहे. दलवाई हिंदुत्ववादावर टीका करूच शकत नाहीत.' अशी कुजबुज अनेक उजव्या विचारवंतांमध्ये होती. प्रस्तुत लेखकानं हमीदभाईंच्या या पुस्तकाचं मूळ हस्तलिखित मिळवून त्यातलं हस्ताक्षर त्यांच्या इतर हस्तलिखितांशी (पत्रं, डायरी वगैरे) पडताळून पाहिलं असता हे प्रकरण हमीदभाईंनीच लिहिलेलं असून याविषयीच्या ‘चर्चा’ या जाणीवपूर्वक पसरवलेल्या अफवा असल्याचंच सिद्ध होतं.
धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कुणालाही हमीदभाई न परवडणारे आहेत हे लेखाच्या सुरुवातीला म्हटलं ते याचसाठी.
- समीर शेख
sameershaikh7989@gmail.com
Tags: हमीद दलवाई पुस्तक राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान परिचय समीर शेख हिंदू मुस्लीम मुहम्मद अली जिना सावरकर Hamid Dalwai Book Review Islam Muslim Hindu Hindutvawadi RSS Savarkar Sameer Shaikh Load More Tags
Add Comment