राजदंड

शांतिपर्वातील कथा : 3

माझ्या तपाचा किंवा सामर्थ्याचा या ठिकाणी उल्लेख करण्याचीही गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत तुला शासन करण्याचा अधिकार माझा नाही. अपराध्याला शासन करणे हा सर्वस्वी राजाचा अधिकार आहे. राजदंड हाती असणाऱ्याचा तो अधिकार आहे. त्याचा उपयोग माझ्यासारख्या प्रजाजनाने करणे म्हणजे अराजकाला आरंभ करण्यासारखे आहे. अपराध कितीही क्षुल्लक असो आणि अपराधी कितीही श्रेष्ठ असो, अपराध्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तीही राजदंडाच्या साहाय्याने. म्हणूनच मला कर्तव्यकठोर बनावे लागले आणि राजा सुद्युम्नानेही तुझी प्रतिष्ठा विचारात न घेता राजधर्मपालनाचे कर्तव्य केले.

व्यास : राजा आणि राजदंड अभेद्य असतात. राजदंड हीच राजाची शासनशक्ती. ज्या राजाला राजदंड पेलण्याचे सामर्थ्य नसते तो प्रजेच्या पापाचा धनी होतो आणि स्वतःबरोबर प्रजेच्याही नाशास कारणीभूत ठरतो. शत्रूला विरोध न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या दोघांनाही भूमी ग्रासून टाकते. बिळामध्ये सतत राहणाऱ्या मूषकाला सर्प भक्षण करतो; त्याप्रमाणे राजदंडाचे सामर्थ्य उपयोगात न आणणाऱ्या राजाला शत्रू नष्ट करून टाकतात. म्हणूनच राजाच्या सर्व कृत्यांमध्ये दंडधारणाचे कृत्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. दंडधारणामुळेच राजाला सिद्धी प्राप्त होते.

धर्म : दंडधारणाचे एवढे माहात्म्य आहे काय ? यापूर्वी दंडधारणामुळे एखाद्या राजाला सिद्धीची प्राप्ती झाली आहे काय ?

व्यास : होय. सुधुम्नाने राजदंडाचा योग्य वेळी न्याय्य उपयोग केला आणि त्याला उत्कृष्ट प्रकारची सिद्धी प्राप्त झाली.

धर्म : मग मला त्याची कथा ऐकावयाची आहे.

बाहुदा नदीच्या काठी दोन सुंदर आश्रम होते. महर्षी शंख आणि महर्षी लिखित यांची ती वसतिस्थाने होती. अत्यंत रम्य आणि पवित्र असे नदीचे पात्र आणि त्याच्या शेजारच्या त्या तपोवनात या दोन बंधूंचे वास्तव्य, अशा अनन्य संयोगामुळे त्या भूमीचे सौंदर्य आणि शुचिता अनेक पटींनी वाढली होती. त्या दोघांचे बंधुप्रेम, सत्यप्रियता आणि शुद्ध आचरण यांचा प्रभाव त्या भूमीवर सर्वत्र व्यक्त होत होता. आश्रमातील वेदाभ्यासाने आसमंत दुमदुमून जात होता. नदीच्या तीरावरील फुललेल्या निसर्गसौंदर्याला पारावार नव्हता. त्या दोघांचे आश्रम निराळे असले तरी त्यांची हृदये एक होती. त्यांचे बंधुप्रेम अद्वितीय होते. आश्रमाभोवती फलपुष्पांनी बहरलेले वृक्ष होते. लता-वेलींनी त्यांच्या आश्रमांची शोभा अधिकच वाढविली होती. शांतता, प्रसन्नता आणि रम्यता यांचा अपूर्व संगम त्या वातावरणात झालेला होता.

आश्रमात चाललेला वेदघोष सर्वत्र निनादत होता. समिधांच्या धूम्रवलयांनी वायु-मंडळातील दूषित हवा नष्ट होत होती. विद्या, विनय आणि चारित्र्य यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून सर्व जण शंख-लिखिताची प्रशंसा करीत असत.

त्या दिवशी अनध्याय होता. आश्रमाभोवती सर्वत्र शांतता होती. वेदघोष ऐकू येत नव्हता. दैनंदिन व्यवहाराला खंड पडला होता. सर्वत्र कसे स्तब्ध, शांत होते. शंख काही कामानिमित्त आश्रमाबाहेर गेला होता. त्याच्या आश्रमात कोणीही नव्हते. तीन प्रहरची वेळ. लिखित सहज आपल्या आश्रमाबाहेर आला. समोरच्या पर्णराजीकडे त्याचे लक्ष गेले. त्यातील काही वृक्ष मधुर फळांनी बहरले होते. फळांचा रंग, मोहकता आणि पक्क्वता यांनी लिखिताच्या मनात ती फळे खाण्याची अनिवार इच्छा उत्पन्न झाली. पण ती मिळायची कशी? कारण ती शंखाच्या आश्रमाच्या आवारात होती ना!

लिखिताला मोह आवरला नाही. तो त्या आवारात गेला आणि काही रसाळ फळे तोडून त्यांचा आस्वाद घेऊ लागला. वडील बंधूची अनुज्ञा न घेता त्याच्या आश्रमाच्या परिसरात जाऊन आपण फलाहार करीत आहोत याचेही त्याला भान राहिले नाही.

तेवढ्यात शंख तेथे आला. लिखिताचे वर्तन त्याला आवडले नाही. त्याने विचारले, “तुला ही फळे कोणाकडून मिळाली?"

लिखित चाचरला. वडील बंधूजवळ जाऊन त्याने वस्तुस्थिती सांगितली आणि त्याची क्षमा मागितली. पण शंखाचे मन शांत होण्याऐवजी अधिकच संतप्त झाले. मुद्रा रागीट बनली. बंधूची मन:स्थिती लिखिताच्या लक्षात आली. तो म्हणाला, "असा रागावू नकोस. तुझ्या आश्रमाच्या परिसरातील या समोरच्या वृक्षाचीच फळे मी खात आहे. त्यासाठी तुझी अनुज्ञा घ्यावयास हवी होती, पण ती न घेण्यात माझी चूक झाली, मला क्षमा कर!"

शंख म्हणाला,"अनुज्ञा न घेता तू ही फळे भक्षण करीत आहेस.. याचा अर्थ तू चोरी केली आहेस असा होत नाही काय?" लिखित म्हणाला, "होय. खरोखर मी चोरी केली आहे. त्यासाठी मला तू हवी ती शिक्षा कर."

शंख म्हणाला, "नाही! मी तुला शिक्षा करू शकणार नाही. तु चोरी केली आहेस आणि या अपराधाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार राजाला आहे. कोणत्याही अपराधाबद्दल फक्त राजाच शिक्षा करू शकतो."

लिखिताने आपल्या बंधूची पुष्कळ विनवणी केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. शंखाने त्याला पुन्हा निक्षून सांगितले, “अपराध्याला शिक्षा करणे राजाचे कर्तव्य असते. राजा दंडधारी आहे. शासन करणे अथवा न करणे याचा त्यालाच अधिकार आहे. मला काहीही करता येणार नाही आणि मी काही करूही नये. तू राजाकडे जा आणि चोरी केल्याचे त्याला तू स्पष्ट सांग. तू असेही म्हण की, हे राजा, मी चौर्यकर्म केले आहे. त्याला योग्य असेल ती शिक्षा मला दे.

शंखाचे निर्वाणीचे भाषण ऐकून लिखित थोडा वेळ स्तब्ध राहिला. नंतर त्याला आपल्या बंधूचे म्हणणे पटले. तो लगेच सुद्युम्न राजाकडे गेला.

धर्मशील आणि कर्तव्यदक्ष राजा म्हणून मुथुम्नाची सर्वत्र ख्याती होती. लिखितासारखा श्रेष्ठ महर्षी आपल्याकडे आला आहे असे द्वार पालांच्या तोंडून ऐकताच राजा सुद्युम्न अमात्यांना बरोबर घेऊन त्याला सामोरा गेला. सन्मानाने त्याला उच्च आसनावर आग्रहपूर्वक बसविले. राजा म्हणाला, "हे भगवन्! आज आपण इकडे कोणत्या हेतूने आला आहात? आपले अभीष्ट समजू द्या. मी ते लगेच पूर्ण करीन."

"राजा, माझी इच्छा पूर्ण करीन असे तू मान्य केले आहेस ते एका अर्थी बरेच झाले. तुला आता आपल्या वचनापासून माघार मात्र घेता येणार नाही."

"पण आपले उद्दिष्ट काय ते तर कळू द्या."

"मी चोरी केली आहे. मला माझ्या अपराधाबद्दल शासन कर." 

"चोरी? आणि आपण?"

"होय, मीच! माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या आश्रमाच्या परिसरातील वृक्षाची मी फळे खाल्ली आणि तीही बंधूंच्या अनुमतीवाचून. या अपराधाबद्दल मला शासन हवे आहे आणि ते करण्याचा तुलाच अधिकार आहे."

"महर्षी, दंड करण्याविषयी राजा हाच प्रमाण असतो हे आपले म्हणणे राजनीतीला धरूनच आहे. हा माझा अधिकार मान्य केला म्हणजे आपल्या अपराधाला शिक्षा न देण्याचा अधिकारही माझाच आहे, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. आपण धर्मनिष्ठ आहात. आपले आचरण शुद्ध आहे. म्हणून मी आपल्या प्रस्तुतच्या कृत्याला अनुमती देतो. म्हणजे मग शिक्षा देण्याचा प्रश्नच उरत नाही. आता आपण आपली दुसरी इच्छा सांगा. आपली आज्ञा मानण्यास मी सदैव तयार आहे."

"राजा, माझी दुसरी काहीही इच्छा नाही. मला काय हवे आहे ते मी सांगितले. मी चोरी केली आहे आणि चोराचा करच्छेद करणे ही त्यावरील शिक्षा आहे. ती तू मला कर. राजधर्माचे हे सूत्र तुला उल्लंघन करता येणार नाही. तेव्हा विलंब न करता तू माझे हात तोड." राजा निरुत्तर झाला. त्याला शिक्षा करण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही. त्याने लिखिताचा करच्छेद केला, आणि आपले कर्तव्य पार पाडले.

लिखित दुःखित अंतःकरणाने आपल्या बंधूकडे गेला आणि त्याला म्हणाला, "आता मला शासन झाले आहे; तूही क्षमा कर. आपल्या धाकट्या बंधूवर रागावू नकोस."

शंख गहिवरला आणि शांतपणे म्हणाला, "मी तुझ्यावर रागावलो नाही आणि तुला दोषही देत नाही. तुझ्या हातून धर्माचा अतिक्रम घडला. धर्मबाह्य वर्तनाबद्दल प्रायश्चित्त मिळणे आवश्यक असते. तुझे सुंदर हात विच्छिन्न झाल्याबद्दल मला अत्यंत दुःख होत आहे. तू आता बाहुदा नदीच्या प्रवाहात जा. देव, ऋषी आणि पितरांना यथाविधि तर्पण कर. त्यामुळे तुझ्या अंतःकरणातील मालिन्य नष्ट होईल. तू पुनः पवित्र होशील."

शंखाचे भाषण ऐकून लिखित नदीच्या प्रशांत प्रवाहाकडे गेला. त्याने स्नान केले आणि तर्पणासाठी आपले हात पाण्यात घातले. त्याबरोबर त्याचे दोन्हीही हात पुन्हा सुंदर कमलाप्रमाणे दिसू लागले.

लिखित सद्गदित झाला. आपल्या बंधूकडे परत येऊन तो म्हणाला, "तुझ्या तपाचा एवढा प्रभाव असताना तूच मला यापूर्वी का पवित्र केले नाहीस? मला राजाकडे कशाला पाठविलेस? "

शंख म्हणाला, ‘"मी केले तेच योग्य होते. माझ्या तपाचा किंवा सामर्थ्याचा या ठिकाणी उल्लेख करण्याचीही गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत तुला शासन करण्याचा अधिकार माझा नाही. अपराध्याला शासन करणे हा सर्वस्वी राजाचा अधिकार आहे. राजदंड हाती असणाऱ्याचा तो अधिकार आहे. त्याचा उपयोग माझ्यासारख्या प्रजाजनाने करणे म्हणजे अराजकाला आरंभ करण्यासारखे आहे. अपराध कितीही क्षुल्लक असो आणि अपराधी कितीही श्रेष्ठ असो, अपराध्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तीही राजदंडाच्या साहाय्याने. म्हणूनच मला कर्तव्यकठोर बनावे लागले आणि राजा सुद्युम्नानेही तुझी प्रतिष्ठा विचारात न घेता राजधर्मपालनाचे कर्तव्य केले."

- स. मा. गर्गे

Tags: राजकारण महाभारत भीष्म युधिष्ठिर शांतिपर्व समाजशास्त्र शंख आणि लिखित Load More Tags

Add Comment